एक भयाण अनुभव .....(गूढ कथा)

Submitted by मी मी on 1 February, 2013 - 07:11

परवा आलेला एक भयाण असामान्य अनुभव .....
कुठल्याश्या अनोळखी, अजिबात आवाज नसणाऱ्या...बिन छपराच्या, आकर्षक यानात बसून
असंख्य माणूस सदृश मेटालिक कपड्यातली लोक भराभर बाहेर पडलीत ......
आकाशातून उतरणाऱ्या छोट्या गोलाकार वस्तूतून खाली आलेल्या सलाखीने...
उत्खनन सुरु केले.....वाऱ्या पेक्षाही प्रचंड वेगाने जागा खणली जात होती.....
आणि टना पेक्षाही प्रचंड वजनाची माती दूर सारली जात होती.....
मी अजूनही हे सर्व बघते आहे...मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना.....
कुठून आलेत हे सर्व?....कोण आहेत?...आपण पूर्वी यांना कधीच कुठे कसे पहिले नाही ?
बुद्धी ला पटत नव्हते पण घडत तर होते...मी डोळे दुप्पट मोठे करून पाहू लागले......
तेवढ्या वेळात तर त्यांचे एखाद्या छोटेखानी शहरा एवढे खोदकाम झाले होते.....
एवढ्या वेगाने हि लोक सगळ अस अस्तव्यस्त करताहेत आणि आपली सरकार झोपलीय कि काय ?
कुणीच काहीच कस करत नाहीये?......कि सरकारनेच पाठवलेली पित्तू आहेत हि सर्व......
माझा तर रक्त दाब पण वाढायला लागला......अजून हि माझ्या घरापर्यंत आलेली नव्हती .....मी अजूनही खिडकीत उभी राहून बघत होते
कपाळावर प्रचंड घाम फुटलेला ....घश्याला कोरड पडलेली.....
इथपर्यंत यायला आता यांना असा कितीसा वेळ लागणार....भीतीने मी गार पडत होते..पण विचारचक्र स्वस्थ बसू देईना....
त्या विचित्र माणसांच्या हालचाली बदलू लागल्या....काही मागे उभी असणारी माणसं पुढे आलीत ..त्यांच्या हातातले त्रिकोणी बिस्कीट एवढे मशीन
तोंडाजवळ घेऊन ते काहीतरी बोलू लागले....बोटाच्या तर्जनीला लावलेले पिटुकले काहीतरी ..ते बोट चहु दिशेने फिरवू लागले त्यातून निळ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडत होता
त्याने बोट जमिनीला लावले.....आणि मागच्या लोकांना डाव्या बाजूला वळून पुढे जाण्याचा इशारा दिला.....आणि माझ्या मनात सर्रकन धड्कीची वीज चमकून गेली ........
जवळ जवळ शंभर एक माणसांचा ताफा माझ्या घराकडे वळला होता......मी यांना दिसली बहुदा.....हृदयाचे ठोके आगगाडीच्या इंजिनच्या आवाजा एवढे जोरात आणि तेवढ्याच गतीने धडकू लागले होते.........डोळे फाकले होते.....अंगावर शहारे आलेले ...तळहाथ गारेगार पडलेले.....मी घरात एकटी आहे.....हे सर्व घरात शिरले तर????? .....काहीतरी करायला हवे...काय करू..काय करू
मी लोखंडी कपाट कसेतरी ढकलत दाराशी लावले......खिडक्यांचे पडदे पडून घेतले.....सगळ्या दारांना घट्ट कड्या घातल्या......आणि हाताची नखे खात, खोलीत येरझाऱ्या घालत बाहेर काय होतंय याचा कानोसा घेऊ लागले....थोडावेळ गेला असेल
अचानक सगळ शांत झाल्....कदाचित ती मंडळी दारासमोरील रस्त्यावरून पुढे निघून गेली असावी....मी निःश्वास टाकला.....आणि मागल्या भितींला टेकले....डोळे मिटले....
आणि भिंतीवरून तशीच घरंगळत खाली बसले.....जेमतेम धावता काटा दोनदा पूर्ण फिरला असेल आणि त्या मागल्याच भिंतीला जोरदार हादरा बसला.....दुसरा हादरा बसला
छताला .....मी मान वर करून बघण्याच्या आत आत माझ्या पुढच्या भागातल्या छताची अर्धी बाजू खाली येऊन पडायच्या मार्गात ....आणि पडलेल्या फटींमधून लाल-हिरवे प्रकाश आत डोकावत होते......माझी विचारांची क्षमता नाहीशी झालीय..मी सुन्न होऊन त्याच छताच्या खाली उभी होते...हे अचानक आठवले आणि मी भानावर आले....वार्याच्या वेगाने धाव घेतली...भेगा गेलेल्या भिंतीना ओलांडून मधल्या खोलीचा वरंडा पार करत....माज घराशेजारच्या त्या बंदिस्त, पडीक सामानाने ओतप्रोत भरलेल्या कुजक्या वासाच्या अंधार्या खोलीत कसे बसे आत आत शिरत गेले.....आज्जीची आठवण म्हणून ठेवलेल्या त्या रंग उडालेल्या, खिपल्या पडलेल्या, चारही बाजूने चेपलेल्या भल्या मोठ्या लोखंडी पेटीच्या कडेने
भिंतीच्या मध्ये दबा देऊन अंग चोरून, दोन्ही हाताच्या घडीत दोन्ही पाय घटट धरून आणि त्याच् पायांच्या गुडघ्यांवर डोळे मिटून डोक टेकवून देवाचा धावा करतांना सगळ्या गतकाळच्या आठवणी स्मरू लागली ...भरलेले डोळे मात्र अंधारातही काळ आल्याची सूचना बघत होते....भीतीपोटी माझ्याच ओढणीने मी चेहेरा झाकून घेतला होता....जणू ओढणी मागच्या मला या नव्या दुनियेतला नवा गडी ओळखू शकणार नाही...हा भाबडा भ्रम मी पांघरला होता....

धडाम्मम्म्म्म-धुम्म्म्म- धडद्द्द्द .... आवाज येत राहिले पुढले तीनेक मिनिटं....एव्हाना बाहेर सगळ मातीत मिळाल होत....आडव्या-तिडव्या तुटलेल्या विटांच्या भिंती तेवढ्या उभ्या होत्या....दुर्र्र दुर्र्रर्र विराण भयाणता पसरलेली....प्रेमाने जोपासलेली एक एक वस्तू भुइसपाट, अस्त-व्यस्त..मातीच्या,विटांच्या, दगडांच्या मलब्याखाली दबलेली...माझ्या घरची..गावची माणसं सुद्धा इथेच कुठेतरी आत आत रुतलेली असावीत.....त्यांच्या वर-वर-खूप खूप वर पर्यंत आता होते माती-गोट्यांची प्रचंड मोठी पहाड..मातीच्या टेकड्या .....आता याक्षणी त्याच मातीवरून लाल, निळ्या, हिरव्या प्रकाशाचा झोत झुलत आहे....आणि मी डोळे फाडून हे सगळं बघत होते.... ......

मेटालिक कपड्यातले ते अनोळखी माझ्या माणसांच्या-माझ्या वस्तूंच्या ढिगारावर उभे होते....कुठल्याश्या आनंदाने जल्लोष करत होते....इथवर येऊनही त्यांचे अजून उत्खनन चालूच होते.....माझ्या नजरे समोरच्या भागातली खूप सारी माती हाताने खोदून काढण्याचा प्रयत्न या समूहातला एक वयोवृध्द, मोठ्या डोक्याचा, निळ्या डोळ्याचा आणि कपाळावर टिकली एवढे यंत्र लावलेला तो अनोखा माणूस (?) करत होता.....त्याच्या हातात काही लागले..जराश्या ताकदीने त्याने ते वर काढले....ती माझी लाडकी गिटार होती....सगळी मंडळी गोळा झाली गीटार उलटून पालटून बघू लागलीत ....त्याच्या तारा तुटल्या होत्या एकच तार अधांतरी कशीबशी ठाण मांडून टिकून होती....त्या तारेला हाथ लागताच ती झंकारली....सूर बाहेर पडला.....हजारो वर्षांपासून कान आतुर होते, सुराच्या तहानेने व्याकूळ झाले होते जणू असे माझ्या कानाने ते सूर पिऊन घेतले....या घाबरल्या अवस्थेतही कानाला तृप्तीचा अनुभव आला...पण..त्या सुराने या विचित्र समुहात मात्र आनंदाची सुनामी आली होती....त्या सुराने अंगात उत्साहाची शिर्शिरी यावी असे सगळे हलले....वेगवेगळ्या दिशेने शोध घेऊ लागले....विजेच्या उर्जेने माती खणून काढून माझी एक एक वस्तू बाहेर काढत होते...माझी जीर्ण झालेली डायरी ...कवितेची छिन्न-विच्छिन्न वही....पेन..मोबाईल आणि काय काय.....ओह्ह्ह माझा जीव कळवळला....जीव कि प्राण असणार्या वस्तूंची हि गत......
सगळ्या वस्तू काळ्या अरुंद लांब अश्या दुसर्या टोकाने यानाला जोडलेल्या पाईपात टाकले जात होते .....मी अजूनही सुन्न हे सर्व बघतांना माझा जीव सुद्धा तुकड्या तुकड्याने त्या काळ्या पाय्पात पडतोय असे वाटत राहिले.....आता तो काहीसा मोठ्या वयाचा इसमवेगळा इसम माझ्या दिशेने येऊ लागला....यावेळी कोण जाणे का पण मी घाबरले नाही...आहे त्या अवस्थेत तशीच स्तब्ध-सुन्न, अश्रू वाहत्या स्थितीत बसून राहिले...त्याच्या चेहेर्यावर अविरत आनंद ओसंडत होता.....माझ्या आजू-बाजूची जागा त्याने अशी सहज खणून काढली...आत खोल हात घालून काढतांना त्याच्या हातात अडकून बाहेर आलेले काहीतरी मी त्या अंधारात लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न केला....ओढून काढतांना तो पठ्ठ्या खुश दिसत होता ....मला मात्र विजेचा ४४० वॉंल्ट एवढा जोराचा करंट लागावा असा धक्का बसला......मी पाहतेय त्यावर माझा विश्वासच बसेना....मी ओढून बसले होते तीच ओढणी त्याने जमिनीतून ओढून वर काढली होती.....
'अत्यानंदाने तो जवळ जवळ किंचाळलाच'....त्याच्या सोबत्यांना हाक घालू लागला....'I Got it सापडले सापडले' असे परत परत घोकू लागला....असा काय खजिना मिळालाय या डोमकावळ्याला ..पण कळेलच; निदान आपल्याला याची भाषा समजते आहे हा समाधानाचा मुद्दा आहे ....
सोबत्यांनी आजू-बाजूची सगळी जमीन खणून काढली...मी बारीक नजर ठेवून होतेच....हाताला लागणाऱ्या लहान मोठ्या वस्तू ते साठवत होते.....आताशा अंधार पडत होता त्या अतिप्रगत मानव सदृश प्राण्यांनी स्पष्ट आणि मुबलक उजेडाचे त्यांचे प्रगत असे टोंर्च सुरु केले....या उजेडात माझी ओढणी मिळाली त्याच्या जवळच दोन पावलांच्या अंतरावर थोडस खोलवर खोदल्यावर अत्यंत महत्वाच काहीतरी....प्रेशियस अस मिळाल्याचे त्यांच्या हालचाली सांगू लागल्या...चेहेरे प्रसन्न पण गंभीर (विचारी) होते....त्या जागेभोवती सगळीच्या सगळी गलका करून उभी होती...काय असेल तिथे? माझी जिज्ञासा शिगेला टेकली....आता सर्वच्या सर्व खाली वाकले आणि अनेक हाताने कुठलासा 'सापळा' बाहेर काढला....'ममी' गवसली होती .....
ते बघून मी अवाक....अरे देवा 'हि तर मी होते' .....

दुसरे दिवशी जमिनीपासून वर हवेत असणारे सार्वजनिक अतिप्रगत टेलीविजन...सकाळी सकाळी हाथात पडणारी नेटवर्क स्क्रीन बातम्या.....घरातल्या तंत्रज्ञांनाने सज्ज भिंती भिंतींवर उपलब्ध टी व्ही नेटवर्क आणि मनगटावर बांधलेल्या रुपयाच्या शिक्क्या एवढ्या कॉइन इंटरनेट वरून 'ब्रेकिंग न्यूज' दणाणू लागल्या.....
Breking News :-
'पाच हजार वर्षांपूर्वी २१ डिसेंबर २०१२ ला पृथ्वीवर झालेल्या प्रलयाने तत्कालीन जीव-जंतूंचा संपूर्ण नायनाट झाला याचे ठोस पुरावे वैज्ञानिकांच्या हातात कालच्या उत्खननाने लागले....
कोंबडी, बगळे अशी तत्कालीन नावे असणार्या काही पक्ष्यांची अंडी, तसेच माकड,अस्वल अश्या काही प्राण्यांची हाडं सापडली असून त्यावर पुनर्जीवन प्रक्रिया प्रयोग लवकरच सुरु करण्यात येईल अशी आशा बाळगायला हरकत नाही ...
भारतीय संस्कृतीच्या अनेक रहस्यांचा शोध .....
संगीत क्षेत्रातल्या पुरातन साधनांचा नमुना, तत्कालीन लिपी आणि हस्ताक्षरांचा जीर्ण अवस्थेत सापडलेला नमुना
एका अतीव हुशार आणि सुंदर स्त्रीरूप मानवाचा सापळा मिळाल्याचा वैज्ञानिकांचा दावा .....
तसेच अतीव सुंदर ...हुशार स्त्रीरूप ममीच्या हृदयस्पर्शी..मार्मिक कवितांचा संग्रह डायरी रुपात मिळाला असून आजच्या युगासाठी हा संग्रह अभ्यासास विश्व स्तरावर उपलब्ध करवला जाणार आहे असा सर्व संमत ठराव पास ......

इतक्यात.... थोडासा कर्कश्श ओळखीचा आवाज कानी पडला ......
ए उठ ना म्हशे....अनेक युगाची झोप लागली काय....हिकडे जगबुडी येऊ दे का प्रलय येऊ दे नाय तर भूकंप...पण या घोडीची झोप काही उघडायची नाही.....कोणत्या नक्षत्रात जन्माला आली कोण जाणे.....

पहाटेची स्वप्न खरी ठरतात म्हणे......असे असेल तर आज पाहिलेले स्वप्न खरे होण्यास निदान पाच हजार वर्ष वाट पहावी लागेल....नाही ??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages