'घर दोघांचं'

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2013 - 23:17

ghar doghaanche2_0.jpg

चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या प्रसिद्ध संग्रहात एक चारोळी आहे.
'घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुसर्‍याने आवरायचं
'
एक आणि दुसरा आलटून पालटून पसरवणं-आवरणं करत असतील तर खरंच त्यात रेखाटलेलं सहजीवनाचं चित्र रम्य आहे. गोखल्यांच्या प्रत्येक चारोळीबरोबर अनेक प्रति-चारोळ्या येतातच. ही चारोळी वाचल्यावर वाटलं की प्रत्यक्षात मात्र ...
'घर दोघांचं असतं
त्यात दोघांनी वावरायचं
त्याने पसरवलं
तरी तिनेच आवरायचं
' असंच चित्र बहुतकरुन दिसतं.

शिक्षण आणि करियर-निवड आपल्या मनाप्रमाणे करणे आजच्या काळात मुलींसाठी तुलनेने सोपे झाले आहे. वयाच्या एका टप्प्यानंतर मात्र मुलीची वाट अजूनही वेगळी होते. त्यातही अधोरेखित करुन सांगायचे तर लग्नानंतर. करियर करायचे की होममेकर व्हायचे की नोकरी आणि ब्रेक आलटून-पालटून की आधीची नोकरी सोडून नवऱ्याबरोबर नवीन जागी स्वत:ला रुजवायची धडपड ... एक ना अनेक पर्याय ! ह्या पर्यायांबद्दल आक्षेप नाही. किंबहुना मुली अतिशय डोळसपणे ह्या पर्यायांना सामोरं जातात. पण पर्यायाची निवड केली की प्रश्न संपतात का ? तर तसे नाही. नाहीतर मग नोकरीत अत्यंत यशस्वी असणारी पण मुलांसाठी वेळ काढू शकत नाही ह्या गिल्टचं ओझं बाळगणारी किंवा घरासाठी खस्ता खाल्ल्या पण आपल्यासाठी वेळ काढायचा राहून गेला, छंद जोपासायचे राहूनच गेले असं म्हणून हळहळणारी किंवा पैसे कमावत असून आर्थिक स्वातंत्र्य नसणारी किंवा मल्टिटास्किंग करताना दमछाक होणारी स्त्री आजूबाजूला सतत का बरं दिसली असती ?

स्त्री नोकरी करत असो वा पूर्णवेळ गृहिणी असो, कुठलीही भूमिका निभावताना तिला ओढाताण न होता ती समाधानाने निभावता येणं, त्या भूमिकेचा काच न वाटणं हे साधायचं असेल तर तर तिच्या आजूबाजूच्या माणसांनी, विशेष करुन तिच्या जोडीदाराने सहजीवनातील आपली जबाबदारी ओळखणं आणि ती वाटून घेणं अतिशय आवश्यक आहे. जोडीदाराची साथ असेल तर बाकीचे अडथळे पार करणे सुकर होते हे नक्की !

आपापली स्वप्नं पूर्ण करत एकमेकांच्या साथीने वाट चालताना आणि 'घर दोघांचं' उभं करताना तिच्या जोडीदाराचा सहभाग आणि पाठिंबा किती आणि कसा असतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणं हा ह्या धाग्याचा उद्देश आहे.

ह्या धाग्यावर काय लिहिणे अपेक्षित आहे ? :

हा धागा पुरुषांसाठी आहे. 'मी अमूक अमूक करतो.' अशा प्रकारच्या पोस्ट्स अपेक्षित आहेत.

१.प्रापंचिक जबाबदारीचं ओझं फक्त बायकोच्या खांद्यावर पडू नये म्हणून तुम्ही काळजी घेता का ? घेत असल्यास कशा प्रकारे घेता ? कामांचं स्वरुप लिहू शकाल का ?
२.आपापल्या ध्येयांमागे धावताना नवरा-बायकोंची वर्तुळं छेदतात ती घर आणि घरातील इतर सदस्य, मुलं ह्यांच्यामुळे. ह्यांच्याशी संबंधित असलेली कामं तुम्ही कशाप्रकारे वाटून घेता ?
३.घरातल्या स्त्रीला तिच्या छंदांसाठी वेळ काढता येतो का ? तिला आपले छंद जोपासता यावेत म्हणून तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करता?
४.तुमची बायको नोकरी करणारी किंवा गृहिणी ह्यापैकी कुठल्याही भूमिकेत असेल तरी तिला फक्त स्वत:साठी असा थोडा तरी वेळ बाजूला काढण्याची संधी मिळते का ? ती संधी मिळावी म्हणून तुम्ही खास प्रयत्न करता का ? कोणते ?
५.दोघांपैकी एकाला तडजोड करण्याची वेळ येणं हे कधीकधी अपरिहार्य आणि स्वाभाविक असू शकतं. अशावेळी साकल्याने विचार करुन बायकोऐवजी निदान काही काळासाठी ती तडजोड तुम्ही केली असे कधी घडले आहे का ? असेल तर त्याविषयी सांगू शकाल का ? उदा. जागाबदल, कामाच्या स्वरुपात बदल, हाती आलेली संधी सोडणे, बॅकसीट घेणे किंवा पूर्णपणे घरी राहणे, मुलांसंबंधीचे निर्णय किंवा तत्सम तडजोडी.

सगळ्यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी असं नाही पण इतरांना उपयोगी ठरतील अशा गोष्टी आवर्जून शेअर करा. मात्र प्रश्नांची उत्तरं फक्त होकारार्थी किंवा नकारार्थी देऊ नये. उदाहरणे देऊन लिहावे.

आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत Happy
--------------------------
वरील चारोळी वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनातर्फे श्री. चंद्रशेखर गोखले यांचे मनःपूर्वक आभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते बदल होणे हे अपेक्षित आहे त्या द्रुष्टिने वरिल पोस्टितील सगळे पुरुष जे घर दोघा.न्च या उक्तिप्रमाणे थोड/बहुत काम करत असतिल ते सग्ळेच अभिनन्दनास पात्र आहेत.

आत्ता इथे कोणी चहा केला होता हे तुला खरं तरी वाटेल का? असं अगदी आवर्जून रोज विचारतात>>smiley4.gif

मस्त धागा आहे.

माझ्या वडिलांबद्दल याबाबतीत लिहिण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. Happy
घरात हे काम आईचे आणि हे पपांचे अशी कधीच विभागणी नव्हती/ अजूनही नाहीये. घरातली/ बाहेरची कामे,, स्वयंपाक, स्वच्छता, मुलांचा सांभाळ अशी समस्त कामे ते करतात. स्वयपाकात चहा, भाज्या, पोळ्या, भाकरी ते दिवाळीचे पदार्थ , खवय्ये सारखे कार्यक्रम पाहून नवीन प्रयोग हे सर्व करतात. किराणा भरणे, दळण आणणे यासार खीही कामे करताना त्यान्ना पाहिले आहे. वेळ पडली तर भांडीही घासली आहेत. बागकाम हे काम फक्त आईच्या आवडीचे असल्याने ते करत नाहीत. ऑफिसातून येताना रोज भाज्या तेच आणतात. आम्ही लहान असताना अंघोळ घालण्यापासून, आमचे डबे भारण्यापर्यन्त सर्व पपाच करायचे. अनेक वर्षे घरातल्या सर्वांचे कपडे इस्त्री करण्याचेही काम तेच करायचे. सध्याही आई ऑफिसमधून आली की तिला चहा देउन मग दोघे मिळून भाज्या निवडतात.
अजून खूप आहे लिहायला. सवडीने लिहीन.

>> स्वैपाकघरात कोणताही पदार्थ केला की नंतर भांडी धून विसळून जागेवर गेली म्हनजेच काम पूर्ण झालं असाही त्यांचा खाक्या आहे.

Happy

बाबांचं अभिनंदन .. Happy

केदार जाधव, कौतुकास्पद आहे ..

विशाल कुलकर्णी, Happy

सगळेच छान लिहिताहेत. आपल्या बायकोला समजून घेऊन तिला मदत करण्याची वृत्ती दिसते आहे. खरंतर बरेच पुरुष आपापल्या परीनं मदत करत असतील, त्यांनीही इथे आपले अनुभव शेअर केले तर वाचायला आवडेल.

नवर्‍याला भेटायला मंडळी आली तर बायको सहज चहापाण्याचं बघते. 'अगं, जरा चार कप चहा कर गं.' हे ही सर्रास बोललं जातं. पण तेच बायकोच्या मैत्रिणी आल्या तर तिला गप्पा मारायला बसवून कधी कोणा नवरोजींनी चहापाण्याचं बघितलंय का? किंवा 'अरे, जरा चार कप चहा कर रे.' असं कोणी बोललंय का? तो दिवस खरा सुदिन.

आमच्याकडेही असं घडत नाही. बरेचदा कामवालीच असते घरात तीच चहा करते पण समजा ती नसली आणि माझ्याकडे कोणी भेटायला आले तर मीच उठून चहा-कॉफी करते. (फक्त एकदा नवर्‍याच्या हातचा चहा दिनेशदा आणि जिप्सीला मिळालाय. Happy )

माझ्या वडिलांना मी सगळ्या प्रकारची कामं करताना पाहिलंय. माझ्या आईचा कामाचा उरका जबरदस्त होता पण चार्-चार मुली (त्यातल्या दोन जुळ्या) यांचं भरपूर काम असायचं. बाबा आईच्या बरोबरीनं घरातली कामं उरकत असायचे. आमची आजारपणं, अभ्यास, भटकंती या सगळ्यात दोघांचा सहभाग सारखा असायचा.

घराची साफसफाई ते अगदी जेवण (त्यातून मटण म्हणजे त्यांची खासियत) बनवणे. त्यांची नोकरीही सुटसुटीत असल्याने त्यांना घरी बराच वेळ मिळायचा. आईनं महिलामंडळ, भजन क्लास, केटरींग क्लास, लायब्ररीयनचा कोर्स असे अनेक उपक्रम बाबांमुळे निर्धास्त पार पाडले. एकदा तर मी आणि माझ्या बहिणीनं बाबांना लागोपाठ तीनदा दडपे पोहे करायला लावले होते आणि त्यांनीही न कंटाळता तीन वेळा नारळ वगैरे खवून आम्हाला दडपे पोहे करून दिले.

माझ्या अमेरिकेतल्या बहिणीच्या दुसर्‍या डिलिव्हरीच्या वेळी इतक्या लांबच्या प्रवासाकरता आईच्या डॉक्टरांनी तिला मनाई केली. तेव्हा एकटे बाबा तीन महिने अमेरीकेला जाऊन राहिले आणि बहिणीच्या मदतीला उभे राहिले. स्वयंपाक, बाळाला सांभाळणं, खेळवणं इ. सगळं त्यांनी आनंदानं केलं.

हा धागा पुरुषांसाठी आहे. 'मी अमूक अमूक करतो.' अशा प्रकारच्या पोस्ट्स अपेक्षित आहेत. >>> संयोजक, इथे मायबोलीकरणींनी माझेबाबा, नवरा, भाऊ काय मदत करतात ई. हे लिहिले तर चालणार आहे का?

छान धागा. छान पोस्टी. Happy
अधिकाधिक पुरूषसदस्यांनी इथे लिहिलं पाहिजे.

बायकोच्या मैत्रिणी आल्या तर तिला गप्पा मारायला बसवून कधी कोणा नवरोजींनी चहापाण्याचं बघितलंय का? किंवा 'अरे, जरा चार कप चहा कर रे.' असं कोणी बोललंय का? >> हे मात्र माझा नवरा स्वतःहून करतो. पण तेवढंच. Wink बाकी सगळं (काही अपवाद सोडल्यास) कर रे, कर रे म्हटल्यानंतर. इथे बहुधा माबोकर पुरुषांनी लिहायचे असल्यामुळे जास्त लिहित नाही.

वाचतेय. इथे लिहिला गेलेला पुरुषांचा घरातला सहभाग पाहून मस्त वाटतंय Happy

अजून येऊद्यात असेच प्रतिसाद पुरुष मायबोलीकरांकडून.

बायकोच्या मैत्रिणी आल्या तर तिला गप्पा मारायला बसवून कधी कोणा नवरोजींनी चहापाण्याचं बघितलंय का? किंवा 'अरे, जरा चार कप चहा कर रे.' असं कोणी बोललंय का? >>

माझ्या मैत्रिंणींसाठी नाही पण लेकीचे मित्रमंडळ जमले की नवरा बर्याच वेळा ही जबाबदारी घेतो.

विशाल, केदारच्या पोस्टस मस्त. आवडल्या.

बायकोच्या करिअरसाठी स्वतःच्या करिअरमध्ये छोटी का होईना तडजोड करणारे फार म्हणजे फारच दुर्मिळ असल्यामुळे केदारचं विशेष कौतुक. बरेचदा पुरुषांना स्वत:ला अशा तडजोडी करायला काहीच प्रॉब्लेम नसतो पण इतर लोक (घरचे, मित्रमंडळी वगैरे) प्रेशराइज करतात. त्यांच्या प्रेशरखाली न येणे अन आपल्या संसारात काय महत्वाचं आहे ते करणे याला खरंच मोठी हिंमत लागते. ती नवरा-बायको दोघातही असायला हवी.

मनस्मी, मुक्तेश्वर यांचंही कौतुक वाटलं.

सर्वांचेच अनुभव वाचून छान वाटले.. महिला दिना निमिता का होईना पण पुन्हा एकदा सर्व पुरूषांच्या जाणिवा जागृत आहेत हे वाचून समाधान वाटले, अन्यथा ज्या प्रकराच्या ब्रेकींङ न्यूज सर्वच बातम्या वाहिन्यांवर येत आहेत ते पाहून आजकाल पुरूष म्हणवून घ्यायची शरम वाटू लागली आहे.
असो. तरिही या ऊपक्रमा निमित्ताने विशेषतः पुरूषांच्याही चांगल्या बाजू समोर येत आहेत हेही चांगले आहे.
आता मी अमके तमके करतो असे खरे तर स्वस्तुतीपर लिहीणे थोडे अवघड वाटते पण विषय तसा आहे व संयोजकांची अपेक्षा तशीच असल्याने काही गोष्टी नमूद करतो एव्हडेच. त्यामागे ऊद्देश निव्वळ सहजीवनातील अनुभव लिहीणे व जमलेच तर त्यातून थोडेफार ईतरांना काही मार्गदर्शन मिळावे एव्हडाच आहे.
तर आमची मुलगी होण्या आधी मी व पत्नी दोघेही ऊसगावात काम करत होतो. पत्नी तर एका नावाजलेल्या माँटेसरी शाळेत डायरेक्टर म्हणून काम पहात होती. मुलगी झाल्यावर त्या बाळाला १००% वेळ देता यावा यासाठी पत्नीने नोकरी सोडली. ऊसगावात विशेषतः आजी आजोबा वा ईतर नातेवाईक जवळ नसतात तेव्हा असे बाळासाठी एकाला, मुख्यत्वे आईला सर्व वेळ द्यायचा म्हणजे ईतर काहिही व्यवसाय ऊद्योग करता न येणे हे अपरिहार्य आहे. तेव्हा तसे ठरवून तीने काम सोडले, हळहळ झालीच, कारण अमेरिकन संस्कृतीनुसार बाळ झाल्यावर अक्षरशः एकाच महिन्यात पुन्हा १००% कामावर रुजू होणे या शिरस्त्या विरुध्द निर्णय घेतल्यावर बरेच लोकांनी तीला/आम्हाला असे करिअर वाया घालवू नकोस वगैरे सल्ले दिलेच.. पण 'आम्ही' ठाम होतो. त्या वेळी मी देखिल जवळ जव्ळ सर्वच सुट्ट्या या बायकोची तब्येत किंवा बाळाबरोबर वेळ या साठी घेतल्या. तो निर्णय किती योग्य व अमूल्य होता याची आजही जाणिव होत असते व बरे वाटते.
त्या दरम्यान आठवड्याची ग्रोसरी, सामान सुमान आणणे, घराची साफ सफाई ई. कामे मी मदत म्हणून करत असे. तसेच जेव्हा जेव्हा बाळाला डॉ. कडे न्यायचे असे तेव्हा कामातून वेळ काढून निक्षून स्वतः दोघींबरोबर जात असे. अजूनही जातो. [मुलगी जन्माला आली तेव्हाचे क्षणही विसरू शकत नाही-- माझ्याच हाताचा आधार धरून पत्नीने प्रसूतीच्या कळा देऊन बाळाला जन्म दिला.. आणि जन्माला आल्यावर लगेच बाळाने पहिला स्पर्श तीच्या आई बाबांचा अनुभवला! प्रत्त्येक पुरूषाने स्वताच्या मुलाच्या जन्माच्या वेळी आपल्या पत्नी बरोबर ऊपस्थित असावे असे मी आवर्जून सांगेन, कदाचित जे त्या बाळंतपणाच्या ९ महिन्यात एक पुरूष अनुभवू शकत नसेल ते त्या प्रसूतीच्या वेळी, त्या वेदना, तो आनंद, ते सर्व, जोडीने अनुभवताना पुरूषाचे रूपांतर वडील्/बाप या भूमिकेत होत असताना अनुभवास येत असते. कुटूंबाची जबाबदारी 'जोडीने' ऊचलण्याच्या शिक्षणातील ते क्षण म्हणजे आपल्याच आई वडीलांनी हाताला धरून गिरवलेला श्री गणेशा असतो!]
अलिकडे मुलगी मोठी झाली तशी पत्नीने दुबई मधील काही शाळात सल्लागार म्हणून एक दोन कामे सुरू करायचे ठरवले तेव्हा तीला जमेल तशी मदत केली. त्यात पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवून देणे पासून तीच्या बरोबर "मानसिक आधार" म्हणून ऊपस्थित रहाणे, बाळाला बघणे, असे जमेल तसे केले.
तरिही पत्नी अजून घरीच पूर्ण वेळ आहे.. व मला फक्त शुक्र, शनी सुट्टी असते.. तेव्हा शक्यतो विकांताला मुलीला बाहेर नेणे, बागेत खेळायला नेणे, कधी स्विमिंग ला नेणे असे करतो जेणे करून पत्नीला घरी स्वतासाठी वेळ मिळतो. कपडे आवरून ठेवणे, घर स्वच्छ ठेवण्यात मदत करणे, मुलीच्या शाळेच्या कार्यक्रम ई. मध्ये वेळ देणे हे देखिल करतो. आणि मुलगीला देखिल गीत संगीत ईं ची आवड असल्याने बाबा व लाडकी लेक मस्तपैकी गाणि गात बसतात, माझाही रियाज होतो, तिलाही प्रशिक्षण मिळते आणि पत्नी ची ईतर कामे 'सुरेल' व विना अडथळे होतात Happy

आता मलाच पुढील २,३ वर्षे पूर्ण वेळ घरी बसून १००% वेळ मुली बरोबर घालवायचा आहे.. येणारी वर्षे तीच्या एकंदर जडण घडणीतील महत्वाची वर्षे आहेत त्यात मला पुन्हा लहान होऊन तीच्या बरोबर खेळायचे आहे, अभ्यास करायचा आहे, गप्पा मारायच्या आहेत.. त्यासाठी पत्नीला जी हवी ती संधी (नोकरी, व्यवसाय, ई.) तीने स्विकारून मी संपूर्णपणे 'होममेकर' होणार आहे असा माझा प्रस्ताव आहे Happy तो पूर्ण व्हावा अशी माझी ईच्छा आहे. बघुया कितपत जमतय.. किंबहुना 'होममेकर' होणे २००% अवघड आहे असेच मला वाटते.

'एकत्रीत कुटूंब पध्दती' या भारतीय संस्कृती मधिल सामाजिक रचनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याचे तोटे असले तरीही फायदे खूप अधिक आहेत आणि शक्य असेल तिथे जमेल तेव्हा एकत्र कुटूंब टिकवण्यासाठी आजच्या स्त्री पुरूष दोघांनी प्रयत्न करावेत असे मला वाटते.

अलिकडे सं अरब अमिरातीत माझ्या दृष्टीने एक 'ऐतीहासिक' घटना घडली/निर्णय घेतला गेला. सर्वच सरकारी (व बहुतेक खाजगी देखिल) कचेरी, ऊद्योग, व्यवसाय यात सर्वात श्रेष्ठ पदांवर म्हणजेच कंपनी बोर्ड, चेअयरमन, कमिटी ई. वर किमान ५-१०% महिला असाव्यात असा नियम करण्यात आला आणि आमलातही आणण्यात येत आहे. जगातील एरवी ज्या संस्कृती मध्ये स्त्री चे स्थान हे पारंपारीक दृष्ट्या पुरूषापेक्षा कितितरी दुय्यम आहे तिथे असा विचार व नियम केले जाणे हे थेट अमेरिकेपासून भारतापर्यंत सर्वांसाठी मार्गदर्शक आहे असे मला वाटते.

किंबहुना 'घर व कुटूंब संभाळणार्‍या" स्त्री मधिल अंगीभूत गुण हे कुठल्याही Harvard Graduate व्यवस्थापकापेक्षा अधिक सहज, सशक्त, व सर्वंकष असतात असे मी माझ्या अनुभवावरून २००% ठामपणे म्हणू शकतो. मूल, चूल, घर, नाती गोती, कुटूंब, स्वयंपाक, व्यवहार, ई अनेक गोष्टी तितक्याच तत्परतेने multitasking यशस्वीपणे करणारी माझी दहावी पास आज्जी देखिल याला अपवाद नाही. तेव्हा आजची स्त्री तर अधिकच सक्षम असू शकेल..

किंबहुना,दर दोन तीन वर्षानी आळी पाळीने पती पत्नीने कचेरीतून बदली म्हणून काम करावे अशी पॉलिसी असलेली कंपनी स्थापन करण्याचे माझे स्वप्न आहे. Happy जर मनुष्य, स्त्री हे कुटूंबात सुखी असेल तरच तो वा ती व्यवसाय, नोकरी ई. ठिकाणी अधिक आनंदी, ऊर्जाशील व प्रॉडक्टीव असते असे माझे,निरीक्षण आहे.

सहजीवनात 'संतुलन' याला फार महत्व आहे. स्त्री च्या मानसिक गरजा व शारिरीक मर्यादा लक्षात घेऊन असे संतुलन ठेवण्यासाठी प्रथम दोन पावले मुलगा, नवरा, वडील, ई. भूमिकेत असलेल्या पुरूषाने ऊचलणे जास्त गरजेचे आहे. 'सप्तपदी मी रोज चालते...' हे गीत युगुल गीत व्हावे असे माझ्यातील संगीतकाराला कायम वाटत आले आहे आणि वैयक्तीक आयुष्यात तसे व्हावे यासाठी जमेल तसे जमेल तेव्हा प्रयत्न करणे हे मला महत्वाचे वाटते.

महिला दिना निमित्त 'सुपरव्हुमन' ची गरज मला वाटत नाही.. किंबहुना सुपरव्हुमन हा शब्दच अगदी पोकळ, खोटा, छापिल वाटतो. सुपरमॅन देखिल पुस्तकातच असतो नाही का? पण महिला दिना निमित्त 'संपूर्ण' स्त्री ची गरज मला आजकालच्या समाजात अधिक भासत आहे आणि अर्थातच स्त्रीला सर्वार्थाने संपूर्ण, स्वयपूर्ण करण्यात प्रत्त्येक पुरूषाचा 'सुपर' वाटा असणे गरजेचे आहे. तेव्हा महिला दिना निमित्त दोघांनाही माझ्या अनेक शुभेच्छा!

सर्वांचेच प्रतिसाद उत्तम आहेत. एकंदरीतच पुरुषांनी घरकामाला हातभार लावायचे प्रमाण आता वाढलेय, आणि यापुढे ते अपरिहार्यच ठरणार आहेत.

माझ्या आजोबांनी जो व्यवसाय सुरु केला त्याबद्दल मात्र आवर्जून लिहावेसे वाटतेय. ते मलकापूरच्या राजवाड्यात कोठावळे होते. पण स्वातंत्राची चाहूल लागल्यावर, महाराजांनी आता संस्थाने राहणार नाहीत, तुम्ही काहितरी उद्योग सुरु करा असा सल्ला दिला. त्या काळात पाव बिस्किटे हा आपल्याकडे नवा प्रकार होता. आजोबांनी बेकरी सुरु केली.

पण बेकरी सुरु केली तरी आपल्याकडे मैदा सहजपणे मिळत नसे. म्हणून गव्हाचेच पिठ बारीक चाळणीने चाळून घेत असत. यीस्ट पण मिळत नसे, तीदेखील घरी करावी लागे. पण त्यांनी कष्टाने ती बेकरी चालवली. पन्नास पन्नास किलो पिठ एकावेळी ते एकट्याने हाताने मळत असत. कुठल्याही शुभकार्यात त्यांच्याच हातचे जेवण असे, घरात. ( हे सगळे ६५/७० वर्षांपुर्वी )

पुढे मामा, माम्या यांनी तो व्यवसाय वाढवला. आजोबा सर्व कामे करताहेत हे बघतच आम्ही मोठे झालो. त्यांच्यामूळे आमच्या घराण्यात जेवण करणे वगैरे कामाला कधीही केवळ स्त्रियांचे काम मानले गेले नाही.
सध्या माझे मामा, माम्या, मावस भाऊ, चुलत भाऊ, वहिन्या, भाचा, पुतणा सर्वजण याच व्यवसायात आहेत.
सध्याच्या पिढीने अर्थातच व्यावसायिक शिक्षण घेतलेले आहे. आजोळच्या घरात तर पहाटे ३ ते रात्री ११
पर्यंत काम चालते. घरातील सर्वांचे सहकार्य असल्याशिवाय हे शक्यच नव्हते. अजूनही एकत्र कुटुंब आहे.
प्रत्येकाची कामे वाटलेली आहेत. सर्वांना हक्काची विश्रांतीदेखील मिळते.

बाकी माझ्या बाबतीत मी एकटा जीव असल्याने, घरातील म्हणून जी काही कामे असतात, ती सर्व एकट्यानेच करतो Happy गेली २३ वर्षे Happy Happy

सुरेख ! माबोकरणींचे बाबा तसेच विशाल, मुक्तेश्वर, केदार यांचे अनूभव खूपच छान आणी कौतुकास्पद.

योग खूपच छान प्रतीसाद. खर्‍या अर्थाने सहजीवन. दिनेशजींचे तर कौतुक करावे तेवढे थोडे. एका वेळी अनेक क्षेत्रात कार्यरत रहाणे आणी त्या क्षेत्रांची उत्तम माहिती असणे हे फार दुर्मिळ आहे. तुमच्या कुटुंबाचे पण कौतुक करावे तेवढे थोडे. पिढ्या न पिढ्या त्याची माहिती चालतेय हे खूप छान आहे. तुम्ही पाकक्रियेतले तज्ञ कसे हे आता माबोकरणींना समजेलच.

बाकी सर्वांचे पण अतीशय छान आणी उत्कट अनुभव आहेत. शुभेच्छा सर्वांना.

विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि स्त्रियांनाही आपला नवरा, वडील ह्यांच्याबद्दल लिहावसं वाटतंय हे आम्ही समजू शकतो. स्त्रियांनी आपल्या घराबद्दल, घरातल्या कामांबद्दल, वर्क लाईफ बॅलन्सबद्दल बोलणे आपल्यासाठी नवीन नाही. पण आज खरी गरज आहे ती पुरुषांनी ह्याबद्दल मोकळेपणाने बोलण्याची.

ह्या विषयावर लिहिण्यात आत्मस्तुतीचा धोका आहे किंवा 'ह्यात काय लिहायचं वेगळं' असा विचार करुन स्वतःला थांबवू नका अशी तुम्हाला विनंती आहे. पुरुषांचे काम फक्त अर्थार्जन करणे आणि घरकाम, मुलं ही फक्त स्त्रीची जबाबदारी अशी मानसिकता आपल्या समाजात अजूनही खूप जास्त आहे. ती बदलायची असेल तर 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' असं सांगणारे पुरुष पुढे आले पाहिजेत. 'घर दोघांचं' ही जाणीव मग जास्त चांगल्या प्रकारे रुजेल. ह्या उपक्रमाचा हेतू तोच आहे ! Happy

* आधी लिहिलेल्या पोस्ट्स कृपया काढू नका. मात्र पुरुष आयडींच्याच पोस्ट्स ह्या धाग्यावर जास्त दिसाव्या असे आम्हाला वाटते.

खरं सांगु..., अगदी मनापासुन...घर दोघांचं असतं ही कल्पना मला खुप आवडली
माझ नाव विपुल आहे मी मायबोली नेहमी वाचतो

लग्नाला १० वर्ष झाली. दोघेही नोकरी करतो. बायकोवरच फक्त प्रापंचिक जवाबदारीचे ओझे पडू नये म्हणून मी प्रयत्न करतो का? ह्याचे उत्तर सध्या "हो" असं आहे. लग्नाआधी आणि लग्नानंतर बरीच वर्षे, बायको वर प्रापंचिक जवाबदारीचे ओझे होऊ शकते असा विचार सुद्धा मनात आला नाही. विचार का आला नाही ह्याचे नक्की कारण काय हे सांगता येत नाही पण मोठं होत असताना वडिल बाहेर नोकरी करुन पैसे कमवतात (फक्त तेवढच करतात), आई घर संभाळते (फक्त तेवढेच करते) असं चित्र होतं हे एक कारण असू शकते. पुढे कधी कधी परिस्थितीनी मी नाईलाजाने एखादी जवाबदारी डोक्यावर घेतली तेव्हा ह्याचे ओझे होऊ शकते हा डोक्यात प्रकाश पडला. ती कामं करताना सुद्धा नोकरी करुन मी ही कामं करतोय म्हणजे बायकोच्या डोक्यावर उपकार करतोय असाच अविर्भाव होता. ती सुद्धा नोकरी करत होती पण घरात थोडीफार मदत करणे, मुलाचे बघणे ही कामं काय नवर्‍यानी करायची नसतात ह्या ब्रिलियंट विचारसरणीमुळे आपल्या बायकोनी खरं "काय आपला नवरा घरात मदत करतो" ह्याचे गोडवे गायला हवेत असाही विचार बर्‍याच वेळा मनात येऊन जायचा.
नवर्यानी काय करायला पाहिजे आणि काय नाही ह्याबद्दलचे माझे मौलिक विचार हे मी जन्मताच बरोबर घेऊन आलो की काय, इतके ते खोलवर रुतलेले होते असं मला आज वाटतं.
थोडक्यात लग्नाला १० वर्ष होत आली तरी तिच्या वर ओझं पडू नये ह्याकरता मी मुद्दाम असे प्रयत्न मागच्या २-३ वर्षांपासूनच करायला लागलो. मागच्या महिला दिन कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या चर्चेतून सुद्धा डोक्यात बर्‍याच ट्युब पेटल्या. आपले काही माबो कर पुरुष (सध्या फक्त परदेसाई आठवतायत आणि माबो बाहेरचे म्हणजे श्री, आयडी "मेधा" चा नवरा) घरात काय काय कामं करतात हे वाचलं आणि आपण अजून बरेच मागे आहोत ही जाणीव झाली.

सध्या सकाळी उठल्यावर मुलाचे सगळे मी बघतो (हे एक काम फक्त मी बायको ५ वर्षांपुर्वी फुल टाईम नोकरी करायला लागली तेव्हा हाती घेतलं. हेच ते ओझ्याची जाणीव करुन देणारे काम).
कामाहून घरी आल्यावर मुलाचे जेवण वगैरे मी बघतो. अभ्यासाचे बायको बघते पण पोरगा जरा नाठाळ क्याटेगरी असल्यामुळे कधी कधी तिथे मार्शल लॉ लावायला माझी गरज पडते. बाकी डिशवॉशर मध्ये भांडे लावणे, घर आवरु लागण्यात मदत करणे हे करतो. पुर्वी आठवड्यातून एकदा विकेंडला, आवड असल्यामुळे चिकन वगैरे करायचो पण नंतर एकदा बायको प्रोजेक्ट करता १ महिना भारतात गेली तेव्हा इतर भाज्या ही करुन बघितल्या आणि आता जमतात.

हे झालं माझ्याबद्दल. महिला दिनाबद्दल बायकोशी चर्चा झाली तेव्हा त्यात आलेल्या काही गोष्टी तिनी मुद्दाम लिहायला सांगितल्या म्हणून इथे देत आहे. अवांतर वाटल्यास क्षमस्व.
संसार करत असताना नवर्‍यानी स्वतःची जवाबदारी ओळखून बायकोवरच फक्त जास्त ओझं होतय का हे बघायला पाहिजे हा विचार स्तुत्य आहे पण तो ती जवाबदारी ओळखेलच ह्याचा नेम नाही आणि अजून पुढे जाऊन आपल्या नवर्‍यानी ही जवाबदारी ओळखली आहे ह्याची व्याख्या सुद्धा स्त्रियांनी नीट पडताळून पाहावी. इथे जवाबदारी म्हणजे फक्त घरातले काम ही नसून सगळीच म्हणजे कुटूंबाच्या भविष्याच्या दृष्टिनी तो (नवरा) जे काही करत आहे त्याची (ह्यात अर्थिक गुंतवणूक, मुलांच्या शिक्षणाबद्दल निर्णय असे सगळेच आले)
बर्‍याच वेळा नवरा नोकरी करतो आणि बायको घर संभाळते हे विभाजन अगदी सहज किंवा नकळत होऊन जाते अणि पुढे नवरा-बायको सुखानी संसारही करतात. इथे नवरा बाहेर नोकरी करुन, घरात पैसा आणून ह्या घरा बद्दल, ह्या कुटूंबाबद्दल जे निर्णय घेतोय ते बरोबर आहेत असं बायको गृहित धरत आहे आणि बायको घर संभाळत असताना मुलांच्या शिस्ती विषयी, घरात शिजत असलेल्या अन्नांविषयी जे निर्णय घेत आहेत ते बरोबर आहेत असं नवरा गृहित धरत आहे. इथे सर्वात मोठं लफडं असं आहे की नवरा घेतोय ते निर्णय आणि बायको घेतेय ते निर्णय ह्यात त्या निर्णयांचा होणारा त्या कुटूंबावर परिणाम ह्यात खुप मोठा फरक आहे.
आता घर संभाळत असली तरी कुठलेही निर्णय घेताना नवरा बायकोला विचारुन मगच घेतो असंही होत असेल पण नुसतं विचारणे आणि विचारुन सुद्धा खरच त्या मताला किंमत दिली जात आहे का हे ही बघावं.
ह्याही पुढे जाऊन एक खुप महत्वाचा मुद्दा म्हणजे सहसा पैसा कमवून घरात आणणार्‍याला घरात आर्थिक किंवा कुठल्याही महत्वाच्या बाबींवर निर्णय घ्यायची मुभा असते. इथे परत बायको कमवत असली तरी बहुतांश वेळा "मुलांचे बघावे" लागते ह्या करणा करता सतत बॅक सीट ( back seat) घेऊन मुद्दाम नवर्यापेक्षा कमी पगार, कमी जवाबदारी असलेली नोकरी करतात. हे बॅक सीट फक्त पगार ह्या बद्दलच नाही तर खरंतर वैचारिक दृष्ट्या मुद्दाम घेतलेले बॅकसीट असते. आमच्या दोघांच्या ओळखीत असलेल्या काही स्त्रियांशी बोलत असताना अगदी जाणवते की त्यांनी बर्‍याच गोष्टींमध्ये आपला नवरा आपल्यापेक्षा जास्त योग्य निर्णय घेऊ शकतो हे अ‍ॅक्सेप्ट केलेलं आहे. इथे खरच तसे असेल तर ठीक आहे पण तसं नसेल तर काय ह्याची परिक्षा का पाहावी हा प्रश्न आहे.
काही स्त्रियांना घर संभाळण्याची खरच आवड असेल किंवा एकंदरित पिंडच घर संभाळण्याकडे असेल हे समजू शकते पण नवर्‍याच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहाणं हे फक्त ग्लॅमर किंवा हम भी कुछ कम नही हे दाखवण्यापुरतेच सिमीत नसून तसं करुन स्त्रिया खरं तर त्यांच्या स्वतःच्या, त्यांच्या कूटूंबाच्या भविष्याबद्दल घेतल्या जाणार्या निर्णयांमध्ये हक्काचा समभाव (?) घेत आहेत.

अरे वा!

वैद्या बुवा आणि बाई अगदी मस्त विचार .. Happy

बुवा, छान लिहीलं आहे .. कौतुक ..

(योगची पोस्ट वाचायची आहे .. थोडी मोठी आहे ;))

दिनेशदा, Happy

बुवा, फार मस्त लिहिलेय. प्रामाणिकपणा, स्वतःचे विचार बदलण्याची तयारी अन संवेदनशीलता या गुणांसाठी तुम्हाला १००% मार्क्स!

बुवा, खरंच छान , अगदी ह्युमनली पोस्ट Happy उगीच आदर्शपणाचा बुडबुडा नाही, बरेच काही चुकतही होतं, त्यावर काम करण्याची तयारी आहे हा अप्रोच आवडला.

Pages