तेलात शिजवलेल्या आवळ्याचे लोणचे

Submitted by चिन्नु on 24 December, 2012 - 05:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो आवळे, एक मध्यम वाटी तिखट, एक मध्यम वाटी, मीठ, लोणच्याला लागेल एवढे तेल, आलं-लसूण पेस्ट्-एक लहान वाटी, फोडणीसाठी जीरे, मोहरी, एक टे. स्पु मेथीपूड.

क्रमवार पाककृती: 

आवळे धुवून, पुसून कोरडे करा.
फोडणी करण्यायोग्य पण लोणच्याचे तेल मावेल असे भांडे गॅसवर ठेवा. लागणारे तेल ओता. तेल गरम झाल्यावर जिरे, मोहरी घाला. आवळे घाला. लगेच भांड्यावर झाकण ठेवून त्यात पाणी ओता. आता आवळे तेलात शिजवायचे आहेत. अधून मधून झाकण काढून परता. भांड्यात पाणी पडू देऊ नका. आच मीडियम असू द्या. एखादा आवळा सुरीने टोचून बघा. गिच्च शिजवायचे नाहीये. सहज कापले जात असल्यास गॅस बंद करा. थंड होवू द्या.
थंड झाल्यावर तिखट, मीठ, आले लसूण पेस्ट, मेथीपूड घालून ढवळा. बाटलीत भरून ठेवा.
गरम भात, तूप याबरोबर किंवा दहीभातासोबत हे लोणचे मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
लोणच्याच्या वाढपीप्रमाणे
अधिक टिपा: 

आवळे खिसू नये, सबंद ठेवावे.
आवडीनुसार तिखट्-मीठ कमीजास्त करावे.
हे लोणचे जास्त टिकत नाही.
मिश्रण कोरडे वाटल्यास थोडे तेल गरम करून थंड करून मिक्स करावे.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा..खूपच मस्त लागणार हे तेलात शिजवलेल्या आवळ्याचे लोणचे.असेच लोणच्याचा मसाला भरलेले लिंबाचे लोणचे ही फार छान लागते.भरल्या वांग्यांप्रमाणे वर व खाली काप करुन त्यात नेहमीचा लोणचे मसाला भरायचा.भरपुर तेलाची फोडणी करुन त्यात लिंब शिजवायची.थंड झाले कि बरणीत भरायचे तेल वर पर्यंत हवे तर च टिकते.मस्त चव.

फोडणी करण्यायोग्य पण लोणच्याचे तेल मावेल असे भांडे गॅसवर ठेवा. लागणारे तेल ओता. तेल गरम झाल्यावर जिरे, मोहरी घाला. आवळे घाला.>>>>>>>>>>>>>>>>>> मी कन्फुय्ज Sad

फोडणी साठी चे २-३ चमचे तेल टाकायचे आहे की आव़ळे शिजवायला लागणार आहे तेवढ तेल टाकायच आहे ????

अंकु, लोणच्यासाठी लागणारे सर्व तेल घालायचे आहे. फोडणीयोग्य भांडे पण लोणच्यासाठीचे तेल मावेल इतके मोठे असे.
सुलेखाताई, भरल्या लिंबाच्या लोणच्याच्या रेस्पीसाठी थांकु Happy

झकास कृती. आलं-लसूणपेस्टऐवजी फक्त आलं घातलंय. फोडणीत मोहरी-जिरं घालायचं राहून गेलं. मस्त लागतंय चवीला.

धन्यवाद!

aavaLaa loNache-maayabolee.jpg

आय्-हाय मृण्तै Happy कसला किल्लर फोटूये. लै भारी!
लसूण पण टाकून बघ. खमंग वास येतो ग्रेव्हीला/खाराला. फोडणीच्या जिनसान्नी फार फरक पडेलसे वाटत नाही.

थँक्स अंजू, मिवि.
>>नेम्कं किती आवळ्याला किती तेल ?
आवळ्यांच्या थोडं वर येइल तेव्हढं.
सॉरी, अंदाजे जमतं सांगायला. आवळे ज्या जारमध्ये स्टोर कराल, त्यात आवळे घालून पहा. त्याच्या थोडे वर यायला हवे तेल.

थँक्स सुजा.
हो देवकी, मोठ्या आवळ्यांचेच करायचे.

रायावळ्यांचे करायचे झाले तर आधी फोडणी करून थंड करून तिखटमीठ कालवून घ्यायचं. आलंलसूण नाही घालयचं. आणि या मिश्रणात धुवून पुसून कोरडे केलेले अक्खे रायावळे घालायचे न शिजवता. लगेच २ दिवसात संपवावे. नंतर पाणी सुटत जाऊन चव बदलते. स्टोर करायच्या भानगडीत पडू नये हे लोणचं.

आज केलं.
मस्तं दीड किलो आवळे होते.
मात्र मोठे होते त्यामुळे तेलात तळून बाहेर काढून बिया काढल्या आणि पुन्हा फोडी तेलात टकाल्या.
आलं लसूण पेस्ट न करता ठेचून घातले.
मस्तं झालंय.
धन्यवाद!

तेलात शिजवून थंड केलेले आवळे चिमटीत पकडून जरासे दावले की त्यांच्या एकसमान आकाराच्या सहा किंवा आठ फोडी होतात. आणि बी बाहेर पडते.

उसगावात फ्रोझन आवळे सहजी तुकडे करता येतात. ही आयडीया मस्तयं.
थोड्या आवळ्याचे करून पहा नक्की आऊ.

मी केलं आज, पाचच मोठ्या आवळ्याचं केलं. आलं आणि लसूण तुकडे घातलेत मात्र. नवऱ्याला आणि मला तुकडे आवडतात पेस्टपेक्षा. छान झालंय. आवळे मात्र जास्त तुरट लागतायेत म्हणून मी किंचित साखर घातली. नवरा खाईल, नाहीतर तो नाही खायचा. मला नाही आवडत साखर घालायला.

फोटो नाही मला नीट काढता येत.