गूळचुनातील कोकणातली पक्वान्ने

Submitted by शैलजा on 22 February, 2013 - 04:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गूळचून घालून केलेले ओले काजू (मवला वा मोवला असेही नाव आहे )

ओले काजू
एक नारळ खवणून
१ वाटी गूळ
१ टेबलस्पून पातळ तूप
१ चमचा - वेलची व जायफळ पूड (दोन्ही अर्धा, अर्धा चमचा घ्यावे)
चवीला मीठ

गूळचुनातील राजेळी केळी

६ पिकलेली राजेळी केळी
नारळाची अर्धी वाटी खवणून
पाव किलो गूळ
वेलची + जायफळ पूड एक चमचा
१ टेबलस्पून साजूक तूप
४-५ लवंगा

क्रमवार पाककृती: 

गूळचून घालून केलेले ओले काजू

१. थोडे पाणी घालून ओले काजू मऊ शिजवून घ्यावेत. निथळत ठेवावे.
२.गॅसवर पातेले ठेवून त्यात तूप घालून गूळ खोबर्‍याचे सारण एकत्र करुन घ्यावे, त्यात जायफळ व वेलचीची पूड घालावी.
३. त्यावर आता शिजवलेले ओले काजू घालून हलक्या हाताने ढवळावे व एक वाफ काढावी. होता होईतो काजू मोडणार नाहीत हे पहावे.

गूळचूनातील राजेळी केळी

१.केळ्यांच्या साली काढून त्यांचे लांबट तुकडे करावेत व सारण भरण्यासाठी केळ्यांना चिरा द्याव्यात.
२. गूळ, खोबरे व वेलची + जायफळ पूड एकत्र करावे व हे सारण केळ्यांमध्ये भरावे.
३. गॅसवर लंगडी ठेवून त्यात तुपाची फोडणी करुन लवंगा घालाव्यात.
४. लवंगा तडतडल्या की त्यात की भरली केळी आडवी ठेवून मंद गॅसवर एक वाफ आणावी.
५. एका वाफेनंतर केळी उलटावी व पुन्हा ५ मिनिटे ठेवून अजून एक वाफ आणावी.

वाटल्यास वरुन तूप घालता येईल. एक हळदीचे पानही सोबत घातल्यास छान वास येईल.
गॅस मंद असणे आवश्यक.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक हळदीचे पानही सोबत घातल्यास छान वास येईल.>>>> म्म्म्म्म्म्म...पातोळ्या आठवल्या. Happy
मस्त आहेत पदार्थ दोन्ही. Happy कधी येऊ? Proud

वॉव
मी प्रथमच ऐकले हे पदार्थ!
काजु ओलेच का हवेत आणी राजेळी केळी म्हणजे ती लहान आकाराची केळी ना..

मस्त.

फुकट ते पौष्टिक
फुकट तिथे प्रकट
फुकट तिथे उपट
फुकट मिळेल तिथे दुप्पट गिळेल
आणि फुकट तिथे फ्यामिलीसकट या पंचओळी मंत्रानुसार मिलालं तर बरंच :p

यम्मी Happy . राजेळी केळी खाल्ली आहेत, गूळचूनातले ओले काजू कधी खाल्लेले नाहीत.

<<< राजेळी केळी म्हणजे ती लहान आकाराची केळी ना

राजेळी म्हणजे मोठी केळी. लहान केळ्यांना वेलची केळी म्हणतात. राजेळ्यांचा हा नेट्वर सापडलेला फोटो.

rajeli.png

भारी आहे एकदम.
क हळदीचे पानही सोबत घातल्यास छान वास येईल.>>>> म्म्म्म्म्म्म...पातोळ्या आठवल्या.>>> अगदी अगदी, कित्येक वर्षात खालेल्या नाहीत.
शैलु कधी भेटूयात मग ? Proud

अहाहा! ओले काजू!
(दोन्ही पा.कृ. मिष्टान्न क्याटेग्रीतल्या असल्याने त्यांना नो 'अहाहा!' :फिदी:)

लले, पण ह्या साखरवाल्या नैयेत. गूळ्वाल्या हैत. साखरेपेक्षा गूळ कधीही बरा. Happy की तू एकदमच नो गोड गोड?

धन्यवाद Happy

करुन पहा आणि सांगा. केळ्याचा प्रकार आपली नेहमीची केळी घेऊनही करता येतो, पण ही केळी राजाळी केळ्यांइतकी गोडीला नसतात. तेह्वा दुधाची तहान ताकावर ह्या न्यायाने साधी केळी किंवा फारतर वेलची केळी वापरुन करायचे Happy ओल्या काजूंना मात्र पर्याय नाही!

अगं, गुळाच्या पोळीच्या गुळात चुना घालायची पद्धत आहे असं कुठेतरी वाचलं होतं म्हणून विचारण्याची हिंमत तरी केली Lol

आता चुनकाप म्हणजे काय ते ही सांग. चून म्हणजे खोबर्‍याचं सारण हे कळलं. कापं म्हणजे फोडी का ?

नाही, कापं म्हणजे वड्या म्हणजे काजूकतलीला कोकणात काजूची कापं म्हणतील. Happy
किंवा खोबर्‍याच्या वड्या म्हणजे खोबर्‍याची कापं, गुळाची कापं वगैरे.
>>गुळाच्या पोळीच्या गुळात चुना घालायची पद्धत आहे >> हो? मला नव्हतं माहिती.

Pages