माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ८

Submitted by केदार on 8 August, 2013 - 13:54

माझ्या नवीन मित्रांकडे त्सो मोरिरीचे परमिट नव्हते. आजचा लेक पाही पर्यंत त्यांचे तळ्यात मळ्यात होते. त्यांनी म तेथील लोकांना विचारल्यावर त्सो मोरिरी, पँगाँग पेक्षा जास्त चांगला आहे आणि तिथे गोरे लोक जास्त जातात आणि पँगाँगला भारतीय, शिवाय त्सो कार देखील तुम्हाला बघायला मिळेल असे तेथील लोकांनी त्यांना (मी जे सांगत होतो तेच) सांगीतल्यावर त्यांनाही त्सो मोरिरी बघावा वाटला आणि आमची कंपनी आणखी वाढली. मग ते परमिट घेण्यासाठी ज्याकडून त्यांनी बुलेट घेतली होती त्यालाच त्यांनी विनंती केली. बरेचदा लोकल एजंटचे काही मुलं लाईनीत आधीपासून असतात त्यामुळे मी त्यांना (ग्रूपला) टेंगझिनचीच मदत घ्यायला सांगीतले. त्याकडे मग ओरिजनल परमिट देऊन दोघेजण टेंगझिन सोबत गेले आणि मी गाडीच्या तेलपाण्याचे बघायला. माझ्यासोबत प्रतिकही आला. डिझेल भरून आम्ही मस्त नाष्ता वगैरे करून बाकी पब्लिकची वाट बघत बसलो. तिथे ( डी सी ऑफिस मध्ये) आजपासून पँगाँगचे परमिट देण्याचे बंद झाले हे कळाले, पण का? हे नीट कळाले नव्हते.

त्सो मोरिरी वरून पांग मार्गे मनाली कडे जाता येते त्यामुळे परत लेहला येण्याची गरज पडत नाही. त्यामुळे मी आज माझ्या गाडी सोबत त्यांनी देखील आणखी एक गाडी घेतली. कारण त्यांच्याकडे भरपूर सामान होते आणि माझे सामान, त्यांचे सामान व आम्ही सात जण एका गाडीत तसेही बसू शकलो नसतो. खार्दूंगला वर क्रिकेट खेळताना काही टॅक्सी ड्रायव्हर ओळखीचे झाले, तिथेच आम्ही त्यांचे फोन नं घेतले होते. मग होता होता १८००० रू मध्ये त्यांना टॅक्सी मिळाली.

त्सो मोरिरी ते मनाली जायला दोन रात्र स्टॉप घ्यावा लागतो. पहिली त्सो मोरिरी, दुसरी केलाँग किंवा जिस्पा आणि मग तिसरे दिवशी आपण मनाली मध्ये पोचू शकतो.

manali_map.JPG

हा पूर्ण रस्ता ६५० किमीचा आहे. लेह-उपशी-चुमाथांग-माहे-कर्झोक- पुगा - (मग मनाली हायवे लागतो आणि आपण टांगलांगलाच्या पायथ्यापाशी निघतो) - पांग - सर्चू - केलाँग - जिस्पा - मनाली.

आधी लिहिल्यासारखे लेह आणि कारू मध्येच पंप आहे. पुढचा पंप मनालीच्या जवळ टंडी मध्येच! म्हणजे ६५० किमी मध्ये एकही पंप नाही. ज्या गाड्यांचे टँक लहान आहेत आणि बाईक ह्यांना पेट्रोल / डिझेल सोबत बाळगावे लागते. माझ्या गाडीचा टँक ७० लिटर आहे व अ‍ॅव्हरेज आत्तापर्यंत १०-११ चे (डोंगरात आणि १४ प्लेन्स) मिळत असल्यामुळे मला तशी गरज नव्हती कारण मी अजून २० लिटर देखील गाडीत घेतले होते. मी जाणार होतो ते हानले पण ह्याच रस्त्यावर आहे. जर तुम्ही स्वतः ड्राईव्ह करणार असाल तर पेट्रोलची सोय आधी बघावी लागेल. ह्या रस्त्यावर काहीही सोयी नाहीत. मध्येच एखाद ढाबा लागतो तेवढेच. आणि गाडी बंद पडली तर यू आर ऑन युवर ओन. कुठल्याही गावात काहीही सोय नाही, इतकेच नाही तर तिथे सेल फोन चालत नाही. अगदी बिसएनएलचा पोस्टपेड सुद्धा चालत नाही. एकदम रिमोट जागा आहे ही.

लेहला फायनल गुडबाय केला आणि आम्ही चुमथांग डेसर्टच्या दिशेने जाऊ लागलो. लेह ते त्सो मोरिरी रस्त्यावर एकही मोठा पास नाही. सगळा रस्ता चुमथांग डेझर्ट मधून आहे. ह्या रस्त्याएवढा सुंदर सिनिक राऊट मी तरी अजून पाहिला नाही. वन ऑफ द बेस्ट रोड्स टू ड्राईव्ह. लेह पासून त्सो मोरिरी २२० + किमी वर आहे. तेथे करझोक नावाचे गाव आहे , जिथे तुम्हाला राहायला, टेन्ट, गेस्ट हाऊस आणि होम स्टे हे सर्व दिसतील. टेन्टची किंमत ४००० रू आहे तर होम स्टे तुम्हाला ७-८०० रू मध्ये मिळेल.

लेह पासून मनाली रस्त्यावर निघून कारूला जायचे, कारूला पँगाँगला लोक डावीकडे वळतात, आपण तिकडे न वळता उपशी कडचा रस्ता घ्यायचा आणि सरळ जायचे. जाताना अर्ध्या-एक किमी नंतर जर मध्ये आपण (कारू मधूनच) उजवीकडे वळलो तर हेमिस गोम्पा लागतो. लेह मधील सर्वात श्रीमंत मोनेस्टरी!

आम्हाला निघायला खूप वेळ झाला असल्याकारणाने मी हेमिस पर्यंत गेलो पण मध्ये (देवळात) नाही गेलो कारण ऑलरेडी १२:३० वाजले होते.

आज लेहपासूनच पुढे आम्हाला सिंधू सोबत असणार होती. पार माहे ब्रिज पर्यंत.

हा पूर्ण रस्ता नदीच्या बाजूने जातो.

त्या वैराण वाळवंटात नदीकिनारी थोडी हिरवळ मात्र नक्कीच आहे.

चुमाथांग येण्या अगोदर आम्हाला परत ब्रो ने थांबविले कारण लॅन्ड स्लाईड झाली होती. इथे आम्हाला दोन एक तास थांबावे लागले. गेले एक तास माझ्यासोबत एक मिल्ट्री जिप्सी होती. कधी तो समोर तर कधी मी असे चालू होते. आम्हाला थांबवल्यावर मी गाडीतून उतरून सिंधूच्या पाण्याला न्याहाळत उभे होतो तर ग्रूप मधील पब्लिक दुसर्‍या एका मिल्ट्री ट्रक वाल्याशी बोलत होते. तो मिल्ट्री वाला (जिप्सीतला) उतरला आणि माझ्याकडे येऊन त्याने मला गाडीबद्दल विचारले, कशी आहे, चालते कशी वगैरे वगैरे. थोड्याच वेळात आम्ही चांगले मित्र झालो आणि बर्‍याच विषयांवर (पाक, चीन आक्रमन, रोजची मारामारी, दिल्लीत बसणारे पुढारी आणि त्यांचे अफलातून आदेश) मारल्या. त्याचे नाव लेफ्टनंट कर्नल प्रसन्ना. त्याच्यावरच ची आजची जबाबदारी होती पँगाँगला अडकलेल्या लोकांना मदत करण्याची आणि तो उलट्या रस्त्याने (माझा कालचा मुळ मॅप बघा, चुसुल, त्सागा ला, मान मेरेक रस्ता) पँगाँगला चाल्ला होता. कारण? काल रात्रभरात एकूण ५०० मिटरची लॅन्ड स्लाईड झाली होती आणि लेह- पँगाँग रस्ता नीट व्हायला किमान दोन ते तीन दिवस लागणार होते, मग जे लोकं काल रात्री पँगाँगला होते त्यांना मदतीसाठी मिल्ट्री निघाली होती ! दोन तीन दिवस ! माय गॉड. मग मला कालच्या पाण्याचे रहस्य समजले. गेले दोन तीन दिवस क्लिअर असल्यामुळे खूप बर्फ वितळला होता आणि त्यामुळे ही एवढी मोठी लॅन्ड स्लाईड झाली होती. आणि त्यामुळेच काल पँगाँगला मला वॉटर क्रॉसिंग मध्ये खूप जास्त पाणी आढळले होते ! वाचलो मी पण ! आणि डी सी ऑफिसने परमिट देणे का बंद केले हे ही कळाले. कालच वापस यायचा निर्णय बरा होता. तसा मी काल रात्री राहिलो असतो तरी ह्या (माझ्या मुळ) रस्त्याने आज त्सो मोरिरीला असलो असतो पण मित्रांकडे परमिट नव्हते त्यामुळे आम्ही वापस गेलो. दोनेक तासांमध्ये प्रसन्नाने मला येथील ( लेह मधील) व बाहेरच्या जसे, पाक मधील लोकांनी आपल्या जवानाचे डोके कापून नेले ह्या घटनेबद्दल पण माहिती दिली, जी मला एकदम रोमांचकारी वाटली. रस्ता सुरू झाल्यावर त्याला पुढच्या त्याच्या टास्क बद्दल मी बेस्ट लक देऊन निघालो.

आम्ही चुमाथांग गावात जेवायला थांबलो. त्या गावी डोर्जेची ( दुसर्‍या गाडीचा ड्रायव्हर) बहिण नांदते. मग आम्ही तिथेच जेवलो. चुमाथांग गावात देखील गरम पाण्याचे झरे आहेत. ते सर्व झरे अगदी सिंधूच्या तिरावर आहेत. काही ठिकाणी एकदम उकळणारे पाणी आहे. हात घातला तर एकदम भाजेलच इतके. डोरजेने इथे अनेकदा मॅगी ह्या झर्‍यांवर बनवून खाल्ली आहे, आजही तसेच करू असे म्हणाला पण मी तो प्लान उधळून लावला कारण समोरच्या ढाब्यात मस्त पैकी दाल भात होता !

त्सो मोरिरी जवळ अनेक छोटे छोटे लेक आहेत. जसे त्सो कियागर, त्सो कार, मिरपाल त्सो वगैरे वगैरे. हा दिसतोय तो त्सो कियागर.

त्सो कियागरपाशी थोडावेळ थांबून आम्ही पुढे त्सो मोरिरीला निघालो. ह्या भागात ब्लू नेक क्रेन, वाईल्ड आस कियांग आणि ब्राह्मी बदक दिसतात. कियांग हा एक वेगळ्याप्रकारचा गाढव आहे. त्याचे फोटो माझ्याकडे नाहीत, कारण जेंव्हा तो मला दिसला तेंव्हा मी चालत चालत गाडीपासून बराच दुर (केवळ निसर्ग पाहण्यासाठी म्हणून कॅमेरा न घेता) गेलो होतो.

नामशांग ला (१५८०० फुट जरी ते १५८०० असेल तरी तुम्ही खूप वर जाता असे अजिबात जाणवत नाही, ) येण्याआधी डोरजे समोर होता आणि मी फोटो ब्रेक घेत घेत येत होतो. जवळ आलो तर डोरजे आणि अद्वेत मला हातवारे करून येऊ नको, येऊ नको हे सांगत होते. ते हातवारे बघून मी ऑलमोस्ट अर्धा किमी मागेच गाडी थांबवली आणि कारण कळाले! वॉटर क्रॉसिंग ! ही वॉटर क्रॉसिंग देखील भयानकच होती. ५० एक फुट लांब आणि दीड-दोन फुट डिप तरी असावी. त्यात एक सॅन्ट्रो अडकली होती, जी दुरून पिटूकली वाटत होती. मग तिथे अचानक चार बुलेट देखील दिसल्या. ते पब्लिक उतरलं होतं आणि त्यांनी त्या सॅन्ट्रोला पार व्हायला मदत केली. हळूच मग डोरजेने / अद्वेतने हात हालवून मला देखील यायला सांगीतले आणि मी (इतक्या वॉटर क्रॉसिंग करून प्रो झाल्यामुळे Wink ) काही न बघता एका टॅक्सी ड्रायव्हर प्रमाणे मस्त मध्ये घातली आणि बाहेरही आणली. बाहेर आल्यावर बुलेटवाले भेटले. त्यांचे सर्व कपडे, बुट, सॉक हे सर्वच ओले झाले होते आणि ते ऑलमोस्ट कुडकुडत होते. एकमेकांना बाय म्हणून मी पुढे निघालो तर पुढे लगेच २ एकशे फुटांवर नामशांग ला लागला. ज्याला ती सॅन्ट्रो तीन वेळा प्रदक्षिणा घालत होती. हुश्श, वाचलो असा भाव मी त्या ड्रायव्हरच्या चेहर्‍यावर पाहिला.

आम्हाला पोचायला ऑलमोस्ट ७ वाजून गेले होते. रात्री दिसणारा त्सो मोरिरी !

त्सो मोरिरी लेक देखील ४५९५ मिटर वा १५००० फुटांवर आहे. हा देखील इतर लेक्स सारखा खार्‍या पाण्याचा आहे.

रात्री लाईट नसल्यामुळे जेवायचे ऑलमोस्ट वांदे झाले. एक तर नीट रूमही मिळेना. टेन्ट पूर्ण फुल होते. जे होम स्टे होते ते इतके बकवास होते की मी गाडीत झोपणे पसंत केले असते. पण सर्वांसोबत राहायचे म्हणून मग मी ही तयार झालो.

सकाळी ढग होते. पण त्सो मोरिरी खूप सुंदर दिसत होता.

लेह ते पुगा पर्यंत ऑलमोस्ट टार रोड आहे. पण त्या पुढे मात्र विविध ट्रॅक्स लागतात. त्यापैकी जर आपण चुकीचा ट्रॅक घेतला तर गोल गोल फिरत राहतो. त्या बुलेटवाल्यांनी चुकीचा ट्रॅक घेतला होता आणि ते रात्री १०:३० च्या सुमारास आले. तेंव्हा आम्ही मस्त पैकी जेवनांनतच्या गप्पा मारण्यासाठी एका हॉटेल मध्ये चहा पित बसलो होतो.

सॉल्ट डिपॉझिट्स

तिथून आम्ही त्सो कार ला निघालो. त्सो कारचे कलर्स इतके सुंदर आहेत की बास. वन ऑफ द बेस्ट लेक. तिथे जायचा रस्ता.

आणि सुंदर हा त्सो कार !

त्सो कार येईपर्यंत मी बराच वेळ त्या दुसर्‍या गाडीच्या पुढे होतो. त्या गाडीला आज यायला खूप वेळ लागत असल्यामुळे प्रवास खूपच स्लो होत होता. अनेक ठिकाणी मला त्यांची वाट पाहत थांबावे लागले. त्याचे कारण? डोरजे च्या पोटातून खूप कळा येत होत्या, डोके दुखत होते आणि उलटी येत होती. आणि त्याला नीट फोकस करता येत नव्हते. कारण? त्याने रात्री बियर प्याली. १५००० फुटांवर आधीच ऑक्सिजन विरळ असतो. त्यात दारू पिणे म्हणजे स्ट्रिक्टली नो नो! पण तरीही त्याने प्याली. तो लोकल (लडाख मधील) असूनही त्याला AMS चा झटका बसलाच. त्यामुळे परत एकदा सांगावे वाटते, रिस्पेक्ट द नेचर! १५००० फुट म्हणजे लई उंच आहे हो !

पण आज आम्हाला रात्रीपर्यंत निदान केलाँग किंवा जिस्पा पर्यंत पोचने आवश्यक होते. त्सो कार वरनं लेफ्ट घेतला की आपण परत लिजंडरी मनाली - लेह हायवेला लागतो. डोरजेच्या अवस्थेमुळे त्सो कारला खूप वेळ थांबता आले नाही. शिवाय मनालीच्या रस्त्यावर लागताना तो रस्ता देखील चुकला, त्यात देखील वेळ गेला. आम्ही दुपारनंतर कधीतरी पांगला पोचलो.

भाग एक
भाग दोन
भाग तीन
भाग चार
भाग पाच
भाग सहा
भाग सात

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर अप्रतिम सुरेख मस्त असे प्रतिसाद प्रत्येक भागाला देतोय तरी कंटाळा येत नाहीये.. ये दिल मांगे मोअर Happy
अभिजीत.. सहा महीने ?? Happy

जबरी...
ललिताला अनुमोदन ! बियर पिणे वगैरे एक भाग झाला.. वेळा न पाळणारे लोकं बरोबर असले तरी चिडचिड होते फार..

अभिजीत, लेह इज द लँड ऑफ लँडस्केप्स. तीथे जिथे पहावे तिथे सुंदर लँडस्केप्स बनवता येतात. तू, एकदा जाऊन बघ्. मोनॅस्टरी किंवा अशी कुठे रहायचे सोय तुला नक्की सापडेल. आय अ‍ॅम शुअर बरेच लोकं अशी रहात असतील.

आणि एक भा.प्र. कॅमेराची बॅटरी कशी चार्ज केली? गाडित तशी व्यवस्था आहे का? >> नाही गाडीत व्यवस्था नाही त्यामुळे मी टेन्ट मध्ये कधी झोपलो नाही.>> आम्ही तीन ठिकाणी टेन्ट मध्ये राहिलो. टेन्ट जिथे असतो, तिथे विटांनी बांधलेले किचन असते, तिकडे मिळाले फोन आणि कॅमेरा चार्ज करायला. त्सो मोरेरीमध्ये जरा प्रॉब्लेम आहे.

दमले! एका दमात बरेच भाग वाचून काढले मी. हासुद्धा रोमांचक भाग होता. तुम्ही पूर्वी त्सो मोरिरीला गेलेलात का? तुम्हाला ते सर्वात सुंदर आहे हे इतक्या ठामपणे माहिती होतं म्हणुन विचारलं.
दिनेशना अनुमोदन. या सगळ्या आणि इतर इथे न टाकलेल्या फोटोखजिन्याचा स्लाईड शो लाईव्ह कॉमेंट्रीसकट बघायला आवडेल. सोबत प्रज्ञा, आदित्य आणि यामिनी असतील तर दुधात साखर.

लेह मधील लोकं मला प्रामाणिक वाटले त्यामुळे ते सुरक्षितच आहेत. >>> +१
खूप साधी, सरळ आणि कष्टाळू लोक आहेत ते.

लेह मध्ये दोन तीन एटीम पाहिले आहेत त्यामुळे तिथे जाईपर्यंत कॅश बाळगली नाही तरी चालेल. पण पुढे सर्व व्यवहार कॅश मध्येच आहेत त्यामुळे कॅश असणे आवश्यक आहे. >>>

चार वर्षांपूर्वी तर एटीम्स भम्हटो मोडमध्ये असायची. Happy

लेह इज द लँड ऑफ लँडस्केप्स. तीथे जिथे पहावे तिथे सुंदर लँडस्केप्स बनवता येतात>>> फोटोग्राफीची ज्यांना आवड असते, ते लोक वेडे होतात अक्षरशः. पावलोपावली निसर्गाचे वेगळे, अधिक सुंदर रूप समोर येते. Happy

सर्वांनाच धन्यवाद. Happy

ही आमची सुपर वुमन टीम कार्यरत झाली >> मस्त. तुम्हालाही परत जायला उशीर झाला होता का?

ढच्यावेळी कुठे जायचं ठरलं तर महिनाभर आधीच कळवा, बरीचशी माबोकर तयार होतील >>> आय गेस. आता लोकं येतील. मागे मी विचारले होते माबोकरांना. Happy पण माझ्या ड्राईव्हिंग स्किल बद्दल शंका असाव्यात Happy

इतकी तयारी केलीस तर एक टेंट पण घ्यायचा ना? तुला उपयोग झाला असता हा एक फु. स. >> अमा गाडीत टेन्ट आणि स्लिपिंग बॅग्स पण होत्या. पण आम्ही गेलो तेंव्हा अंधार पडला आणि तो प्रचंड गडद असल्यामुळे व ढगही असल्यामुळे टेन्ट कुठे लावावा हे कळत नव्हते.

लेह-लडाखात पहावे तिथे फोटोजेनिक लँडस्केप्स दिसत आहेत. तिथे एखाद्या मॉनेस्ट्रीमध्ये ६ महिने राहण्याची सोय होऊ शकते का? >> अभिजित सहा महिने राहन्यासाठी बुद्धिझम कोर्स करावा लागेल. मगच राहता येईल. पण त्यापेक्षा दोन ट्रीप कराव्यात. एक ग्रे लडाख पाहण्यासाठी उन्हाळ्यात. आणि दुसरी डिसे / जाने मध्ये व्हाईट लडाख पाहण्यासाठी.

टेन्ट जिथे असतो, तिथे विटांनी बांधलेले किचन असते, तिकडे मिळाले फोन आणि कॅमेरा चार्ज करायला >> स्वाती तू त्यांच्या टेन्ट मध्ये राहण्याबद्दल बोलतेस. मी आमच्याच टेन्ट मध्ये. जिथे आपणच टेन्ट लावायचा आणि राहायचे. तिथे वीज वगैरे काही नाही.:)

त्सो मोरिरी / पांग / सर्चू / त्सो कार / पँगाँग / सुमुर इथे तू म्हणतेस ते टेन्ट आहेत. त्सो मोरिरीला ४००० रू होते, ते द्यायची तयारी होती, पण त्यातील एकही टेन्ट रिकामा नव्हता.

फोटोग्राफीची ज्यांना आवड असते, ते लोक वेडे होतात >> +१ लडाख इज फोटोग्राफी अ‍ॅण्ड ड्रायव्हिंग पॅराडाईज Happy

जे फोटोग्राफर आहेत त्यांनी एक १०-२४ न्यावीच न्यावी. मी उगाच घेता घेता नाही घेतली. आणि एक प्राईम व फास्ट लेन्स असावीच असावी. त्या शिवाय एक ND आणि एक CPL मस्ट !

खुप सुंदर.. मोठ्या आकारात बघावेसे वाटले हे फोटो ! >>> दिनेश फोटोवर टिचकी मारा. मोठा दिसेल. तरी ही ओरिजनल साईज नाही. माझे बहुतांश फोटो हे २५ एम्बीचे रॉ आहेत.

सई - एनीटाईम! फक्त २००० +/- फोटो मात्र बघावे लागतील.

यो - Happy पुढची ट्रीप माझ्यासोबत ठेव. जाउ असेच कुठेतरी वाईल्ड अन अ‍ॅडव्हेंचरस व्हेकेशन साठी.

पराग / लली - बरोबर Happy पण मी काही ग्रूप पाहिले जे तिथे लेकच्या काठी जोरजोरात म्युझिक लाऊन ओली पार्टी करण्यात दंग होते. - ऑफकोर्स ज्याचे त्याचे व्हेकेशन Happy

त्सो मोरिरी की पँगाँग ह्यात तुलना अशक्य आहे. मला दोन्ही आवडले पण मोरिरी जास्त कारण तिथे जाताना लागणारा रस्ता, तेथील लॅन्डस्केप्स वगैरे मुळे. पँगाँग हा इझिली अ‍ॅक्सेसेबल आणि सर्वांनाच माहिती असल्यामुळे लोकं इथे गर्दी करतात. गर्दीच्या पुढे गेलात तर पँगाँगचे एक सुंदर / अवर्णनीय रूप पाहायला मिळते. त्सो कार देखील अत्यंत सुंदर लेक आहे. आणि हा तर लेह - मनाली रोड पासून केवळ २२ किमी मध्ये आहे.

स्वाती तू त्यांच्या टेन्ट मध्ये राहण्याबद्दल बोलतेस. मी आमच्याच टेन्ट मध्ये. जिथे आपणच टेन्ट लावायचा आणि राहायचे. तिथे वीज वगैरे काही नाही>> ओह. गॉट इट. खरतर, स्वताच्या टेन्ट मध्ये रहाणे ऑस्सम एस्पिरीअन्स असेल. आम्ही तसे करताना काहीजणांना पाहिले होते. एकजण तळ्याच्या अगदी जवळ जाउन टेन्ट लावून बसला होता.

आम्ही गेलो तेव्हा, वैजयंतीने बुकींग्ज आधीच केली होती, त्यामुळे टेन्ट्स मिळाले. कंफर्टेबल होते.

लडाखला माणसाने चार ते पाच वेळातरी वेगवेगळ्या प्रकारे जावे.
एक टुरीस्ट कार- सगळे मन लावून पाहता येते.
दुसरे स्वताची कार- ड्रायविंग थ्रिल.
तिसरे बाईक- आहाहा.
चौथे - थंडी. परत आहाहा.

द लँड ऑफ लँडस्केप्स. तीथे जिथे पहावे तिथे सुंदर लँडस्केप्स बनवता येतात>>> फोटोग्राफीची ज्यांना आवड असते, ते लोक वेडे होतात अक्षरशः. पावलोपावली निसर्गाचे वेगळे, अधिक सुंदर रूप समोर येते. > अगदी खरयं... ते पहायला, अनुभवायला कॅमेर्‍याच्या लेन्स जेव्हा कमी पडतात.. तेव्हा आपल्याला लाभलेल्या दोन लेन्सच्या वरदानाच मह्त्व पटतं.

केदार्..
सलग ८ भाग वाचले आणि मग प्रतिक्रिया देतेय. थांबुच वाटल नाही वाचताना मधे...

खुप सुन्दर लिहिलय प्रवास वर्णन आणि तुमचे अनुभव. खुप माहीतिपुर्ण. थोडे प्रश्न होते पण त्याची पण उत्तरे मिळाली...मायदेशी परतल्यावर हि ट्रिप नक्कि करणार..
प्र्.चि. ....लयी भारी...प्रेमात पडले मी या ठिकाणांच्या..आभार.
UK मधे बसुन भारतवारी करवली माझी...

सलग ८ भाग वाचले आणि मग प्रतिक्रिया देतेय. थांबुच वाटल नाही वाचताना मधे...>> + 1

vaapas vaapas phoTo baghitale Happy

Pages