उकडलेल्या आवळ्यांचं लोणचं - मोहरी फेसून

Submitted by स्वाती_आंबोळे on 3 January, 2013 - 11:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवळे
लाल मोहरी
लाल तिखट
मीठ
हिंग
हळद
साखर
लिंबूरस

क्रमवार पाककृती: 

१. आवळे अगदी थोडं पाणी घालून उकडून घ्यायचे.
(मी फ्रोझन वापरले म्हणून कुकरात एक शिट्टी काढली. ताजे घेतले तर दोन काढाव्या लागतील कदाचित.)
२. उकडलेल्या आवळ्यांतल्या बिया काढून टाकायच्या. त्यांच्या फोडी हातानेच सुट्या होतात.
३. आवळ्यांना सुटलेलं पाणी निथळून घ्यायचं.
४. त्याच पाण्यात लाल मोहरी फेसून घ्यायची. (म्हणजे मोहरी आधी मिक्सरमधे कोरडी दळून मग त्यात हे पाणी घालून पुन्हा एकदा फिरवायची/घुसळायची.)
५. तेल तापवून त्याला कढ आणायचा. गॅस बंद करून त्यात हिंग, हळद आणि लाल तिखट घालायचं.
६. आवळ्यांच्या फोडींत मीठ आणि आवडीनुसार साखर आणि लिंबूरस घालायचा. (आवळ्यांचा तुरट-आंबटपणा असतोच, त्यामुळे लिंबूरस नंतर चव बघून त्यानुसार घालावा.)
७. फोडणी जरा थंड झाली की आवळे आणि फेसलेली मोहरी एकत्र करून त्यावर ओतायची. मिश्रण नीट कालवून घ्यायचं.
८. बाटलीत भरून फ्रीजमधे ठेवायचं.
९. आवडत्या व्यक्तींना आधी कल्पना देऊन आणि फेसलेल्या मोहरीची रसभरीत वर्णनं करून पानात लोणचं वाढायचं.
नावडत्या व्यक्तींना आणि अन्य बेसावध बकर्‍यांना आधी अशी कल्पना द्यायची नाही. ते लोणच्याची चव घेत असतांना आपण पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ प्यायला सुरुवात करायची नाही.

वाढणी/प्रमाण: 
घरात असतील तितके नग.
अधिक टिपा: 

पाककृतीत प्रमाणं लिहिलेली नाहीत. सगळे जिन्नस आपल्या अंदाजाने आणि आवडीनुसार घ्यायचे.
अंदाज चुकला तर आवडच तशी आहे असं ठासून सांगायचं.
आवड इतरांशी जुळली नाही तर त्या इतरांकडे एक तुच्छ कटाक्ष टाकायचा. त्यावरून कोणी नाराज झालं तर दादचं नाव सांगायचं.
१० मिनिटं हा आवळे उकडून झाल्यानंतर लागणारा वेळ आहे. त्यावरून पाककृती लिहिणारीच्या अंदाज आणि आवडीबद्दल आडाखे बांधू नयेत.
लालऐवजी काळी मोहरी चालेल का वगैरे प्रश्न विचारू नयेत. आपले प्रयोग आपण करावेत आणि आपली आपण फळं भोगावीत.
यात आवडत असेल तर आलं किसून घालू शकता. पण आपले प्रयोग...इ. इ.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वाचुनच तोंडाला पाणी सुटलंय.
>>ते लोणच्याची चव घेत असतांना आपण पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ प्यायला सुरुवात करायची नाही.>> Rofl हे वाचताना तोंडात द्रव पदार्थ न्हवता हे माझ्या कीबोर्डचं नशीब!
लहानपणी हे अनेकदा खाल्लेलं आहे. हल्ली इंग्रोत आवळे मिळतात. करुन बघेन. मोहोरीला वसाबीने रिप्लेस करता येईल का? Proud

Pages