एकत्र कुटुंबाचा तिढा कसा सोडवायचा ????

Submitted by मिताली on 1 July, 2013 - 19:27

नमस्कार मायबोलीकर.

घरातल्या सगळ्या प्रकारामुळे अत्यंत अस्वस्थता आली आहे, नैराश्याच्या वाटेवर आम्ही दोघे (मी आणि नवरा) चाललो आहोत.
कुणाशी तरी बोललं तर मन हलकं होईल म्हणून इथे लिहीत आहे. जाणकार सल्ल्यांची आणि मार्गदर्शनाची गरज तर आहेच.

आमच्या लग्नाला दहा वर्षे झाली. नवरा-४० वर्षे, मी ३४ वर्षे. गेल्या ७-८ वर्षांपासून आम्ही दोघे शिक्षण, नोकरी अशा सबबींवर बाकीच्या कुटुंबापासून वेगळे राहत आहोत.आम्हाला ७ वर्षांचा एक मुलगा आहे.

गावाकडे ९ लोकांचं कुटुंब आहे.
१. सासू - ६५ वर्षे,
२. सासरे- ७२ वर्षे
दोघांच्याही नावे विमा वगैरे काही नाही. बँकेत जमा रक्कम नाही. सासर्‍यांच्या नावाने मोठा प्लॉट आहे. सध्या त्याची किंमत अंदाजे ७० लाखापर्यंत जाईल. पण त्यावर साधारण ३५ लाखाचं कर्ज आहे.
३. रमेश - ४७ वर्षे, गुटख्याचं व्यसन आहे. बाकी आजार सध्या तरी काही नाहीत. विमा नाही.बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत.
४. रमेशची बायको- ४० वर्षे, आजार सध्या तरी काही नाहीत. विमा नाही. बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत. थोडंफार सोनं बँकेत गहाण आहे.
५. रमेशचा मुलगा - १५ वर्षे, दहावीत शिकतो.होस्टेलला असतो.शालेय प्रगती साधारण. ५०-६० % च्या आसपास मार्क्स असतात. पुढील शिक्षणासाठी खर्चाची काहीही तरतूद केलेली नाही.
६. रमेशची मुलगी - १३ वर्षे, आठवीत शिकते.शालेय प्रगती साधारण. ५०-६० % च्या आसपास मार्क्स असतात.
पुढील शिक्षणासाठी खर्चाची काहीही तरतूद केलेली नाही.
७. सुरेश - ४३ वर्षे, सिगारेट, गुटखा, दारू सगळी व्यसनं आहेत. दारूडा म्हणण्याइतकी स्थिती नसली तरी आजकाल रोजच दारू पिण्याची सवय लागली आहे. एकदा हार्ट अटॅक येऊन गेला आहे. बीपीचा त्रास आहे. विमा नाही. बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत. त्यांच्या नावाने एक प्लॉट आहे. साधारण किंमत १०-१२ लाख.
८. सुरेशची बायको- २३ वर्षे, सध्या प्रेग्नंट.नोकरी करत नाही.बचत रक्कम नाही. थोडंफार सोनं बँकेत गहाण आहे.
९. सुरेशची मुलगी - २ वर्षे, व्यवस्थित पोषण न झाल्याने सतत आजारी.

रमेश आणि सुरेश दोघे मिळून शेती करतात. पण गेल्या दहा वर्षांत त्यातून ठोस नफा झाल्याचं माझ्या ऐकण्यात नाही. २० एकर शेती आहे. ऊस, कापूस, तंबाखू, फ्लॉवर, सोयाबीन अशी पिके घेतात. पण हवे तितके कष्ट न घेतल्याने किंवा इतर कारणांनी शेतीसाठी होणारा खर्च वजा जाता वर्षाअखेरीस हातात फारसं लागत नाही.

आम्ही दोघे नोकरी करतो. नवर्‍याच्या नावाने एलाआयसी वगैरेचे इन्शुरन्स आहेत. पण माझ्या नावे अजून काही नाही. मुलाच्या शिक्षणासाठी अजून काही बचत करायला सुरूवात केलेली नाही. आम्हाला दोघांना मिळून महिना एक लाखापर्यंत कमाई होते.

गेल्या वर्षीपर्यंत आम्ही घरी महिना ३० ते ५० हजारच्या दरम्यान रक्कम पाठवत होतो. पण असं किती दिवस चालू राहणार म्हणून आम्ही सर्वांना एकत्र बसवून चर्चा केली. आम्ही असा प्लॅन सुचवला.

मोठा प्लॉट विकून सगळं कर्ज फेडून टाकावं आणि उरलेली रक्कम विभागून रमेश, सुरेश आणि त्यांच्या बायका ह्यांच्या नावावर ठेवावी. शेती दुसर्‍या कुणाला तरी कसायला द्यावी. दोन्ही कुटुंबांनी वेगवेगळं रहावं. चौघांनीही काहीतरी छोटे-मोठे उद्योग सुरू करून किंवा नोकरी करून स्टेडी मिळकत सुरू करावी. त्यांचं बस्तान बसेपर्यंत दोन्ही कुटुंबांना गरजेपुरती आर्थिक मदत आम्ही करत राहू.

पण ह्या प्लॅनला सासर्‍यांची आणि दोन्ही भावांची तयारी नाही. त्यांना मोठा प्लॉट विकायचं पटत नाही. अजून दहा वर्षांनी त्याची किंमत डबल होईल असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या वयात नवीन काही उद्योग करण्ं जमणार नाही असं त्यांना वाटतं. नोकरी करणं त्यांना कमीपणाचं वाटतं (एकेकाळचं सावकार घराणं आहे !) बायकांना घराबाहेर पडू द्यायची तयारी नाही. "बायका म्हणजे पायातली चप्पल" अशा विचारांची पुरूषप्रधान संस्कृती @$@$ Angry आहे. शिवाय वेगळं राहणं जमेल असा विश्वास त्यांना वाटत नाही.

आम्ही काहीही बोलायला गेलो तर "तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्यापुरतं बघा" असं उत्तर मिळतं. पण गेल्याच महिन्यात सुरेशच्या ऑपरेशनसाठी १ लाख रूपये आम्ही पाठवले. आम्ही नसते पाठवले तर कुठूनतरी महिना ३ % व्याजदराने घेतले असते (अशा व्याजाची पण काही रक्कम कर्ज आहे)
रमेशच्या मुलाच्या होस्टेल खर्चासाठी दरमहा १० हजार रूपये आम्ही पाठवतो. आता दोन्ही मुलांची कॉलेज शिक्षणं चालू होतील. वर लिहिल्याप्रमाणे ह्यासाठी काहीच तरतूद नसल्याने ही जबाबदारी आम्हीच घेतली आहे.

सगळा विचार केला तर खूप चिडचिड होते. पुढे सगळाच अंधार दिसतो. बरं सगळ्यांशी पूर्ण संबंध तोडून टाकून फक्त आपल्यापुरतं बघावं असा विचार जरी मनात आला तरी अपराध्यासारखं वाटतं.
पण असंच चालू ठेवावं तर स्वतःच्या भवितव्याविषयी टेन्शन येतं. विचार करकरून आजकाल खूप उदास वाटायला लागलं आहे. नुकतंच माझं बीपी सुद्धा वाढल्याचं आढळलं. आजकाल सतत डोकं दुखत असतं.रात्री झोप लागत नाही.
सुदैवाने आमच्या दोघांमध्ये ह्या विषयावर काही मतभेद नाहीत. पण दोघंही हतबुद्ध झालो आहोत. मार्ग सुचत नाहीये. जीवनात रसच वाटेनासा झालाय.
फार मोठं गुर्‍हाळ लिहिलंय. कदाचित जरा असंबद्धही झालं असेल. त्याबद्दल सॉरी. पण आज विचारांचा कडेलोट झाला. रात्रीची उठून कीबोर्ड बडवत बसलेय. प्लीज मार्गदर्शन करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपुलकीने सल्ले आणि शुभेच्छा दिल्याबद्दल प्रत्येकाचे धन्यवाद. चर्चेची मदत होतेय.

गा पै,
<<प्र.१. तुमच्या गावाकडचे घरचे लोक कधी जादूटोणा वा तत्सम गोष्टींच्या मागे लागले होते का? >>नक्की माहीत नाही.
<<प्र.२. तुमच्यावर वा तुमच्या नवर्‍यावर वा तुमच्या मुलावर ते लोक करणी करतील अशी तुम्हाला भीती वाटते का?>> नाही
असं काही असतं की नाही हे माहीत नाही, असलं तरी त्या मार्गाने जायचं नाही Happy

राजू७६,
फार संतुलित सल्ला. आवडला. काही गोष्टी आधीपासून करण्याचा प्रयत्न करतोय उदा-सावकारीय कर्ज आणि त्यांचे दुष्परिणाम ह्यावर चर्चा. अजून यश आलं नाही. पण प्रयत्न सोडणार नाही.

इब्लिस,
चक्रवाढ व्याज आणि त्याचा डोंगर लग्न झाल्यावर पहिल्यांदा बघितला. फारच भयानक असतं ते.
<<एकंदर कौटुंबिक पार्श्वभूमी पहाता,(स्त्रियांबद्दलचा दृष्टीकोण इ. ताईंचे वाक्य)... >> हे आम्हा दोघांमध्ये नाहीये. नवरा समंजस आहे, जेन्डर एक्वॅलिटी वगैरे गोष्टी त्याच्यासाठी नवीन होत्या (घरातील वातावरण) पण मुळात स्वभाव सौम्य असल्याने आणि आता मी मुलाशी गप्पा मारताना त्याचेही विचार स्पष्ट व्हायला लागले आहेत.
त्याचा एकच प्रॉब्लेम म्हणजे - भिती !
मी मदत नाही केली तर ह्यांचं काय होईल, किंवा आपण अशी ठाम भूमिका घेतली आणि त्या टेन्शनने सुरेश जास्त दारूडा झाला, त्याला पुन्हा हार्ट अटॅक आला किंवा सासूसासरे वयस्कर आहेत, हा ताण सहन न होऊन त्यांच्या जीवाचं बरंवाईट झालं तर......अशा अनेक कल्पित भितींमुळे तो दबून गेला आहे Sad
मी प्रयत्न करतेच आहे, पण असल्या कल्पना धुडकावून लावताना मलाही जरा बिचकायला होतंय.

पिकांचं म्हणाल तर एक उदा. सांगते. त्यांनी चार वर्‍षांपूर्वी पिकवलेली तंबाखू अजून गोडाउनमध्ये पडून आहे. आणखी भाव वाढेल अशा आशेने ठेवतात आणि नुकसान करून घेतात.
('ही मृत्युची शेती आधी बंद करा, इतर पिके घ्या' ह्यावरून नवर्‍याचे अनेकदा वाद झाले आहेत ते वेगळंच)

निनाद, गाडीची कल्पना आलीच होती पुढे. तुमचा ह्याविषयीचा सल्ला लक्षात ठेवीन.

पेशवा, कटु आहे पण सत्य आहे आणि मान्यही आहे. वर्किंग ऑन इट.
अमा, आम्ही अमेरिकेत नाही. आमचा खर्च वगळून घरी पाठवणे जमत होतं पण शिल्लक काही उरत नव्हतं. आता सहा महिन्यांपासून पाठवणं बंद केल्यावर शिल्लक उरली आहे. ती आधी गुंतवून टाकतो.

१. स्वतःच्या भविष्याची व मुलाच्या भविष्याची आधी चिंता करा. (तुमचा प्रश्न मिटेल)
२. सासु सासरे तुमच्यासोबर रहायला तयार असले तर त्यांना घेऊन या. (सासु सासर्‍यांचा प्रश्न मिटेल)
३. दिरांना उचलुन पैसे देण्याऐवजी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करा व तो परस्पर शाळेत कॉलेजातच द्या. त्या मुलांना तिथुन हलवा. (मुलांचे हाल होतील ही चिंता जाईल.)
४. तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी आम्ही घेणार नाही हे तुमच्या नवर्‍याने ठणकावुन सांगणे गरजेचे आहे. (याची चिंता जोवर तुम्ही जामीन रहात नाही तोवर घ्यायची गरज नाही)
५. इस्टेटीवर हक्क दाखवायची गरज नाही पण तुम्ही आजवर त्यांच्यावर किती खर्च केलाय याचा ताळमेळ दाखवायची गरज आहे.
६. "तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्यापुरतं बघा" असे असल्यावर अपराधीपणे वागायची आवश्यकता नाही.
७. दरमहा देण्यात येणारे पैसे ताबडतोब बंद करा. तसे केल्यावर व्याजाने पैसे घेतील मग जमीन जाईल वगैरे चिंता जर तुम्हाला त्या जमीनीमधे काहीच रस नसेल तर ही चिंता करण्याची गरजच नाही.

तुम्हाला त्या जमीनीमधे काहीच रस नसेल तर ही चिंता करण्याची गरजच नाही.>> आमच्यासाठी चिंता नाही करत, पण जमीन गेली तर ह्या सगळ्यांचं पुढे काय. चार मोठ्यांपैकी (दोन दीर आणि त्यांच्या बायका) कोणालाच महिन्याला स्टेडी मिळकत नाहीये.
इन फॅक्ट, जी प्रॉपर्टी माणसाला निष्क्रिय बनवते ती नसलेलीच बरी असं आम्हा दोघांचं मत आहे.

जमीन गेली तर ह्या सगळ्यांचं पुढे काय>>
जे तुम्हाला "तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्यापुरतं बघा" असे सुनावत आहे त्यांची चिंता करताय हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तो सोडवलात की तिढा सुटेल.

>>चुकले निर्णय तर चुकले. अचूक निर्णय फार थोडे लोक घेतात.<<

निर्णय चुकले तर त्रास कोणाला होणार? आणि नुकसान होइलच ते वेगळे.
आर्थिक बाजूच जरा जरी जाणीव असते ती लोकं अशी वागतच नाही.
आणि कळले तरी आडमुठेपणा खूप असतो ह्या लोकांमध्ये. कारण त्यांचे काही हातचे जात नसते.

Give a man a fish, and you feed him for a day; show him how to catch fish, and you feed him for a lifetime.

असं काहितरी करायचं आहे तुम्हाला.

जी प्रॉपर्टी माणसाला निष्क्रिय बनवते ती नसलेलीच बरी असं आम्हा दोघांचं मत आहे. >> Happy बरोबर
अग पण घरचे ती प्रॉपर्टी आहे म्हणुन घरचे थोडे तरी स्टेबल आहे. मागच्या पिढ्या ह्या ऐशोआरामात जगल्या मग आपण पण त्यांचे वारसदार हे लोकांना दाखवण्यासाठी हि आहे.
तसेच जवळपास ९९% शेती करणारे, शेतजमीनी ला आई मानतात , ती विकण हे पापच असा विचार असतो.. (तिच्यावर कर्ज काढण नाही.) त्यंची विचारसरणी बद्लणे महाकठीण कर्म आहे..
म्हणुन जी प्रॉपर्टी तुम्ही कमवलेली नाही तिला विकण्यावर घरचे नक्कीच हरकत घेणार (त्यांच्या भल्यासाठी असल तरी :)) . त्यांना तिच्यावर कर्ज काढण्यापासुन परावृत्त करा..

तुम्ही , तुम्ही कमवलेल्या प्रॉपर्टी वर concentrate करा. Happy

चार मोठ्यांपैकी (दोन दीर आणि त्यांच्या बायका) कोणालाच महिन्याला स्टेडी मिळकत नाहीये.<<<
४७, ४३, ४० आणि २३ अश्या वयाच्या लोकांना महिन्याला स्वतःचं जेमतेम भागण्याइतकीही स्टेडी मिळकत जमत नसेल तर त्यांची मदत करायची लायकी नाही हे पहिल्यांदा स्वतःशी पक्क करा.
दान सुद्धा सत्पात्री असावं असा संकेत आहे. हे तुम्ही करताय त्याला सत्पात्री दान मुळीच म्हणता येणार नाही.

खरंय.
सध्या पुरतं मी ठरवलेली स्ट्रॅटेजी म्हणजे -

१. ह्या प्रश्नासाठी एक डायरी/वही करते. त्यात कांदापोहेंनी समराइझ केल्याप्रमाणे मुख्य मुद्दे लिहून ठेवते. सगळ्या चर्चेतील महत्वाची वाक्ये पण नोट करून ठेवते. टेन्शन येतंय असं वाटलं की आम्ही दोघांनी उघडून वाचायचं. कारण कुत्र्याच्या शेपटासारखं आम्ही आजकाल परत परत 'कसं निस्तरणार हे सगळं, आपण मदत नाही केली तर ह्यांचं काय होईल' अशाच विचाराशी येऊन अडखळतोय. आपण ठरवलेली पॉलिसी पुन्हापुन्हा वाचली की मनात ठसत जाईल.

२. घरच्यांच्या कानावर घालतो की आम्ही आमचा खर्च वजा जाऊन जी रक्कम राहतेय ती सगळी म्हातारपण, मुलाचं शिक्षण ह्यासाठी गुंतवतोय. त्यामुळे हातात कसलीच नगद नाही.

३. फक्त सासूसासर्‍यांच्या नावे दरमहा १० % रक्कम बाजूला काढून ठेवायला सुरू करतो. त्यांच्या अडीअडचणीला आणि आमच्या मानसिक समाधानासाठी.

४. रमेशचा मुलगा-जो आता दहावीत आहे- त्याला नेहमीचं १०+२+ग्रॅड असं शिक्षण घेण्यापेक्षा व्होकेशनल ट्रेनिंग घेऊन लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रवृत्त करता येईल का ते पाहतो.

५. लवकरात लवकर फायनान्शिअल कन्सल्टन्ट गाठून आमच्या गुंतवणूकीचे निर्णय घेतो.

खूप धन्यवाद लोक्स. अपडेटस कळवीनच. Happy

शेतजमिनी बद्दल जे काही कायदे आहेत ते माहित करून घ्या. नाहीतर काही न करताच कर्ज मात्र तुमच्या नशिबी येयील.
मदत एकदम बंद करणे शक्य नसेल तर किती काळापर्यंत तुम्ही मदत करणार ते स्पष्ट सांगा. नाहीतरी कोणी कोणाल आयुष्यभर मदत नाही करू शकत.
आतापर्यंत केलेल्या मदतीच हिशोब करा व त्यांना पण सांगा ह्यामुळे थोडा मानसिक दबाव येवू शकतो

टेन्शन नको घेउस, नवर्‍याच्यापाठी भक्कमपणे उभी रहा. त्याला सगळ्यांपेक्षा जास्त सपोर्ट/पॉझिटिव्ह एनर्जीची गरज आहे. तु शांत रहा. चिडचिड नको करून घेउस. Happy
खात्री आहे लवकरच सगळ ठीक होइल.
शुभेच्छा !!! Happy

खरंच सगळ कठीण आहे. पण ह्यातून मार्ग काढणं तुमच्याच हातात आहे. आम्ही काय व्यावहारीक ठोकताळे विचारात घेऊन सल्ला देऊ पण बर्याच गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हालाच माहित असतात. जे काही मार्ग वाचकांनी सुचवले ते तुम्हाला नक्कीच माहित असणार, तेव्हड्या सुज्ञ तुम्ही नक्कीच असणार.

माझं असं मत आहे की जो काही मार्ग निवडायचाय तो तुम्हाला ठरवायचाय, त्याच्या परिणामाची जबाबदारी तुम्हालाच घ्यायचीय आणि भोगायचय पण तुम्हालाच.. मग कशाला लोकांकडे सल्ले मागावेत? उद्या आमच्यापैकी कुणी नाही येणार.. माफ करा माझं स्पष्ट मत दिलय. शेवटी आपले प्रश्न.. आपली उत्तरं..

आता चर्चा अश्या वळणावर आल्यासारखी वाटत आहे की उत्तरेच उत्तरे आहेत आणि त्या उत्तरांची अंमलबजावणी करण्याची लेखिकेची इच्छा असूनही ती करता येत नाही आहे किंवा त्यात काही ना काही (भावनिक इत्यादी) अडचणी आहेत.

तेव्हा, आता (मला वाटते की) उपाय सुचवणे हा भाग संपलेला असून पेशवा म्हणत आहेत त्याप्रमाणे लेखिकेने स्वतःची प्राधान्ये पतीबरोबर एकत्रितरीत्या अ‍ॅग्री करून त्यांची त्वरीत अंमलबजावणी करणे इतकेच उरलेले आहे.

ऐकत्र कुटुंबात कधीच कोणी पुर्ण ईडीपेंडन्ट नसतो तर कधीच पुर्ण डिपेंडन्ट पण नसतो याचा येक रेशो ठरलेला असतो तो रेशो जर डिपेंडन्सीकडे झुकायला लागला तर प्रॉब्लेम सुरु होतात. आमच पण ऐकत्र कुटुंबच आहे आणि सध्या तरी आम्ही ईडीपेंडन्ट साईडला आहोत त्यामुळ सगळ व्यवस्थित आहे. ह्याच श्रेय माझ्या आई वडिलांना जात. जर असच आमच्या घरात झाल आणि मी तुमच्या नवर्‍याच्या जागी असतो तर मी काय केल असत हे सांगतो त्यातल तुम्हाला काय घ्यायचय ते तुम्ही ठरवा.
अ. आर्थिक व्यवहार
१. पुर्ण कर्जाचा लेखा जोखा मांडणार आणि त्याला व्याजदरानुसार आणि परतफेडिच्या मुदतीनुसार प्राधान्य देणार
२. प्लॉट विकणार
३. त्याचे ४ हिस्से करणार
ऐक आई वडीलांना (त्यांचा औषधोपचारासाठी), दुसरा पुढच्या पिढीच्या (सगळ्यांचीच मुल)शिक्षणासाठी बाजुला ठेवणार , बाकीच्या २ हिश्यात प्राधान्याक्रमानुसार कर्ज परतफेड करणार.
ब. प्रत्येक पिढीचे प्रॉब्लेम
ब१. आई वडीलांच्या नावाने काही रक्कम ठेवलेली असल्यान त्यांच्या औषधोपचाराची सोय होईल. आपण सगळे ऐक आहोत आणि सध्या जे चालु आहे ते वेगळ होण्यासाठी नाही तर ऐकत्र राहुनच सगळ काही चांगल/व्यवस्थित करण्यासाठीच करतोय असा त्यांना विश्वास येईल अस ऐकंदरीत अ‍ॅप्रोच ठेविइल जेणेकरुन त्यांच्या आरोग्याच्या कटकटी कमी होतील.
ब२. माझ्या मोठ्या भावांवर कर्जाचा असलेला बोजा थोडा कमी होईल आणि त्यांना मानसिक हिम्मत सारखी सारखी देईल. दररोज त्यांच्याशी बोलेन. नकारात्मक आणि माघे झालेल्या कुठल्याही चुकांचा पाठपुरावा करणार नाही आणि त्यांचा उल्लेख टाळण्याचाच जास्त प्रय्त्न करणार. नविन कुठलच कर्ज त्यांनी काढु नये याला सगळ्यात जास्त प्राधान्य देणार. व्यसनांवर भावनिकपणे बोलणार. शेतीत काय करावे आणि काय करु नये यावर बोलणार नाही. जोड धंदा सुचवणार नाही. पण हे सांगत राहणार की फक्त शेतीवर आपल्याला मजल मारता येणार नाही तर काहीतरी जोडधंदा करायलाच हवा. काय ते तुम्ही पर्याय काढा त्यावर सगळे मिळुन निर्णय घेउ आणि पैश्याची तजवीज कशी करायची ते पण सगळे मिळुनच ठरवण्यावर जास्त भर देऊ. धाकटा असल्यामुळ वेळ पडेल तिथ नकटा होऊन काम साध्य करण्याचा प्रयत्न करणार.
ब३. माझ्या बायकोला माझ्या वहीन्यांना जबाबदार करण्यासाठी सांगणार. माझ्या आईशी तिच कम्युनिकेशन वाढवणार. यात तिला जी काही मदत लागेल ती करणार. बायकोच्या माहेरकडच्यांच्या जबाबदार्‍या पण या सगळ्यात कश्या समाविष्ट करता येतिल ते पण ठरवणार.
ब४. भावाच्या मुलांना आणि माझ्या मुलाला बिलकुल कळु देणार नाही की त्यांच्या शिक्षणासाठी पैसे बाजुला काढुन ठेवलेले आहेत म्हनुन. तस सगळ्यांना बजाउनच ठेवणार. सतत सगळ्याच मुलांना जाणिव करुन देणार की तुम्हाला मार्क्स पडले तरच तुमच पुढच शिक्षण होणार. ज्यानी त्यानी मार्कस मिळवावेत आणि शिकाव. गरज पडली तर पैसे बाजुला काढुण ठेवलेले आहेतच त्यामुळ घरातले कोणी मला यावरुन बोलण्याची शक्यता कमी असेल आणि भावी पिढी ईंडिपेंडन्ट होण्याचे चान्सेस वाढतिल.
आता मी स्वतः काय करणार.
१. या सगळ्यात माझी बायको आणि माझा मुलगा यांना सगळ्यात पहिल प्राधान्य राहिल मग मी आणि आमच्या घरातल्या इतरांच.
२. मुलाच्या शिक्षणाची तजवीज वेगळी करण्यासाठी आत्तापासुन पैसे बाजुला काढणार.
३. बायकोच्या आणि माझ्या रिटायर्मेंट साठी तजवीज करायला सुरुवात करणार जस की विमा वगैरे.
गावाकडची म्हनुन थोडी रक्कम दर महीना बाजुला काढणार पण हे फक्त बायकोलाच माहीत असु देईल. जर आम्ही पण गावाकडच शिफ्ट झालो तर तिलापण नाही. कारण तिचा स्वभाव मला माहीत आहे.
४. घरातल्या कुठल्याच प्रॉपर्टीवर हक्क सांगणार नाही आणि हक्क सोडणार पण नाही. आणि याची जाणिव सगळ्यांना असेल याची काळजी घेईल.
५. घरातल्यांशी बोलण्याच्या वेळा ठरऊन त्या त्या वेळेसच बोलण्याचा प्रय्त्न करणार. हे याच्या साठी की मी पण जॉब करतोय आणि माझ्या तिथे पण जबाबदार्‍या आहेत. ऑफिसातुन बोलणे शक्यतो टाळणार.
६. बायकोशी ह्या बाबतीतल सगळ काही शेअर करणार , तिच्या मताला पण माझ्या मता येव्हडच महत्व असणार याकड थोड लक्ष देईल.
७. धाकट असल्यामुळ नकट होउन सारथ्य कस माझ्या आणि माझ्या वडीलांच्या हातात राहिल हेच पहाणार. कर्ज फेडीचे ट्प्पे आखुन घेऊन मामला आवाक्यात आला की हळुहळु बाजुला होऊन मोठ्या भावांकड हे सोपवण्याचा प्रयत्न करणार पण माघे झालेल्या चुका नोट डाउन करुन ठेवणार.
सगळ असच्या असच घडेल अस नाही पण यातल ५०% जरी झाल तरी फार होईल.....

आमच्या गावाकड एक म्हण आहे ...बैलगाडी बरोबर कुत्र चाल्ला की त्याला वाटत आपल्या मुळे गाडी चाल्ली आहे..

तुम्ही काहीही काडीची मदत केली नाही तरीही तुमच्या नातेवाई़कांचे काही बिघडणार नाही ..
ते स्वत: चा मार्ग शोधतील. घरी बसून कोणीही मरत नाही ...पोटाला चिमटा बसला की हात-पाय आपोअप हालतात ..गोडावून मध्ल्या तंबाखू बाहेर येतील ..आणि ३०-३५ लाखाचा प्लॉट आणि शेती असलेली माणसे बरे वाईत होत नाही..

कालपनिक संक्ट सांगा आणि त्यांना पैसे मागा ..जसे की नवर्‍याचा जॉब ट्रबल मधे आहे . ऑफिस मधे चुक झाली आणि २ लाख भरायचे आहेत ..वर्किंग व्हिसा चे पैसे आता स्वतः भरायचे आहेत ..तुम्हीच पैसे द्या ..प्लोट विकून द्या ..इतके दिवस मी दिले ..आता मला गरज आहे..

* माणसाने दुसर्‍यांकडे पैसे मागत रहावे ...म्हणजे तुमच्या कडे उगीच कुणी पैसे मागणार नाही

मिताली,

१) पहिल्यांदा सासु आणि सासरे ह्यांचा हेल्थ इन्शुरन्चे घ्या सेनिअर सिटिझन असल्याने पर्याय कमी आहेत पण हे बघा .

२) त्याच प्रमाणे जर भावांसाठी काही करायचेच असेल तर दोम्हि भावांचे हेल्थ इन्शुरन्स काढून फक्त प्रिमिअम भरा. बाकी पुख्याची़ सोय त्यांची त्याना करुद्या

३) तुम्ही म्हणता आहात कि सासर्यांच्या नावावर प्लॉट आहे. तर तो विकु नकाच. रिव्हर्स मॉडगेज चा पर्याय बघा.

कालपनिक संक्ट सांगा आणि त्यांना पैसे मागा ..जसे की नवर्‍याचा जॉब ट्रबल मधे आहे . ऑफिस मधे चुक झाली आणि २ लाख भरायचे आहेत ..वर्किंग व्हिसा चे पैसे आता स्वतः भरायचे आहेत ..तुम्हीच पैसे द्या ..प्लोट विकून द्या ..इतके दिवस मी दिले ..आता मला गरज आहे..

* माणसाने दुसर्‍यांकडे पैसे मागत रहावे ...म्हणजे तुमच्या कडे उगीच कुणी पैसे मागणार नाही
>> +११११११ जोरदार अनुमोदन.
(पण खात्री आहे तुमचा नवरा कधीच धजावणार नाही इतक इमॅजनरि बोलायला, जमल तर फार सोप्पा होईल तुमचा मार्ग Happy )

मग कशाला लोकांकडे सल्ले मागावेत? >>

डीडी, खरंतर कसलं स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये.
पण सल्ला मागितल्याने - मुख्य म्हणजे मला मन हलकं वाटतंय. शिवाय इथे मत लिहिलेल्या बर्‍याच लोकांच्या पोस्ट्स मी अनेक वर्षांपासून वाचतेय.त्यातल्या अनेकांबद्दल (अर्थात त्यांच्या विचारसरणीबद्दल) मला आदर आहे. माझ्या जागी ते असते तर काय वागले असते हे कळल्याने मानसिक बळ मिळतंय.शिवाय बरेच प्रॅक्टिकल मुद्दे, जे आमच्या लक्षात आले नव्हते ते सुचवले गेल्याने फायदाच आहे.

सुशांत, उपयोगी पोस्ट.
पेशवा, लिन्क्सबद्दल धन्यवाद. उघडून पाहिल्या. पुन्हा एकदा नीट वाचते.

हे चित्र फार जगावेगळं आहे असं नाही. चार भावातले दोघे-तिघे कमावणार,एक दोघे बसून खाणार, तरी त्यांची लग्न करून दिली जाणार, त्यांच्या बायका घरातल्या मोलकरणी म्हणून राबणार हे पाहिलंय/अनुभवलंय. कधी पोसणारा भाऊ गावात राहूनच पैसा कमावत असतो, तर कधी मुंबईच्या मनीऑर्डरची वाट बघत सगळे बसून राहतात.

याचा अर्थ हे योग्य आहे, आहे तसंच चालू द्यावं असं मी म्हणत नाही. फक्त हे तितकं अनकॉमन नाही हे निरीक्षण नोंदवायचं होतं.
हे चित्र बदलता यावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

एक अनुभव असा ही आहे... कि लहान भाऊ नोकरीच्या निमित्ताने लांब राह्तो तरी त्याला घरी मोठ्या भावा-बहिणी साठी खावटी द्यावी लागते.
मोठ्या भावाचा पगार ८८०/- महीना + आईची पेंशन १२०/-
लहान भावाचा ३८०/- महीना
घरी २००/- पाठ्वाय्चेच... !
लहान भावाचं हे पैसे पाठवण हे लग्नानंतर आणी एक मुल झाल्या नन्तर ही सुरुच...! Sad

आयुष्यभर ज्यांनी काबाडकष्ट करुन आपल्याला मोठं केलं, त्या आई-वडिलांची व्रुद्धापकाळात देखभाल करण्याचं कर्तव्य - हा सेकंड किंवा थर्ड प्रायॉरिटी आय्टम आहे हे एका प्ततिसादात वाचुन भारत किती पुढारला आहे याची जाणिव झाली.

अवांतराबद्धल क्षमस्व.

आयुष्यभर ज्यांनी काबाडकष्ट करुन आपल्याला मोठं केलं, त्या आई-वडिलांची व्रुद्धापकाळात देखभाल करण्याचं कर्तव्य - हा सेकंड किंवा थर्ड प्रायॉरिटी आय्टम आहे हे एका प्ततिसादात वाचुन भारत किती पुढारला आहे याची जाणिव झाली.<<<

नक्की तपशीलवार वाचून लिहीत नाही आहे, पण हे वरील मत अगदी तश्याच्या तश्या अर्थाने लिहिणार्‍याने लिहिलेले नसणार राज! जे आई वडील घरातील स्त्रीला वहाणेची जागा द्यावी असे वर्तणुकीतून सुचवतात, एका मुलावर दुसर्‍या दोन्ही मुलांची व स्वतःचे अशी तीन कुटुंबे चालवण्यात धन्यता मानतात त्यांच्याबाबतीत तसे म्हंटले गेलेले आहे.

आयुष्यभर ज्यांनी काबाडकष्ट करुन आपल्याला मोठं केलं, त्या आई-वडिलांची व्रुद्धापकाळात देखभाल करण्याचं कर्तव्य - हा सेकंड किंवा थर्ड प्रायॉरिटी आय्टम आहे हे एका प्ततिसादात वाचुन भारत किती पुढारला आहे याची जाणिव झाली.

>> इथे कोणीही आईवडिलांना थर्ड प्रायॉरिटी करा म्हणुन सांगत नाहीये. उलट काही काही प्रतिसाद त्यांना तुमच्या घरी राहायला घेऊन या असे सांगितले आहे. इथे सगळ्यांचा आक्षेप आहे तो भाऊ धडधाकट असतांना त्यांच्या संसाराचा गाडा ह्यांनी ओढण्याला. काही प्रतिसादात त्यांच्या अचानक येणार्‍या आजारपण इत्यादींसाठी तरतुद करुन ठेवा असेही सल्ले आहेत.

बाकी चालुद्या तुमचे "दुसर्‍यासाठी जगलास तर जगलास.. स्वतःसाठी जगलास तर मेलास" चे दळण.

भारत किती पुढारला आहे याची जाणिव झाली.

>> आणि भाऊ धडधाकट असुन दारु पित बसतो, काही करत नाही हे वाचुन कसली जाणिव होत नाही का?

मिताली,

इथल्या प्रश्नांना तुमची उत्तरे नकारार्थी आली हे सुचिह्न आहे. Happy

मला वाटतं की तुम्हा दोघांच्या (विशेषकरून तुमच्या यजमानांच्या) मनातली भीती एकदा गेली की सगळं सुरळीत होईल. पुढील वाटचालीस शुभेच्छा!

आ.न.,
-गा.पै.

गामा साहेब,

'यजमानांच्या मनात' भारताबाहेर गेल्यानंतरही गावाकडच्या कुटुंबाच्या विचारसरणीची भीती तशीच राहावी याला बिचार्‍या 'यजमानीण' बाईंनी काय करावे?

बेसिकली, अनेक ठिकाणी 'लग्न' हाच एक प्रॉब्लेम असू शकतो, अश्या विचित्र निष्कर्षाप्रती येणे होते.

मिताली

वर बरीच चर्चा झालेली दिसते. तुम्ही सध्या जे ठरवले आहे ते योग्यच आहे. एकंदरीत मला खालील प्रमाणे जाणवले
१) तुम्ही चांगले शिकलेले आहात. सध्या एकजण शिकत आहे, दुसरा कमावत आहे. ते उत्पन्न रुपये १ लाख इतके आहे. जेंव्हा दुसराही कमावु लागेल, तेंव्हा नक्कीच जास्त रक्कम मिळेल व वाढीव शिक्षणाचाही फायदा होइल.

२) तुमचे उत्पन्न कसे वाढेल ह्याचा विचार करा. स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करु नका. जास्ती उत्पन्ना साठी तेच कामी येणार आहे.

३) तुम्ही परदेशात आहात, शिकत आहात , पदरी लहान मुल आहे. अशा परिस्थीतित गावाकडे पैसे पाठवण्या पेक्षा त्यांच्या नावे गुंतवणुक करा.

४) पहिले स्वतःचे भविष्य सुधारा. मग इतराचे.

५) योग्य आर्थिक सल्ला घ्या. फक्त इंशुरन्स, फक्त शेअर्स, इ.इ. करु नका. डोन्ट कील ऑल एग्ज इन वन बास्केट. आज्काल ऑनलाईन सुविधे मुळे अनेक गुंतवणुक पर्याय परदेशात राहुन करता येतात.

६) गावात योग्य होइल असा व्यवसाय रमेश्च्या बायकोला द्या. त्यात तिच्या अंगी काही कला असेल, वा ती थोडी शिकलेली असेल तर शिकवण्या करु शकते. किंवा नर्सरी/ माँटेसरी ट्रेनिंग घेवुन एखाद्या शाळेत नोकरी करु शकते. ह्या कामात सासू सासर्‍यांना विश्वासात घ्या.

७) संबंध तोडणे खुप सोप्पे आहे. जोडणे कठीण. आणि तुमच्या लिखाणा वरुन तुमचे मिस्टर खुप हळवे आणि कुटूंबाशी एकदम जोडलेले आहेत. ह्या त्यांच्या स्वभावाशी तुम्हाला जुळव्ने गरज्चे आहे. जमिनीवरचा हक्क कधीही सोडु नका.

८) तुमच्या गरजाचे प्रायरोटायझ्शन करा. त्या प्रमाणे प्राधान्य देवुन एक एक फुली मारत जा. भारतात तुमचे घर नसेल, तर ताबडतोब एखादे घर... लहान का होइना.. घ्यायची हालचाल करा. त्याला सर्वाधिक प्राधान्य द्या.

मुख्य म्हणजे रोज थोडातरी मानसिक व्यायाम करा. मनात सकारात्मक गोष्टी आणा. रोज एका पानावर मला यश मिळणारच आहे. मला सगळं नीट निभाउन नेण्यची बुध्धी व दिशा मिळो असे आवाहन आपल्या अंतर्मनाला करा. अंतर्मन जसे ज्से निष्चयी होवु लागेल, तसे तसे निर्णय घेणे सोपे पडेल. एक वेगळाच आत्मविश्वास तुम्हाला येईल. मात्र स्वतःवर वर आपल्या निर्णयावर विश्वास मात्र अत्यंतिक गरजेचे आहे.

वरील मानसिक साधना स्वतः केल्या मुळे एकदम ट्राईड & टेस्टेड आहे.

पुढिल वाटचालीसाठी शुभेछा....

मोहन की मीरा

रोज एका पानावर मला यश मिळणारच आहे. मला सगळं नीट निभाउन नेण्यची बुध्धी व दिशा मिळो असे आवाहन आपल्या अंतर्मनाला करा. हे अगदी खरे! उत्तम विचार आहे. रोज आपले विचार नुसते कागदावर उतरवले तरी मन शांत व्हायला मदत होते.
नंतर तो कागद फाडून टाकला तरी चालतो Happy

मोहन की मीरा,
खूप छान वाटलं तुमची पोस्ट वाचून. तुम्ही ह्या क्षेत्रातील तज्ञ. शेवटची काही वाक्ये तर फारच आतवर पोचली. धन्यवाद Happy

बेफ़िकीर

मुळावरच घाव घालताय की ओ !!

भलत सलत डोक्यात घ्यायच्या त्या !
" तरी माझे बाबा/ आई म्हणत होते , असल्या मुलाशी लग्न करू नको..पण भाळले ना तुमच्यावर ..आता ***** .."

<दिवे घ्या>

Pages