कोबी भात

Submitted by चेरी on 4 June, 2013 - 17:56

कोबी.. त्याच्या उग्र वासामुळे मला लहानपणी विशेष आवडत नसे.पण नंतर नंतर कोबीची भाजी, पचडी, पराठे आवडू लागले. अशीच कोबीची आणखी एक रेसिपी म्हणजे कोबी भात. ह्या भाताला खूप छान चव असते. कोबी फारसा न आवडणार्‍यांनाही कदाचित हा भात आवडेल.

साहित्य - चिरलेला कोबी ४ कप (बारीक चिरलेला नाही. साधारण चायनीज डीश/पदार्थ बनवताना आपण चिरतो तसा.), १ कप तांदूळ, १/८ कप मूगडाळ, २ टीस्पून धनेपूड, ४ टीस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून जिरं, चवीनुसार मीठ, १/४ कप भाजलेले/तळलेले शंगदाणे, ८-१० कढिलिंबाची पानं, चिमूटभर हिंग, २ टीस्पून बारीक चिरलेला लसूण, १ टीस्पून तिखट, १/४ टीस्पून हळद, २ टीस्पून लिम्बूरस, १/४ कप मटाराचे दाणे, १.५ ते २ कप पाणी, १ टीस्पून तूप

कृती:
१) तांदूळ, मूगडाळ धूवून निथळत ठेवा.
२) एका कुकरमध्ये तेल घेऊन त्यात जिरे-मोहरी, कढिपत्ता, हिंग घालून फोडणी करा.
३) त्यात लसूण घालून परता. मग हळद, चिरलेला कोबी, मटार घालून परता. मग डाळ-तांदूळ घालून परता.
४) आता त्यात तिखट, मीठ, धनेपूड, लिंबू ज्यूस घाला. आवडत असल्यास १ चमचा तूप घाला आणि परता.
५) त्यात दीड ते दोन कप पाणी घाला. परत एकदा चवीनुसार तिखट, मीठ, लिंबू घालून कुकरला झाकण लावून ३ शिट्ट्या करा.
६) गरमा-गरम कोबीभातावर शेंगदाणे घालून खा.

Kobi bhat.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, लोला, दक्षिणा, दूर्गा, यशस्विनी, दिनेशदा
सर्वांचे अनेक आभार Happy

@ लोला,
'कोबीचे उबजे' ह्याबद्दल मला काही माहिती नाही. हे नाव मी पहिल्यांदच ऐकले.

पहिल्यानेच वाचले. करुन पाहेन.. कोकणी पद्धतीचं भानोळं नावाचं बेसनाधारित थालिपीठ माहितीय कोबीचं भाजीव्यतिरिक्त.

छानच. या रेसिपीमध्ये फक्त कोबी वगळला तर जी कृती असेल तशा प्रकारे आम्ही खिचडी करतो. कोबीऐवजी बर्‍याचदा लाल भोपळा टाकतो. त्यामुळे मी आज जरी 'कोबी भात' केला तरी पोरांसकट सगळे कोबीची खिचडी म्हणून खातील. Happy

कोबी म्हणजे पत्ताकोबी का, कि फुलकोबी? मी फूलकोबी घालुन करते.. मसाले भातासारखा. आता असा करुन बघेन.