चाळीशीतली वाटचाल - सार्वजनिक धागा

Submitted by मामी on 6 December, 2012 - 22:14

'संयुक्ता'ने माहिती संकलन, विचारमंथन आणि समाजसेवा हे तीन उद्देश समोर ठेवून आजवर धागे प्रकाशित केले आहेत. 'संयुक्ता'मध्ये चर्चेस घेतले जाणारे विषय सर्वंकश असावेत हे पथ्य संयुक्ता व्यवस्थापन तसेच संयुक्ता सदस्य कटाक्षाने पाळत आल्या आहेत. ह्यातले अनेक विषय केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नसतात किंवा 'संयुक्ता'पुरते ठेवल्याने केवळ एकच बाजू समोर येते असे लक्षात आल्याने काही धागे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता उदा: प्रोफेशनल नेटवर्किंग. 'चाळिशीतली वाटचाल' हा असाच एक विषय जो स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा. ह्याच कारणासाठी हा धागा सार्वजनिक आहे. धागा 'संयुक्ता'तर्फे काढण्यात आला म्हणून 'संयुक्ता' ग्रूपमध्ये आहे.

***************************************************

आपली मायबोली ऐन षोडशा असली तरी बहुसंख्य मायबोलीकर आता चाळीशीत पदार्पण करते झालेले आहेत. विशीतली धडपड आणि तिशीतली गडबड मागे पडून चाळीशीचा प्रवास सुरू झाला आहे. आताच्या जमान्यात चाळीशी म्हणजे काही 'वय' झालं नाही हे नक्कीच. करियरमध्ये, धंद्यामध्ये, जीवनात अजूनही कितीतरी मोठ्या भरार्‍या घेण्याची हिंमत आहेच. पण तरीही कुठेतरी काहीतरी बदलतंय हे जाणवतंय. होय ना?

वयाच्या या टप्प्यात अनेकानेक बदल होत असतात. शारीरिक, मानसिक, परिस्थितीजन्य...

स्त्रीच्या शरीरात होणारे बदल अगदी ठळक असतात. रजोनिवृत्ती, त्यामुळे होणारे हार्मोनल चेंजेस आणि निसर्गानं बहाल केलेलं हे कवचकुंडल गळून गेल्यानं काही रोगांना शरीरात मिळणारा सहज प्रवेश. तर पुरुषांचे इतके ठळक नाही पण तरीही जाणवण्याइतपत होणारे शारीरिक बदल. यांचा स्त्रीपुरुषांच्या सहजीवनावर होणारा परिणामही महत्त्वाचा ठरतो.

सर्वसाधारणपणे या वयात स्त्रीपुरुष आपापल्या नोकरी-धंदा-संसारात स्थिर झालेले असतात. भौतिक सुखाची समीकरणं, आपापल्या चौकटीत का होईना, जुळवली गेलेली असतात.

पण तरीही समीकरणातले इतर घटक बदलू लागलेले असतात. मुलांची वयं वाढून त्यांची उच्च शिक्षणं सुरू होतात. त्याकरता पैश्यांची तजवीज करावी लागते. मुलं परदेशात रहायला जातात, बाहेरगावी नोकरीनिमित्त जाऊन राहतात. घर मोकळं होतं. 'एम्टी नेस्ट सिंड्रोम'च्या अनुभवाची ओळख होते.

आईवडिल एव्हाना वयस्क झालेले असतात. त्यांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचे फोन नंबर्स मोबाईलमध्ये जमायला लागतात. अनायसे आपल्याकरताही हा डेटाबेस तयार होत आहे याची कुठेतरी नोंद घेतली जाते आणि मग नियमित आरोग्य तपासणी करण्याकडे कटाक्ष ठेवला जातो.

आईवडील वेगळे राहत असतील तरीही आता त्यांच्या ढासळत्या तब्येतीमुळे, आजारपणामुळे आलेल्या परावलंबित्वामुळे किंवा एक जोडीदार गेल्याने मागे उरलेल्या पालकांना आधार देण्याकरता अनेकदा त्यांना आपल्या घरी आणले जाते. या वाढीव जबाबदारीकरता घरातल्या व्यवस्थेची नव्याने बांधणी करावी लागते.

मानसिक दृष्ट्याही हा काळ तसा नाजूकच. स्त्रीची रजोनिवृत्ती जवळ आलेली असते आणि त्या बदलाचे पडसाद मनाच्या माध्यमातून वागण्यात उमटतात. घरातून निघून गेलेल्या मुलांच्या अवास्तव काळज्या करणं, कारण नसताना हळवं होणं, आपल्या ओसरत चाललेल्या सौंदर्यखुणांची खंत करणं, जोडीदाराला आपल्यात इंटरेस्ट राहिला नाहीये का अशा शंका मनात डोकावणं, निसटून चाललेलं तारुण्य पकडून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणं असं काहीबाही घडत राहतं. हे चुकीचं वागणं आहे हे कळूनही वळत नाही. 'लाथ मारेन तिथं पाणी काढेन' ही वृत्तीही हळूहळू बदलायला लागलेली असते.

दुसर्‍या दृष्टीने विचार केला तर मुलांच्या जबाबदार्‍या कमी झाल्याने जोडीदारांना एकमेकांकरता पुन्हा वेळ मिळतो, एकत्र काही छंद जोपासणे, प्रवास करणे, गाण्याच्या मैफिली मनमुराद ऐकणे, काही सामाजिक उपक्रम हाती घेणे, नवनविन समवयस्क आणि समविचारी मित्रमैत्रिणी जमवून धमाल करणे या करता पैसा आणि वेळ गाठीशी असतो. त्यामुळे जीवन समृध्द करण्याच्या अनेक संधी असतात.

हल्ली चाळीशीचा फारसा बागुलबुवा केला जात नाही. जे बदल अपरिहार्य आहेत ते सहजपणे स्वीकारून जीवनाचा आनंद घेण्याची ही संधी आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन वावरणारे आपल्या मायबोलीकरांमध्ये पण अनेक असतील. तर हा धागा आहे आपले अनुभव शेअर करण्याकरता, काही प्रश्न असतील, शंका असतील त्या मांडण्याकरता.

****************************************************
तळटीप : या लेखात व प्रतिसादात दिलेल्या माहितीची अधिकृत शहानिशा करून मगच त्यानुसार कार्यवाही करावी. या लेखाचा उद्देश केवळ अनुभव व माहितीची देवाण-घेवाण एवढाच असून काही वैद्यकीय उपचार असतील तर ते आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करावेत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंदयात्री,
>>उतार

आता उतार सुरू
कित्ती छान!
चढणं ही भानगड नाही
कुठलंच शिखर जिंकायचं नाही
आता नुसता उतार
समोर झाडीने गच्च भरलेलं दृश्य
दरीतून अंगावर येणारा आल्हाददायक वारा
कधी धुकं तर कधी ढगही!
टेकावं वाटलं तर टेकावं,
एखाद्या दगडावर बसलेल्या छोट्याशा पक्ष्याशी
त्याच्या सुरार्त सूर मिसळून गप्पा माराव्यात
अरे, हे सगळं इथेच होतं?
मग चढताना का नाही दिसलं?
पण असू दे
आता तर दिसतंय ना?
मजेत बघत उतरू हळूहळू
हा मस्त मस्त उतार

- अनिल अवचट<<

चयापचय या क्रियेने शरीर चालते. चय = घडविणे, अपचय = नष्ट करणे. ४०शीत अपचय चयापेक्षा जास्त होतो. घडणे हे मोडण्यापेक्षा कमी पडू लागते. ३० मधे निम्मे आयुष्य संपले, म्हणजेच टॉपवर आलात, तो प्ल्याटु आता उताराला लागतो. सत्य आहे..

"कुठलंच शिखर जिंकायचं नाही" अनेक अर्थ निघतात..
मी सग्ळीच जिंकून चुकलोय.. आता काही उरलेच नाही पासून, आता हिम्मत नाही उरली कुठल्याच शिखरावर जायची.. पर्यंत.

अन उताराबद्दल म्हणाल तर उताराच्या वाटे बद्दलही म्हणावंच लागतं.

"life is not about reaching there safely, wiping the slight sweat on your brow and just ending it, but its about the bumps and rides and the heady speed, and reaching there, and saying -
'whew!' what a ride!"

(उताराच्या डोक्यावर पायाला स्की बांधून तयार असलेला) इब्लिस Wink

>>"आमच्यात" एकच सनातन भिती वास करुन अस्ते, ती म्हणजे म्हातारपणी यदाकदाचित आर्थिकदृष्ट्या परावलम्बी झालो तर पोरे/सुना विचारणार तर नाहीतच, उलट उचलुन वृद्धाश्रमात नेऊन टाकतील वा खायचेप्यायचेल्यायचे हाल हाल करतील>><<

अहो, मग मुलं काहितरी करतील आपल्यासाठी हि आशा बाळगाच कशाला? आताच काय ते स्वतःसाठी गुंतवणूक करून ठेवा. व ती पुर्णपणे दोघांसाठी(नवरा व बायको) ठेवायची. तब्येत पण जितकी होइल तितकी चांगली ठेवायची.

आपल्याकडे (भारतात) मुलं म्हातारपणात मदत करतील हे अपेक्षा चुकीचेच आहे. जसं म्हातार्‍या आई वडिलांकडे आपली पोरं सोडणं(हो मी सोडणंच म्हणते) चुकीचे तसच हे सुद्धा.

काळ बदललाय. कितीही कडू वाटले तरी ह्यात वावगं काहीच नाही की स्वतःचा विचार करणे.

----
मला स्वतःच्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता सतावते.(उगाच तरी) असले तरीही. आता चाळीशी नंतर भितीने काय होइल ह्या एक चिंतेत आहे. दिल्ली अभी दूर नही. Proud

उत्तम धागा! मनुष्याची वाटचाल प्रगल्भतेकडे व्हायला लागते चाळीशी नंतर. (विशेषतः)स्त्रियांना चाळीशी ओलांडली हे मान्य करणे कठीण जाते. निसटते सौंदर्य, आरोग्य पकडायला बघितले जाते.आँटी / अंकल म्हटले कि मनातून राग येतो वा वाईट वाटते.पण खिलाडूपणे घेतले पाहिजे याचीही जाणीव होते.

पंचवीस वर्षांपूर्वीची, दहा वर्षांपूर्वीची आणि आत्ताची, बदललेली प्राधान्ये माझ्या मनात सतत रुंजी घालतात. ज्या गोष्टींमध्ये तेव्हा स्वारस्य होते त्या गोष्टींमध्ये आत्ता काहीच स्वारस्य नसते. एखादा गाजावाजा झालेला चित्रपट झळकणार असला तर जाण्यात रस नसतो. हॉटेलिंग पूर्वी लक्झरी वाटायचे ते आता रूटीन वाटते. करिअर गाजवले की उमदे वाटायचे ते आता निरर्थक वाटते. तरीही मनाने तरुण राहण्यात मला काव्यनिर्मीतीने मोलाची सोबत केली. रसिकांनी भरभरून दिलेली दाद आणि दोन ते तीन वर्षे सातत्याने आयोजीत झालेले मुशायरे, कवीसंमेलने यांनी भारावून जाण्यातील रसही जरा कमी झाला आहे. ती प्रसिद्धी आणि पैसेही मिळवणे हाताशी असून त्यापासून खूप दूर गेलो आहे. कविता प्रकाशित होत असतानापेक्षा ती हल्ली मनात घडत असताना अनेक पट जास्त आनंद देते.

अनेक बाबतीत क्षमाशील व्हायला शिकावे लागले, तडजोडी शिकाव्या लागल्या, माणसे आहेत तशी स्वीकारावी लागली, स्वतःचे वर्तन दुसर्‍या हवे तसे करण्याची अवघड कला शिकावी लागली, कुठेतरी हा विचार घट्टपणे रुजू लागल्याचे जाणवले की 'जे होते ते नशिबाने होत असते'. प्रयत्नवादापासून दैववादाकडे होऊ शकेल अश्या प्रवासाचे पहिले पाऊल नकळतपणे पडल्यासारखे वाटले. त्याचा अपमान नाही वाटला, इगो दुखावला नाही गेला पण स्वतःचेच हसू आले.

माझ्या आयुष्यात 'वेग' या गोष्टीला फार महत्वाचे स्थान होते. मोटरसायकल आणि मोटार दोन्ही तुफान वेगाने चालवली आणि आयुष्यालाही वेगातच पुढे नेले. कधी हळू झालोच नाही. आता जरा टेकावेसे वाटते. शरीर थकलेले नाही, पण वेगाची भीती मात्र वाटू लागली आहे.

म्हणायला चाळिशी म्हणतात असे वाटायचे, पण खरोखरच एक्केचाळीस आणि बेचाळीस या वर्षांनी माझ्यात बदल घडवले. चक्क थोडेसे बोल्ड लिहायला परवानगी असलीच तर बेड पार्टनर म्हणून मी आत्ता आधीपेक्षा जास्त स्वागतार्ह झालो तर लाईफ पार्टनर म्हणून 'स्थिरावणे, मुरणे ' या वर्षांमध्ये सुरू झाले. बेदरकारपणा घटत गेला आणि दुसर्‍याबद्दलचा रिस्पेक्ट मनात आपोआप वाढत गेला. एक अपघात आणि एक मोठे आजारपण यांनी तकलादू बनवले, शरीरासकट मनालाही. याचा नेमका चाळिशीशी संबंध नसला तरी त्या दोन्ही गोष्टी नेमक्या चाळिशीच्या 'आस आणि पास' झाल्या. आई जाण्याचे दु:ख मी माझ्या वयाच्या वीस-पंचविशीत सोसूच शकलो नसतो, त्या जागी संयम राखण्याचे बळ कुठून आले देवच जाणे! आर्थिक सुबत्तेने उधळ्या प्रवृत्तीला अधिकाधिक प्रोत्साहन दिले व ते अजून चालूच आहे.

'मुलगेलेपण' हा शिक्का कायमचा पुसला गेला. हा मध्यमवयीन माणूस आहे हे भाव प्रत्येक चेहर्‍यावर न चुकता दिसू लागले. पण समहाऊ मला काहीच मिस केल्यासारखे वाटले नाही. माझा अनुभव आत्तापर्यंत तरी असा आहे की येणारा काळ आधीच्या काळापेक्षा सर्वथा अधिक चांगला गेला. चष्मा लागला नाही पण रुपेरी छटा कानांशेजारच्या केसांवर प्रेम करू लागली आहे. दाढीचे काही खुंट पांढरे असतात हे पाहून असे वाटते की केस पूर्णपणे काळे असताना आयुष्यात एकदा तरी दाढी ठेवून पाहायला हवी होती. आता ती ठेवली तर रुपेरीच दिसणार. पुन्हा, कसे काय जाणे, पण पांढर्‍या झालेल्या केसांचे काही वैषम्यच वाटत नाही. स्वतःला मूल असल्यावर बापामध्ये येणारा एक जबाबदारीचा सेन्स कधीच विकसित झाला नाही. पण त्यामुळेच की काय, आमच्या दोघांचे वैवाहिक जीवन नीरस व्हायच्या ऐवजी 'रोज नवीन अनुभवांनी व्यापलेले' असे काहीसे होत राहिले.

यापुढे:

नोकरी सोडली आहे. १२.१२.१२ ही शेवटची तारीख आहे या कंपनीतील, म्हणजे परवाचा दिवस! तेरवापासून मी मोकळाच! बायकोचा जॉब चालू झाला आहे. पण पंचवीस वर्षे मीही चढत्या क्रमाने व्यावसायिक यश मिळवल्याचे तिने व तिच्या घरच्यांनीही पाहिलेले असल्याने माझा हा निर्णय सुदैवाने कोणीही नकारात्मकरीत्या घेतलेला नाही. पण मी काहीतरी करणार आहे, काहीतरी (आर्थिक पातळीवर) सुरूही झालेले आहे. पण आता वेळ जास्त मिळेल हे खरे. हा वेळ शरीरस्वास्थ्य, वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्याशी गप्पा मारणे, व्यवसाय करणे आणि बायकोबरोबर अधिकाधिक वेळ घालवणे यात घालवायची इच्छा मनात आपोआप येत आहे. अखंड प्रवास करून गाठीशी एक अनुभव आलेला आहे तो म्हणजे अगदी नवरा बायको हे सुद्धा प्रत्यक्षात एकेकटेच जगत असतात. सहजीवन हा बाह्यरुपाचा भाग म्हणावा लागतो. यात कोणाचा दोष नाही. ज्याला त्याला आपले आयुष्य जगू देण्याची मुभा असावी. शैली निवडण्याची, प्राधान्ये ठरवण्याची परवानगी मागावी लागू नये. काहीतरी सामाजिक करावे असेही मनात येत आहे. देवाने भरपूर दिलेले असल्याने बहुधा ते करता यावे.

एकंदर, एका बेजबाबदार, बेदरकार, रंगेल व उधळ्या व्यक्तीमत्वाचे रुपांतर एका हळव्या, माणसे हवीशी वाटू लागलेल्या व्यक्तीमत्वात होत असावे असा अंदाज आहे.

या धाग्यासाठी पुन्हा आभार! आपले अनुभव शेअर करा असे म्हंटलेले असल्याने मी माझे काही अनुभव शेअर केले.

-'बेफिकीर'!

बेफिकीर .... मनापासुन लिहिलेत. नोकरी सोडलीत... आता मस्त जगा. तुम्हाला शुभेच्छा.

पंचवीस वर्षांपूर्वीची, दहा वर्षांपूर्वीची आणि आत्ताची, बदललेली प्राधान्ये माझ्या मनात सतत रुंजी घालतात. ज्या गोष्टींमध्ये तेव्हा स्वारस्य होते त्या गोष्टींमध्ये आत्ता काहीच स्वारस्य नसते.
एकंदर, एका बेजबाबदार, बेदरकार, रंगेल व उधळ्या व्यक्तीमत्वाचे रुपांतर एका हळव्या, माणसे हवीशी वाटू लागलेल्या व्यक्तीमत्वात होत असावे असा अंदाज आहे.>>>>>

हे फार आवडले.

एकंदर, एका बेजबाबदार, बेदरकार, रंगेल व उधळ्या व्यक्तीमत्वाचे रुपांतर एका हळव्या, माणसे हवीशी वाटू लागलेल्या व्यक्तीमत्वात होत असावे असा अंदाज आहे.
>> बेफी या सर्व गोष्टी तुमच्यात ऑलरेडी आहेत, फक्त त्यावरची धूळ झटकायची आहे तुम्हाला.

अनिल अवचटांची कविता छानच आहे पण ती त्यांनी साठाव्या वर्षी केली होती माझ्या आठवणीप्रमाणे..........

चाळीशीला चढ संपत नाही...फक्त त्याचा steepness (पक्षी : slope ) कमी होतो. उतार सुरू व्हायला वेळ आहे अजून !

चर्चा मस्त चालू आहे...

मस्तच लिहिला आहेत तुमचा अनुभव/मनोगत बेफि.
आवडलं.
मस्त आहे आहे धागा. अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय निघाला आहे असं वाटतय प्रतिसाद वाचून.
केदार च्या पहिल्या प्रतिसादाला अनुमोदन.
चाळिशीला अजून २ वर्षे आहेत पण एम्टी नेस्ट सिंड्रोम अजून कोसो दूर आहे. वेळ कसा जात आहे ते कळत नाही आणि आवडीच्या गोष्टी करण्यासाठी लागणारा वेळ/पैसा अजूनही हाती लागत नाही त्यामुळे मनसिक ओढाताण जाणवते.

एम्टी नेस्ट सिंड्रोमची एका पॉझिटिव अर्थाने वाटच बघत आहे म्हटल्यास वावगं ठरु नये. Happy

बेफीजी, You are simply great ! पुढील प्रवासास शुभेच्छा !

जाणवले की 'जे होते ते नशिबाने होत असते'. प्रयत्नवादापासून दैववादाकडे होऊ शकेल अश्या प्रवासाचे पहिले पाऊल नकळतपणे पडल्यासारखे वाटले.>>>

हळू हळू असे वाटत जाते खरे,

बेफि. त्यातूनच माझे हे शेर येत गेले....

नकोरे मना दोष कोणास देऊ
जसे होत होते नशीबात होते

किंवा

नशीबा सामन्याचा अंत तू आधी ठरवलेला
म्हणूनच एकही चेंडू तुझा मी खेळला नाही

आणि
चिंता कशास, गेले राहून येथ काही
कित्येक जन्म बाकी आहेत येरझारा

बेफि, वेगळा निर्णय. आणि तूमची यापुढची वाटचाल आम्ही बघणारच आहोत.
चैतन्य, ओळखीचा खुणा हरवत जाणार हे स्वीकारलेच पाहिजे. सध्या मी घरापासून फार काळ लांब रहात नाही पण पुर्वी, १८ महिने वगैरे दूर रहात असे. त्यावेळी भारतात आल्यावर वेगळेच वाटायचे. खास करुन भाचे पुतणे एकदम मोठे झालेले दिसायचे. पण आता त्याची सवय झाली.
म्हातारपणाची आर्थिक तरतूद जरी करुन ठेवलेली असली, तरी ती पुरी पडेल का, याची धास्ती असतेच. मनाची उमेद कायम ठेवायची. आणि मुख्य म्हणजे तब्येत राखायची.

माझा एक अगदी नेमका अनुभव लिहायलाच हवा. माझ्या ४० व्या वाढदिवशी आम्ही ३ मित्र प्रबळगडावर होतो.
तिथल्या वाडीवरच रात्र काढली. तिथे एफ एम चे प्रसारण छानच ऐकू येत होते. पहाटे ५ वाजता मराठीतून त्याकाळी एक कार्यक्रम सादर होत असे. मला तो कार्यक्रम आणि त्यातली निवेदिका खुपच आवडत असे.
ते मी माझ्या मित्रांना सांगितल्यावर, त्याने एक सहज कॉमेन्ट केली. ती आवडते तर तिला सांग..

खरंच एवढी साधी गोष्ट मी का केली नव्हती ? त्यापुर्वी सहकारी, शाळामैत्रिणी, वर्गमैत्रिणी होत्याच. पण जिला कधी बघितले नाही, अशा निवेदिकेशी संवाद साधायला मी कचरत होतो एवढे नक्की.

पुढे मी तिला खरेच मेल पाठवली. आणि आम्ही बराच काळ संपर्कात होतो. ( पुढे तो चॅनेल बंद पडला.) तिने
तर माझ्या संदर्भाचे दाखले देखील, त्या कार्यक्रमात दिले होते.

त्यानंतर अशी मैत्री जोडताना मी कचरलो नाही. मायबोलीवरचा वावरही त्यानंतरचाच.

०००

४० नंतर मी माझे दूर्गभ्रमण मात्र कमी केले. शरीरक्षमतेची खात्री राहिली नाही हे कारण होतेच पण त्यात थ्रील
वाटेनासे झाले. पण कुठेतरी ती आवड आहेच. म्हणून तर इथले सर्व वृतांत मला आवडतात.

माफ करा काही तुरळक पोस्टी वगळता सगळं थोडं निराशाजनक वाटतंय किंवा शेवटाकडे जायला लागल्यासारखं तात्पर्य काढणे टाइपचं होतंय. आणि खरं सांगते चाळीशी आता दीड वर्षच लांब असली तरी मला असं निराश बिराश, संपत आल्यासारखं, उताराला लागल्यासारखं वाटत नाहीये.
बहुतेक चाळीशीपर्यंत जे टप्पे पार व्हायला हवेत ते झाले नाहीयेत, आत्तापर्यंत अचिव्हमेंटचे फारसे काही तीर मारले नाहीयेत, किंवा अजून अक्कल आलेली नाहीये यातलं काहीही असेल पण अजून ती ४० हा केवळ एक आकडा आहे यापलिकडे फार काही हललेलं नाही माझ्यासाठी.

चुकतंय बहुतेक काहीतरी!

नी,
Midlife crisis is a term coined in 1965 by Elliott Jaques stating a time where adults come to realize their own mortality and how much time is left in their life.[1]

विकीवरचा उद्बोधक लेख. यातच हे 'क्रायसिस' पॉझिटिव्हली कसे घ्यावे, वा पॉझिटिव्हली कसे काम करते, तेही दिले आहे. एकदा नजरेखालून घाला.

मोठी होणारी मुले, स्वतःचा प्रथमपुरुषी 'मी' उल्लेख करायला शिकतात, तेव्हा त्यांच्यात 'इगो' 'इड' तयार झालेले असतात. त्या आधी मी गेला, चिनू आला असा स्वत:चाच थर्ड पर्सनमधे उल्लेख सुरू असतो.

स्वतःच्या नश्वरतेची किंचितही जाणीव बालकांना अन तरुणांना नसते. अन ती नसावीही. ही जाणीव जेव्हा होऊ लागते, ते मध्यमवय.

इथे प्रत्येकालाच क्रायसिस येते असे नाही, पण तो एक मोठा बदल असतो 'मी' मधे.

या वयानंतरच समाजऋण काय ते समजू लागते. इतरही सकारात्मक बदल होतात. काहीवेळा हे बदल नकारात्मक असतात, ते होऊ नयेत म्हणून आपल्यातलेच बदल समजून घेण्याच्या प्रयत्नांसाठी ही चर्चा असावी. एका वेगळ्या अर्थानेही लाईफ अगेन बिगिन्स अ‍ॅट फॉर्टी.

चर्चा चांगलीच आहे इब्लिस. माझ्यामते आयुष्यातले ठराविक टप्पे (लग्न, नोकरीधंद्यात स्थिरावणे, यशस्वी होणे, मुलेबाळे इत्यादी) कसे आणि कधी येतात यावर क्रायसिसचं स्वरूप बदलत असावं.

मला तिशी कधी आली कळलंच नाही. ते उजाडेतो आईचा मृत्यू झेलला. त्या क्रायसिसशी आजही झगडते आहे. स्थिरावणे, मुलेबाळे, यशस्वी होणे हे टप्पे माझ्या आयुष्यात अजून आलेले नाहीत आणि त्याबद्दल 'आता काय संपलं!' असं फार क्वचित वाटतं.

शारीरिक पातळीवर वय दिसणे हे आईच्या मृत्यूनंतर आणि मग ३५ नंतर जाणवायला लागले आहेच. पण त्याने इच्छा-आकांक्षा संपलेल्या नाहीत. की हाच क्रायसिस आहे?

नी,
प्रत्येकाला क्रायसिस येत नाही. ते सुमारे १०% लोकांना येतं. जपानी अन भारतीय संस्कृतीत ते प्रमाण अजून कमी आहे असे म्हणतात. दुसरं म्हणजे क्रायसिस किंवा स्ट्रेसर असं एक दोन दिवसांच्या आजारासारखं नाही. तो ४-६ वर्षांचा कालखंड आहे.

त्येकाला क्रायसिस येत नाही. ते सुमारे १०% लोकांना येतं.>>> धन्यवाद इब्लिस. गेले आठ दिवस तेच विचार करत होतो. कि गेल्या १० १२ वर्षात नेमका काय बदल झालाय आपल्यात. आणि अजुन १० १२ वर्षात काय बदल होउ शकतो. पण वर दिलेल्या कोण्त्याच फॅक्ट्स आतातरी लागु होताहेत असे दिसत नाहीय. (निधप यांनी म्हटल्या प्रमाणे ४० हा केवळ एक आकडा आहे च्या चालीवर वय हा केवळ एक आकडा आहे असेच अजुन वाटते कारण ते कधी वाढायचे थांबणार आहे ते माहित नाही ना Wink ).

अजुन ४० शी लांब आहे, खुप नाही पण थोडीशी. पण गंम्मत म्ह्णजे मागच्या महिण्या २ महिण्यापुर्वी कुणीतरी मला वय विचारलं.. आणि मी माझ वय तब्बल ८ वर्षांनी कमी सांगीतलं Wink लगेच ल्क्षात आलं काहितरी चुकतय. मग बरोबर सांगीतलं. आता जोकमध्ये वय लपवायचं सांगतात तसा किस्सा झाला.

पंचवीस वर्षांपूर्वीची, दहा वर्षांपूर्वीची आणि आत्ताची, बदललेली प्राधान्ये माझ्या मनात सतत रुंजी घालतात.>>> हे एकदम मस्त लिहलयं.. पण अजुन अनुभवायला मिळालं नाही.

माझ्यामते आयुष्यातले ठराविक टप्पे (लग्न, नोकरीधंद्यात स्थिरावणे, यशस्वी होणे, मुलेबाळे इत्यादी) कसे आणि कधी येतात यावर क्रायसिसचं स्वरूप बदलत असावं.>>>
काय आहे या सगळ्या गोष्टींची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. अगदी एक्स्ट्रीमली डीफरंट.

मला वाटतं क्रायसिस हे भितीचं एक रुप आहे. तुम्हाला कशाचीच भिती वाटत नसेल तर क्रायसिस कधिच जाणवणार नाही... नाहीतर तो जाणवण्यासाठी वयाची काही अट असेल असं वाटत नाहे.

आमच्या भागात (ग्रामिण) बघितलेला सामाइक अनुभव म्हणजे, लोक काय म्हणतील या गोष्टीची अतिशय प्रचंड भिती (धसकाच म्हणा हवंतर). त्यामुळे स्वतःला काय वाटतय यापेक्षा समाज काय म्हणेल हीच प्रॉयोरीटी (प्राधान्ये) आणि त्यामुळे वर उल्लेखलेले सो कॉल्ड क्रायसिस.

Pages