क्रॅनबेरीचे लोणचे

Submitted by मेधा on 19 November, 2012 - 14:47
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१२ आउंस ताज्या क्रॅनबेरी -
८-१० सुक्या मिरच्या मी ब्याडगी वापरते.
१ टेबलस्पून मीठ
२ हिरव्या मिरच्या
बोटभर आल्याचा तुकडा
मिळत असल्यास एक एक इंचाची आंबे हळद अन ओली हळद
तेल , हिंग , मोहरी

क्रमवार पाककृती: 

एक कप पाण्यात एक टेबलस्पून मीठ घालून गरम करावे, उकळी आली की गॅस बंद करावा. पाणी गार झाल्यावर सुक्या मिरच्या घालून ठेवाव्यात. १५-२० मिनिटे तरी मिर्च्या भिजत घालाव्यात.
क्रॅनबेरी धूवुन कापडावर पसरुन कोरड्या करून घ्याव्यात.
लागेल तसे थोडे थोडे मीठाचे पाणी घालून क्रॅनबेरी व मिरच्या बारीक वाटाव्यात.
वाटून झाले की बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले, हळद, आंबेहळद सर्व वाटणात मिसळून घ्यावे.
तेलात मोहरी हिंगाची फोडणी करून गार होऊ द्यावी. गार फोडणी लोणच्यात कालवून , पाहिजे असल्यास वरुन मीठ घालून मिसळावे.

वाढणी/प्रमाण: 
लोणच्या एवढे
अधिक टिपा: 

आवळ्याचे 'हिंडी' नावाचे लोणचे असते आमच्यात. इथे ताजे आवळे मिळत नाहीत, फ्रोजन आवळे तुरट लागतात. म्हणून हा प्रयोग.

क्रीम चीझ बरोबर मिसळून मस्त झणझणीत स्प्रेड तयार होईल.

मी फ्रीझ मधेच ठेवते. बाहेर किती टिकेल काही कल्पना नाही.

आवडत असल्यास फोडणीत थोडे मेथी दाणे पण घालू शकता

माहितीचा स्रोत: 
मावशी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षक जीवघेणे आहे, पण मायबोलीवर चौदा चौदा वर्षे झाली तरी फोटो टाकत नाहीत याचा निषेध!

ही क्रॅनबेरी परदेशात मिळत असणार. ती आमच्यापर्यंत कधी पोचायचीच नाही. असो!