मार्केटमधला नवा 'मजनू' - रांझणा (Raanjhnaa - Movie Review)

Submitted by रसप on 22 June, 2013 - 02:47

एक असतो बनारसी पंडित. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो. त्या मुलाच्या कहाणीवर एक होतकरू दिग्दर्शक चित्रपट काढायचं ठरवतो. त्या चित्रपटातून एक तमिळ सुपरस्टार हिंदीत आगमन करणार असतो. त्याच्या हिंदी उच्चारांवर मेहनत घेऊन त्याचा आणि स्वत:चा अजून एखाद्या चित्रपटासाठीचा वेळ वाया घालविण्यापेक्षा रोलच जरासा 'अ‍ॅडजस्ट' करू या की, असं ठरवलं जातं आणि कहाणी अशी बनते की - 'एक असतो 'तमिळ' पंडित. तो बनारसला 'प्रॅक्टिस' करत असतो. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो आणि वगैरे वगैरे'

'बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा देव आला नाहीये', असा काहीसा संवाद 'OMG' मध्ये आहे. तो ऐकून दिग्दर्शकाची ट्युब पेटली असावी आणि जाणवलं असावं की बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा 'मजनू' आला नाहीये ! दोन-तीन चांगल्या दर्जाची ठिगळं जोडून एक कहाणी विणली गेली असावी. ही कहाणी ठिगळ बाय ठिगळ उलगडत जाते. सुरुवात होते बनारसमध्ये. तमिळनाडूतून येऊन बनारसमध्ये स्थिरस्थावर झालेल्या एका पंडिताचा द्वाड मुलगा 'कुंदन' (धनुष), बालपणापासूनच 'झोया' (सोनम कपूर)च्या प्रेमात असतो. बालवयातल्या ह्या प्रेमाला स्वत: कुंदन आणि झोयाच्या घरचे फारच सिरिअसली घेतात आणि शोप्याची रवानगी बनारसहून अलिगढ आणि नंतर पुढिल शिक्षणासाठी तिथून दिल्लीला होते.
८-९ वर्षांनी परतलेली झोया बदललेली असते. ती 'अक्रम' (अभय देओल) ची दीवानी झालेली असते. पण कुंदन बदललेला नसतो. तो अजूनही तिच्याच प्रेमात असतोच. मस्त प्रेमत्रिकोण बनतो. पण इतकी कहाणी उलगडते तरी अजून मध्यंतरसुद्धा झालेलं नसतं. आजपर्यंत किती प्रेमत्रिकोण आपण पाहिलेत, ह्याची गणतीसुद्धा अशक्य आहे. पण ही कहाणी केवळ प्रेमत्रिकोण नाहीये. पुढचं एक ठिगळ ह्या कहाणीला एक अनपेक्षित वळण देतं आणि चित्रपटाच्या शेवटापर्यंत ती 'कुठच्या कुठे' जाऊन पोहोचते !

पुढची दोन ठिगळं काय आहेत, हे चित्रपट बघूनच समजून घ्यावं. त्यासाठी फक्त सोनम कपूरला आणि मध्यंतरानंतरच्या धीम्या गतीने भरकटण्याला सहन करावं लागतं. बाकी तसं ह्या चित्रपटात काहीच 'असह्य' नक्कीच नाही.

1363584324a21cd.jpg

कुंदनचा मित्र 'मुरारी' (अभिनेत्याचं नाव माहित नाही) जबरदस्त आहे. त्याचे वन लायनर्स हुकमी टाळ्या घेतात, हशा पिकवतात. त्याव्यतिरिक्तही संवाद बऱ्यापैकी खुसखुशीत आहेत. सगळ्याच सपोर्ट कास्टचं काम चोख झालं आहे. अभय देओलला तसं कमी काम असलं तरी त्याचा पडद्यावरचा वावर छाप सोडतोच आणि मुळात मुख्य भूमिकेतील 'धनुष' अगदीच पाप्याचं पितर असल्याने अभय लक्षात राहतो.
धनुषला पाहिल्यावर सुपरस्टार बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात, हे समजतं -
१. एखाद्या लार्जर दॅन लाईफ सुपरस्टारला मुलगी असली पाहिजे.
२. तिच्याशी तुमचं लग्न झालं पाहिजे.
बास्स ! झालात तुम्ही सुपरस्टार आणि त्यात हे प्रकरण दाक्षिणात्य असेल तर तुमचं येत्या काही दिवसांत सासऱ्याच्या बाजूला, रामासोबत हनुमानाचं असावं तसं मंदिरही बनू शकेल.
कारण, बाकी कुठलंही, सुपरस्टारच काय पडद्यावर झळकायच्या लायकीचंही लक्षण 'धनुष'मध्ये नाही. त्याची अंगकाठी इतकी बारकी आहे की राजपाल यादवची पर्सनालिटी भारी वाटावी. पंधरा थपडा मारणारी सोनम कपूरच होती म्हणून ठीक, बिपाशासारख्या भक्कम हिरविणीची एक थप्पडही ह्याचा डावा गाल उजवीकडे नेऊ शकेल, असं त्याला पाहून वाटतं. अभिनय म्हणावा, तर 'कुंदन'च्या व्यक्तीरेखेतच दम आहे. त्यात त्याने काही विशेष जीव ओतलाय, अश्यातला भागच नाही. त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल.

शोसाठी घरून निघताना, जरासा वेळ होता म्हणून सहज टीव्ही लावला होता तर एका वाहिनीवर दिग्दर्शक आनंद रायची छोटीशी मुलाखत चालू होती. तो सतत 'धनुष सर, धनुष सर' म्हणत होता. दया आली.
'जब तक हैं जान' नंतर नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या रहमानच्या चाहत्यांना रहमान जरासा(च) दिलासा 'रांझणा'तून देतो. 'तुम तक' ही कव्वाली तर मस्तच बनली आहे.

एकंदरीत एकदा(च) पाहण्यास हरकत नसावी, असा हा चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्यात मरतुकड्या सुपरस्टारला हिंदीत आणतो आहे. इथल्या बलदंड बैलांच्या गर्दीत, हे कुपोषित कोकरू टिकेल का हे काळच सांगेल !!

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/raanjhnaa-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल. >

धनुअषला अभिनयासाठीचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे.

चित्रपटाचे परीक्षण छान लिहीले आहे.

बाकी धनुषबद्दल - मला तो हिन्दी चित्रपटाचा हीरो शोभेल असा कधीच वाटला नाही, त्याला पाहिल्यावर राजपाल यादवच आठवतो. एखादा चित्रपट पाहिल्यावरच कळेल एवढा का तो लोकप्रिय आहे तो.

'देव-डी' ला संगीताचं राष्ट्रीय पारितोषिक मिळू शकतं, तर धनुषला अभिनयाचं न मिळायला काय!

नुसते व्यायाम करुन शरीरयष्टी कमवुन पडद्यावर सतत दाखवत मख्ख फिरणे म्हणजे अभिनय नव्हे...

दक्षिण भारतीय चित्रपटांमधे सामान्य दिसणारेच अभिनेते असतात त्यांना ना व्य्वस्थित कमवलेली बॉडी असते ना चेहरा राजबिंडा असतो.. दाढी सुध्दा करत नाहीत काही... सर्वांना मिश्या त्या ही पिळदार...

त्यांच्याकडचे काही सुपरस्टार आपल्या हिंदितल्या साध्या स्टार्स च्या आजुबाजुला सुध्दा नाही दिसण्यामधे... तरी सुध्दा त्यांचे चित्र्पट सुपर डुपर हिट्ट ??????????
याचे कारण ????

असा हा चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्यात मरतुकड्या सुपरस्टारला हिंदीत आणतो आहे. इथल्या बलदंड बैलांच्या गर्दीत, हे कुपोषित कोकरू टिकेल का हे काळच सांगेल !!>>> Biggrin

<<<<त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल. >

धनुअषला अभिनयासाठीचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे.>>>

चिनुक्स , प्लीज नोट, धनुषकडे काय काय नाही या यादीत 'अभिनया'चा समावेश नाही.
मेरे पास अ‍ॅक्टिंग है Wink

मटा मधले :-

पहिला हिंदी सिनेमा असूनही धनुषने उत्तम काम केलंय. त्याचा अभिनय बेफाट झालाय. त्याच्या बोलण्यात तमिळ अॅक्सेंट फारसा डोकावत नाही हा प्रेक्षकांना सुखद धक्का आहे. धनुषच्या रुपात बॉलिवुडला उत्तम अभिनेता मिळाला. आधी उथळ, मस्तीखोर कुंदन आणि नंतरचा गंभीर, समजूतदार कुंदन साकारण्यात धनुष सफल ठरलाय. सहज हसणं, रडणं, एका एक्सप्रेशनमधून दुसऱ्या एक्सप्रेशनमध्ये जाणं त्याला सहज शक्य झालंय. सोनम कपूरला ग्लॅमरस दाखवलं नाही. तिने अभिनयात फारशी चमक दाखवली नसली तरी आता ती एक पायरी पुढे गेली आहे. अभय देओल कमी वेळासाठी सिनेमात आहे. त्याला फार काही करण्यासारखं नव्हतं. त्यामुळे तोही अप टू द मार्क आहे. मुरारी (महम्मद झिशान अयुब) आणि बिंदीया (स्वरा भास्कर) हे दोघेही कुंदनचे बालमित्र दाखवले आहेत. बिंदीया कुंदनवर प्रेम करत असते. पण, कुंदन झोयावर. म्हणून ती झोयाच्या मरण्यावर टपली असते. तिचं झोयाविषयीचं जळणं, कुंदनच्या सारखं मागे लागणं हे तिने उत्तम साकारलं. मुरारीने सच्चा दोस्ताची भूमिका योग्यप्रकारे पेलली. जेवणात चवीपुरतं जसं मीठ तसं या दोघांचं आहे. त्यांची काम मोजकी पण भन्नाट झाली आहेत.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Uhoh

>>त्याच्या बोलण्यात तमिळ अॅक्सेंट फारसा डोकावत नाही हा प्रेक्षकांना सुखद धक्का आहे.<<

एक तर लिहिणारा मूर्ख आहे किंवा बहिरा..!!
चित्रपटात धनुष 'लंकाधअन' असे म्हणत असतो. (हे एक उदाहरण आठवलं. शितावरुन भाताची करावी.)

सैफ अलि खान सिनेमात आला तेव्हा त्याला ६नं पासून पुरीष रूपातली शर्मिला टागोर असं काहिही हिणवण्यात आलं.
नंतर मात्रं तो चक्क माचो मॅन झालाय.
आत तर खास पुरूषी व्यक्तिमत्त्व म्हणून त्याला जाहिराती आणि सिनेमे मिळतात.
तस्मात पदार्पणातच कोण कोकरू आणि कोण छावा हे सांगणे कठिण.

चित्रपट उद्या पाहणार आहे. इकडे आमच्या गावात तो अंबिकापती म्हणून तमिळमधे रीलीज झालाय, पण मला हिंदी बघायचा आहे. प्रोमो आणि गाणी बघून तरी जीव सुखावला माझा. तुम तक गाण्याच्या शब्दांनी तर गारूड केलंय. इरशाद कामिल बेस्ट आहे.

क्सा, अनुपमा चोप्राच्या लिंकसाठी धन्यवाद.

धनुष मला कोलावेरीडी क्रेझ यायच्या आधीपासून आवडतो. त्याचा अभिनय चांगला असतो, नाचतो पण तो टिपिकल टपोरीसारखा. एकदम फुल्ल टू धमाल. त्याचा ब्रँड वेगळा ठेवलाय त्याने. उगाच "हा शर्ट काढून फिरतो म्हणून मी पण एकातरी गाण्यात सिक्स पॅक दाखवेनच" वगैरे शर्यतीमधे तो येत नाही. Happy साऊथच्या इतर हीरोंपेक्षा वेगळा दिसतो तरी इथे लोकांमधे फार प्रिय आहे तो. रजनीकांतच्या मुलीशी लग्न करण्याआधीपासूनच.

चित्रपटात धनुष 'लंकाधअन' असे म्हणत असतो>>> जर त्याचा रोल तमिळ पंडिताच्या मुलासारखा असेल तर त्याचे बोलणे चूक आहे का? तमिळमधे ख, घ, छ, झ, थ, ध हे वर्ण नसतात. संस्कृतमधून आलेल्या शब्दांमधे हे वर्ण असतील तरी त्यांचे उच्चार क, ग, ज असेच करतात हे लोक. त्यामुळे यांचे परफेक्ट उच्चार त्यांना जमत नाहीत. 'ळ' याचे इथे दोन विविध उच्चार आहेत. झपाटलेला रीव्ह्युमधे पण तुम्ही हा उच्चारांचा मुद्दा उपस्थित केला होतात, त्यावरून प्रश्न पडलाय की. पुस्तकी उच्चार करणे ही उत्तम अभिनयाची परीक्षा आहे की व्यक्तीरेखेला अनुसरून उच्चार करणे? पडोसनमधला मेहमूद जे बोलतो त्याला तमिळ उच्चार म्हणत नाहीत. (इथे अजून एक नुकतंच उदाहरण आठवलं पण फ्यान्स परत चिडाबिडायचे!!) चेन्नई एक्स्प्रेसमधे दीपिका पदुकोण हे बोलते ते तमिळ उच्चार.

कारण, बाकी कुठलंही, सुपरस्टारच काय पडद्यावर झळकायच्या लायकीचंही लक्षण 'धनुष'मध्ये नाही. >>> का ही ही!!! पडद्यावर झळकायच्या लायकीची काय लक्षणं असतात? दिसायला सुंदर हवेत, पीळदार शरीरयष्टी हवी, की अभिनय करता यायला हवा? धनुष उत्तम अभिनेता आहे हे त्याने राष्ट्रीय पारितोषिक मिळवून दाखवलेले आहे. त्याचे इतर सिनेमा पाहिलेत तरी त्याचा अभिनय किती उत्तम आहे हे लक्षात येईल. उगाच सुपरस्टारचा जावई आहे म्हणून त्याला हनुमान वगैरे लिहिण्याआधी किमान त्याने इतर भाषेमधे काय काम केले आहे हे तरी एकदा वाचा की. विकीपीडीयावर भरपूर माहिती आहे त्याची.

'देव-डी' ला संगीताचं राष्ट्रीय पारितोषिक मिळू शकतं, तर धनुषला अभिनयाचं न मिळायला काय!>>> परिक्षण म्हणून काहीही लिहीत आहात ते पुरेसे नाहीए का? प्रत्येकवेळी आपले विधान डिफेंड कशाला करीत आहात, ते ही इतक्या अजागळपणे?
रॉबिनहूड यांना जोरदार अनुमोदन

ओम पुरी, नसीरूद्दिन शाह, अमिताभ बच्चन, शाहरूख खान अशी कितीतरी उदाहरणे आहेत जे रूढार्थाने दिसायला सुंदर नाहीत, तरी ते पडद्यावर झळकलेत, आणि नुसतेच झळकले नाहीत तर सुपरस्टारदेखील झाले आहेत. फौजी आणि सर्कसमधल्या शाहरूखला बघून "हा बादशहा ऑफ बॉलीवूड होइल" असे कुणालातरी वाटले होते का? तेव्हा तो पण असाच पाप्याचं पितर होता की.

सुपरस्टार होण्यासाठी तुमच्याकडे तो एक्स फॅक्टर असायला हवा, जो सध्या रणबीर कपूर, इम्रान खान सारख्या नवीन मुलांकडे आहे आणि धनुषकडे तर निश्चित आहे.

'देव-डी' ला संगीताचं राष्ट्रीय पारितोषिक मिळू शकतं, तर धनुषला अभिनयाचं न मिळायला काय!>>> >>< अर्र, हे विधान मी वाचलंच नव्हतं. आपण त्याला पारितोषिक मिळालेला सिनेमा पाहिला आहे का? तसं असल्यास त्यांना हे पारितोषिक का मिळायला नको हवं होतं याबद्दल काही लिहाल का? आणि सिनेमा पाहिलाच नसेल तरी हे विधान लिहीत असाल तर मग ऱोबिनहूड बरोबर बोलताहेत.

'राष्ट्रीय पारितोषिक' ही एवढी चेष्टेवारी न्यायची गोष्ट नाही. देव-डी नि धनुष घटकाभर बाजूला ठेऊ. पण राष्ट्रीय पारितोषिक आजवर कुणाकुणाला कशासाठी मिळालं आहे- त्याची यादी बघावी कृपया.

देव-डीचं संगीत (वासेपूरच्या संगीतासारखंच) 'क्लासिक' आहे, ट्रेंडसेटर आहे.

वासेपूरवरून नवाजूद्दीन आठवला. त्याच्याकडेही असंच, स्टार बनण्यासाठी काहीच नव्हतं. Happy

रिव्ह्यु चांगला लिहिला आहे.. मुख्य म्हणजे चित्रपट कथा "फोडली" नाही... मटा मधे सरळ सरळ फोडुन टाकली आहे...:(

असो...

गाणी तर अप्रतिम झालेलीच आहे परंतु या चित्रपटाचे संगीत देताना रेहमान च्या मनात बनारस आणि बिसमिल्ला खान ची शेहनाई होती.. म्हणुनच त्यांना आदरांजली म्हणुन रेहमान ने गाण्यांमधे "शेहनाई"चे स्वर मिसळलेले आहेत.....

या कथेचा बाजच असा होता की त्यात ..एक शालेय विद्यार्थी जो किमान १६-१८ वर्षाचा कोवळा दिसायला हवा त्याचबरोबर दिसायला देखील सादाच हवा.. अन्यथा मोठा झाल्यावर एकदम "रितिक रोशन" सारखा दिसायला लागला तर सोनम "अभय" ऐवजी यालाच पसंद नाही का करणार ;).. धनुष दिसतो अगदी सामान्य मुलासारखा .. अशी मुल तुम्हाला कुठेही कोणत्याही शाळेत कॉलेजात दिसतील.. बारिक काटक शरीरयष्टी, तोंडावर बावळत हास्य.. रंगाने "अप्रतिम" सामान्यतः कोणताही भारतीय (एकदम काश्मीर उत्तर भारत घेउ नका) सामान्य मुलासारखे दिसने महत्वाचे होते.. कारण पुढे जे काही घडते ...या जे काही होते.. ते रितिक अथवा रणवीर कपुर ला घेतले असते तर ते पटलेच नसते..

स्क्रिनप्ले महत्वाचा आहे यात.. एक स्टोरी त्यात एक फ्लॅशबॅक त्यात विविध वळणे.. व्य्वस्थित जमली आहेत...
अर्थात काही उणिवा नक्कीच आहेत...

सोनम चा चेहरा रडणे आनि हसणे हे दोन प्रकार मुख्य असल्यासारखा प्रतिक्रिया देत असतो.. तरी सुध्दा तिचे साधे दिसनेच या चित्र्पटात मुख्य हायलाईट झाले..त्यामुळे इतर बाबी काही प्रमाणात झाकल्या गेल्या...

अभय देओल ला इतर असे काही काम नाही

त्याच्या बोलण्यात तमिळ अॅक्सेंट फारसा डोकावत नाही हा प्रेक्षकांना सुखद धक्का आहे.>>>> +१

मध्यंतरानंतर मध्येच ५-१० मिनिटे उच्चार गडबडले आहेत, नाहीतर सिनेमा बघताना कुठेही धनुष दाक्षिणात्य आहे असे वाटत नाही. अगदी 'याचे डबिंग कुणी दुसर्‍याने केले असावे' असे वाटण्याइतपत. Happy

एक शालेय विद्यार्थी जो किमान १६-१८ वर्षाचा कोवळा दिसायला हवा त्याचबरोबर दिसायला देखील सादाच हवा.. अन्यथा मोठा झाल्यावर एकदम "रितिक रोशन" सारखा दिसायला लागला तर सोनम "अभय" ऐवजी यालाच पसंद नाही का करणार डोळा मारा.. धनुष दिसतो अगदी सामान्य मुलासारखा .. अशी मुल तुम्हाला कुठेही कोणत्याही शाळेत कॉलेजात दिसतील.. बारिक काटक शरीरयष्टी, तोंडावर बावळत हास्य.. रंगाने "अप्रतिम" सामान्यतः कोणताही भारतीय (एकदम काश्मीर उत्तर भारत घेउ नका) सामान्य मुलासारखे दिसने महत्वाचे होते.. कारण पुढे जे काही घडते ...या जे काही होते.. ते रितिक अथवा रणवीर कपुर ला घेतले असते तर ते पटलेच नसते..>>>
+१

धनुषने काम चांगले केले आहे. भुमिकेत शोभून दिसला आहे. Happy
सोनम ओके.

नंदीनीजी,

उच्चारांबाबतचे माझे उत्तर, त्या आधीच्या एका पोस्टमध्ये 'म. टा. तील परीक्षणात धनुषचे उच्चार तमिळ नाहीत' असे म्हटले आहे, त्यावर होते. उगाच कशाला वाद घालताय ? Light 1

तो मला बंडल वाटला... मी बंडल म्हटलं.. त्याला अजून २५ राष्ट्रीय पुरस्कार मिळोत की ! कविता असो वा चित्रपट मी तरी पुरस्कार मानत नाही..

जे मला वाटलं, ते लिहायला रनजीकांतची परवानगी घ्यायला हवी की काय ??
Uhoh

तो मला बंडल वाटला... मी बंडल म्हटलं.. >> हो ते ठीकच आहे की. फक्त 'पुरस्कार काय, कुणालाही मिळतात' अशा अर्थाच्या वाक्यावर जरा आक्षेप घ्यावासा वाटला इतकंच. इथं तर 'राष्ट्रीय' पुरस्काराचा विषय होता. खाजगी वाहिनी, संस्था, ट्रस्ट इ. कडून मिळणार्‍या नाही.

तो मला बंडल वाटला... मी बंडल म्हटलं>> म्हणा की. पण रेटिंग वगैरे देऊन तुम्ही जो समीक्षकाचा आव आणता त्याला आम्ही हसतो. Happy तुम्हाला काही प्रॉब्लेम? मायबोली पब्लिक फोरम आहे, इथे तुम्ही रीव्ह्यु टाकल्यावर आम्ही आमची कमेंट देणारच की. आम्ही कमेंट दिले की लगेच "उगाच वाद होतात" का? आम्हाला चित्रपट समीक्षण (खरंतर कुठलंही समीक्षण)ही अजिबात सोपी गोष्ट नाही हे माहित आहे, आणी तुम्ही दर आठवड्याला नेमाने "फिल्म रीव्ह्यु" लिहत असता, त्यामधे काहीही बाष्कळ विधाने करत असता, त्याच्यावर आम्ही मनमुरादपणे हसू देखील नये का?

त्याच्या हिंदी उच्चारांवर मेहनत घेऊन त्याचा आणि स्वत:चा अजून एखाद्या चित्रपटासाठीचा वेळ वाया घालविण्यापेक्षा रोलच जरासा 'अ‍ॅडजस्ट' करू या की, असं ठरवलं जातं आणि कहाणी अशी बनते की >>या मूळ पोस्ट्मधे देखील तुम्ही उच्चारांचा मुद्दा लिहिला आहेच की. उद्या सिनेमा पाहिल्यावर उच्चारांबद्दल अधिक लिहू शकेन.

बाकी त्याच्या नृत्यकौशल्य वगैरे बद्दल उद्या सिनेमा पाहून आल्यावरच लिहेन.

कविता असो वा चित्रपट मी तरी पुरस्कार मानत नाही..
>>> बरं... पण इथे तुम्हाला पुरस्कार देतंय कोण? Light 1

जे मला वाटलं, ते लिहायला रनजीकांतची परवानगी घ्यायला हवी की काय ??
>>> किमान तुम्ही आडुकाळम (अथवा त्याचे इतर पिक्चर) पाहिला असता आणी त्यानंतर 'देव-डी' ला संगीताचं राष्ट्रीय पारितोषिक मिळू शकतं, तर धनुषला अभिनयाचं न मिळायला काय! असे विधान केले असते तर "जे मला वाटलं" वगैरे म्हणायला अर्थ होता. तुम्ही पाहिलेच नाही तर तुम्हाला काय वाटलं आणि काय नाही वाटलं काय महत्त्व उरते त्याला?

उगाच लिहायचे म्हणून का ही ही!!!!

@साजिरा,

पुरस्कार, अगदी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा कुणालाही 'लाईफ टाईम' सिद्ध करतात का हो? धनुषला एक राष्ट्रीय पु. मिळाला म्हणून तो अभिनेता म्हणून कायमचा सिद्ध झाला की काय ? अजय देवगणलाही मिळाला आहे राष्ट्रीय पु. ना ? मग? सन ऑफ सरदार मध्ये आवडला म्हणणार?

पुरस्कार मिळाला म्हणून कुणी ग्रेट ठरत नसतो, हे मान्य आहे की नाही..?

राष्ट्रीय पुरस्कार काही अपवाद वगळता नक्कीच चांगल्या कामासाठीच दिले गेले आहेत

मेगास्टार सुपरस्टार अमिताभ बच्चन ला देखील त्यांच्या उमेदीच्या काळात मिळाला नाही.. त्यांनी लीड रोल सोडुन जेव्हा इतर भुमिकांकडे वळले तेव्हा त्यांना मिळाला ते देखील "ब्लॅक" मधील असामान्य भुमिके करिता...

या उलट ... मिथुन चक्रवर्ती यांना २ - ३ वेळा मिळाला आहे.. शाहरुख , सलमान. परफेक्ट आमिर खान यांसारखे १००-२०० करोड हमखास कमवणार्या कलाकारांना देखील मिळाला नाही परंतु हिरो म्हणुन कुठल्या ही संज्ञेत न बसणार्या "इरफान खान" याला "पान सिंग तोमर" साठी मिळाला...

असो.. अवांतर जास्त झाले Wink

Pages