चाळीशीतली वाटचाल - सार्वजनिक धागा

Submitted by मामी on 6 December, 2012 - 22:14

'संयुक्ता'ने माहिती संकलन, विचारमंथन आणि समाजसेवा हे तीन उद्देश समोर ठेवून आजवर धागे प्रकाशित केले आहेत. 'संयुक्ता'मध्ये चर्चेस घेतले जाणारे विषय सर्वंकश असावेत हे पथ्य संयुक्ता व्यवस्थापन तसेच संयुक्ता सदस्य कटाक्षाने पाळत आल्या आहेत. ह्यातले अनेक विषय केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नसतात किंवा 'संयुक्ता'पुरते ठेवल्याने केवळ एकच बाजू समोर येते असे लक्षात आल्याने काही धागे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता उदा: प्रोफेशनल नेटवर्किंग. 'चाळिशीतली वाटचाल' हा असाच एक विषय जो स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा. ह्याच कारणासाठी हा धागा सार्वजनिक आहे. धागा 'संयुक्ता'तर्फे काढण्यात आला म्हणून 'संयुक्ता' ग्रूपमध्ये आहे.

***************************************************

आपली मायबोली ऐन षोडशा असली तरी बहुसंख्य मायबोलीकर आता चाळीशीत पदार्पण करते झालेले आहेत. विशीतली धडपड आणि तिशीतली गडबड मागे पडून चाळीशीचा प्रवास सुरू झाला आहे. आताच्या जमान्यात चाळीशी म्हणजे काही 'वय' झालं नाही हे नक्कीच. करियरमध्ये, धंद्यामध्ये, जीवनात अजूनही कितीतरी मोठ्या भरार्‍या घेण्याची हिंमत आहेच. पण तरीही कुठेतरी काहीतरी बदलतंय हे जाणवतंय. होय ना?

वयाच्या या टप्प्यात अनेकानेक बदल होत असतात. शारीरिक, मानसिक, परिस्थितीजन्य...

स्त्रीच्या शरीरात होणारे बदल अगदी ठळक असतात. रजोनिवृत्ती, त्यामुळे होणारे हार्मोनल चेंजेस आणि निसर्गानं बहाल केलेलं हे कवचकुंडल गळून गेल्यानं काही रोगांना शरीरात मिळणारा सहज प्रवेश. तर पुरुषांचे इतके ठळक नाही पण तरीही जाणवण्याइतपत होणारे शारीरिक बदल. यांचा स्त्रीपुरुषांच्या सहजीवनावर होणारा परिणामही महत्त्वाचा ठरतो.

सर्वसाधारणपणे या वयात स्त्रीपुरुष आपापल्या नोकरी-धंदा-संसारात स्थिर झालेले असतात. भौतिक सुखाची समीकरणं, आपापल्या चौकटीत का होईना, जुळवली गेलेली असतात.

पण तरीही समीकरणातले इतर घटक बदलू लागलेले असतात. मुलांची वयं वाढून त्यांची उच्च शिक्षणं सुरू होतात. त्याकरता पैश्यांची तजवीज करावी लागते. मुलं परदेशात रहायला जातात, बाहेरगावी नोकरीनिमित्त जाऊन राहतात. घर मोकळं होतं. 'एम्टी नेस्ट सिंड्रोम'च्या अनुभवाची ओळख होते.

आईवडिल एव्हाना वयस्क झालेले असतात. त्यांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचे फोन नंबर्स मोबाईलमध्ये जमायला लागतात. अनायसे आपल्याकरताही हा डेटाबेस तयार होत आहे याची कुठेतरी नोंद घेतली जाते आणि मग नियमित आरोग्य तपासणी करण्याकडे कटाक्ष ठेवला जातो.

आईवडील वेगळे राहत असतील तरीही आता त्यांच्या ढासळत्या तब्येतीमुळे, आजारपणामुळे आलेल्या परावलंबित्वामुळे किंवा एक जोडीदार गेल्याने मागे उरलेल्या पालकांना आधार देण्याकरता अनेकदा त्यांना आपल्या घरी आणले जाते. या वाढीव जबाबदारीकरता घरातल्या व्यवस्थेची नव्याने बांधणी करावी लागते.

मानसिक दृष्ट्याही हा काळ तसा नाजूकच. स्त्रीची रजोनिवृत्ती जवळ आलेली असते आणि त्या बदलाचे पडसाद मनाच्या माध्यमातून वागण्यात उमटतात. घरातून निघून गेलेल्या मुलांच्या अवास्तव काळज्या करणं, कारण नसताना हळवं होणं, आपल्या ओसरत चाललेल्या सौंदर्यखुणांची खंत करणं, जोडीदाराला आपल्यात इंटरेस्ट राहिला नाहीये का अशा शंका मनात डोकावणं, निसटून चाललेलं तारुण्य पकडून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणं असं काहीबाही घडत राहतं. हे चुकीचं वागणं आहे हे कळूनही वळत नाही. 'लाथ मारेन तिथं पाणी काढेन' ही वृत्तीही हळूहळू बदलायला लागलेली असते.

दुसर्‍या दृष्टीने विचार केला तर मुलांच्या जबाबदार्‍या कमी झाल्याने जोडीदारांना एकमेकांकरता पुन्हा वेळ मिळतो, एकत्र काही छंद जोपासणे, प्रवास करणे, गाण्याच्या मैफिली मनमुराद ऐकणे, काही सामाजिक उपक्रम हाती घेणे, नवनविन समवयस्क आणि समविचारी मित्रमैत्रिणी जमवून धमाल करणे या करता पैसा आणि वेळ गाठीशी असतो. त्यामुळे जीवन समृध्द करण्याच्या अनेक संधी असतात.

हल्ली चाळीशीचा फारसा बागुलबुवा केला जात नाही. जे बदल अपरिहार्य आहेत ते सहजपणे स्वीकारून जीवनाचा आनंद घेण्याची ही संधी आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन वावरणारे आपल्या मायबोलीकरांमध्ये पण अनेक असतील. तर हा धागा आहे आपले अनुभव शेअर करण्याकरता, काही प्रश्न असतील, शंका असतील त्या मांडण्याकरता.

****************************************************
तळटीप : या लेखात व प्रतिसादात दिलेल्या माहितीची अधिकृत शहानिशा करून मगच त्यानुसार कार्यवाही करावी. या लेखाचा उद्देश केवळ अनुभव व माहितीची देवाण-घेवाण एवढाच असून काही वैद्यकीय उपचार असतील तर ते आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करावेत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाळीशी....

आलीच ती. मागच्या वर्षी आमच्या १० वी च्या बॅचचं री युनीयन झालं २५ वर्ष झाली म्हणुन. सगळे भेटले आणि चाळीशी अंगावर आली. सगळेच एकदम नुकतेच चाळीशीत पदार्पण केलेले. त्या वयात कोवळे दिसणारे आम्ही आता ( लली सारखा एखादा अपवाद सोडुन) सगळ्या मुली "बायका" झालेल्या त्याही बरण्यांच्या वेग वेगळ्या साइझ मधे... बाप्ये तर कोणी छप्पर उडालेले, ढेरपोटे... सगळे वेगळेच दिसत होतो. कार्येक्रम संपल्यावर मात्र जाणवलं की अरे आता चाळीशी खरच आली.

मला वैयक्तिक जाणवलेल्या गोष्टी

१. मॅचुरीटी आल्या सारखी वाटते
२. पेशन्स खुप वाढला आहे
३. कोणत्याही प्रश्नाकडे पाहिल्या वर गांगरायला होत नाही.
४. फॅमिलीत वडिलांच्या झालेल्या म्रूत्यु मुळे माझी दुखः सोसायची ताकद कळली. ( मी आणि माझा नवरा मॉरली त्यांच्यावर खुपच विसंबुन होतो)
५. निर्णय क्षमता कमालीची वाढली आहे.
६. नवे इंटरेस्ट निर्माण झाले आहेत
७. स्वतःला वेळ द्यावासा वाटत आहे
८. नवरा बायकोचं नातं खुपच गहिरं झालं आहे. मैत्रि घट्ट झाली आहे.
९. लेक वयात येताना बघताना मस्त वाटतय. तिच्या "गर्ल्स टॉक" मी खुप एंजॉय करते.
१०. लोक आंटी म्हणतात...
११. काही किरकोळ शारीरिक त्रास सुरु झालेले आहेत.
१२. प्रोफेशन मधे आता जवळ जवळ १७ वर्ष झाली. त्या मुळे लोकांच्या नजरेत "मॅडम सॉलीड एक्स्पिरियंस्ड आहेत" हे वाचता येतं.... कामं आपसुक मिळतात. ( पूर्व पुण्याइ)
१३. बोलताना "मी लहान असताना... कॉलेजात असताना" हे संदर्भ येतात... ( गेले ते दिन गेले)
१४. नोकरी सोडायचं धाडस करु शकले. ते ४०शीत गेल्यावरच. तेवढा आत्मविश्वास आला.
१५. वाचनाचे संदर्भ बदलले. अगदी कॉलेजात असताना खुप मराठी वाचलं. मग पुढे सगळं अभ्यासाचं वाचत गेले. नंतर आता इंग्रजी साहित्याची आवड निर्माण झाली आहे.
१६. प्रेमकथां वर आधारीत सिनेमे आताशा आवडत नाहीत.
१७. कधी कधी एकांत फार प्रिय वाटतो.
१८. लोकांच्या कामातल्या चूका पटकन लक्षात येतात. ( अगदी न ठरवता सुध्धा)
१९. सुपर वुमन सिंड्रोम खुपच कमी झाला आहे. ( ही टर्म संयुक्ता मधुन उचलली)

मीं स्वतः चाळीशी केंव्हांचीच ओलांडली आहे व वर चर्चिलेल्या घालमेलीतून गेलो आहे. पण असले टप्पे अगदीं लिलया, खेळकरपणे पार करत जाणारे बरेच जण मी पाहिलेत. त्यांच्याबद्दलचं माझं निरीक्षण कदाचित इथं देणं योग्य होईल -
१]ज्यांचे तुमच्याशी असलेले संबंध वयातीत असतात अशीं माणसं तुमच्या आसपास असतील तर वयाचे वेगवेगळे टप्पे पार करतानाच्या गिअर बदलण्याचा त्रास जाणवत नाही ;
२] शरीर व मन यांनी दिलेल्या संकेताना सहजतेने दाद दिली [ उदा. बेफिकीर यांचा वरील प्रतिसाद] तर आयुष्य टप्प्यांत विभागलं न जातां एकसंघी व सुसूत्र वाटत असावं. शरीर व मन यात वयानुसार बदल घडवताना निसर्ग ते बदल स्विकारण्याची अंगीभूत कलाही देतच असणार. आपणच अट्टाहासाने त्याकडे दुर्लक्ष केलं तरच 'कॉन्फ्लीक्ट' निर्माण होत असावा;
३] महत्वाकांक्षा व जिद्द या बरोबरच छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद घेण्याची आपली उपजत वृत्ती जपणारीं माणसं आयुष्यातील असल्या बदलाना वरचढ होऊं देत नाहीत; स्वतःच्या [ किंवा इतरांच्या ]वयाबद्दल अति जागरूक न रहातां आनंद मिळवण्यावर भर असणं हा याबाबतीत यशस्वी असणार्‍यांचा स्थायीभाव आहे;

४] वयाच्या प्रत्येक टप्प्याचे कांही अंगीभूत फायदेही असतातच, अगदीं वृद्धत्वाचेही . त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणं शहाणपणाचं. आपले एक मायबोलीकर आपल्या प्रत्येक इ-मेल सोबत इंग्लीश कवितेच्या या पंक्ती जोडतात, ज्या इथं चपखलपणे बसतात -
" Age is opportunity no less
Than Youth itself, though in another dress,
And as the evening twilight fades away
The sky is filled with stars, invisible by day"
- Henry Wadsworth Longfellow.

byecriket.JPG

माझ्या आयुष्यात 'वेग' या गोष्टीला फार महत्वाचे स्थान होते. मोटरसायकल आणि मोटार दोन्ही तुफान वेगाने चालवली आणि आयुष्यालाही वेगातच पुढे नेले. कधी हळू झालोच नाही. आता जरा टेकावेसे वाटते. शरीर थकलेले नाही, पण वेगाची भीती मात्र वाटू लागली आहे. >> बेफि - सेम टु सेम

येथुनच आपल्याला कुटूंब असल्याची जाणिव होते. बायको, मुला, मुलींची आठवण नकळत येत राहते.
ऐषारामाचे जिवन जगणे सोडुन कौटूंबिक गरजा पुर्ण करण्याकडे कल वाढतो.

बी +१

मायबोलीवरच्या आयुष्यात पहिल्यांदाच १०० वी पोस्ट टाकण्याचा योग आला!

वाचते आहे सगळ्यांचे अनुभव! बेफिंनी मस्त लिहीले आहे.

चाळीशी ओलांडली आहे! मुली अजुन खुप लहान आहेत! Happy त्यामुळे या विषयावर विचार करायला वेळ नाहीये खरतर! आणि विचार आलाच मनांत तर तो पळवुन लावते आहे! नी म्हणतेय तसं अजुन बरच काही करायचं आहे!

माझी एक जुनीच आणि नेहमीची शंका इथे विचारते -

स्त्रियांच्या रजोनिवृत्तीप्रमाणेच पुरूषांच्या रजोनिवृत्तीबद्दल (andropause) मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून सविस्तर माहिती हवी आहे. (वेबसाईट्सवर शास्त्रीय माहिती मिळते.)
कारण बहुतेक कुटुंबात आधी andropause अवतरतो आणि नंतर menopause.

@ ललिता,

बरिच चुक माहीती आहे असे दिसत आहे.

१- पुरुषांना andropause वगैरे असे काहीही होत नसते. prostate glands चे काम पुरुष मरे पर्यन्त चालु असते. वयानुसार थोडे कमी प्रमान होते. हे वैज्ञानिक सत्य आहे. andropause हा प्रकार मानसिक वा काल्पनीक आहे. शारीरीक बदल काहीही होत नसतो. उलट सगळ्यांनी प्रोस्टेट क्यान्सर का होतो हे वाचलेले बरे व त्यावरचा उपाय करत रहाने फार बरे.

२- स्त्री चा menopause होतो म्हनजे मासीक पाळी बन्द होते व ती मुल जन्माला घालु शकत नाही. बाकी दुसरे काहीही बदल होत नाही. सगळे जैसे थे रहाते. उलट फिब्रोईड नावाच्या रोगाने रजोनोव्रती तर सोडाच, रजोनिव्रत्ती आधिच गर्भाशय काढुन टाकावे लागत आहे. त्याने सुध्धा तीत काहीच फरक पडत नाही. उलट तीला चांगलेच वाटते. पाळी चा होनारा त्रास संपतो.

मला जे माहित होते सांगीतले. बाकि कुनीही ईथे ही शन्का समाधान केलेले दिसले नाही म्हनुन माझा थोडा प्रयत्न.

२- स्त्री चा menopause होतो म्हनजे मासीक पाळी बन्द होते व ती मुल जन्माला घालु शकत नाही. बाकी दुसरे काहीही बदल होत नाही. सगळे जैसे थे रहाते. >>> Uhoh

स्त्री चा menopause होतो म्हनजे मासीक पाळी बन्द होते व ती मुल जन्माला घालु शकत नाही.>>> काहीही.. ही माहिती जुनाट आहे. मेनोपोज झाला तरी स्त्री इतरांचे स्त्रीबीज वापरून मुल जन्माला घालू शकते. काही महिला ६० वयात सरोगेट झालेल्या आहेत.
वैद्यानिक युग असताना स्त्रीला 'शेल्फ लाईफ' असते हे उगाळणे आपण लोक कधी बंद करणार?

इथे एक विचारायचे आहे....
मुख्यतः आपण फॅमिली डॉक कडे काही नेहमीच्या तक्ररी घेउन जातो जस की ताप, थन्डी... किंवा असच काही आणि ते सुद्धा अगदी काय होतय इत्यादी विचारुन औषधं देतात ... त्यातच बागेर वाट पाहणार्या पेशंट्स् ची लाइन इत्यादी सगळ्यातुन अगदी तत्पुरतेच उपाय होतात सर्वांगाने चौकशी होतच नाही...

पण 'हायपर अक्टिवनेस ' ... 'झोप येते'.... ' थायरॉइड'
असे काही प्रॉब्लेम असतिल तर कुठल्या डॉक ला कन्सल्ट कराव ???
म्हणजे गायनॅक... endocrinologist... कि आणखी कोणी???

मी उत्तर देणे योग्य नसेल बहुधा, पण थायरॉईड या संकटातून जात असल्यामुळे एक मत फक्त लिहितो.

थायरॉईडसाठी endocrinologist ला भेटावे असे मला वाटते.

(मला हायपर थायरॉईड हा प्रॉब्लेम असून त्यासाठी डॉ. वैशाली देशमुख आणि माझे काका डॉ. सुरेश कटककर यांची ट्रीटमेंट मी घेत आलो आहे. मला निओ मर्केझॉल नावाची टॅब्लेट घ्यावी लागते व त्याने थायरॉईडचे पॅरॅमीटर्स पूर्ण नियंत्रणात आलेले आहेत व आता मी बराचसा ओके आहे).

सुरमयी,

http://www.maayboli.com/node/12685 या धाग्यावर थायरॉईडची साद्यंत चर्चा आहे.

तुझ्या नेहमीच्या गायनॅकला तुला काहीही प्रॉब्लेम असेल ते सांग. ती तुला कोणत्या टेस्टस कराव्या आणि कोणाकडे जावे ते सांगेल.

मामी धन्यवाद. ईतका मस्त धागा काढण्या साठी. वाचून खूप बर वाटल. निदान आपणच एकटया नाही हे वचून तरी.

प्रचण्ड भिती वाटत असते. कशाची भिती वाटते तेही समजत नसते. >>> हे खर आहे. आत कुठेतरी वाघीण होती आणि तिचा ससा ( सशिण? )झालीये असा काहिसा फील येतो आहे खरा. करीअर मस्त चाललय पण presentation देताना blank व्ह्ययल होतय, subject matter नीट माहित असून. किन्वा business travle च खूप दड्पण येतय. समजत नाहिये काय बदलले अहे पण आपण आधिचे राहिलो नाही असा फील येतो आहे खरा.

हे रजोनिव्रुत्तिशी जर अजिबात related नसेल ( in very early 40s) तर solution साठी कठ्ल्या दीशेने बघावे?

इथे चाळीशीबद्दल ’विनोदी’ लिहायचं की माहित नाही. पण माझ्याबाबतीत मी काढलेला अर्थ खालीलप्रमाणे.

चाळीशीतला साक्षात्कार
चाळीशी उंबरठ्यावर (आहेत कुठे आता उंबरठे?) आली तेव्हा ’धडधड’ वाढली होती. तिथपर्यंत पोचणार्‍याला खरं तर स्वत:ला जाणीवच नसते पण आजूबाजूची तुम्हाला ते जाणवून देण्यात फार तत्पर असतात. पण आता कळतंय ही चाळीशी किती लाभदायक असते:
• हल्ली अगदी विसरायलाच होतं बाई हा महामंत्र जपत कितीतरी कामं टाळता येतात.
• आज बाहेरच जायचं का जेवायला? जळ्ळी मेली ती चाळीशी, जीव अगदी नकोसा केलाय असं वारंवार म्हणता येतं.
• कोणता ना कोणता अवयव सतत दुखता ठेवून उंटावरुन शेळ्या हाकता येतात. सोफ्यावर बसल्या बसल्या घरातली सर्वजण मुकाट कामं करतायत (त्यांची कारणं वेगळी असतात) हे पहाण्यासाठी चाळीशीच गाठावी लागते.
• फडताळाचं (पॅन्ट्री) दार उघडलं की तिथपर्यंत का पोचलो ते आठवत नाही त्यामुळे आतल्या काहीतरी स्वादिष्ट वस्तूवर तिथेच ताव मारत आधीचं काम विसरुन जाता येतं.
• चिडचिड, थकवा, वैताग, सगळं पोरं आणि नवर्‍यावर काढून झालं की आरामात म्हणता येतं बहुतेक मेनोपॉज सुरु होण्याची लक्षणं. हे सगळं घरातली नेहमी, ’विनाकारण’ करत असते असं म्हणतात, त्याला काहीतरी ’नाव’ दिल्याचा आनंद उपभोगता येतो.
• टी. व्ही. चं रिमोट, बेकींग इन्स्ट्रक्शन, पदार्थांमधले घटक ज्या काही ’बारीक’ अक्षरात लिहलेल्या गोष्टी वाचून करायच्या असतात त्या बिनदिक्कत दुसर्‍यावर चष्मा सापडत नाही म्हणून घालता येतात.

आणि जेव्हा सर्व व्यवस्थित असतं तेव्हा, माझी चाळीशी झाली तरी करतेय, नाहीतर तुमचं साठीला आल्यासारखं सुरु असतं असं खिजवताही येतं...

इथं फायनान्शियल सिक्युरिटीविषयी कुणी लिहिलं नाही का?
मुलांची शिक्षणे, जोडीदाराचे भविष्य, आपले म्हातारपण आणि सगळ्या कुटुंबियांचे आरोग्य यासाठी पैसे जमा करण्याची व्यवस्था अगोदर केली नसेल तर किमान चाळीशीत तरी करावी लागते.
पोस्ट रिटायरमेंट प्लॅन करावे लागतात.
एखादी व्यावसायिक सेकंड इनिंग खेळून पहायची असेल तर त्याची आर्थिक तजवीज करून ठेवावी लागते.

Pages