ऐक जरा ना! - वासंती मुजुमदार

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 00:28

Mabhadi LogoPNG.pngनिर्मल निर्भर वातावरणी
धुके तरंगे धूसर धूसर,
झगमगते अन् नक्षी त्यावर
सोनेरी किरणांची सुंदर...

किंवा

तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्यांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे– शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे. गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.


पण ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली
आणि मग कधी झोप लागलीच नाही
.

किंवा

तुला विसरण्यासाठी
पट सोंगट्या खेळते;
आकांताने घेता दान
पटालाही घेरी येते!

असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत
कशा तुझ्या आठवणी
उभ्या कट्टीत.. कट्टीत!

अशा उत्कट आणि गहिर्‍या कविता इंदिरा संतांच्या. विलक्षण सौंदर्य आणि असहनीय दु:ख, एकाकीपण यांची एकत्र अनुभूती देणार्‍या...

विशुद्ध भावकाव्य लिहिणारी कवयित्री, अशी इंदिरा संतांची ओळख. इंदिराबाई मूळच्या शिक्षिका. बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या. १९३५ साली प्रा. ना. मा. संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळी दोघंही पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात शिकवत होते. 'सहवास' हा या दोघांच्या कवितांचा संग्रह.

इंदिराबाईंनी निसर्गावर मनापासून प्रेम केलं, आणि हे प्रेम त्यांच्या कवितांमध्ये उतरलं. लग्नानंतर जेमतेम दहा वर्षांत वैधव्य आलं. पदरी लहान मुलं होती. इंदिराबाई धीरानं पुन्हा उभ्या राहिल्या. नोकरी करून मुलांना वाढवलं. जोडीदार गमावल्याचं दु:खही त्यांच्या कवितांमधून बाहेर आलं.

१९५१ साली इंदिराबाईंच्या 'शेला' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, आणि त्यातल्या अप्रतिम सुंदर कवितांनी इंदिराबाईंना ओळख मिळवून दिली. 'इतकं सोपं, पण गहिरं काव्य मराठीत कोणीही लिहिलं नाही', असं 'शेला'तल्या कवितांबद्दल अनेक वर्षांनी श्रीनिवास कुलकर्ण्यांनी लिहिलं.

'मेंदी', 'मृगजळ', 'रंगबावरी', 'चित्कळा', 'बाहुल्या', 'वंशकुसुम', 'गर्भरेशमी', 'निराकार' असे काव्यसंग्रह नंतर प्रसिद्ध झाले. या राजवर्खी कवितांमधून इंदिराबाईंनी चकित करणारं असं लेखनसामर्थ्य दाखवलं. या कवितांमध्ये दिसलेलं सौंदर्य, एकाकीपण, अपुरेपण यापूर्वी इतक्या तरलतेनं क्वचितच कोणी मांडलं होतं. त्यांच्या कवितांमधला नेमक्या शब्दांत व्यक्त केलेला भावनांचा कल्लोळ वाचकांसाठी नवा होता. अतिशय अस्वस्थ करणारी आर्तता इंदिराबाईंच्या कवितांचा स्थायिभाव होती, आणि ही आर्तता व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या अनोख्या निसर्गप्रतिमांमुळे त्यांच्या अंतरीचा उद्गार वाचकांपर्यंत सहज पोहोचला.

इंदिराबाईंच्या कवितांइतकंच त्यांचं ललितगद्यही वाचकप्रिय ठरलं. 'फुलवेल' हा त्यांच्या पहिला ललितलेखसंग्रह. नंतर त्यांनी 'तरुण भारत'साठी विजय कुवळेकरांच्या आग्रहाखातर स्तंभलेखन केलं. हे लेख 'मृद्गंध' या संग्रहात एकत्र केले गेले.

या लेखांमधून, किंवा कवितांमधूनही इंदिराबाईंनी निसर्गाची अनेकविध रूपं रेखाटली. सुखद, सुंदर असा निसर्ग इंदिराबाईंना नाजूकपणे रेखाटला. हा निसर्ग अनेकदा एकट्या, स्वतंत्र, उरात कायम दु:ख बाळगून असलेल्या स्त्रीची प्रतिमा बनूनही आला. पण इंदिराबाईंप्रमाणेच त्यांच्या लेखांमधली, कवितांमधली स्त्री ताठ कण्याची होती. आपलं स्वत्व राखणारी होती. 'खरं स्त्रीत्व हे इंदिराबाईंच्या कवितांमध्ये सापडतं', असं दुर्गाबाई भागवतांनी 'कालनिर्णय'च्या एका दिवाळी अंकातल्या लेखात लिहिलं होतं.

इंदिरा संतांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ४ जानेवारी, १९१४ हा त्यांचा जन्मदिन, आणि १३ जुलै २००० रोजी त्यांचं निधन झालं. यंदाच्या मराठी भाषा दिनानिमित्तानं आपण मायबोलीवर इंदिरा संतांच्या कवितांचा पुन्हा एकदा आस्वाद घेणार आहोत, त्यांचं ऋजु व्यक्तिमत्त्व, त्यांच्या कवितेमागच्या प्रेरणा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

इंदिराबाईंच्या मृत्यूनंतर प्रख्यात लेखिका व चित्रकर्त्री वासंती मुजुमदार यांनी त्यांच्या लाडक्या आक्कांवर 'ललित' मासिकात एक स्मृतिलेख लिहिला होता. वासंतीबाई या इंदिरा संतांच्या मानसकन्या. इंदिराबाईंसारख्याच तरल आणि संवेदनशील मनाच्या. वासंतीबाईंची चित्रं जितकी सुंदर, तितकंच नितळ त्यांचं लेखनही होतं. 'नदीकाठी' आणि 'झळाळ'मधलं सुंदर ललितगद्य असो, किंवा 'सहेला रे'मधलं भावकाव्य, वासंतीबाईंचं लेखन हे रंग, रूप, रस यांचा एक उत्फुल्ल उत्सवच भासतं.

जुलै महिन्यात इंदिराबाई गेल्यानंतर ऑगस्ट महिन्यात हा लेख प्रसिद्ध झाला. हा लेख वासंतीबाई आणि इंदिरा संत यांच्या नात्याबद्दल खूप काही सांगून जातो. वासंतीबाईंनी आणि इंदिराबाईंनी आपल्या अनेक स्फुटांतून, ललितलेखांतून एकमेकींबद्दल लिहिलं आहे. त्या दोघींना एकमेकींबद्दल वाटणारा जिव्हाळा या लेखांतून दिसून येतो. खाली पुनर्मुद्रित केलेला लेख मात्र या लेखांपेक्षा फार वेगळा आहे. वासंतीबाई अजून दु:खातून सावरल्या नसाव्यात, आक्कांचं निधन त्यांनी स्वीकारलं नसणारच. त्यामुळे काही ठिकाणी इंदिराबाईंचा वर्तमानकाळातला उल्लेख येतो. वासंतीबाईंचं हळवेपण त्यांच्या कवितांमधून दिसून येतं. या लेखातही ते जाणवतं.

indira sant.jpg

संपादक,
’ललित’ यांस
सप्रेम नमस्कार.

आपण मला इंदिरा संत यांच्या कवितेविषयी किंवा त्यांच्याविषयी लिहायला सांगितलं आहे. पण समीक्षक म्हणून त्याच्या साहित्याचं वाचन मी कधीच केलं नाही. आपल्या माणसाचं, आपल्याला आवडणारं लेखन, हीच भूमिका नेहमी अधिक प्रभावी झाली. पाडगावकर, श्रीनिवास यांच्या लेखनाशीही मी कधी परीक्षणकार या नात्यानं जोडली गेले नाही, आक्कांप्रमाणेच जिव्हाळ्याच्या नात्यानं दृढपणे जोडली गेले. अशा जवळच्या माणसांनी उत्तम लेखक असावं, हा वेगळा भाग. त्यामुळे आणि मी सिद्धहस्त लेखक नसल्यामुळे आक्कांच्या समग्र कवितेवर चटकन लिहून देणं मला अवघड वाटतं.

काही लेखकांशी खूप सहवास नसूनही असं घट्टं नातं जुळल्याच्या माझा अनुभव आहे. कुसुमाग्रज, पु.ल., व्यंकटेश माडगूळकर अशी बरीच नावं मला सांगता येतील. यांचं लेखन वाचताना मला खरोखरच आनंदाने भरून येतं. ह्यांच्या काळात आपण आहोत, म्हणजे भाग्यवानच आहोत असं मला वाटतं.

तर, सांगायचं असं, की इंदिरा संत यांची कविता आणि अन्य लेखन मी वाचलं, इतकंच नव्हे तर त्यातलं अलीकडच्या काही वर्षांतलं लेखन मी साक्षीत्वानं अनुभवलं. त्यांच्या काही संग्रहांची शीर्षकनामं ठरविण्याचा अधिकारही त्यांनी मला दिला. इतकी गुंतवणूक असल्यावर लिहिता यायला पाहिजे होतं, पण मला ते जमत नाही आहे.

मात्र तुमच्या या लेखाच्या मागणीच्या निमित्तानं मला वेगवेगळं काही सतत आठवत मात्र राहिलं आहे - 'स्ट्रेबर्डस्'प्रमाणे.

इंदिराबाईंबरोबर नाशिकला गेले होते, ती आठवण मनात गुंजत राहिली आहे. कुसुमाग्रजांकडे आम्ही गेलो होतो आणि तिथला अनौपचारिक, न बोलावलेला दरबार पाहून नकळत आम्हीही भारावून गेलो होतो. 'कुसुमाग्रज' ही व्यक्ती जो जो शब्द उच्चारेल, तो सत्य असेल, किंबहुना तेच 'सत्य' असेल असा विश्वास देणारा त्यांचा स्वर माझ्या अंतःकरणात नेहमीसाठी दरवळत राहिला आहे. एक गंमत म्हणून सांगते, त्या दिवशी कुसुमाग्रजांनी आम्हांला जी बर्फी दिली ना, त्याची चव अजोड होती. खरं म्हणजे आणखी चार वड्या मागून घ्याव्यात, असा मोह होत होता. पण केवळ संकोचामुळे आम्ही दोघीही गप्प राहिलो. नंतर किती तरी वेळ कुसुमाग्रजांच्या ऊबदार घराविषयी, मृदु बोलण्याविषयी आणि मोकळं, छान हसण्याविषयी आम्ही बोलत राहिलो, तो अभिमंत्रित वेळ आठवत राहिलो.

नंतर नाशिक हिंडलो सकाळी सकाळीच. गोदाकाठी आणि किती तरी निसर्गरम्य ठिकाणी. बरोबर यशवंत पाठक होते. एका प्रतिभावान लेखकाच्या प्रासादिक वाणीची किमया कशी आनंद वाढवते, याचा प्रत्यय पाठकांच्या बरोबर नाशिकमध्ये हिंडताना आला. साडीचा घोळ घोट्याच्या वरती उचलून, गोदावरीच्या पात्रात पाय बुडवून किंचित वाकून उभ्या राहिलेल्या आक्का आत्ताही मला समोर दिसत आहेत. तो नदीकाठ पुन्हा जागा होतो आहे आणि अधिकच प्रसन्न वाटतं आहे.

अशा प्रसन्नपणाचा अनुभव प्रत्येक जण घेत असतोच नाही का?

असं प्रसन्नपण मी शाळेत शिकत असल्यापासूनच अनुभवलं आहे. त्या वेळी जे जे वाचनात येई, त्यांमध्ये कुसुमाग्रज, ना. घ. देशपांडे, बा. भ. बोरकर, मर्ढेकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, इंदिरा, शांता शेळके, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार, गाडगीळ, भावे, गोखले अशी हिरेमाणकांची नावं असत. या सर्वांच्या लेखनानं भारलेल्या दिवसांत, स्वतःही भारली जाऊन मी वाढत होते. साहित्यावर जीव जडला, तो या लोकांमुळे. इंदिरा संतांच्या कवितेचा प्रभाव मर्ढेकरांच्या प्रभावासारखाच होता, तरीही त्याचं स्वरूप एकमेकांहून अगदी भिन्न होतं. माझी कवितेची आवड वाढविण्यात सर्वांच्या बरोबर इंदिरा संतांच्या कवितेचा वाटा खूपच होता, असं आता लक्षात येतं. मात्र, या सर्व लोकांना मी छापील शब्दांतूनच ओळखत होते. यांपैकी कुणालाही कधी प्रत्यक्ष भेटावं, असं कधी मनातही नसायचं. त्यांच्या लेखनातून मिळणारं समाधान पुरेसं वाटायचं. अशा थोरामोठ्यांना भेटण्याचा प्रसंग कधी अवचितही घडला नव्हता. पण अचानकच तसा योग आला.

इंदिराबाईंचे मोठे चिरंजीव प्रकाश कर्‍हाडला नोकरीच्या निमित्ताने आले. त्यांची केव्हातरी ओळख झाली. इंदिराबाई त्यांच्याकडे यायच्या होत्या आणि ते आईला घेऊन आमच्या घरी येणार होते. ज्यांची कविता मी उत्सुकतेनं वाचत होते, मनात भरभरून साठवून ठेवत होते, माझ्या भावानुभवांशी, संवेदनांशी जवळची मानत होते, अशा इंदिराबाई प्रत्यक्ष आपल्या घरी येणार, या कल्पनेनंच मी हरखले होते. कवीला प्रत्यक्ष बघण्याचा तो पहिलाच योग असणार होता. त्या कशा दिसतील, काय बोलतील, याचं कुतूहल वाढत चाललं होतं. इंदिराबाईंच्या येण्याचं माझ्या घरात सगळ्यांनाच अप्रूप वाटत होतं. त्या आल्या. काही मोलाचं डोळ्यांसमोर साक्षात व्हावं, तसा आनंद वाटत होता.

उंच, रुंद कपाळ असणारी गोरटेली मुद्रा, त्यावरचे शांत भाव, किंचित भुरी छटा असणार्‍या पातळ केसांची लहानशी वेणी, नऊवारी छापील पातळ, असं त्यांचं पहिलं दर्शन झालं. अरे, या तर आपल्या आईसारख्याच दिसतात, असा विचार माझ्या मनात येऊन गेला.

इंदिराबाई सगळ्यांशी बोलत होत्या. माझ्या आईशी तर विशेष खुलासपणानं. माझ्या आईला वाटलं होतं, एवढ्या थोर कवयित्री आपल्या घरी येणार, आपल्याला कसं काय यांच्याशी बोलायला जमणार? पण त्यांच्या बोलण्यात असे विषय येत गेले की, माझी आई अगदी समरसून त्यांच्याशी कधी बोलायला लागली, ते तिलाही समजलं नाही. वर्षाची वाळवणं कुठं घालता, आजकाल जमिनीची सारवणं घालणं जात चाललंय, तुमच्याकडची सारवणं स्वतःच करता का? बरी अजून तुमच्या स्वैंपाकघरात वाईलचूल टिकून आहे... उंबर्‍यावरची, अंगणातली रांगोळी रोज घालता का... असे तिच्या जिव्हाळ्याचे कितीक विषय इंदिराबाईंच्या बोलण्यात होते. जुनी मैत्रिण भेटली असावी, तशी माझी आई त्यांच्याशी बोलताना रंगून गेली होती. तिनं केलेले पदार्थ इंदिराबाईंनी चवीनं चाखले. निघताना अगदी मनभरून हसल्या त्या. जिवणीच्या कडांतून आणि डोळ्यांतूनही.

त्या जायला निघाल्या, तेव्हा मी त्यांना जराशा संकोचानंच एक भेट दिली. ते एक सुगरणीचं घरटं होतं, आणि घरट्यात मी डबलक्रेपची बटमोगर्‍याची फुलं करून घरटं सजवलं होतं. शिवाय, हिवाळ्यातलं तिन्हीसांजेचं आकाश, त्यातली रंगांची क्रीडा रंगवलेलं तैलचित्रही घरट्याबरोबर भेट म्हणून होतं. मनातून वाटत होतं, असली काय चमत्कारिक भेट, असं नाही ना त्यांना वाटायचं? पण उलटंच झालं. भेट त्यांना फार आवडल्याचं नंतर त्यांनी मला कळवलं. त्या आमच्या घरच्या भेटीत त्या कवितेविषयी, स्वतःच्या लेखनाविषयी काही बोलतील असं मला वाटलं होतं. पण साहित्याविषयी त्या काहीही बोलल्या नाहीत. नंतर मला वाटत राहिलं, बोलल्या नाहीत ते एका परीनं बरंच झालं. नाहीतर आपण काय संवाद करणार होतो त्यांच्याबरोबर? बेळगावहून पाठवलेल्या पत्रात भेट आवडल्याचं कळवताना इंदिराबाईंनी माझ्या चित्रातल्या रंगांना 'तीव्रसुंदर' रंग असं म्हटलं आणि एका शब्दातूनही त्यांची नवी कविता वाचली, असा आनंद मला झाला.

नंतर काही ना काही निमित्तानं भेटी होत राहिल्या आणि प्रत्येक वेळी स्वच्छ, निर्मळ प्रवाह असलेल्या, रुंद, खोल पात्र असलेल्या संथ नदीतून आतवर भिजून जावं, तसं काहीसं वाटत राहिलं.

या काळात त्या माझ्या लेखी इंदिराबाईंच्या 'आक्का' कधी झाल्या ते माझ्याही लक्षात आलं नाही. एकमेकींत जवळीक निर्माण झाली खरी. पण मला असा एकही प्रसंग आठवत नाही की आम्ही आपापल्या व्यक्तिगत आयुष्याविषयी, त्यातल्या अडीअडचणींविषयी एकमेकींशी कधी बोललोय! मी त्यांना आजवर कधी कसला प्रश्न विचारला नाही आणि त्यांनीही मला कधी कसला प्रश्न विचारला नाही.

आयुष्याच्या इथवरच्या प्रवासात आक्कांना तर्‍हातर्‍हांची माणसं भेटली. नात्याची, बिननात्याची. वेगवेगळ्या प्रसंगांतून जावं लागलं. अनेक स्थलांतरं झाली. उमेदीच्या काळात स्थिर आयुष्य लाभलं नाही. तवंदीसारख्या खेड्यात लहानपण गेलं. शिक्षणासाठी तवंदी-बेळगाव-कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर अशी यात्रा झाली. संसारातही मुंबई-पुणे-बेळगाव असा प्रवास झाला. परंतु या सगळ्या ओढाताणीत त्या त्या काळात, त्या त्या ठिकाणी जे जे चांगलं हाती आलं, तेच आक्का मिळवून जपत गेल्या. या मिळकतीत जिवाभावाच्या माणसांचा स्नेहभाव आला, त्याच जोडीला निसर्गाचं, प्राण्यांचं प्रेम आलं... स्त्रियांच्या ओव्या आल्या. कारण आक्कांची जगण्याकडे पाहण्याची दृष्टी नेहमीच, अगदी आजपर्यंत स्वागतशील, होकारात्मक राहिली.

तरुण वयात आक्कांनी भीषण आघात सोसले. एकटेपण वाट्याला आलं. कारल्याच्या मांडवाखालून घडीघडी जावं लागलं. पण आक्कांनी कुठंही माघार घेतली नाही. आल्या प्रसंगाशी त्यांनी जिद्दीनं झुंज दिली आणि ती जिंकली. पुष्कळ माणसं पराक्रम गाजवतात. अनेक वेळा जिंकतातही. परंतु त्या लढाईत विजयामुळे मनाचा एक विचित्र खरखरीतपणाही त्यांच्यापाशी जमा होतो. त्यांची संवेदना बोथट होण्याची शक्यता असते. परंतु त्यांच्या बाबतीत हे घडलं नाही. परिस्थितीशी युद्ध हे त्यांनी 'युद्ध' कधी मानलं नाही. 'हं, आता अमुकतमूक करायचं - अशा पद्धतीने आयुष्यक्रम हवा...' इतका सरळ विचार त्या युद्धाच्या पाठीमागे उभा केला. त्यामुळेच, त्या जरी लढाई जिकत गेल्या तरी खरखरीतपणा, रूक्षपणा त्यांच्या आसपास फिरकला नाही, आणि उत्स्फूर्तता आजपर्यंत टिकून राहिली. क्वचित कुठे इतक्या जोमाने दिसणारी उत्स्फूर्तता आढळते. अगदी हेवा वाटावा अशी, आणि ती आक्कांमध्ये आहे याचा अतिशय आनंद वाटतो. त्यांच्या या वृत्तीमुळे त्यांची निर्मितीची शक्तीही अधिकाधिक जोरकसपणे वाढली. दूरदर्शनसाठी त्यांची मुलाखत घेतली, त्या वेळी आजारपणानं त्या गांजलेल्या दिसत होत्या. पण 'फार शीण आला' असं एकदाही न म्हणता, "दहा-वीस मिनिटांसाठीसुद्धा हेमामालिनी, झीनत एवढाल्या रकमा का घेत असतील, ते कळलं बघ मला", एवढंच त्या बोलल्या.

'शतपावली'सारख्या साध्याशा विषयावर लिहितानाही त्यांच्या मनाची ही स्वागतशील वृत्ती प्रकट होते. सामान्यांच्या जीवनातही शतपावलीला महत्त्व असतंच. काळजीचा बुक्का आणि आनंदाचा गुलाल त्या पावलांतून उमटत जाताना त्या व्यक्तिला किती हलकं वाटत असेल! दिवस-रात्रींनी सीमित झालेलं आपलं जीवन म्हणजे आक्कांना शतपावल्यांचा उत्सवच वाटतो. कधी काही कर्तव्यं बोटाशी धरलेली, स्वप्नं छातीशी सांभाळलेली, कधी कुणाची ओझी आपल्या खांद्यावर घेतलेली...पावलापावलांतून सुखदु:खाची, उन्हा-सावलीची जाळी पसरणारी. आपल्याबरोबरच दुसर्‍यालाही समाधान देणारी ही जीवनाची शतपावली किती रम्य असते... पण ती आपल्याला जाणवायला हवी...

प्रत्येक लहानसहान गोष्टीतूनही रम्य असं काही शोधणारं आक्कांचं मन म्हणूनच सदा सतेज राहत असेल. ज्या भावनेचा आकार शब्दांत पकडता येत नाही, जी फक्त जाणवते, असं काही निसुटतं भावरूप सुचवण्याची शक्ती या त्यांच्या वृत्तीतूनच आली असावी असं मला वाटतं.

आक्कांसंबंधी बोलताना त्यांची कविता तात्पुरती बाजूस ठेवून बोलावं म्हटलं तरी ते शक्य नसल्यामुळे भावरूप सूचकपणे सगुण करण्याच्या त्यांच्या शक्तीचं उदाहरण म्हणून मला कवितेच्याच ओळी सांगाव्याशा वाटतात. त्यांनी एक कविता आहे, 'उगीच... उगीच'. अशी आहे ती:

उगीच... उगीच

"किती उन्हाची आलीस!" "उगीच."
"अशी गप्पशी..." "उगीच."
"चहा का नको?" "उगीच."
"पाणी तरी...?" "उगीच काय..."
समोर पाण्याचा ग्लास.
स्फटिकासाठी पाणपाखरे आत डुबकलीं,
डुबकतांना काठाशी किलबिललीं, "उगीच उगीच."
"हसायला काय झालं?" "उगीच."
"हें ’उगीच उगीच’ काय चाललंय..."
पुन्हा 'उगीच' म्हणालें नाही. नाहीतर उगीच...
ग्लास उचलून ओठाला लावला तर ती
पाणपाखरें चोचीं वर करून किलबिललीं,
"उगीच...उगीच!"

पिऊं की हसूं करतां ठसका लागला,
ग्लासातून निसटतांना एक खडीसाखरी पाणपाखरू
किलबिललें, "उगीच...उगीच..."

आक्कांच्या प्रत्येक निर्मितीला असंवेद्य असं अवकाश असतं. या 'उगीच...उगीच' कवितेतून मला असा अवकाश जाणवत राहतो.

असंच असंवेद्य अवकाश आक्कांना मालणींच्या भावगाथांमध्ये दिसलं. त्यांच्या बारीक नजरेनं ते शोषून घेतलं आणि मग त्याची नीटस अशी पुनःनिर्मिती केली. इथं मला आक्कांचं कुमारजींच्या वृत्तीशी साम्य दिसतं. लोकसंगीतातलं नेमकं तेच उचलून आपल्या शास्त्रीय ज्ञानाच्या मुशीतून ते काढून नवे धुनउगम राग कुमार गंधर्वांनी निर्माण केले. अस्ताव्यस्त रूपातल्या पसरट आणि विखुरलेल्या ओव्यांमधून आशयानुरूप वेचणी करून आक्कांनी नऊ नऊ ओव्यांच्या मालणींच्या भावगाथा निर्माण केल्या.

आमच्याकडे आक्कांची आणि कुमारजींची भेट झाली. तो सोहळा मला अजून आठवतो. कुमारजी बोलता बोलता 'नैया मोरी निके निके चालन लागी' गायले आणि नंतर आक्कांनी याच शीर्षकाचा सुंदर लेख लिहिला. त्या दिवशी कुमारजींना वाळकेश्वरला पोहोचवायला गेलो आणि नि:शब्द आनंदाचा प्रत्यय घेत राहिलो. शब्दांचा इतका प्रसन्न दुरावा पूर्वी कधी अनुभवला नव्हता.

आक्कांना अभिजात शास्त्रीय संगीताचं प्रेम आहे. त्यांच्या लेखनात वारंवार संगीताचे संदर्भ येतात. गंभीर असा षड्ज, स्वरकल्लोळ, ताललयीचं नर्तन, तीव्र निषादांचा दवबिंदू असे कित्येक शब्दप्रयोग सहजपणे त्यांच्या लेखनात-बोलण्यात असतात. स्वरांप्रमाणे विविध रंगांचं त्यांना असणारं आकर्षण त्यांच्या कवितांत तर दिसतंच, पण साध्या घरगुती गोष्टींतूनही दिसतं. मॅचिंग ब्लाऊजपीसला त्या 'रंगाचं मिळवणं' म्हणणार. स्वयंपाकघरात डाळ-तांदूळ धुऊन ठेवलेले, चिरलेली पालेभाजी, फळभाजी, गाजरं, वांगी अशा वस्तू ओट्यावर पाहून पिवळा, पांढरा, हिरवा केशरी, जांभळा, पोपटी अशा रंगांची ती विलोभनीय रंगशोभा त्यांना आल्हाददायक वाटते. त्यांना नेटकेपणाचं आणि सौंदर्याचं अप्रूप आहे. माझ्याकडे असताना सकाळी उठल्यावर स्वतः चहा करत, किटलीत भरत. दूध, साखर वेगळं. ट्रे बाहेरच्या खोलीत टीपॉयवर ठेवत. मग वर्तमानपत्र उघडत आणि अर्धा कप चहा एका वेळी भरून चवीचवीनं घेत राहायच्या. वृत्तपत्र वाचून संपेपर्यंत किटलीतला चहा पुरवायच्या. जेवणानंतरही स्वतःला झेपेल तेवढं टेबलावरचं आवरण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

आयुष्याचा मोठा काळ नोकरी आणि प्रपंच यांच्या जबाबदार्‍या एकटीनं सावरण्यात घालवूनही या दोन्ही क्षेत्रांविषयी आक्कांच्या मनात कडवटपणा नाही. एखाद्या कुशल गृहिणीकडे नसेल इतका मोठा पदार्थांच्या कृतींचा संग्रह त्यांच्याकडे आहे. त्यातही नीटनेटकी विभागणी. हरबरा हे धान्य लिहायला घेतलं की सबंध हरबर्‍यांचे पदार्थ; मग डाळींचे, मग डाळीच्या रव्याचे, पिठाचे - अशा तर्‍हेनं सगळा पदार्थप्रपंच लिहून काढलेला. आणि नोकरीच्या संदर्भात विचार करताना स्वतःचे अनुभव जसे सोबतीला तसे इतर नोकरदार स्त्रियांचेही. नोकरदार स्त्रियांची दु:खं, कष्ट लिहायला 'गंगाधराचा तिसरा डोळाच हवा' असं त्यांना वाटतं. (गंगाधर गाडगीळांच्या लेखनसामर्थ्याविषयी अशा अल्पाक्षरात आक्कांची टिप्पणी आहे.) संसाराच्या झळा लागताते त्या दोघांना, जे चटके बसतात ते दोघांना, जी भाकर मिळते ती दोघांना. तिची चव अवीट अशी. स्त्रीला जी मुक्तता हवी, तिचा हा पाया तर नसेल ना? आक्कांचे संसार आणि मिळवती स्त्री यांविषयीचे हे विचार कोणत्याही पुस्तकी अभ्यासातून आलेले नाहीत. अनुभवांतून परिपक्व होत आलेले आहेत.

समाधानी तृप्त स्त्रीचं चित्र त्यांच्या 'मीच की' कवितेत आढळतं.

मीच की

"काय ही खरेदी!"
"बघा ना!" तिने दोन्ही हातांतील पिशव्यांतील सामान टेबलावर मोकळे करीत पदराने कपाळाचा घाम टिपला.
"कुणाकुणाला हे?"
"बघा ना- हे यांना. हे त्यांना. हे तिला. हे हिला. हे याला. हे त्याला. हे..."
"हे अमक्याला. हे तमक्याला. - आणि तुला?"
ती आनंदाने उचंबळली.
सर्व सामान दोन्ही भुजांनी वेढीत म्हणाली,
"हे सगळे मलाच की."
"आणि मला?"
"मीच की."

पण क्वचित एखाद्या पत्रात त्यांची खंत व्यक्त होते. अमृता प्रीतमच्या संदर्भात पत्रात लिहिताना आक्कांनी लिहिलं होतं, "मलाही घराचा उंबरठा ओलांडायचा होता. नवा प्रकाश अनुभवायचा होता. काही स्वतंत्र कर्तृत्व हातून घडावंसं वाटत होतं... पण आपल्या घरांचे उंबरठेच इतके उंच असतात की..."

आयुष्याविषयीचा व्यापक विचार त्यांच्या मनात असतो, आयुष्याच्या विस्ताराच्या कक्षा त्यांच्या निर्मितीशील मनाला स्पष्ट दिसतात आणि त्याच वेळी त्यांच्या सीमारेषाही मनात ठळक होत असतात. तेव्हा आक्का सहजपणे म्हणतात,

आभाळासाठी पाखरु हवें
पाखरासाठी झाड हवें
अंगणासाठी घर हवें
घराला दोन डोळे हवें
एका डोळ्यात आनंदाचे पाणी हवें
एका डोळ्यात जिव्हाळ्याचे दाणे हवें
दोन्ही डोळ्यांत आभाळासकट
सगळे सगळे मावायला हवें

या मोजक्या शब्दांतून पाझरणारं सुंदरपण स्वाभाविक, निरागस असतं, ते तसं घटनांविषयीच्या, माणसांविषयीच्या, वस्तूंविषयीच्या प्रतिक्रियांमधूनही उमटत राहतं. मनाच्या आतलं मन बाळमन असल्याशिवाय असं घडणार नाही, असं मला नेहमी वाटतं. एकदा एक कविता त्यांनी पत्रातून धाडली, आणि तिच्या शेजारी लिहिलं, "काहीतरीच खरडलं आहे. वाचून सोडून दे." वर लहान मुलासारखी शपथ घातली होती, 'कुण्णाला दाखवू नकोस' म्हणून.

निरागस, उत्कट वृत्ती लाभल्यामुळेच आक्का निखळ, निर्मळ प्रेम करु शकल्या. प्राण्यांवर, निसर्गावर, सर्व माणसांवर आणि त्यांच्या मुलामाणसांवर, पतीवर. मुलांविषयी, सुना-नातवंडांविषयी त्या जिव्हाळ्यानं बोलत. पण त्यांच्या सर्वांत निकटची, त्यांच्या उत्तर आयुष्याला व्यापून उरणारी, आणि आक्कांना जिच्याविषयी निखालस गाढ प्रेम, अशी व्यक्ती म्हणजे त्यांची सून वीणा. तिच्याबाबतीत बोलताना एकदा आक्का म्हणाल्या, "वीणानं मला दोन गोजिरवाणी नातवंडं दिली खरी, पण तिला मात्र तीन मुलांचं सगळं करावं लागतं. मुलांप्रमाणेच मलाही ती जिवापाड जपते. तिच्या रूपात आईच माझा सांभाळ करतेय असं मला नेहमी वाटतं." आक्कांविषयी बोलत राहायचं तर संदर्भ चहूबाजूंनी दाटी करत येतात आणि आपलंच प्रसन्नपण अधिकाधिक उमलत जातं. आक्कांनी उत्कटपणे ओंजळी भरभरुन सर्वांना प्रेम दिलं... त्यांच्या या शक्तीचं आणि त्यांच्या अमेय मनोबलाचं आश्चर्य कधीकधी वाटतं. आणि कधीकधी, त्यांचं 'सहजपण' असं आश्चर्य वाटूही देत नाही.

आक्कांनी काळजाला भिडणारी उत्कटता अनुभवायची असेल तर त्यांची एखादीच कविता पुन्हा पुन्हा वाचावी. मलाही तशी आत्ता वाचावीशी वाटतेय. आपण सर्वच ही उत्कटता एकपणानं 'ऐक जरा ना' या कवितेतून अनुभवूया?

अंधारानें कडे घातलें घराभोंवती;
जळधारांनी झडप घातली कौलारावर,
एकाकीपण आले पसरत दिशादिशांतुन
पेरायास्तव...
एकटीच मी पडतें निपचित मिटून डोळे,
हळूच येते दार घराचे अंधारातुन;
उभे राहते जरा बाजूला,
"ऐक जरा ना...
आठवते मज ती... टकटक त्या बोटांची;
शहारते अन्‌ रंगरोगणाखाली एक आठवण,
गतजन्मींची;
आभाळांतून टपटपणार्‍या त्या थेंबांची."
"ऐक जरा ना..."
दंडावरती हात ठेवूनी
कुजबुज करते अरामखुर्ची,
"आठवते का अजुन तुला ती कातरवेळा,
माहित नव्हतें तुजला,
वाट तुझी तो पाहत होता मिटून डोळे
होते दाटून असह्य ओझे;
होती धुमसत विद्युत काळी;
अजून होते मजला जाणिव
निबिड वनांतिल..
मध्यरात्रिच्या वावटळीची
-झपाटल्याची."
"ऐक जरा ना..."
कौलारांतुन थेंब ठिबकला ओठावरतीं,
"ऐक जरा ना... एक आठवण."
ज्येष्ठामधल्या- या रात्रीच्या पहिल्या प्रहरी,
अनपेक्षितसें
तया कोंडले जळधारांनी
तुझ्याचपाशी.
उठला जेव्हां बंद कराया
उघडी खिडकी,
कसें म्हणाला...
मीच ऐकले शब्द तयाचे...
'यां डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेंच मला भय."
- धडपडलें मी उठलें तेथुन;
सुटलें धावत
त्या वस्तूंतुन, त्या पाण्यांतुन, दिशादिशांतुन,
हात ठेवुनी कानांवरतीं,
ऐकुं न यावे शब्द कुणाचे, कुणाकुणाचें;
"ऐक जरा ना..."
"ऐक जरा ना..."
"ऐक जरा ना..."

***

हा लेख मायबोलीवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. अशोक कोठावळे (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई) यांचे मन:पूर्वक आभार.

या लेखातील, तसंच प्रस्तावनेतील कविता व कवितांच्या ओळी मायबोलीवर पुनर्मुद्रित व प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, यांचे आभार.

या लेखातल्या तसंच प्रस्तावनेतल्या सर्व कवितांवर प्रताधिकार - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

इंदिरा संत यांचं छायाचित्र पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, यांच्या सौजन्याने. छायाचित्रकार अज्ञात.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! इंदिराबाईंबद्दल इतक्या जवळिकेनं, आत्मीयतेनं कुणीतरी बोललेलं पहिल्यांदा बघितलं. Happy
'शतपावली'बद्दल लिहिलेलं आवडलं, आणि 'ऐक जरा ना..' अस्वस्थ करून गेली.

'धन्यवाद, हे इथं वाचायला दिल्याबद्दल.

संयोजक, धन्यवाद. उत्तम लेख.

इंदिरा संतांच्या कविता खूप साध्यासरळ आणि तरीही आशयसंपन्न. शब्दांचे विचित्र खेळ न करता सहजपणे फुलत जाणारी कविता!!

अगदी कविता म्हणजे काय हे कळत नव्हतं, तेव्हापासून त्यांच्या कविता आवडत आल्यात. हा लेख तर त्यांचे आणखी जवळून दर्शन घडवतो. त्यांच्या हसर्‍या प्रेमळ चेहर्‍याचे निदान रेखाचित्र तरी हवे होते, इथे.

दिनेशदांशी सहमत.या असल्या कवितांवर तर किशोरवय पोसलं.
'ऐक जरा ना' .. ची आठवण जागवल्याबद्दल, या सुंदर लेखाबद्दल धन्स.