शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नरेंद्र सावंत नामक व्यक्तीची मेल एका ग्रूपमधे आलेली आहे. त्यातला मजकूर देत आहे.

माझी पुण्यातली एक मैत्रीण आहे संजीवनी. काहीतरी करायचंय करायचंय असं तिचं बराच काळ चाललं होतं.
मी तिला म्ह्टलं, एक काहीतरी धर आणि लाग त्याच्यायमागे. अनेक चेंडू एकदम पकडायला गेलीस, तर एकही हातात यायचा नाही. तुला जी समस्या महत्त्वाची वाटते, ती एकच समस्या हातात घे आणि पिच्छा पुरव.
ती म्हणाली, हिंजवडीच्या चौकातला ट्रॅफिक जॅम ही समस्या महत्त्वाची वाटते मला.
आधी ती समस्या तिच्या मागे होती, आता ती त्याच समस्येच्या मागे लागली. ऑफिस सुटल्यावर ती त्या चौकात जाऊन उभी राहिली, तासाला किती वाहनं तिथून ये-जा करतात ती मोजली. फोटो काढले. मग तिथल्या वाहतूक पोलिसांशी बोलली, त्यांना काय अडचणी येतात ते विचारले. मग पुण्यातले काही वाहतूक तज्ज्ञ गाठून या समस्येवर काय काय उपाय शक्य आहेत हे समजून घेतले. एकदा समस्या आणि उपाय नीट समजले की एल्गार करायचा.
हिंजवडीत अनेक कंपन्या आहेत, त्यांची एक असोसिएशन आहे. या असोसिएशनच्या पदाधिकारी मंडळींना गाठून संजीवनीनं त्यांना आग्रह केला. ही समस्या ऐरणीवर घ्या म्हणून. हळूहळू तेही तयार झाले. एकीकडे संजीवनीनं एक ऑनलाइन स्वाक्षरी अभियान सु केले. या वाहतूक कोंडीचा आम्हाला त्रास होतो आणि यावर हा उपाय करावा असं त्या अभियानात म्हटलं होतं. पाच हजार लोकांच्या सह्या जमल्यावर तिनं पत्रकारांशी संपर्क करून बातम्या छापून आणल्या?
मग स्थानिक खासदारांचा तिला फोन आला. त्यांनी स्वत: हिंजवडी चौकाला भेट दिली. वाहतुकीचं निरीक्षण वगैरे केलं. कंपन्यांच्या असोसिएशननंही खासदार आणि इतर संबंधित यंत्रणांना निवेदने दिली. दोन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर त्याच चौकात नवीन सिग्नल बसले. अनधिकृत पार्किंंग बंद झालं. लेन आखून त्यातून ट्रॅफिक सुरळीत नेल्यामुळे गर्दी थोडी कमी झाली.
मग आम्ही सगळ्यांनी खूश होऊन संजीवनीला एक पार्टी दिली. स्पेशल चहा आणि क्रीमरोल अशी जंगी पार्टी! मजा पार्टीच्या मेनूत थोडीच असते? ती तर पार्टीच्या निमित्तात असते. तुम्हाला बोचणारी एक समस्या उचला आणि लागा तिच्यामागे हात धुवून. कोणाला दोन महिने लागतील तर कोणाला सहा. पण शेवटी पार्टी मिळणार हे नक्की !

ही मुलगी माबोवर असते (ओळखा कोण?)
आपण स्वतः<>> नाही महेश, झकासरावांनी लिहिलय बघ.

लाडकीने हे धाडस केले त्याच्या दुसर्‍या दिवशी कॉलेजमधे तिचा आम्ही सत्कारदेखील केला होता. Happy

सी.ए. परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल वाचून त्यांचा खुप अभिमान वाटला. याचा अभ्यास खुपच कठीण असतो आणि पेपर लिहिण्यासाठी जबरदस्त चिकाटी आणि संयम लागतो. या मुलांचेही यश सहज नव्हतेच. त्यांना हार्दिक शुभेच्छा.

'व्हिजन वार्ता' हे नविन व्रुत्तत्पत्र याच हेतुने सुरु झाले आहे..
सद्या सिन्धुदुर्ग , रत्नागिरि, बेळगाव आणि सातारा आव्रुत्ति सुरु आहे .
२६ जाने ला सोलपुर जिल्हयात सुरु होतोय..
त्यानंतर कोल्हापुर , सांगली, अहमदनगर जिल्हयातही 'व्हिजन वार्ता' सुरु होईल.
.....पाहुया कसा प्रतिसाद मिळतो आहे !...सकारत्मक पेपरला...

'मराठी भाषा गौरव दिन' : २७ फेब्रुवारी

कुसुमाग्रज अर्थात जेष्ठ कवी वि.वा शिरवाडकर यांच्या जन्मदिवसा दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे .

धागा आवडला आणि इतक्या सकारात्मक बातम्या वाचायलाही मस्त वाटले. धन्यवाद हर्पेन. Happy

हर्पेन, अभिनंदन या धाग्यासाठी .खरेच तीव्रतेने वर्तमानपत्रांची अन वाहिन्यांची दहशत वाटू लागली आहे..
आजच्या मुंबई मिरर (२५-०१-२०१३ ) मध्ये मॅन एशियन लिटररी अ‍ॅवॉर्ड नॉमिनी मुशर्रफ अलि फारूकी (पाक कॅनडियन लेखक )यांचे जयपूर लिटररी फेस्ट वरचे विचार व परिचय आलाय (Why can't a lit fest be fun?-on Jaipur lit fest being compared to the Kumbh ).. वाचून मन प्रसन्न झाले.. पाकिस्तानी लेखकांना भारतात होणारा विरोध त्यांनी खूप प्रगल्भतेने समजून घेतलाय, स्वीकारलाय. त्यांचे 'बिट्वीन क्ले अँड डस्ट' या त्यांच्या कादंबरीबद्दलचे निवेदन वाचतानाही हेच जाणवले की आपापल्या स्थळकाळापलिकडची अशी प्रगल्भ माणसे नेहमीच या राष्ट्रांमधल्या युद्धसदृश परिस्थितीत त्रिशंकू ठरतात.. साहित्यावर अन वाचकांच्या सामंजस्यावर मात्र त्यांची मोहोर उमटल्याशिवाय रहाणार नाही.

हर्पेन, या धाग्याबद्दल धन्यवाद! Happy
समाजसेवेच्या व्रताचा समृद्ध वारसा
पाचोरा (जि. जळगाव)- समाजकार्यात "बाप से बेटी सवाई' असल्याचा अनुभव येथील प्रदीप पांडे यांना येतो. त्यांनी मतिमंदांसाठी सुरू केलेल्या समाजकार्याचा वारसा त्यांच्या दोन तरुण मुली कांचन आणि मीनल यांनी विवाहानंतर परदेशातही नेला. शिवाय, भारतात आल्यावर वडिलांच्या कार्यात त्या नेहमीच सहभागी होत आहेत.

पांडे यांनी आपल्या मातोश्री कै. कालिंदीबाई पांडे यांच्या इच्छेनुसार, तसेच संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होऊन मतिमंद बालकांसाठी कार्य करण्याचा वसा घेतला. त्यासाठी संत गाडगेबाबा शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेअंतर्गत मतिमंद निवासी विद्यालय सुरू केले. कुटुंब आणि समाजात दुर्लक्षित असलेल्या मतिमंद बालकांचा प्रेमाने सांभाळ करून व त्यांना त्यांची आवड व बुद्धीनुसार विविध व्यावसायिक शिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचा प्रयत्न पांडे करतात.

त्यांच्यासोबतच त्यांच्या कन्या कांचन व मीनल यांनाही या कार्याची गोडी लागली. दोघींनी विवाहाअगोदर वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. विवाहानंतरही त्यांनी मतिमंदांची सेवा थांबविलेली नाही. कांचन व मीनल यांनी विवाहानंतर अमेरिका व कुवेतमध्ये मतिमंदांची सेवा करण्यात स्वतःला झोकून दिले आहे.

कांचनने नाशिक येथे डी.एस.ई.एम.आर. हे मतिमंदांच्या सेवेसंदर्भातील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महेंद्र मेहता यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर श्री. मेहता यांच्या नोकरीच्या निमित्ताने ती कुवेतला गेली. तेथेही तिने मतिमंदांसाठी काही काळ काम केले. सध्या ती भारतात आहे. मीनलनेदेखील नाशिक येथे मतिमंदांच्या शिक्षण व सेवेसंदर्भातील शिक्षणक्रम पूर्ण केला व चंद्रेश उपाध्याय यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. पतीच्या नोकरीनिमित्ताने सुरवातीला इटली येथे मतिमंदांसाठी तिने कार्य केले. त्यानंतर अमेरिकेतील साउथ कॅरोलिनात तिने मतिमंदांची सेवा करण्यास सुरवात केली व आजही करीत आहे.
...
मायेचा ओलावा
या दोन्ही भगिनींच्या मानवतावादी कार्याची परकीय देशात तोंड भरून प्रशंसा होत आहे. पांडे यांनी आपली अर्धांगिनी मीनाक्षी पांडे, मुलगा नीलेश व स्नुषा सुरेखा यांनाही मतिमंदांच्या कार्यात सक्रिय केले.

सर्व माबोकरांना ईदच्या हार्दीक शुभेच्छा !

सर्व माबोकरांना उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
गणराज्य दिन चिरायु होवो !

कष्टाला सन्मान मिळवून देणारी 'बाळूताईंची टोळी'

बुध (ता. खटाव) - मुंबईच्या डबेवाल्यांप्रमाणे शेतमजुरीच्या व्यवसायाला कुशल व्यवस्थापनाची जोड देऊन शेतमजूर महिलांना अधिक उत्पन्न व सन्मान मिळवून देण्याची किमया खटाव तालुक्याचतील रणशिंगवाडी येथील बाळूताई दादा फडतरे यांनी केली आहे. तीस ते पस्तीस गरजू शेतमजूर महिलांची छोटी संघटना त्यांनी तयार केली असून, शेतीतील कामे ठेका पद्धतीने घेऊन ती कमी वेळेत त्या पूर्ण करून देत आहेत. वेळेच्या आत काम करून देण्याची शिस्त असल्यामुळे शेतकरीही त्यांना कामाचे अधिक दाम देऊन त्यांच्या कष्टाची कदर करत आहेत. शेतमजूर महिलांची अडवणूक, पिळवणूक थांबविण्याचे कार्य करणारा हा गट "बाळूताईंची टोळी' या नावाने प्रसिद्ध झाला आहे.

रणशिंगवाडी येथील गरीब कुटुंबातील बाळूताईंनी कसेबसे चौथीपर्यंत शिक्षण घेतले. वडिलांच्या मृत्यूनंतर आईबरोबर मजुरी करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरला नव्हता. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला; परंतु, गेली पंचवीस वर्षे त्या माहेरी रणशिंगवाडी येथेच राहतात. माहेरी आल्यापासून कष्टाळू व स्वाभिमानी बाळूताई पुन्हा शेतमजुरी करू लागल्या. मात्र, तेथे महिलांची बड्या बागायतदारांकडून होणारी अवहेलना त्यांना अस्वस्थ करू लागली. उशिरा कामावर आल्यानंतर मजुरी कमी देणे, मुलाबाळांच्या ओढीने घरी जाऊ पाहणाऱ्या महिलांना उशिरापर्यंत काम करायला भाग पाडणे, अपशब्द वापरणे असे अनुभव या महिलांना नेहमी येत होते. हे पाहून बाळूताई दुःखी होत. पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या या महिलांना चांगली वागणूक मिळावी, कामाचा योग्य मोबदला मिळावा, रोजच्या रोज मजुरी मिळावी व त्यांची पिळवणूक थांबावी, या उद्देशाने त्यांनी शेतमजूर महिलांना एकत्र करून छोटी संघटना बांधली. या महिला कष्टाळू असल्याने त्यांना कंत्राट पद्धतीने अधिक पैसे मिळू शकतात, याचा बारकाईने विचार बाळूताईंनी केला आणि तशी कामे घेण्यास सुरवात केली. शेतातील पीक परिस्थिती पाहून ज्वारी काढणीचा एकरी दर 3500 रुपये, बटाटा लागणीचा दर 70 रुपये प्रति क्विंटल, गादीवाफ्यावरील कांदा लागण 3500 रुपये, तर वाफ्यातील कांदा लागण एकरी 3200 रुपये याप्रमाणे दर ठरले गेले. ही सर्व मजुरी सर्वांना समान वाटून दिली जाऊ लागली. संघटनेतील महिला आणि शेतकरी या दोघांच्या दृष्टीने ही योजना फायद्याची ठरल्याने गेली 25 वर्षे ही संघटना अतूट राहिली आहे.
सध्या दुष्काळी स्थितीमुळे या भागात संघटनेला मजुरी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ग्रीन हाउस, डाळिंबाच्या बागा यातील आंतरमशागतीचे कौशल्य या महिलांनी प्राप्त केले. त्यामुळे अकलूजसारख्या भागात या महिलांना मोठ्या प्रमाणात कामे मिळू लागली आहेत. या संघटनेचा नावलौकिक ऐकून कांदा व बटाटा लागणीसाठी या टोळीला कऱ्हाड, फलटण, रहिमतपूर, साप, एकंबे, जिहे, कठापूर, शिरंबे, नांदगिरी, खेड, चंचळी, राजाळे या भागातील शेतकऱ्यांकडूनही शेतीकामासाठी मोठी मागणी वाढत आहे. या महिला सकाळी सात ते सायंकाळी सात याप्रमाणे बारा-बारा तास राबून शेतकऱ्यांची कामे वेळेत पूर्ण करून देत असल्यामुळे शेतकरी, बागायतदारही बाळूताईंच्या टोळीचे तोंड भरून कौतुक करत आहेत. त्यामुळे दुष्काळातही या महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे.

मोठ्या प्रमाणावर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना विविध कामांसाठी शेतमजुरांची गरज भासते; परंतु, एकाच वेळी जास्त मजूर उपलब्ध होत नसल्याने भांगलण, ज्वारीची काढणी, काटणी, कांदा, बटाटा लागण अशी कामे खोळंबून राहतात. अशा वेळी शेतकऱ्यांना बाळूताईंच्या टोळीची मदत घ्यावीच लागते. याशिवाय वीज भारनियमनामुळे अर्ध्या दिवसासाठी मजूर मिळत नाहीत. अशावेळी भारनियमनाच्या वेळापत्रकाची माहितीही बाळूताईंकडे असते. त्या काळातही मजुरांची उपलब्धता बाळूताई करून देत असतात.

रविवारीही सुटी न घेता काम
बाळूताई कमी शिकलेल्या असल्या, तरी व्यवहारकुशल आहेत. ज्या क्षेत्रात काम करावयाचे आहे, ते क्षेत्र किती असेल, याचा अचूक अंदाज केवळ नजरेने घेतात. त्यावर त्या कामाच्या मजुरीचा दर ठरवला जातो. गेली पंचवीस वर्षे सातत्याने काम करणाऱ्या या महिला क्वचितप्रसंगीच सुटी घेतात. रविवारीही सुटी घेत नाहीत. मोठ्या सणांव्यतिरीक्त सुटी घेत नसल्याने शेतकऱ्यांना या टोळीचा मोठा आधार वाटतो. काही कारणास्तव बाळूताईंना बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला तर त्या टोळीतील महिलांशी मोबाईलद्वारे संपर्क ठेवून अडचणींची सोडवणूक करतात. प्रेमळ स्वभाव, कुशल व्यवस्थापन व उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेल्या बाळूताई या टोळीतील महिलांसाठी एक आधारवड बनल्या आहेत.

सकाळ मधल्या बातमीचा दुवा...
http://esakal.com/esakal/20130128/5718014537893902392.htm

चैत्राली, महेश, गिरिश सावंत, भारती बिर्जे डिग्गीकर, शोभा१२४, इथे शुभवार्ता पोस्टल्या बद्दल धन्यवाद.

भारती बिर्जे डिग्गीकर, आपल्या Mumbai Mirror मधल्या बातमीचा दुवा इथे देऊ शकाल का?

धन्यवाद हर्पेन....एका चांगल्या 'टोळी'ची बातमी दिल्याबद्दल. एरव्ही टोळी म्हटले की काहीतरी कायद्याच्या विरूद्ध काम करणारे समाजातील घटक असेच चित्र नजरेसमोर येते. पण बाळुताईंच्या या कौतुकास्पद कार्यामुळे त्या नामाचा अर्थच बदलून गेला आहे असेच म्हणावे लागले...

अशा "टोळ्यां'चे जोमदार पीक सर्वत्र यावे.

अशोक पाटील

हर्पेन ........मस्त आहे "मैत्री " .... मल पण आवडेल काम करायला ......सविस्तर सागितले तर बरे होयिल.......ई मेल केली तरी चालेल......... हा धागा तर एकदम बेस्ट बेस्ट बेस्ट .....

हर्पेन, हा उत्तम धागा सुरू केल्याबद्दल अभिनंदन. इथे सांगितलेल्या सर्वच घटना, गोष्टी वाचून खूप छान वाटले. Happy
अगदी बातमी म्हणून नाही पण एक सकारात्मक बदल म्हणून मी स्वतः केलेली एक गोष्ट सांगते. परवा शनिवारी संक्रातीचे हळदी-कुंकू/गटग केले. मैत्रिणींबरोबर एक निवांत भेट म्हणून मी दरवर्षी हे करते. खाणं वगैरे नेहमीसारखंच केलं पण एखादी वस्तू जी लूटतात ना (संक्रांतीचे वाण) ती काहीही वस्तू दिली नाही. त्या ऐवजी प्रत्येक मैत्रिणीमागे माझ्यातर्फे १ कॅन बीन्स आणि ओटीऐवजी १ पाऊंड तांदूळ Oregon Food Bank ला दिला. आणि तीळगूळ देताना हे आवर्जून सांगितले की तुम्ही पण तुमच्या हळदीकुंकवाला असंच काहीतरी बदल करा. आपण सर्वजणी मिळून नवी पद्धत सुरू करूया. काहीजणींनी चेष्टामस्करी करून नावं ठेवली तर खूप जणींनी हा बदल आवडल्याचे सांगितले. ज्यांना आवडले त्यांच्या बरोबर एक गट करून आम्ही आता सुट्टीच्या दिवशी Food Bank त जाऊन स्वयंसेवक म्हणून काम करणार आहोत.

मी माझ्या मुलीबरोबर हे काम नेहमी करतेच पण अजून २० जणी आणि त्यांची मुले गोळा करू शकले ही चांगली गोष्ट वाटली. असा छोटा बदल लहान मुलांवर सुद्धा खूप मोठा परिणाम करतो.

क्षमस्व हर्पेन, दोन दिवस इथे नसल्याने उशीर झाला..
''Why can't a lit fest be fun ?' ..लिंक द्यायचा प्रयत्न केला तर ऑनलाइन पेपर मध्ये जाउन मुंबई मिररच्या आर्काइव्हमध्ये एंटर करावे लागतेय.. Happy
http://epaper.timesofindia.com/Default/Client.asp?skin=pastissues2&enter...

स्वप्ना_राज - जे दुवे आपण 'काही माझ्याकडून' म्हणून टाकलेत ते 'खूप' आहेत. Happy

माझ्याकडे काही धागे (पक्षी- The saga of Sagayam and Durai; आय एफ एस ऑफिसर तांबे - सिक्कीम मध्ये रेनवॉटर हार्वेस्टींगची योजना राबवली.) लवकर उघडत नाहीयेत.
(बहुदा बर्‍याच आधी प्रकाशित घटना असल्या कारणाने?) कॉपी पेस्ट करू शकाल का?

धनश्री - सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्द्ल अभिनंदन!

प्रत्येकाने आपापल्या परिघात (का होईना), असा घेतलेला पुढाकार हा आपल्या आसपासच्या वातावरणामधे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी नक्कीच कारणीभूत ठरू शकतो.
माझ्यामते आपल्या जवळपासच्या माणसांकडून मिळणारी स्फुर्ती ही थोर / महात्मा लोकांकडून मिळणार्‍या स्फुर्तीपेक्षा अधिक जास्त परिणामकारक ठरू शकते.

ह्या घटनेचे वार्तांकन इथे नोंदवल्या बद्दल धन्यवाद.

धागा मस्त आहे असे साती व अजुनही बर्‍याच जणांनी प्रतिक्रियेत नोंदवले आहे पण........

पुलंनी अवचटांच्या मुक्तांगणाबाबत काढलेले उद्गार आठवतात. ते म्हणाले होते, मुक्तांगण ही संस्था, कल्पना खूपच चांगली आहे पण तरी याची भरभराट होवो असे तरी कसे म्हणू?

त्याच धर्तीवर हा धागा चांगला, अगदी खूप-चांगला असला तरी jagaat चांगल्या घटना घडो, इथे तिथे सर्वत्र ऐकायला मिळो व सर्वच माध्यमातल्या लोकांना ह्या चांगल्या बातम्या आपल्या पर्यंत पोहोचवण्याची सद्बुद्धी मिळो व त्याची परिणीती या धाग्याची गरज संपण्यात होवो असे मात्र नक्की वाटते. आमेन, आमीन तथास्तु ईत्यादी. Happy

हर्पेन....स्वप्नाराज....भारती....तसेच अन्यही.

१. तुम्ही मंडळी इतक्या चांगल्या विषयासाठी अधिकच्या वाचनासाठी ज्या 'लिंक्स' देता त्या संदर्भात माझे निरिक्षण असे आहे की, कित्येक सदस्यांच्या कार्यालयीन कामाच्या ठिकाणी ह्या लिंक्स उघडत नाहीत.... म्हणजे मुख्य सर्व्हरकडून त्या 'लॉक' केल्या जात असाव्यात. याचाच अर्थ असा की ज्यांच्या घरी इंटरनेटची सोय नाही त्याना अशा लिंक्समधील संबंधित बातमी/बातम्या वाचता येणार नाही हे नक्की.

२. शिवाय माझ्या परिचयातील काही कुटुंब [दोन्ही घटक] असेही आहेत की ज्याना 'इंग्लिश' भाषा जितकी समजायला पाहिजे तितकी ती समजू शकत नाही, पण ते मायबोली तसेच अन्य मराठी संस्थळांवर प्रकट होत असलेले विचार नित्यनेमाने वाचत असल्याने मग त्याना ह्या धाग्याचा पुरेपूर आनंद द्यायचा झाल्यास किमान अशा लोकांसाठी का होईना, तुम्ही दिलेल्या लिंक्समधील बातम्यांचा सारांश इथे प्रतिसाद रुपात दिल्यास ती एक चांगली गोष्ट होईल.

३. मला माहीत आहे की मराठीतून कित्येकवेळा मोठे प्रतिसाद टंकणे कंटाळवाणे आणि वेळखावू काम सिद्ध होते, तरीही हा विकल्प धाग्याचे महत्व वाढविणारा ठरू शकेल.

विचार करावा.

अशोक पाटील

धनश्री , एक्दम बढिया कल्पना आणी उपक्रम ........एक्दम भावेश ... पुढच्या वर्शी नक्कि असेच काही तरी करीन .... कुवेत मधे जे जमेल ते...... ह्या धग्या मुळे कळाले ...हर्पेन ..धन्यवाद ......

अशोक. - आपल्या म्हणण्यास संपुर्ण सहमती !

लोकहो आपल्या सहभागाकरता अनेकानेक धन्यवाद, परंतु कृपया आपण इथे फक्त दुवे देण्याऐवजी,
१. मूळ बातमी मराठीव्यतिरिक्त ईतर भाषेत असेल तर मराठीतील सारांश इथे लिहावा,
२. मूळ बातमी मराठीतच असेल तर तोच (देवनागरी लिपीतील) मजकूर इथे डकवावा.
३. तसेच दिनेशदा यांच्या सुचनेचे स्वागत करून असेही सुचवतो की स्वतःला आलेले सुखद / सकारात्मक अनुभव देखील इथे टंकावेत.

Pages