आमच्यापण भाजूक तुकड्या

Submitted by दिनेश. on 3 June, 2013 - 09:20

सर्वात आधी सगळ्यांनी दिवे घ्या बरं !

तर काही मायबोलीकरणी आमचा अगदी अंत बघतात. आता मी जागू, अवल असे कुणाचेही नाव न घेता, "काही" असा शब्द वापरलाय. त्यामूळे नावे घेतली नाहीत तरी चाणाक्ष मायबोलीकरांना ती ओळखता आली असतीच.
सॉरी, जरा डुप्लिकेशन झाले. मायबोलीकर चाणाक्ष असतातच, त्यामूळे वेगळे लिहायची गरज नव्हती.

आता जे मायबोलीकर चाणाक्ष नाहीत, त्यांनी आपल्या सदस्यत्वाबाबत गांभीर्याने विचार करावा हे बरं.

तर त्या आमचा अंत बघतात म्हणजे काय करतात, तर इथे भाजूक तुकड्या वगैरे काही(बाही) लिहितात.
असा विचार करत नाहीत, आम्हाला का मन नसतं, आम्हाला का असे काही खावेसे वाटत नाही.. ( हि शैली
साने गुरुजींची आहे निळू फुले यांची नाही, हे पण चा.मो. नी ओळखले असेलच. तरी आजकाल आम्ही सगळ्या
माहितीचा सोर्स सांगत असतो.)

पण आम्ही काही साने गुर्जी नाही आहोत, आम्ही पण भाजुक तुकड्या करु शकतो, आणि इथे टिच्चून डकवू
शकतो.

आणि याची कृती पण लिहू शकतो (बरं. )

तर अशा तुकड्या करुन घेतल्यावर वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. म्हणजे कधी हळद + वाटलेला लसूण + मीठ असे वाटण लावायचे आणि मग वरुन मिरपूड शिवरायची. किंवा याच मिश्रणात लाल तिखट मिसळायचे.

नाहीतर हिरवे वाट्ण आहेच. हिरवे वाटण म्हणजे, एवढी बरी कोथिंबीर + बोटभर आले + उगीच थोडासा पुदीना + सोसतील एवढ्या मिरच्या आणि नावाला लसूण असे एकत्र वाटायचे. आणि त्या वाटणात मीठ घालून
तुकड्या जरावेळ मुरु द्यायच्या. आणि मग शॅलो फ्राय करायच्या.

या इतक्या मस्त लागतात ना कि "त्यांना" पण मोह आवरत नाही. पण असे एकदम "तोपासु" असे शेरे मारू
नका. न चाखताच असे शेरे लिहिलेत तर (पुण्यातील) जागतिक चित्रपट + नाटक + सकल कला निर्माता
संघाच्या अध्यक्षांतर्फे तूमचा (वारंवार) जाहीर उद्धार सॉरी सत्कार केला जाईल. ( आम्ही गूगल क्रोम वापरत
असल्याने ब्याक्स्पेस चालत नाही, म्हणून वारंवार सॉरी म्ह्णावे लागतेय. चा.मो. ते जाणतातच.)

असा उद्धार सॉरी सत्कार ( कॉपी पेस्ट केलेय, कठीण शब्द क्रोमात टायपता येत नाहीत. ) न चाखताच वाखाणणारी, तू तिसरी असे सन्मानपत्र दिले जाईल. मी तिसरी तर पहिल्या दोन कोण, असा कालवा करु नका.

कारण तिसरी आणि कालवा, हि दोन्ही माश्यांची नावे आहेत. पण याची खात्री करण्यासाठी मंगळवेढ्यांच्या
मायबोलीकरांना विचारू नका, कारण ते तिसर्‍या म्हणजेच कालवं म्हणजेच शिनोणे असे खात्रीपुर्वक सांगतील,
कारण त्यांच्या गूगलवर तसेच दिसते.

अर्र् . तुकड्या कसल्या त्या लिहायचे राहिलेच.

डिशमधे वरच्या अंगाला पाण्याचा एक थेंब आहे, तो मुद्दामच ठेवला आहे, कारण मग बशीत चर्चा कसली करणार ? कपात करुन चालणार नाही.

तर असे काही करुन बघितल्यावर, आणि अशी डिश समोर ठेवल्यावर, शाकाहारी बायको आहे हेच विसराल.

आताच मुशोंनी सांगितले कि "शाकाहारी बायको आहे हेच विसराल" असे लिहिणे चूकच आहे. त्या ऐवजी
" बायको शाकाहारी आहे हेच विसराल" असे पाहिजे. यात नेमका काय फरक आहे ते आम्हाला न कळल्याने,
हवा तो पर्याय निवडावा.

आता हे मी असे का लिहिलेय, याचे कारण अवल आणि जागू, (अ‍ॅडमिन) काका आम्हाला वाचवा, असा टाहो
फोडणार नाहीत. फारतर " बघ ना कसा हा दादा, मला चिडवायचं, हाच याचा धंदा" असे गाणे म्हणतील.

पण त्याची फिकिर करु नये, फारतर स्वतःला दादासाहेब म्हणवून घ्यावे, कसं ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा दिनेशदा! पहिल्या फोटोवरुन समजलं नव्हतं काय असेल ते!!
बाकी तुम्ही अगदी कडवी टक्कर दिलीत!! आम्हा शाकाहारींच्या बाजुने दिनेशदा लढतील. होउन जौद्या आता. Wink Proud

लोला,
ते घरचे चिली सॉस आहे. नव्या हिरव्या मिरच्या आणल्यावर आधीच्या मिरच्या तेलात परतून. मीठ आणि व्हीनीगर घालून वाटायच्या. तसेच गार्लिक प्रेस मधून लसूण काढून त्यावर तिखट टाकून वर गरम तेल ओतायचे, हा झाला गार्लिक सॉस. असे दोन सॉस आहेत ते.

.. दक्षे... हौस म्हणूनच हे सगळे !

आर्या, नक्की नक्की.. आता माघार नाहीच..

शाकाहारी तंदूरी चिकन पण करून दाखवेनच.

अरे ..........हे काय पहातेय मी? दिनेशदा आणि मासे? वाचत वाचत फोटोपर्यंत आले आणि वाटलं शाकाहारी दिनेशदा आता अगदी जागू, अवल इ.इ. लोकांना खुन्नस देण्यासाठीच मासे बिसे पण करायला लागले बहुतेक!
असा विचार करत करत केळ्याचा फोटो पाहिल्यावर उलगडा झाला!
मस्त!

असे केळ्याचे काप आमच्याकडे बहुतेकदा बनवले जातात. लिंबू, मीठ आणी तिखट एवढंच मिश्रण देखील बास होतं. शिवाय सेल्वी त्यामधे अगदी इवलूसा म्हणत सांबार नाहीतर रसम मसाला घालते. नसेल घातला तर वरून चाट मसाला घ्यायचा. कच्ची केळी ही हल्ली आमच्या स्टेपल डायेटचा भाग बनली आहेत. पहाटे पहाटे सहा सव्वासहाला बायका दारोदार विकत असतात तेव्हा ही केळी (आणि अन्य भाज्यादेखील) इतकी फ्रेश असतात की बास.

हो नंदिनी,
गोव्यापासून दक्षिणेकडे अशी मोठी केळी आवडीने खाल्ली जातात. महाराष्ट्रातच फार खप नाही त्यांचा.
बाजारातही क्वचितच दिसतात. आणि तीसुद्धा लहानच असतात. साली काढल्यावर आत फार गरच नसतो.

झकोबा, वांगी मऊ पडतात त्या मानाने केळी मऊ पडत नाहीत.

दा, Rofl Rofl

फ्रेश भाज्या मिळायला नशिबच लागतं.>>> माझ्या पोस्टमधे भाजीवाले किती वाजता येतात ते वाच परत एकदा. तितक्या वाजता उठून मला दरवाजा उघडून कोण भाजीवाला काय विकतोय ते लक्ष ठेवून ऐकावं लागतं आणी तो/ती सायकलवरून पुढे जायच्या आत बोलवावं लागतं. Proud सुरूवातीच्या तमिळ अजिबात येत नसणार्‍या दिवसांत "विहीरीतून बादली काढून देनार" असं तमिळमधे ओरडणार्‍ञा माणसाला मी आपलं "येन अद?" अशी हाक मारल्याने तो आपला "काय बुडालंय विहीरीमधे?" म्हणत पुढच्या अंगणातून सरळ मागच्या अंगणात आणि मी "व्हेजीटेबल्स आं??" असं विचारत त्याच्या मागे. शेवटी विहीरीत काहीही पडलेलं नाही आणि मी चुकून हाक मारली हे बघून त्याचं तोंड एवढंसं झालं. सकाळची बोहनीची वेळ त्याची. शेवटी एक कप चहा आणि थोडे पैसे दिले बिचार्‍याला.

आता मात्र बहुतेक भाजीवाल्यांना सवय झाली. दारामधे उभं राहून आठवणीने "भाजी हवी का?" विचारतात.. त्यातही कच्ची केळी, वांगी, भेंडी, दोडका, अंबाडी, माठ असल्या पालेभाज्या असतील तर मी हमखास घेते म्हणून मी दार उघडेपर्यंत थांबतातपण. Happy

आता मात्र बहुतेक भाजीवाल्यांना सवय झाली. दारामधे उभं राहून आठवणीने "भाजी हवी का?" विचारतात..

हायला, मराठी बोलायला लागल्या की काय??????? Happy Light 1

शप्पथ !!!!!!!!!!! कसल्या भारी दिसताहेत !
दिनेश दा, कट्टी तुमच्याशी Wink आम्हाला अशी शाकाहारी टक्कर Proud
:आता काय टाकावे बरे ? या विचारात हरवलेली बाहुली :

दिनेशदा शाकाहारी तंदूरी चिकनची वाट बघत आहे, येऊद्या रेसिपी. >>

चिकन स्वतः शाकाहारीच असतं. Happy

दा धन्य आहे __/|\__ खतरनाक लिहीलय पुन्हा एकदा नाव चेक केल डुआडी नाही ना Lol
जबराटच दिसतेय रेसिपी.
क्र.३ आणि ४ कोण म्हणेल हे म्हावर नाही.
शा तं चि साठी शुभेच्छा Happy

चिकन स्वतः शाकाहारीच असतं.
<<
गलत + गल्लत.
किडे, आळ्या शाकाहारात कधीपासून समाविष्ट झाल्या?

kiranyake | चिकन स्वतः शाकाहारीच असतं. यावरचं उत्तर आहे हो ते!

किडे, आळ्या शाकाहारात कधीपासून समाविष्ट झाल्या? >>>

अरेच्चा, म्हणजे चिकणे लोक आपोआप चायनीज डिशेस खातात तर Wink

हि खरी घडलेली गंमत आहे. टाटा ऑईल मिल मधे अ‍ॅनिमल फीड आणि चिकन फीड तयार होत असे. चिकन फीड मधे बोनमील वगैरे असे. त्या काळच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला, अ‍ॅनिलम फीड म्हणून चुकून चिकन फीड ( लेयर्स मेश ) पाठवण्यात आले....

पुढे तिच्या घरच्या गायींनी ते खाल्ले कि नाही आणि मग त्यांच्या दूधाचे काय.. अशी चर्चा बरेच दिवस रंगली होती.

Pages