एकत्र कुटुंबाचा तिढा कसा सोडवायचा ????

Submitted by मिताली on 1 July, 2013 - 19:27

नमस्कार मायबोलीकर.

घरातल्या सगळ्या प्रकारामुळे अत्यंत अस्वस्थता आली आहे, नैराश्याच्या वाटेवर आम्ही दोघे (मी आणि नवरा) चाललो आहोत.
कुणाशी तरी बोललं तर मन हलकं होईल म्हणून इथे लिहीत आहे. जाणकार सल्ल्यांची आणि मार्गदर्शनाची गरज तर आहेच.

आमच्या लग्नाला दहा वर्षे झाली. नवरा-४० वर्षे, मी ३४ वर्षे. गेल्या ७-८ वर्षांपासून आम्ही दोघे शिक्षण, नोकरी अशा सबबींवर बाकीच्या कुटुंबापासून वेगळे राहत आहोत.आम्हाला ७ वर्षांचा एक मुलगा आहे.

गावाकडे ९ लोकांचं कुटुंब आहे.
१. सासू - ६५ वर्षे,
२. सासरे- ७२ वर्षे
दोघांच्याही नावे विमा वगैरे काही नाही. बँकेत जमा रक्कम नाही. सासर्‍यांच्या नावाने मोठा प्लॉट आहे. सध्या त्याची किंमत अंदाजे ७० लाखापर्यंत जाईल. पण त्यावर साधारण ३५ लाखाचं कर्ज आहे.
३. रमेश - ४७ वर्षे, गुटख्याचं व्यसन आहे. बाकी आजार सध्या तरी काही नाहीत. विमा नाही.बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत.
४. रमेशची बायको- ४० वर्षे, आजार सध्या तरी काही नाहीत. विमा नाही. बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत. थोडंफार सोनं बँकेत गहाण आहे.
५. रमेशचा मुलगा - १५ वर्षे, दहावीत शिकतो.होस्टेलला असतो.शालेय प्रगती साधारण. ५०-६० % च्या आसपास मार्क्स असतात. पुढील शिक्षणासाठी खर्चाची काहीही तरतूद केलेली नाही.
६. रमेशची मुलगी - १३ वर्षे, आठवीत शिकते.शालेय प्रगती साधारण. ५०-६० % च्या आसपास मार्क्स असतात.
पुढील शिक्षणासाठी खर्चाची काहीही तरतूद केलेली नाही.
७. सुरेश - ४३ वर्षे, सिगारेट, गुटखा, दारू सगळी व्यसनं आहेत. दारूडा म्हणण्याइतकी स्थिती नसली तरी आजकाल रोजच दारू पिण्याची सवय लागली आहे. एकदा हार्ट अटॅक येऊन गेला आहे. बीपीचा त्रास आहे. विमा नाही. बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत. त्यांच्या नावाने एक प्लॉट आहे. साधारण किंमत १०-१२ लाख.
८. सुरेशची बायको- २३ वर्षे, सध्या प्रेग्नंट.नोकरी करत नाही.बचत रक्कम नाही. थोडंफार सोनं बँकेत गहाण आहे.
९. सुरेशची मुलगी - २ वर्षे, व्यवस्थित पोषण न झाल्याने सतत आजारी.

रमेश आणि सुरेश दोघे मिळून शेती करतात. पण गेल्या दहा वर्षांत त्यातून ठोस नफा झाल्याचं माझ्या ऐकण्यात नाही. २० एकर शेती आहे. ऊस, कापूस, तंबाखू, फ्लॉवर, सोयाबीन अशी पिके घेतात. पण हवे तितके कष्ट न घेतल्याने किंवा इतर कारणांनी शेतीसाठी होणारा खर्च वजा जाता वर्षाअखेरीस हातात फारसं लागत नाही.

आम्ही दोघे नोकरी करतो. नवर्‍याच्या नावाने एलाआयसी वगैरेचे इन्शुरन्स आहेत. पण माझ्या नावे अजून काही नाही. मुलाच्या शिक्षणासाठी अजून काही बचत करायला सुरूवात केलेली नाही. आम्हाला दोघांना मिळून महिना एक लाखापर्यंत कमाई होते.

गेल्या वर्षीपर्यंत आम्ही घरी महिना ३० ते ५० हजारच्या दरम्यान रक्कम पाठवत होतो. पण असं किती दिवस चालू राहणार म्हणून आम्ही सर्वांना एकत्र बसवून चर्चा केली. आम्ही असा प्लॅन सुचवला.

मोठा प्लॉट विकून सगळं कर्ज फेडून टाकावं आणि उरलेली रक्कम विभागून रमेश, सुरेश आणि त्यांच्या बायका ह्यांच्या नावावर ठेवावी. शेती दुसर्‍या कुणाला तरी कसायला द्यावी. दोन्ही कुटुंबांनी वेगवेगळं रहावं. चौघांनीही काहीतरी छोटे-मोठे उद्योग सुरू करून किंवा नोकरी करून स्टेडी मिळकत सुरू करावी. त्यांचं बस्तान बसेपर्यंत दोन्ही कुटुंबांना गरजेपुरती आर्थिक मदत आम्ही करत राहू.

पण ह्या प्लॅनला सासर्‍यांची आणि दोन्ही भावांची तयारी नाही. त्यांना मोठा प्लॉट विकायचं पटत नाही. अजून दहा वर्षांनी त्याची किंमत डबल होईल असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या वयात नवीन काही उद्योग करण्ं जमणार नाही असं त्यांना वाटतं. नोकरी करणं त्यांना कमीपणाचं वाटतं (एकेकाळचं सावकार घराणं आहे !) बायकांना घराबाहेर पडू द्यायची तयारी नाही. "बायका म्हणजे पायातली चप्पल" अशा विचारांची पुरूषप्रधान संस्कृती @$@$ Angry आहे. शिवाय वेगळं राहणं जमेल असा विश्वास त्यांना वाटत नाही.

आम्ही काहीही बोलायला गेलो तर "तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्यापुरतं बघा" असं उत्तर मिळतं. पण गेल्याच महिन्यात सुरेशच्या ऑपरेशनसाठी १ लाख रूपये आम्ही पाठवले. आम्ही नसते पाठवले तर कुठूनतरी महिना ३ % व्याजदराने घेतले असते (अशा व्याजाची पण काही रक्कम कर्ज आहे)
रमेशच्या मुलाच्या होस्टेल खर्चासाठी दरमहा १० हजार रूपये आम्ही पाठवतो. आता दोन्ही मुलांची कॉलेज शिक्षणं चालू होतील. वर लिहिल्याप्रमाणे ह्यासाठी काहीच तरतूद नसल्याने ही जबाबदारी आम्हीच घेतली आहे.

सगळा विचार केला तर खूप चिडचिड होते. पुढे सगळाच अंधार दिसतो. बरं सगळ्यांशी पूर्ण संबंध तोडून टाकून फक्त आपल्यापुरतं बघावं असा विचार जरी मनात आला तरी अपराध्यासारखं वाटतं.
पण असंच चालू ठेवावं तर स्वतःच्या भवितव्याविषयी टेन्शन येतं. विचार करकरून आजकाल खूप उदास वाटायला लागलं आहे. नुकतंच माझं बीपी सुद्धा वाढल्याचं आढळलं. आजकाल सतत डोकं दुखत असतं.रात्री झोप लागत नाही.
सुदैवाने आमच्या दोघांमध्ये ह्या विषयावर काही मतभेद नाहीत. पण दोघंही हतबुद्ध झालो आहोत. मार्ग सुचत नाहीये. जीवनात रसच वाटेनासा झालाय.
फार मोठं गुर्‍हाळ लिहिलंय. कदाचित जरा असंबद्धही झालं असेल. त्याबद्दल सॉरी. पण आज विचारांचा कडेलोट झाला. रात्रीची उठून कीबोर्ड बडवत बसलेय. प्लीज मार्गदर्शन करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मदत थाम्बवा आणि प्लॉट विकण्यावर ठाम रहा.
परखड वाटेल पण त्याशिवाय ह्या चक्रतुन बाहेर पड्णे होणार नाहि.
स्वानुभव.

गावातल्या पेपरात एकदा एक (खोटी) वकिली नोटिस द्या की तुम्ही आतापासुन यांचे कसलेही देणे फेडणार नाही. मग बघा यांना कोण उभं करतं लोन देण्यासाठी ते. <<
खोटी कशाला. खरीच नोटीस द्या की.

अश्या कहान्या आमच्या गावाकडे पण आहे. घरातला एकटा मुलगा जर शिकुन नोकरी ला असेल तर घरच्यांनी कष्ट घेतले म्हणुन तो शिकला . अरे त्याचाच सख्खा भाऊ का नाही शिकला ? घरची परीस्थीती तर दोघांसाठी सारखीच होती. जो शिकल तो त्याच्या मेहनतीवर (अर्थात घरच्यांनी केली ती फक्त मद्त)
होत अस जो नोकरी करतो त्याच्या कडुन घरचे अवाजवी अपेक्षा ठेवु लागतात. मुलगाही आपल्याशिवाय कोण आहे, आपल आद्य कर्तव्यच आहे , त्यांच्या कष्टांमुळेच मी इथे पोहचु शकलो अश्या विचारांच्या अहारी जातो नि मन-स्वास्थ्य गमवुन बसतो. त्याचा विचार बरोबर असतो पण डोळस नसतो... आणी इथेच खरी गोम आहे. घरचे पक्के ओळखुन बसता , लगल्या-भागल्याला आहेच हा... एकप्रकार च emotional blackmailing च असत. बिचार्‍याच कळतय पण वळत नाहि अशी गत होते..
त्याची बायको ही कशाला वाईट व्हायच, आहेत पैसे तर देउ नसते तर कुठुन दीले असते असे भाबडे विचार करते..
सुरुवातीला १-२-३ वर्ष मद्त करा नाही अस नाही पण समोर च्या ला त्याची जाणीव आहे की नाही हे बघुनच.. नाहीतर जोपर्यंत पैसे पाठवतोय/मदत करतोय तोपर्यंत गोड. जस पाठवायचे बंद केले की त्रास देण सुरु.. अशी विचारसरणी असलेले घरचे त्या नोकरी वाल्या मुलाचा कधीच विचार करणार नाही ना त्या सुनेचा ..
वेळीच सावध व्हा नि आवरा.. त्यासाठी घरच्यांशी थोडा वाईटपणा घेतला तरी चालेले.. हे तुमच्यासाठी नाही तर घरच्यांच्या जास्त हिताच आहे..

स्मित_, तुमच्या पोस्टमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आम्हाला लागू होतोय Sad

प्रसाद१९७१,
<< तुम्हाला खरे च हा तिढा सुटायला हवा आहे का? ते आधी स्वताच्या मनाला विचारा. कारण जे काही सल्ले तुम्हाला सर्वांनी दिले ते तुम्हाला कधीच सुचले असणार, पण तुम्ही तसे वागला नाहीत. कदाचित तुम्हाला सर्वांची सहानुभुती हवि आहे.>>
तिढा सुटायला तर हवाच आहे. तुम्ही म्हणता तसं ह्यातल्या काही गोष्टी आधी सुचल्या होत्याच. पण तसं वागण्यासाठी जे ठोस पाऊल उचलायला हवंय ते अडखळतंय. आम्ही दोघेही बर्‍यापैकी भिडस्त आणि दयाळु स्वभावाचे आहोत. कठोर वागायला थोडा पुश लागणार आहे. आजच्या चर्चेतून आमचे निर्णय पक्के व्हायला नक्कीच खूप मदत होणार आहे.
बाकी नुसती लोकांची सहानुभूती घेऊन काय मिळणारे ??

साधना, नोटीसचा उपाय भारी आणि जालिम वाटतोय. नाती पूर्ण तुटण्याची शक्यता आहे. पण खरंच अशी नोटीस दिली तर लोक त्यांना पैसे देणं बंद करतील. पॉइंट नोटेड. धन्यवाद.

फॉल-पिको मशिन आणि दुधाची टपरी ह्याबद्दल आणखी माहिती कुठे मिळू शकेल?

मिताली...
गु॑डोप॑त आणि न॑दिनी या॑चे विचार मला पटले...त्या दोघा॑च्या सल्ल्यावर तुम्ही गा॑भिर्याने विचार करा...

अनेकांनी वर सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तातडीने आमच्या मुलाच्या नावाने आणि म्हातारपणीची सोय करायला सुरूवात करतो. कुठल्या पॉलिसीज योग्य ठरतील? >>

मिताली, चांगल्या फायनानशियल कन्स्ल्टंटला विचारालच तुम्ही. पण मनस्मी १८ यांचा टर्म इन्शुरन्स कुठला चांगला या नावाचा बाफ पहा. सगळे पैसे इन्श्युरन्स पॉलिसीत खर्च करू नका. पुण्याजवळ ३ गुंठे जमिनीचा प्लॉट किंवा लांब असेल तर एक दोन एकर जमीन घ्या. तीन वर्षात डबल झाले नाहीत तर विकून टाका. दुसरीकडे घ्या. फ्लॅट किंवा दुकान यात रिस्क असते. पण अर्थातच तुमच्या कन्सल्टन्टला विचारून पैसे गुंतवाल तर ठीक. वर्षाला बारा लाखाचं उत्पन्न असेल तर टॅक्स वजा जाऊनही मुलगा मोठा होताना ब-यापैकी हाताशी असतील तुमच्या.

इमेल पहा.

स्मित_, तुमच्या पोस्टमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आम्हाला लागू होतोय >> Sad
अग मी समजु शकते. माझ्या नात्यातल्या मुलीची अशीच काहीशी स्टोरी होती. पण तीने वेळीच कठोर स्टेप घेतली. तिने २-३ वर्षांनंतर तिचा पगार घरी शेअर करायला विरोध केला. पण घरुन तिच्या नवर्‍याला अस दाखुवु लागले तुझ लग्न झाल नि घरात भांड्ण वाढले - एकी कमी झाली अस तस. त्यामुळे नवरा-बायकोतही खटके उडाली. गावी त्यांच नाव खराब केल , हा फक्त आपल्या बायका-पोरांच बघतो.
ती तर सगळ्यांसाठी वाईट, स्वार्थी ठरली. Sad नवर्‍याला मुठीत ठेवते.. Happy
दोघांनाही प्रचंड मानसिक त्रास झाला.. नवर्याला वयाच्या ३० तच बिपि चा त्रास सुरु झाला.
घरच्यानी वाळीत टाकल .. पण शेवटी घरच्यांना पण झटका बसला. टाळ्यावर आले.
आता घरची परीस्थीती सुधारली आहे. भावाने दारुच व्यसन तर सोडल नाही पण शेतीत कष्ट घेतोय.
मागच्यावेळी चांगला भाव मिळाला त्याला थोडा confidance आला.. दोघ भाऊ परत गोड झाले.
आई-वडीलांच सगळ हेच बघतात.
पण ती मुलगी अजुनही त्यांच्या साठी खाष्ट सुन आहे Happy
तुलाही थोड कठोर बनावच लागेल. नवर्‍याला सांग वाटत असेल तर घरच्यांच्या नावाने बँकेत पैसे दरमहा ठेव पण १-२ वर्ष त्यांच त्यांच बघु दे..
यातुन बाहेर पडायला कुनी मद्त नाही करु शकत .. तुमचे तुम्हीच बाहेर पडायला हव. Happy

""नोटीसचा उपाय भारी आणि जालिम वाटतोय. नाती पूर्ण तुटण्याची शक्यता आहे""
पैशा॑च्या जीवावर उभे असलेले नाते हे मुळात नाते नसतेच त्यामुळे त्या॑च्या तूटण्याची काळजी करु नका...आज या क्षणापासुन तुम्ही पैसे देणे ब॑द करा, कदाचीत ३-४ महीने तुम्हाला या ना त्या कारणावरुन त्रास ही देतील ते लोक कि॑वा खुप गरज दाखवतील पण तुमच्याकडुन होणारा ईन्कम था॑बला आणि पोटाला चीमटे पडायला लागले की बरोबर कामध॑दा सुचेल...तुम्हाला पण एक मुलगा आहे तुम्ही त्याच्या भवीष्याचा विचार आधी करायला हवा...

बेफिकीर,

>> गामा साहेब, माफ करा, पण मला वाटते आपण एक गोष्ट गृहीत धरत आहात की ज्यांना पाण्यात
>> पाडणे / टाकणे आवश्यक आहे त्यांना ते सहजगत्या मान्य होईल.

अरे, यात माफी फसली! आपलं मत (ओपिनियन) सांगतांना माफीबिफी मध्ये नको! Happy

मिताली आणि त्यांच्या पतीने जे काही करायचं आहे ते जितकं गोडीगुलाबीने होईल तितकं बरं. (हे लिहायला विसरलो त्याबद्दल क्षमस्व!) पण जर गावाकडल्या लोकांनी डोक्यात राख घालून घ्यायचंच ठरवलं तर त्यांना कोण अडवू शकणार आहे ! अशा वेळी आपली बाजू भक्कम केलेली बरी.

आपण म्हणता त्या तीन त्रासंपैकी केवळ तिसरा त्रास थेट परिणाम करू शकतो. हे जोडपे दूर असल्याने मारहाण, शिवीगाळ, धमक्या वगैरे प्रकार होणार नाहीत. गावाकडच्या बदनामीला तोंड द्यायची तयारी लागेल. गंभीर त्रास केवळ मालमत्तेचा आहे. तिच्यावरचा हक्क यांनी मनोमन सोडलाच आहे.

तर मग भीती कसली?

आ.न.,
-गा.पै.

मिताली,

>> असं केल्याने माझा नवरा मानसिक आजाराने ग्रस्त होईल

काही गोष्टी स्पष्ट विचारतो. कृपया रागावू नका.

प्र.१. तुमच्या गावाकडचे घरचे लोक कधी जादूटोणा वा तत्सम गोष्टींच्या मागे लागले होते का?

उत्तराचे पर्याय :
१. हो.
२. नाही.
३. नक्की माहीत नाही.

प्र.२. तुमच्यावर वा तुमच्या नवर्‍यावर वा तुमच्या मुलावर ते लोक करणी करतील अशी तुम्हाला भीती वाटते का?

उत्तराचे पर्याय :
१. हो.
२. नाही.
३. नक्की माहीत नाही.
४. हा प्रश्न वाचल्यावर वाटू लागलीये.

आपला प्रतिसाद होकारार्थी असल्यास यथोचित उपाययोजना करता येऊ शकेल असे वाटते.

आ.न.,
-गा.पै.

गापै
:अओ::)
:खोखो::हाहा::हहगलो:

मिताली, नोटीशीमुळे नातं तुटायची काळजी नकोच कारण तुम्हाला तोडायचे नाहीय आणि त्यांच्याकडुन तोडणे त्याना परवडणार नाही. धमक्या येतील भरपुर पण त्या सगळ्या पोकळ, तुमच्याशी नाते तोडले तर त्यांची पोटे कशी भरणार?

वर स्मित ने लिहिले आहेच. तुम्हाला आणि तुमच्या नव-याला मात्र या कालखंडात खुप खंबिर राहायला हवे. नव-याचे इमोशनल ब्लकमेल भरपुर होईल पण त्याने 'माझे कुटूंबीयांवर प्रेम आहे आणि पुढेही राहिल पण याचा अर्थ त्यांनी माझा हवा तसा फायदा घेणे हा नाही' हा व्ह्यु खुप ठामपणे घ्यायला हवा. तो जर झुकला तर काहीच आशा राहणार नाही.

सगळी जमिन विकायची नसेल तर निदान कर्जफेडीपुरती जमिन विकायचा आग्रह धरा आणि आलेल्या पैशातुन कर्जफेडच होईल हे पाहा.

पुढचे काही महिने कठोर व्हा आणि सगळ्यांसाठीच एक चांगले भविष्य घडवा. माझ्याकडुन शुभेच्छा. Happy

Kiranyake >> का हसताय?..
माझी नात्यातल्या मुलीची अशीच काहीशी स्टोरी होती जी आता ह्यातुन बाहेर निघाली आहे तिला ही मध्ये मध्ये वाटु लागल होत कि नवर्‍यावर नि मुलावर घरच्यांनी करणी केली आहे Sad

Kiranyake >> आता हसलात तरी चालेल.. वाईट मराठी Happy
नात्यातली मुलगी म्हणायला हव होत.. सॉरी Proud

संबंध तोडू नका/ संवाद सोडू नका... मदत लगेच बंद करु नका... ती हळूहळू कमी करा... घरच्याबरोबर सावकरीय कर्ज आणि होणारे नुकसान/ व्यसने आणि कौटुंबिक दुष्परिणाम याविषयी माहितीपूर्ण चर्चा करा...

तुमच्या गरजा वाढ्ल्या म्हणून मद्त कमी करतात अस त्यांना सांगा... तुम्ही दरमहिना १०% घरच्यासाठी आणि ५% त्यांच्या भविष्यासाठी/ अड्चणीसाठी बाजूला काढून ठेवा.. जर तुमचे उत्पन्न पुढे वाढले तर त्यांचा भविष्यनिधी वाढवा, घरखर्च नको..

कधी कधी आजूबाजूची परिस्थितीमुळे सुध्दा माणसांना उत्साह येत नाही... त्यामुळे त्यांना वाचनाची आणी
चांगल्या छंदाची सवय लावा.. एकदा हे जग आवडू लागलं तर माणसाचा आत्मविश्वास वाढतो.. त्यांना
समजावून घ्या.. कधी कधी त्याचाकडून तुम्ही शिकत आहात असे दाखवा... त्याच्या कामाची वाहवा करा.. यांनी त्यांचा हुरुप वाढेल...

अजून एक... मदत तुमच्या Level ची करु नका... समोरच्याला जेवढी पाहिजे तेवढी करा... संदर्भ - तुमच्या दिराचे ऑपरेशन.

मला वाटतं तुमच्या घरच्यांना पैशापेक्षा वैचारिक दिशा दाखवण्याची जास्त गरज आहे... कठीण आहे पण अशक्य नाही..

आणी उगाचं तुमचं बीपी वाढवू नका... आयुष्यात यापेक्षा कठीण परिस्थीती येते...

बहीण जुन्या एस एस सी ला असताना त्या अभ्यासक्रमात एक गोष्ट होती. वडील आपल्या भावाच्या कुटुंबासाठी खर्च करत असतात. मुलगा मोठा होतो. व्यवहार बघु लागतो. म्हणतो कि फुटक्या पिंपात पाणी किती भरणार ?

वडील सर्व त्याच्यावर सोपवतात. तो काकांविरुध्द कोर्टात केस जिंकतो. दुर्दैवाने कोर्टातुन परत येताना नाईलाजास्तव काकांच्याच घरी मुक्काम करावा लागतो. काका उसनवारी करुन पुतण्याला गोड जेऊ घालतो. डिक्री बजावायला जेव्हा पुन्हा पुतण्या येतो तेव्हा त्याला डिक्री बजावता येत नाही करण ही नाती रक्ताची असतात.

राजू ७६
योग्य सल्ला. मस्त पोस्ट.

>>संबंध तोडू नका/ संवाद सोडू नका... मदत लगेच बंद करु नका... ती हळूहळू कमी करा... घरच्याबरोबर सावकरीय कर्ज आणि होणारे नुकसान/ व्यसने आणि कौटुंबिक दुष्परिणाम याविषयी माहितीपूर्ण चर्चा करा... <<
एकदम परफेक्ट सल्ला आहे.

*

>>साधना, नोटीसचा उपाय भारी आणि जालिम वाटतोय. नाती पूर्ण तुटण्याची शक्यता आहे. पण खरंच अशी नोटीस दिली तर लोक त्यांना पैसे देणं बंद करतील. पॉइंट नोटेड. धन्यवाद.<<

लोक पैसे देणे बंद करणार नाहीत. जोपर्यंत घर-जमीन मालकीची आहे व ती हिसकावून घेणे शक्य आहे तोपर्यंत कर्ज मिळत राहील.
३% वाले कर्ज म्हणजे काय याची कल्पना सल्ले देणार्‍यांना दिसत नाहीये. हे ३% महिना असते. वर्षाच्या हिशोबाने ३६% दसादशे. प्लस चक्रवाढ असते. तेही वेगळ्या प्रकारचे. म्हणजे, समजा मी १ लाख कर्जाऊ आणले, तर १ लाख फिटे पर्यंत १ लाखावरच व्याज लागत रहाते, भलेही तुम्ही ७५ हजार रुपये मुद्दल फेडून चुकला असाल.
ही कर्जे अनधिकृत व गावगुंडांनी दिलेली असतात व वसूलि देखिल माफिया स्टाईलने केली जाते.

*

शिकलेल्या मुलाने गरज पडेल तशी कॅश घरी द्यावी, व त्याचे वर्षाचे दाणापाणी घरुन यावे अशीही एक अ‍ॅरेंजमेंट असते. शेतकरी एकत्र कुटुंबाची जवळून माहिती असल्याखेरीज सामाजिक व नात्यांच्या दडपणाखाली लोक काय काय करतात याची कल्पना येणार नाही. इथे लिहिणार्‍या अनेकांनी उच्च मध्यमवर्गिय सुशिक्षित कुटुंबांच्या पार्श्वभूमीवरून सल्ले लिहिलेले आहेत. सर्व काँटेक्स्ट्स माहिती असल्याखेरीज सल्ला देण्यात काहीही अर्थ नाही. (त्यामुळे इथे मी सल्ला देत नाहिये)

चर्चेतून समोर आलेली काही निरिक्षणे:
ताईंचे सासूसासरे सेन्सिबल दिसत आहेत. विषेशतः सासरेबुवा. जमीनीवरचा क्लेम सोडू नकोस असे त्यांनी स्वतः सांगितले आहे
शेतीतून उत्पन्न मिळते आहे. ज्या पिकांची यादी आहे ती बर्‍यापैकी पेइंग पिके आहेत. त्यामुळे 'दीर काहीच करत नाहीत' असा जो जनरल ग्रह झालेला आहे तो चुकीचा आहे.
कर्ज काढून छानछोकी करणे चालू आहे असेही दिसत नाही. उधळेगिरी नसावी. पण दारूची सवय मोडणे गरजेचे.

शेवटचे, (थोडे कडू) ऑब्जर्वेशनः
एकंदर कौटुंबिक पार्श्वभूमी पहाता,(स्त्रियांबद्दलचा दृष्टीकोण इ. ताईंचे वाक्य) या धाग्याचा व चर्चेचा उपयोग ताईंना स्ट्रेस बस्टर म्हणूनच आहे. ताईंनी काहीही ठरविले तरी त्याचा उपयोग होईल असे वाटत नाही. दाजींनी मनावर घेणे महत्वाचे दिसते. त्यामुळे या सगळ्या आयडीया दाजींच्या गळी उतरविण्यासाठी काय करता येईल याचे पॉइंटर्स महत्वाचे ठरतील, हेमावैम.

मिताली, तुमचं सुदैव आहे की नवर्‍यालासुद्धा हे पटतंय, डिनायल मधे नाही. यापुढे सुद्धा तुम्हाला त्यांना मदत करायची असेल तर कॅश देऊ नका. पुतण्याच्या कॉलेजचा खर्च करणार असाल तर कॉलेजची फी परस्पर भरणे, पुस्तकं घेऊन देणे व. करा, पण पैसे हातात देऊ नका. पैसे हातात देऊन हिशोब मागत बसाल तर वाट्टेल त्या थापा पदरात पडतील. वारंवार, बेहिशोबी भरपूर पैसे मिळाल्यामुळे ते निष्क्रीय बनले आहेत. तुमच्या कडून आवक बंद झाली की आपोआप हातपाय हलवायला सुरुवात करतील.
तुमच्या या मिशन साठी तुम्हाला खूप शुभेच्छा!

मला वाटतं तुमच्या घरच्यांना पैशापेक्षा वैचारिक दिशा दाखवण्याची जास्त गरज आहे... कठीण आहे पण अशक्य नाही.. >> Exactly! and first step towards that is, even before you stop giving money, stop giving opinions and advice. In any situation, ask them for options they are considering, ask them for resources they have. The only thing to give them is - your appreciation about they are doing/trying their best (even when they are not). "Kay karu re" should always be answered with "Je kahi karshil te vicharanich karshil tu. ata vichar jamat nasel tar thodya velane parat phone karin." etc etc. That draws a strong line, sends a strong message that I will not think for you and about you.

Kiranyake <<भावकी चा वापर कराच.>>. - +१
गामा_पैलवान <<प्रार्थना करा>> +१

- जमीन आणी घर पूर्णपणे वा अर्धीमुर्धी तुमच्या नावावर करून घ्या. त्यासाठी अडीनडीची वेळ वापराच.
-चांगले काम करताना वाईट वाटून घेउ नका. तुम्ही शेत संभाळणार नसाल तर जमीनीचा मोह न ठेवता हिस्सा करून घ्या. - ("अर्धं त्यजेत पंडितः") (आणी जमीनीची भांडणे असतील तर इतर विकत घेणारेही थोडे थबकतात.)
- आजारपणासाठी जास्तीत जास्त किती पैसे देणार ते ठरवा. त्यापलीकडे देवू नका.
- पुढील पिढी मागील पिढीपे़क्षा महत्वाची म्हणून त्यांच्यासाठी जास्त पैसे साठवत जा. (किमान १५%-३०% बचत करा.)
- ३% व्य्याजाने पैसे घेणे काहीहीकरून बंद करा पण त्यासाठी तुमचे पैसे देवू नका. हवे तर तुम्हीच सावकारी करा (तुम्ही २% घ्या).
- एकरकमी पैसे कधीही देवू नका.
- तुम्ही किती पैसे मिळवता याचा अंदाज देवू नका.

>>Exactly! and first step towards that is, even before you stop giving money, stop giving opinions and advice. In any situation, ask them for options they are considering, ask them for resources they have.<<

वयाच्या ४०- ४५ वर्षी पण ज्यांना दिशा समजत नाही, ज्यांना काय करावे (ते ही मूल होवु द्यावे की नाही हे दुसर्‍याला विचारावे लागते) त्यांना कुठले निर्णय अचानक आता घेते येतील?

व घेतले तरी बरोबर असतील कशावरून?

एवढी कर्जे असताना कर्जे घेतात , त्यांना समजावणे कठिण दिसतेय.

अशा परिस्थितीत अजून एक व्यवसाय हमखास पुढे येतो.
तो म्हणजे गाडी/जीप घ्यायची व भाड्याने द्यायची किंवा पट्ट्यावर लावायची.
' हे अजिबात करू नका!' होऊ ही देऊ नका.
गाडी नवीन असे पर्यंत सर्व बरे असते. पण पुढे जाऊन २ वर्षातच हे गणित जुळत नाही व आतबट्ट्याचा धंदा सुरू होतो.

दूधाच्या धंद्याची कल्पना चांगली आहे. पण धंद्यात धोके असतात. त्यात दूध म्हणजे पराकोटीची स्वच्छता आणि वेळेचा काटेकोरपणा आवश्यक ठरेल.
मायबोलीवर सदस्य चंपक होते/आहेत. त्यांचा व्यवसाय हा दूध संकलनाचा आहे. त्यांना या व्यवसायाची उत्तम माहिती आहे. त्यातले धोके आणि फायद्याच्या जागा या बाबतीत ते चांगली मदत करू शकतील असे वाटते. आहे त्या पिकातून फायदा कसा जास्त होईल या विषयी काटेकोर रहा. हिशोब मागा!

शेतीचा ताळेबंद मांडा.
पाण्याची सोय बरी असेल तर भाजीचा विचारही करा.
सर्वांनाच आर्थिक शिस्त कितपत लागेल याविषयी मात्र शंका आहे.
हे सारखे सारखे केले तर काही प्रमाणात तरी फरक पडावा.

वर कुणीतरी मोलाचा सल्ला दिला आहे. कर्जाचे हप्ते याविषयी सर्वांचे कागदावर येऊन प्रबोधन करा, बोला. अन्यथा काही परिस्थिती गंभीर आहे/अजून होईल.

मिताली ह्या सगळ्यात चूक तुमचीच आहे. तुमच्या प्रायोरिटिज पुर्णपणे चुकल्या आहेत असे वाटते. बाकी कोणतेही उपाय योजायच्या आगोदर ह्या प्रायोरिटिज तुमच्या व तुमच्या नवर्‍याच्या मधे ठरवून घ्या. एकंदरीत पोस्त वरून असे वाटते आहे की तुमच्या नवर्‍याने अजुनही आईबापांच्या कुटुंबाशी 'नाळ' तोडलेली नाही. अजुनही तो 'इंडेपेंडंट' झालेला नाही.

लग्न केल्यावर त्याच्या व तुमच्या पहिल्या प्रयोरिटिज हे तुम्ही एक्दुसरे व तुमची अप्त्ये हीच असली पाहिजेत. त्या नंतर तुम्हा उभयतांचे आइ/वडिल व त्या नंतर रिसोर्सेस परमीट भावंडे वा इतर. हे आधी तुमच्या दोघांच्या विचारसरणित रुजलेले दिसत नाही आणि म्हणुन हा सगळा गोंधळ. आधी गेट थिस क्लॅरिटी...

व घेतले तरी बरोबर असतील कशावरून? >> हम्म आहे खरा प्रश्न. पण म्हणून त्यासाठी मितालीने तिची रात्रीची झोप उडवायची? चुकले निर्णय तर चुकले. अचूक निर्णय फार थोडे लोक घेतात.

पेशवा अनुमोदन.

एक शंका होती. १२ लाख अ‍ॅन्युअल इन्कम म्हणजे अमेरिकन डॉलर धरले तर २१०००$ वार्शिक उत्पन्न. ह्यात तुमचे कसे भागते आणि पाठवणे शक्य कसे होते. अमेरिकेत राहात असाल तर सुझी ऑर्मन बाईंचा शो जरूर बघा. ती मस्त सल्ला देते.

कोणाही व्यक्तीचा खर्च चालवण्याचा पत्कर घेणे म्हणजे एनेबलर होणे ह्यात त्या व्यक्तिचे लाँग टर्म मध्ये नुकसानच होते त्यापेक्षा त्यांना त्यांची काळजी घेण्यास, चरितार्थ चालविण्यास सक्षम करणे चांगले. वहिन्या सेन्सिबल असतील तर घरून मेस चालवणे आणि भावांनी कार/ स्कूटर इत्यादीचे वर्क्शॉप चालवणे हे करून बघता येइल. जिम चालवणे हे ही घरून करता येइल. आमच्या सासरी हे केले गेले आहे. निदान चरितार्थ भागतो.

परदेशात घरखर्च व हेल्थ केअर मॅनेज करणे जास्त अवघड आहे. तुम्ही प्रथम स्वतःचा पाया मजबूत करा. मुलाच्या शिक्षणाची सोय करा व मग परमार्थ करण्यास लागा.

Pages