नमस्कार मायबोलीकर.
घरातल्या सगळ्या प्रकारामुळे अत्यंत अस्वस्थता आली आहे, नैराश्याच्या वाटेवर आम्ही दोघे (मी आणि नवरा) चाललो आहोत.
कुणाशी तरी बोललं तर मन हलकं होईल म्हणून इथे लिहीत आहे. जाणकार सल्ल्यांची आणि मार्गदर्शनाची गरज तर आहेच.
आमच्या लग्नाला दहा वर्षे झाली. नवरा-४० वर्षे, मी ३४ वर्षे. गेल्या ७-८ वर्षांपासून आम्ही दोघे शिक्षण, नोकरी अशा सबबींवर बाकीच्या कुटुंबापासून वेगळे राहत आहोत.आम्हाला ७ वर्षांचा एक मुलगा आहे.
गावाकडे ९ लोकांचं कुटुंब आहे.
१. सासू - ६५ वर्षे,
२. सासरे- ७२ वर्षे
दोघांच्याही नावे विमा वगैरे काही नाही. बँकेत जमा रक्कम नाही. सासर्यांच्या नावाने मोठा प्लॉट आहे. सध्या त्याची किंमत अंदाजे ७० लाखापर्यंत जाईल. पण त्यावर साधारण ३५ लाखाचं कर्ज आहे.
३. रमेश - ४७ वर्षे, गुटख्याचं व्यसन आहे. बाकी आजार सध्या तरी काही नाहीत. विमा नाही.बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत.
४. रमेशची बायको- ४० वर्षे, आजार सध्या तरी काही नाहीत. विमा नाही. बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत. थोडंफार सोनं बँकेत गहाण आहे.
५. रमेशचा मुलगा - १५ वर्षे, दहावीत शिकतो.होस्टेलला असतो.शालेय प्रगती साधारण. ५०-६० % च्या आसपास मार्क्स असतात. पुढील शिक्षणासाठी खर्चाची काहीही तरतूद केलेली नाही.
६. रमेशची मुलगी - १३ वर्षे, आठवीत शिकते.शालेय प्रगती साधारण. ५०-६० % च्या आसपास मार्क्स असतात.
पुढील शिक्षणासाठी खर्चाची काहीही तरतूद केलेली नाही.
७. सुरेश - ४३ वर्षे, सिगारेट, गुटखा, दारू सगळी व्यसनं आहेत. दारूडा म्हणण्याइतकी स्थिती नसली तरी आजकाल रोजच दारू पिण्याची सवय लागली आहे. एकदा हार्ट अटॅक येऊन गेला आहे. बीपीचा त्रास आहे. विमा नाही. बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत. त्यांच्या नावाने एक प्लॉट आहे. साधारण किंमत १०-१२ लाख.
८. सुरेशची बायको- २३ वर्षे, सध्या प्रेग्नंट.नोकरी करत नाही.बचत रक्कम नाही. थोडंफार सोनं बँकेत गहाण आहे.
९. सुरेशची मुलगी - २ वर्षे, व्यवस्थित पोषण न झाल्याने सतत आजारी.
रमेश आणि सुरेश दोघे मिळून शेती करतात. पण गेल्या दहा वर्षांत त्यातून ठोस नफा झाल्याचं माझ्या ऐकण्यात नाही. २० एकर शेती आहे. ऊस, कापूस, तंबाखू, फ्लॉवर, सोयाबीन अशी पिके घेतात. पण हवे तितके कष्ट न घेतल्याने किंवा इतर कारणांनी शेतीसाठी होणारा खर्च वजा जाता वर्षाअखेरीस हातात फारसं लागत नाही.
आम्ही दोघे नोकरी करतो. नवर्याच्या नावाने एलाआयसी वगैरेचे इन्शुरन्स आहेत. पण माझ्या नावे अजून काही नाही. मुलाच्या शिक्षणासाठी अजून काही बचत करायला सुरूवात केलेली नाही. आम्हाला दोघांना मिळून महिना एक लाखापर्यंत कमाई होते.
गेल्या वर्षीपर्यंत आम्ही घरी महिना ३० ते ५० हजारच्या दरम्यान रक्कम पाठवत होतो. पण असं किती दिवस चालू राहणार म्हणून आम्ही सर्वांना एकत्र बसवून चर्चा केली. आम्ही असा प्लॅन सुचवला.
मोठा प्लॉट विकून सगळं कर्ज फेडून टाकावं आणि उरलेली रक्कम विभागून रमेश, सुरेश आणि त्यांच्या बायका ह्यांच्या नावावर ठेवावी. शेती दुसर्या कुणाला तरी कसायला द्यावी. दोन्ही कुटुंबांनी वेगवेगळं रहावं. चौघांनीही काहीतरी छोटे-मोठे उद्योग सुरू करून किंवा नोकरी करून स्टेडी मिळकत सुरू करावी. त्यांचं बस्तान बसेपर्यंत दोन्ही कुटुंबांना गरजेपुरती आर्थिक मदत आम्ही करत राहू.
पण ह्या प्लॅनला सासर्यांची आणि दोन्ही भावांची तयारी नाही. त्यांना मोठा प्लॉट विकायचं पटत नाही. अजून दहा वर्षांनी त्याची किंमत डबल होईल असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या वयात नवीन काही उद्योग करण्ं जमणार नाही असं त्यांना वाटतं. नोकरी करणं त्यांना कमीपणाचं वाटतं (एकेकाळचं सावकार घराणं आहे !) बायकांना घराबाहेर पडू द्यायची तयारी नाही. "बायका म्हणजे पायातली चप्पल" अशा विचारांची पुरूषप्रधान संस्कृती @$@$
आहे. शिवाय वेगळं राहणं जमेल असा विश्वास त्यांना वाटत नाही.
आम्ही काहीही बोलायला गेलो तर "तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्यापुरतं बघा" असं उत्तर मिळतं. पण गेल्याच महिन्यात सुरेशच्या ऑपरेशनसाठी १ लाख रूपये आम्ही पाठवले. आम्ही नसते पाठवले तर कुठूनतरी महिना ३ % व्याजदराने घेतले असते (अशा व्याजाची पण काही रक्कम कर्ज आहे)
रमेशच्या मुलाच्या होस्टेल खर्चासाठी दरमहा १० हजार रूपये आम्ही पाठवतो. आता दोन्ही मुलांची कॉलेज शिक्षणं चालू होतील. वर लिहिल्याप्रमाणे ह्यासाठी काहीच तरतूद नसल्याने ही जबाबदारी आम्हीच घेतली आहे.
सगळा विचार केला तर खूप चिडचिड होते. पुढे सगळाच अंधार दिसतो. बरं सगळ्यांशी पूर्ण संबंध तोडून टाकून फक्त आपल्यापुरतं बघावं असा विचार जरी मनात आला तरी अपराध्यासारखं वाटतं.
पण असंच चालू ठेवावं तर स्वतःच्या भवितव्याविषयी टेन्शन येतं. विचार करकरून आजकाल खूप उदास वाटायला लागलं आहे. नुकतंच माझं बीपी सुद्धा वाढल्याचं आढळलं. आजकाल सतत डोकं दुखत असतं.रात्री झोप लागत नाही.
सुदैवाने आमच्या दोघांमध्ये ह्या विषयावर काही मतभेद नाहीत. पण दोघंही हतबुद्ध झालो आहोत. मार्ग सुचत नाहीये. जीवनात रसच वाटेनासा झालाय.
फार मोठं गुर्हाळ लिहिलंय. कदाचित जरा असंबद्धही झालं असेल. त्याबद्दल सॉरी. पण आज विचारांचा कडेलोट झाला. रात्रीची उठून कीबोर्ड बडवत बसलेय. प्लीज मार्गदर्शन करा.
बेसिकली, अनेक ठिकाणी 'लग्न'
बेसिकली, अनेक ठिकाणी 'लग्न' हाच एक प्रॉब्लेम असू शकतो, अश्या विचित्र निष्कर्षाप्रती येणे होते.>>
बेफी जीं शी पुर्णपणे सहमत
मिताली, आधिचे सगळे मेसेजेस
मिताली,
आधिचे सगळे मेसेजेस वाचले नाहित अजुन, पण...
१.दुसर्या भावाचा >>>>>>>>त्यांच्या नावाने एक प्लॉट आहे. साधारण किंमत १०-१२ लाख.>>>>>>हा प्लॉट विकुन त्यात अजुन भर घालुन आधी सर्वात मोठा प्लॉट ज्याच्यावर ३५ लाख कर्ज आहे तो सोडवुन घ्यावा. ( या दोघा भावांनी मिळुन. आणि हो दुसरे कर्ज न घेता हे महत्वाचे)
एकदा तो प्लॉट कर्जमुक्त झाला कि मग सासरे म्ह्णतात त्या प्रमाणे मग तो अजुन काही काळ ठेवायला हरकत नसावी.
२.भावाची मुले हॉस्टेल वर ठेवायची आणि पैसे पाठवायची का गरज पडली? गावात शाळा नाहित का? त्या मुलांना याची जाणिव आहे का? कित्येक गरीब मुले मदतीशिवाय पुढे येतातच ना?
अगदीच हुशार असतील तर स्कॉलरशीप ई बघावी. लागलीच तरिहि मदत तरच करावी आणि तेवढ्यापुरतीच.
३.तुम्हाला पैसे पाठवणे बंद करायचे नसतील तर निदान त्यांना डायरेक्ट पैसे न देता त्यांचे सोने गहाण ठेवले आहे ते सोडवुन घ्या हळु हळु.
नंतर ते सोने त्यांच्या हातात न देता त्यांच्या मुलांसाठी सेफ ठेवावे.
४.घरी महिना ३० ते ५० हजारच्या दरम्यान रक्कम पाठवत होतो>>>>>>घर खर्चापुरती रक्कम अथवा डायरेक्ट सामान आणुन द्यावे काही महिने. आणि थोडे दिवसात हे बंद होईल असे ठणकावुन सांगावे.
५. तुम्हाला मुलगा आहे, त्याचे भविष्य पहा. असे सर्वांना करुन तुम्हाला गरज पडली तर तुमच्या बाजुने उभे रहायला हिच माणसे येतील असा विश्वास आहे का तुम्हाला? नसेल तर त्यावर विचार करा.
मिताली, मानले बाई तुला.
मिताली, मानले बाई तुला. इतक्या वर्षांनंतर ह्या विषयावर बोलते आहेस. कसं पचवलंस इतकी वर्ष? हा मानवी स्वभाव आहे, जितकं मिळेल तितकं फुकटात घ्यायचं.
जर गावी जवळ जवळ ८० लाखाची जमीन आहे तर तिचं उत्पन्न काय ते उत्पन्न वाढवण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत, हे विचारा. माणसाची मानसिकता बदलता येत नाही. त्यांना नोकरी करणं पटत नाही तर नोकरी करून मिळालेला पैसा कसा चालतो? हेही विचारा, प्रथम तुमच्या नवर्याला आणि मग दिरांना. तुमच्या सासर्यांचा जमिन न विकण्याचा मुद्दा चूक नाही. पण त्यांना ह्या प्रश्नांची उत्तरे शोधायला मदत करा. तुम्ही देशाबाहेर आहात त्यामुळे तुम्ही फारसे काही करु शकत नाही असे वाटून घेऊ नका.
नवर्याचे सख्खे रक्ताचे कुटुंब आहे त्यांनी नवर्याच्या शिक्षणावेळी खूप मदत केली असण्याची शक्यता आहे, जेंव्हा तुमचा नवरा शिकत होता तेंव्हा कसे चालायचे हे समजून घ्या. गाव इतके लहान आहे का की मुलाला शिकायला होस्टेल ला ठेवावे लागले. शिवाय असे कोणते हॉस्टेल आहे जिथे दहवीतल्या मुलाचा खर्च १०००० येतो? गाव छोटे असेल तर महिन्याला ४०००० खर्च होउ शकत नाहीत. ह्याशिवाय शेतीचे उत्पन्न आहेच. तुम्हाला कळतय क तुम्हाला लुटत आहेत ते? ह्याची सत्यता जेंव्हा तुझ्या नवर्याला कळेल तेंव्हा त्याला किती धक्का बसेल ह्याचा विचार कर.
यापुढे पैसे पाठवणार असाल तर दर महिन्याला किती पैसे पाठवणार ते स्पष्टपणे सांगा ते फक्त सासू सासर्यान्च्या खर्चासाठीच पाठवा, किंवा तुम्ही ते बँकेत ठेवा खूप गरज असेल तेंव्हाच पाठवा. . त्यातूनच बचत करायला सांगा. ही जबाबदारी सासू सासर्यांवर टाका. मला असे वाटते की तुमचे दीर आणि जावा यांनी गृहित धरले आहे की तुमचा नवरा सगळी जबाबदारी घेणार आहे. उद्या मुलाला महागड्या शिक्षणाला पाठवून खर्च तुमच्याकडून मागतील. दहावीनंतर मुलगा काय करणार त्याचा किती खर्च तुम्ही उचलणार ते तुम्ही कर्ज म्हणून पुतण्याला देणार का नाही, तो नापास झाला तर? हे सगळे नवर्यासोबत बसून लिहून काढा. गावाला कळवा. खर्चाचा ग्रीन बेल्ट कोणता, ऑरेंज कोणता, रेड कोणता हे आत्ताच ठरवा वेळोवेळी वॉर्निंग द्या.
तुम्ही कोणताही कठिण निर्णय घेतलात तरी तुमची कयमची बदनामी होणार आहे, नवर्याची त्याला तयरी आहे क नाही ते पाहून घ्या. मुळात असा दानशूरपणा तो का करत आहे हे तुम्हाला माहीत आहे का.
कोणालाही फुकट अन्न खायला देण्याऐवजी त्याला अन्न मिळवायला शिकवणे जास्त महत्वाचे असते. उद्या तुमच्या मुलाला कधी कोणत्याही मदतीची गरज वाटली तर हे लोक त्याच्या पाठीशी उभे राह्णार का ह्याचा अंदाज घ्या.
पूर्वी जे झाले ते झाले, ह्यापुढे तुमचा आर्थिक निर्णय काय ते ठरवून ठेवा. आप्ण स्वतः जन्माला घातलेल्या मुलान्ची जबाब्दारी आप्ल्यावर असते हे दिरांना स्पष्टपणे सांगा. नाहीतर मुलांना जन्म देउ नये. मुलगा झाला तर काय दिवे लावणार आहे ह प्रश्न ह्या शब्दात नव्हे तरी स्पष्ट विचारा. तुमचा नवरा परदेशात नसता इतकी कमाई नसती तर काय केले असते? जर आर्थिक मदत नव्हे जबाबदारी घेतली आहे तर निर्णय सुद्धा तुम्हीच घेतले पाहीजेत.
दीराच्या ऑपरेशन्साठी पैसे पाठवणं योग्य, पण लगेच पंचतारांकीत हॉस्पिटलसाठी नाही, ते जर स्वतःचं स्वतः सांभलू शकत नाहीत, व्यसने करतात तर त्यांना नगरपालिकेचे हॉस्पिटल आणि जनरल वॉर्ड बरा, त्यात किति खर्च येतो त्याचा थोदा अन्दाज ठेवणे चांगले.
तुम्ही करायचे शिवाय "तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्यापुरतं बघा" असे ऐकायचे कशासाठी? शिवाय तुम्हाला हे कळत नाही का की तुम्ही त्यांना अपंग बनवताय.
गावात जर इतर कोणी मित्र अगदी फक्त तुमच्या विश्वासाचे राहात असतील तर त्यांच्याकडून रिपोर्ट घेत रहा.
तुम्ही अमूकतमूक केले नाहीत तर मदत मिळणार नाही हे स्पष्ट करा. शिवाय पूर्वी इतरांनी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही किति पैसे पाठवले ते सांगा आणि कुठे कसे खर्च झाले ह्याचा हिशोब मागा. ह्याशिवाय शेतजमिनीवरचे कर्ज फितवण्याची जबाबदारी तुमच्यावर येउ नये ह्याकरिता चान्गल्या वकिलाचा सल्ला घ्या.
दारू, गुटखा यातून एक मोठा आजार येउन गेलच आहे आता अजून येत राह्तील कुठे कुठे पुराल तुम्ही? स्वतःकडे लक्ष द्या. स्वतः जिमला नियमित जा. सर्वात आधी मेडिटेशन सुरु करा, तुम्ही का नैराश्याचा सामना करायचा? तुम्हाला का बी.पी. चा त्रास व्हावा? आणि तुम्हाला काही झालं तर तुमच्या मुलाने कोणाचं तोंड पाहायचं? इंटरनेटवर स्वामी सुखबोधानंद, ब्रह्मकुमारी'ज सिस्टर शिवानी यांचे चांगले व्हिडियो आहेत ते पाहा. त्यामधून पॉझिटिव विचार कसे करायचे आपल्या मनातल्या भीतीला कसे घालवायचे ह्यासाठी खूप मदत मिळेल. मला स्वतःला त्यांनी खूप मदत झाली, शिवाय अनेक निर्णय घ्यायला मदत सुद्धा झाली.
सर्वात आधी मेडिटेशन सुरु
सर्वात आधी मेडिटेशन सुरु करा,तुम्ही का नैराश्याचा सामना करायचा? तुम्हाला का बी.पी. चा त्रास व्हावा? आणि तुम्हाला काही झालं तर तुमच्या मुलाने कोणाचं तोंड पाहायचं?
इंटरनेटवर स्वामी सुखबोधानंद, ब्रह्मकुमारी'ज सिस्टर शिवानी यांचे चांगले व्हिडियो आहेत ते पाहा. मला स्वतःला त्यांनी खूप मदत झाली, शिवाय निर्णय घ्यायला मदत सुद्धा झाली.
मिताली नंदिनी आणि इतर
मिताली
नंदिनी आणि इतर बर्याचजणांनी तुम्हाला उपयुक्त सल्ले याआधीच दिले आहेत.एखाद्याला मदत करणे आणि पूर्णपणे पोसणे यात फरक आहे.वल्लरीच यांचा पहिला प्रतिसाद खरच छान आहे. बर्याचजणांची अशी
समजूत असते की त्यांच्याकडे भरपूर आहे तर आम्हांला दिले तर काय झाले.मदतीचे ओझे न वाटता ह़क्क वाटू लागतो.झाले ते झाले. आता तरी स्पष्ट नाही म्हणायला शिका.औषध कडू असते.पण त्यामुळे रोग बरा होतो हे लक्षात ठेवा. नाहीतर त्रासदायक गळू हे शस्त्रक्रिया करून काढायला लागते.
तुमच्या एका पोस्टमधे तुमच्या मिस्टरांच्या L.I.C वरही सासरच्यांनी कर्ज काढ्लय असे तुम्ही म्हटलय.(नवर्याच्या पॉलिसीजवरही त्यांनी कर्ज काढून घेतलं आहे.) त्याला तुमच्या मिस्टरांची संमती होती?जर फक्त मिस्टरांच्याच नावाची पॉलिसी असेल तर ते कर्ज मिटवून स्वतःची L.I.C clear करा.त्याला नॉमिनेशन इ.फक्त तुमचेचराहू द्या.सासू-सासरे यांची जबाबदारी घेणे वेगळे आणि पन्नाशीच्या दीरांची आणि कुटुंबाची जबाबदारी घेणे वेगळे!
२० एकराची शेती असताना तुम्ही
२० एकराची शेती असताना तुम्ही दोघे महिना ३५००० कशासाठी पाठवता? म्हणजे त्या ९ जणांना तुम्हीच पोसताय असं दिसतं. एकूण परिस्थिती पाहता दीराच्या मुलांना या सगळ्याची जाणीव असणं कठीण. आज शिक्षणासाठी पैसे देताय. उद्या दीर जावांची आजारपणं निघणार आहेत. मुलींची लग्ने निघतील. तेव्हा काय कराल? एकत्र कुटुंबात शेती आपल्या नावे करा म्हणणं बरं दिसणार नाही. त्याचे इतर अर्थ काढले जातील आणि इतकी वर्षं केलेलं सगळं मातीमोल ठरवलं जाईल. आतापर्यंत जे पैसे गेले ते गंगार्पण म्हणायचे आणि हळूहळू संबंध कमी करायचे हा एक उपाय दिसतो आहे. दर महिन्याचा तनखा आधी बंद करा. काही कारणाने मदत केली तर ठीक आहे.
Pages