कातरवेळ ...

Submitted by राहुल नरवणे. on 9 July, 2013 - 03:17

संध्याकाळच्या छाया प्रकाशात दूरवर पक्ष्यांचा खेळ चालू होता. बराच वेळ तो खेळ पाहताना एक गोष्ट लक्षात आली, पंखाची फार वेळ हालचाल करून थांबल्यास संथ थोडावेळ फिरायचं आणि परत पंखात भरारी घेऊन उडायचं. फार छोटी आणि साधी घटना … बरेच कंगोरे निघतात. "दिवसभरच्या घाई - गडबडीतील कामातून थोडावेळ आराम …. परत थोडावेळ काम …"
पण विसरलेली एक गोष्ट, आयुष्य हा हि एक दिवसच. एकदा एखादी वेळ गेली की कुठे परत येते, आजच्या दिवसाची सकाळ परत कधी येणार. सकाळ, दुपार, संध्याकाळ. रात्र कधी कळलीच नाही. अगदी मृत्यू सारखीच. मृत्यू, मरण - रात्रीसारख - अंधारमय -काळोखाच.
बालपण अगदी सकाळ सारखं कोवळं, स्वच्छ, नितळ, निष्पाप आणि ताजं. चागल्या कामाची सुरुवात, आयुष्याचा पाया म्हणजे बालपण. छोट्या आणि एका शब्दात - सुरुवात.
दुपार तशीच, तरुण तडपदार, उमेदीची. जी काय हालचाल करायची ती याच वयात आणि वेळेत. संध्याकाळ होण्यापूर्वी जमा करावयाची पुंजी याच वयात गोळा करायची.
सकाळ - दुपार, बालपण - तरुणपण. इतपत सारं काही ठीक, पण प्रश्न फक़्त एका ठिकाणी येउन थांबतो, तो संध्याकाळी. कातरवेळ पूर्णपणे असाह्य करते. सुर्यस्ताकडे पहिले जरी, तरी हालचाल बैचेन करणारी असते. आयुष्याचा सूर्य आपल्या देखत काळोखात जातो. आणि आपण हतबल होऊन बसण्याखेरीज काहीच करू शकत नाही. अगदीच असह्याय.
फ़क़्त आधार असतो, दिवसभर - सकाळपासून केलेल्या गोष्टीचा. त्यात बऱ्याच सुखद, वाईट अशंत: आधार देणाऱ्या. पण या पलीकडे काही नाही. दिवसभर केलेल्या मेहनतिला आयुष्यभर झटल्याचा थकवा शरीरावर आणि मनावर जाणवत असतो. जगलेल्या आयुष्याची परिमाणे काढायाची. त्यात काय चूक आणि काय बरोबर यांची बेरजा - वजाबाकी करायची. सगळीच गणितं बरोबर असतात असंही नाही.
गणितं चुकीची असोत अथवा बरोबर, ती सुटलेली असतात. बाकी आयुष्यातील आकडेमोडीचा अधिकार कोणाच्या तरी हाती देऊन आपलं आयुष्य रिकामं ठेवलेले असतं.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users