'मैत्री शाळा १०० दिवसांची – आपल्या गावी', मेळघाट - २०१३-१४

Submitted by हर्पेन on 16 July, 2013 - 07:30

मैत्री संस्था, गेली १३-१४ वर्षे मेळघाटात चालू असलेल्या कुपोषण मृत्यू रोखण्यासाठी काढलेल्या धडक मोहिमांबरोबरच गेली दोन वर्षे डिसेंबर ते मार्च या काळात स्वयंसेवकांच्या मदतीने शैक्षणिक उपक्रमही घेत आहे. पहिल्या वर्षी मैत्रीने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी शाळाबाह्य ४० मुलांसाठी १०० दिवसांची निवासी शाळा चालवली. त्या नंतरच्या म्हणजेच मागच्या वर्षी ३ गावांमध्ये असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळांबरोबर १०० दिवस काम केले व त्यायोगे सुमारे ७० मुलांपर्यंत आपण पोहोचलो.

गेल्या वर्षी उपक्रम संपताना तीनही गावातल्या पालकांनी सांगितले की वर्षभर आमच्या मुलांना असे काही मार्गदर्शन मिळाले तर जास्त उपयोग होईल. त्यामुळे गावातील शाळांमधून मुलांसोबत सलग १०० दिवस घालवण्यापेक्षा वर्षभर मिळून १०० दिवस असे या वर्षीचे शाळेचे स्वरूप असेल. तसेच स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग असेल तर आणि तरच शाळा नीटपणे चालतील हे जाणून स्वयंसेवक व स्थानिक लोक यांचा मेळ घालून यावर्षीच्या उपक्रमाची आखणी केली आहे.

ह्या वर्षीच्या उपक्रमाचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे आहे.

यावर्षी आपण ११ गावांमधून गावमित्र निवडले आहेत. हे गावमित्र म्हणजे १० वी, १२ वी शिकलेली किंवा पदवीधर असलेली तरुण मुले आहेत.

मेळघाटातील मुलांची मुख्य अडचण आहे ती भाषेची, स्थानिक मुलांची मातृभाषा कोरकू असल्याने त्यांना मराठीतून शिकण्यास अडचणी येतात. त्यामुळे मराठीचा सराव व्हावा म्हणून आपण शिकवताना जास्तीत जास्त मराठीचाच वापर करणार आहोत. गावमित्र हे स्थानिक असल्याने त्यांना कोरकू येतेच आणि त्यांना मराठी पण चांगले कळते त्यामुळे ते स्वयंसेवक व मुले या दोघांशी नीट संवाद साधू शकतील. शाळेच्या आधी दररोज एक तास गावमित्र मुलांना शाळेत जमा करतील आणि काही मूलभूत कौशल्ये त्यांना शिकवतील ज्यामुळे शाळेमध्ये शिकताना येत असलेल्या त्यांच्या अडचणी कमी होतील अशी आशा आहे.

मेळघाटाबाहेरून जाणारे स्वयंसेवक दर महिन्यात चिलाटीमध्ये एक शिबिर/ कार्यशाळा आयोजित करतील. याअंतर्गत गावमित्रांना प्रशिक्षण देण्याचे काम जाणारे स्वयंसेवक करतील. प्रशिक्षण म्हणजे काय असेल तर पहिल्या दिवशी चिलाटीतच पुढच्या महिन्यात मुलांकडून काय काय करुन घ्यायचे याचा चक्क पाठ घेऊन दाखवणे. नंतर तसाच पाठ दोन गावांमध्ये जाऊन मुलांना शिकवून दाखवणे.

योजना अशी आहे की या वर्षीच्या प्रत्येक तुकडीमध्ये एकूण ४ किंवा ५ जणांपैकी २ तरी या आधी जाउन आलेले स्वयंसेवक असतील. जुने स्वयंसेवक गावमित्रांना प्रशिक्षण देतील व पहिल्यांदाच जाणाऱ्या स्वयंसेवकांचे प्रमुख काम, त्यांना मदत करणे व उपक्रमाची साधने बनवणे असे असेल.

मागील दोन वर्षी ज्यांनी आपल्या शाळांचे समन्वयक म्हणून काम पाहिले होते ते श्री. रमेश व श्री. अशोक हे याही वर्षी चिलाटीमध्ये राहून या उपक्रमाचे काम पाहतील. ते दोघे प्रत्येक गावात जाऊन गावमित्रांना मदत व मार्गदर्शन करतील.

मुलांना घरी करण्याकरता आपण काही अभ्यासकृती किंवा वर्कशीट देणार आहोत. त्यामुळे पालकांना पण घरी काही गोष्टी नियमित बघायला मिळतील.

आराखडा जुलै २०१३ ते मार्च २०१४
• एकूण गावे - ११
• कालावधी – जुलै २०१३ ते मार्च २०१४
• एकूण स्वयंसेवक - ४० (प्रत्येक महिन्यात ४ ते ५)
• एकूण मुले - २५० (प्रत्येक शाळेत २० ते २५ याप्रमाणे)
• एकूण अपेक्षित निधी - अंदाजे रु. ५ लाख

स्वयंसेवक वेळापत्रक : (ज्यांना अधिक राहणे शक्य आहे त्यांनी अधिक दिवस रहायला हरकत नाही)
Batch No Batch Period Start from Pune Return from Melghat starts
१ (१७ ते २२ जुलै) १७ जुलै २१ जुलै
२ (१४ ते १९ ऑगस्ट) १४ ऑगस्ट १८ ऑगस्ट
३ (१७ ते २२ सप्टेंबर) १७ सप्टेंबर २० सप्टेंबर
४ (१६ ते २१ ऑक्टोबर) १६ ऑक्टोबर २० ऑक्टोबर
५ (१३ ते १८ नोव्हेंबर्) १३ नोव्हेंबर् १७ नोव्हेंबर्
६ (१८ ते २३ डिसेंबर) १८ डिसेंबर २२ डिसेंबर
७ (१५ ते २७ जानेवारी) १५ जानेवारी २६ जानेवारी
८ (१२ ते १७ फेब्रुवारी) १२ फेब्रुवारी १६ फेब्रुवारी
९ (१२ ते १७ मार्च) १२ मार्च १६ मार्च

तुम्ही कशा प्रकारे सहभागी होवू शकता?

५ दिवस मेळघाटात प्रत्यक्ष मदतीकरता जावून
या उपक्रमासाठी आर्थिक मदत करून
एका मुलाचा वर्षभराचा खर्च रु २०००/-
एका गावासाठी एका महिन्याचा खर्च रु. ५०००/-
एका गावमित्राचा एका महिन्याचा खर्च रु ५००/-
जीपचा एका शिबिरासाठीचा खर्च रु. ६०००/-
एका शिबिराचा सर्व मुलांसाठी खाऊचा खर्च रु. ६२५०/-
एका स्वयंसेवकाचा खर्च रु २०००/-
एका महिन्याचा मुलांना द्यावयाच्या वर्कशीट छपाईचा खर्च रु. ५००/-

या उपक्रमासाठी वस्तुरूपाने मदत करून
छपाईकरता कागद देऊन (A4 size)
पाठकोरे कागद, फाईल्स देऊन
ओरिगामी, चित्रकला, हस्तकला याचे साहित्य देऊन

तसेच या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून आपण आपला मोलाचा वाटा उचलू शकता.

संपर्कासाठी: मैत्री कार्यालय - ०२० २५४५०८८२/ ७५८८२८८१९६ (वैशाली, मधू, लीनता ), अश्विनी धर्माधिकारी : ९४२२० २५४३१
Email : maitri1997@gmail.com
www.maitripune.net
Regn. No.: E 2898/PUNE.

मुलांसाठी पाट्या, वह्या, पेन्सिली इ. गोष्टी देऊ करुन मैत्रीच्या शैक्षणिक उपक्रमास मदत केल्या बद्दल मायबोलीकर सुनिधी यांचे आभार Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान.मदत नक्की केली जाईल...स्वयंसेवक किंवा आर्थिक. जमलं तर दोन्ही.
उपक्रमास शुभेच्छा.

मैत्रीच्या कार्यालयीन कामकाजाची वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० ते संध्याकाळी ६ अशी आहे.

धन्यवाद चैत्राली, मी पहिला प्रतिसाद टाके पर्यंत तुझाही प्रतिसाद आला. तुला स्वयंसेवक म्हणून मेळघाटात जायला जमणार असेल तर नक्की जमव. खूप मस्त, वेगेवेगळ्या पातळीवर आपल्या कक्षा रुंदावणारा अविस्मरणीय अनुभव असतो तो....
मी यावर्षी इन्शाल्लाह १४ ते १९ ऑगस्ट्च्या बॅचला जायचे ठरवले आहे. Happy

हर्पेन, या वर्षी बाळ एकच वर्षाची असल्याने स्वयंसेवकगिरी होणे नाही.
पण अल्लामदुल्लाह जमेल तशी मदत करेनच! Wink

वरदा, भारती, शुभेच्छांबद्दल धन्यवाद,
ही माहीती आपापल्या मित्रमंडळामधे ईमेलद्वारे आपल्या शिफारशी सोबत पाठवलीत तर होणारी मदत मोलाची ठरेल.

सध्या मेळघाटात लागणारे शैक्षणिक साहित्य, पाट्या, दुरेघी वह्या, शिस-पेन्सिली, चित्र काढण्यासाठी पाठ कोरे कागद / चित्रकलेच्या वह्या, रंगीत तेल-खडू, स्केचपेन्स असे आहे.

आपण काही पूरक शैक्षणिक साहित्य इथून बनवून नेतो ते प्रिंट करण्याकरता ए-फोर साईझचे कोरे कागद देखील हवे आहेत.

ह्या पैकी ज्या कोणाला जे काही देणे जमणार असेल तर कृपया कळवावे.

हर्पेन, वरील साहित्यापैकी काही साहित्य द्यायला आवडेल मला... ते कुठे आणि कसे देता येईल... मी पुण्यात असते.

मैत्रीचे कार्यालय मयूर कॉलनीत आहे, तिथे वैशाली, मधू किंवा लीनता असतात.
त्यांना ०२० २५४५०८८२ ह्या किंवा ७५८८२८८१९६ ह्याक्रमांकावर संपर्क करावा ही विनंती..

उपक्रमास खुप शुभेच्छा. Happy ... प्रत्यक्ष मदतीला यायला कधीही आवडले असते पण येऊ शकत नाही. इतर गरजांत हातभार लावायला तुम्हालाच संपर्क केला तर चालेल का हर्पेन?

सुनिधी, हे काय विचारणे झाले, मला कधीही सम्पर्क साधलात तरी चालेलच की, पण माझ्यापेक्षा जास्त आणि चांगली माहीती मैत्रीचे कार्यालय देवू शकेलसे वाटल्याने मी मैत्री कार्यालयात संपर्क साधा असे सांगत असतो.

मी ठरवल्याप्रमाणे मेळघाटात जाऊन आलो Happy

सुनिधीकडून मिळालेल्या, पाट्या, वह्या, शिसपेन्सिली आदी वस्तुरुपी देणग्या योग्य ठिकाणी पोहोचल्या गेल्याचे स्वतः बघून आलो. Happy अनेकानेक धन्यवाद सुनिधी !

नवीन पाट्या मिळाल्यानंतर मुलांच्या चेहर्‍यावरचे हास्य आणि निखळ आनंद बघणे, म्हणजे स्वतः घेण्याचाच अनुभव.

http://www.maayboli.com/node/45066 ह्या दुव्यावर जाता, आपल्याला मैत्री शाळेबद्दल एक छोटा वृत्तांत वाचायला आणि काही प्रकाशचित्रे बघायला मिळतील. Happy

मेळघाटातल्या ह्या शैक्षणिक वर्षाचा उपक्रम ठरवल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडला. आता शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. आपण शाळा व्यवस्थित चालाव्या म्हणून नेमलेले, मेळघाटातील १२ युवक गावमित्र, सध्या पुण्याच्या दौर्‍यावर आलेले आहेत. पुण्यात त्यांचे वास्तव्य १ मे ते ४ मे असेल. त्यादरम्यान त्यांच्यासाठी काही कार्यशाळांबरोबरच, कम्युनिटी रेडीयो केंद्र, कात्रज सर्पोद्यान आणि प्राणी संग्रहालय, दूध डेअरी यांना भेटी देण्याच्या कार्यक्रमांचाही अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या सोबत मुक्त गप्पांचा एक कार्यक्रम शनिवार दि. ३ मे रोजी पुण्यातील राजेन्द्रनगर भागातील इंद्रधनुष्य सभागृहामधे संध्याकाळी ५ ते ८ च्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

मेळघाटातील मैत्रीचे काम कशा रीतीने चालते आहे, त्याची माहिती आपल्याला प्रत्यक्ष कोरकू गावमित्रांच्या तोंडून ऐकायला मिळू शकेल.

तरी समस्त मायबोलीकरांना ह्याकरता आग्रहाचे निमंत्रण देत आहे.
येण्याचे अगत्य करावे.

मेळघाटातील उपक्रमांबद्दल तुम्ही कुठून माहिती गोळा करता? अशा उपक्रमात सामिल होऊन पर्यटन आणि किंचीत समाजसेवा दोन्ही छान साधता येऊ शकतं म्हणून मी विचारत आहे. धन्यवाद.