आमच्यापण भाजूक तुकड्या

Submitted by दिनेश. on 3 June, 2013 - 09:20

सर्वात आधी सगळ्यांनी दिवे घ्या बरं !

तर काही मायबोलीकरणी आमचा अगदी अंत बघतात. आता मी जागू, अवल असे कुणाचेही नाव न घेता, "काही" असा शब्द वापरलाय. त्यामूळे नावे घेतली नाहीत तरी चाणाक्ष मायबोलीकरांना ती ओळखता आली असतीच.
सॉरी, जरा डुप्लिकेशन झाले. मायबोलीकर चाणाक्ष असतातच, त्यामूळे वेगळे लिहायची गरज नव्हती.

आता जे मायबोलीकर चाणाक्ष नाहीत, त्यांनी आपल्या सदस्यत्वाबाबत गांभीर्याने विचार करावा हे बरं.

तर त्या आमचा अंत बघतात म्हणजे काय करतात, तर इथे भाजूक तुकड्या वगैरे काही(बाही) लिहितात.
असा विचार करत नाहीत, आम्हाला का मन नसतं, आम्हाला का असे काही खावेसे वाटत नाही.. ( हि शैली
साने गुरुजींची आहे निळू फुले यांची नाही, हे पण चा.मो. नी ओळखले असेलच. तरी आजकाल आम्ही सगळ्या
माहितीचा सोर्स सांगत असतो.)

पण आम्ही काही साने गुर्जी नाही आहोत, आम्ही पण भाजुक तुकड्या करु शकतो, आणि इथे टिच्चून डकवू
शकतो.

आणि याची कृती पण लिहू शकतो (बरं. )

तर अशा तुकड्या करुन घेतल्यावर वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. म्हणजे कधी हळद + वाटलेला लसूण + मीठ असे वाटण लावायचे आणि मग वरुन मिरपूड शिवरायची. किंवा याच मिश्रणात लाल तिखट मिसळायचे.

नाहीतर हिरवे वाट्ण आहेच. हिरवे वाटण म्हणजे, एवढी बरी कोथिंबीर + बोटभर आले + उगीच थोडासा पुदीना + सोसतील एवढ्या मिरच्या आणि नावाला लसूण असे एकत्र वाटायचे. आणि त्या वाटणात मीठ घालून
तुकड्या जरावेळ मुरु द्यायच्या. आणि मग शॅलो फ्राय करायच्या.

या इतक्या मस्त लागतात ना कि "त्यांना" पण मोह आवरत नाही. पण असे एकदम "तोपासु" असे शेरे मारू
नका. न चाखताच असे शेरे लिहिलेत तर (पुण्यातील) जागतिक चित्रपट + नाटक + सकल कला निर्माता
संघाच्या अध्यक्षांतर्फे तूमचा (वारंवार) जाहीर उद्धार सॉरी सत्कार केला जाईल. ( आम्ही गूगल क्रोम वापरत
असल्याने ब्याक्स्पेस चालत नाही, म्हणून वारंवार सॉरी म्ह्णावे लागतेय. चा.मो. ते जाणतातच.)

असा उद्धार सॉरी सत्कार ( कॉपी पेस्ट केलेय, कठीण शब्द क्रोमात टायपता येत नाहीत. ) न चाखताच वाखाणणारी, तू तिसरी असे सन्मानपत्र दिले जाईल. मी तिसरी तर पहिल्या दोन कोण, असा कालवा करु नका.

कारण तिसरी आणि कालवा, हि दोन्ही माश्यांची नावे आहेत. पण याची खात्री करण्यासाठी मंगळवेढ्यांच्या
मायबोलीकरांना विचारू नका, कारण ते तिसर्‍या म्हणजेच कालवं म्हणजेच शिनोणे असे खात्रीपुर्वक सांगतील,
कारण त्यांच्या गूगलवर तसेच दिसते.

अर्र् . तुकड्या कसल्या त्या लिहायचे राहिलेच.

डिशमधे वरच्या अंगाला पाण्याचा एक थेंब आहे, तो मुद्दामच ठेवला आहे, कारण मग बशीत चर्चा कसली करणार ? कपात करुन चालणार नाही.

तर असे काही करुन बघितल्यावर, आणि अशी डिश समोर ठेवल्यावर, शाकाहारी बायको आहे हेच विसराल.

आताच मुशोंनी सांगितले कि "शाकाहारी बायको आहे हेच विसराल" असे लिहिणे चूकच आहे. त्या ऐवजी
" बायको शाकाहारी आहे हेच विसराल" असे पाहिजे. यात नेमका काय फरक आहे ते आम्हाला न कळल्याने,
हवा तो पर्याय निवडावा.

आता हे मी असे का लिहिलेय, याचे कारण अवल आणि जागू, (अ‍ॅडमिन) काका आम्हाला वाचवा, असा टाहो
फोडणार नाहीत. फारतर " बघ ना कसा हा दादा, मला चिडवायचं, हाच याचा धंदा" असे गाणे म्हणतील.

पण त्याची फिकिर करु नये, फारतर स्वतःला दादासाहेब म्हणवून घ्यावे, कसं ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, शाब्बास! Happy

अरे ..........हे काय पहातेय मी? दिनेशदा आणि मासे? वाचत वाचत फोटोपर्यंत आले आणि वाटलं शाकाहारी दिनेशदा आता अगदी जागू, अवल इ.इ. लोकांना खुन्नस देण्यासाठीच मासे बिसे पण करायला लागले बहुतेक!
असा विचार करत करत केळ्याचा फोटो पाहिल्यावर उलगडा झाला!>>>>>>>>>>>अगदी अगदी, मानुषी माझं हेच झाले. Happy

हायला, मराठी बोलायला लागल्या की काय??????? स्मित दिवा घ्या>>>>>>>.साधना Lol

नीर फणसाच्या पण अश्या तुकड्या करता येतील. मी साध्या रवा-तिखट-मीठ अश्या मिश्रणात घोळवलेल्या खाल्ल्या/ केल्या आहेत. आता परत कधी मिळाला नीर फणस तर हे मसाले लावून बघेन.

Pages