माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ३

Submitted by केदार on 1 August, 2013 - 06:41

आजचा प्लान होता बटिंडा ते श्रीनगर!

Srinager_map.JPG

बटिंडावरून सकाळी नाश्ता करून निघालो. (काल ती चूक केली होती.) तिथूनही दोन मार्ग जातात. एक व्हाया अमृतसर व दुसरा जालंदर. मग अमृतसरच्या गोल्डन टेंपल मंदिरात जावे की जालंदर वरून जम्मूकडे जावे ह्यावर टॉस करून निर्णय घ्यायचा ठरविले. गोल्डन टेंपलला प्रज्ञाला जायचे होते तर मी म्हणत होतो की आपण गोल्डन टेम्पल परत करू. नाहीतरी आपले एक घर दक्षिण काशी ( नांदेड) मध्ये आहेच तर तेथील गुरुद्वारा आणि हा, ह्यात काही फार फरक नाही. मग अमृतसर कॅन्सल करून मी माझ्या गाडीच्या जीपीस वर भरवसा ठेवून आजचे डेस्टीनेशन श्रीनगर, जम्मू अ‍ॅन्ड काश्मिर असे टाकले. आज केवळ ६३३ किमी जाणार होतो. तुलनेने रोजपेक्षा ३०० किमी कमी प्रवास ह्या आनंदात आम्ही होतो ! लिटल डिड आय नो, की आपण आज पटनीटॉपलाच पोहचू शकतो.

तर आम्ही जे BSNL कार्ड घेतले होते ते एव्हाना अ‍ॅक्टीव्हेट झाले होते असा SMS माझ्या एअरटेल वर आल्यामुळे आम्ही प्रज्ञाच्या फोनमधील सीम बदलून हे नवीन सीम टाकायचा विचार केला आणि तिच्या फोनमधून तिने कार्ड काढले खरे, पण दुसरे कार्ड स्लॉट मध्ये जायलाच तयार होत नव्हते. तो स्लॉटच खराब झाला होता ! म्हणजे अब कार्ड तो तीन और चलनेवाला फोन एकच. आणि तो पण फुल सीम कार्ड वाला नाही तर माझा आयफोन. म्हणजे आता सीम कार्ड साठी फोन विकत घ्यावा लागणार वा तो स्लॉट दुरूस्त करण्यासाठी २-३ तास वाट पाहावी लागणार. Time was at premium! मग काय एक ड्युअल सीमवाला
नोकियाच घेतला आणि दोन्ही सीम (रादर तिन्ही) सुरू झाले. टाईम टू एन्जॉय. मग जालंदरच्या अलिकडील एका ढाब्यावर यथेच्छ ताव हाणला.

Map my India च्या जीपिसमध्ये (निदान महिंद्रा व्हर्जन) "टेक बायपास" असा ऑप्शन नसावा बहुदा. त्या बाईने आम्हाला तीनदा गावात नेले आणि आम्ही १-१ तास गावात गरज नसताना अडकून पडलो. जालंदरमध्ये तर दोन तास अडकलो कारण एक ट्रेन तशीच थांबून राहिली.आणि आम्ही भरगावात गेट वर. मग माझ्या फोन मधील GPS च्या अंत्यत भरवश्याच्या अशा गुगल मॅप्सचा आधार घेऊन आम्ही जालंदरचे दिव्य पार केले. तिथून आम्ही पठानकोटच्या रस्त्याला लागलो तेंव्हा हुश्श वाटले.

पठानकोट १ तासावर असताना आम्हाला पहिला मिल्ट्री कॉन्व्हॉय लागला. वॉट अ साईट. ४० एक स्टॅलियन गाड्या एका रेषेत काश्मीर खोर्‍यात चालल्या होत्या. पठानकोटच्या अलिकडे एक टोल नाका आहे. तिथे कडक चेकिंग चालू होते.आणि आम्ही परत अडकलो. योगायोगाने आमच्या समोरचा सॅन्ट्रोवाला हा हरयानवी पोलिटिशन होता. ( तेच पांढरे कपडे, तीच दाढी, तसाच चष्मा वगैरे वगैरे) त्याला घाई होती, त्याने आणि एका मिल्ट्रीवाल्याने मग जुगाड करून जॅम मधून रस्ता काढला. आमची XUV देखील त्या पाठी निघाली ! आम्ही टोलनाका चुकवून मस्त पिक्चर मध्ये जसे शेत दाखवतात तश्या रस्त्यातून तो टोल नाका बाय पास करून जम्मूच्या रस्त्याला लागलो आणि जम्मू मध्ये प्रवेश करते झालो. बायदवे पंजाब मधील शेतं खरेच लोभस आहेत. एकदम जबरी साईट असते ती.

पठानकोटच्या एका फुल टू मॉडर्न धाब्यात आदित्य खेळताना.

आजचा खरा प्लान होता श्रीनगर गाठायचा. पण आम्ही आत्ता कुठे लखनपुरपाशी येऊन पोचलो. टोल देतो न देतो तोच अनेक काश्मिरी विक्रेत्यांनी घेरले आणि वस्तू विकावयास सुरूवात केली. सोललेल्या नारळापासून ते वॉलनट,बदाम ते चेरी ते क्रिकेटच्या बॅट्स हे सर्व लखनपुरच्या टोल नाक्याजवळ मिळते. आम्ही पण ट्रीपची भवनी म्हणून बदाम, चेरी, आक्रोड इत्यादी खरेदी केले. इथे घासाघीस केली नाही तर तुम्ही लुबाडले जाल.

टोल नाका पार करेपर्यंत चारएक वाजले. तेथून जम्मू कडे सुसाट वेगाने NH1 वरून गाडी धावत होती. श्रीनगरला जाता येईल असे आत्ताही वाटत होते कारण केवळ ३५४ किमी असा बोर्ड दिसत होता. जम्मूला चहा घेऊन पुढे गेलो. जम्मू बायपास घेतला की सुरू झाली हिमायलन चढाई! आता हा हिमायल पुढचे अनेक दिवस सोबत राहणार होता. पार किरतपुर पार करे पर्यंत! हिमायलाची अनेक रुपं ह्या प्रवासात बघायला मिळणार होती. देवदार आणि पाईन ट्री मधील हिरवा हिमालय, अमरनाथाला तयार करणारा पांढरा हिमायल आणि लडाख मधील ग्रे हिमालय, ज्यावर गवत सुद्धा दिसत नाही तो हिमालय !

जम्मू ते श्रीनगर मधील अंतर कमी करण्यासाठी आता मोठ्या वेगाने ह्या हिमालयात खोदकाम, बांधकाम चालू आहे. आम्ही पोचलो तेंव्हा रात्र होती तरीही लाईट लावून बांधकाम चालू आहे. मोठे मोठे बोगदे आणि फ्लायओव्हर बांधणे चालू आहे. हे झाले की जम्मू ते श्रीनगर अंतर केवळ अर्ध्या वेळात कापता येईल. त्याला अजून निदान ५ वर्षे लागतील असे दिसते.

जम्मू पासून काश्मीर खोर्‍याला दुर करते ते पटनीटॉप आणि जवाहर टनेल. पटनीटॉप 2,024 m (6,640 ft) ह्या उंची वर आहे. मी जेंव्हा गेलो तेंव्हा अमरनाथ यात्रा चालू असल्यामुळे चोवीस तास ट्रॅफिक होती. ह्या पूर्ण घाटात बंपर टू बंपर ट्रॅफिक असल्यामुळे गाडी जोरात हाकणे कठीण झाले होते. त्यातच धुक्याला सुरूवात झाली.

आणि बघता बघता ते धुके असे गडद होत चालले होते.

हळू हळू एकेक फुटांवरचे दिसणे कठीण होत गेले आणि डेड स्पिड मध्ये गाडी पुढे जायला सुरूवात झाली. एका बाजूला देवदार वृक्षांच्या दर्‍या तर दुसर्‍या बाजूला डोंगर असे आम्ही वरच वर चाललो होतो. मग सर्वानुमते आज श्रीनगर 'नको' तर केवळ पटनीटॉप गाठू अन ९ वाजे पर्यंत झोपू असा विचार आम्ही केला. तेंव्हा पटनीटॉप होते केवळ ३० किमी आणि वाजले होते साडेसात. Never underestimate mother nature! पटनीटॉपचे हॉटेल गाठायला आम्हाला रात्रीचे ११:३० झाले ! केवळ ३० किमीला फक्त ४ तास !

तिथे जाऊन आम्हाला हॉटेल शोधायचे होते. एक दोन ठिकाणी शोध घेतला तर अगदी बकवास रूम्स होत्या. मग अजून शोध घेऊ असे ठरवून मी JKTDC च्या हॉटेल मध्ये गेलो. तिथे रूम नव्हतीच. पण मध्यरात्री तिथे त्या जागी दोन मुलं भेटली, जी रात्री रिव्हर्स मध्ये गाडी घेत होती. त्यापैकी एक जण खिडकीत काचा खाली करून बसला होता व त्याचे अर्धे शरीर बाहेर होते. त्याने आम्हाला एक विनंती केली.
"भैय्या इधर रूम नही मिला तो कोई नही, सामने जगह है, पर आप एकदम आरामसे चलाना, आपके साथ फॅमिली है"
मी : हो
तो : एकदम ० की स्पिडसे चलाना.
दुसरा : अबे ० की स्पिडसे गाडी चलेगी क्या? कुछबी बकता है!
मी : ठिक है.
तो : मेरी बिनती है.
मी : ठिक है.
तो : मेरी बिनती है.
मी : ठिक है.
दुसरा: जादा पि रख्खी है

खरेतर दोघांनी पण खूप चढवली होती.

ह्या विनोदामुळे आमचे ते ४-५ तास धुक्यातून बंपर तू बंपर गाडी चालवल्याच्या ताण कुठच्या कुठे पळाला. पुढे दोन दिवस "० की स्पिड" वर माझी मुलगी तुफान हसत होती. असे करता करता आम्हालाही हॉटेल मिळाले व वी हिट द सॅक. फक्त रात्रीचा १ वाजला होता.

हा दिवस श्रीनगर न येताच गेला. दुसर्‍या दिवशी मस्त नाश्ता वगैरे घेऊन आम्ही १० वाजता निघालो. श्रीनगरला केवळ उतरायचे होते आणि जवाहर टनेल पार करायचा होता. पण रोड मात्र जबरीच होता.

अमरनाथ यात्रेमुळे अनेक खायचे स्टॉल रस्तात होते. आम्ही मस्त छोले-पुरी-शिरा असे जेवण एका लंगर मध्ये बनिहालला केले. आणि पुढे निघालो. बनिहालमध्येच मागच्या महिन्यात आपल्या पंतप्रधानांनी एका टनेलच उदघाटन केले तो देखील बघितला. मिल्ट्री, J&K पोलिस ह्यांसोबत प्रज्ञा व मुलांनी फोटो काढले, जवाहर टनेल पार करून आम्ही श्रीनगर खोर्‍यात पोचलो.

मग श्रीनगर जवळ आम्हाला, यु आर गोईंग थू ग्रीन टनेल" असा बोर्ड लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच देवदारांच्या कमानी होत्या. अतिशय सुंदर ड्राईव्ह. असे मजल दर मजल करत आम्ही श्रीनगर मुक्कामी पोचलो.

प्रज्ञाला श्रीनगर पाहायचेच होते, मला श्रीनगर सोडून कधी एकदा सोनामर्गला (लेहच्या रस्त्यावर) जातो असे झाले होते, पण ह्या लढाईत विजय अर्थात प्रज्ञाचा झाला आणि आम्ही मग आधी एक रात्र राहू असे करून तिथे दोन रात्री मुक्काम केला. पहिली संध्याकाळ अर्थातच दाल लेक मध्ये घालविली.

दाललेक मध्ये तुम्ही शिकारा राईड घेतली की लोकं कश्ती घेऊन अनेक गोष्टी विकायला येतात.( राईडची किंमत १००० रू) एकही मिनिट तुम्ही एंजॉय नाही करू शकत. तो शिकारावाला तुम्हाला त्याच्या ठरलेल्या लोकांकडे घेऊन जाणारच. पूर्ण जुने श्रीनगर ही "लेक सिटी" आहे. मग ऑफकोर्स आम्हीही खरेदीदार झालो आणि एका लेकसाईड दुकानात जाऊन काश्मिरी ड्रेसेस गिफ्ट आणि इतर अशी भरपूर खरेदी केली. तुमच्या कडे पैसे नाहीत? नो प्रॉब्लेम, ते लोक ५०० रू घेऊन व्हिपीपी ने देखील पाठवतात ! अर्थात आम्ही क्रेडीट कार्ड दिले, जे त्याकडे चालत होते. शिकार्‍यामध्येच (खरेदीसहीत) आम्ही ४ एक तास घालवले. आजचा दिवस असाच संपला !

दुसर्‍या दिवशी अर्थात मला इ स पूर्व स्थापना झालेल्या शंकराचार्यांच्या मंदिरात मला जायचे होते. प्रज्ञाने मंदीर परत चालत येण्यापेक्षा रेस्ट घेणे पसंत केले. मग मी आणि यामिनी आम्ही दोघे मंदीरात गेलो. तिथे ही गर्दी! सगळ्या अमरनाथ यात्रेकरूंना श्रीनगरला यावे लागतेच. ते सर्व इथेही गर्दी करतात. शिवाय रांग वगैरे लावण्याच्या प्रश्न नाहीच. मग मी आणि एका मुलीने ( ती ही मराठीच) ह्या सर्वांवर दादागिरी करत त्यांना एकच लाईन लावायला लावली. आमचेही दर्शन व्यवस्थित झाले. हे मंदीर आणि त्या बाजूचे टिव्ही टॉवर "मिशन काश्मीर" मध्येही पाहायला मिळेल.

इथून दिसणारे श्रीनगर.

मग दुपारी निवांत झालो आणि संध्याकाळी एका अद्वितीय राईड्साठी तयार झालो. श्रीनगर ही लेक सिटी आहे. अनेक तलाव एकमेकांना जोडलेले आहेत. शिकारा राईड तर घ्यायचीच होती पण दाल लेक मध्ये नको. एकतर हजरतबाल दर्गा लेकला जाऊन तिथे दर्शन घेणे किंवा नगीना लेक राईड असे दोन पर्याय ३ तासांच्या राईड साठी शिकारा मालकाने ठेवले. सिक्युरिटीमुळे आम्ही हजरतबल टाळला. मला जायचे होते. मग आम्ही एक सुंदर लेक नगीना लेक राईड घेतली. ही राईड लोक सांगत नाहीत कारण महाग आहे. ( २५०० रू , आदल्या दिवशीचाच शिकारावाला होता म्हणून आम्हाला १८०० ) शिवाय सर्व जण दाल लेक मध्ये समाधानी असतात. पण तुम्ही काही हटके आहे का? हे विचारल्यावर ही राईड सांगीतली जाते. दाल लेक मध्ये भारतीय तर नगीना मध्ये फॉरेनर्स अस्तात. तिथे कोणीही मध्येच काहीही विकायला येत नाही. अतिशय सुंदर राईड! ही ओल्ड सिटी मधून जात असल्यामुळे काश्मीरी पंडितांची जुनी घर पाहायला मिळतात. अर्थात ती आता तेथील लोकांनी बळकावली आहेत.

नगीना लेक एकेकाळी पूर्ण पारदर्शी होता असे शिकारा चालविणार्‍यांचे म्हणणे होते. हा लेक दाल पेक्षा अतिशय स्वच्छ अन सुंदर आहे.

श्रीनगर मध्ये आणखी बघण्यासारखं काय तर तेथील गार्डन्स. शालिमार, निशान, चष्मेशाही वगैरे. आम्ही शालिमारला गेलो. ही सर्व गार्डन ओव्हरहाईप्ड आहेत. तिथे जाऊन भ्रमनिरास होण्यापेक्षा न गेलेले चांगले. अर्थात शालिमार मध्ये मी फुलांचे अनेक मॅक्रो काढले पण ते मला इथे सारसबागेत देखील काढायला मिळाले असते.

तर हे दिवस तसे निवांतच गेले. दुसर्‍या शिकारा राईड मुळे श्रीनगरची प्रतिमा आमच्या मनात नक्कीच चांगली झाली अन्यथा दाल लेकमुले त्याला तसा तडा गेला होता. आता मला वेध लागले होते झोझिला पासचे. सोनमर्ग पार केल्यावर लगेच झोझिला लागतो. तो पास म्हणजे ड्रायव्हिंग स्किल आहेत की नाही? ह्याची परिक्षा होती. जरा लवकर उठू असा विचार करून आम्ही ह्या दिवसाला (की रात्रीला कारण ११ वाजले होते) रामराम केला ! स्वप्नातही झोझिला दिसलाच !

भाग एक

भाग दोन

भाग चार

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाही भाग मस्त.

केदार, तुम्ही लोक आमच्या गावाशेजारुन गेलात की बहूतेक. जालंदरहून पठाणकोटला कोणत्या मार्गाने गेला होता?व्हाया मुकेरियांच ना? त्याच रस्त्यावर दसुआ -मुकेरियांच्या मध्ये सासर आहे माझं. Happy

जालंदर रुट भयानक आहे. नकोदरच्या आसपास गाडी अडकून रहाते. आणि जालंदर ते दसुआ रस्ता पण बराच वाईट आहे, स्पेशली तांड्याच्या आसपासचा. हल्ली आम्ही पण जालंदर टाळून चंदिगड-होशियारपुरमार्गे जातो तिकडे जाताना.

हो अल्पना दासुआ - कथूआ - मग जम्मू. पण रूट तर चांगला आहे की. म्हणजे मला तरी बरा वाटला NH1. हो ते तांडा गाव म्हणजे एक प्रकरणच आहे. तसा दोन्ही कडून कुंपनात बांधलेला रस्ता आहे पण लोक गोंधळ करतात. तिथून पुढे गेल्यावरच मला कॉन्व्हॉय लागला. आणि तांड्यापासून पुढे एक १० किमी वर दुसर्‍यासाईडला तो ढाबा (मॉडर्न) आहे.

दिल्लीत अडकल्यावर डाउनटाऊन मधून फरिदाबाद कडे जाताना मला तुझी फार आठवण झाली होती. म्हणलं नं असता तर भेटही झाली असती अन ड्राईव्ह मध्ये आरामही झाला असता. Happy तुम्ही कसे सहन करता ती ट्रॅफिक काय माहीत.

माझे वाहन जरा कमी ताकदवान होते- १५०सीसी होन्डा युनिकॉर्न >>> ज्ञानेश युनिकॉर्न तरी चांगली, मी ह्यावेळी एका महान आत्म्याला CD SS वर डबल सीट पाहिले आहे आणि त्याच्या पिलियनला मग राईडही दिली कारण ती होण्डा ९८ सीसी, चढतच नव्हती.

केदार
श्रीनगर मध्ये कुठे राहिलास?
या टीप्स फारच उपयोगी पडतील जेव्हा आम्ही असे काही करु तेव्हा.

निलिमा आम्ही दाल लेकच्या घाट नं १२ समोर असणार्‍या ब्राऊन पॅलेस मध्ये राहिलो. ही वेबसाईट http://www.hotelbrownpalace.com/

एकदम मस्त, स्वच्छ आणि लव्हेबल हॉटेल. शिवाय रस्ता ओलांडला की दाल लेकच पण तरीही एकदम शांत जागा.

दसुआ अगदीच शेजारी आहे रे समीरच्या गावाच्या. आम्ही सगळे गावी जमल्यावर भाजी आणायला दसुआ-मुकेरियांलाच जातो. त्या दसुआला एक पप्पु की हट्टी नावाचं मिठाईचं दुकान आहे अगदी रस्त्यावरच. तिथली बर्फी आणि बेसन फेमस आहे. अप्रतिम चव असते. Happy

दिल्लीचा ट्रॅफिक म्हणजे दुखती नग आहे माझी. बर्‍याच चांगल्या चांगल्या नोकर्‍यांवर पानी सोडलंय या ट्रॅफिकला सहन करावं लागु नये म्हणून. आता पुढच्या वेळी नॉर्थची ट्रीप ठरवलीस की आधी नंबर घे माझा. दिल्ली आणि पंजाब दोन्ही ठिकाणी मदत होईल. Happy

जबरदस्त...
२ आणि ३ एकदम वाचून काढले.. आता पुढचा भाग पण टाका लवकर..

>>माझे रेकमंडेशन असे राहिल की व्हेकेशन स्वतःच आखावे व स्वतःच पार पाडावे अगदी एकटे गेलात तरी!
+१
आणि हे सगळ्या व्हेकेशन्स ना लागू होते

मस्त .. वाचायला मजा येतेय .. Happy

>> निशान

"निशात" ना?

>> अर्थात शालिमार मध्ये मी फुलांचे अनेक मॅक्रो काढले पण ते मला इथे सारसबागेत देखील काढायला मिळाले असते.

अगदी पुणेकर इष्टाईल .. Lol

सॉलिड ट्रीप मारलेली दिसतेस केदार! काल पर्वा अगदी ४-५ मिनिटेच येउन गेलो माबो वर तेव्हा नुसतं वर वर फोटो आणि थोडा मजकूर वाचला पण आता शेवटी वेळ मिळाला सगळं वाचायला.
बेस्ट! अशी ट्रीप मी सहकुटूंब करणे म्हणजे अशक्यच. मुलगा आनंदानी येइल खरं पण येवढी मोठी ट्रीप इथुन तिकडे फक्त सुट्टीकरता जातो तेव्हा करणे खुपच अवघड आहे. बस्तान तिकडे हलवलं तरच काही शक्य आहे त्यामुळे सध्या तरी तू लिहिलयस तेच "अनुभवून" समाधान मानणार आहे. Happy
अजून वाचायला आवडेल. Happy
बाकी आपण बाप्या लोकं सहसा असल्या लांब ट्रिपा मारायला तयार असतो पण तुझी बायकोही तयार झाली यायला तेही मुलांना बरोबर घेऊन ह्याचे मला विशेष कौतूक वाटते. Happy

हा पण भाग मस्त , तो नदीच्या बाजुचा रस्ता जाम टेम्टींग वाटतोय.
कहानी मे अभी बहोत बडा ट्विस्ट बाकी है ! >>> आता तु उत्सुकता ताणायला लागला आहेस , लवकर टाक पुढचा भाग . Proud

स्वप्नातही झोझिला दिसलाच ! >>>> Happy

एक मूल असेल तरी लाँग ड्राईव्हवर अवचीत सुसू-स्टॉप्स घ्यावे लागतात आणी अशा स्टॉप्सची संखया मुलांच्या संखयेच्या प्रमाणात एकस्पोनेंशयली वाढते. ते कसं मॅनेज केलंत देव जाणे!

हो सशल निशात. ती टायपो आहे.

अगदी पुणेकर इष्टाईल .. हाहा >> Lol वाण नाही पण गुण लागणारच की. Happy

बुवा बरोबर आहे.

मामी, आम्ही अनेक स्टॉप घेतले. जिथे मुला/मुलीने आता थांबता का? असे विचारल्यावर लगेच कुठेतरी थांबलोच. तिथे मग अर्धा तास स्टॉप घेऊन हात-पाय मोकळे केले. शिवाय मी त्यांच्यासोबत मग खेळायचो मग थकवा निघून (माझाही) निघून जायचा. पण जेंव्हा व्हिल वर असायचो तेंव्हा मग तो सर्व वेळ आपोआप भरून निघायचा.

तसे मुलांनी खरच अजिबात त्रास दिला नाही. प्रवासात उलटीही झाली नाही. पण लेह मध्ये पोचल्यावर यामिनीला थोडासे ऑक्सिजनच्या त्रासामुळे डोके धरणे, उलटी झाली.

केदार, आयाम लहान आहे म्हणत आम्ही लेह-लदाख ट्रीप टाळली होती. पण आता तुझा अनुभव बघून मी आत्तापासूनच पुढच्या वर्षीसाठी समीरच्या पाठीमागे लागलेय. Happy (आता प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की त्याला बुलेट घेवून जायचंय... )

मस्तच!
जम्मू-श्रीनगर रस्ता खरंच सुंदर आहे. चिनाब नदी कधी सुंदर दिसते, तर कधी घाबरवून सोडते; पण रस्ताभर तिचीच सोबत असते.
आणि ज्या एका वळणावर सर्वप्रथम बर्फाच्छादित शिखरं दिसायला लागतात, तो क्षण तर काय वर्णावा!

बापरे..... मुलांना बरोबर घेवुन सॉल्लिड धाडस केलत तुम्ही.....

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....

साती - लोल. भाग चार ही टाकला आहे. http://www.maayboli.com/node/44436

अल्पना : आयामला आज्जी / काका कडे ठेऊन दे आणि तुम्ही दोघे दोन बुलेट घेऊन जा ! पण हो नॉट द क्लासिक वन पण TB500 !!

मस्त!

हा भाग पण सहीच आहे Happy

अजुन काही फोटोज.. कॉन्व्हॉय, चिनाब इ इ चे असतिल तर टाकता येतिल का? बघायला आवडतिल Happy

Pages