आमचें गोंय -समारोप -आजचा गोवा

Submitted by टीम गोवा on 25 February, 2013 - 18:05

***
आमचें गोंय- प्रास्तविक(१)
आमचें गोंय- प्रास्तविक(२)
आमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास
आमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता
आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)
आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)
आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही
आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १
आमचे गोंय - भाग ७ - स्वातंत्र्यलढा २
आमचे गोंय - भाग ८ - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
आमचे गोंय - भाग ९ - गोव्याची सांस्कृतिक जडणघडण
आमचे गोंय - भाग १० - गोव्याची खाद्यसंस्कृती
आमचें गोंय - भाग ११- कोंकणी भाषा: इतिहास आणि आज

***

आजचा गोवा

६ डिसेंबर १९९२ ला आम्ही आमचं सामान घेऊन गोव्यात आलो. तो दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय, कारण त्याच दिवशी अयोध्येत रामजन्मभूमीचा वाद विकोपाला जाऊन मोठाच गोंधळ झाला होता. वाटेत जागजागी पोलीस बंदोबस्त होताच. पण टीव्ही नसल्यामुळे नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नव्हता. पण गोव्यात आल्यावर फार काही टेन्शन वगैरे जाणवलं नाही.

त्यापूर्वी आमची बदली होणार हे निश्चित झाल्यावर अधिकार्‍यांनी २ पर्याय दिले होते, एक तर मुंबई किंवा गोवा. मुंबईचं आयुष्य आणि गर्दी, लोकलचा प्रवास हे सगळं आपल्याला न झेपणारं, म्हणून आम्ही गोव्यात यायचा निर्णय घेतला, आणि आजपर्यंत कधीच त्याचा पश्चात्ताप झाला नाही. बदली झाल्यावर माझा नवरा आधी बॆंकेची शाखा नक्की कुठे आहे हे पाहण्यासाठी एकटाच पुढे आला होता. रत्नागिरी- पणजी बसने येताना वाटेत म्हापश्याला त्याने बॆंकेचा बोर्ड पाहिला. माझी म्हापश्याला बदली झाली होती , त्यामुळे तिथल्या लोकांनाही भेटून यावं म्हणून तो सहजच बॆंकेत शिरला.

ओळख झाल्यावर रहायची सोय काय म्हणून प्रश्न कोणीतरी विचारला. आता जागा शोधायची आहे म्हणताच एका स्टाफने लगेच म्हटलं. “अरे, परवा तो अमका अमका जागा भाड्याने द्यायची म्हणत होता!” लगेच माझ्या नवर्‍याला स्कूटरवर घेऊन तो जागा बघायला रवाना झाला आणि म्हापश्याला बसमधून उतरल्यापासून अर्ध्या तासाच्या आत घराची किल्ली त्याच्या हातात होती! तो खरंच बॆंकेचा स्टाफ आहे का, सांगतोय तोच आहे की दुसरा कोणी आहे, काही न विचारता मालकाने जागा भाड्याने दिली! गोंयकार कोणावरही पटकन विश्वास टाकतो. अगदी आपुलकीने बोलायला लागतो. पण याच सवयीने गोव्याचा हळूहळू घात झाला. अगदी काश्मिरी, नेपाळी गुन्हेगार, रशियन आणि इतर काही ड्रग्ज विकणारे आणि इतर परदेशी लोकही किनार्‍यांवर भाड्याने जागा घेऊन बस्तान बसवून राहिले. आता परदेशी नागरिक इथे राहून हॉटेल्स चालवायचे धंदे कसे करतात, हळूहळू जागा विकतही कशा घेतात, मला माहिती नाही पण हे सगळीकडे सर्रास ऐकू येतं. ड्रग्स विकणारे आणि रेल्वेतून आलेले गुन्हेगार यानी गोव्याला फास लावलाय.

शाळा कॉलेजांमधे ड्रग्स विकणारे आणि विकत घेणारे असतात हे मुलंही सांगतात. काही पर्यटकांचे संशयास्पद मृत्यू, वाढलेली गुन्हेगारी, पर्यटकांचे वाढते अपघात गोव्याच्या बाह्य जगात असलेल्या आकर्षक चित्राला कमीपणा आणतात हे नक्कीच! विशेषत: किनार्‍यांवर हे सगळं मोठ्या प्रमाणावर चालतं असं ऐकिवात आहे. वर वर शांत दिसणार्‍या, गोव्यात आतपर्यंत खूप खळबळ चालू आहे. मुंबईहून आलेल्या आमच्या काही कलिग्जना एका किनार्‍यावर काही हिंदी बोलणार्‍यांनी “इथे बसलात तर कापून काढू” अशी हिंदीतून धमकी दिलेली मला माहिती आहे. आज अशी परिस्थिती आहे, की आमच्यासारखे सामान्य घाबरट लोक फक्त पणजीच्या मिरामार किनार्‍यावर जातात आणि जास्त उशीर न करता परत येतात.

गोव्याला भेडसावणारा दुसरा मोठा प्रश्न म्हणजे खाणींचा. गोव्यात जंगल प्रदेशात लोह खनिजाचे मोठे साठे भूगर्भात आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी खाणमालक आणि राजकारणी यांनी अंदाधुंद खाणी सुरू केल्या आणि त्यामुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम घडून आले. काही ठिकाणी जलस्रोतांवर परिणाम झाले, तर बहुसंख्य भागात लोक खाणीतून काढलेल्या खनिजांच्या धुळीमुळे विविध आजारांनी ग्रस्त आहेत. रस्ते, घरे सगळ्यांवर धुळीचे थर, एवढंच काय जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी वस्त्यांमधे येताहेत आणि विनाकारण मरण पावताहेत. काही दिवसांपूर्वी वाळपईजवळ एका ढाण्या वाघाला मारल्याचे फोटो आले त्यानंतर गोव्यात पट्टेरी वाघ आहेत का यावर चर्चा सुरू झाल्या. जुने लोक सांगतात की गोव्याच्या कर्नाटक हद्दीवरील जंगलांत ढाण्या वाघाचं अस्तित्व आहे, पण जंगलं वाघांसाठी संरक्षित करावी लागतील या भीतीने काही लोक ते होऊ द्यायला तयार नाहीत.

गोव्यातली गाड्यांची वाढती संख्या, लहान आणि वळणावळणांचे रस्ते, यामुळे अपघातांचं प्रमाणही लक्षणीय आहे. पण देशात सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असल्याची ही गोव्याला चुकवावी लागणारी किंमत आहे. शेजारच्या महाराष्ट्र् आणि कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल स्वस्त आहे आणि गाड्याही स्वस्त आहेत. तशीच दारूही स्वस्त आहे, वाढत्या अपघातांना या सगळ्याच गोष्टी कारणीभूत ठरत आहेत.

गोव्यातल्या संधीसाधू राजकारणावर सगळेच ताशेरे ओढतात, पण त्याचे इतर काही दुष्परिणाम आहेत, त्यावर कोणीच कायमस्वरूपी इलाज शोधत नाही. कारण तशी इच्छाशक्ती कोणत्याच पक्षाकडे नाही. सत्ता चालवण्यासाठी कोणत्याही मुख्यमंत्र्याला किंगमेकर आमदारांचा आधार घ्यावा लागतो, हे आमदार लहान मतदारसंघांमुळे सगळ्याच मतदारांच्या ओळखीचे असतात. मग कोणाचीही कसली मागणी पुरी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नसतं. यात काही काही विचित्र निर्णय घेतले जातात, त्यात भलतेच कोणी भरडून निघतात.

२ वर्षांपूर्वीएक विचित्र कायदा करण्यात आला. जुन्या पुरातन वास्तू संवर्धनासाठी खाजगी व्यक्तींकडे हस्तांतरित करण्याचा. एवढंच नाही तर या खाजगी व्यक्तींना संवर्धनासाठी या पुरातन वास्तू पाडून परत बांधण्याचा परवानाही या कायद्यात आहे. शिवाय कोणीही या कायद्याला न्यायालयात आव्हान देऊ शकणार नाही अशीही तरतूद या कायद्यात आहे! या कायद्याचे परिणाम काय होऊ शकतात हे अगदी कोणाच्याही लक्षात सहज यैइल. उद्या कोणीतरी हॉटेलवाला एखादी पुरातन वास्तू ताब्यात घेऊन तिथे हॉटेल चालू करील आणि आपण त्या जागेचं संरक्षण करतोय असं सांगेल. किंवा मन मानेल तसं त्या वास्तूचं नूतनीकरण करील. खांडेपार इथल्या सप्तकोटेश्वर देवळाची अशीच पुनर्बांधणी करण्यात आली आणि ती मूळ देवळासारखी नाही हे फोटो पाहताच चटकन लक्षात येतं. पण या कायद्याला फारच थोडे लोक विरोध करतायत. पणजीच्या धेंपे कॉलेजातील इतिहासतज्ञ प्रा. प्रज्वल साखरदांडे हे हाताच्या बोटावर मोजता येतील अशा या लोकांपैकी एक.

गोव्यातले बरेच तरूण परदेशी स्थायिक होतात. तिथून आपल्या कुटुंबाला पैसे पाठवतात. शिवाय पूर्वीपासून गोव्यात बरेच लोक बर्‍यापैकी पैसे बाळगून आहेत. त्यामुळे कष्टाची कामे करायला मनुष्यबळ नाही. प्लंबर वगैरे कुशल कामगार बहुधा परदेशीच जातात. त्यामुळे इथे जी उणीव भासते ती पुरी करण्यासाठी शेजारच्या कर्नाटकातले, केरळातले आणि अर्थातच उत्तर भारतीय लोक गोव्यात स्थायिक होतात. आजघडीला फळं आणि भाजीपाल्याचा व्यापार बहुतांश हुबळीच्या मुस्लिम लोकांच्या हातात आहे तर मासे व्यापार भय्यांच्या हातात. आणि इतर पाव वगैरे बेकरी प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणात केरळी लोक तयार करून विकतात. एकुणात महाराष्ट्राचं जे दुखणं आहे, तेच गोव्याचंही आहे. पण गोंयकार जात्याच सोशीक आणि दुसर्‍याला आपलंसं करून घेणारा त्यामुळे त्याने बिनधास्त आपला व्यापार परप्रांतीयांच्या हातात जाऊ दिला. गोवा हे इतकं इटुकलं राज्य आहे की हे बाहेरून आलेले लोंढे लोकसंख्येच्या वाढीत मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे सगळ्याच सार्वजनिक सुविधांवर अतोनात ताण पडायला लागलाय.

गोंयकार २०२० सालापर्यंत गोव्यात अल्पसंख्य होतील अशी साधार भीती व्यक्त करण्यात येते, याला गोंयकारांकडे काही उपाय आहे का माहिती नाही. पण लवकर काही उपाय केले नाहीत तर इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती लवकरच नाहीशी होईल अणि एक बिनचेहर्‍याचं शहरीकरण झालेलं कलेवर इथं राहील याचं दु:ख आणि भय वाटतं.

आजपर्यंतच्या गोवेकरांच्या प्रेमाची, विश्वासाची परतफेड करता येणार नाही, पण इतकी वर्षं गोव्यात राहिल्यानंतर गोव्याबद्दल काही लिहायची संधी मिळालं हे मी माझं नशीब समजते, यातून गोव्याचं माझ्यावरचं ऋण थोडंतरी फेडलं असं मी म्हणू शकते. ही मालिका पुरी करण्यासाठी अनेक पूर्वसूरींना वाट पुसत आम्ही लिहिलं. त्यातील काही म्हणजे, बा.द. सातोसकर, यांचं 'गोवा - प्रकृती आणि संस्कृती'’, त्यांचेच गोमंतक ग्रंथाचे खंड, रियासतकार सरदेसाईंची रियासत, वामन राधाकृष्ण यांचं 'मुक्तीनंतरचा गोवा'’, बाळशास्त्री हरदास, मनोहरराय सरदेसाय, माधव गडकरी, अ.का.प्रियोळकर यांची पुस्तकं, उल्हास प्रभुदेसाई यांचं 'गंगावळ्ळी, नेत्रावळी, शंखावळ्ळी'’ आणि त्यांची इतर काही पुस्तकं, टिओटिनिओ डिसूझा यांची काही पुस्तकं, सरकारी गॆझेट्स आणखी इतरही खूप काही. सगळ्यांचाच उल्लेख करणं शक्य नाही पण या सार्‍यांचंच ऋण आमच्यावर आहे. तसेच या लेखमालिकेच्या निमित्ताने आम्हाला गोव्याचा इतिहास आणि समाजजीवनाचे ताणेबाणे यांचा अभ्यास करायला मिळाला याबद्दल ही मालिका लिहायची कल्पना करणार्‍या आणि आम्हाला लिहायला लावणार्‍या श्री. बिपिन कार्यकर्ते यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. ही मालिका मिसळपाव’ या संस्थळावर आणि त्यासोबत मायबोली’ आणि मीमराठी’ या संस्थळांवर एकाच वेळी प्रसिद्ध होत होती. त्यासाठी या सर्व संस्थळांचे चालक, व्यवस्थापक आणि वाचक यांच्या आम्ही अतिशय ऋणी आहोत.

काही वर्षांपूर्वी मी एक योगाचा कोर्स केला होता, तेव्हा एका कार्यक्रमासाठी आम्ही काही जण म्हापश्याहून पणजीला सकाळी ६.00 च्या दरम्यान पोचलो. तेव्हा आताच्यासारख्या गाड्या नव्हत्या. त्यामुळे ५/६ स्कूटर्स/मोटारसायकलींवर आम्ही १०/१२ जण गेलो होतो. पणजीत पोचलो आणि एकाच्या व्हेस्पाचा टायर पंक्चर झाला. स्कूटरचं किट नेमकं कुणाकडेच नव्हतं. आता मिरामारपर्यंत कसं पोचायचं याचा विचार सुरू होता, तेवढ्यात एकजण व्हेस्पावरून येताना मला दिसला. काही विचार न करता मी त्याला हात करून थांबवलं. किट आहे का विचारलं. नेमकं त्याच्याकडे होतं. तो म्हणाला, “तुम्ही पंक्चर काढा, मी तोपर्यंत दूध आणि पेपर घेऊन येतो.” बर्‍याच जणांची मदत असल्याने पटकन पंक्चर झालेला टायर बदलून झाला.

थोड्या वेळात तो परत आला. “देव बरें करूं” म्हणत त्याचं किट परत देऊन आम्ही निघालो. माझा सहप्रवासी मला विचारायला लागला, तो व्हेस्पावाला तुझ्या ओळखीचा आहे का? मला हसू आलं, कारण पणजीला यायची वेळ सुद्धा फार क्वचित यायची. मी म्हटलं, “थेट नाही, पण तशी एकुणातच मी गोंयकारांना ओळखते आणि त्यांच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे.” हा विश्वास आजही कायम आहे. म्हणूनच गोव्याच्या पद्धतीने तुम्हालाही म्हणते, “देव बरें करूं!”

- ज्योति कामत

- इति लेखनसीमा -

*****

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (ज्योति_कामत, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा
दोन नंबरचा फोटो आमोण्याचा नसून खोर्जुवे- हळदोणेचा केबल स्टेड पूल आहे बरोबर ना?

बाकी सगळ्या माबोकरांचे या आमच्या मालिकेला दिलेल्या प्रतिसादांबद्दल आणि गोव्याबद्दल असलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. Happy

असाच लोभ असुद्यात आमच्या गोव्यावर.

-टीम गोवा

दिनेशदा, फोटोमधल्या नागेशीच्या समोरच्या घरांतले एक घर आमचे वझे कुटुंबियांचे आहे बरं.... सुखद धक्का आहे Happy धन्यवाद.

प्रीत्मोहोर, नक्की माहीत नाही. तो फोटो ( माझ्या कॅमेराने ) गिरीराजने काढला होता. नव्यानेच तो ब्रिज झाला होता त्यावेळी.

सुमेधा, आधी माहीत असते तर डोकावलो असतो ना घरात !

दिनेशदा, पुढच्या वेळेस नक्की या. आमचे कुटुंबीय चांगले अगत्यशील आहेत. Happy
ज्योती, मी गोवा टीमला एक मेल पाठवली आहे संपर्कातून ती बघाल का?

संपली पण लेखमाला Sad

संपूर्ण लेखमाला आवडली; आपले प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट संपूर्ण लेखांमधून दिसून येतात. त्रिवार अभिनंदन....

लेखमालेचे अजून काही भाग गोव्यातल्या कलाकारांवर, कलाप्रकारांवर,(जसे डिचोलीचे मातीकाम) व अनवट ठिकाणांवर (जसे नेत्रावळीचे बुड्बुडतळे, काब द राम किल्ला), जुन्या पुराण्या पण अजूनही राहत्या घरांवर ई. वर करता येतील तर पहा ही कळकळीची विनंती.

मंदार कात्रे आणि हर्पेन, धन्यवाद!
हर्पेन, तुमच्या सूचनेप्रमाणे जरूर असे विशेष लेख अधून मधून लिहू!

प्रीतमोहर, बरोबर अगदी! कोर्जुवे-हळदोणा पूल आहे तो!
मला मात्र फेरीने जायला आवडायचे...

उत्तम लेख!
गोव्याला भेडसावणारा दुसरा मोठा प्रश्न म्हणजे खाणींचा.>>>> हे अगदी जवळून पाहीले आहे. गोव्याचा पूर्व भाग हा तर खाणींनी पोखरून काढला आहे. सोडून दिलेल्या खाणी आणि त्यातल्या निरुपयोगी मातीचे डोंगर हे अस्थानिक वनस्पतीनी भरून गेले आहेत. आम्हि किती पर्यावरणवादी आहोत हे दाखवण्यासाठी खाणमालकांनी अंदाधुंदपणे वाढणार्‍या वन्स्पती तिथे लावून रान माजवून ठेवले आहे.

गिरीराज Happy
मलाही फेरीच फार आवडते. अर्थात लहानपणीची मज्जा आता नाही. पण मांडवीवरच्या रायबंदर-दीवाड, रायबंदर पोंबुर्फा ह्या फेर्‍या अजुनही स्पेशल आहेत Happy

खाणींचा प्रश्न? मला विचारा . माझ्या घराच्या अगदी उंबर्‍यापाशी खाण येउन टेकलीये अस म्हणु शकते मी. गेल्या काही महिन्यात खाणी बंद असल्यापासुन तिथे जगणं सुसह्य झालय, सगळ्यांचच माणसं आणि जनावरांचही. माझ्या लहानपणी आमच्या शेतात मोर यायचे धान्य खायला आणि आम्ही त्यांची पिसे वेचत असु. त्यानंतर आत्ता आत्त्ता कित्तीतरी वर्षांनी मोर शेतात पहायला मिळाला, अन्यथा आमच्याच काजुंच्या वनातल्या मंदिरापाशी कधीतरी दिसणारा हा मोर मला दुर्मिळच होतोय का असेच वाटत होते.
आम्ही आमच्या कुळागरातील व्हाळ कितीतरी वर्षात स्वच्छ पाणी वाहुन नेतोय हे चित्र पाहिले नव्हते. ते आत्ता दिसायला लागलेय. आमच्या केळींची पाने लाल असतात असाच समज झाला होता लहान चुलतभावाचा, तर आत्ता पुन्हा हिरवीकंच दिसणारी पाने पाहुन विचारतो अग सरड्यासारखा आपल्या केळींनीही रंग बदलला की काय? असो... काय काय न किती लिहिणार
पिसुर्ले -अडवय च्या ह्या चौगुले कंपनीच्या खाणी ज्यादिवशी कायमच्या बंद होतील तो सुदिन.

सुरेख लेखमाला.. इतक्या सुंदर माहितीबद्दल धन्यवाद.

गोव्याला माझा काका राहतो. त्याचं घर मोतीडोंगर परिसरामधे येतं. पूर्वी गोव्याला खूप येणंजाणं असायचं तेव्हा प्रचंड फिरलो होतो. मी आणि माझा आतेभाऊ तर दिवसदिवस भटकत असायचो. आता मात्र गेल्या कित्येक वर्षामधे गोव्याला येणं झालंच नाही. या लेखमालेमुळे पुन्हा एकदा गोवा फिरावासा वाटतोय.

<<<गेल्या काही महिन्यात खाणी बंद असल्यापासुन तिथे जगणं सुसह्य झालय, सगळ्यांचच माणसं आणि जनावरांचही.>>>+१०००००००००००००००००
सेम हियर प्रीतमोहर..
बाकी काही प्रतिक्रिया देणं टाळत होते कित्येक दिवस..माझ्या लहानपणीचा गोवा हरवत चालल्याचं दु:ख येऊन टोचलं लेख वाचून.. शब्दच सुचत नव्ह्ते.. Sad
पण टीम गोवाने घेतलेल्या कष्टांबद्दल अभिनंदन केलंच पाहिजे.. अतिशय सुंदर लेखमालिका.. तुमच्या-आमच्या आठवणीतला गोवा तसाच रहावा अशी प्रार्थना करुया फक्त.. Happy

दिवाळीत घरचे सगळे मिळून पाच दिवस दक्षिण गोव्यात पैंगीण (काणकोण) ला जाणार आहोत. त्यानिमित्ताने ही लेखमाला वाचली. फारच छान, अगदी जमून आले आहेत सगळे लेख!

बुडबुड्यांचे तळे, तांबडी सुर्ला हे बघायचे ठरवले आहे त्याशिवाय (पैंगीणला राहून) दोनतीन दिवसात आसपासची कोणती ठिकाणे पाहाता येतील?

पाळोळे बीच, 'काब द राम' किल्ला जवळ आहेत
माझ्यामते गोव्याच्या त्या भागातून तांबडी सुर्ला जरा लांब पडेल पण कर्नाटकातले सदाशीवगड, कारवार जास्त जवळ आहे.

संपली पण लेखमाला Sad
संपूर्ण लेखमाला आवडली; आपले प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट संपूर्ण लेखांमधून दिसून येतात. त्रिवार अभिनंदन....
लेखमालेचे अजून काही भाग गोव्यातल्या कलाकारांवर, कलाप्रकारांवर,(जसे डिचोलीचे मातीकाम) व अनवट ठिकाणांवर (जसे नेत्रावळीचे बुड्बुडतळे, काब द राम किल्ला), जुन्या पुराण्या पण अजूनही राहत्या घरांवर ई. वर करता येतील तर पहा ही कळकळीची विनंती.
>>>>>>>>>>>
अगदी माझ्याही मनापासून...

Pages