अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - २

Submitted by स्वाती२ on 3 July, 2013 - 14:06

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १
मुलं मिडलस्कूलमधे जातात तेव्हा नविन शाळा, वाढलेला अभ्यास, खेळातील स्पर्धा वगैरे गोष्टींशी त्यांना जमवून घ्यावे लागते. त्यातच भर म्हणून शरीरात होणारात बदल आणि त्यातून मनात उठणारी वादळे ही याच काळात सुरु होतात. अपरीपक्व वयातील पीयर प्रेशर आणि वेगवेगळी प्रलोभने यामुळे मुलं गोंधळून जातात. मुलांनी वरवर मोठं झाल्याचा कितीही आव आणला तरी आईबाबांच्या भक्कम आधाराची गरज याच काळात जास्त असते. डेटिंग ते कर्फ्यु आणि इंटरनेट ते प्रिस्क्रिप्श्न ड्रग्ज पर्यंत बर्‍याच गोष्टींच्या सीमा रेषा ठरवाव्या लागत असल्याने पालकांसाठीही हा काळ काहीसा परीक्षेचा असतो. आमच्यासाठीही होता. पण याचकाळात मुलाबरोबर जे नवे मैत्रीचे, विश्वासाचे नाते तयार होत गेले ते बघता हा काळ खूप आनंददायी देखील होता.

डेटिंग - : प्राथमिक शाळेत निखळ असलेली मैत्री या काळात थोडी बदलू लागते. इथे ६वी-७वी पासून हळूहळू काही मुलं डेटिंग करायला लागतात. हे डेटिंग बहुतेक वेळा मुव्ही, पिझा इतपतच असतं. एक प्रकारची प्लेडेटच. दोघांपकी कुणाचे तरी पालक मुलांना मुवीला नेऊन सोडतात आणि मुवी सुटला की पिकप करुन पिझा किंवा आयस्क्रिम खायला नेतात. बरेचदा २-३ जोड्या मिळून ग्रुपडेटही करतात. जोड्या जमतात आणि शुल्लक कारणावरुन तुटतातही. चिटिंगचे आरोप होतात, जोडीदार पळवला म्हणून भांडणे होतात, मैत्री तुटते. नाही म्हटले तरी मन गढूळ होते, अभ्यासावर परीणाम होतो. माझ्या मुलाच्या बाबतीत अजून एक प्रश्न होता. तो म्हणजे इंटर रिलीजीअस डेटिंग साठी आवश्यक असलेली समज त्याला किंवा त्याच्या मित्र मैत्रीणींना नव्हती. या सगळ्याचा विचार करून आम्ही मुलाच्या बाबतीत १६ च्या आत डेटिंग नाही असा निर्णय घेतला. त्याला शांतपणे समजावून सांगितल्यावर त्यालाही ते पटले. त्यातून त्याला खरेच मनापासून कुणाबद्दल विशेष काही वाटायला लागले तर याबद्दल पुन्हा बोलून, विचार करुन काय करायचे ते ठरवू मात्र सगळे करतायत म्हणून डेटिंग फॉर द सेक ऑफ डेटिंग नको असेही सांगितले. Dating is a wonderful experience if done at the right the age अशी डेटिंगबद्दल सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे जेव्हा घरी कळू न देता कर असे काही मित्र-मैत्रीणींनी सुचवले तेव्हा ' I am not going to do it as if it's sin. ' असे सांगून मुलाने लपून छपून डेटिंगला नकार दिला. आम्ही मुलगा १० वर्षांचा असल्यापसून वयात येताना मुलगा आणि मुलगी यांच्यात होणार्‍या शारीरीक बदलांबद्दल बोलायला सुरुवात केली होती. त्यात भर म्हणून हेल्दी रिलेशनशिपबद्दलही बोलायला सुरुवात केली. जेंडरलेस मैत्रीला प्रोत्साहन दिले. अर्थात नेहमीच सगळे सुरळीत घडायचे असे नाही. वेड्या वयाचा परीणाम म्हणून अधून मधून हॉलबडी, मुलीने मुलाचे जॅकेट घालणे वगैरे काहीबाही खुळंही चालायची. मात्र आम्ही या गोष्टींकडे एक फेज म्हणून बघितले. लेकाचे फ्लीसचे जॅकेट दिवसभर त्याची मैत्रीण घालून बसते कळल्यावर लेकाला काही न बोलता एक्स्ट्रा जॅकेट द्यायला सुरुवात केली. विंटर बरोबर जॅकेटचे खूळही गेले. Happy शाळेत सेक्स एज्युकेशनच्या अंतर्गत अ‍ॅब्स्टिनन्सवाले भाषण वगैरे द्यायचे. आम्ही त्याच्या जोडीला कमिटेड रिलेशनशिप, सेफ सेक्स वगैरे कव्हर केले. शाळेत डान्स असायचे. फॉर्मल ड्रेसकोड आणि टिचर्सनी निवडलेले म्युझिक असल्याने एकंदरीत क्राऊड मर्यादेत वागायचा. काही अनुचित घडू नये म्हणून बडी सिस्टिम वापरायला शिकवले होते. ६वी-७वीत पक्की डेट नसल्याने माझा लेक त्याच्या ग्रुप मधील सिंगल मैत्रीणींबरोबर डान्स करायचा. ८वीच्या सेकंड टर्म पर्यंत त्याच्या मैत्रीणींना बॉय फ्रेंड मिळाले होते. ग्रुप बरोबर जाऊन तिथे कुणा रँडम मुलीबरोबर नाच करण्यात लेकाला स्वारस्य नव्हते. त्यामुळे त्यावर्षी मात्र त्याने डान्सला न जाण्याचा निर्णय घेतला.

पार्ट्या आणि कर्फ्यु :
माझ्या मुलाला पालकांच्या देखरेखीखाली होणार्‍या पार्ट्याना जायला परवानगी होती. पालक हजर असले तरी ५०-६० टीन एजर्सचा ग्रुप हाताबाहेर जाण्यास वेळ लागत नाही हे लक्षात घेऊन त्याला वॉर्निंग साइन्स ओळखायला शिकवले. थोडे जरी अनकंफर्टेबल वाटले तरी सेल वर मेसेज पाठव आम्ही घ्यायला येऊ हे पुन्हा पुन्हा सांगितले. एक अशीच ५-७ वेळात ठेवलेली पार्टी हाताबाहेर गेली. मुलाशी आधीच बोलणे झाले होते तरी गडबडून जाऊन तो आणि त्याच्या दोघी मैत्रीणी तिथून बाहेर पडले आणि साईड वॉक नसलेल्या रस्त्यावरून चालत सेफ प्लेस असलेल्या बॉइज क्लबच्या दिशेनी चालायला लागले. सुदैवाने थोडे अंतर गेल्यावर बीटवर असलेल्या पोलीसाने थांबून चौकशी केली. असे रस्त्याच्या कडेने चालणे सेफ नाही सांगितले. मग लेकाने तीनही घरी फोन केला आणि आम्ही मुलांना घरी घेऊन आलो.
माझ्या मुलाला आम्ही घरी नसताना मित्र-मैत्रीणींना घरी बोलवायला तसेच पालक नसताना त्यांच्याही घरी हँग आउट करायला परवानगी नव्हती. कर्फ्यु टाईम प्रसंगानुसार ९:३० ते १० या रेंजमधे असायचा. नियम मोडल्यास त्याचे काय परीणाम असतील हे आधीच त्याच्याशी बोलून ठरवले होते.

बुलिंग, हॅरॅसमेंट वगैरे
आजकाल सर्व शाळाच्या अ‍ॅंटीबुलिंग पॉलिसीज असतात. त्यासंबंधी माहिती पत्रकात असते. जोडीला वर्कशॉप्सही असतात. मात्र अधून मधून होणारे अनवॉन्टेड अडव्हान्सेस, डेटिंग वायलन्स याबाबत फार कमी बोलले जाते. मिडलस्कूलम्धे काही वेळा मुलींना मुलांचा उपद्रव होतो. अशा वेळी वेळीच न घाबरता तक्रार करावी. बदनामी होइल म्हणून घाबरू नये. शाळा अशा तक्रारींची लगेच दखल घेते. माझ्या मुलाच्या मैत्रीणींना असा त्रास झाला होता तेव्हा शाळेने लगेच योग्य ती कारवाई केली. या सगळ्या प्रकारात मैत्रीणींची व्यथा ऐकून /पाहून माझा मुलगा आणि त्याचे मित्रही बरेच समजूतदार झाले. काही वेळा मुलींचाही मुलांना उपद्रव होतो. एका मुलीला डेटिंगसाठी नाही म्हटले म्हणून माझ्या मुलाला असा उपद्रव झाला होता. अशा वेळी देखील शाळा योग्य ती कारवाई करते. बरेचदा या वयात आपापसात हिशोब चुकता करायची खुमखुमी असते पण इथले कायदे बघता काहीवेळा त्याचे परीणाम गंभीर होऊ शकतात याची पाल्याला आणि त्याच्या मित्र-मैत्रीणींना कल्पना द्यावी.

सेलफोन, इंटरनेट, मेडिया
मिडलस्कूलमधे मुलं एक ट्रान्सपोर्टेशन सोडले तर बर्‍यापैकी स्वतंत्र होतात. साहाजिकच त्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सजग रहावे लागते. सेलफोन, इंटरनेटचा चुकून जरी अयोग्य वापर झाल्यास त्याचे गंभीर परीणाम होऊ शकतात.माझ्या मुलाला तो १६ पूर्ण होईपर्यंत स्वतंत्र इमेल आणि फेसबुक अकाउंट नव्हते. त्याचे कामाचे सगळे इमेल्स हे फॅमिली अकाउंटला यायचे. इंटरनेटचा वापर आमच्या देखरेखीखाली व्हायचा. सेलफोन साधा इमर्जन्सीसाठी वापरण्यायोग्य पे अॅज यु गो होता. एवढी काळजी घेऊनही डेमोक्रॅटिक कन्वेशनसाठी एकंदरीत प्रोसीजरचा भाग म्हणून सेलफोन नं. सबमिट केल्यावर साधारण १५ दिवसांनी त्याच्या फोनवर ड्रग्ज विकत घ्या म्हणून वॉइसमेल, मेसेजेस यायला लागले. आम्ही लगेच पोलीसांची मदत घेतली तरी मेसेजेस थांबायला १५ दिवस लागले. विडीयो गेम्स आणि टिव्हीच्या माध्यमातून मुलापर्यंत काय पोहोचत आहे त्यावर अंकुश ठेवला. आमच्या कडे केबल नव्हती/ नाहीये. स्कूल नाईटला ६:३० च्या न्युज व्यतिरिक्त टिव्ही टाईम नव्हता. विकेंडला तो बहुतेक वेळा आमच्या बरोबर टिव्ही बघायचा. बहूतेक शाळा सेक्स्टिंग बाबत वर्षाच्या सुरुवातीला माहीती देतात. पालकांनी देखील आपापल्या स्टेटचे सेक्स्टिंग संबंधीचे कायदे माहीत करुन घ्यावेत आणि पाल्यालाही समजावून सांगावे. लोकल पोलिसांतर्फे बर्‍यच ठिकाणी मुलांसाठी अणि पालकांसाठी इंटरनेट सेफटी वर्कशॉप्स असतात त्याचा जरूर फायदा घ्यावा.

इल्लिगल ड्रग्ज, अल्कोहोल, प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज, गन्स
आमच्या काउंटीमधे मेथ लॅब्जचा सुकाळ असल्याने ड्रग्ज संबंधी बोलणे ४थी-५वी पासूनच सुरु केले होते. अल्कोहोल बद्दलही त्याच सुमारास बोलायला सुरुवात केली होती. मिडल स्कूल मधे ड्रग्ज, अल्कोहोलच्या जोडीला प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज बद्दल बोलायला सुरुवात केली. अभ्यास करताना लक्ष केंद्रीत व्हावे म्हणून ते 3-D movie बघताना अधिक मजा यावी म्हणून विविध कारणांसाठी प्रिस्क्रिप्शन ड्रग्जचा गैरवापर केला जातो. ६वी-७वीतली मुलं याबाबतचे अज्ञान, पियर प्रेशर याला बळी पडतात आणि इमर्जन्सी रुमला जायची वेळ आणतात. आमच्या सुदैवाने माझ्या मुलाला वायप्रेसच्या प्रिस्क्रिप्शन ड्रगवरील स्टोरीसाठी इलस्ट्रेटर म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यावेळी होणार्‍या चर्चा, केलेला रिसर्च, समोर आलेला डेटा या सगळ्यातून लेक याबाबत खूप जागरूक झाला आणि आमचे काम सोपे झाले.
आमच्या मित्र मंडळीत तसेच मुलाच्या मित्रमंडळींत हंटिंग खूप कॉमन असल्याने रिस्पॉन्सिबल गन ओनरशिपबाबत आम्ही सुरुवातीपासूनच आग्रही होतो.

मनी स्किल्स : माझ्या मुलाला आम्ही तो लहान असल्यापासून पॉकेट मनी देत होतो. बेसीक मनी स्किल्स शिकवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. मिडलस्कूलमधे त्याला हळूहळू लोन, क्रेडिट, इंटरेस्ट, टॅक्सेस वगैरे गोष्टींची ओळख करुन दिली. गृह कर्ज, इमर्जन्सी फंड, रिटायरमेंट, एज्युकेशन फंड वगैरे गोष्टी स्टेटमेंट्स दाखवून समजावून सांगितल्या. खरेदी करताना आपले बजेट, गरजा, चैन यांचा मेळ घालायला शिकवले. कंझुमर रिपोर्ट वाचून तसेच क्लिअरंस, डिस्काउंट, कुपन्स, रिवार्डस वगैरे वापरुन आम्ही कशी खरेदी करतो ते तो बघत होता. आमच्या इथे चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे ७वीच्या मुलांसाठी रियॅलिटी स्टोअर असते. यात दिवसभर वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीतून मुले डॉलर आणि सेंट्स बद्दल शिकतात. बाहेरच्या जगात आईबाबांना ज्या आर्थिक जबाबदार्‍या पाड पाडाव्या लागतात त्याची जाणीव या वर्कशॉपमधे मुलांना होते. 'being grown up is no fun' ते 'babies are expensive' पर्यंत अनेक प्रतिक्रिया मुलांकडून ऐकायला मिळाल्या. :). २००८ ची बिकट इकॉनॉमीने देखील मुलांना बरेच काही शिकवले.

आमच्या फॅमिली वॅल्यूज आणि माझ्या मुलाला तेव्हा असलेली समज याचा विचार करुन आम्ही आमच्या सीमारेषा आखल्या. शाळेतील शिक्षक, काउंसेलर, फॅमिली डॉक्टर यांनी वेळोवेळी योग्य सल्ले दिले, धीर दिला..मुलानेही चांगली साथ दिली. प्रसंगी दोन्ही बाजूंनी थोडीफार तडजोड केली आणि अवघड वर्षं पार पडली.

टीप - मला एकच मुलगा असल्याने माझा अनुभव हा मुलगा मोठा होतानाचा आहे. मायबोलीकरांपैकी कुणाला मुलींचे पालक म्हणून अजून काही अनुभवाचे बोल सांगायचे असतील त्यांचे स्वागतच आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती, खरंच खूप छान अनुभव शेअर करताय. वर गेहना म्हणतेय तसं सुरेख पॅरेंटींग आहे तुमचं. तुमच्या मुलाचंही मला तितकंच कौतुक वाटतंय पण. आई-वडील आपल्या भल्याकरिताच सांगतायत हे माहीत असलं तरी शाळेतली प्रलोभनंही कमी नसतील नक्कीच त्याच्याकरिता. इतकं समंजस वागणं सोप्पं नाही.

स्वाती२, हाही लेख आवडला. खूप उपयुक्त माहिती व अनुभव. आणखी विस्ताराने यासंबंधीचे अनुभव वाचायला आवडतील.

सायबरबुलिंग बद्दल राज +१. मी ऐकले आहे त्यानुसार तिथे अनेक शाळांमधूनच फेसबुक, सायबरबुलिंग, इंटरनेटचा वापर यांविषयी मार्गदर्शन केले जाते. (अर्थात त्यातल्या किती गोष्टी मुले खरोखर ऐकतात व फॉलो करतात हा वेगळा मुद्दा!)

धन्यवाद मंडळी!

राज, अधिक माहिती बद्दल धन्यवाद. माझ्या मुलाचे जॉइंट अकाउंट आहे त्याच्या बाबाबरोबर. त्याच्यासाठी सिक्युर्ड क्रेडिट कार्ड घेणार आहोत.

>>आई-वडील आपल्या भल्याकरिताच सांगतायत हे माहीत असलं तरी शाळेतली प्रलोभनंही कमी नसतील नक्कीच त्याच्याकरिता.>>
आडो, प्रलोभन होतीच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे त्याचे परीणामही डोळ्यासमोर होते. व्यसने, त्यातुन येणारी बेकारी, गरीबी, हाय स्कूल स्वीट हर्ट म्हणत लवकर होणारी लग्ने अणि त्यातला डोमेस्टिक वायलंस हे सगळे आजूबाजूला बघत तो मोठा झाला. माझ्या मुलाचे मित्र-मैत्रीणी इथल्या मेनस्ट्रीम मधले. गावातल्या डॉक्टर-इंजिनियर पासून कन्विक्टेड फेलनच्या मुलांपर्यंत सगळे एकाच वर्गात. त्यामुळे इथली काळी बाजू लहानपणापासूनच समोर असायची. आम्हीही त्याला शेल्टर केले नाही. त्याच्या प्रश्नांना त्याला समजेल अशा भाषेत उत्तरं देत गेलो. काल आम्ही पीनटबटर आणि क्रॅकर खाऊन झोपलो, मॉमला डॅड ने मारलं- पोलीस आले- डॅड आता सेलमधे आहे वगैरे गोष्टी २री-३रीतली मुलं सहजपणे सांगायची. त्याच्या एका मित्राला आमचा भरलेला फ्रिज आणि पॅन्ट्री ही अप्रुपाची गोष्ट होती. 'तुझी आई खूप चांगली आहे. मला नेहमी पोटभर खाऊ घालते.' असं जेव्हा तो मित्र म्हणाला तेव्हा लेकाला सुरवातीला त्यात विशेष काय तेच कळले नाही. आफ्टरनुन स्नॅक हे त्याच्यासाठी रुटीन होते. शाळेतील फ्री लंच नंतर बर्‍याच मुलांना स्नॅक सोडाच पुरेसे डिनरही मिळत नाही हे कळल्यावर तो उडालाच होता. मित्राच्या वडलांची नोकरी दारुच्या व्यसनामुळे जाते, मित्राला आणि त्याच्या मोठ्या भावाला हॉटेलात डिशवॉशरची नोकरी करावी लागते हे प्रत्यक्ष पाहील्यावर मुलाला फार काही सांगावे लागत नाही.

anudon tu pan hyachyat bhar ghalu shakashil na??

(marathitun type hot nahiye Sad )

दोन्ही लेख अतिशय सुंदर. मुलांना वाढवणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. तुम्ही ते इतक्या यशस्वीपणे पेललत याबद्दल तुमचे नी तुमच्या लेकाचे अतिशय अभिनंदन, नी त्याच्या भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा! त्याला सदैव यश मिळो हीच सदिच्छा!

>>दोन्ही लेख अतिशय सुंदर. मुलांना वाढवणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. तुम्ही ते इतक्या यशस्वीपणे पेललत याबद्दल तुमचे नी तुमच्या लेकाचे अतिशय अभिनंदन, नी त्याच्या भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा! त्याला सदैव यश मिळो हीच सदिच्छा! >>
१०० % सहमत !
फार कळकळीने लिहिले आहे स्वाती, आभार हे सर्व शेअर करण्यासाठी.

SUNDER

Pages