सियाचीन ग्लेशीयर.....भाग २ ......आयुष्याची दोरी

Submitted by रणजित चितळे on 25 December, 2012 - 11:39

सियाचीन ग्लेशीयर ...भाग १
.ह्या आधीचे...

.......... एखाद्या खुनी माणसा प्रमाणे किंवा कोणाला मारण्याची सुपारी घेतल्या सारखे सतत तेथे असणाऱ्या जवानांच्या मागे दबा धरून राहून घात करायला तयार असतात जणुकाही. चालताना चुकलात, थोडे वजन जास्त पडले, पाय घसरला, समजले नाही, वाट चुकलात किंवा नशिबाने पाठ फिरवली तर पटकन सावज साधायला तयार...................

भुरभूर होणारा हिमवर्षाव हिमखाईच्या तोंडावर सारखा पडत राहतो. ह्या साठलेल्या पहिल्या थरावर पडणाऱ्या बर्फाचा अजून एक थर बसतो. हळूहळू थरावर थर जमतात. हे जमलेले बर्फाचे थर हिमखाईचे तोंड बंद करतात. जसे काही छोटेखानी पूल. दिवसरात्र पडणाऱ्या हिमपाताने तो पूल इतका भक्कम होतो की पाच सहा माणसांचे वजन सहज घेऊ शकतो व हिमखाई त्याच्या खाली दडून जाते. दिसता दिसत नाही. ग्लेशीयर मध्ये अशा किती हिमखाई दडल्या असतील देवच जाणे. आजूबाजूला बर्फ पडून हे हिमपूल सुद्धा दडून जातात. बघणाऱ्याला फक्त लांबच लांब पांढरी बर्फाच्छादित चादर पसरल्या सारखी वाटावी तसे दिसते. ह्या चादरीत, हिमखाई व त्यावर निसर्गाने बांधलेले पुल, दडून जातात. ग्लेशीयरच्या पोटात होणाऱ्या हालचालीने किंवा सूर्याच्या किरणांनी, कधीकधी मात्र ते तयार झालेले हिमपूल ठिसूळ होतात व अगदी कमी वजनाने सुद्धा तुटून, त्याखाली दडलेली हिमखाई उघडी पडते. न लक्षात येऊन अशा ठिसूळ झालेल्या पुलावरून जर आठ दहा जवानांची टोळी गेली तर त्यांच्या वजनाने पुल तुटतो. अशा जागेवरून जाताना ज्या जवानाच्या वेळेला नेमका हा पुल तुटतो, तो दुर्भागी हिमखाईत पडतो. एकदा पडला की सुटणे मुष्कील. मरूनच सुटका फक्त. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या किड्या सारखे.

ह्या मरणखाई पासून वाचण्याचा एकच उपाय असतो. हा उपाय म्हणजे ‘दोरी’. ग्लेशीयर मध्ये एका पोस्ट वरून दुसऱ्या पोस्टवर जायचे असते तेव्हा कधीही एकटा दुकटा जवान जात नाही. आठ दहा जवानांची टोळी पॅट्रोलींग करत जाते. ह्या गस्त घालणाऱ्या टोळी मधले जवान, एक लांबच लांब दोरी घेऊन, पहिल्या जवानाच्या कमरेला बांधतात. मध्ये सात आठ फूट सोडून, दुसऱ्याच्या कमरेला बांधतात व परत सात आठ फुटांची ढील सोडून, तिसऱ्याच्या कमरेला बांधतात व असे करत करत शेवटच्या जवानाच्या कमरेला बांधून एक साखळी तयार करतात. चालणाऱ्या दोन जवानांमध्ये तीन चार फुटांचेच अंतर ठेवत असले तरी कमरेला बांधलेल्या दोरी मध्ये चांगली आठ ते दहा फुटांची ढील सोडलेली असते. एका वेळेला साधारण आठ जवान अशी कमरेला दोरी बांधून एका मागोमाग चालतात. चुकून कोणी अश्या ठिसूळ पुलावरून चालताना, पूल तुटून हिमखाईत पडला तर कमरेला बांधलेल्या दोरीमुळे टोळीतले बाकीचे साथीदार, अशा अभाग्याला खाईतून ओढून काढू शकतात व गस्त घालणाऱ्या टोळी मधल्या जवानाला जिवंत राहायची संधी मिळते. अशा तऱ्हेने बांधलेली दोरी हिमखाईच्या रूपाने होणाऱ्या अपघातात खूप कामाला येते. ह्या अशा टोळीलाच ‘दोरी’ म्हणतात. ग्लेशीयर मध्ये एक दोरी म्हणजे अशा पद्धतीने गस्त घालणारे किंवा रसद पोहोचवणारे आठ दहा जवान.

_60071982_siachen_lores_13.jpg
(दोरी....(बिबिसी वरून साभार))

अशीच एक ‘दोरी’ भल्या पहाटे त्या दिवशी बारा किलोमीटर दूर असलेल्या फॉरवर्ड पोस्टवर जायला निघाली. त्यांना त्या पोस्टवर जाऊन रसद पोहोचवायची होती. ग्लेशीयर मध्ये रस्ते नाहीत. वाहने नाहीत. जर रसद पोहचवायची तर जवानांनीच किंवा हेलिकॉप्टरने. हवामान अनुकूल असेल तरच हेलिकॉप्टरने रसद पोहोचवता येते. पण ग्लेशीयर मध्ये हवामान अनुकूल मिळणे कर्मकठीण, त्यामुळे बहुतेक करून रसद जवानच पोहचवतात. ही ‘दोरी’ आठ जणांची होती.

ह्या रसद पोहचवणाऱ्या जवानांच्या टोळीजवळ खूप वजन होते. उन्हाळा येणारच होता. ग्लेशीयर मध्ये वर्षातले चार महीने तापमान जरा वाढते म्हणजे शून्याखाली तीस डिग्री सेल्शियस जाण्या ऐवजी ह्या चार महिन्यात शून्याखाली दहा डिग्री सेल्शियस असते इतके वाढते. इथले जवान ह्याला गमतीने ‘उन्हाळा’ म्हणतात. पाकिस्तानकडून उन्हाळ्यातच हालचाल सुरू होते. म्हणजे तोफा डागणे किंवा ग्रेनेड फायर अशा सारखे उपद्रव. एकदाका गोळाबारी सुरू झाली की रसद पोहोचवणे मुष्कील जाते. एवढ्यासाठी उन्हाळा येण्याआधी रसद पोहचवून तरतूद करून ठेवावी लागते. रसद म्हणजे प्रामुख्याने ग्लेशीयरचा देव ‘रॉकेल’. येथे बाकीचे काहीच इंधन उपयोगी पडत नाही. तंबू गरम ठेवण्यासाठी लागणारी ‘बुखारी’ रॉकेलवर चालते, स्टोव्ह रॉकेलवर चालतो, छोटी संयंत्रे म्हणजे जनरेटर्स रॉकेलवर चालतात. फॉरवर्ड पोस्टवर रॉकेल पोहोचवणे सुद्धा अशा दोरीचे एक काम असते. सियाचीनच्या रसदपुरवण्याच्या बेस वर रॉकेल हेलिकॉप्टरने पोहोचवले जाते. पण तेथून पुढे ग्लेशीयरमध्ये पोहचवण्याचे काम अशा ‘दोऱ्याच’ करतात. कधीकधी हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेतात पण प्रतिकूल हवामानात ‘दोरीच’ उपयोगाची. हेलिकॉप्टर जरी गेले तरी सुद्धा अती उंच जागे मुळे कमी रसद घेऊन जाऊ शकते. कोणाला आश्चर्य वाटेल पण छोटी हेलिकॉप्टर्स तीस चाळीस किलो पेक्षा जास्त नाही सामान घेऊन जाऊ शकत नाहीत.

ग्लेशीयर मध्ये चालायचे म्हणजे स्वतःच्या बचावासाठी प्रत्येकाजवळ बर्फ फोडण्याच्या कुदळी, कमरेला दोरी, विजेरी, एक दिवसाचे खाणे व पर्सनल लोकेटर बिकन असतो. हा बिकन आणीबाणीच्या प्रसंगात सॅटलाईट तर्फे जवानाचे अचूक ठिकाण बेस कँपला पोहोचवते. ह्या बरोबर आम्ही एकएक रॉकेलचा ‘जेरीकॅन’ घेऊन निघालो. एक जेरीकॅन भरून रॉकेल म्हणजे वीस लीटर. म्हणजे आमच्या दोरी मध्ये प्रत्येक जवानाच्या पाठीवर जवळजवळ तीस किलो वजन होते. एवढे वजन नीट घेऊन जाता यावे म्हणून अल्युमिनीयमच्या फ्रेमचा स्टॅन्ड, पाठीवर लादला होता. त्या स्टॅन्डमध्ये पोहचवायच्या साऱ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या त्यामुळे दोन्ही हात मोकळे होते. त्या दिवशी हे सगळे नेहमीचेच असले तरी आम्हाला चालणे फार कठीण झाले होते. रात्रभराच्या हिमपाताने आम्हाला सगळीकडे फक्त पांढरेच पांढरे दिसत होते. आमच्या ठरलेल्या वाटा व एका पोस्टाकडून दूसऱ्या पोस्टावर जायच्या नेहमीच्या खुणा पडलेल्या बर्फाने दडून गेल्या होत्या.

रात्रभराच्या बर्फवृष्टीने पाया खालचा बर्फ अजून कडक झाला नव्हता. चालताना पाऊल घूडघ्या पर्यंत बर्फात खोल रुतत होते. तशातच वादळी वारे घोंघावत वाहत होते. ताशी दहा मैल वेगाने वाहणारे वारे आमच्या शक्तीची परीक्षा पाहत होते जणू. वादळी वाऱ्यात हेलकावे खात कसेबसे त्या एकएक पाऊल टाकत, आम्ही पुढे चाललो होतो. सगळे खूप दमलो होतो. आमच्यातल्या प्रत्येकाला थांबावे असे वाटत होते. पावला पावला गणिक तोंडातून शिव्या सुटत होत्या. पण थांबलो असतो तर चालताना पाठीवर आलेला घामाचा थर लगेच गोठला असता. अश्या गोठलेल्या थराने शरीरातली राहिलेली गर्मी शोषून घेतली जाण्याच्या भीतीने आम्ही सगळे न थांबता चालत राहिलो होतो. अजून तीनच किलोमीटरच्या चालण्याने फॉरवर्ड पोस्ट येणार होते. तेथे पोहोचल्यावर रॉकेलवर चालणाऱ्या बुखारी जवळ बसून मस्त चॉकलेट व सुकामेवा खायला मिळणार होता आम्हाला. दमून आल्यावर मिळणाऱ्या मेव्याच्या आकर्षणाने आमची पावले पोस्टच्या दिशेने झपझप पडायला लागली होती. प्रथिनयुक्त असलेले जेवण खावे लागते म्हणून ग्लेशीयर मध्ये सुकामेवा खूप मिळतो. बाकी जेवणात फक्त टिन्ड्फूड असते.

फॉरवर्ड पोस्ट आता अगदी टप्प्यातच आले होते,.... तेवढ्यात घात झाला. कोठचाही इशारा न देता, हिमखाईने आमच्या ‘दोरीला’ गाठले. आमच्या दोरीतला शेवटचा म्हणजे आठव्या जवानाला हिमखाईने साधले. आता जेव्हा जेव्हा ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर येते, तेव्हा कळते आमच्यातला शेवटचा जवानच हिमखाईच्या सापळ्यात का सापडला ते. आम्हाला पत्ता नसलेल्या हिमखाईवरुन चालताना त्याच्यावर हिमवर्षावाने बनलेला पूल आमच्या प्रत्येकाच्या रुतणाऱ्या वजनदार बुटांनी हळूहळू तकलादू होत इतका कुचकामी झाला की शेवटच्याचे वजन त्या पुलाला पेलवले नाही व आधी न दिसलेल्या हिमखाईचे तोंड पूल कोसळण्यामुळे उघडे होऊन शेवटचा जवान त्यात पडला. त्याला काही कळण्याच्या आधीच. हे इतके पटकन घडले की पडताना घाबरून फोडलेली आरोळी सुद्धा तो त्या हिमखाईच्या आत पडल्यामुळे आम्हाला हळू ऐकायला आली. अकस्मात तो असा आत पडल्यामुळे, त्याच्या पुढेच पास सहा पावलांवर चालणाऱ्या जवानाच्या कंबरेला बांधलेली आठ फुटांच्या दोरीचा ढील एकदम संपला. खाईत पडलेल्या जवानाच्या वजनाने, दोरी इतक्या वेगाने ओढली गेली की काही कळायच्या आधीच पुढचा जवान खेचला गेला व साखळी ने चाललेल्या बाकीच्या सगळ्यांना दोरीचा जोरात धक्का बसला. रसद पोहोचवायच्या पोस्टच्या आम्ही अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो होतो. थोडेच पुढे पोस्ट होते, एका छोट्या डोंगरावर. आम्ही त्या डोंगराचा शेवटचा चढ चढत होतो. पण हा शेवटचा टप्पा अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीच्या दृष्टीने घातक होता. बर्फ आधीच ठिसूळ होता, अगदी कापसा सारखा. हे झाले तेव्हा आम्ही डोंगर चढायला लागलो होतो त्यामुळे आम्हा बाकीच्यांच्या वजनाचा फायदा मिळू शकत नव्हता. आम्ही जर चढ चढायच्या ऐवजी, उतारावर असतो तर त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला असता.

त्या वेगाने ओढल्या जाणाऱ्या दोरीमुळे आमच्यातले चार जवान तर अकस्मात खेचले जाऊन घसरून पडले. बाकीच्या जवानांनी एकदम त्यांच्या आईसएक्स त्या ठिसूळ बर्फात रुतवल्या, त्यामुळे निदान आम्ही त्या हिमखाईत ओढले गेलो नाही. पण बर्फ इतका रवाळ होता की आम्ही सगळे त्या बर्फावर झोपून व जिवाच्या आकांताने आमच्या कुदळी रोवायचा प्रयत्न करून सुद्धा काही फायदा होत नव्हता. एव्हाना हिमखाईत पडलेल्या जवानाने घाबरून हातपाय मारायला सुरवात केली होती. कोठे धरायला मिळते का, कोठे पाय ठेवायला जागा मिळते का ह्या प्रयत्नात तो असताना, आमच्या दोरीला त्याच्या हालचालीमुळे जोरात झटके बसून आम्ही हिमखाईच्या दिशेने ओढले जाऊ लागलो. त्यातच त्याच्या जिवाच्या आकांताने ओरडण्याने आमचे सगळ्यांचे हृदय पिळवटून जात होते. आमच्यापण नशिबी येऊ घातलेल्या दशेचे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहिले. प्रत्येकाला ओढल्या जाणाऱ्या दोरीचा अर्थ कळला व धोका समजला. पटकन काहीतरी केले नाही तर सगळीच्या सगळी दोरी आम्हा बाहेर असलेल्या सातही जवानांना घेऊन त्या हिमखाईत खेचली जाणार होती. हिमसमाधीसाठी. मृत्यू काही फूट ‘आ’ वासून उभा होता. आम्ही सगळे हिमखाईकडे ओढले जायचे थांबत नव्हते. आमचा लीडर आमच्या दोरीच्या सगळ्यात पुढे होता. दोरीतला पहिला. त्याने त्या हिमखाईतल्या जवानाला ओरडून हालू नकोस असे सांगितले. एक दोन घटकांनी, हिमखाईत पडलेल्या जवानाने हालचाल व ओरडणे कमी केले. पॅट्रोल लीडरचा आदेश त्याच्या काना पर्यंत पोहोचलेला होता. त्याने स्वतःला सावरले.

त्याच्या कमी झालेल्या हालचालीमुळे आम्हाला बसणारे झटके कमी झाले व क्षणभर असे वाटले की हिमखाईत ओढले जाण्याचा वेग कमी झाला आहे. आम्ही सगळे जेथे होतो तेथे बर्फावर निपचीत पालथे पडलो होतो. कुदळी, हातांची बोटे, कोपर एवढेच काय पालथे पडल्या पडल्या पाय फाकवून आमचे घुडगे व बूट बर्फात रुतवून आमच्या दोरीला बसलेली ओढ कमी करायच्या प्रयत्नात लागलो. दोरी वापरण्या मधला सगळ्यात मोठा धोका आम्ही सगळे अनुभवत होतो. कमरेला बांधलेल्या दोरी मुळे एखाद्याला खाईतून वाचवता येते, पण अशा आताच्या सारख्या परिस्थितीत, तीच दोरी सगळ्यांना बरोबर घेऊन जाते, मरणखाईत. आम्हाला ग्लेशीयर मध्ये येण्या आधी बेस कँपवर एकवीस दिवसाचे ट्रेनिंग दिले जाते त्यात ह्या साऱ्या गोष्टी व सारे धोके शिकवले जातात. आम्हाला ते क्षणार्धात सगळे आठवले. आम्हाला जाळ्यात सापडल्याची जाणीव झाली. आता अशी पाळी आली होती की काहीही कोणीही हालचाल केली की लागलीच ओढ वाढायचा व मृत्यू तेवढा जवळ यायचा. आमच्या पेट्रोल लीडरने इकडेतिकडे पाहिले. त्याच्या सुदैवाने जवळच त्याचा रेडीओसेट पडलेला त्याला दिसला. आम्ही जेव्हा सगळे दोरीच्या झटक्याने खाली पडलो, त्यात त्याचा रेडीओसेट पण पडला होता. बेस कँपवरून मदत मागण्यासाठी आमचा पॅट्रोललिडर रेडीओसेट पर्यंत सरपटला. त्याच्या त्या सरपटण्याने परत दोरीची ओढ वाढली. एवढे होई पर्यंत आमच्यातला सातवा जवान दोरी बरोबर ओढला जाऊन, हिमखाईच्या अगदी तोंडाशी पोहचला होता. वेळ अशी होती की कोणीही जरा हालले की हिमखाईच्या तोंडाशी घसरत पोहचलेला सातवा जवान त्या हिमखाईत खेचला जाऊन पडला असता, व दोघाच्या वजनाने मग थांबणे नाही. आम्ही सगळेच त्या खाईत पडलो असतो. हिमखाईने पहिली खेळी खेळली होती. आता पुढची खेळी खेळायची पाळी आम्हा जवानांवर होती.

आमच्या लीडरकडे दुसरा पर्याय नव्हता.

‘रोप को कांट दो।’

सातव्या जवानाला उद्देशून तो जोरात ओरडला. कारण तोच जवान हिमखाईच्या तोंडाशी पोहोचला होता. त्या आदेशाने सगळ्यांना धक्का बसला. अंगावर काटे उभे राहिले. दोरी कापण्याचा अर्थ सर्व जाणत होते. जसे काही हिमखाईत पडलेल्या जवानाची आयुष्याची दोरीच कापण्या सारखे. जन्म मृत्यूच्या खेळात तेवढ्या दोरीचेच अंतर राहिले होते. दोरी कापणे म्हणजे आमच्या त्या साथीदाराला वाचवायचे सगळे पर्याय संपणार होते. आमच्यातले अनुभवी जवान समजून गेले की पॅट्रोल लीडरचा आदेश कितीही निर्घृण असला तरी हा एवढा एकच पर्याय आमच्या जवळ शिल्लक राहिला आहे. थोड्याच घटकेत आमची सगळ्यांची गत त्या हिमखाईत पडलेल्या जवाना सारखी होणार होती. आमच्या हालचालीने स्थिती अजूनच बिघडत चालली होती. ती बदलण्याची वाट बघत राहणे आत्मघातकी होते. तुफानी वाऱ्यांनी आम्हाला लवकरच गोठवून टाकले असते व थंडीने उरलीसुरली शक्ती पण संपुष्टात येत चालली होती.

काही कळत नव्हते. जो पर्यंत आम्ही असे पालथे पडून होतो तो पर्यंत आम्ही त्या हिमखाईतल्या जवानाला मदत करू शकणार नव्हतो. जर असेच राहिलो असतो तर थोड्याच वेळात त्या हिमखाईतल्या गारठ्याने तो जवान स्वतःच एक बर्फाचा गोळा बनला असता. हे सगळे पटण्या सारखे असून सुद्धा त्या सातव्या जवानाचा दोरी कापण्यासाठी हात धजेना.

‘मैं केहता हूँ, काट दो रस्सीको।’ पॅट्रोल लीडर चिडून परत एकदा खेकसला. त्याच्या त्या रागात परत दिलेल्या आदेशाने काम केले. जवानाचे हात आपोआप चालले व हिमखाईतल्या जवानाची दोरी त्याने कापली.

हिमखाईत एवढा वेळ लटकणाऱ्या जवानाची दोरी कापली जाताक्षणी तो खाईत कोसळला व त्याने कोसळतानाची भयभीत होईन फोडलेली आर्त किंकाळी आमचे सगळ्यांचे हृदयचिरून गेली. पण त्याचे ओरडणे जसे सुरू झाले तसे ते अकस्मात पणे थांबले ही. इकडे जशी हिमखाईत पडलेल्याची दोरी कापली तसे आम्ही लागलीच जागचे उठून हिमखाईच्या तोंडाशी आलो. आत डोकावून बघितले. बघतो तो काय, आम्हाला हिमखाईची अजून एक जादूगारी दिसली. आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. आतमध्ये काही फुटांवर ती हिमखाई इतकी अरुंद झाली होती की पडलेला जवान, ती अरुंद झाल्या कारणाने काही फुटांवर खाली तसाच उभा राहिलेला दिसत होता. हे बघून थोडेसे हायसे वाटले. जर वेळेत मदत मिळाली तर एक संधी होती त्याला वाचवायची.

काही फूट खाली दिसणाऱ्या जवानाला बघून, पॅट्रोल लीडर परत मागे हटला व जेथे त्याने त्याचा रेडिओ ठेवला होता त्यात जोर जोरात खेकसायला लागला. दहा मिनिटाने आम्हाला कळले की अपघाताची बातमी बेस कँपला मिळाली आहे. ७० किलोमीटरचा ग्लेशीयर. बेस कँपची जागा ग्लेशीयरच्या शेपटाला आहे. १९००० फुटांवरून ग्लेशीयरमध्ये असणारा हजारो वर्षांचा टणक बर्फ, समुद्रसपाटी जस जशी कमी होत जाते, तस तसा बर्फ नरम होत जातो. बेस कँप पर्यंत तो इतका नरम होतो की तो वितळून त्याचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. बेस कँपच्या खाली, ह्याच वितळणाऱ्या बर्फाचा थेंब थेंब झरणाऱ्या थंड पाण्याचा छोटा ओहोळ होतो, ओहोळाचे रूपांतर ‘श्योक’ नावाच्या नदी मध्ये होते. पुढे ही श्योक, पश्चिमेस आढेवेढे घेत पाकिस्तानात जाते. त्यामुळे असे म्हणता येईल की ग्लेशीयर बेस कँपशी संपतो. बेस कँप ग्लेशीयरला रसद पुरवण्याचे व अपघात झालेल्या जवानांना मदत करायचे केंद्र आहे. येथे हेलिकॉप्टर्स रसद आणतात व इथून पुढे ती वेगवेगळ्या पोस्टांवर पोहोचवली जाते. तसेच आणीबाणीत वापरता येण्यासाठी येथे हेलिकॉप्टर्स ठेवलेली असतात. त्यात स्ट्रेचरर्स, फर्स्टएडचे सामान व बर्फ तोडण्यासाठी लागणारी काही हत्यारे नेहमी ठेवलेली असतात. आलटून पालटून काही वैमानिक सतत कामावर रुजू राहतात. कॉल आला की निघायचे. पण हवामान ठीक असेल तरच व दिवसाच. रात्री शक्य नाही. त्यामुळे अपघात घडायचाच असेल तर दिवसा घडावा व हवामान चांगले असताना घडावा अशी प्रत्येकाची साधी इच्छा पण चांगल्या हवामानात व दिवसा अपघात कशाला घडतात. ते नेहमी खराब हवामानात व रात्रीच घडतात.

ह्या बेस कँपला असलेली हेलीकॉप्टरर्स व त्यांच्या वैमानिकांचे काम खूप अवघड व महत्त्वाचे असते. ग्लेशीयर मध्ये तत्परतेने कोठेही जेथे अपघात झाला असेल तेथे रेस्क्यू टीमला घेऊन जायचे. रेस्क्यू टीमने वाचवलेल्या व्यक्तीला बेस कँपला सुखरूप घेऊन यायचे. शेवटच्या फेरीत रेस्क्यू टीमला काम झाल्यावर बेस कँपला घेऊन आले की त्या दिवशीचे त्यांचे काम संपते. ग्लेशीयर मध्ये खूप अपघात होत राहतात. ती जागाच तशी आहे. खरे म्हणजे पाकिस्तानचा नंबर दुसरा लागतो. पहिली नंबर ग्लेशीयरचा.

बेस कँपच्या लाउड स्पीकरवरून मोठ्यांदा अपघाताचा कोडवर्ड जसा सगळ्यांनी ऐकला, तसे तयारीत असलेले प्रशिक्षित वैमानिक हेलिकॉप्टर कडे जाऊ लागले. तरी सुद्धा निघायला अजून दहा मिनिटे लागणारच होती. हेलिकॉप्टर सुरू करायची सुद्धा एक पद्धत असते. ती काटेकोरपणे पाळणे जरुरीचे असते. नाहीतर वाचवण्यासाठी ठेवलेल्या हेलिकॉप्टरचाच अपघात व्हायचा. कधी कधी तापमान जास्त असेल तर रेस्क्यू टीम मधल्या एकाच जवानाला हेलिकॉप्टर घेऊन जाऊ शकायचे. त्यातून परत येताना अपघाती जवानाला पण घेऊन यायचे. परत येताना हेलिकॉप्टरचे इंधन कमी झालेले असते त्यामुळे, कमी झालेल्या वजनात, अपघाती जवानाला पण घेऊन येता येते.

जेव्हा ही बातमी बेस कँप वर आली तेव्हा रेस्क्यू टीम कंट्रोल रूम मध्येच होती. जास्त काहीच माहिती मिळाली नव्हती, फक्त घटनास्थळाच्या ठिकाणाची माहिती कळली होती.

‘बेस कमांडरने’ रेस्क्यू टीम लीडरला सांगितले "हिमखाईत जवान पडला आहे" टीम लीडर एक उमदा कॅप्टन होता. त्या कॅप्टनने, त्याच्या मांडीवर पसरलेला नकाशा बघत बघत बेस कमांडरला विचारले "सर, किती वेळ झाला पडून?" त्याला अपघात कोठे झाला त्या जागेची एवढी काळजी नव्हती ते काम वैमानिकाचे होते. दोघे वैमानिक तो पर्यंत त्यांच्या नकाश्यात अपघाताची जागा बघून फ्लाईट प्लॅन ठरवत होते. एका हेलिकॉप्टर मध्ये दोन वैमानिक असतात. टीम लीडरला त्याला लागणारी माहिती पाहिजे होती. कारण प्रत्येक हिमखाईचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते.

"गेली ४५ मिनिटे तो हिमखाईत आहे. त्यात हेलिकॉप्टरने पोहोचायचा वेळ लावला तर अजून पंधरा मिनिटे. तू पोहोचे पर्यंत त्याला हिमखाई मध्ये पडून एक तास होईल" बेस कमांडर निराशेने म्हणाला.

हेलिकॉप्टरचा पायलट खिडकी बाहेर बघून म्हणाला, "लौझी टायमिंग". ह्या वाक्याचा अर्थ सगळ्यांना माहिती होता. हे अजून एक ग्लेशीयरचे वैषीठ्य होते. ग्लेशीयर लांबीने जरी ७०- ८० किमी असला तरी रुंदीने साधारण एक ते दीड किलोमीटरच आहे. पण त्यात खूप छोट्या छोट्या दऱ्या व छोटे छोटे हिमपर्वत आहेत. त्यांच्या निमुळत्या व सापा सारख्या नागमोडी असणाऱ्या आकारांनी, नागमोडी वळणाच्या बऱ्याच दऱ्या तयार झाल्या आहेत. ह्या दऱ्यांनी हजारो वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात, क्वचितच कधी सूर्याचा प्रकाश पाहिला होता! सकाळच्या वेळेस सूर्याचे ऊन जेव्हा पडते तेव्हा ग्लेशीयरचा पांढरा बर्फ आरशासारखे काम करतो व त्याला लागून असलेली हवा पटकन गरम होते, आधीच विरळ असलेली हवा अजूनच विरळ होते व तापून हलकी झालेली गरम हवा वर जायला लागते. खाली उरलेल्या मोकळ्या जागेत निर्माण झालेल्या पोकळीने अशा दऱ्या खोऱ्यातून थंड हवा जोरात खेचली जाऊन वर गेलेल्या गरम हवेची जागा घेतली जाते. ह्यामुळेच दुपार व्हायला लागते तसे सू सू करणारे व सारखे दिशा बदलणारे वादळी वारे वाहू लागतात. विरळ झालेली गरम हवा, वादळी वारे व सगळीकडे फक्त पांढरेच पांढरे दिसणे हे हेलिकॉप्टरचे भयंकर मोठे शत्रू आहेत. विरळ झालेली गरम हवा व १९००० फुटांपेक्षाही उंच जागे मुळे हेलिकॉप्टरच्या इंजनची कसोटी लागते. आज सुद्धा अशा वातावरणात काम करणारी हेलिकॉप्टर्स विरळेच आहेत, व जी आहेत ती सुद्धा फार जास्त वजन उचलू शकत नाहीत. सारखी दिशा बदलणारा वादळी वारा, हेलिकॉप्टर सुरू करते वेळी त्याच्या पंखांना इजा करतो व कधी कधी त्या वादळी वाऱ्या मुळे मागचा पंख हेलिकॉप्टरच्या शेपटीवर आदळून हेलिकॉप्टरचा बसल्या जागीच अपघात होतो. वादळी वाऱ्यात हेलिकॉप्टरचा टिकाव लागणे कठीण असते. ग्लेशीयर मध्ये बर्फ असतोच. बर्फामुळे सगळीकडे दिसणारे पांढरे व त्यातच जर पांढरे ढग आकाशात आले असतील तर व्हाईट आऊट (शुभ्रांधळा) होऊन वैमानिकाला स्थितीचे भानच राहत नाही. त्याला सगळीकडे पांढरेच दिसते व त्याचा क्षितिजाचा संदर्भ जातो. कोणाला कल्पना करवणार नाही असा भुलभुलैय्या तयार होतो व कधीकधी वैमानिक सगळेच पांढरे दिसत असल्या कारणाने आकाश समजून जमिनीच्याच दिशेने हेलिकॉप्टर घेऊन जातो व सरळ जमीनदोस्त होतो. ह्याच सगळ्या कारणांस्तव दुपार नंतर हेलिकॉप्टर ग्लेशीयर मध्ये जाऊ शकत नाही. नाहीतर अपघाती जवानाला मदत करायला जायचे व स्वतः अपघाती होऊन बसायचे ह्याला काय अर्थ आहे.

Picture22.jpg

(मी काढलेला फोटो)

हेलिकॉप्टर पायलट त्याच्या घड्याळाकडे पाहून टीम लीडर कॅप्टनला म्हणाला "वि हॅव टू अॅकमप्लिश धिस रेस्क्यू मिशन इन थ्री आवर्स. डू युअर स्टफ इन डॅट टाइम अॅन्ड वी कॅन गेट बॅक होम. आफ्टर डॅट हेलिकॉप्टर कॅनॉट कम बॅक फ्रॉम द रेस्क्यू पॉइंट. वी आर रेडी व्हेन यू अॅन्ड युअर टीम इज रेडी. वि वील टेक ऑफ व्हेन यू सिग्नल अस." चार माणसांची रेस्क्यू टीम दोन फेऱ्यांमध्ये हिमखाईच्या जागी पोहोचायचे असे ठरले. अजून चार जणांची रेस्क्यू टीम पोस्टाच्या पेरंट युनिट मधून स्नो स्कूटरवर निघाली. स्नो स्कूटर्स ग्लेशियरमध्ये आहेत पण चालणऱ्यांईतकाच त्यांना सुद्धा हिमखाईत पडण्याचा धोका असतो. परत स्नो स्कूटर सगळ्यांना मिळतातच असे नाही कारण त्या मोजक्याच आहेत. ती चार जवानांची रेस्क्यू टीम स्नोस्कुटर वरून ऑक्सिजनचे सिलिंडर्स, गरम चहा, पाणी घेऊन निघाले. अडकून पडलेल्या दोरीतल्या सात जवानांसाठी. त्याच बरोबर त्या टीमने हिमखाईत पडलेल्या आठव्या जवानासाठी, फर्स्टएडचे सामान व रेस्क्यू करण्यासाठी बाकीच्या लागणाऱ्या गोष्टी घेतल्या. ह्या गोष्टी तयारच असतात त्यामुळे कशातच वेळ जात नाही. अपघाताच्या स्थळी दोनही टीम्स जवळ जवळ एकाच वेळेला पोहोचल्या.

हेलिकॉप्टरने त्या हिमखाईच्या वरती होवर करून ‘जीपीएसचे’ संदर्भ घेतले व जरा लांब वर जाऊन हेलिकॉप्टर उतरवले. तेथेच उतरवले असते तर त्याच्या फिरणाऱ्या पंख्याच्या वाऱ्याच्या रेटाने, अडकलेल्या जवानांना त्रास झाला असता. पॅट्रोल लीडरने रेस्क्यू टीमला भेटून हिमखाई दाखवली. तो पर्यंत हेलिकॉप्टर रेस्क्यू टीमच्या दुसऱ्या दोन जवानांना घेऊन येण्यासाठी परत बेस कँपकडे उडले.

(क्रमशः)

सियाचीन ग्लेशीयर .....भाग ३

आपण राष्ट्रव्रत घेतले का? त्या बद्दल येथे वाचा

http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html
(मराठी ब्लॉग)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दच नाहीत प्रतिक्रिया द्यायला !

सलाम सलाम सलाम त्या जवानांच्या धैर्य आणि शौर्याला !

त्यांच्याकडे पाहताना आजकालच्या देशाभिमान विसरलेल्या तरुणाईचे बहकलेले जीवन म्हणजे वळवळणार्‍या किडया प्रमाणे वाटते !!!!!!!!!!!!!!

का करावे अशा बेजबाबदार पिढीचे रक्षण या जवानांनी आपले प्राण धोक्यात घालून?

बापरे कसलं भयंकर....
एक शंका....त्या खाईत पडलेल्या जवानाची नंतर प्रतिक्रीया काय होती. आपल्या लीडरनेच आपल्याला मृत्यूच्या दारात लोटले...एका अर्थी ठार मारण्याचा प्रयत्न केला...याबद्दल त्याची भावना काय होती. का हे सर्व त्यालाही समजले असेल...
जर असेल तर त्या जवानाला लाखो सलाम....
त्या लीडरच्या निर्णयशक्तीला ही....किती आतडे पिळवटले असेल त्याची ती ऑर्डर देताना....

खूपच भयंकर आणि विचारशक्तिदेखील गोठवणारे आहे हे सगळे......

अशा विपरीत परिस्थितीतही आपल्या देशाचे संरक्षण करणार्‍या आपल्या सर्व जवानांना सलाम, सलाम आणि सलामच.....

खुपच थरारक ..
अशा विपरीत परिस्थितीतही आपल्या देशाचे संरक्षण करणार्‍या आपल्या सर्व जवानांना सलाम.

रणजित चितळे,

आजून किती भाग होणार आहेत सियाचेनवर? सगळे एकदम वाचेन म्हणतो. एकेक भाग वाचून पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत राहणं अतिशय क्लेशदायी आहे. माझ्यात तेव्हढीही सहनशक्ती नाहीये याबद्दल क्षमा असावी. वाचकांच्या प्रतिक्रियांवरून या आठवणी अतिशय थरारक आणि वाचकास दिङ्‌मूढ व नि:शब्दकारक करणार्‍या असाव्यात.

आ.न.,
-गा.पै.

एकेक भाग वाचून पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत राहणं अतिशय क्लेशदायी आहे. माझ्यात तेव्हढीही सहनशक्ती नाहीये याबद्दल क्षमा असावी.
----- चितळे साहेब वेळांत वेळ काढुन हे सर्व लिहीतात.... आपण त्यांचे केवळ आभार मानुयांत आणि पुढच्या भागाची प्रतिक्षा करुयांत. येथे त्यांच्या लिहीण्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव (मग तो रसिकांच्या प्रेमाचा, आदर युक्त भक्तीचा ही असेल) असता कामा नये असे मला वाटते...

वाट बघणे हे आपल्याला क्लेश्दायक असेल तर तेथे ज्या परिस्थितीत जवान वास्तव्य करतात त्यांच्या क्लेशाचे काय?

अशा विपरीत परिस्थितीतही आपल्या देशाचे संरक्षण करणार्‍या आपल्या सर्व जवानांना सलाम.

उदय,

>> वाट बघणे हे आपल्याला क्लेश्दायक असेल तर तेथे ज्या परिस्थितीत जवान वास्तव्य करतात त्यांच्या
>> क्लेशाचे काय?

म्हणूनच क्षमा मागितली आहे.

आ.न.,
-गा.पै.

रणजित,
धन्यवाद, जबरदस्तच !

घरात बेडवर लोळत देशप्रेमाच्या गप्पा मारणार्या लोकांनी ईथे लक्ष द्यावे.

मागे एका लेखावर विद्यार्थांसाठी सैनिकी प्रशिक्षणासाठी केल्या गेलेल्या मागणीची खिल्ली
ऊडवलेल्यानी हे एकदा वाचावे.

का करावे अशा बेजबाबदार पिढीचे रक्षण या जवानांनी आपले प्राण धोक्यात घालून?>> हा काय प्रकार आहे. जवानांच कार्य, राष्ट्रसेवा आणि त्यागभावना याला तर सलामच. ते तिथे आहेत म्हणून आज आपण ईथे सुरक्षित आहेत यात वाद नाही.
पण...
पण लगेच आजच्या पिढीला झोडपणे गरजेचे आहे का? प्रत्येक माणूस त्याला आवडत्या क्षेत्रात जे काही काम करत आहे ते त्याच्या परिनी राष्ट्राच्या सेवेत दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्या कॉन्ट्रिब्युशनलाही तेवढच महत्व आहे. हा देश घडताना नुसता सैनिकाच्या बढावर घडत नसून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्या-या प्रत्येक नागरीकाच्या रक्ता मासातून घडत आहे. प्रत्येकच माणूस आपल योगदान देतो आहे. अगदी आयटी कंपनीत काम करणारा प्रोग्रामरे पासून तर शेतात राबणारा मजूर या सगळ्यांच्या कष्टातून राष्ट्र विकास साधतो आहे. म्हणून प्रत्येकाचं योगदान तेवढच मोलाचं आहे.
सैनिकांची स्तूती करायची म्हटलं की इतर तरुणाना झोडलेच पाहिजे असे नाही.

एम,

आज भारतीय सैन्यदलाला सैनिकांची गरज आहे. बर्याच जागा रिक्त आहेत. आज सैन्यदलात भरती होणारा सैनिक, सैन्यद्लाला एक नोकरी म्हणुन बघतो, पॅशन म्हणुन नाही.
आजच्या तरूण वर्गाला बर्याच ऊपलब्धी असल्याने सैन्याकडे वळण्याचा कल कमी झाला आहे,

ही खरेच चिंतेची बाब आहे.

भारतीय संरक्षण विभाग गेल्या काही वर्ष सतत जाहीराती करत आहे, गेल्या आठवड्यात झी मराठीवर सैन्य-दलातले माजी वरीष्ठ अधिकारी आले होते, ते जागोजागी समाजाच्या प्रबोधनासाठी व्याख्यान द्यायला सुद्धा तयार आहेत, पण कोणी बोलवत नाहीत हिच खंत त्यांनी बोलुन दाखवली.

आजच्या तरुणवर्गाला सैन्यदलाची ओळख करण्यासाठी सैनिक स्कुल, सैनिक प्रशिक्षण वर्ग सक्तिचे करणे गरजेचे झाले आहे. अश्या वर्गात प्रवेशणार्या मुलाला कॅडेट म्ह्णतात आणि प्रशिक्षीत मुलाला ऑफिसर जेंटलमन !

जर भारताचे आजचे चित्र बदलायचे असेल तर अशी जबरदस्त संस्कार वर्गाची आवश्यकता आहे अन्यथा निर्भया सारख्या तरुणीचे संरक्षण करायला को णीही पुढे येणार नाही.

जगभरात बर्याच देशात तरूणाना सैन्यसेवा (२ वर्षाची ) सक्तीची आहे. त्याशिवाय त्यांना ईतर उपलब्धी मिळत नाही. त्या विरुद्द भारतात ग्रामिण भागात डॉक्टरना पाठवण्यासाठी जबरसस्ती करावी लागते.

डँबीश१,
तुमचं म्हणनं पटलं. पण त्यामुळे इतर रुपात देशसेवा करणार्‍याना झोडपू नका. सैनिकेत्तर सेवेतील नागरिकाचं कार्यही या देशाच्या निर्मितीत तेवढचं भर घालत असते जेवढं सैनिकांच रक्षणार्थ. इतरांचही योगदान तेवढ्याच तोलामोलाचं आहे.

राहिला प्रश्न सैनिकभर्तीसाठी अधिकारे हिंडताहेत वगैरे थोतांड आहे. आत्ता परवा डिसेंबर-२०१२ मधे चंद्रपुरात सैन्य भर्ती झाली होती तेंव्हा वय वर्ष २४ म्हणून हजारो पोराना बाद केलं. एन.डी.ए. ते प्रवेश घेण्याची अटही अशीच आहे. ह्या सगळ्या अटी तेंव्हाच्या आहेत जेंव्हा देशात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी होती अन सैन्यातल्या नोकरीतला पगार व सोयी टेम्प्टिंग वाटायच्या. इतर क्षेत्रं ओस पडली असायची म्हणून त्या काळात लोकं सैन्याच्या नोकरीला प्राधान्य दयायची. आज परिस्थीती बदललेली आहे. जरा नियमात लवचिकता आणायला हरकत नाही. २५ वर्षाची मुलं अगदीच म्हातारी नसतात हो... त्याना बाद ठरवायला...

याच्या जोडीला राजकारण्यांचा घोळही आहेच. डिफेन्सचं बजेट वाढवलं की सैन्यातील सोयी व पगारंही वाढवता येतील. मग नवी पिढी सैन्यातही करीअर शोधेल.

वरील सगळ्या मुद्द्यातून एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे सैन्येत्तर क्षेत्रातुन देशाच्या विकासात हातभार लावणारे नागरिक हे अजिबात दोषी नाहित. जर कुणी दोषी असतिल तर बजेट न वाढविणारे राजकारणी व ६० वर्षा पुर्विच्या निकषाना चिटकलेले सेना अधिकारी.

बोफोर्स पासून तर कॉफिन पर्यंतच्या भ्रष्टाचारा बद्दल बोलायचे म्हटल्यास सगळा आनंदी आनंद आहे. असो.

एम,

एकदम पटलं !!
माझी व तुमची नाण्याच्या दोन बाजूच !!
सैन्य भरतीसाठी कमाल वय मर्यादा २५ वर्षे ठेवायला हरकत नाही !
खरे गुन्हेगार राजकारणीच !

Pages