'घर दोघांचं'

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2013 - 23:17

ghar doghaanche2_0.jpg

चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या प्रसिद्ध संग्रहात एक चारोळी आहे.
'घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुसर्‍याने आवरायचं
'
एक आणि दुसरा आलटून पालटून पसरवणं-आवरणं करत असतील तर खरंच त्यात रेखाटलेलं सहजीवनाचं चित्र रम्य आहे. गोखल्यांच्या प्रत्येक चारोळीबरोबर अनेक प्रति-चारोळ्या येतातच. ही चारोळी वाचल्यावर वाटलं की प्रत्यक्षात मात्र ...
'घर दोघांचं असतं
त्यात दोघांनी वावरायचं
त्याने पसरवलं
तरी तिनेच आवरायचं
' असंच चित्र बहुतकरुन दिसतं.

शिक्षण आणि करियर-निवड आपल्या मनाप्रमाणे करणे आजच्या काळात मुलींसाठी तुलनेने सोपे झाले आहे. वयाच्या एका टप्प्यानंतर मात्र मुलीची वाट अजूनही वेगळी होते. त्यातही अधोरेखित करुन सांगायचे तर लग्नानंतर. करियर करायचे की होममेकर व्हायचे की नोकरी आणि ब्रेक आलटून-पालटून की आधीची नोकरी सोडून नवऱ्याबरोबर नवीन जागी स्वत:ला रुजवायची धडपड ... एक ना अनेक पर्याय ! ह्या पर्यायांबद्दल आक्षेप नाही. किंबहुना मुली अतिशय डोळसपणे ह्या पर्यायांना सामोरं जातात. पण पर्यायाची निवड केली की प्रश्न संपतात का ? तर तसे नाही. नाहीतर मग नोकरीत अत्यंत यशस्वी असणारी पण मुलांसाठी वेळ काढू शकत नाही ह्या गिल्टचं ओझं बाळगणारी किंवा घरासाठी खस्ता खाल्ल्या पण आपल्यासाठी वेळ काढायचा राहून गेला, छंद जोपासायचे राहूनच गेले असं म्हणून हळहळणारी किंवा पैसे कमावत असून आर्थिक स्वातंत्र्य नसणारी किंवा मल्टिटास्किंग करताना दमछाक होणारी स्त्री आजूबाजूला सतत का बरं दिसली असती ?

स्त्री नोकरी करत असो वा पूर्णवेळ गृहिणी असो, कुठलीही भूमिका निभावताना तिला ओढाताण न होता ती समाधानाने निभावता येणं, त्या भूमिकेचा काच न वाटणं हे साधायचं असेल तर तर तिच्या आजूबाजूच्या माणसांनी, विशेष करुन तिच्या जोडीदाराने सहजीवनातील आपली जबाबदारी ओळखणं आणि ती वाटून घेणं अतिशय आवश्यक आहे. जोडीदाराची साथ असेल तर बाकीचे अडथळे पार करणे सुकर होते हे नक्की !

आपापली स्वप्नं पूर्ण करत एकमेकांच्या साथीने वाट चालताना आणि 'घर दोघांचं' उभं करताना तिच्या जोडीदाराचा सहभाग आणि पाठिंबा किती आणि कसा असतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणं हा ह्या धाग्याचा उद्देश आहे.

ह्या धाग्यावर काय लिहिणे अपेक्षित आहे ? :

हा धागा पुरुषांसाठी आहे. 'मी अमूक अमूक करतो.' अशा प्रकारच्या पोस्ट्स अपेक्षित आहेत.

१.प्रापंचिक जबाबदारीचं ओझं फक्त बायकोच्या खांद्यावर पडू नये म्हणून तुम्ही काळजी घेता का ? घेत असल्यास कशा प्रकारे घेता ? कामांचं स्वरुप लिहू शकाल का ?
२.आपापल्या ध्येयांमागे धावताना नवरा-बायकोंची वर्तुळं छेदतात ती घर आणि घरातील इतर सदस्य, मुलं ह्यांच्यामुळे. ह्यांच्याशी संबंधित असलेली कामं तुम्ही कशाप्रकारे वाटून घेता ?
३.घरातल्या स्त्रीला तिच्या छंदांसाठी वेळ काढता येतो का ? तिला आपले छंद जोपासता यावेत म्हणून तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करता?
४.तुमची बायको नोकरी करणारी किंवा गृहिणी ह्यापैकी कुठल्याही भूमिकेत असेल तरी तिला फक्त स्वत:साठी असा थोडा तरी वेळ बाजूला काढण्याची संधी मिळते का ? ती संधी मिळावी म्हणून तुम्ही खास प्रयत्न करता का ? कोणते ?
५.दोघांपैकी एकाला तडजोड करण्याची वेळ येणं हे कधीकधी अपरिहार्य आणि स्वाभाविक असू शकतं. अशावेळी साकल्याने विचार करुन बायकोऐवजी निदान काही काळासाठी ती तडजोड तुम्ही केली असे कधी घडले आहे का ? असेल तर त्याविषयी सांगू शकाल का ? उदा. जागाबदल, कामाच्या स्वरुपात बदल, हाती आलेली संधी सोडणे, बॅकसीट घेणे किंवा पूर्णपणे घरी राहणे, मुलांसंबंधीचे निर्णय किंवा तत्सम तडजोडी.

सगळ्यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी असं नाही पण इतरांना उपयोगी ठरतील अशा गोष्टी आवर्जून शेअर करा. मात्र प्रश्नांची उत्तरं फक्त होकारार्थी किंवा नकारार्थी देऊ नये. उदाहरणे देऊन लिहावे.

आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत Happy
--------------------------
वरील चारोळी वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनातर्फे श्री. चंद्रशेखर गोखले यांचे मनःपूर्वक आभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकुण, मला तरी, फार उपयुक्त धागा वाटत नसला तरी महिला दिनाच्या निमित्ताने सुयोग्य मात्र वाटत आहे. >> ह्म्म, मला नेमक उलट वाटल - हा धागा फार उपयुक्त असला तरी महिला दिनाच्या निमित्ताने अयोग्य आहे. इथे अनेक पुरुषांनी त्यांनी घरात कसे contribution दिले हे लिहिले आहे. मला वाटते ते महत्त्वाचे. त्यामुळे त्यांच्या बायकोला काय काय करणे साध्य झाले ते गौण. एखाद्या पुरुषाने घरतील थोडेफार/सर्व पहिले, त्याला आत्मिक समाधान मिळाले हेच मुळात पुरुषांनी पुरुषांना सांगणे खूप खूप मोठे आहे.

वैद्यबुवा, खूप छान आणि प्रामाणिक पोस्ट.

योग, बेफिकिर तुमच्याही पोस्ट्स खूप आवडल्या.

माय वाईफ इज द बॉस! आणि हे मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने सांगतो. एकतर घरकामाच्या बाबतीत मी अतिभयंकर सांगकाम्या आहे. आणि या सगळ्यात पुरुषी अहंकार वगैरे अजिबातच नाही. मला या सगळ्याची उमज नाही आणि उरकही नाही हाच प्रॉब्लेम आहे. मी या मुद्द्यावरुन माझ्या आईच्याही प्रचंड शिव्या खाल्ल्या आहेत. तरी लग्नानंतर बरीच सुधारणा आहे असे आईचे मत आहे! बायकोने मला वळण लावले हेच खरे. स्वयंपाकाशी निगडीत छोटी-मोठी कामे, मुलाचे आवरणे आणि थोडक्यात म्हणजे जे ती सांगेल ते कमीतकमी घोळ घालून करणे एवढेतरी मी करतोच. भांडी घासणे हे माझे सर्वात आवडते काम आहे.
आर्थिक मुद्द्यांबाबत सर्वच्या सर्व निर्णय बायकोच घेते. फक्त शेअर्सच्या बाबतीत मी तिचा सल्लागार आहे.
ती नसताना मी मुलाला उत्तमरित्या सांभाळू शकतो त्यामुळे कामाच्या वा इतर कोणत्याही निमित्ताने ती निर्धास्तपणे बाहेर जाउ शकते.
मुळात आम्ही दोघेही अत्यंत स्वतंत्र मनोवृत्तीच्या व्यक्ती आहोत त्यामुळे मी काहीतरी करुन तिच्यासाठी वेळ काढणे हा मुद्दा मला जरा गोंधळात पाडणारा आहे. असं वेगळं काही करावं लागतं असं मला वाटत नाही कारण तिला जो वेळ स्वतःसाठी हवा असतो तो ती घेतेच, तो 'देणारा' मी कोण?
करिअरमधे तडजोडीची वेळ अजूनतरी आलेली नाही पण येईल तेंव्हा फार अडचण येईल असे वाट्त नाही. आमचे परस्पराकलन आणि संवाद अत्युत्तम असल्याने अनेकदा आम्ही एकच विचार करीत असतो. पुढच्या महिन्यापासून बढती मिळून ती कामाच्या ठिकाणीही माझ्यापेक्षा वरच्या जागेवर जाईल आणि मला त्याचाही प्रचंड आनंद आणि अभिमान आहे.

गोखल्यांची चारोळी मला फारशी आवडत नाही. म्हणजे यमक, गेयता नि सुटसुटीत पणा वगैरे म्हणून ठिक आहे पण त्यातला आशय, विशेषतः शेवटच्या ओळीतला मला नेहमी खटकतो. दोघांचे घर म्हणून एकाचा मेस नेस्तरायची जबाबदारी दुसर्‍याच्या शिरावर ठेवून दिली आहे. ती जबाबदारी दोघांचीही असायला हवी. मेस होणे स्वाभाविक आले तरी तो एकत्र साफ करणे हाच खरा 'दोघांच्या घरा'चा अर्थ.

आमच्या घरात आम्ही नकळतच आपापली कामे वाटून घेतली. आमच्या दोघांच्याही घरात आई वडलांनी कामात कधीच 'हे पुरुषांचे नि हे बाईचे' असा भेदभाव न केल्याने आमच्यात तसे न होणे साहजिक होते. पण त्यातहि 'आपण अमके काम जास्त नीट करू शकतो' हे लक्षात आल्यावर एकाने बॅकसीट घेऊन दुसर्‍याला ते करू देणे स्वाभाविकपणे झाले. ह्यात घरकामापासून बाहेर ग्रोसरी, मुलीची जबाबदारी, पाहुणे रावळे, आर्थिक बाबी सगळ्याच आल्या. अगदीच म्हणायचे तर आम्ही आमच्या कामांबाबत possessive झालो होतो. एखाद्या वेळी एकाने दुसर्‍याचे काम करताना दुसरा जसे करेल तसेच करावी अशी अपेक्षा वाढली होती. Happy After a while we sorted it out.

अर्थात बहुतेक सामायिक निर्णय सामायिकच असतात पण जर दोघातील एकाचा एखाद्या बाबतीमधे strong preference असेल तर निर्णयावर veto सहजमान्यपणे झालेला आहे. त्यामूळे तडजोड अशी एकमेकांसाठी करायची वेळ आली नाही. आपल्यासाठी लागणारा वेळ आम्ही आपापला घेतो, द्सरा सहजपणे तेंव्हाचा slack भरून काढतो. दुसरा ह्याचा गैर फायदा घेणार नाही ह्याचा विश्वास नि अशा गोष्टींचा count ठेवू नये हे डोक्यात पक्के बसले असल्यामूळे ह्यातून कधी खटके उडालेले नाहित.

सगळ्यांची पोस्ट्स छान आणि विचार करायला लावणारी आहेत ..

बेफिकीर अत्यंत प्रामाणिक आणि छान पोस्ट ..
>>> +१

आगाऊ मस्त पोस्ट!

देणारा मी कोण?
हे सही आहे.

असामी पोस्ट आवडली.
तुम्ही समंजस आहात म्हणून ज्याला जी कामे जमतील ती वाटून घेतलीत.
बाकीचे 'हे तुलाच जमते तर तूच कर' असे म्हणून कामे एखाद्याच्या गळ्यात मारतात किंवा 'तुला हे अज्जिबात जमत्/कळत नाही' असे म्हणून सगळं आपल्या गळ्यात घालून घेतात.;)

आगावा मस्त पोस्ट!
देणारा मी कोण? हे करेक्टेय!

बाकीचे 'हे तुलाच जमते तर तूच कर' असे म्हणून कामे एखाद्याच्या गळ्यात मारतात किंवा 'तुला हे अज्जिबात जमत्/कळत नाही' असे म्हणून सगळं आपल्या गळ्यात घालून घेतात <<<
किंवा एखादे काम इतके वाईट आणि चुकीचे करायचे, घोळ घालायचा आणि मग "बघ हे तुलाच जास्त चांगलं जमतं माझ्यापेक्षा!" म्हणून बायकोच्या गळ्यात घालायचे.. Wink

दोघांचे घर म्हणून एकाचा मेस नेस्तरायची जबाबदारी दुसर्‍याच्या शिरावर ठेवून दिली आहे. ती जबाबदारी दोघांचीही असायला हवी. मेस होणे स्वाभाविक आले तरी तो एकत्र साफ करणे हाच खरा 'दोघांच्या घरा'चा अर्थ. >>> हे विशेष पटलं असाम्या!

वैद्यबुवा, फार छान लिहिले आहे. या मुद्द्यावर 'असं काहीतरी वाचायला मिळावं' अशी माझी वैयक्तिक अपेक्षा होती, ती तुमच्या पोस्टीने पूर्ण झाली. तुम्ही खूप छान, मुद्देसुद आणि प्रामाणिकपणे लिहिले आहे. आणि तुमच्या सौंनी तुम्हाला मुद्दाम लिहायला सांगितलेले विचारही आवडले.

आगाऊ, मस्त लिहिलं आहेस. तुझ्यासारखी काहीशी परिस्थिती आमच्या नवरोबांची आहे. काही तपशील वेगळे असतील. आमच्या घरी 'अमुक कामे मुलींचीच' अश्या विचारांचा भयंकर घट्ट पगडा. आता बर्‍याच बाबतीत आम्ही एकमेकांना सहजपणे रीप्लेस करू शकतो, पण काही कामे त्यालाच चांगली जमतात आणि ती त्यानेच करावी आणि मी उत्तमपणे करू शकणार्‍या कामांमधे त्याने लुडबुड करून त्यांची वाट लावायची नाही अश्या परस्पर समजुतीने आम्ही घराची कामे करतो. Wink

तो 'देणारा' मी कोण?>>> Happy याबद्दल तुला १०० पैकी १०० मार्क!
ही उमज खूपच थोड्या जणांना असते. बर्‍याच, अगदी बर्‍याच पुरुषांचा असा टोन असतो की लग्नानंतर बायकोला अमुक एक (उदा. गाणं/ ब्युटीपार्लरचा कोर्स/ उद्योगधंदा/ ट्युशन/ लायब्ररी इत्यादी इत्यादी) करायचं होतं आणि ते मी तिला करू दिलं.
कुठलीच बाई असं म्हणत नाही की माझ्या नवर्‍याला (उदा.) तबल्याचा क्लास लावायचा होता, तो मी त्याला लावू दिला.

असामी, (चारोळीबद्दल) एक्झॅक्टली! पहिला परीच्छेद वाचून तर 'अगदी, अगदी' असं झालं.

माझ्या घरात माझे मित्र आले तरी बायकोच चहा बनवते.... तिच्या मत्रींनी आल्या तरी तिच चहा बनवते.... खरं तर स्वयंपाक घरातली सगळी कामं करणं हे तिचं काम आहे असे ती मानते........ कधी मला संधी मिळते.. जेव्हा तिचं स्वयंपाक करणं जिवावर येतं.... ती माहेरी जाते.... तेव्हा ती करत असलेली सगळेच कामं मी ही करतो.... मुलाला आंघोळ घालणे, झाडु मारणे, चहा करणे,....... मी कधीतर स्वयंपाक केला की ती नक्कीच चार जणींना सांगते.........

कुठलीच बाई असं म्हणत नाही की माझ्या नवर्‍याला तबल्याचा क्लास लावायचा होता, तो मी त्याला लावू दिला.<<<

खरे तर हा धागा भरकटता भरकटता ट्रॅकवर आलेला आहे. या धाग्याचा मूड असाच जपला जावा असे आपले मनात येत आहे. वरीलसारखी भावनिक विधाने जरा जपून केली जावीत असेही वाटते. स्त्रिया आपल्या नवर्‍याने काय करावे व काय करू नये याबाबत हल्ली अत्यंत जागरूक असलेल्या दिसतात, आग्रही असतात, त्याने त्याचे (त्या त्या स्त्रीला न आवडणारे) छंद जोपासावेत की नाही, किती वेळ त्यात घालवावा याबाबत त्यांची मते ठामपणे मांडताना दिसतात. त्यावरून वादही होऊ शकत असतात. (हे छंद म्हणजे फक्त ड्रिंक्स वगैरे म्हणायचे नाही, अगदी तबला असला तरीही स्त्री असे म्हणू शकते की तुझ्या तबल्याच्या क्लासचे कोणतेही टायमिंग नेमका आपला संसाराचाच वेळ कंझ्यूम करत आहे). तेव्हा असे जनरलायझेशन भावनिकतेच्या आधारे करणे गैर आहे असे मला वाटते.

पुन्हा एकदा - अगदी तळागाळातील किंवा सांख्यिकीदृष्ट्या अमुक अमुक टक्के असलेल्या शोषित स्त्रिया अथवा स्त्रियांना गृहीतच धरणारा वर्ग सोडल्यास एक संख्येने मोठा वर्गही असाही अस्तित्वात आलेलाच आहे जो स्त्रीला भरपूर स्वातंत्र्य देणे हे मुळातच करत आहे व त्यात काही विशेष श्रेयही स्वतःकडे घेत नाही. तेव्हा 'स्त्री म्हणजे बिच्चारी' या दिशेने उगीचच प्रतिसाद जाऊ नयेत इतकेच व्यक्त करतो. महिला दिन साजरीकरणाचे प्रमुख कारण स्त्रीला 'बिच्चारी पदावरून' 'ही पण कुणीतरी आहे' या पदावर बढती मिळणे हे एकमेव नसावे.

धन्यवाद

खुप सुन्दर .तुम्ही घरातुन कम करता.मलाही असे घरातुन काम करायचे आहे .मला मदत कराल का? मी ईलेcत्रिcअल इन्जिनीर आहे.

मस्त धागा!!! आजच वाचला

आगाउ... मस्त पोस्ट

विकु.... छान लिहिलं आहे. सौं ना शुभेच्छा !!!! मुंबई / ठाण्यात प्रदर्शन वगैरे असेल तर कळवा !!!!

मुक्तेश्वर कुल.... अगदी प्रामाणिक प्रतिक्रिया....

वैद्यांची पोस्ट एकदम मस्त...

बेफि: कित्ती मोठ्ठी पोस्ट ती !!!! वाचताना दमले. पण खुप प्रामाणिक. फार डिटेल्स मधे लिहिल्या सारखी नाही वाटत? खुप जास्त तपशीलात लिहिलत... तपशीलांपेक्षा भावना आणि विचार महत्वाचे... ( रागाउ नका पण तुमच्या आधीच्या एका लेखाशी ह्या पोस्ट मधले तपशील contradict करतात!!! आर्थात हे मा.वै.म. )

एकंदर विषय छान... पण आपलं उगाचच वाटलं की कोण काय करतय किंवा कोण काय नाही करत पेक्षा, त्या जोडिदाराच्या अपेक्षा आपण कितपत पुर्ण करतोय हे जास्त महत्वाचं... आणि आयुष्यात अशी फक्त बायकांनी करायची वा फक्त पुरुषांनी करायची अशी exact identified कामं नसतातच.... ज्याला जे योग्य वाटतं तो वाटा तो तो माणुस उचलत असतो.

समाजाचा एक वर्ग जो दुर्दैवाने खुप मोठा आहे, तिकडे मात्र अशा तर्‍हेचं Bifurcation खुप आहे. असमानता फार म्हणजे फार आहे. त्यात शिक्षित / अशिक्षित, जात, सामाजिक उंची, असा काहीही प्रकार नाही. तो एक वेगळा विचार करणारा वर्ग आहे. तो आपल्या अवतीभवती सगळी कडे असतोच.... तिकडे मग पुरुषाने थोडं जरी चाकोरी बाहेर जाउन वागलं तरी त्याचं फार म्हणजे फारच कौतुक होतं.... त्याला फारच देवत्व देउन टाकतात...

जाउदे धागा भरकटवायचा उद्देश नाही. पण चांगले विचार वाचायला मिळाले....

मो कि मी,

त्यात काय रागवायचंय? फक्त असे विरोधाभासयुक्त मुद्दे माझ्या 'त्या' (तुमच्यामते जो लेख आहे त्याखाली प्रतिसादात) लिहीलेत तर माझ्याही लक्षात येईल आणि हा धागा ट्रॅक चेंज करणार नाही. धन्यवाद. Happy

धागा भरकटतो आहे की नाही हे कोण ठरवणार? की माझ्या सुरात सुर मिसळला नाही की धागा भरकटला म्हणून बोंबाबोंब सुरु करायची? अमूक एका मार्गाने'च' चर्चा व्हायला हवी हा काय अट्टाहास आहे? जेंव्हा अशा ओपन एंडेड विषयावर चर्चा होत असते तेंव्हा वेगवेगळे आवाज येणारच ते त्या चर्चेचे साध्य असते हे माझे मत, बाकी स्वयंघोषीत अ‍ॅडमीनची माबोवर कमी नाहीच.

.

Pages