लेडीsज (अँड जंटलमन) ऑफ द ज्युरी..

Submitted by लोला on 10 February, 2013 - 19:50

"मला तर इथं क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय... "

हाताची घडी घालत, आजूबाजूला उभ्या असलेल्या इतरांकडे आणि मग छताकडे बघत आजीबाई म्हणाल्या.

अंदाजे पंधरा बाय बारा फुटांची रुम असेल. सीलिंग मात्र थोडं उंचावर होतं. छताच्या मध्यभागी एक मोठा गोल स्कायलाईट. त्याच्या फुगीर काचेवर बाहेरुन असलेलं काळं आवरण अर्ध्याच भागावर होतं त्यामुळं दुसर्‍या अर्ध्या भागातून सूर्यप्रकाश आत येत होता. याखेरीज दुसरी खिडकी नाही. कृत्रिम उजेडासाठी वीजेचे दिवे मात्र भरपूर. रुमच्या एका कोपर्‍यात एक कोटहँगर आणि त्याच्या विरुद्ध कोपर्‍यात एका गोल टेबलावर पाणी, कॉफी, छोटे फोमचे कप्स इ. आणि टेबलाखाली वेस्ट- बास्केट. भिंतीवर एक घड्याळ आणि त्याच्या समोरच्या भिंतीवर एक व्हाईटबोर्ड. रुमला दोन अ‍ॅटॅच्ड रेस्टरुम्स. एक स्त्रियांसाठी, दुसरी पुरुषांसाठी. त्या मात्र ऐसपैस होत्या.

खोलीच्या मध्यभागी एक मोठ्ठं आयताकृती लाकडी टेबल होतं आणि बाजूने तश्याच लाकडी भक्कम, हात असलेल्या मोजून बारा खुर्च्या! त्यातल्या तीन-चार आम्ही बाजूला काढून भिंतीलगत ठेवल्या कारण एवढ्या लागणार नव्हत्या आणि जरा दाटी कमी होणार होती. आम्ही सात जणच होतो. सहा बायका आणि एक पुरुष. बहुतेकजण उभेच होते. थोड्याश्या जागेत हालचाल करायचा प्रयत्न करत होते. पण थोड्या वेळानं उभं राहणंही कम्फर्टेबल वाटेना, मग मी म्हटलं जरा टेकावं... खुर्च्याही ऐसपैस होत्या पण बैठकीला कुशन नाही! आत कोर्टरुमच्या ज्युरी बॉक्समधल्या आरामशीर खुर्चीवर तर कुशन होतं आणि ती खुर्ची १८० अंशात फिरतही होती. म्हणजे 'तिथे कदाचित खूप वेळ बसावं लागेल तेव्हा निवांतपणे बसा पण इथे फार (खल करत) वेळ काढू नका' असा संदेश द्यायचा होता की काय देव जाणे!

आत्तापर्यंत एकमेकांची नावापुरती जुजबी ओळख झाली होती. अ‍ॅन पुस्तक घेऊन आली होती आणि ते वाचत बसली होती. मधूनच काहीतरी लक्षात आल्यासारखं उठली आणि "जाऊन घेते.." म्हणत रेस्टरुमकडे गेली. मग रांगेने सगळ्याच. आम्हा बिचार्‍या सहा बायांना एक रेस्टरुम शेअर करावी लागत होती आणि लॅरीला मात्र एकट्याला एक आख्खी! नॉट फेअर.

..एका खटल्यासाठी ज्युरी म्हणून निवड झाल्यानंतर सुनावणी सुरू होण्यापूर्वीच्या ज्युरी रुममधला हा सीन होता.

**

सर्वांसाठी याची सुरुवात दीडेक महिन्यापूर्वी टपालातून आलेल्या "YOU HAVE BEEN SUMMONED.." अश्या पत्राने झाली होती. ज्युरी म्हणून तुमची नागरी कर्तव्य पाड पाडण्याबद्दलचं असं समन्स एकदा यापूर्वीही मला आलं होतं पण आदल्या दिवशी फोन करुन कन्फर्म करावं लागतं तेव्हा माझ्या ग्रूपला 'येण्याची गरज नाही' असं कळल्यामुळं पुढे काहीच घडलं नव्हतं. यावेळी कदाचित जावं लागेल या तयारीनं ऑफिसमध्ये कळवणे, समन्सची कॉपी देणे इत्यादी सोपस्कार मी उरकून घेतले. जरी जावं लागलं तरी तुमची ज्युरी म्हणून निवड होईलच असं नाही पण एक दिवस जातोच. तेव्हा चार्ज कोड वगैरे गोष्टी माहीत करुन घेतल्या. जास्तीच जास्त दहाच दिवसाचा पगार मिळेल अशी पॉलिसी असल्याचं कळलं. तेव्हा माझी कलीग पॅट म्हणाली-

"दहाच दिवसाचे पैसे देतात? कुठलीतरी क्रेझी केस असेल आणि मग खूप दिवस लागले तर..?

"तर काय.. तसे ज्युरी ड्यूटीचे दिवसाला तीस डॉलर्स मिळतात पण त्यावर टॅक्स भरावा लागतो. अशी मोठी केस संपल्यावर पुस्तक लिहायचं आणि टीव्ही वर वगैरे जायचं, मग त्याहून जास्त मिळतात पैसे!" मी चेष्टेत म्हटलं. यावर ती मिशेलने बेहनरच्या बोलण्यावर कसे डोळे फिरवले होते तसे डोळे फिरवत निघून गेली.

जावं लागेल हे आदल्या दिवशी कन्फर्म झालं. हे संध्याकाळी उशीरा कळतं त्यामुळं नंतर ऑफिसला इमेल पाठवून कळवलं. समन्सवरच्या सूचना वाचल्या. टॅग कापून ठेवला. बॅगमध्ये मॅगेझीन, पाण्याची बाटली ठेवली. तरी मनात "आपल्याला काय निवडणार नाहीत, नुसती जा-ये होणार आहे" असं वाटत होतं. त्यात काही अर्धवट अनुभवी लोकांच्या सांगण्यावरुन "शिकलेल्या, हुषार लोकांना घेत नाहीत" असं काहीतरी ऐकलं होतं त्यामुळं...

सकाळी वेळेच्या थोडं आधीच पोचले. "फोन आणू नका" अशी सूचना होती पण तिथे लॉकरमध्ये ठेवता येतो ही माहिती मिळाल्याने मी तो लॉकरमध्ये ठेवला कारण डाउनटाउनमधली हिस्टॉरिक कोर्टहाऊसची इमारत त्यामुळं पार्किंग इमारतीपासून थोडं लांब होतं, तेव्हा फोन जवळ असावा असं वाटलं. पहिले सोपस्कार झाल्यावर एका मोठ्या हॉलमध्ये नेऊन बसवलं. तिथे वाचायला मॅगेझिन्स होती. "न्यूजपेपर आणू नका" अशीही सूचना होती कारण केसबद्दल त्यामध्ये माहिती आलेली असू शकते. थोड्याच वेळात हॉल भरला. थोड्या वेळाने एक ऑफिसर आला आणि कोणाला ब्रेकफास्ट, कॉफी हवी असेल तर बिल्डिन्गमध्ये पहिल्या मजल्यावर कॅफे आहे तिथे जाता येईल अशी माहिती दिली आणि माझ्यासह काहींनी तयारी दाखवली तेव्हा स्वतः तिथे घेऊन गेला. "कॉफी घेऊन हॉलमध्ये गेलात तरी चालेल पण कार्पेटवर सांडू नका" अशी प्रेमळ सूचनाही केली. बाकी लोक काहीबाही वाचत होते, काही नुसतेच बसले होते, काही डुलक्या काढत होते..

काही वेळातच ज्युरी मॅनेजरने येऊन सूचना दिल्या. "ज्युरी म्हणून निवडले गेलात तर केस संपेपर्यंत केसबद्दल बोलायचं नाही" असं तीन-चार वेळा बजावलं. तिथे तीन ट्रायल्स सुरु होणार होत्या. हॉलमधल्या सगळ्या लोकांना तीन ग्रूपमध्ये विभागलं. प्रत्येक ग्रूप साधारण २५-३० लोकांचा होता. याच २५-३० लोकांच्या तीन ग्रूप्समधून एकेका ट्रायलसाठी ज्युरी निवडणार होते. आमच्या ग्रूपला एका कोर्टरुमच्या बंद दारासमोर उभं केलं. मग दार उघडलं गेलं आणि आम्हाला एकेक करुन आत सोडून एरवी लोक बसतात तिथं बसायला सांगितलं. मी पहिल्याच रांगेतल्या बाकावर बसले. कोर्टरुम प्रशस्त सुंदर होती. यापूर्वी मी कधी प्रत्यक्ष पाहिली की नाही तेही आठवेना. "शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये" म्हणतात त्याप्रमाणे कधी चढली नव्हती. लहानपणी कधीतरी कोर्टरुम प्रत्यक्ष पाहिली असेल पण आठवत नाही. एरवी टीव्हीवर आणि सिनेमातच. रुममध्ये जजखेरीज पोलीस ऑफिसर, क्लर्क आणि अजून काही लोक आधीच उपस्थित होते.

कोर्टरुममध्ये प्रवेश करताना आणि बाकावर बसल्यावरसुद्धा - समोरच्या दोन टेबलांसमोर दरवाजाकडे तोंड करुन उभे असलेले ५-६ लोक आपल्याला अगदी निरखून पहात आहेत अशी जाणीव झाली. काहींनी नजर भिडवून स्माईल देण्याचाही प्रयत्न केला. ती कोर्टरुम आणि सगळा प्रकार overwhelming की काय तसा झाला आणि मी सगळं पचवण्याच्या प्रयत्नात होते. जरा वेळानं लक्षात आलं की हे लॉयर्स आणि केसमधल्या संबंधित पार्टीज असणार. ते अदबीनं उभे होते आणि त्या सर्वांच्या चेहर्‍यावर हसतमुख, विनम्र भाव होते! मला एकदम अस्वस्थच वाटायला लागलं..

एवढं पुरेसं नसावं म्हणून की काय पुन्हा सर्वांना नाव पुकारल्यावर उभं राहण्याची विनंती केली आणि त्या सर्वांनी आम्हाला पुन्हा नावासकट पाहून घेतलं. त्यानंतर जजनी सर्वांचे आल्याबद्दल आभार मानले. विशेषतः यामुळं की कोणी स्वतःहून तिथं जात नाही. त्यांनी केसबद्दल जुजबी माहिती दिली आणि इथून पुढं काय होणार आहे याबद्दल थोडी कल्पना दिली. काही इतर महत्त्वाच्या कारणाने ज्युरी म्हणून काम करणं शक्य नसेल तसं सांगण्याची विनंती केली आणि मग काही प्रश्न विचारले-
"अमक्या देशातल्या लोकांचा कोणाला वाईट अनुभव आहे का?"
(आजतागायत तिथले कोणी माझ्या ओळखीचे नाही)
"अमूक डॉक्टरकडून कोणी ट्रीटमेन्ट घेतली आहे का? बरा-वाईट अनुभव आहे का?"
"पोलीस ऑफिसर्सचा कोणाला वाईट अनुभव आहे का?"
आणि बरंच काही.. मग त्य दोन वकिलांनीही काही प्रश्न विचारले.
माझ्या आजूबाजूने आणि मुख्यतः पाठीमागून काही उत्तरं येत होती.

काही मिनिटं हा प्रकार चालला. या प्रश्नोत्तरांतून कोणाचे काही बायस, प्रेज्युडिस असतील तर ते समजतील मग त्याचा केसवर परिणाम होऊ नये म्हणून हा प्रपंच. मग शेवटी जजनी जाहीर केलं की त्यांनी आणि वकिलांनी मिळून सात लोक निवडले आहेत. (या केससाठी सातच हवे होते) त्यांची नावं आता घेतली जातील. त्यांनी ज्युरी बॉक्समध्ये येऊन बसावं. बाकीच्यांनी पुन्हा बाहेरच्या हॉलमध्ये बसावं, जायला सांगेपर्यंत. कारण इतर ट्रायल्ससाठी काही कारणानं ज्युरी कमी पडले तर त्यांतून निवडता यावेत. म्हणजे एकतरी दिवस जातो ते यामुळेच!

..आणि मग क्लर्कने नावं पुकारायला सुरुवात केली. चौथ्या की पाचव्या वेळी अस्मादिकांचे नाव पुकारले गेले आणि मी जॅकेट, बॅग सांभाळत इकडेतिकडे न बघता ज्युरी बॉक्समध्ये जाऊन बसले. सातजण स्थानापन्न झाल्यावर आम्हाला शपथ दिली आणि ग्रूपमधल्या उरलेल्या लोकांना कोर्टरुममधून बाहेर जायला सांगितलं. जजनीही डेलिबरेशन्स सुरु होईपर्यंत केसबद्दल आपापसांत तसंच इतरांशी काहीही न बोलण्याची सूचना देऊन केस सुरु होण्याची तयारी होईपर्यंत आम्हां "सिक्स अँग्री विमेन" आणि एका मॅनला ज्युरी रुममध्ये जायला सांगितलं. ऑफिसरने आम्हाला जजच्या बाजूच्या एका दारातून कोर्टरुममधून थेट ज्युरी रुममध्ये नेलं...

**

"मोनॉपॉलीची न्यूज ऐकली का?" दुसरी एक आजी म्हणाली.

नाही म्हटलं तरी थोडासा ताण सर्वांना जाणवत असावा. आजी लोक इतर वयोगटातल्या सर्वांना कम्फर्ट झोनमध्ये न्यायचा प्रयत्न करत होत्या.

"ऐकली ना, आज 'टुडे' शो वर नवीन पीस 'मांजर' आणलं होतं."

"'इस्त्री' चा पीस काढून टाकणार म्हणे. इस्त्रीला सगळ्यात कमी मतं मिळाली."

"ह्म्म, इस्त्री.. symbol of women's oppression!"

"Well, but I want to keep my iron.. स्टीम बोट, कार आणि टोपी ते सगळं आहे ना अजून? माझ्याकडं फारच जुना सेट आहे."

बिचारा लॅरी एकटाच भिंतीला टेकून उभा होता आणि हे संभाषण ऐकून समजून घ्यायचा प्रयत्न करत होता.

इतक्यात रुमच्या दारावर टकटक झाली. मग बाहेरच्या व्यक्तीनंच दार उघडलं. दारात कोर्टातली ऑफिसर उभी होती.

तिनं सर्वांकडं बघून विचारलं, ".. यू रेडी? "

(क्रमशः)

[ज्युरी ड्यूटीचा अनुभव लिहीत आहे. केस संपली आहे. घटनेतली नावे बदलली आहेत. विषयाचे गांभीर्य टिकवूनही नुसतंच माहितीवजा न होता हलकंफुलकं लिहिण्याचा प्रयत्न आहे. सगळं लिहून झाल्यावर काही प्रश्न असतील तर उत्तरं लिहीन. स्वतःचे किंवा ऐकीव अनुभव, सिस्टमबद्दलची मते इ. लेखन पूर्ण झाल्यावर मांडा. इतक्यातच कंटाळा आला तरी सांगा.
धन्यवाद.]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहितेयस .
चार्‍या सहा बायांना एक रेस्टरुम शेअर करावी लागत होती आणि लॅरीला मात्र एकट्याला एक आख्खी! नॉट फेअर. >>> तुम्ही पण आक्युपाय रेस्टरुम करायचं होतं ना Proud

अरे वा, मस्त अनुभव वाचायला मिळणार. छानच. एकूणातच ज्युरी सिस्टिमबद्दल फक्त वाचलंय (जय जॉन ग्रिशम!) आणि (सिनेमातून) पाहिलंय. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे.

खास लिहिलंयस म्हणून सांगते की कंटाळा आलेला नाही आणि येईलसं वाटतं नाही. Happy

अरे वा! वेगळा विषय! पुढे वाचायला नक्की आवडेल.
मामींसारखी मलाही गिशमांच्या जॉनची आठवण आली. Happy

मला पण अजून कधी बोलावणं नाही आलं. पण जाम उत्सुकता आहे. लवकर लिही. कंटाळा नाही आला.
लॅरीसारखच मला पण ते इस्त्री, टुडे शो, मांजर संवाद झेपेना Happy

"तर काय.. तसे ज्युरी ड्यूटीचे दिवसाला तीस डॉलर्स मिळतात पण त्यावर टॅक्स भरावा लागतो. अशी मोठी केस संपल्यावर पुस्तक लिहायचं आणि टीव्ही वर वगैरे जायचं, मग त्याहून जास्त मिळतात पैसे!" मी चेष्टेत म्हटलं. >> किती दिवस लागले मग केसला देवी ? पुस्तकाची सुरूवात दिसतेय Lol

ते क्रमंशः बद्दल वर कोणी लिहिलय त्याला अनुमोदन.

खूप छान लिहीलं आहेस लोला. तू वर जे २५-३० जणांच्या सिलेक्शन चं लिहीलं आहेस नं, त्या स्टेजपर्यंत मी पण जाऊन आले आहे. तुझ्या विनंतीला मान देऊन जास्त काही सांगत नाही. पुढचा भाग लवकर येऊ दे.

<<अशी मोठी केस संपल्यावर पुस्तक लिहायचं आणि टीव्ही वर वगैरे जायचं, मग त्याहून जास्त मिळतात पैसे! >>
त्यापेक्षा जुरी ड्युटी सिलेक्शन कसं टाळायचं यावर पुस्तक लिहिल्यास हमखास जास्त पैसे मिळतील. Happy

आवडेल वाचायला! अशी द्युटी यायला नागरिक्त्व लागत असेल ना? का रेसिडे.न्ट्ला पण येवु शकते ज्युरी द्युटी?

अशी मोठी केस संपल्यावर पुस्तक लिहायचं आणि टीव्ही वर वगैरे जायचं, मग त्याहून जास्त मिळतात पैसे!" मी चेष्टेत म्हटलं>>>>> Lol
मला त्या डेलिबरेशन रूमबद्दल मजकूर वाचताना ट्वेल्व अँग्री मेनचीच आठवण झाली (पुढे उल्लेख केलासच म्हणा) Happy

चांगलं वाटलं वाचायला, पुढे काय असेल ह्याची उत्सुकता आहे. Happy

धन्यवाद. (मुद्दाम नाही, यामुळे धागा आपोआपच वर येतो.)
जरा वेळ लागत आहे त्याबद्दल दिलगीर आहे. अजून दोन भाग असतील.

फार छन लिहिता आहात तुम्ही....

उत्सुकता आहे पुधील भागांची !!

>>मला त्या डेलिबरेशन रूमबद्दल मजकूर वाचताना ट्वेल्व अँग्री मेनचीच आठवण झाली (पुढे उल्लेख केलासच म्हणा)<< ह्या वरुनच मल वाटते पंकज कपुर चा एक रुका हुआ फैसला आल होता ना ?

Pages