७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

Submitted by तुमचा अभिषेक on 24 January, 2013 - 13:47

रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते. मी त्या वर्तमानपत्रातील तेवढे कात्रण नेमके कापून उरलेल्याची व्यवस्थित सुरंगळी करून रद्दीच्या पिशवीत भिरकावून दिेली आणि विचारमग्न अवस्थेतच अंत:पुराकडे प्रस्थान केले. कुठेतरी खोलवर आतवर अंतकरणात दडलेला पुरुषी अहंकार दुखावला गेला होता.

तर मित्रांनो काय होती ती बातमी जी आपल्या पुरुषांच्या प्रधानगिरीला आव्हान देणार होती हे ऐकायची तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागून राहिली असणार.

तर ऐका,

आपले वाचा,

" भारतीय महिला ७२ मिनिटे जास्त काम करतात. "

बसला ना झटका...!!
असेच आणखी दोनचार झेलायची तयारी करून खाली सविस्तर वाचा.

---------------------------------------------------------------------------------------------
आधुनिक भारताच्या अत्यानुधिक महिलांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करणारे वृत्त -
वृत्तसंस्था, झुमरीतलैया

भारतीय महिला दिवसभरात भारतीय पुरुषांच्या तुलनेत सरासरी ७२ मिनिटे अधिक कार्यालयीन काम उपसत असल्याचे एका गुप्त सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात प्रत्येक शहरात हीच बाब कमी-अधिक फरकाने अधोरेखित झाली आहे. "नारी शक्ती तिथे युक्ती अन पुरुषांपासून मुक्ती" हे ब्रीदवाक्य असलेल्या "सखी तू होऊ नकोस दुखी" या संघटनेतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात भारतभर महिला मनुष्यबळाचे प्रमाण क्षणोक्षणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.

(बातमी इथेच थांबली असती तर काही प्रश्न नव्हता, पण तिच्या उत्तरार्धात पत्रकारसखीने खास बायकांच्याच शैलीत मारलेला तिरकस टोमणा मात्र संभाव्य धोक्याची चाहूल देणारा होता... तर ऐका... आपले वाचा...)

कामाच्या बाबतीत भारतीय पुरुष भारतीय महिलांपेक्षा पिछाडीवर असले, तरी भारतीय पुरुषांनी वेतनाच्या बाबतीत ही कसर भरून काढली आहे. निर्धारित वेळ काम करूनही पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांच्या तुलनेत १७ टक्के अधिक वेतन मिळत असल्याचे देखील या सर्वेक्षणात सामोरे आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------

वाक्यावाक्याला भारतीय पुरुष असा उल्लेख वाचून आजवर स्वत:ला जेवढा "भारतीय" असल्याचा अभिमान वाटत होता तेवढीच आता "भारतीय पुरुष" असल्याची लाज वाटू लागली होती. काही नाही, मी ठरवले, या बातमीला उत्तर द्यायचेच. खून का बदला खून, आंख का बदला आंख, तसेच सर्वेक्षण का बदला सर्वेक्षण.... मात्र मला एकट्याला सर्वेक्षण करणे शक्य नसल्याने मी केवळ निरीक्षण करून एक अहवाल बनवायचे ठरवले अन लागलीच कामाला लागलो. महिन्याभरात स्वताच्याच ऑफिसमधील महिला कर्मचार्‍यांच्या निरीक्षणावरून भारतीय बायकांचे ऑफिसकाम प्रत्यक्षात कसे चालते यावर मी एक दसकलमी अहवाल बनवला. बस तोच पुरुष जनहित मे जारी तुमच्या समोर सादर करत आहे.

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

१) सकाळी कार्यालयात शिरल्या शिरल्या या कामाच्या जागेवर न जाता सरळ प्रसाधनगृहाकडे कूच करतात आणि मेकअप शेकअप करत बसतात. कारण घरून आंघोळ अन नीटनेटकी तयारी करून निघाल्या असल्या तरी प्रवासामुळे (भले तो दहा मिनिटांचा अन वातानुकुलीत बसने का असेना) विस्कटलेले केस, ड्रेस, मेकअप वगैरे ठिकठाक करूनच यांना ऑफिसमधील आपल्या इतर सहकार्‍यांना दर्शन द्यायचे असते.

२) जागेवर आल्यानंतरही कॉम्प्युटरची कळ न दाबता या आधी इतर महिला सहकार्‍यांवर एक नजर मारतात. आज कोणी काय नवीन विशेष घातले आहे का याचा आढावा घेतला जातो. असल्यास खोट्या खोट्या स्तुतीसुमनांचा मारा होतो. कारण पुढच्यावेळी आपण जेव्हा काहीतरी नवीन घालून येऊ तेव्हा आपलीही अशीच दखल सर्वांनी घ्यावी हा सुप्त हेतू.. गिव एंड टेक.. तू मला लाईक कर मी तुला लाईक करते..!

३) तासाभराने चहा येतो. तेव्हा बरेच पुरुष मुकाट्याने चहा पिऊन लगेच कामाला सुरुवात करतात तर काही जण सिगारेटचा झुरका मारायला बाहेर पॅंट्रीमध्ये जातात, मात्र सिगारेट-चहा संपताच परत येतात. बायकांच्या गटात मात्र चहा आल्या की खुर्च्याच एकमेकींच्या दिशेने वळतात, डब्यातून चिवडा-फरसाण अन क्रीमची बिस्किटे काढली जातात. एकमेकींशी देवाणघेवाण केली जाते. आणि सावकाश गप्पा मारत ज्याला गॉसिपिंग असेही बोलतात त्याच्या जोडीने हा टी-टाईम साजरा केला जातो.

४) त्यानंतर होते दुपारी जेवायची वेळ. ही वेळही काटेकोरपणे पाळली जाते. कारण कितीही अर्जंट काम असले तरी या फारवेळ उपाशी राहू शकत नाहीत. जेवणही यांचे सावकाश असते. डब्यात रोजच्याच भाज्या असतात तरीही त्याची पाककृती उगाचच्या उगाच जेवणाबरोबर चघळली जाते. तसेच जेवण झाल्यावर देखील या तश्याच गप्पा मारत बसून राहतात, लगेच उठत नाहीत. इतर सारे उठले की उलट यांच्या गप्पा जास्त रंगात येतात आणि चुगलीचा कार्यक्रम जोर शोर से चालतो. जाऊ, भावजय, नणंद हे दुर्मिळ शब्द फक्त इथेच ऐकू येतात.

५) पुरुष बापुडे जेवतात आणि डबा तसाच बॅगेत भरून घरी आणतात. या मात्र तिथेच ऑफिसच्या पाणवठ्यावर डबा घासून, पुसून, सुकवून, लखलखीत करूनच बॅगेत भरतात. डबेही यांचे काही कमी नसतात. खाणार जेमतेम दिड चपात्या मात्र लोणचे, पापड, सॅलाड, भाजी, चपाती असे सतरा डबे असतात. धुणीभांडी स्वताच करायची असल्याने वेळप्रसंगी ताट वाटी चमच्याचेही लाड चालतात.

६) जेऊन जागेवर आल्यावर यांचा फोनचा कार्यक्रम सुरू होतो. सर्वप्रथम नवर्‍याला फोन लागतो ते जेवण कसे झाले होते हे विचारायला. पण अर्थातच, तो एक पुरुष असल्याने आणि त्याच्या ऑफिसला असल्याने बरेवाईट काय ते खरेखोटे न सांगता एका शब्दात चांगलेच होते बोलून फोन ठेऊन देतो. त्यानंतर घरी फोन लावला जातो. कोणाचा सासरी लागतो तर कोणाचा माहेरी, मात्र लागतो जरूर. तिकडचे हालहवाल काय आहेत यावर तो फोन किती चालतो हे ठरते.

७) पुन्हा तास दीड तासाने चहाचा कार्यक्रम सकाळसारखाच पार पडतो. एवढ्या गप्पा या दिवसभरात कश्या मारू शकतात, एवढे विषय कुठून येतात या बद्दल कोणालाही शंका नसावी. विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.

८) संध्याकाळी ऑफिस सुटायच्या तासभर आधी यांना निसर्गनियमानुसार पुन्हा भूक लागते. यावेळी कोणी चहा तर आणून देणार नसतो. मग एकेकीच्या डब्यातून संत्री केळी अन सफरचंद निघतात. अगदी घरच्यासारखे सुरीने कापून वगैरे ही फळे खाल्ली जातात. इथे ही गप्पा मारणे हे ओघाने आलेच. निव्वळ खाण्यासाठी म्हणून या तोंड कधीच उघडत नाहीत.

९) ऑफिस सुटायच्या दहा ते पंधरा मिनिटे आधीच यांचा कॉम्प्युटर बंद होतो. कारण पुन्हा दिवसभराचा शीण घालवायचा तर तेवढा तगडा मेक अप हा हवाच. याच दरम्यान ऑफिसमधील सार्‍या बायका रंगरंगोटी करायला रेस्टरूमवर गर्दी करत असल्याने आणि प्रत्येकीला किमान सात-आठ मिनिटे लागत असल्याने यात वेटींगचा एक्स्ट्रा टाईम देखील हिशोबात धरल्यास उत्तम.

१०) उशीरा ऑफिसमध्ये थांबणे हा प्रकार यांच्या बाबतीत अभावानेच आढळतो आणि आढळला तरी रोज रोज नसतो. यांना वरचेवर थांबवायची त्यांच्या बॉसलाही भिती वाटते, न जाणो दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्येच भाज्या निवडायला घेऊन आल्या तर......

तर मित्रांनो........ हे असे असते. यावरून असे म्हणता येईल की मुळातच या भारतीय बायका भारतीय पुरुषांच्या मानाने संथ असून त्यांना दिवसभरात तेच काम करायला ७२ मिनिटे जास्त लागत असण्याची शक्यता असल्याने हा सर्व्हे सर्वस्वी चुकीचा आहे असे नाही म्हणता येणार.

या अहवालाशी सहमत असाल नसाल तरी इथे याच खाली मोठ्या संख्येने स्वाक्षरी करा. येत्या अमावस्येच्या आधी आपल्याला याची एक प्रत दैनिक फेकानंदच्या कार्यालयात सादर करायची आहे. पुढील कार्यक्रमाची रुपरेषा लवकरच, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज..!!

धन्यवाद,
अहवाल सादरकर्ता - तुमचा
पुरुषमित्र अभिषेक

तळटीप - सदर लेख कल्पनेवर आधारीत असून आपल्या जवळपास असेच काहीसे द्रुष्य दिसल्यास तो निव्वळ योगायोग समजावा........ आणि हो, हलकेच घ्या हं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळे बघण्यात आणि त्यावर चर्चा / विचार करण्यात त्यांचे ७२ तास खर्ची पडतात >>> अगदी अगदी दिनेशदा
१००% अनुमोदन

मुळातच या भारतीय बायका भारतीय पुरुषांच्या मानाने संथ असून त्यांना दिवसभरात तेच काम करायला ७२ मिनिटे जास्त लागत असण्याची शक्यता >> विनोदी लेखन म्हंटले तरी तुमचा निष्कर्ष तुमच्याच निरीक्षणातून धड व्यक्त होत नाही. संथ आणि कामचुकार किंवा वेळेचा अपव्यय करणे ह्यात फरक आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे हे? भारतीय स्त्री पुरुष ह्याबद्दल जाऊ दे पण तुम्ही मराठीच्या तासाला काय करीत होतात ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे - संथ आणि कामचुकार ह्या शब्दातील फरक कसा कोणी नाही शिकवला तुम्हाला? भरकटू नका, छान लिहा तुम्हाला जमेल.

अभिषेक,

माबोवर ७२ या नव्या आकड्याने अवतार घेतला आहे! Lol

बघितलंत का आकडेका बदला (तिप्पट) आकडेसे!! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

आता पुरुषांचा आँफिसातला ७२मिनिटांचा हिशेब कोणी लिहील का
>>>
गरज नाही
कारण ते दिवसातले सगळे मिनिट बायका काय करतात ते पाहात बसलेले असतात ( हे लेखच एक उदाहरण आहे Wink )

मस्त!
ऑफिस ऑफिस मधल्या आसावरी जोशी ची आठवण आली.
नेहमी ऑफिसात भाज्या चिरत बसलेली असायची.
आता पुरूषांचे टी टोबॅको नेट गेम्स इत्यादी टाईमपास लिहा कुणीतरी.

रिया,
कारण ते दिवसातले सगळे मिनिट बायका काय करतात ते पाहात बसलेले असतात ( हे लेखच एक उदाहरण आहे )
----------------------------
असे काही नाही...
जसे तुम्ही बायका मालिका बघता बघता वाटाणे सोलू शकता, तांदूळ निवडू शकता (त्याच्या नादात राहिलेला एखाद दुसरा खडा माफ) कारण कुठल्याही मालिकेचा कुठलाही एपिसोड घ्या, मेले तेच तेच रडगाणे तर असते.... तसेच आम्हा पुरुषांना देखील बायकांचे निरीक्षण करायला हातातील कामे बाजूला ठेवावी लागत नाही, आमची ईंद्रिये या कामासाठी सदैव तत्पर असतात.. Happy

च्रप्स +1
अरे निदान त्यामुळे तरी तो लिहीता होईल. Lol

खरच हे असे चित्र असेल (पुरुष असो वा महिला)तर हे सगळ करणार्यंच्या पेर्फॉर्मन्स वर काही फरक पडत नाही का? पडत नसेल तर प्रश्नच नाही आणि पडत असेल तर कंपनी अश्या लोकांना ठेवते कशी?

मला आवडला लेख. Happy Happy मजा आली वाचायला.

खरं सांगू का, यामुळेच भारतात नोकरी करायला मजा येते. नाहईतर इथे, आपलं डेस्कवर जा, काम करा, कुणाशीही न बोलता जेवा, घरी या.
किती बोअरिंग. Sad

बाय द वे, मला वाटले होते की शारुक च्या '७० मिनिट' भाषणासारखे '७२' मिनिट लिहिले आहे की काय. पण त्यापेक्षा भारी आहे हे. :ड
'७२ मिनिट' फेमस होतील लवकरच. Happy

अरे फार जुना लेख आहे हा.. हल्ली असले काही नाही लिहीत, तेव्हाही गंमतीनेच लिहिलेला.. ज्यांना आवडला ते चांगलेच आहे, ज्यांना आवडला नसेल ते ही आपल्या जागी योग्यच आहेत Happy

मला वाटले होते की शारुक च्या '७० मिनिट' भाषणासारखे '७२' मिनिट लिहिले आहे की काय >>>>> Happy

Pages