बटाट्याची खरपूस भाजी

Submitted by तृप्ती आवटी on 7 May, 2013 - 22:29
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मोठे बटाटे, एक मोठा टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, १ टे स्पु धणे, १ टी स्पु जिरे, १/२ टी स्पु मेथ्या, १/२ टी स्पु आमचूर पावडर, तिखट, गरम मसाला, साखर, मीठ, फोडणीसाठी- तेल, हिंग, हळद.

क्रमवार पाककृती: 

बटाटे उकडून सालं काढून बारीक फोडी कराव्यात. टोमॅटोच्या पण बारीक फोडी कराव्यात. कोथिंबीर चिरून घ्यावी. धणे, जिरे आणि मेथ्या भरड वाटून घ्याव्यात. त्यात चवीप्रमाणे गरम मसाला, तिखट घालून नीट मिसळून घ्यावे. फोडणीसाठी जरा सढळ हाताने तेल गरम करून त्यात हिंग, हळद घालून धणे-जिरे इ.चे मिश्रण घालावे आणि भरभर हालवावे. सगळा मसाला नीट पोळला पाहिजे पण जळाला नाही पाहिजे. त्यात लगेच बटाट्याच्या फोडी, टोमॅटो, कोथिंबीर घालावे. न हालवता जरा वेळ तसेच राहू दिले की मसाला आणि बटाटे छान खरपूस होतात. मीठ, छोटा चमचाभर साखर आणि आमचूर पावडर घालून भाजी नीट हालवून घ्यावी. आंच जरा जास्त ठेवून मस्त खरपूस करावी. टोमॅटोचा रस आटून जातो शेवटी. जरा जाड पुर्‍यांसोबत मस्त लागते ही भाजी.

p4.JPG

वाढणी/प्रमाण: 
दोन मोठी माणसं
अधिक टिपा: 

ही एका मैत्रिणीने दिलेली रेसिपी आहे. मैत्रीण राजस्थानी आहे. पण ही काही पारंपरिक रेसिपी आहे की नाही हे माहिती नाही. तिच्याकडे गेलं की ही भाजी आणि पुडी असा बेत नाश्त्याला असतो.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. माझी फेवरिट आहे. त्यात इंडक्षन कुकर वर आपल्याला फ्लॅट सरफेस खूप मिळतो व सर्व बटाट्याच्या फोडी मस्त खरपूस करून घेता येतात. पुरी तळायला वेळ नसल्यास बाँबे पाव झिंदाबाद.

मस्तच आहे. परंतु फार काळजी घ्यायला पाहिजे असे वाटत आहे नाहीतर `ख' चा `क' व्हायला वेळ लागणार नाही. खरपूस होण्यासाठी नॉन स्टिक भांड्यातच केली पाहिजे ही पा.कॄ.

फोटो छान वाटतोय. आज डब्यात पण उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे, पण खरपुस नाही Happy
करुन पाहायला हवी आता खरपुस भाजी.

सापाला ऐकू येत नाही असं म्हणतात. त्याला जमिनीतली व्हायब्रेशन्स जाणवतात असं एकाने सांगितलं. मग उंच बिल्डींगच्या गच्चीवर किंवा झाडावरच्या घरट्यातली पक्षांची पिल्ल कशी काय खातो तो ?

सोपी आणि खूप मस्त चवीची भाजी आहे ही. आमरसाबरोबर खरंच मस्त वाटेल मेनुत. ही भाजी, आमरस आणि पुर्‍या. वा वा Happy

फोटो ताणला गेला आहे का ? >>> Happy फोटोला काय झालं कळालं नाही. फोनवर ताणलेला दिसतोय. पण डेस्कटॉपवर नीट दिसतोय.

यम्मी वाटतेय एकदम, मी पण आमरसाबरोबर करणार म्हणतेय .. आधीच एवढ्या कॅलरीज अन कार्ब्स म्हटल्यावर वर पुन्हा पुर्‍या करायला हिंमतच लागेल पण Happy

अहा.... मोह होतोय बटाटे आणायचा. बरं आणते. Happy ...
धणे-जीरे-मेथ्या न भाजताच भरड वाटायचे ना?

हो.

मी आत्ता केली, फुलक्यांसोबत खायला मस्त लागली. धणे-जिरे-मेथ्यांचा फ्लेवर छान आला. महत्वाचं म्हणजे करायला अजिबातच वेळ लागत नाही.

आयपॅडवर फोटो स्ट्रेच्ड् दिसला .. आता तसा दिसत नाही ..

धने-जीरे-मेथी भाजून वाटले तर स्वाद आणखी चांगला येईल काय? माझ्या जित्याची खोड स्पेशल प्रमाणे तसं व्हेरीयेशन करून बघायची इच्छा होते आहे .. Wink

Pages