दुर्दैव

Submitted by डॉ अशोक on 11 August, 2013 - 03:59


दुर्दैव

वहात जावे ज्यांच्या संगे, प्रवाह ऐसे उरले नाही
दिपून जावे डोळे ज्यांनी, भास्कर ऐसे दिसले नाही
*
कितीक पंचम्या आल्या गेल्या, पुंग्या ही वाजवून झाल्या
भिनून घ्यावे जहर जयांचे, नागच ऐसे डसले नाही !
*
प्रवास झाला उभा-आडवा, थकून होतो कधी थांबलो
राहुन जावे कायम जेथे, गावच ऐसे भिडले नाही
*
शिकार व्हावी हीच मनीषा, व्हावे लक्ष्य ही एकच आशा
रक्ताळूनही मन हासावे, बाणच ऐसे घुसले नाही
*
रदिफ-काफिये नाचून गेले, घेवुन आले अलामतींना
ठाव घेतील रसिक मनाचा, शेरच ऐसे सुचले नाही

-अशोक
११/०८/२०१३
(नागपंचमी)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कितीक पंचम्या आल्या गेल्या, पुंग्या ही वाजवून झाल्या
भिनून घ्यावे जहर जयांचे, नागच ऐसे डसले नाही

आवडले.