भाषा आणि भाषांतरे - काही निरीक्षणे - भाग २/२

Submitted by दिनेश. on 28 November, 2012 - 09:57

मागील भागावरुन --

४) भाषांतरीत पुस्तके.

लोकसत्ताच्या लेखाचा आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भाषांतरीत पुस्तके. इंग्रजीमधूनच नव्हे तर जगातील सर्वच भाषांतून, मराठीत अनुवाद व्हावेत. पण जास्त भर असावा, तो भारतातीलच, इतर भाषांवर. आपल्याला फारच कमी अनुवाद वाचायला मिळतात, असे.

आता हे भाषांतर, नेहमीच समाधान देते का ? खुपदा नाहीच. जशीच्या तशी वाक्यरचना किंवा शब्दशः
भाषांतर, केल्यास खुपदा सगळे कृत्रिम वाटू लागते. पण मग थेट मराठीकरणही करता येणार नाही, कारण
मग मूळ, कलाकृतीचा आत्माच गवसत नाही.

गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या अनेक रचनांचे भाषांतर लहानपणापासून वाचतोय. खुप सुंदर कविकल्पना असतात, पण एक होतं, कि अशा भाषांतरात मूळ बंगाली शब्दांतली गेयता काही पकडता येत नाही. पण इथे शब्द्श: भाषांतराला पर्याय नाही. अशा अनेक रचना वाचल्यावर ती भाषा निदान लिपी तरी शिकावी, असे वाटायला लागले. (असे वाटणे हेच भाषांतरकाताचे यश मानावे लागेल.)

ऑथेल्लो या नाटकाचे, याच नावाने मराठीत भाषांतर झाले, मग झुंझारराव या नावाने झाले, एकच प्याला या
नाटकावर पण याची दाट छाया आहेच. पण नाटकाच्या बाबतीत, ते रंगमंचावर सादर व्हायचे असल्याने,
अनेकदा फेरविचार होतो, संवाद सहज आहेत कि नाहीत, ते तपासले जातात, पण पुस्तकाच्या बाबतीत,
तसे होत नाही का ?

मी फारच कमी, अनुवादीत पुस्तके वाचली आहेत. गॉर्कीच्या द मदर चा, अनुवाद चांगला होता, पण मला
तितकासा आवडला नव्हता. बेटी महमूदीच्या, नॉट विदाऊट माय डॉटर चा याच नावाने केलेला अनुवाद,
( बहुतेल लिना सोहोनी, चुभुद्याघ्या ) मला आवडला होता. परक्या देशातले, वातावरणही, चांगले ऊभे केले
होते. आता हे सगळे लिहिताना, मात्र दुर्दैवाने माझ्या हातात, एकच पुस्तक आहे. आणि त्याचेच संदर्भ
देत, लेखन करणे मला भाग आहे.

पुस्तकाचे नाव आहे, बाइकवरचं बिर्‍हाड, ( उपशीर्षक : पुणे ते लेह ते श्रीनगर / एका कलंदराचा प्रवास ) मूळ
लेखक, अजित हरिसिंघानी, अनुवाद : सुजाता देशमुख, अनुवादकर्तीने, श्रीमती सुजाता राय यांचे आभार
मानले आहेत.

हे पुस्तक मायबोलीच्या मुखपृष्ठावर बरेच दिवस होते, त्यामूळे ते चित्र स्मरणात होते. मॅजेस्टीक मधे गेल्यावर, ते सहज दिसले, म्हणून मी घेतले. या संपूर्ण पुस्तकातले नव्हेत तर, आरंभाच्या भागातील, काही
पानाचेच, मी दाखले देतोय.

मूळ पुस्तकाचे शीर्षक आहे, One Life to Ride. आता याचे भाषांतर, बाइकवरचे बिर्‍हाड कसे होईल ?
बिर्‍हाड या शब्दाला वेगवेगळे संदर्भ आहेत, नाटक कंपनीचे बिर्‍हाड, परगावी नोकरी करणार्‍याचे तात्पुरते
घर किंवा विंचवाचे बिर्‍हाड असाही. बाइकवरचे बिर्‍हाड, याचा थेट अर्थ लावला, तर लेखकाने, तंबूसकट
सर्व सामान बाइकवर ठेवून प्रवास केला, जागोजाग तंबूत वास्तव्य केले, जेवण शिजवले, असा मी लावला.
तर तसा कुठलाच संदर्भ पुस्तकात नाही. लेखकाने बहुतेक मुक्काम, हे घरात / हॉटेलमधेच केलेले आहेत.

पान क्र. १९ - पर्णीमला पोचताच.. संदर्भ गोव्याचा आहे. गोव्यातील बहुतेक गावांना, कोकणी आणि पोर्तुगीज उच्चारानुसार दोन नावे असतात. ( उदा. कुठ्ठाळी - कोर्तालिम, डिचोली - बिचोलिम, सांखळी - सांकलेम, पोणजी - पंजिम ) पुस्तक मराठीत असल्याने, पर्णीम हे पोर्तुगीज नाव न देता, पेडणे हे जास्त प्रचलित नाव घेणे गरजेचे होते. गोव्यातील मंडळींच्या आडनावात, खुपदा गावाचे नाव असते ( पणजीकर, म्हापसेकर, पेडणेकर, अमोणकर ) आणि हि नावे, हमखास कोकणीच असतात.

पान क्र. २० - कोपर्‍यातल्या अननसाच्या मोठ्या झाडाखाली ( बाइक ) उभी करतो. इथे तर अनुवादकर्तीने खुपच मोठी चूक केलीय. अननसाचे झाड, जमिनीलगतच वाढते. पेडण्याला कदाचित, केवड्याचे मोठे झाड असू शकेल. त्याला स्क्रू पाईन ट्री असा शब्द आहे. गोव्यात पाईनचे झाड असणे, अशक्यच.
मग लेखकाने पाईन ( आणि अनुवादकर्तीने पाईनअ‍ॅपल ) हा शब्द कुठून आणला ? केवड्याच्या झाडाला,
अननसासारखीच फळे लागतात. पण भारतात ती दुर्मिळ आहेत आणि खाल्ली जात नाहीत. जर ते बघून,
लेखकानेच पाईन अ‍ॅपल ट्री, असे लिहिले असेल, तर मात्र मूळ लेखकाचा दोष.

पान क्र. २० - कोरड्या पोळीचे तुकडे -- चपातीला पोळी म्हणण्याचे महाराष्ट्रात नवीन नाही. इथे अनेकदा, ब्राम्हण / ब्राम्हणेतर अशी विभागणी होते. किंवा काही गावांचा संदर्भ येतो. पण गोव्यात खचितच पोळी हा शब्द वापरात नाही. चपातीपेक्षाही खरे तर पाव असायची शक्यता जास्त आहे.

पान क्र. २०- काष्ठवत कुपोषित शरीर - नाही पटले.

पान क्र. २० - तिचा चेहरा स्मितानं ताणला जातो - नाही पटले.

पान क्र. २२ - गोव्याची स्थानिक दारू.. असे शब्द आहेत. त्यापुढे अराक किंवा फेणी हे शब्द नाहीत. हे दोन शब्द,
तसे मराठी वाचकांना ओळखीचे आहेत. ते हवे होते.

पान क्र २३. - माझा रंग भाजका झालेला - मला वाटतं, रंग काळवंडलेला, करपलेला जास्त नैसर्गिक वाटले असते.

पान क्र. २३, - झाडाच्या डहाळ्या २० -२५ कावळ्यांनी लहडलेल्या - मला हि वाक्यरचना, खटकली. फांद्यांवर
२०-२५ कावळे होते, असे सोपे शब्द जास्त चपखल वाटले असते.

पान क्र. २५ - मी आझर्‍याला तोवर पोचलेलो असतो. माझ्या आठवणीप्रमाणे, त्या गावाचे नाव, आजरा आहे.

पान क्र. २५ - दिवसाकाठी २० लीटर दूध देणार्‍या दुग्धोत्पादक यंत्राच्या त्या खुणावणार्‍या सणसणीत पार्श्वभागापासून.. मूळ इंग्रजी शब्द, बहुदा इन्व्हायटींग असावा, त्याचे खूणावणार्‍या असे भाषांतर करणे, तितकेसे गरजेचे नव्हते, असे मला वाटले. ( उल्लेख एका म्ह्शीबद्दल आहे. )

पान क्र. २५ - ती माझे पाय खेचतेय याची मला कल्पना आहे. हि वाक्यरचनाही, मला मराठीत, अनैसर्गिक वाटली. मस्करी करतेय, जास्त चपखल होते. पुलिंग माय लेग्ज, चे जरी भाषांतर असले, तरी असे शब्दशः भाषांतर नको होते.

पान क्र. २६ - व्याकरण म्हणजे काय याचा अद्याप गंध नसलेली ती नवजात कल्पना माझ्या कानात दोनच शब्द कुजबुजते. " जा. लडाख. ".. नाही कळलं, मला तरी !

पान क्र. २७ - माझ्या रुग्णांनी माझ्या वेळा आधीच घेऊन ठेवल्या होत्या.... हे वाक्य पण नाही पटलं. टेकन अपोंईट्मेंटस चा आणखी चांगला, अनुवाद होऊ शकला असता.

पान क्रं २६ - ई-मेल वरच्या देवाण-घेवाणीतून.. एक्स्चेंज ऑफ इमेल्स, चे मराठी भाषांतर, ईमेल वरच्या संवादातून असे जास्त समर्पक झाले असते, नाही का ?

( थोडे विषयांतर, पान क्रमांक २९ वर भारताचा नकाशा आहे. डिसेंबर २०१० च्या नकाशात, उत्तराखंड, झारखंड वगैरे हि राज्ये दाखवली नाहीत, शिवाय महाराष्ट्राचा उत्तर भागही, नीट दाखवलेला नाही.)

पान क्र. ३२ - तर छोटा पान्हा काढण्यासाठी.. माझ्या माहितीप्रमाणे, स्पॅनरला मराठी प्रतिशब्द, पाना आहे. पान्हा चा मराठीत अर्थ वेगळा आहे.

पान क्र, ३३ - जलजीवनाचा भरपूर साठा..अमराठी वाटला, हा शब्दप्रयोग.

पान क्र, ३५ - पिवळाजर्द पांगारा. पिवळा पांगारा असतो ?. एरिथ्रिना या पांगाऱ्याच्या शास्त्रीय नावातल्या शब्दाचा अर्थच, लाल रंगाचा असा आहे. बाइकवरुन अधूनमधून दिसलेला, बहावा
किंवा पळस असू शकेल. ( नेमका मूळ इंग्रजी शब्द माहीत नाही, पण पांगारा हे भाषांतर खचितच योग्य नसावे.) बहावा तितक्या संख्येने दिसत नाही आणि पळस पिवळा नसतो.

हुश्श... असे बरेच नमुने आहेत. मला वाटतं भाषांतर करताना, यापेक्षा सजगता दाखवली पाहिजे. म. वा. धोंड,
ओवीतल्या एखाद्या शब्दासाठी जेवढा धांडोळा घेतात, तेवढा या पूर्ण, पुस्तकासाठी घेतलेला दिसत नाही.

५) पाककृती..

माझ्या आवडीचा विषय. आजकाल बहुतेक नियतकालिकात, अशी सदरे असतात. अमराठी लेखकांकडून
आली असेल तर ठिकच आहे, पण कधी कधी मराठी भाषिक शेफ्स ( याला नेमका मराठी प्रतिशब्द नाहीच.
आचारी, सैपाकी म्हणणे, त्यांना आवडणार नाही. बल्लवाचार्य, हा शब्द भीमालाच शोभतो. आहारतज्ञ पण
मला योग्य वाटत नाही, पाककला तज्ञ जास्तच लांब आहे . तर असो. ) ज्या कृती देतात, त्यादेखील धड,
अनुवादीत होत नाहीत.

माझ्या अंदाजाप्रमाणे, ते शेफ्स त्यांच्या ज्यूनियर्सना हे काम सोपवत असतील, आणि नियतकालिकांतले
शिकाऊ उमेदवार हे भाषांतर करत असतील. हे भाषांतर खुपदा, हिंदीतून शब्दश: केल्यासारखेच असते.
हिंदीत, योग्य वाटणार्‍या वाक्यरचना, मराठीत खुपच खटकतात.

उदा: कढाईको धीमी आँचपर रखिये, हे हिंदीत योग्य असले तरी, कढईला सौम्य आचेवर ठेवा, हे भाषांतर
योग्य नाहीच. कढई मंद आचेवर ठेवा, जास्त स्वाभाविक वाटते. त्याला परतवा, असे पण लिहिलेले असते.
परता, परतून घ्या, सवतळा असे अनेक चांगले मराठी पर्याय आहेत.
बटाटे उकळून घ्या. ( उकडून घ्या ) आमटी उकळवा ( ठिक आहे पण कढ आणा, जास्त मराठी आहे. ) सॉटे करा ( तव्यावर परता ) हे पण असतेच.

( थोडे विषयांतर, तरला दलाल ची मातृभाषा कुठली ते माहीत नाही. ती अगदी पहिल्यांदा दूरदर्शनवर यायला
लागली, तेव्हापासून बघतोय. तिचे हिंदी बोलणे, मराठी वळणाचेच असायचे. आणि सध्या तर तिची, इंग्रजी
पुस्तके, मजेशीर वाक्यरचनांनी भरलेली असतात. भारतीय भाषांचा गंध नसलेली व्यक्ती, त्यातून अर्थ काढू
शकेल का, याची मला शंकाच वाटते. माझी एक पंजाबी शेजारीण, तिची, नमक अंदाजसे, या शब्दप्रयोगाची,
खुपच टिंगल करायची. )

मी वर उदाहरणे दिलीत, ती वेबदुनिया सारख्या मूळ हिंदीच असलेल्या संकेतस्थळावरची नाहीत, अगदी लोकप्रभातही हे नमुने दिसतात.
आपल्या मायबोलीवरच्या पाककृती मात्र खुपच चांगल्या तर्‍हेने लिहिलेल्या असतात. शिवाय बारीकशी जरी
चूक राहिली असेल, तर प्रतिसादातून, ती सुधारली जातेच.

६) घोषणा

नाही मला राजकीय घोषणा नाही लिहायच्या. या घोषणा आहेत त्या, रेल्वेस्थानक, एस्टी स्टँड, विमानतळ
वगैरे ठिकाणच्या.

पहिला मान अर्थातच, आपल्या राज्य परीवहन महामंडळाचा. बस क्रमांक छ्त्तीस चोवीस, पुणे - सातारा - कर्‍हाड मार्गे, कोल्हापूरला जाणारी गाडी, फलाट क्रमांक तीन वर लावण्यात आली आहे, या घोषणेत गेली
२५/३० वर्षे तरी बदल झालेला नाही. इथे मात्र आपला, म्हराटी बाणा. या घोषणा केवळ मराठीतूनच दिल्या
जातात. कर्नाटकातून कोल्हापूरला आलेल्या गाड्यांच्या वाहकांना, स्वतः कानडीतून कंठशोष करावा लागतो.

साधारण १९८० पासून, मुंबईच्या लोकल स्टेशनवरच्या घोषणा मराठीतून द्यायला सुरवात झाली. त्या संगणकात रेकॉर्ड केलेल्या आवाजाच्या असतात. आणि त्याचे मराठीकरण, नवल वाटावे, एवढे चांगले झालेले आहे.

मुंबईच्या सहार विमानतळावर पण उड्डाणाच्या घोषणा मराठीतून दिल्या जातात. आता तो आवाज एवढा क्षीण असतो, कि धड ऐकू पण येत नाहीत. पण आजकाल मराठीचा एक वेगळाच नमुना तिथल्या इंडीकेटर्स वर दिसत असतो.

लॅंडेड आणि डिपार्टेड यांचे हिंदी भाषांतर, जा चुकी है / आ चुकी है असे बरोबर केलेले असले तरी मराठीत मात्र
आलेली आणि गेलेली असे लिहिलेले असते. आणि ते खुपदा आ ले ली आणि गे ले ली असे दिसत असते.
आलेली / गेलेली अशी शब्दयोजना बहुदा कोकणात केली जाते. पण फ़्लाईट आणि उडान हे शब्द त्या त्या भाषेत जरी स्त्रीलिंगी असले तरी मराठीत उड्डाण आणि विमान, दोन्ही नपुसकलिंगी आहेत. त्यामूळे हे शब्द आले आहे / गेले आहे किंवा आलेले आहे / गेलेले आहे, असे हवे. अनेकवेळा तिथल्या सजेशन बॉक्स मधे असे लिहूनही, गेल्या जूनपर्यंत तरी बदल झालेला नव्हता.

७) नवे शब्द.

मागच्या भागात मी सर या शब्दाचा चुकीचा वापर नेमका कधीपासून सुरु झाला ते सांगता येत नाही, असे लिहिले
होते. पण हि दोन उदाहरणे मात्र अगदी आत्ता आत्ताची आहेत.

साधारण ४ वर्षापासून मला, जाऊयात असा शब्द लिखाणात दिसू लागला. पहिल्यांदा साप्ताहिक सकाळ मधे.
मग अवचटांच्या लेखातही, तो दिसायला लागला. इथेही खुपदा दिसतो. पण याची सुरवात नेमकी कशी
झाली, ते समजत नाही.

कारण पुर्वी असा शब्दप्रयोगच नव्हता.

झुकझुक अगिन गाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या

या गाण्यात हा "त" नाही. कडव्यात नाही आणि पुढच्या कुठल्याच ओळीत नाही. ( कोट विजारी लेऊ या,
शोभा पाहून घेऊ या, गुलाबजामन खाऊ या ) मी अनेकांना विचारून पाहिले, पण कोणीच सांगू शकले नाही.

दुसरे एक उदाहरण, ह्म्म ... हे बहुदा इंग्रजी Hmm चे भाषांतर असावे. पण मराठीत हा म्म हा उच्चार कुठे
होतो. आपला उच्चार हं असा आहे ना ? ह या वर्णाचा उच्चार गळ्यातून ( म्हणजेच जबड्याच्या कुठल्याच
भागाचा आधार न घेता होत असल्याने ) तो ओठ बंद ठेवून करता येतो. नव्हे तसाच आपण तो करतो.
पण म्हणून त्यानंतर म या औष्ठ्य वर्णाचा उच्चार कुठे करतो ?

नाही कशी म्हणू तूला, या गाण्यातही लता हं हं, असाच उच्चार करते. ( ओ निगाहे मस्ताना मधे पण आशा,
हं हं, असेच उच्चारते. ) पण याचे उत्तर मला अजून मिळालेले नाही.

समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही.
ते 'अजित पवारांनी २५ सप्टेंबरला राजिनामा दिला होता'
>>>
इब्लिस, तुम्हाला माधवी काय म्हणत आहेत ते कळलं नाही बहुदा. कुठल्याही न्युज चॅनेल वर न्युज चालू असताना खाली काही बातम्यांच्या पट्ट्या फ्लॅश होत असतात. किंवा काही वेळा ठॅश ठॅश असे म्युझि वाजवून ठासून बोललेल्या शब्दांत बातमीची एखादी ओळ प्रसारित करत असतात. तेव्हा ती ओळ बातमीदाराच्या आवाजात इमॅजिन करा. (आवाजाचा टोन वगैरे.)) "अमुक अमुक ह्यांनी दिला होता राजीनामा..." असे म्हणायचे असताना "अमुक अमुक ह्यांनी दिलेला राजीनामा..." असे लिहिलेले असते किंवा बातमीदार चुकीचे बोलतात. थोडक्यात दिले होते चे दिलेले असे चुकीचे रुप वापरले जाते. माधवी तिकडे लक्ष वेधत आहेत. आणि कर्ता, कर्म क्रियापद ह्यांचा क्रम मुद्दामहून बदलला जातो कारण ती बातमी/ ते वाक्य ठाशीव करण्यासाठी! कळलं का? Uhoh म्हणजे मला नीट सांगता आलंय का? Uhoh

(माधवी ह्यांचा प्रतिसाद वाचून आधी माझाही गैरसमज झाला होता. पण मी वरील अर्थ लावला आहे.)

हो निंबुडा. बातमी ठाशीव करण्यासाठी असे करत असावेत. हा प्रकार बोलीभाषेत, खास करुन कोकणात केला जातो. उदा. जिभेला हाडच नाही.. आणि मग एक त्या व्यक्तीला उद्देशून नाव न घेता शिवी दिली जाते.
म्हणजे कर्म, शेवटी येते.

चॅनेलवाले, गुगल ट्रान्स्लेटर वापरत असतील काय ? मग तर आनंदच आहे.

माधवीचा मुद्दा मात्र, दिलेला आणि दिला होता असा वाटतोय. आलेला / गेलेला हा पण कोकणातलाच वाक्प्रचार आहे.

साधारण चिपळूण ते मालवण असा शब्दप्रयोग करतात. असला काय तां आमी कदी बघितलेला नाय.

आपण, आम्ही काय बघितले नाही. असे म्हणू. कोल्हापूरात मी कुटं बघायलोय ?असे म्हणतील

दिनेश....

"डांबरट", "डॅम्बिस", "आलबेल" आदीसारख्या सर्वमान्य शब्दांनी खरे तर भाषा समृद्धच होत असते. परकीयांशी तसेच शेजारील प्रदेशाच्या लोकांशी तसेच संस्कृतीशी संबंध वाढले की मग साहजिकच आपल्या भाषेत नवनवीन शब्दांची भर पडते.... त्याची इतकी सवय होऊन जाते की आजच्या घडीला शाळेत महाविद्यालयाते शिकणार्‍या मुलामुलींना हे शब्द मूळ मराठी भाषेतील नाहीत हे पटणारच नाही.

उदा. 'मटण'. किती मुलांना [तसेच अगदी सीनिअर्सनासुद्धा] समजत असेल की 'मटण' हा शब्द इंग्रजी भाषेतील आहे ? खाटक्याच्या दुकानात कुणीही '१ किलो मांस द्या' असे म्हणत नाही. 'चिकन' हे नामही असेच मराठी म्हणूनच रुळले आहे.

पोस्ट, एस.टी., टेबल्,पेपर, सर, मॅडम, डॉक्टर, इन्जेक्शन, शर्ट, पॅन्ट....आदी नित्य वापरातील ही नामे मूळ इंग्रजीतील असूनही ती वाचणार्‍याला, लिहिणार्‍याला, बोलणार्‍याला 'मराठी' च आहेत असे वाटते. याला कारण भाषेने हे सिद्ध केले आहे की, कमाल वापराचा तो एक फायदाच होय. यामुळे आपल्याच भाषेतील शब्दसंपत्ती समृद्ध होत जाते असेच मी म्हणेन.

इंग्रजाबरोबरच पोर्तुगीज, फ्रेन्च, मुघल अशा बाहेरच्यानी इथे शेकडो वर्षे राज्य केल्याने मग त्या भाषेतील काही विशिष्ट शब्दांना इथे 'मराठी' चे रुप प्राप्त झाल्याचे दिसत्ये.

उदा. पगार, तंबाखू आणि बटाटा ही नामे पोर्तुगीज भाषेतील तर फारशीतून गुन्हेगार, कामगार, सामान, हकीकत, आणि अरबीतून साहेब, मालक, अर्ज, हुकूम असे काही नमुने वानगीदाखल देता येतील. या उदाहरणांतील एकही शब्द मूळचा मराठी नाही हे सत्य पचनी पडणे कठीण जाते.

प्रश्न असतो तो भाषेची मोडतोड करण्याचा....ज्याचा उल्लेख तुम्ही त्या दूरदर्शन आकाशवाणी प्रांगणातून होत असल्याचा केला आहेच. स्टेशन डायरेक्टर्स बहुधा परराज्यातीलच असल्याने तेही कुठल्यातरी असिस्टंटवर बातम्यांची बांधणीची जबाबदारी टाकत असतात....सादरीकरणाच्या मानधनावर बातम्या तसेच कार्यक्रम देणार्‍यांनाही 'भाषेची समृद्धी' यात काही गम्य नसतेच.

परवाच मिर्ची एफ.एम. बॅण्डवर मिनिटामिनिटाला पिटपिट करणारी निवेदिका वदली....."आता ऐका हे गाणे - 'जीवनात ही घडी अशीच राहू दे !..... गाण्याला स्वरसाज चढविला आहे यशवंत देव यानी तर संगीत दिले आहे यशवंत देव यानी...."

काय बोलायचे या अगाध ज्ञानाबाबतीत ?

दिनेशदा, लेखातल्या शुद्धलेखनाच्या अनेक चुका टोचत आहेत. कृपया सुधाराल का?

सहजच :
वृत्तनिवेदक कसे बोलतात अशी चर्चा झाली होती परवा, त्यावरुन आठवले.
एका मराठी वाहिनीवरिल कुकरी शो मधे निवेदिकेने शेफला विचारले
'तुम्हाला जेवण करण्याची आवड कधीपासुन आहे?' Lol

Pages