ऊन-सावली

Submitted by अमेलिया on 13 December, 2012 - 01:33

ऊन-सावलीच्या खेळामध्ये
एकदा ऊन रुसून बसलं
'साऱ्यांना बरी तूच आवडतेस
माझं कौतूकच नाही कसलं

जो तो मला नको म्हणे
मुरडून नाक मिचकावून डोळे
शुभ्र स्वच्छ अन लख्ख असे मी
तरीही मजला जो तो टाळे

तुला मात्र भलताच भाव
तुला पाहून खुश सगळे
माझ्यापासून दूर होतात
तुझ्या मात्र गळ्यात गळे'

सावली हसली गालात
'कसे कळले नाही तुला?
तू आहेस म्हणून मी आहे
मी नाहीच मी तुझ्याविना

कधी तू कधी मी
हाच तर तुझा-माझा खेळ
एकच आपण दोघे बघ
जन्मांतरीचा आपला मेळ'

'खरंच गं तुझं अगदी खरंय
माझ्या लक्षात नाही आलं
माझी सावलीच की गं तू
आपलं-तुपलं मैत्र भलं!'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह अमेलिया किती हलकी-फुलकी बोलकी कविता
खूप खूप आवडली

रियाजींशी सहमत १००%

परवाच एक शेर गुणगुणत होतो ..(माझाच आहे गोड मानून घेणे....)
नको तुझी सावली मला ; घे!
खरी मजा तर उन्हात आहे