अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ३ (शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद)

Submitted by निंबुडा on 30 November, 2012 - 01:23

अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग १
अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग २

"जरा ह्या बाटलीचे निरीक्षण करुया आता! अरे, हे इथे काय आहे?" - इथून पुढे चालू

"जरा ह्या बाटलीचे निरीक्षण करुया आता! अरे, हे इथे काय आहे?"

मेजावर ठेवलेले तीनही पेले एकत्र ठेवलेले होते व तिघांनाही वाईनचा रंग लागलेला दिसत होता. पैकी एकाच्या तळाशी वाईनचा अतिशय पातळ पापुद्रा * जमलेला होता. जवळच दोन तृतीयांश भरलेली वाईनची बाटली उभी होती. तिच्याच बाजुला लांब ब वाईनने माखलेला - बाटलीचे बूच उघडण्यासाठी लागणारा - कॉर्क होता. बाटलीची धाटणी व तीवरील धूळ पाहून हे नक्की होते की ती फारच महागडी व खूप खास अशी वाईनची बाटली होती.

होम्स च्या देहबोलीत आता लक्षणीय फरक झाला होता. त्याच्या चेहर्‍यावरचे कंटाळवाणे भाव जाऊन त्यांची जागा आता सावधानता व एकाग्रतेने घेतली होती. त्याच्या डोळ्यांत ती नेहमीची ओळखीची कुतूहलयुक्त चमक परत आली होती. त्या कॉर्क चे त्याने बारकाईने निरीक्षण चालवले होते.

"त्यांना हा कॉर्क कुठून मिळाला?", हातातला कॉर्क नाचवत होम्स ने विचारले.

हॉपकिन्स ने एका अर्धवट उघडलेल्या ड्रॉव्हर कडे अंगुलिनिर्देश केला. त्यात जेवणाच्या मेजावर वापरायची काही फडकी आणि एक मोठा कॉर्कस्क्रू होता.

"श्रीमती ब्रॅकनस्टॉलनी हा स्क्रू वापरला गेल्याबद्दल काही विधान केले होते का त्यांच्या जबानीत?"

"नाही. तुम्हाला आठवत असेल की त्यांनी असे सांगितले आहे की जेव्हा चोरट्यांनी वाईनची बाटली उघडली तेव्हा त्या शुद्धीवर नव्हत्या."

"असेल. माझा तपास सांगतो की हा स्क्रू कधीच वापरला गेला नाही. उलट एका लहान पॉकेट स्क्रू ने बाटलीचे बूच उघडण्यात आले. कदाचित चाकू बरोबरच्या जुडग्यात असतो तसला छोटा पॉकेट स्क्रू! आणि तो दिड इंचापेक्षा लांब नसणार! तुम्ही जर बाटलीचे बूच व ह्या कॉर्क चा वरचा भाग नीट न्याहाळलात तर तुमच्या लक्षात येईल की ह्या कॉर्क मध्ये तो लहान स्क्रू बसवून बाटलीचे बूच एकुण तीन वेळा उघडण्याचा प्रयत्न केला गेला. कारण तो स्क्रू ह्या कॉर्क मध्ये घट्ट बसू शकला नसणार! जर तो मोठा स्क्रू वापरला गेला असता तर बूच एकाच खेचण्यात झटकन बाहेर निघून आले असते. त्या माणसाला जेव्हा तुम्ही पकडाल तेव्हा त्याच्याकडे असा बहूपयोगी चाकू व स्क्रू ह्यांचा जुडगा आहे की नाही ते पडताळू शकता."

"भले शाब्बास! फारच छान!" हॉपकिन्स उत्तेजित झाला होता.

"पण ह्या तीन पेल्यांचे गौडबंगाल मला अजूनही समजत नाही. श्रीमती ब्रॅकनस्टॉल ह्यांनी तीन व्यक्तींना वाईन पिताना खरोखरचे पाहिले, असेच म्हणाल्या ना त्या नक्की?"

"हो! आणि ह्या बाबतीत त्यांना जराही शंका नव्हती!"

"तर मग प्रश्नच मिटला. आता अजून काय बोलायचे ह्यावर? आणि तरिही तुला हे मान्य करावेच लागेल, हॉपकिन्स, की ह्या तीन पेल्यांमध्ये एक विशेष बात आहे. काय म्हणतोस? तुझ्या लक्षात येत नाही? बरं जाऊ दे! कदाचित माझ्यासारख्या विशेष बुद्धी आणि ज्ञान असलेल्या माणसाला समोर सोपे व सहज स्वीकारण्यासारखे वास्तव असतानाही काहीतरी गुंतागुंतीची उत्तरे व स्पष्टीकरणे शोधायची खोड असते. नक्कीच असेही असू शकते की ह्या पेल्यांबाबत मला वाटते ती शंका निरर्थकही असू शकते. चला! आता चांगलेच उजाडले आहे. त्यामुळे तुम्हाला 'हा दिवस चांगला जावो' अश्या शुभेच्छा देऊन मी तुमची रजा घेतो. तसेही ह्यापुढे तुला माझी गरज लागणार नाही असे दिसते कारण केस आता दिवसाच्या उजेडाइतकी लख्ख आहे. तु त्या रँडॉलला अटक केलीस की मला खबर दे. तसेच ह्या केसच्या संदर्भातल्या पुढच्या हालचाली व प्रगतीचे तपशीलही कळव. मला खात्री वाटते की ही केस यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल मला लवकरच तुझे अभिनंदन करण्याची संधी मिळेल. चल, वॉटसन. आपण आपला वेळ आपल्या घरी बसून दुसर्‍या एखाद्या केससाठी सत्कारणी लावू!"

आमच्या परतीच्या प्रवासात होम्सच्या निमग्न चेहर्‍यावरून मी ताडले की त्याने अशी एखादी गोष्ट तिथे पाहिली होती की ह्यामुळे तो अजूनही गोंधळलेला होता. थोड्या थोड्या वेळाने तो शंकाकुशंका झटकून देण्याचा व नेहमीच्या आविर्भावात येण्याचा प्रयत्न करीत होता. पण लगेच पुन्हा त्याच्या चेहर्‍यावर प्रश्नांचे जाळे पसरत होते. त्याच्या कपाळावरच्या आठ्या, आकुंचन पावलेल्या भुवया आणि बारीक डोळे सांगत होते की मनाने तो वारंवार त्या अ‍ॅबी ग्रेंज येथल्या हवेलीतल्या भोजनक्षात रेंगाळत होता. अचानक तो बसल्या जागेवरून उठला व आगगाडीच्या दरवाजाकडे धावला. मी ही त्याच्या मागोमग प्रतिक्षिप्त क्रियेनुसार धावलो. गाडी एका उपनगरीय स्थानकातून नुकतीच बाहेर पडत होती व तिने पुरता वेग पकडलेला नव्हता. माझ्या हाताला धरून ओढतच त्याने मला चालत्या गाडीतून खाली उतरवले.

"मित्रा, आता माझे बोलणे जरा नीट लक्ष देऊन ऐक," वळणावरून नाहीशा होत जाणार्‍या आगगाडीच्या शेवटच्या डब्यांकडे मी पाहत होतो. होम्स बोलत होता, "माझ्या चळिष्टपणामुळे मी तुला वारंवार त्रास देत आलेलो आहे ह्याबद्दल मी दिलगीर आहे, मित्रा! परंतु ही केस मी अशीच सोडून देऊ शकत नाही. माझ्या अंतःप्रेरणा वारंवार मला सुचवत आहेत की काहीतरी चूक होते आहे. मी शपथपूर्वक सांगू शकतो की नक्कीच काहीतरी चुकीचे आहे. आणि तरीही श्रीमती ब्रॅकनस्टॉलनी सांगितलेल्या कथेत काही अपूर्णता नाही. त्या दाईने सांगितलेला घटनाक्रमही त्या कथेला पूरक आहे. इतरही सगळे तपशील नेमके आणि यथायोग्य आहेत. तेव्हा ह्या विरुद्ध बोलण्यासारखे माझ्याकडे काय आहे? फक्त तीन वाईनचे पेले - इतकेच! पण जर का मी गोष्टी दिसताहेत तश्या गृहित धरल्या नसत्या आणि अथपासून इतिपर्यंत पुन्हा सगळे पुरावे अजून काळजीपूर्वक नजरेखालून घातले असते तर मला वाटते की मला नक्कीच माझ्या शंकांना पुष्टी देणारे काही ठाम पुरावे मिळू शकले असते. तसे असेल तर मला नक्कीच तसे केले पाहिजे. वॉटसन, ये असा ह्या बाकड्यावर बस इथे! जोपर्यंत पुन्हा मागे चिझलहर्स्ट स्थानकाकडे जाणारी आगगाडी येत नाही, तो पर्यंत मी तुझ्यासमोर काही पुरावे मांडतो. परंतु त्या आधी त्या दोघा स्त्रियांनी सांगितलेले सर्व खरे असेलच हा विचार मनातून काढून टाक. मनातला ह्या केससंदर्भातला पूर्वग्रह पूर्णपणे बाजुला सारून पुन्हा नव्याने ह्या केसकडे बघु या! श्रीमती ब्रॅकनस्टॉलच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आपले मत त्यांच्या बाजुने झुकता कामा नये.

"ह्या स्त्रीच्या कथनात नक्कीच काही असे कच्चे दुवे आहेत की आपल्याला शंका घ्यायला वाव मिळतो. त्या चोरट्यांनी पंधरवड्यापूर्वीच सिडनहॅम परिसरातील त्यांच्या दरोड्यामुळे आम जनतेचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचे वर्णनपर तपशील तेव्हा प्रसिद्ध झाले असल्याने आम जनतेला ते ठाऊक होते. थोडक्यात एखाद्याला चोरीचा काल्पनिक देखावा उभा करायचा असेल तर त्या त्रिकुटाचे तपशील वापरून कुणीही स्वतःच्या कथनात रंग भरू शकेल. तसं बघायला गेलं तर सराईत दरोडेखोर एक मोठा व यशस्वी डल्ला मारल्यानंतर बराच काळ शांत राहणे पसंत करतात. त्यांच्या अटकेस कारणीभूत होणारी अशी कोणतीही हालचाल ते करू इच्छित नसतात. शिवाय ज्या वेळेला ही घटना घडली ती वेळ (मध्यरात्रीच्या थोडे आधी) त्यांनी आपल्या कार्यभागासाठी निवडणे थोडे विचित्र वाटते. ही गुन्ह्याच्या दृष्टीने फारच लवकरची वेळ आहे. त्याचप्रमाणे एका स्त्रीला ओरडण्यापासून थांबवण्यासाठी त्यांनी तिच्यावर हल्ला करणेही माझ्या पचनी पडत नाही आहे. कारण असे करून उलटपक्षी तिने अजून जोरात आरोळी ठोकली असती आणि हे समजायला ते चोरटे तितके हुशार नक्कीच असतील. ते तिघे मिळून एका व्यक्तीला नुसत्या झटापटीतही भारी ठरू शकले असते, तरीही त्यांनी खून करावा हे माझ्या बुद्धीला पटत नाही. अजूनही एक घोळ आहे. एकदा सर ह्युस्टस ह्याचा खातमा केल्यानंतर घरात त्यांनी चोरून नेण्यासारख्या बर्‍याच मौल्यवान चीजा असतानाही फक्त सहा चांदीच्या ताटल्या घेऊन त्यांनी पोबारा करणे शंकेला वाव उत्पन्न करते. आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे त्यांनी ती वाईनची बाटली तिथेच अर्धवट सोडून जाणे! ह्या सर्व विचित्र गोष्टींबाबत तुझे म्हणणे काय आहे, वॉटसन?"

"ह्या सर्व मुद्द्यांचा एकत्रित विचार केला तर तर्कसंगती लागत नाही, हे तर खरेच, पण सुट्टा सुट्टा एकेक मुद्दा बघितला तर त्यांच्या खरेपणाची शक्यता नाकारताही येत नाही. माझ्या मते सगळ्यात विचित्र गोष्ट ही आहे की त्या स्त्रीस खुर्चीला बांधून ठेवण्यात आले होते."

"खरं सांगू? माझा स्वतःचा त्या मुद्द्यावर अजिबात विश्वास बसलेला नाही. एक तर त्यांनी तिचे तोंड कायमचे बंद करायला हवे होते किंवा तिला अश्या पद्धतीने बांधून ठेवायला हवे होते की त्यांनी पोबारा केल्यानंतर निदान पुरेशा कालावधीपर्यंत तिला त्यांच्या बद्दल लोकांना सूचना द्यायला संधी मिळू नये. थोडक्यात मी तुला सांगितले नव्हते का, की कुठच्याही कोनातून पाहिले तरीही त्या स्त्रीच्या कथनाबद्दल शंका उपस्थित करायला वाव मिळतोच आहे. आणि ह्या सर्वांच्याही वर सगळ्यात मोठा पुरावा ते वाईनचे पेलेच देत आहेत!"

"हे वाईनच्या पेल्यांचे गौडबंगाल आहे तरी काय?" मी अधीरतेने विचारले.

"तु ते पेले आत्ता ह्या क्षणी तुझ्या नजरेसमोर आणू शकतोस का?"

"नक्कीच!"

"आपल्याला सांगण्यात आले की त्या तीन पेल्यांमधून तीन जणांनी वाईन प्यायली. हे तुला कितपत खरे वाटते, वॉटसन?"

"तुला नक्की काय म्हणायचे आहे? त्या प्रत्येक पेल्यात थोडी थोडी वाईन होती की!"

"हो नक्कीच! पण फक्त एकाच पेल्याच्या तळाशी वाईनचा अतिशय पातळ पापुद्रा जमलेला होता. ह्यावरून तू काय निष्कर्ष काढशील?"

"जो कुठला शेवटचा पेला भरला गेला असेल त्याच्याच तळाशी असा पापुद्रा जमू शकण्याशी शक्यता आहे."

"साफ चूक! वाईनची बाटली अतिशय जुनी असल्याने संपूर्ण बाटलीतच तसे अंश होते, मग फक्त एकाच पेल्यात ते चुर्‍याचे अंश इतक्या मोठ्या प्रमाणावर सापडणे मला अशक्य कोटीतले वाटते. इथे फक्त दोनच शक्यता असू शकतात. फक्त दोन! एक - दुसरा पेला भरल्यानंतर बाटली जोरजोरात हलवली असेल व नंतर तिसरा पेला भरला असेल, त्यामुळे तिसर्‍या पेल्यात ते चुर्‍याचे अंश सापडले. मला ही शक्यता वाटत नाही. माझी खात्री आहे की माझ्या विचारांचा प्रवास योग्य दिशेने चालला आहे."

"मग तुला कोणती शक्यता वाटते?"

"फक्त दोनच पेले भरले गेले होते. आणि दोन्हीमधली उरलेली वाईन तिसर्‍या पेल्यात ओतण्यात आली होती. जेणेकरून तिथे तीन व्यक्ती उपस्थित असल्याचा आभास निर्माण होईल. आणि म्हणूनच जुन्या वाईनचा निदर्शक असा तो चुरा फक्त शेवटच्या पेल्यात सापडला. खरे की नाही? नक्कीच, माझी खात्री आहे की मी तंतोतंत अचूक निष्कर्ष काढला आहे. तसे असेल तर आता ही केस सामान्य राहत नाही. ती एका रंजक गूढ व रहस्यात रुपांतरीत झाली आहे. कारण हे आता उघड झाले आहे की त्या स्त्रिया आपल्याशी जाणून बुजून खोटे बोलल्या. त्यांच्या कथनात एक टक्काही सत्यांश नाही. खर्‍या गुन्हेगाराला लपवून ठेवण्यामागे नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी सबळ कारण असणार. त्यामुळे आपल्याला आता त्यांच्या मदतीची अपेक्षा न करता ह्या केसवर पुढचे काम करावे लागेल. चल वॉटसन, ती बघ आपल्याला हवी ती आगगाडी येते आहे, तर पुन्हा एकदा ह्या मोहिमेवर निघू या!"

आमच्या पुनर्भेटीमुळे हवेलीतले सगळेजण चकित झाले होते. होम्स ने तिकडे लक्ष न देता, हॉपकिन्स त्याच्या वरिष्ठांना खबर द्यायला पोलिसखात्याच्या मुख्यालयात गेल्याची संधी साधून भोजनक्षाचा ताबा घेतला. दालनाचे दार आतून लावून घेऊन जवळपास दोन तास त्याचे काम चालले होते. त्याच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्याने कसून सर्व गोष्टींची झडती घेतली. आपल्या प्राध्यापकाचे संशोधन चालू असताना कोपर्‍यात बसून कुतूहलाने त्यांना न्याहाळणार्‍या विद्यार्थ्याच्या आविर्भावात मी होम्सच्या संशोधनाचा प्रत्येक टप्पा निरखीत होतो. खिडकी, पडदे, जमिनीवरचा गालिचा, ती खुर्ची, तो दोरखंड - ह्या प्रत्येक गोष्टीचे त्याने सूक्ष्म व काळजीपूर्वक निरीक्षण केले. दुर्दैवी सर ह्युस्टस ह्यांचे शव आता तिथून हलवण्यात आलेले होते. बाकी सर्व गोष्टी मात्र आम्ही सकाळी पाहिल्या तश्याच होत्या. अचानक होम्सला भट्टीच्या त्या दणकट लाकडी आच्छादनावर चढताना पाहून मला आश्चर्य वाटले. त्याच्या डोक्याच्याही बर्‍याच वर अद्याप तारेला लटकलेला तो लालसर रंगाचा दोरखंड लोंबकळत होता. बराच वेळपर्यंत मान वर करकरून होम्स ने त्या दोर्‍याचे निरीक्षण केले. त्या दोर्‍याच्या अजून जवळ पोचता यावे म्हणून त्याने भिंतीवरील लाकडी चौकटीवर गुढगे टेकवले. आता त्याचे हात त्या अर्धवट लोंबकळणार्‍या दोरखंडापर्यंत पोचू शकत होते. पण त्याचे लक्ष आता त्या दोरापेक्षा त्या लाकडी चौकटीवर खिळले होते. सरते शेवटी तो उडी मारून खाली उतरला तेव्हा त्याचा चेहरा अतीव समाधानाने झळकत होता.

"चल वॉटसन, काम झाले, " तो म्हणाला, "आपल्या संग्रहातली ही सर्वात लक्षणीय व रंजक केस ठरणार आहे. मला राहून राहून ह्याचे आश्चर्य वाटतेय की मी इतका मूर्खपणा कसा काय केला? पण आता अधले मधले राहिलेले एखाद्-दोन दुवे वगळता ही साखळी माझ्या मते मी पूर्ण केली आहे."

"थोडक्यात तुला गुन्हेगार सापडले म्हणायचे!"

"सापडले नाही, सापडला म्हण! एकच माणूस. एक अतिशय ताकदवान माणूस! सिंहासारखा बळकट. ती मोडलेली सळई नजरेआड करू नकोस. सहा फूट तीन इंच उंचीचा, खारीप्रमाणे चपळ, उत्तम हस्तकौशल्य असणारा आणि सर्वात महत्वाचे अतिशय तीव्र बुद्धीचा असा हा इसम आहे. ही रचलेली कथाही नक्कीच त्याच्याच डोक्यातून उगम पावलेली आहे. वॉटसन, आपण एका अतिशय हुशार माणसाचा कारनामा शोधून काढला आहे. त्या घंटेच्या दोरखंडावर त्याने एक महत्त्वाचा पुरावा सोडला आहे ज्याने आपल्या शंकेला बळकटी मिळालेली आहे."

"कुठचा पुरावा?"

"ठिक आहे सांगतो. आता मला एक सांग. जर तू हा दोरखंड ओढला असतास तर तुझ्या मते तो कोणत्या जागी तुटला असता? नक्कीच जिथे तो वायरीला जोडण्यात आलेला आहे तिथे! होय ना? पण इथे तर तो वायरीच्या टोकापासून तीन इंच खाली तुटलेला आहे. का बरे असे?"

"कारण तिथे तो घासण्यात आलेला आहे!"

"बरोबर! जर आपण इथे खाली सापडलेल्या ह्या दोर्‍याचे हे टोक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हे टोक घासण्यात आलेले आहे. हे काम चाकूने करण्याइतका तो हुशार होता. पण दुसरे टोक पाहशील तर ते असे घासलेले दिसत नाही. इथून ते नीट दिसणार नाही. पण त्या भट्टीच्या आच्छादनावर चढून पाहशील तर तुला दिसेल की दोर्‍याचे तिथे लटकणारे टोक असे घासलेले नाही. दोरा तिथून चाकूने कापून काढल्यासारखे ते टोक दिसते. आता तुला कळले असेल की नक्की काय घडले. त्या मनुष्यास एक दोरखंड हवा होता. पण ओढून काढला असता तर घंटेचा आवाज होऊन नोकर मंडळी जागी झाली असती. मग त्याने काय केले? तर तो त्या लाकडी आच्छादनावर चढला. तिथे धुळीत त्याने त्याचे गुढगे टेकल्याच्या स्पष्ट खुणा उमटल्या आहेत. आता त्याची उंची त्या घंटेच्या दोरापर्यंत व्यवस्थित पोचू शकत होती. मग त्याने त्याच्या चाकूने तो दोर कापला. मी अजून तीन इंचाने उंच असतो तर माझी ही उंची तिथपर्यंत पोचू शकली असती. ह्याचा अर्थ तो मनुष्य माझ्यापेक्षा तीन इंचाने उंच असणार. म्हणून मी त्याच्या सहा फूट तीन इंच ह्या उंचीचा अंदाज बांधला. त्या ओकच्या लाकडी खुर्चीवरच्या खुणा पाहिल्यास का? त्या काय सांगतात, वॉटसन?"

"रक्त दिसतंय!" मी खुर्चीचा बसण्याचा भाग बारकाईने निरखीत उद्गारलो.

"रक्तच आहे ते! ह्या एकाच पुराव्याने हे सिद्ध होतंय की श्रीमती ब्रॅकनस्टॉलची कथा तद्दन खोटी आहे. गुन्हा घडत असताना जर का त्या खुर्चीवर बसलेल्या होत्या तर मग रक्ताचे शिंतोडे खुर्चीच्या बसण्याच्या जागी कसे उडू शकतील? त्यांना नक्कीच त्यांच्या पतीच्या खुनानंतर तेथे बसवण्यात आले होते. मला वाटते की आपण त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांच्या सोफ्यावर ठेवलेल्या काळ्या झग्यावर जो रक्ताचा डाग दिसला होता तो खुर्चीवरील ह्या शिंतोड्यामुळे पडलेला असणार! अजूनही आपण पूर्ण निष्कर्षाप्रत पोचलो नाहीये, वॉटसन! मला त्या दाईची जबानी पुन्हा एकदा घ्यावी लागेल. तिच्याकडून सत्य वदवून घेण्यासाठी प्रसंगी आपल्याला तिच्यासोबत कदाचित थोडे सक्तीने व कठोरपणे बोलावे लागेल.

हे थेरेसा राईट नामक प्रकरण फारच रंजक होते. ती अतिशय संयमी व करारी अशी स्त्री होती. परंतु अतिशय शंकाखोर, बोलायला अनुत्सुक, रोखठोक व विनयाचा अभाव असलेल्या त्या स्त्रीचा होम्स च्या मृदू संभाषणाने थोड्या वेळात कायापालट केला. होम्स ने अभय देताच ती स्त्री स्नेहपूर्ण भाषेत बोलू लागली. तिने कुठल्याही प्रकारे तिच्या माजी मालकाबद्दल तिला असलेला राग व तिटकारा लपवण्याचा प्रयत्न केला नाही.

"हो, श्रीयुत, हे खरे आहे की सर ह्युस्टस ह्यांनी मला काचेचा जग फेकून मारला....

क्रमशः

वाईनचा अतिशय पातळ पापुद्रा * - मूळ इंग्रजी कथेत bee's-wing असा शब्द आहे. ह्या शब्दाशी माझे घोडे जरा अडले होते. गूगलल्यावर ही माहिती मिळाली: वाईन जितकी जुनी तितकी जास्त चांगली असे समजले जाते. अश्या जुन्या, साठवलेल्या वाईन्स मध्ये [बराच काळ बाटली न हलता राहिल्यामुळे] बारीक चुर्‍याचा पातळ पापुद्रा तळाशी तयार होतो, त्यावरून वाईन किती वर्षे जुनी आहे, त्याचा पत्ता जाणकारांना लागतो. मधमाशीच्या पातळ, नाजुक पंखासारखा हा थर दिसत असल्याने नाव दिले - bee's-wing)

अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग १

सरते शेवटी त्या पुन्हा बोलू लागल्या:
"मी तुम्हाला सांगते काल रात्री काय झाले......" - इथून पुढे चालू

सरते शेवटी त्या पुन्हा बोलू लागल्या:
"मी तुम्हाला सांगते काल रात्री काय झाले. कदाचित तुम्हाला माहीत असावे की घरातले सर्व नोकर-चाकर हवेलीच्या नवीन भागात झोपतात. हवेलीचा मधल्या म्हणजेच मुख्य भागात राहत्या खोल्या असून मागील बाजूस स्वयंपाकघर आणि वरील बाजूस आमचा शयनकक्ष आहे. माझी दाई - थेरेसा - माझ्या खोलीच्या वर अजून एक खोली आहे, तेथे झोपते. ह्या व्यतिरिक्त इथे कोणी नाही आणि कुठलाही आवाज ह्या पलीकडील हवेलीच्या भागांत पोचू शकत नाही. हे तपशील त्या चोरांना नक्की माहीत असणार. अन्यथा त्यांनी ज्या पद्धतीने हे काम केले, तसे ते करू शकले नसते.

"सर ह्युस्टस रात्री साधारण साडे दहाच्या दरम्यान झोपायला गेले. नोकरमंडळी त्या पूर्वीच त्यांच्या खोल्यांमध्ये झोपण्यास गेलेली होती. फक्त माझी दाई जागी होती आणि मला जोपर्यंत तिची गरज वाटून मी तिला हाक मारली नाही तोपर्यंत ती तिथेच होती. रात्रीचे अकरा वाजून गेले तरीही मी ह्याच खोलीत बसून पुस्तक वाचण्यात गढून गेले होते. नंतर वरच्या शयनकक्षात झोपण्यासाठी जाण्यापूर्वी मी सर्व खोल्यांमधून एक चक्कर टाकली. ही माझी रोजची सवय होती. कारण मी तुम्हाला हे आधीच सांगितले आहे की सर ह्युस्टस हे ह्या बाबतीत भरवसा ठेवण्याजोगे नव्हते. मी स्वयंपाकघर, खानसामा राहतो ती जागा, शस्त्रागार, बिलियर्ड खेळण्याची खोली, दिवाणखाना आणि सरते शेवटी हे भोजनगृह ह्या सर्व खोल्यांमधून चक्कर टाकली. काळे पडदे लावलेल्या ह्या खिडकीजवळ येताच माझ्या चेहर्‍यावर वार्‍याचा मोठा झोत आला आणि माझ्या लक्षात आले की खिडकी उघडीच आहे. मी पडदा बाजुला सारला आणि पाहते तो माझ्यासमोर एक रुंद खांद्यांचा मध्यमवयीन इसम उभा होता. त्याने नुकतेच त्या कक्षात पाऊल ठेवले होते. ही खिडकी फ्रेंच वास्तुकामाचा नमुना असलेली आहे. त्यामुळे बाहेरील बगीच्यात जाणार्‍या दारासारखी तिची रचना आहे. माझ्या शयनक्षातील मेणबत्ती माझ्या हातांत होती. तिच्या प्रकाशात मला त्या इसमाच्या मागे अजून दोन इसमांच्या आकृती दिसल्या. ते इसमही आत शिरण्याच्या तयारीत होते. मी झटकन मागे सरकले तरी तो इसम माझ्यावर आदळलाच! त्याने प्रथम माझे मनगट धरले व नंतर माझा गळा आवळला. मी ओरडण्यासाठी तोंड उघडण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझ्या डोळ्याच्या वर जबरदस्त मुष्टिप्रहार केला आणि मला जमिनीवर पाडले. थोड्या क्षणांकरीता माझी शुद्ध हरपली असावी. कारण मी डोळे उघडले तेव्हा त्यांनी मला घंटेला बांधलेल्या दोराच्या सहाय्याने एका ओकच्या लाकडापासून बनवलेल्या खुर्चीला घट्ट बांधून ठेवल्याचे आढळले व ती खुर्ची भोजनाच्या मेजावर ठेवलेली होती. ही घंटा भट्टीच्या वरील आच्छादनाच्या वरच्या बाजुस टांगलेली आहे. मला इतके मजबूतरीत्या बांधलेले होते की मला तसूभरही हलता येत नव्हते व तोंडात कोंबलेल्या रुमालाच्या बोळ्यामुळे मी ओरडूही शकत नव्हते. आणि ह्याच क्षणी माझे दुर्दैवी पती तेथे आले. त्यांनी नक्कीच काही शंकास्पद आवाज ऐकले असणार त्यामुळे ते येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या पूर्ण तयारीनिशी तेथे आले होते. त्यांच्या अंगावर त्या वेळी ते रात्री झोपताना परिधान करत असत तो अंगरखा व विजार होती आणि हातात त्यांची आवडती छडी! ते उगारत ते चोरांकडे धावले, तितक्यात त्या मध्यम वयीन इसमाने भोजनकक्षात उबेसाठी असलेल्या भट्टीच्या बाजुला जाळीत खोचलेली सळई खेचून काढली आणि माझ्या पतीला तिचा एक जोरदार तडाखा दिला. एक मोठा आवाज करत ते खाली कोसळले ते परत कधी उठलेच नाहीत. पुन्हा मी काही मिनिटांकरीता बेशुद्ध झाले. मला जाग आली तेव्हा जाणवले की बाजुच्या कपाटातल्या चांदीच्या ताटल्या त्यांनी बाहेर काढल्या होत्या तसेच वाईनची बाटलीही कपाटातून बाहेर काढली होती व समोर मेजावर ठेवली होती. त्या तिघांच्याही हातांत वाईनचे पेले होते. मी तुम्हाला हे आधी सांगितले की नाही आठवत नाही, त्या तिघांपैकी एक, - जो मध्यमवयीन इसम होता - त्याला दाढी होती व इतर दोघे - जे तरुण होते - त्यांनी तुळतुळीत दाढी केलेली होती. बहुदा ते पिता - पुत्र असावेत. ते आपापसांत अतिशय हळू आवाजात कुजबुजत होते. मग त्यांनी जवळ येऊन मी घट्ट बांधले गेले असल्याची पुन्हा एकदा खात्री केली. सरते शेवटी ते ह्याच खिडकीतून बाहेर गेले. खिडकी बाहेरून बंद केली. पुढे मला माझ्या तोंडातला बोळा बाहेर काढता येण्यास जवळपास १५ मिनिटे लागली. तसे केल्या केल्या मी माझ्या दाईच्या नावाने आरोळी ठोकली. तशी ती लगोलग माझ्या मदतीला इथे धावून आली. घरातल्या इतर नोकरांनाही जाग आली व लगोलग स्थानिक पोलिसांना आम्ही खबर पाठवली. त्यांनी लगेच लंडन पोलिसांकडे बातमी रवाना केली. बस्स्स! इतकेच मी तुम्हाला सांगू शकते! आणि मी आशा करते की मला पुन्हा ह्या वेदनादायक प्रसंगाची उजळणी करण्याची गरज पडणार नाही."

"श्री. होम्स, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का?" हॉपकिन्स ने विचारणा कली.

"श्रीमती ब्रॅकन्स्टॉल ह्यांचा वेळ व सहनशक्तीची मी परीक्षा बघू इच्छित नाही, " होम्स म्हणाला, " मला तुमचा अनुभव जाणून घ्यायला आवडेल." आपला मोर्चा दाईकडे कडे वळवत होम्स उद्गारला.

"मी त्या चोरांना हवेलीत प्रवेश करण्यापूर्वीच पाहिले होते. स्वच्छ चांदणे पडले होते. मी माझ्या झोपण्याच्या खोलीत खिडकीजवळ उभी असताना हवेलीच्या फाटकापाशी रेंगाळताना मी त्यांना चंद्रप्रकाशात पाहिले होते. परंतु त्या वेळी मला त्यात काहीच संशयास्पद वाटले नाही. त्यानंतर तासाभारापेक्षाही जास्त काळ लोटून गेल्यानंतर मी माझ्या बाईसाहेबांची आरोळी ऐकली. मी लगेच खाली धाव घेतली. भोजनकक्षात प्रवेश केल्या केल्या मी शेळीगत भेदरलेल्या बाईसाहेबांना व जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साहेबांना एकाच वेळी पाहिले. ते दृश्य कोणत्याही स्त्री च्या हृदयाचा थरकाप उडवेल असेच होते. कुमारी मेरी फ्रेझर ह्यांना इतके घाबरलेले मी ह्यापूर्वी कधीच पाहिलेले नाही. सद्ग्रुहस्थांनो, तुम्ही आधीच माझ्या बाईसाहेबांना बरेच प्रश्न विचारून झाले आहेत. तेव्हा आता मला त्यांना त्यांच्या खोलीत आरामासाठी घेऊन जाण्याची परवानगी द्या. त्यांना विश्रांतीची नितांत गरज आहे."

असे म्हणून त्या वृद्धेने आईच्या मायेने श्रीमती ब्रॅकनस्टॉल ह्यांना उठवले व त्यांच्या हाताला धरून ती त्यांना त्यांच्या शयनक्षाकडे घेऊन गेली.

"ती कायम श्रीमती ब्रॅकनस्टॉल सोबत राहिलेली आहे," त्या दिशेकडे पाहत हॉपकिन्स सांगत होता, "श्रीमती ब्रॅकनस्टॉल ह्या पूर्वाश्रमीच्या कुमारी मेरी फ्रेझर. त्यांचे मूळ गाव दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ह्या भागात आहे. ह्या दाईने लहानपणी त्यांना स्वतःच्या बाळासारखे सांभाळले व मोठे केले आहे. १८ महिन्यांपूर्वी त्या पहिल्यांदा ऑस्ट्रेलियातून बाहेर पडून इथे इग्लंड मध्ये आल्या तेव्हाही ही दाई त्यांच्या सोबतच इथे आली. तिचे पूर्ण नाव थेरेसा राईट असे आहे. आजच्या जमान्यात अशी एकनिष्ठ व कामसू दाई मिळणे मुश्किल आहे. इथे ह्या बाजुला या असे, श्री. होम्स!" हॉपकिन्स भोजनक्षाच्या दिशेने पुढे होत म्हणाला.

ह्या केस मध्ये आधी निर्माण झालेली रुची साफ उडून गेल्याचे होम्स चा बोलका चेहरा सांगत होता. आणि मला कळत होते की रहस्य समजल्यानंतर ह्या केसची रंजकता एकदमच नष्ट झाली होती. त्या चोरांना शोधून फक्त ताब्यात घेण्याचे काम उरले होते आणि अशा सामान्य चोरांना पकडण्यात होम्स ला काय गोडी वाटणार होती? त्याच्यासारख्या गूढ्-गहन, विद्वान आणि आपल्या कामात तरबेज गुप्तहेराला इतक्या साध्या केससाठी बोलावले गेल्याची स्पष्ट निराशा मला त्याच्या डोळ्यांत दिसून येत होती. परंतु भोजनकक्षातला विलक्षण नजारा त्याचे लक्ष वेधून घेण्यास व त्याची ह्या केस मधली गेलेली रुची परत आणण्यासाठी पुरेसा होता.

ते अतिशय भव्य आणि उंच असे दालन होते. दालनाचे छत ओकच्या लाकडाचे व सुरेख नक्षीकाम केलेले असे होते. सगळ्या भिंतींवर शिकार केलेल्या हरणांचे भुसा भरलेले मुखवटे व जुनी शस्त्रात्रे ओळीने लटकवलेली होती. प्रवेशद्वाराच्या बरोबर विरुद्ध बाजुस मघाशी बाईसाहेबांनी त्यांच्या कथनात नमूद केलेली फ्रेंच धाटणीची खिडकी होती. उजव्या बाजुच्या तीन लहान खिडक्यांतून गार थंडीतला फिकट सूर्यप्रकाश आत येत होता. डाव्या बाजुस दालनात ऊब निर्माण करण्यासाठी बनवण्यात आलेली मोठी आगीची भट्टी होती. तिच्या वरील बाजुस एका भले मोठे आच्छादन होते. ते ओकच्याच भक्कम व मजबूत लाकडापासून बनवलेले होते. भट्टीच्याच बाजुला ओकच्या लाकडाची भक्कम खुर्ची होती. तिला बसण्याच्या जागी इंग्रजी X आकाराच्या लाकडाच्या पट्ट्या होत्या व हात टेकवण्यासाठी आधाराच्या लाकडाच्या पट्ट्या होत्या. खुर्चीच्या मोकळ्या जागांमधून किरमिजी रंगाचा दोरखंड ओवून तो मधल्या इंग्रजी X आकाराच्या भागाला गाठ मारलेल्या अवस्थेत होता. श्रीमती ब्रॅकनस्टॉलना मुक्त केल्यानंतर त्या जेव्हा खुर्चीतून उठल्या असाव्यात तेव्हा दोरखंडाचा उचकटलेला भाग घरंगळून खाली पडला असावा, परंतु दुसरे टोक जे गाठ मारून पक्के केले होते ते तसेच राहिले असावे. ह्या सर्व तपशीलांची नोंद आम्ही तेव्हा घेतली नव्हती. कारण भट्टीच्या समोरच अस्ताव्यस्त पडलेल्या सर ह्युस्टस ह्यांच्या मृतदेहाखेरीज अन्य कशावरही लक्ष त्या क्षणी जाणे शक्य नव्हते.

सर ह्युस्टस हे उंच व बळकट शरीरयष्टीचे गृहस्थ होते. त्यांचे वय साधारण चाळीसच्या आसपास असावे. ते पाठीचर उताणे पडले होते. चेहरा छताच्या बाजुस असून त्यांच्या लहानखुर्‍या दाढीतून तोंडातील एक दात बाहेर डोकावत होता. त्यांचे हात वर उगारलेल्या स्थितीत असून हातात त्यांची छडी दिसत होती.
त्यांच्या काळ्या व देखण्या चेहर्‍यावर द्वेषाने पेटलेल्या व सूड घेण्याच्या ईर्ष्येने झपाटलेल्या व्यक्तीचे भाव दिसत होते, त्यामुळे त्यांचा मृत चेहरा अधिकच पाशवी व भयावह वाटत होता. ह्या दालनात प्रवेश करण्यापूर्वी ते नक्कीच झोपलेले असावेत. कारण त्यांच्या अंगावर सुरेख नक्षीकाम केलेला ठेवणीतला अंगरखा होता. तसेच विजारीतून बाहेर डोकावणार्‍या त्यांच्या पायांत ना बूट होते ना मोजे! त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला होता व सबंध दालनात त्यांच्यावर झालेल्या उग्र व घणाघाती हल्ल्याचे पुरावे दिसत होते. बाजुलाच मस्तकावर प्रहार केल्याने कमानीसारखी वाकलेली सळई पडली होती. सळईचा मूळ आकार कमालीचा बदललेला होता. होम्स ने सळईचे व तिच्या बिघडलेल्या आकाराचे बारकाईने निरीक्षण केले.

सर ह्युस्टस ह्यांच्या शवाचे निरीक्षण करणारा होम्सः

Sir Eustace Deadbody_0.jpg

"तो मध्यमवयीन मनुष्य चांगलाच ताकदवान असला पाहिजे!" होम्स उद्गारला.

"बरोबर आहे!, " हॉपकिन्स बोलता झाला, " माझ्याकडे रँडॉल त्रिकुटाचे वर्णन आहे आणि त्यातल्या पित्याचे वर्णन तुम्ही सांगितलेल्या तपशीलांशी जुळते."

"मग तर तुम्हाला त्याला शोधून काढणे फारसे अवघड नसणार!"

"अजिबात नाही! आमची शोध पथके आधीच रवाना झाली आहेत. मध्यंतरी अशी आवई उठली होती की त्यांनी अमेरीकेकडे प्रयाण केले आहे. पण आता असे दिसते आहे की ते ह्याच भागात कुठेतरी आहेत. आता मी बघतोच की आमच्या तावडीतून ते कसे काय सुटतात! आम्ही प्रत्येक बंदरावरची बातमी आम्हाला मिळण्याची व्यवस्था केली आहे. तसेच माहिती देणार्‍यास त्याच दिवशी संध्याकाळच्या आत इनाम देण्याची घोषणाही केली आहे. फक्त मला एक गोष्ट लक्षात येत नाहीये व ती ही की त्यांना इतके कसे लक्षात येऊ नये की ती स्त्री मुक्त झाल्यानंतर त्यांचे वर्णन करू शकेल व त्या वर्णना आधारे आम्ही त्यांना आरामात पकडू शकू? इतका वेडेपणा कसे करू शकले असावेत ते?"

"अगदी बरोबर! एखाद्याने हे आधीच ओळखून श्रीमती ब्रॅकनस्टॉल ह्यांनाही सद्गती दिली असती."

"त्यांना कदाचित हे लक्षात आले नसेल की, त्या शुद्धीवर आल्या असतील" मी म्हणालो.

"हां! कदाचित तसेही असू शकेल. त्यांना बेशुद्धावस्थेत पाहून त्यांना मारून टाकण्याचा विचार त्यांनी रद्द केला असेल. बरं ह्या बिचार्‍या इसमाबद्दल काही सांगशील का?" मृतदेहाकडे अंगुलीनिर्देश करून होम्स ने विचारले, " मी ह्या सद्ग्रुहस्थांबद्दल चित्रविचित्र वार्ता ऐकल्या आहेत!"

"तो एरवी एक सहृदयी मनुष्य होता, पण एकदा का दारू चा पूर्ण अंमल चढला की त्याच्याइतका नीच दुसरा कुणी नसेल. पूर्ण नशा म्हणण्यापेक्षा अर्धवट नशेत म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. कारण ते कधीच पूर्ण नशा होइस्तोवर सगळी दारू संपवत नसत. अर्धवट नशेत त्यांच्यात सैतान संचारत असे आणि अशा अवस्थेत ते काहीही करीत असत. काहीही म्हणजे अक्षरशः काहीही! त्यांच्या कडे इतका मान-मरातब, पैसा, प्रतिष्ठा असूनही त्यांना एक-दोनदा पोलिस ठाण्याच्या वार्‍या कराव्या लागलेल्या आहेत. त्यांच्या पत्नीच्या लाडक्या कुत्र्याला जाळून मारून टाकण्याचे एक प्रकरण मध्यंतरी पोलिसांकडे आलेले होते. ते कसेबसे दाबून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्या दाईला काचेचा जग फेकून मारण्याचेही एक प्रकरण झाले होते. त्यालाही नंतर फारच गंभीर वळण मिळाले होते. एकंदरीत त्यांच्या जाण्याने ह्या हवेलीमागची व पर्यायाने आमच्या खात्यामागचीही मोठी ब्याद टळली आहे, असेच म्हणावे लागेल. ते तिकडे तुम्ही काय पाहत आहात, श्री. होम्स?"

होम्स त्या ओकच्या लाकडाच्या खुर्चीच्या पुढ्यात आपल्या गुढघ्यांवर बसून खुर्चीला बांधलेल्या लाल दोरखंडाच्या गाठी काळजीपूर्वक तपासत होता. चोरांनी खेचून ओढ दिल्यामुळे तुटलेल्या त्या दोरखंडाच्या तुटक्या व घासलेल्या बाजुचे त्याने बारकाईने निरीक्षण केले.

"जेव्हा हा दोरखंड खेचला गेला असेल तेव्हा त्या घंटेचा आवाज तर नक्कीच झाला असेल." तो उद्गारला.

"कुणीही तो ऐकला नाही. कारण स्वयंपाकघर हवीलीच्या एकदम मागील बाजुस आहे."

"पण त्या चोरांनी हा अंदाज कसा बांधला असेल की कुणीच आवाज ऐकणार नाही? इतक्या अविचाराने घाई-गडबडीत हा दोर त्यांनी का व कसा खेचला असेल?"

"नक्कीच तुमची शंका रास्त आहे, श्री. होम्स. हाच प्रश्न माझ्या मनातही कधीपासून रेंगाळत आहे. मला वाटते की त्या चोराला घराची रचना व घरातल्यांच्या सवयी पूर्णपणे माहीत होत्या. त्यांना हे ठाऊक होते की त्या वेळेला घरातले सर्व नोकर त्यांच्या खोपण्यांच्या खोल्यांमध्ये असणार व त्यामुळे स्वयंपाकघरातली घंटा कुणालाही ऐकू येणार नाही. म्हणजेच घरातीलच एका नोकराच्या ते आधीपासूनच कायम संपर्कात असणार. पुरावे तरी तेच सांगताहेत. पण घरातील सर्व आठ नोकरांच्या जबान्या आम्ही घेतल्या आहेत आणि ते सर्व विश्वासू सेवक वाटत आहेत."

"तर मग संशयाची सुई त्या दाई वर म्हणजेच थेरेसावर जाते.", होम्स म्हणाला,"कारण तिला सर ह्युस्टस ह्यांनी काचेचा जग फेकून इजा केली होती. पण मग तसे असेल तर तिने तिच्या प्रिय मालकिणीचा विश्वासघात केल्यासारखे होते. आणि ती तर तिच्या मालकिणीशी अतिशय एकनिष्ठ वाटते. तसेही हा मुद्दा गौण आहे. कारण एकदा का तुम्ही त्या रँडॉल ला पकडलेत की त्याच्या ह्या पापात सहभागी असणार्‍यांची नावे तो सांगेलच. आपल्या समोर हे जे पुरावे दिसताहेत ते त्या स्त्रीने कथन केलेल्या गोष्टीला नक्कीच पूरक आहेत." असे म्हणत होम्सने त्या फ्रेंच खिडकीजवळ जाऊन खिडकीचे दरवाजे सताड उघडले, "इथे पावलांचे कसलेच ठसे दिसत नाहीत, पण खालची जमीन लोखंडासारखी टणक असल्याने आपण तशी अपेक्षाही करू शकत नाही. इथे मला दिसतेय की भट्टीवरच्या आच्छादनावर ठेवलेल्या ह्या मेणबत्त्या पेटवलेल्या होत्या."

"होय. ह्या आणि बाईसाहेबांच्या हातातल्या त्यांच्या शयनकक्षातल्या मेणबत्त्त्यांच्याच प्रकाशात त्या चोरट्यांना बाहेर जायला वाट सापडली."

"आणि त्यांनी नक्की काय काय चोरून नेले??"

"तसं पाहता त्यांनी विशेष काही चोरले नाही. बाजुच्या कपाटातल्या फक्त सहा चांदीच्या ताटल्या! श्रीमती ब्रॅकनस्टॉल ह्यांना असे वाटते की ते चोर सर ह्युस्टस ह्यांच्या अनपेक्षित मृत्युमुळे स्वतःच इतके बावचळले होते की सगळे घर धुंडाळ्ण्याचे त्यांनी कष्ट न घेताच पोबारा केला. एरवी त्यांनी तसे जरूर केले असते."

"असेच असेल ह्यात मला जराही शंकाही नाही. आणि त्यांनी वाईनही प्यायली म्हणे!"

"स्वतःला पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी असेल!"

"कपाटात उरलेले तीन पेले दिसताहेत. मला वाटते त्यांना कुणाचाही स्पर्श झालेला नाही. बरोबर?"

"बरोबर! आणि बाटली त्यांनी जिथे ठेवली होती तशीच ती तिथेच उभी आहे."

"जरा ह्या बाटलीचे निरीक्षण करुया आता! अरे, हे इथे काय आहे?"

क्रमशः ....

अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ४
अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ५ (अंतिम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिला! Happy

आवडला हाही भाग.

फक्त ते bee's-wingचं स्पष्टीकरण सर्वात शेवटी खाली दे ही सुचवणी.

फक्त ते bee's-wingचं स्पष्टीकरण सर्वात शेवटी खाली दे ही सुचवणी.>>>> +१ आता हेच लिहायला परत आले

आधीच्या भागांच्या लिंक देणार का? प्रत्येक लेखाखाली.
>> +१.
प्रत्येक भागामध्ये उरलेल्या सगळ्या भागांची लिंक दे.

आधीच्या भागांच्या लिंक देणार का? प्रत्येक लेखाखाली.
>>>
आनंदयात्री,

Happy

तेच परवा आधीच्या एका भागासाठी करत होते तर म्हणालास की सारखे "बदलून" असे दिसते आहे. Happy
नेटचा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. प्रत्येक वेळी संपादन करताना काहीतरी प्रॉब्लेम येतोय आणि २ किंवा तीन वेळा प्रयत्न करून एकदाच संपादन होतेय. Sad

आधीच्या लिंक्स देते! Happy

धन्यवाद, अ‍ॅडमिन Happy

तसेही मी सध्या लिंक्स अ‍ॅड केल्यात. लेखमालिका बनली की लिंका काढून टाकेन. Happy

नजरअंदाज च्या जागी, नजरेआड किंवा दुर्लक्ष अशी शब्दयोजना चालली असती.
>>>
धन्स, दिनेशदा... "नजरअंदाज" हा हिंदी शब्द आहे. बदल करते लगेच!