भाषा आणि भाषांतरे - काही निरीक्षणे - भाग २/२

Submitted by दिनेश. on 28 November, 2012 - 09:57

मागील भागावरुन --

४) भाषांतरीत पुस्तके.

लोकसत्ताच्या लेखाचा आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भाषांतरीत पुस्तके. इंग्रजीमधूनच नव्हे तर जगातील सर्वच भाषांतून, मराठीत अनुवाद व्हावेत. पण जास्त भर असावा, तो भारतातीलच, इतर भाषांवर. आपल्याला फारच कमी अनुवाद वाचायला मिळतात, असे.

आता हे भाषांतर, नेहमीच समाधान देते का ? खुपदा नाहीच. जशीच्या तशी वाक्यरचना किंवा शब्दशः
भाषांतर, केल्यास खुपदा सगळे कृत्रिम वाटू लागते. पण मग थेट मराठीकरणही करता येणार नाही, कारण
मग मूळ, कलाकृतीचा आत्माच गवसत नाही.

गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या अनेक रचनांचे भाषांतर लहानपणापासून वाचतोय. खुप सुंदर कविकल्पना असतात, पण एक होतं, कि अशा भाषांतरात मूळ बंगाली शब्दांतली गेयता काही पकडता येत नाही. पण इथे शब्द्श: भाषांतराला पर्याय नाही. अशा अनेक रचना वाचल्यावर ती भाषा निदान लिपी तरी शिकावी, असे वाटायला लागले. (असे वाटणे हेच भाषांतरकाताचे यश मानावे लागेल.)

ऑथेल्लो या नाटकाचे, याच नावाने मराठीत भाषांतर झाले, मग झुंझारराव या नावाने झाले, एकच प्याला या
नाटकावर पण याची दाट छाया आहेच. पण नाटकाच्या बाबतीत, ते रंगमंचावर सादर व्हायचे असल्याने,
अनेकदा फेरविचार होतो, संवाद सहज आहेत कि नाहीत, ते तपासले जातात, पण पुस्तकाच्या बाबतीत,
तसे होत नाही का ?

मी फारच कमी, अनुवादीत पुस्तके वाचली आहेत. गॉर्कीच्या द मदर चा, अनुवाद चांगला होता, पण मला
तितकासा आवडला नव्हता. बेटी महमूदीच्या, नॉट विदाऊट माय डॉटर चा याच नावाने केलेला अनुवाद,
( बहुतेल लिना सोहोनी, चुभुद्याघ्या ) मला आवडला होता. परक्या देशातले, वातावरणही, चांगले ऊभे केले
होते. आता हे सगळे लिहिताना, मात्र दुर्दैवाने माझ्या हातात, एकच पुस्तक आहे. आणि त्याचेच संदर्भ
देत, लेखन करणे मला भाग आहे.

पुस्तकाचे नाव आहे, बाइकवरचं बिर्‍हाड, ( उपशीर्षक : पुणे ते लेह ते श्रीनगर / एका कलंदराचा प्रवास ) मूळ
लेखक, अजित हरिसिंघानी, अनुवाद : सुजाता देशमुख, अनुवादकर्तीने, श्रीमती सुजाता राय यांचे आभार
मानले आहेत.

हे पुस्तक मायबोलीच्या मुखपृष्ठावर बरेच दिवस होते, त्यामूळे ते चित्र स्मरणात होते. मॅजेस्टीक मधे गेल्यावर, ते सहज दिसले, म्हणून मी घेतले. या संपूर्ण पुस्तकातले नव्हेत तर, आरंभाच्या भागातील, काही
पानाचेच, मी दाखले देतोय.

मूळ पुस्तकाचे शीर्षक आहे, One Life to Ride. आता याचे भाषांतर, बाइकवरचे बिर्‍हाड कसे होईल ?
बिर्‍हाड या शब्दाला वेगवेगळे संदर्भ आहेत, नाटक कंपनीचे बिर्‍हाड, परगावी नोकरी करणार्‍याचे तात्पुरते
घर किंवा विंचवाचे बिर्‍हाड असाही. बाइकवरचे बिर्‍हाड, याचा थेट अर्थ लावला, तर लेखकाने, तंबूसकट
सर्व सामान बाइकवर ठेवून प्रवास केला, जागोजाग तंबूत वास्तव्य केले, जेवण शिजवले, असा मी लावला.
तर तसा कुठलाच संदर्भ पुस्तकात नाही. लेखकाने बहुतेक मुक्काम, हे घरात / हॉटेलमधेच केलेले आहेत.

पान क्र. १९ - पर्णीमला पोचताच.. संदर्भ गोव्याचा आहे. गोव्यातील बहुतेक गावांना, कोकणी आणि पोर्तुगीज उच्चारानुसार दोन नावे असतात. ( उदा. कुठ्ठाळी - कोर्तालिम, डिचोली - बिचोलिम, सांखळी - सांकलेम, पोणजी - पंजिम ) पुस्तक मराठीत असल्याने, पर्णीम हे पोर्तुगीज नाव न देता, पेडणे हे जास्त प्रचलित नाव घेणे गरजेचे होते. गोव्यातील मंडळींच्या आडनावात, खुपदा गावाचे नाव असते ( पणजीकर, म्हापसेकर, पेडणेकर, अमोणकर ) आणि हि नावे, हमखास कोकणीच असतात.

पान क्र. २० - कोपर्‍यातल्या अननसाच्या मोठ्या झाडाखाली ( बाइक ) उभी करतो. इथे तर अनुवादकर्तीने खुपच मोठी चूक केलीय. अननसाचे झाड, जमिनीलगतच वाढते. पेडण्याला कदाचित, केवड्याचे मोठे झाड असू शकेल. त्याला स्क्रू पाईन ट्री असा शब्द आहे. गोव्यात पाईनचे झाड असणे, अशक्यच.
मग लेखकाने पाईन ( आणि अनुवादकर्तीने पाईनअ‍ॅपल ) हा शब्द कुठून आणला ? केवड्याच्या झाडाला,
अननसासारखीच फळे लागतात. पण भारतात ती दुर्मिळ आहेत आणि खाल्ली जात नाहीत. जर ते बघून,
लेखकानेच पाईन अ‍ॅपल ट्री, असे लिहिले असेल, तर मात्र मूळ लेखकाचा दोष.

पान क्र. २० - कोरड्या पोळीचे तुकडे -- चपातीला पोळी म्हणण्याचे महाराष्ट्रात नवीन नाही. इथे अनेकदा, ब्राम्हण / ब्राम्हणेतर अशी विभागणी होते. किंवा काही गावांचा संदर्भ येतो. पण गोव्यात खचितच पोळी हा शब्द वापरात नाही. चपातीपेक्षाही खरे तर पाव असायची शक्यता जास्त आहे.

पान क्र. २०- काष्ठवत कुपोषित शरीर - नाही पटले.

पान क्र. २० - तिचा चेहरा स्मितानं ताणला जातो - नाही पटले.

पान क्र. २२ - गोव्याची स्थानिक दारू.. असे शब्द आहेत. त्यापुढे अराक किंवा फेणी हे शब्द नाहीत. हे दोन शब्द,
तसे मराठी वाचकांना ओळखीचे आहेत. ते हवे होते.

पान क्र २३. - माझा रंग भाजका झालेला - मला वाटतं, रंग काळवंडलेला, करपलेला जास्त नैसर्गिक वाटले असते.

पान क्र. २३, - झाडाच्या डहाळ्या २० -२५ कावळ्यांनी लहडलेल्या - मला हि वाक्यरचना, खटकली. फांद्यांवर
२०-२५ कावळे होते, असे सोपे शब्द जास्त चपखल वाटले असते.

पान क्र. २५ - मी आझर्‍याला तोवर पोचलेलो असतो. माझ्या आठवणीप्रमाणे, त्या गावाचे नाव, आजरा आहे.

पान क्र. २५ - दिवसाकाठी २० लीटर दूध देणार्‍या दुग्धोत्पादक यंत्राच्या त्या खुणावणार्‍या सणसणीत पार्श्वभागापासून.. मूळ इंग्रजी शब्द, बहुदा इन्व्हायटींग असावा, त्याचे खूणावणार्‍या असे भाषांतर करणे, तितकेसे गरजेचे नव्हते, असे मला वाटले. ( उल्लेख एका म्ह्शीबद्दल आहे. )

पान क्र. २५ - ती माझे पाय खेचतेय याची मला कल्पना आहे. हि वाक्यरचनाही, मला मराठीत, अनैसर्गिक वाटली. मस्करी करतेय, जास्त चपखल होते. पुलिंग माय लेग्ज, चे जरी भाषांतर असले, तरी असे शब्दशः भाषांतर नको होते.

पान क्र. २६ - व्याकरण म्हणजे काय याचा अद्याप गंध नसलेली ती नवजात कल्पना माझ्या कानात दोनच शब्द कुजबुजते. " जा. लडाख. ".. नाही कळलं, मला तरी !

पान क्र. २७ - माझ्या रुग्णांनी माझ्या वेळा आधीच घेऊन ठेवल्या होत्या.... हे वाक्य पण नाही पटलं. टेकन अपोंईट्मेंटस चा आणखी चांगला, अनुवाद होऊ शकला असता.

पान क्रं २६ - ई-मेल वरच्या देवाण-घेवाणीतून.. एक्स्चेंज ऑफ इमेल्स, चे मराठी भाषांतर, ईमेल वरच्या संवादातून असे जास्त समर्पक झाले असते, नाही का ?

( थोडे विषयांतर, पान क्रमांक २९ वर भारताचा नकाशा आहे. डिसेंबर २०१० च्या नकाशात, उत्तराखंड, झारखंड वगैरे हि राज्ये दाखवली नाहीत, शिवाय महाराष्ट्राचा उत्तर भागही, नीट दाखवलेला नाही.)

पान क्र. ३२ - तर छोटा पान्हा काढण्यासाठी.. माझ्या माहितीप्रमाणे, स्पॅनरला मराठी प्रतिशब्द, पाना आहे. पान्हा चा मराठीत अर्थ वेगळा आहे.

पान क्र, ३३ - जलजीवनाचा भरपूर साठा..अमराठी वाटला, हा शब्दप्रयोग.

पान क्र, ३५ - पिवळाजर्द पांगारा. पिवळा पांगारा असतो ?. एरिथ्रिना या पांगाऱ्याच्या शास्त्रीय नावातल्या शब्दाचा अर्थच, लाल रंगाचा असा आहे. बाइकवरुन अधूनमधून दिसलेला, बहावा
किंवा पळस असू शकेल. ( नेमका मूळ इंग्रजी शब्द माहीत नाही, पण पांगारा हे भाषांतर खचितच योग्य नसावे.) बहावा तितक्या संख्येने दिसत नाही आणि पळस पिवळा नसतो.

हुश्श... असे बरेच नमुने आहेत. मला वाटतं भाषांतर करताना, यापेक्षा सजगता दाखवली पाहिजे. म. वा. धोंड,
ओवीतल्या एखाद्या शब्दासाठी जेवढा धांडोळा घेतात, तेवढा या पूर्ण, पुस्तकासाठी घेतलेला दिसत नाही.

५) पाककृती..

माझ्या आवडीचा विषय. आजकाल बहुतेक नियतकालिकात, अशी सदरे असतात. अमराठी लेखकांकडून
आली असेल तर ठिकच आहे, पण कधी कधी मराठी भाषिक शेफ्स ( याला नेमका मराठी प्रतिशब्द नाहीच.
आचारी, सैपाकी म्हणणे, त्यांना आवडणार नाही. बल्लवाचार्य, हा शब्द भीमालाच शोभतो. आहारतज्ञ पण
मला योग्य वाटत नाही, पाककला तज्ञ जास्तच लांब आहे . तर असो. ) ज्या कृती देतात, त्यादेखील धड,
अनुवादीत होत नाहीत.

माझ्या अंदाजाप्रमाणे, ते शेफ्स त्यांच्या ज्यूनियर्सना हे काम सोपवत असतील, आणि नियतकालिकांतले
शिकाऊ उमेदवार हे भाषांतर करत असतील. हे भाषांतर खुपदा, हिंदीतून शब्दश: केल्यासारखेच असते.
हिंदीत, योग्य वाटणार्‍या वाक्यरचना, मराठीत खुपच खटकतात.

उदा: कढाईको धीमी आँचपर रखिये, हे हिंदीत योग्य असले तरी, कढईला सौम्य आचेवर ठेवा, हे भाषांतर
योग्य नाहीच. कढई मंद आचेवर ठेवा, जास्त स्वाभाविक वाटते. त्याला परतवा, असे पण लिहिलेले असते.
परता, परतून घ्या, सवतळा असे अनेक चांगले मराठी पर्याय आहेत.
बटाटे उकळून घ्या. ( उकडून घ्या ) आमटी उकळवा ( ठिक आहे पण कढ आणा, जास्त मराठी आहे. ) सॉटे करा ( तव्यावर परता ) हे पण असतेच.

( थोडे विषयांतर, तरला दलाल ची मातृभाषा कुठली ते माहीत नाही. ती अगदी पहिल्यांदा दूरदर्शनवर यायला
लागली, तेव्हापासून बघतोय. तिचे हिंदी बोलणे, मराठी वळणाचेच असायचे. आणि सध्या तर तिची, इंग्रजी
पुस्तके, मजेशीर वाक्यरचनांनी भरलेली असतात. भारतीय भाषांचा गंध नसलेली व्यक्ती, त्यातून अर्थ काढू
शकेल का, याची मला शंकाच वाटते. माझी एक पंजाबी शेजारीण, तिची, नमक अंदाजसे, या शब्दप्रयोगाची,
खुपच टिंगल करायची. )

मी वर उदाहरणे दिलीत, ती वेबदुनिया सारख्या मूळ हिंदीच असलेल्या संकेतस्थळावरची नाहीत, अगदी लोकप्रभातही हे नमुने दिसतात.
आपल्या मायबोलीवरच्या पाककृती मात्र खुपच चांगल्या तर्‍हेने लिहिलेल्या असतात. शिवाय बारीकशी जरी
चूक राहिली असेल, तर प्रतिसादातून, ती सुधारली जातेच.

६) घोषणा

नाही मला राजकीय घोषणा नाही लिहायच्या. या घोषणा आहेत त्या, रेल्वेस्थानक, एस्टी स्टँड, विमानतळ
वगैरे ठिकाणच्या.

पहिला मान अर्थातच, आपल्या राज्य परीवहन महामंडळाचा. बस क्रमांक छ्त्तीस चोवीस, पुणे - सातारा - कर्‍हाड मार्गे, कोल्हापूरला जाणारी गाडी, फलाट क्रमांक तीन वर लावण्यात आली आहे, या घोषणेत गेली
२५/३० वर्षे तरी बदल झालेला नाही. इथे मात्र आपला, म्हराटी बाणा. या घोषणा केवळ मराठीतूनच दिल्या
जातात. कर्नाटकातून कोल्हापूरला आलेल्या गाड्यांच्या वाहकांना, स्वतः कानडीतून कंठशोष करावा लागतो.

साधारण १९८० पासून, मुंबईच्या लोकल स्टेशनवरच्या घोषणा मराठीतून द्यायला सुरवात झाली. त्या संगणकात रेकॉर्ड केलेल्या आवाजाच्या असतात. आणि त्याचे मराठीकरण, नवल वाटावे, एवढे चांगले झालेले आहे.

मुंबईच्या सहार विमानतळावर पण उड्डाणाच्या घोषणा मराठीतून दिल्या जातात. आता तो आवाज एवढा क्षीण असतो, कि धड ऐकू पण येत नाहीत. पण आजकाल मराठीचा एक वेगळाच नमुना तिथल्या इंडीकेटर्स वर दिसत असतो.

लॅंडेड आणि डिपार्टेड यांचे हिंदी भाषांतर, जा चुकी है / आ चुकी है असे बरोबर केलेले असले तरी मराठीत मात्र
आलेली आणि गेलेली असे लिहिलेले असते. आणि ते खुपदा आ ले ली आणि गे ले ली असे दिसत असते.
आलेली / गेलेली अशी शब्दयोजना बहुदा कोकणात केली जाते. पण फ़्लाईट आणि उडान हे शब्द त्या त्या भाषेत जरी स्त्रीलिंगी असले तरी मराठीत उड्डाण आणि विमान, दोन्ही नपुसकलिंगी आहेत. त्यामूळे हे शब्द आले आहे / गेले आहे किंवा आलेले आहे / गेलेले आहे, असे हवे. अनेकवेळा तिथल्या सजेशन बॉक्स मधे असे लिहूनही, गेल्या जूनपर्यंत तरी बदल झालेला नव्हता.

७) नवे शब्द.

मागच्या भागात मी सर या शब्दाचा चुकीचा वापर नेमका कधीपासून सुरु झाला ते सांगता येत नाही, असे लिहिले
होते. पण हि दोन उदाहरणे मात्र अगदी आत्ता आत्ताची आहेत.

साधारण ४ वर्षापासून मला, जाऊयात असा शब्द लिखाणात दिसू लागला. पहिल्यांदा साप्ताहिक सकाळ मधे.
मग अवचटांच्या लेखातही, तो दिसायला लागला. इथेही खुपदा दिसतो. पण याची सुरवात नेमकी कशी
झाली, ते समजत नाही.

कारण पुर्वी असा शब्दप्रयोगच नव्हता.

झुकझुक अगिन गाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या

या गाण्यात हा "त" नाही. कडव्यात नाही आणि पुढच्या कुठल्याच ओळीत नाही. ( कोट विजारी लेऊ या,
शोभा पाहून घेऊ या, गुलाबजामन खाऊ या ) मी अनेकांना विचारून पाहिले, पण कोणीच सांगू शकले नाही.

दुसरे एक उदाहरण, ह्म्म ... हे बहुदा इंग्रजी Hmm चे भाषांतर असावे. पण मराठीत हा म्म हा उच्चार कुठे
होतो. आपला उच्चार हं असा आहे ना ? ह या वर्णाचा उच्चार गळ्यातून ( म्हणजेच जबड्याच्या कुठल्याच
भागाचा आधार न घेता होत असल्याने ) तो ओठ बंद ठेवून करता येतो. नव्हे तसाच आपण तो करतो.
पण म्हणून त्यानंतर म या औष्ठ्य वर्णाचा उच्चार कुठे करतो ?

नाही कशी म्हणू तूला, या गाण्यातही लता हं हं, असाच उच्चार करते. ( ओ निगाहे मस्ताना मधे पण आशा,
हं हं, असेच उच्चारते. ) पण याचे उत्तर मला अजून मिळालेले नाही.

समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहित्यिक भाष्हा आणि माहिती देवाणघेवाणीची भाष्हा असे दोन प्रकार पडले आहेत.. माहिती देवाणघेवाणीची भाष जास्त महत्वाची बनलेली आहे.. शाळेतही हल्ली तीच शिकवतात... पूर्वी माझा आवडता ऋतु वगैरे निबंध लिवायला लागायचे... आजकालचे प्रश्न... दिवाळी सेलसाठी कपड्याच्या दुकानाच्या जाहिरातीचे पंप्लेट तयार करा... असले प्रश्न असतात. त्यातून असली भाष्हा रुळत चालली आहे.

सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एस एम एस कसा लिहावा यावर धडा आहे. प्रश्न असतो - मी संध्याकाळपूर्वी तुला भेटतो हे एस एम एस ने कसे कळवाल?

पोरे उत्तर लिवतात .. I meet U b 4 eve

असे लिवले तरच उत्तर बरोबर!!!!!! Proud व्यवस्थीत लिवले तर शून्य मार्क! Biggrin

दिनेशदा, छान चाललीये मालिका.

जाऊयात असा शब्द लिखाणात दिसू लागला. >>
मलाही शालेय जीवनात एका जवळच्या मैत्रिणीच्या तोंडात वारंवार येणार्‍या ह्या शब्दाने चकित केले होते. आता हा शब्द सर्रास कित्येकांच्या तोंडी ऐकला आहे. कदाचित माझ्याही तोंडात येतच असेल.

अजून एक गोष्ट खूप दिवसांपासून मांडायची/ विचारायची होती. नक्की कुठे लिहू समजत नव्हते. राजस साठी बर्‍याचदा मराठी गाण्यांच्या सीडीज, डीव्हीडीज (दृक/ श्राव्य दोन्ही) आणल्या जातात. नुसते कव्हर पाहून समजत नाही की त्यात अंतर्भूत केलेली गाणी ओरिजिनल असतील की दुसर्‍याच गायकांनी गायलेली असतील. माझ्या लहानपणी माझ्या आईने सर्व प्रचलित बडबडगीते एका कॅसेटवर रेकॉर्ड करून घेतली होती. सर्व ओरिजिनल! त्यामुळे डुप्लिकेट गाणे कानांना लगेच खटकते. बरे नुसते दुसर्‍याच्या आवाजात आहे असे नाही तर काही शब्दही बदललेले असतात. Uhoh

झुकझुक अगिन गाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या

इथे रेघा ऐवजी रेषा केले आहे चक्क माझ्याकडे असलेल्या एका अ‍ॅनिमेटेड गाण्यात! Sad
तसेच "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला.." ह्या गाण्यात ती गायिका पुढील शब्द गातेय जे चुकीचे आहेतः

चांदीच्या झाडामागे चांदोबा रहातो
छोट्याश्या फुलाशी लपाछपी खेळतो गं लपाछपी खेळतो

वास्तविक ते "मोत्याच्या फुलातून..." असे आहे.... गाण्यात आकाशात अ‍ॅनिमेटेड फुलामागून अ‍ॅनिमेटेड चंद्र डोकावतानाचे दृश्यही घातलेय. Sad

निंबुडा, हे मला नवलाचे.
गाण्याचे गायक बदलतात पण शब्दही !! Sad

ही सर्व गाणी अगदी त्यातल्या म्यूझिक पीसेस सकट तोंडपाठ आहेत. जरा कुठे बदल झाला, तर लगेच कळतो.

गाण्याचे गायक बदलतात पण शब्दही !! >>>
हो ना. Sad

नुसतेच शब्द नाही. तर "झुकझुक अगिन गाडी" आणि "ससा तो ससा की कापूस जसा" ह्या दोन गाण्यांमध्ये चालही थोडीफार बदललेली लगेच लक्षात येते. Sad
मजा जाते गाणी ऐकण्याची!

आकाशवाणीकडे ती सगळी गाणी आहेत. आता डिजीटल केली आहेत. त्यांना विनंती केली तर ऐकवतात.
मागच्या भागातले, आज मिलनकी रात है, तर केवळ आकाशवाणीकडेच आहे. नेटवर दिसत नाही.

( लता आणि सुधीर फडके यांचे, त्याच चित्रपटातले, जाते कूणीकडे, सखे सांग ना, हे पण त्याच चालीवर हिंदीत आहे. याच दोघांनी गायलेय. पडद्यावर हेलन आणि गोपीकृष्ण आहेत बहुतेक.)

छान लेख दिनेशदा..
अजून एक : 'मला हे करू दे' ऐवजी 'करुन देत, खाऊन देत, पिऊन देत... जाऊन देत.. वैगरे" हे पण खूप खटकतं कानाला...

दोन्ही लेख मस्तच!
भाषांतर वाले इंग्रजी तून मराठी मधे करताना फार घोळ घालतात. त्यामुळे अनुवाद वाचाताना मनःशांती बिघडू शकते.

मूळ लेखात लिहायचे राहिले कारण याला भाषांतर नाही म्हणता येणार पण पुर्वी क्रिकेटचे धावते समालोचन ( रनिंग कॉमेंट्री ) मराठीतून असायची. त्यातल्या समालोचकांनी आणि क्रिडापत्रकारांनी अफलातून मराठी शब्द शोधून काढले होते.

धाव, धावचित, त्रिफळा, त्रिफळाचित, यष्टी, यष्टीरक्षक, शतक, षटक, चोरटी धाव, सीमापार.. असे अनेक शब्द आमच्याही बोलण्यात रुळले होते. पुढे ते शब्द विस्मरणात गेले. पण असा प्रयत्न बाकिच्या क्षेत्रात यशस्वी नाही
होऊ शकला. संगणक क्षेत्रातही, नाही.

या क्षेत्रात एक प्रॉब्लेम आहे, फ्लॉपी चा प्रतिशब्द रुळवायचा तर तोपर्यंत फ्लॅश ड्राईव्ह आलेला असतो.

दिनेश....

काही कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त असल्याने हा दुसरा भाग बोर्डावर आल्याक्षणीच नीटपणे वाचू शकलो नव्हतो. त्यामुळे तात्काळ प्रतिक्रियाही देणे योग्य वाटले नव्हते. पण असो, आता पहिला आणि दुसरा असे दोन्ही भाग पूर्णपणे वाचले आणि 'भाषा' आणि 'भाषेची विविधता' तुम्ही किती नेमकेपणे टिपली आहे याची जाणीव झाली.

गेल्या काही वर्षात 'भाषांतर' साहित्याचा जो पूर आला आहे [त्यातही अर्थात धंद्यावर नजर ठेवून केलेले इंग्रजी लोकप्रिय कादंबर्‍यांचे अनुवाद, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशस्वी उद्योजकांची लिहिलेली वा घोस्ट रायटरकडून लिहून घेतलेली आत्मचरित्रे यांची मांदियाळी मराठीत वाढलेली दिसते] त्याचा परिणाम असा झाला की, अमुक एका लेखकाची जोवरी बाजारात नामचलती नाममहिमा आहे तोपर्यंतच त्याची साहित्य कलाकृती भाषांतरीत करण्यात 'आर्थिक' अर्थ असतो हे सूत्र प्रकाशकांनी ध्यानी धरल्याने हाताशी असलेल्या 'अनुवादक' यादीतील मोकळ्या असलेल्या श्री. वा श्रीमती यांच्याकडून अगदी मानेवर बसून अनुवादाची भट्टी लावली जाते. त्यामुळे झाले आहे असे की, चटपटीत खमंग वाचणे याची भूक असलेल्या वाचकाला 'अनुवादात काहीतरी भाषेसंबंधी खटकत आहे' असे वाटेनासेच झाले आहे, असे चित्र मी येथील स्थानिक नगर वाचनमंदिरातील सदस्यांच्या मतांच्या अनुषंगाने सांगू शकतो.

६० आणि ७० च्या दशकात सर्वश्री जी.ए.कुलकर्णी, पु.ल.देशपांडे, श्री.ज.जोशी, राम पटवर्धन, भा.द.खेर आदी नामवंतांनी इंग्रजीतील दर्जेदार साहित्यांचे मराठी भाषांतर करून एकप्रकारे मराठी वाचकांची त्या साहित्यांबाबतची भूक भागवली होती असेच म्हणावे लागेल. मुळात या लेखकांची नावेच, त्यांच्या लेखन प्रतिभेमुळे इतकी आपलीशी वाटत होती की त्यानी भाषांतरासाठी स्वीकारलेली कलाकृती ही 'क्लासिक' गटातीलच असणार याची मनोमनी खात्री पटलेली असायची.

"बाईकवरचं बिर्‍हाड" मधील तुम्ही दिलेली उदाहरणे वाचताक्षणीच जर तुम्हाला मला तसेच तिसर्‍या वाचकाला खटकतात, तर मग ज्या प्रकाशकांने ते सादर केले आहे त्याच्याकडे असलेल्या टीमपैकी एकालाही ते खटकले नसेल ? [मला असे काही प्रकाशक माहीत आहेत की ज्यांच्या पदरी विद्यापीठ पातळीवरील भाषेचे प्राध्यापक मानधन तत्वावर केवळ याच कामासाठी नेमस्त केलेले आहेत. ही प्रा. मंडळी स्वतः अनुवाद करीत नाहीत मात्र समोर आलेल्या अनुवादाच्या बंडलावर आपले 'योग्य/अयोग्य' मत जरूर देत असतात.....प्रत्येक पानावर प्रा. महोदयांची झालेले भाषांतर 'योग्य' आहे किंवा नाही त्याबद्दल स्वाक्षरी असते...हे मी पाहिले आहे. म्हणजेच हाच नियम देशमुखबाईंच्या अनुवादाला लावायचा झाल्यास संबंधित प्रकाशकाने प्रसिद्धीपूर्वी ते लिखाण एखाद्या भाषा प्राध्यापकाकडून मंजूर करून घेतले की नाही ? हा प्रश्न उभा राहतो....आणि ज्याअर्थी तुम्ही वानगीदाखल दर्शविलेल्या पुस्तकातील वाक्यांचा विचार केल्यास, तसे 'दाखविणे' झालेच नाही असे म्हणावे लागेल.

ही उदासीनता भाषावृद्धीला मारक ठरू शकते.

शब्दरचना मनाला मोहिनी घालणारे हुकमी सामर्थ्य असून ते हरेक प्रकारचे मायाजाल उभे करू शकण्यास समर्थ असते. पण 'आले आहे काम तर करून टाकू या...' या वृत्तीने ते हाती घेतले तर पैठणीचे पारोसे व्हायला वेळ लागत नाही.

अशोक पाटील

अशोक,

सतत अशी भाषा वाचनात आल्यावर / कानावर पडल्यावर मग मुले पण असेच बोलायला लागतात. भाषा सुधारावी हे मान्य, पण अशी नको !

दिनेशदा प्लीज विपू पहाल का जरा..... जरा विस्कळीत आहे , टाईपिन्ग चुका भरपूरय्त पण एडिटची सोय नसते ना राव तिथे
सॉरी

माझे शन्का निरसन कराच प्लीज
-वैवकु

हल्ली मोठ्या व प्रमुख वृत्तपत्रांतही "अमुक आदेश जारी केला गेला" अश्या प्रकारचे वाक्ये वाचायला मिळतात. हिंदीत "यह आदेश जारी कर दिया गया है|" चे शब्दशळ भाषांतर वाटते हे मला. जारी हा शब्द मराठी आहे का?

लागू केला गेला / अंमलात आला / आणला गेला जास्त योग्य ठरेल. आधी आदेश बद्दल पण मला शंका आहे. पण सर्कारी शब्द आहे ना तो. आदेश आणि अध्यादेश मधे काय फरक ? सूक्ष्म फरक नक्कीच असणार.

"विमोचन" पण सर्रास वापरतात.

बहाल करणे याबद्दल तशीच गम्मत आहे. हिंदी अन मराठी अर्थांतली.

आदेश म्हणजे ऑर्डर.
अध्यादेश म्हणजे डायरेक्टिव्ह.

आदेश एका व्यक्तीस स्पेसिफिक लागू होतो. की तुम्हाला उद्यापासून ठाणे येथे रुजू होण्याचा आदेश देण्यात येत आहे. अध्यादेश हा अमुक परिस्थितीत तमूक गोष्टी कराव्यात असा असतो. उदा. शासनाच्या अध्यादेशानुसार उद्यापासून भाजीवरील अडत ८ % वरून ६% करण्यात आलेली आहे.

डॉक्टर....

थोडासा बदल करणे गरजेचे आहे.

१. आदेश = ऑर्डर. बरोबर. दिलेले उदाहरणही योग्य.
पण
२. अध्यादेश = डायरेक्टिव्ह नव्हे तर ऑर्डिनन्स. तुम्ही दिलेले अडत टक्केवारीचे उदाहरण चपखल आहे ऑर्डिनन्ससाठी, कारण रेव्हेन्यू वाढविण्यासाठी सरकार विधिमंडळाच्या पूर्वपरवानगीशिवायही असा अध्यादेश = ऑर्डिनन्स काढू शकते आणि ज्यावेळी संसद सत्र सुरू होईल त्यावेळी त्या ऑर्डिनन्सविषयी सभागृहाला माहिती देवून, त्याची गरज विशद केली जाते आणि आवाजी मतदानाला तो ऑर्डिनन्स टाकला जातो. मंजूर झाल्यावर मग त्या ऑर्डिनन्सचे 'लॉ' मध्ये रुपांतर होते....अशी प्रथा असते.

डायरेक्टिव्ह = निदेश.....आणि तसे निदेश देणार्‍यास निदेशक असे नाम असते.
इथेही एक प्रकारे ऑर्डर दिली जाते पण ते खातेनिहाय असते. उदा. माझी सेवा [बदली....ट्रान्सफर नव्हे] कोल्हापूर झोनमधून पुणे झोनमध्ये काही काळापुरती वर्ग करण्याचा निदेश [डायरेक्टिव्हज] जिल्हाधिकारी काढू शकतात. त्या निदेशावर सही करणार्‍या अधिकार्‍यास मग निदेशक म्हटले जाते.

अशोक पाटील

दिनेशदा हे खरेच की पूर्वी तोलामोलाचे साहित्यिकच अनुवाद करीत्,ती प्रातिभ प्रतिनिर्मिती असे..आता एकीकडे अनुवाद उदंड झाले, मागणी वाढली..दुसरीकडे भाषाभ्रष्टतेची सवय झालेल्या समाजाचा कसलाच आग्रह उरला नाही.
वृत्तपत्रीय भाषाही प्रमाणभाषा राहिली नाही.
'अमक्याच्या प्रती आदर व्यक्त करणे ' असे सर्रास म्हटले/लिहिले जाऊ लागले..
वस्तू मिळणे अन माणूस भेटणे यात गफलत करणे रूढ झाले..
मी आली मी गेली हेही कानावर आदळून जुने झाले.
नव्या पिढीने तर भाषेपलिकडची भाषा रूढ केली.
फार शुद्ध बोलण्याचा न्यूनगंड यावा अशी परिस्थिती..
पण हे थोडे नकारात्म होतेय का ? आपण आपल्यासारखे बोलत, लिहीत, वागत रहावे,समोरच्याच्या चुका दुरुस्त करीत रहावे..

पाटील सर,
धन्यवाद. चूक झालीच तुम्ही दुरुस्त कराल ही खात्री होतीच.
तितका मुरलेलो नाही हो मी शासकीय भाषेत. १०-१२ वर्षांतच शासकीय सेवेस रामराम केल्याचा परिणाम असावा Wink

डॉक्टर.....

माझी शासकीय भाषेशी जवळीक आहे म्हणजे मला तिच्याविषयी खूप प्रेम वगैरे आहे असे नसून एक आवड तसेच रोजच्या पत्रव्यवहाराच्या निमित्ताने अशा संज्ञा नित्यनेमाने समोर येत असतात, त्या लक्षात राहतात, इतकेच.

दुसरे असे की, मी केवळ तुमच्या व्याख्येची व्याप्ती अधिक स्पष्ट केली. त्या माहितीला चूक म्हणता येणार नाही, फक्त तांत्रिकदृष्ट्या काही बदल दाखविणे गरजेचे होते.

हो भारती, " समोरच्याला कळतंय ना. मग बास." एवढेच भाषेचे प्रयोजन राहिलेय असे वाटत राहते.

इब्लिस / अशोक

आमच्याघरी पण हे सरकारी मराठीचे प्रयोग होत असतात. अ‍ॅक्टान्वये डीटेलवार माहिती वगैरे.

पाटीलसर,
शब्दांचा योग्य वापर व शासकीय पारिभाषिक संज्ञांचा अर्थ समजणे हे सगळ्यांसाठीच गरजेचे असते. तुम्हाला अनुभव जास्त असल्याने तुम्ही अधिक योग्य लिहिले आहेत, हेच मीही म्हटलो.

चांगली चर्चा दिनेशदा!
मला तर हल्ली मराठी बातम्या ऐकवत नाहीत. अचाट हिंदाळलेले मराठी असते.

अननसाच्या झाडाखाली बाईक हे भारीच आहे.

बाकी मला मराठवाड्यात राहिल्यावर जाऊयात खाऊयात जाऊत खाऊत अशी सगळी सवय झालीय.
पुन्हा तुमची भाषा म्हणजेच शुद्ध भाषा का हा मुद्दा आहेच. Happy

माझी मदत करा हे तर हल्ली सगळ्या मालिकांत आहे. कधी वाटतं कुणास ठाऊक आपल्याला चुकीची वाटते ती वाक्यरचना महाराष्ट्राच्या कुठल्यातरी भागात चक्क रूढ असेल.

माझ्या बहुतेक प्रतिक्रीया 'मस्त, मस्तच' अशा असतात तर यावरही एकाने ' मस्त ही काही योग्य प्रतिक्रीया नव्हे , मस्त शब्दाचा मराठीत वापर फक्त मस्तवाल किंवा मदमस्त अशा नकारार्थी छटेनेच होतो . अन्नपदार्थ किंवा कलाकुसरीची वस्तू , साहित्य हे काही मस्त म्हणता येणार नाही' असे ऐकवले.
ते वाचून मला ' नाईस इज नॉट अ नाईस वर्ड टू युज' हा जुन्या इंग्रजी शिक्षकांचा फेमस डायलॉक Happy आठवला.

साती....

"मस्त" बद्दल मस्त लिहिता येण्यासारखे आहे.

तुमच्या 'मस्त' प्रतिक्रियेला उद्देश्यून ज्या सदस्याने 'तसा वापर फक्त नकारार्थी छटा' दर्शविण्यासाठी केला जातो असे लिहिले होते, त्या अनुषंगाने मी असे म्हणू शकतो की ते शतप्रतीशत योग्य म्हणता येणार नाही.

'मस्त' चा अर्थ 'विपुल....अमर्यादित....अगणित...." अशा सांख्यिकी अर्थाने घेतला जातो. उदा. "आवंदा पावसाने लई किरपा केलीया आणि जुंधळा काय मस्त आलाय !" असे शेतकरी जेव्हा हर्षभराने उदगारतो, त्यावेळी मस्तचा अर्थ नकारार्थी छटा घेऊन अवतरत नाही, तर पीक विपुल आले आहे असा घेतला जातो.

"आईने केलेल्या पुरणपोळ्या मस्तच असतात....". इथे आईच्या हातचा गोडवा किती लुभावणारा आहे हे दर्शविण्यासाठी 'मस्त' विशेषणाचे प्रयोजन. पुरणपोळ्या खावून कुणी 'मदमस्त' होत नाही हे तर स्पष्टच आहे.

एखाद्या गुणाचे रुपांतर अवगुणात होत असल्याचे आपण ज्यावेळी पाहतो अनुभवतो, त्यावेळी मात्र 'मस्त' ला डावे रुप प्राप्त होते. उदा. " गेल्या निवडणुकीतील यशाने रावसाहेबांना मस्ती चढली होती, यंदा ती मस्ती आपण जिरवू या चांगलीच !".....या निर्णयात रावसाहेबांच्या अंगी असलेल्या गुणांचे विजयामुळे अवगुणात रुपांतर झाल्याचे गावकर्‍यांच्या एका गटाने मानले. तो अवगुण म्हणजे 'मस्ती'.

अजूनही खूप उदाहरणे देता येतील. थोडक्यात 'मस्त' अशी प्रतिक्रिया म्हणजे एखाद्या लेखातील गुण तुम्हाला भावले म्हणून त्यात असलेल्या सुंदर विपुलतेला तुम्ही 'मस्त' असा शेरा दिला असे म्हटले पाहिजे.

अशोक पाटील

फारच माहीतीपुर्ण लेखमाला आहे दिनेशदा. मराठीभाषेविषयी कुणी असे लिहीते/ बोलते आहे हे पाहून आनंद वाटला.

आजकाल (काही) मराठी संकेतस्थळावरील प्रतिसादांत "आवडल्या गेले आहे", "केल्या गेले आहे" "समजल्या गेले आहे" अशी शब्दरचना केल्या गेलेली आढळते.

प्रमाणभाषा व बोलीभाषा यात फरक असतोच त्याचप्रमाणे प्रमाण लिखाणातही हा फरक असावा. असे करणे हे देखील व्याकरणाच्या नियमांना धरून असते.

वरती गोगोंनी जे काही म्हटले आहे त्यास अनुमोदन. ("अजून एक : 'मला हे करू दे' ऐवजी 'करुन देत, खाऊन देत, पिऊन देत... जाऊन देत.. वैगरे" हे पण खूप खटकतं कानाला...")

दिनेशदा:
अप्रतिम लेख. मराठी भाषेबद्दल इतकी आस्था आणि तिच्यातल्या बारकाव्यांची माहिती असणारी माणसे जवळजवळ दिसेनाशी झाली आहेत.
म.टा. आणि लोकसत्ता अशा एकेकाळी आदरणीय असणार्‍या वृत्तपत्रांमधली मराठी वाचून हताश वाटते, सकाळ तर त्यांच्याही आधी भीषण मराठी छापत होता.

तुमचे आणि मा.बो. वरील इतर काही मंडळींचे लिखाण वाचले की 'अजून सगळेच काही संपलेले नाही' अशी आशा मनात पालवते, हे तुमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवायचे आहे, मनापासून धन्यवाद.

जाता जाता: 'बाइकवरचे बिर्‍हाड'चे प्रकाशक कोण आहेत?

दिनेशदा
लेख छान आहे. बर्‍याचशा निरिक्षणांशी मी सहमत आहे.
मला पण अनुवादित पुस्तके वाचताना हा अनुभव आलेला आहे. मी सुद्धा रविंद्रनाथांची काही अनुवादित पुस्तके वाचली आहेत. काही मराठीतून तर काही इंग्लिशमधुन पण मला सतत कुठेतरी खटकत असे.
बर्‍याचदा, अनुवादामुळे त्या कलाकृतीचे साहित्यमुल्य कमी होते की काय अशी शंका येते कारण त्यामधले सौंदर्य वाचणार्‍यापर्यंत पोहोचतच नाही.

MandarKulkarni>>
म.टा. आणि लोकसत्ता अशा एकेकाळी आदरणीय असणार्‍या वृत्तपत्रांमधली मराठी वाचून हताश वाटते
>> सहमत.
बर्‍याचदा मराठी वृत्तवाहिन्याही चुका करताना दिसतात,
जसे, 'अजित पवारांनी २५ सप्टेंबरला दिलेला राजिनामा'
ह्या वाक्याच्याऐवजी
'अजित पवारांनी २५ सप्टेंबरला दिला होता राजिनामा'
असे असावयास हवे नाही का?

'सादर केले' च्याऐवजी 'पेश केले'! हे काय?

टिव्हीवाल्यांना बहुतेक तेवढ्या पट्टित न्युज दाखवायची असते मग कशीही वाक्यरचना करतात.

मस्त, या शब्दाबद्दल नव्यानेच कळले मला. पण काही शब्द इतके मराठीत रुळले आहेत कि आता ते परके वाटतच नाहीत. उदा.

डँबिस ( Damn Beast ) डांबरट ( Damn Rat ) आलबेल ( all well )

या बातम्यांबद्दल मला नक्कीच आठवतेय, कि पहिल्यांदा बातम्या देणारे ( वाचणारे ) स्वतः त्याचे भाषांतर करत असत. बहुतेक भक्ती बर्वे असे म्हणाली होती. त्या काळात प्राध्यापक अनंत भावे, प्रदीप भिडे यासारखे मराठीचे जाणकार दूरदर्शनवर होते. त्याकाळात कधी अशी विचित्र वाक्यरचना ऐकल्याचे आठवत नाही.

जसं बीबीसी वरचं इंग्लिश ऐकताना छान वाटतं, तसं कुणाचं मराठी ऐकायला छान वाटेल, अशी माणसं आज हवी आहेत.

जयंत नारळीकर, राम शेवाळकर, सरोजिनी बाबर, शांता शेळके अशी अनेक नावे सांगता येतील.

'अजित पवारांनी २५ सप्टेंबरला दिला होता राजिनामा'
असे असावयास हवे नाही का?
<<

नाही.
ते 'अजित पवारांनी २५ सप्टेंबरला राजिनामा दिला होता'
असे असायला हवे.
कर्ता, कर्म क्रियापद. अशी अनुक्रमे शिश्टीम अस्ते मराठीमधे असे ऐकून आहे Wink

Pages