गावांच्या नावाचा इतिहास

Submitted by कुमार१ on 5 March, 2013 - 04:54

गावांच्या नावांचा इतिहास वा व्युत्पत्ती इथे लिहावी.जगातील कुठलीही गावे चालतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सातारा' बद्दल अजून थोडे: खरं म्हणजे 'सप्ततारे' वरून 'सातारे'. ब्रिटीशांनी बरीच एकारांत नावे आकारांत केली. जसे सातारा, धुलीया (धुळे), पूना ( पुणे).
'सासवड' मध्ये प्रवेश करताना ७ मोठी वडाची झाडे होती म्हणून 'सातवड'.> सासवड.

'बंगळूर' बद्दलची दंतकथा : केंपे गौडा जंगलात वाट चुकून उपाशीपोटी रस्ता शोधत असताना एका म्हातारीने त्याला उक डलेले दाणे ( कन्नड : बेंद काळू) दिले. त्याची आठवण म्हनून त्याने 'बंगळूर' वसविले. ही कथा वास्तव आणि कल्पित म्हणणारे दोन्ही बाजूचे लोक आहेत!

जाता जाता......
पुणेकर, नागपुरकर आणि मुम्बईकर यांन्च्यासमवेत कोल्हापुरकरांपुढेही मला कर जोडावेसे वाटतात.

अवनी....

"...कोल्हापुरकरांपुढेही मला कर जोडावेसे वाटतात...."

कारण ? मी पक्का कोल्हापूरकर आहे, त्यामुळे तुम्ही वरील कबुली कोणत्या संदर्भात दिली आहे हे जाणण्याची उत्सुकता आहे.

अशोक पाटील

अशोकमामा,
अहो कौतुकानीच म्हणतेय......तुमची ती स्पेशल बोलीभाषा, जातायेता दोस्ताला टपल्या मारणं, पायात पाय घालून पाडणं लैच आवडतय बघा मला !

च्यामारी, अस्सं व्हय ! मी समझलो काय काय आमच्याकडून हितं चुका झाल्या आसतील नसतील त्याबद्दल संतापून, चिडून, त्राग्याने, वैतागाने, उद्वेगाने 'कर' जोडत आहात की काय ??

आत्ता धुकं निवळलं मस्तपैकी....! आणि एकदा का "मामा" म्हटलं की मग तर ऐकणार्‍याला शहाळ्यातील पाण्यासारखं गारगार वाटतंच.

अशोकमामा

पुण्याजवळची गावे जसे फुरसुंगी, हडपसर, सूस, हिंजवडी, वानवडी, निगडी, दापोडी, बोपोडी, वारजे, पौड, कात्रज, येरवडा, औंध वगैरे अगम्य आहेत.
मुंबईजवळची कळवा (कळवे?), डोंबिवली, नेरळ, मुलुंड, भांडुप, कांजूर, नाहुर, मालाड, कांदिवली, वसई, मुरबाड, कसारा, कर्जत, उरण, वाशी, भायखळा, माटुंगा ही आणि अशी अनेक नावे अगम्य वाटतात.

ही कुठल्या दुसर्‍या भाषेतून आलेल्या शब्दापासून बनलेली नावे आहेत का? आणि ही गावे इतकी प्राचीन आहेत का की मराठी प्रस्थापित व्हायच्या आधी इथे बोलल्या जाणार्‍या भाषेतले शब्द वापरुन ही नावे निर्माण व्हावीत?

कांदिवली चे आताच विकीपेडीयावर वाचलं.. हे उपनगर अश्मयुगापासुन वसवले गेले आहे. कांदिवली स्टे. १९०७ मध्ये बां धले गेले त्याचे पुर्वी नाव होते खांदोळी. हे नाव कंदोलिंम या पुर्व भारतातील भागावरुन दिले गेले. स्टे. बांधताना परण ( जे कांदिवली स्टे. च्या पुर्वेला आहे) ह्या भागातुन दगड आणी माती आणले गेले. मालाड भागातील दगडी खाणी मालाड स्टोन साठी प्रसिध्द होत्या. याच दगडांपासुन मुंबईतल्या बर्याच पुरात न वास्तु बांधण्यात आल्या आहेत. उदा. ससुन ग्रंथालय, बॉम्बे हाऊस, वेस्टर्न ए. ची चर्चगेट जवळची ईमारत..

shendenaxatra,

खरोखरच यांतली काही नावे अगम्य आहेत. मात्र काही गावांची नवे यमकात बसतात. उदा : कांजूर-अंजूर, मालाड-भिलाड-कोलाड, कांदिवली-चांदिवली, अंधेरी(अंदेरी?)-उंदेरी-खांदेरी, नाहूर-पहूर-माहूर, वसई-असई, इत्यादि. या यामाकांवरून वाटतं की सुरुवातीचं अक्षर कुठल्याश्या नामाशी निगडीत असावं तर यमक एखाद्या क्रियेशी संबंधित असावं. हा केवळ अंदाज बरंका! Happy

तुमच्या यादीतल्या काही गावांबद्दल सांगतो.

१. मुलुंड - मूळ नाव मुळुंद आहे असं वाचल्याचं आठवतं. अर्थ माहीत नाही!
२. कर्जत - हे करजत असावंसं वाटतं.
३. भायखळा - इथे भाया नावाच्या माणसाचं शेत (खळं) होतं.
४. माटुंगा - हे नाव मातंगशाळा म्हणजे हत्तीपागा यावरून पडलं आहे.
५. हडपसर - हडप कुटुंबाच्या मालकीचा तलाव असं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

@ दिपु कंदोलिम हे नाव पूर्व भारतातील भागावरून देले गेले असे जर विकीवर असेल तर ते चूक आहे. विकीवरची मुंबईसंबंधी बरीचशी माहिती आणि बर्‍याचश्या साइट्स ह्या ईस्ट इंडिअन ख्रिस्टिअन ह्या मूळ मुंबईकर कोळी आगरी भंडारी लोकांमधल्या धर्मांतरितांच्या वंशजांनी त्यांच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या आहेत. हे लोक मुंबईविषयी प्रचंड आस्था आणि अभिमान बाळगतात त्यामुळे त्यांनी मुंबईसंबंधी विपुल लिखाण केलेले आहे, पण ते ऑथेंटिक नाही.आपली ग्रामनामे ही पूर्वी (जुन्या शुद्धलेखनानुसार ) अनुस्वारान्त असत. आणि पोर्चुगीझ मध्ये ह्या अनुस्वारासाठी एम हे अक्षर वापरले गेले आहे. गोव्यात हे प्रकर्षाने जाणवते. सांकोलिम्(सांखळी) पेर्नेम्(पेडणे) मयेम्(मये), मंगुएशीम (मंगेशी) इ. त्यामुळे खंदोळें हे मूळ नाव असणयाची शक्यताच जास्त आहे..कदाचित साष्टीची बखर या दुव्यावर अधिक माहिती सापडू शकेल. मुलुंड हे आत्ताआत्तापर्यंत मुळुंद होते. इंग्लिश स्पेलिंग मध्ये ळ. ड हा भेद दाखवणारी वेगळी अक्षरे नाहीत.त्यामुळे एम यू एल यू एन डी असे स्पेलिंग करावे लागले आणि त्याचा आपण चुकीचा उच्चार रूढ केला आहे. नाल्ला सोपारा हे नाळा आणि सोपारा असे जोड गाव आहे. मानखुर्द हे माण(खुर्द) होते. न.र. फाटकांनी मुंबईचा इतिहास लिहिला आहे. गंगाधर गाडगीळ यांची काही पुस्तके आहेत.मुंबईचे प्रवासवर्णन हे माडगावकरांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.शिवाय जुनी पुस्तके वाचण्याचा नाद असेल तर बरीच तत्कालीन नावे कळून येतात.

महोदय,
मी गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास (http://www.maayboli.com/node/41723) हा धागा | 8 March, 2013 - 18:42 या वेळी चालू केलेला होता. त्यानंतर त्याला प्रतिसादही सुरु झालेले होते. त्यानंतर माझ्या धाग्यावर Chaitrali ने (8 March, 2013 - 19:51) "नवीन असा धागा आहे आधीच......
www.maayboli.com/node/41636" ही कॉमेंट टाकली.
माझ्यानंतर "गावांच्या नावाचा इतिहास कुमार१ | 5 March, 2013 - 18:54
गावांच्या नावांचा इतिहास वा व्युत्पत्ती इथे लिहावी.जगातील कुठलीही गावे चालतील." हे केवळ एकच वाक्य टाकून हा दुसरा धागा लिहिला.
आमच्या धागा तयार झालेल्या वेळा पाहिल्या तर आपणास लगेच लक्षात येईल. त्यांची वेळ आहे माझ्या(18:42) नंतर १२ मिनिटे म्हणजेच 18:54 . आता त्यांचा नोड क्रमांक माझ्यापेक्षा कमी कसा मिळाला हे मला न उलघडलेले कोडे आहे.
तरी कुमार1 ने म्हटल्याप्रमाणे आणि माझा धागा अगोदरचा असल्यामुळे त्यांचा धागा माझ्या धाग्यात विलिन करावा ही विनंती.

@ नंदिनी मिर्‍या डोंगर ही समुद्रालगत उंचवट्याची जागा आहे. मूळ मिर्‍यें शब्दाचा अर्थ पाणथळ जमिनीमधली उंचवट्याची जागा असा (मला वाटते म.भा.स. मंडळाच्या) शब्दकोशात दिलेला आहे. दहीसरनजीक काशी-मिर्‍यें या नावाचे गाव आहे. या गावावरूनच जवळच्या स्टेशनचे नाव मिरा रोड ठेवले गेले. जसे नासिक रोड, रोहा रोड, खार रोड, चरणी रोड, वसई रोड वगैरे. पुढे पुढे वहातुकीच्या सुलभतेमुळे स्टेशनलगत वस्ती वाढत गेली आणि स्टेशनपासून हेतुतः लांब ठेवलेली मूळ गावे विस्मरणात गेली.
आपल्याकडे स्थलविशेष दर्शवणारे अनेक शब्द विस्मृतीत जात चालले आहेत. जूं (जुहू), भाटी-भाट्यें, दांडा-दांडी, पाटी,चिखलठाण, खडक, खडकमाळ, भरडा,सडा, काप, टेंब, टेपाड, मुरमाड, डिखळ,ढेपळे-ढेकळे, आगर,भाट,आर, पार,(आरनाळा, नेरुरपार) पार (कट्टा या अर्थाने शनीपार, पार नाका), तर धरमतर, (तर म्हणजे एक तर नदीच्या उताराचे म्हणजे तरून जाण्याजोगे ठिकाण किंवा जिथे तर/तरी म्हणजे प्रवासी होडी मिळू शकते ते ठिकाण.) पांढर-पंडरिगे/पंढरपूर इ. इ.

भायखळा शब्दाची भाया कोळ्याची जागा अशीही एक व्यत्पत्ती सांगितली जाते. म्हातारपाखाडी (सध्याचा उच्चार मॅटरपॅक्री) हे म्हात्रेपाखाडीसुद्धा असू शकते कारण मूळ मुंबईत वाडवळ जातीचे लोक पुष्कळ होते आणि त्यांच्यात म्हात्रे हे नाव जास्त आढळते. माझगाव हे उघड-उघड आपल्या माझघरासारखे मधले गाव आहे. मूळच्या सात बेटांमधील साधारणतः मध्यवर्ती गाव. पण ज्यांना मराठीतले हे साधे साधे शब्द माहीत नव्हते त्यांनी ओढूनताणून कुठलीतरी व्युत्पत्ती दाखवली आहे.
पेण म्हणजे मालवहातुकीच्या आणि टपाली घोड्यांची विश्रांतीच्या टप्प्याची किंवा घोडे बदलण्याची जागा.(घोडे 'पेंड' खातेय) त्यावरून पेण. पालपेण वगैरे.

हीरा खूपच छान माहिती !
परकियांनी त्यांच्या सोयीसाठी बदललेली सगळी नावे पूर्ववत करायला हवीत.

भायखळा शब्दाची भाया कोळ्याची जागा अशीही एक व्यत्पत्ती सांगितली जाते.>>हीरा, माझ्या वाचनानुसार इथे भाया नावाच्या शेतकर्‍याचे खळे (शेत) होते म्हणून ते "भायखळा"

म्हातारपाखडीला कुण्या एका म्हातार्‍याचे घर होते म्हणे. माझगांवची व्युत्पत्ती आत्ता आठवेना मला, कधी माझ्या बॉसशी संपर्क झाला तर त्यांना विचारेन. त्यांच्याकडे असली भन्नाट माहिती कायम असायची.

दादर म्हणजे जिना, ब्रिटिशांनी घातलेला भराव सलग नसून एकीकडे चढता असल्याने त्याला लोक दादर म्हणायला लागले. बोरीबंदर म्हणजे जिथून मालाच्या बोरी (पोती) उचलत ती जागा. बांद्र्याचा उच्चार वांद्रे असा होता पूर्वी. तिथे भरपूर वानरं असावीत, हल्ली सिनेनट राहतात. Happy

SORRY कुमार1 & Maaybolikar
Thanks नंदिनी
मी तारखेकडे पाहिलेच नाही. एक मात्र तेवढेच सत्य आहे की कुमार यांनी काढलेल्या धाग्याची मला बिलकूल कल्पना नव्हती. खरं तर ज्या पद्धतीने मी हे पत्र लिहिलेले आहे तसेच कुमार1 ह्यांनी लिहावयास हवे होते. त्यांनी ते लिहिले नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
एक मात्र नक्की दोघांच्या मनात साधारण पणे एकाच वेळी ह्या धाग्याचा विचार आला. ह्यावरून काहीतरी कुमार1 व अविनाश1 ह्यांचे ब्रिजींग असले पाहिजे. दोघांच्याही नावात 1, 1 आहे. त्यांचे नाव मी काल पहिल्यांदाच पाहिले. नंदिनी ह्यांनी ते दाखवून दिले त्यामुळे त्यांचे पुनश्र्च धन्यवाद.

मुख्य म्हणजे त्यांनी 5 मार्चला धागा काढला आणि माझा धागा उगवेपर्यंत त्यांच्या धाग्यावर एकही प्रतिसाद नव्हता. << नाही, कारण या धाग्यावर पहिलाच प्रतिसाद माझा आहे आणी तो नंदिनी | 5 March, 2013 - 20:06 म्हणजे ५ मार्चच्या रात्री ८ वाजता दिलेला आहे.

८ मार्चला तुमचा धागा येईपर्यंत तिथे ३०+ प्रतिसाद ऑलरेडी आलेले होते. Happy

http://www.maayboli.com/node/41723 अविनाश१ | 8 March, 2013 - 18:42 वरुन
प्रत्येक छोट्यामोठ्या गावाला ज्ञात-अज्ञात इतिहास असतो. एखाद्या गावाचे नाव हे का पडले याचा शोध घेण्यासाठी इतिहासात डोकावल्यास कित्येक अनाकलनीय गोष्टींची उकल होते. अगदी डोंगरातील एखाद्या लहानात लहान वाडीलादेखील काही ना काही इतिहास असतोच. कित्येक गावांची नावे तर खूपच मजेशीर असतात. त्यांचा सकृत्‌दर्शनी काहीच संदर्भ लागत नाही. सध्या मी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गावांच्या नावातील व्युत्पत्ती शोधत आहे.
आरंभी अर्थातच 1) कोल्हापूर - देवीने कोल्हासूराचा येथे वध केला.
2) नृसिंहवाडी - काहीजण "नरसोबावाडी' म्हणतात. नृसिंहसरस्वतींचे येथे वास्तव घडले. "नृसिंह' ह्या संस्कृत शब्दास येथील बोलीभाषेत "नरसोबा' असे म्हणतात.
3) औरवाड - "और' म्हणजे "नदीचा पूर' नृसिंहवाडीच्या समोर आहे ते औरवाड. येथे कायम पूर येतो त्यामुळे हे नाव पडलेले असणार.
4) चिखली (प्रयाग) - चिखली गावाच्या पुढे "प्रयाग' हे संगमाचे स्थान आहे. येथे तुळशी-भोगावती व कुंभी-कासारी ह्या नद्यांचा संगम होतो. पाचवी सरस्वती ही गुप्त आहे असे मानले जाते. संगम झाल्यानंतर या नदीला "पंचगंगा' असे म्हणतात. पंचगंगा ही नृसिंहवाडी येथे कृष्णेला मिळते.
आता "चिखली' ह्या नावाविषयी पावसाळ्यात चिखली हे गाव सदैव पूरग्रस्त होत असते. त्यामुळे कायम तेथे चिखल राहत असल्यामुळे "चिखली' हे नाव पडलेले असणार.
5) शिरोळ - मोल्सवर्थमधील अर्थ "To set out-go-walk-come in or at th cool portion of the day'' शिरोळ हे गाव नृसिंहवाडीजवळ आहे. तेथे नृसिंहसरस्वतीचे भिक्षापात्र आहे. यावरून नृसिंहसरस्वती हे वाडीवरून शिरोळला सकाळी लवकर भिक्षा मागण्यासाठी येत असावेत. यावरून हे नाव पडलेले आहे की काय अशी मला शंका येते.
6) वाशी - हे नाव कोणत्या तरी थोर व्यक्तीचा येथे वास घडलेला असतो त्यावरून पडत असावे.
7) गुडाळ - गोदल?
येथे मी तर्क मांडलेले आहेत. त्या-त्या भागातील रहिवासी आणखीन जास्त खुलासा करू शकतील.

तमीळ-तेलुगु मध्ये कित्येक ग्रामनामांमध्ये 'पळ्ळी' हा शब्द आढळतो. आंध्रप्रदेशलगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही अशी गावे आढळतात. उदा. नागेपल्ली, इटापल्ली, चिचपल्ली. इ. आपल्याकडचा वली किंवा ओली हा शब्द याच पळ्ळी वरून आला असावा का? उदा. मेणवली, कडोली, लुणावळे/ळी, घणसोली, ऐरोली,दापोली, वाघोली मळवली,खानोली, कणकवली इत्यादि. आली किंवा आळी म्हणजे रांग-घरांची वगैरे. त्यावरून काही ग्रामनामे निघाली असतील. खिडकाळी, घंटाळी, बामणोली वगैरे. अळ्ळ म्हणजे हुनर किंवा कसब, त्यावरून पांचाळ शब्द आला,(कासार,लोहार,सोनार,तांबट आणि आणखी एक आठवत नाही) त्यातूनच ते ते कसब जाणणार्‍यांची ती ती आळी असेही घडले असेल.
विश्वनाथ खैरे यांचे मराठी ग्रामनामांचा इतिहास हे पुस्तक कोणाच्या पहाण्यात आहे का? त्यात सगळी माहिती आहे.

बंदर म्हणजे सीपोर्ट (मूळ फार्सी) या अर्थाने बान्दोरा, बांदरा हे शब्द आले असावे. पण भांडार म्हणजे वखार किंवा माल साठवण्याची जागा. समुद्री वाहतुकीने आलेला माल जिथे उतरवला/साठवला जात असे ती जागा. कदाचित फार्सी ची पूर्वभाषा प्रोटो इरानियन आणि संस्कृतची पूर्व भाषा या दोन्हीमधून एकाच अर्थाचा हा शब्द वेगवेगळा विकसित झाला असावा. स्रिलंका या देशात बंडारनायके हे नाव प्रसिद्ध आहेच. बहासा इंडोनीशिया मध्येही बंदर अ‍ॅसे वगैरे स्थाननामे आहेत.

गिरीजा | 8 March, 2013 - 19:03
मुंबई : मुंबा देवीचे मंदीर असलेले गाव मुंबा आई चे पुढे मुंबै झाले असावे
तसेच पवई हे बहुधा पद्मा देवीचे मंदीर असलेले गाव : पद्माई चे पवई झाले असावे
असे माझे मत आहे
चंबू | 8 March, 2013 - 19:04
कोपरगांवः महर्षी अगस्थी (?) तप करत होते तेव्हा गोदावरी नदीला पूर आला. त्यामूळे त्यांच्या तपश्चर्येत बाधा आली. त्यांनी नदीला "कोपराने" ढकलले. नदीचे पात्र त्यामूळे बदलले. आणि गावाचे नाव कोपरगाव झाले. आजही नदीचे जुने पात्र ओळखता येते ते "जुनी गंगा' या नावाने ओळखले जाते .

(http://www.maayboli.com/node/41723 अविनाश१ | 8 March, 2013 - 18:42 वरुन)

मुंबई व परिसरातील गावांच्या नावांची उत्पत्ति संबंधी मायबोली वर अजून एक धागा आहे..........

महिकावतीची बखर या धाग्यात मुंबई व परिसरातील गावांच्या नावा बद्दल अधिक सविस्तर चर्चा झाल्याचे आठवते !

http://www.maayboli.com/node/25764

महिकावतीची बखर ही १४ व्या ते १६ व्या शतकात लिहिली गेली असल्याने ह्यात जुन्या मराठी शब्दांचा प्रचंड समावेश आहे. कै. राजवाडे यांनी बखरीमधल्या एकूण शब्दांची संख्या मोजली ती सुमारे १२ हजार इतकी भरली. ह्यात १०३ यावनी उर्फ फारशी शब्द आलेले आहेत असे त्यानी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १२ हजारात फक्त १०३ शब्द म्हणजे मुसलमानी सत्ता येऊनही रोजच्या व्यवहारात डोईजड होईल इतकी ती कोकणात तरी फैलावली नव्हती असेच म्हणावे लागेल. संपूर्ण बखरीमध्ये उत्तर कोकण म्हणजे मुंबई - ठाणे आणि आसपास परिसरातील गावांची, नद्यांची, किल्ल्यांची आणि प्रांतांची एकूण ३९६ नावे आलेली आहेत. त्यातील महत्वाची आणि मोजकी ६० नावे पुढे देत आहे. त्यांच्या जुन्या नावांपुढे सध्याची नावे तिथे कंसात दिलेली आहेत...

१. आगाशी (आगाशी- विरार जवळ)
२. उतन (उत्तन - भाईंदर जवळ)
३. कळवे (कळवा - ठाणे शहर)
४. कान्हेरी (बोरीवली)
५. कोंडीवटे (कोंदिवडे - कर्जत - राजमाची पायथा)
६. आन्धेरी (अंधेरी)
७. कानझुरे (कांझूर - कांझूरमार्ग)
८. कालिणे (कालिना - सांताक्रूझ)
९. कोपरी (कोपरी - ठाणे पूर्व)
१०. कोलसेत (कोलशेत - ठाणे - घोडबंदर)
११. उरण (उरण)
१२. आसनपे (आसनगाव?)
१३. कल्याण (कल्याण)
१४. कांधवळी (कांदिवली)
१५. खरडी (खर्डी - कसारा जवळ)
१६. घोडबंदर (घोडबंदर ठाणे)
१७. चेउल (चौल - अलिबाग)
१८. डिडोशी (दिंडोशी)
१९. तांदूळवाडी पैलदेची (तांदूळवाडी - पालघर जवळ)
२०. ताराघर (तारापूर - पालघरजवळ)
२१. तुरफे (तुर्भे)
२२. गोराई (गोराई)
२३. चरई (चरई - ठाणे पश्चिम)
२४. चेने (चेना - ठाणे घोडबंदर)
२५. चेंभूर (चेंबूर)
२६. जवार (जव्हार)
२७. डोंगरी (डोंगरी - मुंबई)
२८. दहीसापूर (दहिसर?)
२९. गोरगाव (गोरेगाव)
३०. चेंदणी (चेंदणी - ठाणे खाडीकडील भाग)
३१. जुहू (जुहू)
३२. तळोजे महाल (तळोजा - पनवेलजवळ)
३३. दांडाळे (दांडाळेतळे वसई)
३४. नागावे (नायगाव)
३५. बोरवली (बोरीवली)
३६. भाईखळे (भायखळा)
३७. महिकावती (माहीम - पालघर)
३८. बिंबस्थान (केळवे - पालघर)
३९. देवनरे (देवनार)
४०. नाउर (नाहूर - मुंबई)
४१. मणोर (मनोरी - मुंबई)
४२. मागाठण (मागाठणे - मुंबई)
४३. वरोळी (वरळी)
४४. वासी (वाशी)
४५. वाळुकेश्वर (वाळकेश्वर)
४६. वेउर (येऊर - ठाणे)
४७. वोवळे (ओवळे - ओवळा - ठाणे घोडबंदर)
४८. वरसावे (वर्सोवा)
४९. वांदरे (बांद्रा - मुंबई)
५०. विह्रार (विरार)
५१. माझिवडे (माजिवडा - ठाणे घोडबंदर)
५२. काशीमिरे (काशीमिरे - मीरारोड मधील)
५३. सीरगाव (शिरगाव - पालघर)
५४. मुंबई (मुंबई)
५५. मुळूद (मुलुंड)
५६. सानपे (सानपाडा?)
५७. साहार (सहार - मुंबई विमानतळ भाग)
५८. सीव (शिव - सायन)
५९. साष्टी (ठाणे परिसर)
६०. सोपारे (नालासोपारा)

@ अवनी, परकीयांनी, विशेषतः इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी नावे बदलली असे नसून शक्यतो मूळ उच्चारासारखे किंवा त्याच्या जास्तीतजास्त जवळ जाणारे उच्चार ज्या स्पेलिन्गद्वारे इंग्रजांकडून होऊ शकतील अशी स्पेलिंग्स निवडली. आपण मात्र त्या स्पेलिन्ग्सचा उच्चार आपल्या इंग्लिश बोलण्याच्या धाटणीनुसार करतो. शींव (सीमा) ह्या शब्दाचा मूळ उच्चाराच्या जवळपास जाणारा ब्रिटिश उच्चार एस आय ओ एन ह्या स्पेलिंगद्वारे होऊ शकत होता म्हणून त्यांनी ते स्पेलिंग निवडले. आपण त्याचा उच्चार सायन करतो ही आपली चूक.

@ मंदार कात्रे, कोंडिवटे म्हणजे कर्जत राजमाची जवळचे गाव नसून अंधेरीनजिकचे महाकाली गुम्फा असलेले कोंडिवटे गाव आहे. सध्या ट्रेकर्समुळे कर्जत जवळचे गाव भटक्या लोकांमध्ये ओळखीचे असले तरी महिकावतीबखर-लेखनकालात महाकाली कोंडिवटे अधिक प्रसिद्ध होते. आजही अंधेरी(पूर्व) परिसरात कोंदिवटे गावाचा पत्ता कोणीही सांगू शकेल.
हा खुलासा मी महिकावतीबखर धाग्यावर केलेलाच आहे.
आसनपे हे आसनगाव नसून घाटकोपरजवळचे आसलफे आहे. सध्या त्याचा उच्चार असल्फा असा
होतो
सध्याच्या विहार तलावाच्या जागी विहाड नावाचे गाव होते ज्याचा उच्चार स्थानिक ईस्ट इंडियन (आगरी/कोळी बोली) बोली मधे विहार असा होई.
सध्याच्या वेर्सोवा चे मूळ मराठी रूप वेसावें असे आहे. कोळी लोक येस्सांव किंवा येस्सांवें म्हणतात. ह्या बाबतीत अधिक संशोधनाची गरज आहे.
साष्टी म्हणजे ठाणे परिसर म्हणण्यापेक्षा सध्याचा अंधेरी-बोरिवली घोडबंदर वगैरे १९६० पूर्वीच्या जुन्या ठाणे जिल्ह्याचा परिसर म्हणणे योग्य ठरेल. साष्टी हे बेट होते आणि ते साधारण माहीमची खाडी आणि वसईची खाडी या दरम्यानच्या पश्चिम भागात पसरले होते. पूर्वेकडचे कुरले वगैरे भाग साष्टीमध्ये येत नसत.
मुंबईवर गुजराती सुल्तनत आणि मोंगली अम्मल हा १३४७ ते १५३४ इतका काळ होता आणि पोर्चुगेझ अंमल १५३४ ते १६६८ इतका होता. म्हणजे दोघांच्याही बाबतीत प्रदीर्घ काळ म्हणता येणार नाही. या दरम्यान धर्मांतरितांच्या भाषेवर बराच परिणाम झाला. पण आज आणि बखर-लेखनकाळातही हे समाजघटक मुख्य प्रवाहापासून दूर असल्याने त्यांच्या भाषेचा मराठीवर फारसा परिणाम झाल्याचे जाणवत नाही.

हीरा, मिर्या नावाची तुम्ही दिलेली उत्पत्ती योग्य वाटतेय.
तिथे तीन मिरे आहेत.
जाकीमिर्या, भाटीमिर्या आणि सडामिर्या.

भाट म्हणजे पाणथळ जागेच्या मधेच असलेली सपाट कोरडी जागा.
ही सगळी मिरेकर मंडळी नंतर डोंगर सोडून खाली रहायला आली मग नाव झाले मिरकरवाडी.

होय अबोली, पळ्ली म्हणजे गावच. आपल्याकडे जी आळी, ओळी वली असे अन्त्य शब्द असलेली नावे आहेत ती या पळ्ळीवरूनच आलेली असावीत असे सुचवायचे होते.
@ साती.. होय, तेच ते महिकावतीबखरीमधले कोंडिविटे. आज त्याला कोण कोंदिवटे म्हणते, कोणी कोंडिविटे, तर कोण कोंडविटे. मराठीतली बहुतेक सर्वच एकारान्त नपुंसकलिंगी ग्रामनामे आकारान्त झालेली आहेत म्हणून कोंडिवट्याच्या आजचा उच्चार कोंडिविटा किंवा कोंडिवटा.

Pages