मसाप मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा जंगी सत्कार
डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची ८६व्या अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष्यपदी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळी कोत्तापाल्लेन्चा सत्कार पुण्याच्या मसापच्या सभागृहात झाला.
त्यावेळी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. त्यातही रावसाहेब कसबे आणि अनंत दिक्षित हे विशेष. त्याचबरोबर उल्हास पवार, न.म.जोशी ई. उपस्थित होते.
कोत्तापल्ले यांचे स्वागत करण्यासाठी खास चौघडा वादन झाले. चौघड्यातील विविध तालांनी वादकांनी कमाल केली. स्वत: कोत्तापल्लेही त्यामुळे भारावून गेले.
मसापच्या अध्यक्ष असलेल्या डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी कोतापल्ले यांचा सत्कार करताच टाळ्या आणि चौघड्याने सभागृह दणदणून गेले.
त्यानंतर आमच्या सुचेतानांत प्रकाशनासह ४-५ प्रकाशक, साहित्य संस्था यांनी कोतापल्ले यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमातील बराचसा महत्वाचा भाग वर्तमान पत्रांमध्ये आलाच आहे. मात्र काही गमतीदार गोष्टी मी सांगतो.
परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी नेहमीप्रमाणेच दमदार भाषण केले. त्यात एक मुद्दा त्यांनी असा घेतला ...
'' सर, मला विशेष आनंद होतो आहे की तुमची आत्ता निवडा झाली. कारण, तुम्ही हलते- फिरते असतानाच्या वयात तुमची अध्यक्षपदी निवड होणे हेसुद्धा विशेष आहे.''
अरुण जाखडे यांनी सांगितले,
'' सर, निवड झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी सत्कार करताना आनंद होतो आहे. म्हणजे कसं की, लग्न झाल्याबरोबर सत्यनारायण केला कि सगळीकडे फिरायला मोकळे.''
रावसाहेब कसबे म्हणाले,
'' काही वेळा एकही ओळ न लिहीणारेसुद्धा अध्यक्ष झाले आहेत. मात्र आता एक अभ्यासक अध्यक्ष झाला हे चांगले झाले. आपल्या प्रचंड बहुमताने झालेली निवडच हे सांगत आहे.''
डॉ. कोतापल्ले यांनीही काही गमती सांगितल्या,
'' मला भांडण करणारे विद्यार्थी आवडतात. पूर्वी एकदा मी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बोरकरांचे नाव सूचित केले होते. तसे त्यांच्या विरुद्धही माझेच स्नेही उभे होते. निवडणूक झाली, बोरकर हरले. माझे विद्यार्थी माझ्याकडे पेढे घेउन आले. मला कळेना. पण विद्यार्थी म्हणाले, सर आम्ही म्हणता होतो ना! तुमचे खोटे झाले, आमचेच खरे झाले, बोरकर हरले आणि आमहाला जे हवे होते ते जिंकले. हे घ्या पेढे!"
डॉ. कोतापल्ले पुढे म्हणाले,
" ४-५ वर्षांपासून अनेक लोक मला सांगत आहेत कि तुम्ही संमेलनाची निवडणूक लढवा. मी पुढे ढकलत होतो. पण मी त्यांना सांगितले, की एक लक्षात ठेवा की, अ.भा. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याशिवाय मी काही मरणार नाही हे नक्की! "
अतिशय मनमोकळेपणे साजरा झालेला हा सोहळा साहित्य विश्वाला नक्कीच पुढे घेउन जाणारा होता असे वाटते.
धन्यवाद!!
छान.
छान.
सत्कार झाला....होतील....अन्
सत्कार झाला....होतील....अन् ते योग्य तसेच रितीरिवाजाप्रमाणेच असते, त्यात नाविन्य काही नाही. डॉ.कोतापल्ले यांच्या सत्कार समारंभातील भाषणाचा वृत्तांत वाचताना खटकलेल्या काही बाबी : [वरील वृत्तांताच्या आधारे म्हणत आहे]
१. रावसाहेब कसबे ~ "काही वेळा एकही ओळ न लिहीणारेसुद्धा अध्यक्ष झाले आहेत."
~ कोण असे अध्यक्ष की ज्यानी एकही ओळ न लिहिता त्या पदावर आरुढ झाले ? अध्यक्षांचा इतिहास तपासताना असे जाणवेल की कदाचित कसबे यांच्या नजरेसमोर सयाजीराव गायकवाड (१९३२) आले असावेत. त्या काळातील परिस्थितीनुसार साहित्य आणि साहित्यिक यांच्याविषयी सयाजीराव यांच्या मनी असलेल्या आदराचे प्रतीक म्हणून त्याना अध्यक्षपद लाभले होते. त्यात काही गैर मानावे असे काही नाही. केवळ 'बडोद्याचे महाराज' म्हणून त्यांची त्या पदावर वर्णी लागली नव्हती हे उघडच होते. [अन्य कुणी तसे 'ओळही न लिहिलेले' अध्यक्ष झालेअसतील तर धागाकर्ते श्री.जोशी यानी ती नावे इथे दिली तर योग्य होईल. आमच्याही ज्ञानात भर पडेल.]
"मात्र आता एक अभ्यासक अध्यक्ष झाला हे चांगले झाले......" ~ हा टोमणा कशासाठी ? डॉ.कोतापल्ले जरूर अभ्यासक आहेत, पण म्हणून त्यांच्याअगोदर झालेले अध्यक्ष 'अभ्यासक' नव्हते असे समजायचे का ? तसेच यापुढे कुणी अभ्यासक साहित्यिक अध्यक्ष होणार नाही की काय ?
२. विद्यार्थी म्हणाले...."बोरकर हरले आणि आमहाला जे हवे होते ते जिंकले. हे घ्या पेढे!" .... ~ बोरकर हरले, मग यात गंमत कसली मानावी ? मिळालेले पेढे डॉक्टरांनी खाल्ले असणारच....निवडणूक म्हटले की हारजीत होणार....तो गंमतीचा किस्सा म्हणून सांगण्यात काय हशील ? बोरकर वा इंदिरा संत यांच्यासारखी गुरुतुल्य साहित्यिक जर निवडणूक लढविणार असतील तर त्यांच्या विरोधात खरे तर कुणी उभे राहूच नये. पण...तसे घडत नाही, हीच मराठी साहित्य संमलेनाची शोकांतिका. त्या संदर्भात पेंडसे, करंदीकरांनी शहाणपण दाखविले असेच म्हणावे लागेल.,....अन्यथा तेही 'गंमतीच्या किश्श्यात' आले असते.
३. डॉ.कोतापल्ले म्हणाले.... "अ.भा. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याशिवाय मी काही मरणार नाही हे नक्की!...." ~ वाईट वाटले ह्या निर्धाराचे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा जीवनमरणाचा प्रश्न होऊ शकतो एका अभ्यासक म्हटल्या जाणार्या साहित्यिकाच्याबाबतीत या परते दुर्दैव दुसरे काय ?
४. "हा सोहळा साहित्य विश्वाला नक्कीच पुढे घेउन जाणारा होता असे वाटते. ....."
~ एक आशा म्हणून ठीक आहे ही भावना, पण एखादा सत्काराचा सोहळा साहित्य विश्वाला पुढे कसा काय घेऊन जाऊ शकतो हे कळणे मुश्किल आहे. काय अधिकार असतात या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीला....साहित्यिकाला ? मसापच्या वर्षभरात तीन बैठका होतात. त्यातील 'मराठी वृद्धी' साठी एकही असत नाही. सरकारकडून मिळालेल्या अनुदान वाटचालीवरच दंगा असतो....पोहे टोस्ट कॉफी सोबतीला घेऊन. कित्येक अध्यक्ष पूर्ण मीटिंगमध्ये तोंडही उघडत नाहीत [हे मी पाहिले आहे....ऐकीव नाही.]
विद्यापीठाच्या मराठीच्या सिलॅबसमधील कथा-कादंबरी-कविताही बदलता येत नाही त्या वर्षभरात अध्यक्षांना. असो.
~ डॉ.नागनाथ कोतापल्ले यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
अशोक पाटील
अशोक पाटील यांना अनुमोदन.
अशोक पाटील यांना अनुमोदन.
मसापच्या सभेतला हा वृत्तांत वाचून आश्चर्य मात्र अजिबात वाटलं नाही. दरवेळी तिथे गेलो किंवा तिथल्या कोणा पदाधिकार्याशी संवाद साधला की करमणुकीशिवाय हाती काही लागत नाही.
गेल्या आठवड्यात मसापच्या एका अधिकारी बाईंना भेटलो. सुरुवातीचा अर्धा तास त्या टिळकांच्या आयुष्यातील घटनांबद्दल बोलत राहिल्या. हे तपशील चुकीचे आहेत, हे सांगितलं, पुरावे कुठे सापडतील, हे सांगितलं तरी बाई काही थांबल्या नाहीत. मग 'इ + उ' ही संधी होत नाही, वगैरे विनोदी विधानं केली.
मग नाट्यसंगीतामुळे लावणी बिघडली, असंही बोलल्या. म्हणजे नक्की काय हो, असं विचारलं तर उत्तर मिळालं नाही.
अशोक पाटील यांना पूर्ण
अशोक पाटील यांना पूर्ण अनुमोदन.
अशोक पाटील यांना संपूर्ण
अशोक पाटील यांना संपूर्ण अनुमोदन.
बेजबाबदार विधानांनी ठासून भरलेला कार्यक्रम हे कार्यक्रमाचे स्वरुप सरळ दिसतच आहे.
मसापकडूनसुद्धा बाकी काही अपेक्षितही नाहीच.
दरवेळी तिथे गेलो किंवा तिथल्या कोणा पदाधिकार्याशी संवाद साधला की करमणुकीशिवाय हाती काही लागत नाही<<<
तिथे जाता हेच वाचून करम़णुक झाली. (हलके घ्यावेत)
मग 'इ + उ' ही संधी होत नाही, वगैरे विनोदी विधानं केली.
मग नाट्यसंगीतामुळे लावणी बिघडली, असंही बोलल्या. म्हणजे नक्की काय हो, असं विचारलं तर उत्तर मिळालं नाही.<<<
माधवी वैद्य आणि नंदा सुर्वे यांची भाषणे, विचार, जेव्हा केव्हा ऐकले तेव्हा पटले नाहीत. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा पूर्ण आदर ठेवून हे विधान आहे या डिस्क्लेमरसकट वरील प्रतिसाद त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, अशी संबंधितांना विनंती, जर पोहोचवायचा असलाच तर. बाकी मला फिकीर नसतेच.
अशोकजी डॉ सयाजीराव गायकवाड
अशोकजी
डॉ सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या निर्विवाद थोर व्यक्तींचा कसबे अनुदाराने उल्लेख करत असतील तर त्यांचा जाहीर निषेधच व्हायला हवा, पण तसं नसावं असं वाटतं. एक ओळही न लिहीलेले याचा अर्थ साहीत्यिक योगदान अगदीच अत्यल्प असणारे असा असावा. १९३२ सालापर्यंत मागे जाऊन त्यांचा उल्लेख सहजपणे झालेला असावा असं वाटत नाही. त्यांच्या उल्लेखाचं काही कारणच दिसत नाही. हमो मराठेंच्या वादाचं काही प्रतिबिंब असेल तर कसबेच सांगू शकतील त्याबद्दल.
"बोरकर हरले आणि आमहाला जे हवे होते ते जिंकले. हे घ्या पेढे!" यातून कोतापल्लेंनी सूचकपणे बोरकरांसारखी योग्य व्यक्तीही अध्यक्ष होऊ शकलेली नाही हे सूचित केले असावे असे वाटते. तसच बोरकरांसारखे साहीत्यिक लाभले नाहीत याचं दु:ख होण्याऐवजी पेढे वाटले गेले ही खंतही. साहीत्य संमेलनाचे अध्यक्षपद हा जीवनमरणचा प्रश्न असू शकत नाही याबद्दल सहमत. मात्र त्यात विनोदाचा भाग होता का हे पहायला हवे. भाषणामधे विनोद पेरले जाऊ शकतात. तो भाग तसाच घ्यायला हवा.
मसाप ही संस्था जुनी आहे. संस्था चालवणे हे सोपं काम नाही. मात्र पूर्वी वसंत बापटांसारखे साहीत्यिक अध्यक्ष झाले, मोठे साहीत्यिक अध्यक्ष म्हणून लाभले तिथे आजच्या काळात फरक का पडतो आहे याचं कारण बदलता काळ असावा. साहीत्यिकांना पूर्वीसारखा मानसन्मान उरला आहे का हे ही तपासून पहायला हवे. खरे तर पूर्वीसारखे साहीत्यिक निर्माण होणारेत का ? सृजनापेक्षा माहितीपूर्ण लिखाण वाढत आहे. अर्ध्या हळकुंडाने दोन ओळी खरडणारे स्वतःला साहीत्यिक म्हणवून घेताना दिसताहेत. कालाय तस्मै नमः
खरे तर पूर्वीसारखे साहीत्यिक
खरे तर पूर्वीसारखे साहीत्यिक निर्माण होणारेत का ? <<<
मला वाटते 'पूर्वी होते तेच खरे व उत्तम व तसे काही होऊच शकत नाही' ही (विशेषतः) मराठी रसिकांची खुळी संकल्पना नवीन साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला लीलया गाडते.
मराठी साहित्यात पाच नांवे सोडली तर विनोदी लेखन ही आपली धाटणी बनवण्याची हिम्मतही कोणात निर्माण झाली नाही यावरून रसिकाश्रयातील घाबरट समजुती स्पष्ट होतात. मी एखाद्याला चांगले म्हणालो आणि बाकीचे नाही म्हणाले तर काय घ्या, अशी!
(अवांतर - राजन खान यांचे घणाघाती भाषण जे मी मायबोलीवर प्रकाशित केले होते ते मला पुनर्प्रकाशित करावेसे वाटत आहे).
इतकेच काय, गाण्यांचा विषय घेतला तरीही आजही सुमारे शंभर बहुश्रुत व सुप्रसिद्ध गाण्यांपलीकडे मराठी गाणी वाजवली जाऊ शकत नाहीत कारण नव्या गाण्यांमध्ये दम नसणार हे गृहीत धरूनच रसिक गाणी ऐकतात.
(या विधानाला सपोर्टिंग विधान करण्याची इच्छा - अती सातत्याने ऐकली गेलेली मराठीतील शंभर ते सव्वाशे गाण्यांची यादी मायबोलीवर प्रकाशित करण्याचा मनोदय आहे, ज्यापलीकडे एक 'आम' माणूस मराठी गाणी फारशी ओळखत नाही. )
सृजनशीलतेपेक्षा माहितीपूर्ण<<<
ही नुसती काळाची महती नाही. नुसते असे म्हणून कसे काय झटकता येईल? माहिती विस्फोटाच्या युगात माहितीपूर्ण लेखन अत्यावश्यक असणार. ते होत आहे. मराठी काव्य मुक्तछंदात अडकवून त्याचे बाह्य सौंदर्य सीमीत करण्यात बड्या नावांनी भक्तीभावाने हातभार लावलेला आहे व ते महान पुरस्कार घेऊन आता मानधने घेत भाषणे ठोकत आहेत. त्यामुळे श्रवणीयता / सुश्राव्यता लोप पावली असून मुळात नवीन पिढीला ( शैक्षणिक माध्यम हा विषय तूर्त बाजूला ठेवून ) कशाही गोडीच लागलेली नाही. आज ज्या कलाकृतींना संदर्भच राहिलेला नाही त्यांचे गोडवे गाण्यात मसाप आणि तत्सम संस्थांशी संलग्न तज्ञ सार्थक मानत आहेत.
कोणतेही काव्यमूल्य नाही असे ज्याच्या काव्याबद्दल हिरीरीने बोलले जाते व स्वतःही श्रेष्ठ अभिरुची सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो त्या संदीप खरेच्या कवितेला मी माझ्यापुरते शंभर पैकी दोनशे गुण देतो (हे करणारा मी कोण - हे मान्यच) कारण त्याने ७५ रुपयांचे तिकीट काढून बालगोपाळांसकट मराठी कविता ऐकायला माणसाला थेटरात आणले. बालगंधर्वला मध्यंतरात बटाटेवडा खाताना 'संदीपच्या कवितेला खोली नाही' म्हणणारे काव्यतज्ञ अजूनही रविकिरणचाच जयघोष करतात म्हंटल्यावर आमच्यासारख्या आंतरजाल प्रतिसादपटूंनी जिभा बेलगाम सोडायला काय हरकत?
-'बेफिकीर'!
प्रदीर्घ आणि संपूर्ण
प्रदीर्घ आणि संपूर्ण दुर्लक्षणिय प्रतिसाद काळजी घ्या.
अशोक पाटील यांना संपूर्ण
अशोक पाटील यांना संपूर्ण अनुमोदन.
मसापची पत्रिका हा एक मोठ्ठा विनोद झालेला आहे गेली कित्येक वर्षं..
सृजनापेक्षा माहितीपूर्ण लिखाण वाढत आहे.>> जर समाजाला याची गरज वाटत असेल, ती पुस्तकं विकली जात असतील तर हे लिखाण वाढणारच. आपण फक्त आंतरजाल वापरणार्या सुशिक्षित वर्गाला डोळ्यापुढे ठेवलं तर ती गरज वाटत नसली तरी या छोट्या गटाबाहेरही फार मोठं वाचकविश्व आहे.
पूर्वी होते तेच खरे व उत्तम व तसे काही होऊच शकत नाही' ही (विशेषतः) मराठी रसिकांची खुळी संकल्पना >> यालाही अनुमोदन. आताच्या जगाची, जगायची, ज्ञानवर्धन करायची, मनोरंजन करून घ्यायची परिमाणं बदलली आहेत. त्यामुळे वाचनाच्या सवयीवर परिणाम होणारच. पण तसंही आधीच्या जमान्यात फार विचक्षण वाचक होते आता नाहीत असं काही नाहीये. आणि मसापने, इतक्या सार्या संमेलनाध्यक्षांनी ही बदलती परिमाणं आकळून साहित्यवृद्धीसाठी काय प्रयत्न केले नक्की? गतकालाचा आढावा आणि स्मरणरंजन, अधूनमधून भावनिक घोषणा असं कायतरी सोडून काय असतं त्या अध्यक्षीय भाषणांमधे? कशाला नवी पिढी रस घेईल मग? मुळातच अध्यक्षीय पद मिळवणं म्हणजे साहित्यिक आयुष्याचं सार्थक असल्यासारखं बहुतेक सगळे साहित्यिक वागतात. ते मिळालं म्हणजे झालं. निवडून देणारे कोण असतात नक्की? सर्वसामान्य वाचक तर नक्केच नाही. तर मसापच्या शाखा व तत्सम पदाधिकारी, वगैरे.. मग हे अध्यक्ष नक्की कुणाचं प्रतिनिधित्व करतात?
मग हे अध्यक्ष नक्की कुणाचं
मग हे अध्यक्ष नक्की कुणाचं प्रतिनिधित्व करतात?<<<
हा अतिशय मार्मिक व महत्वाचा प्रश्न आहे. मतदान करणारे लोक मसापसारख्या साहित्यसंघाच्या संस्थांचे सभासदत्व मिळवलेले लोक असतात. यांचे अनेकदा कर्तृत्व हे दोन तीन पुस्तके, अनेक कार्यक्रम, अनेकदा सूत्रसंचालन आणि 'मिरवणे' इतपत मर्यादीत असते. ही असतात सामान्यच माणसे, पण त्यांना मुखवटा मिळालेला असतो साहित्यिकाचा. (मी अश्या 'कि त्ये कां ना'अगदी जवळून ओळखत असल्याने हे मला नीट माहीत आहे). यांचे स्वतःचे साहित्य स्टोव्हच्या वातीस बरे पडते हे विधान कितीही उर्मट वाटले तरी असे साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे.
मतदान करताना यांची प्राधान्ये अतिशय निराळीच असतात. नेमका 'साहित्य चळवळ' या प्रकाराशी त्या प्राधान्यांचा फारसा जवळून संबंध नसतो.
(ही सगळीच विधाने 'हे असे असते आणि ते तसे असते' अश्या स्वरुपाची जोरकस वाटली तरी ती खरी आहेत व या मतदारांचे माझ्याकडील साहित्य हे सिद्ध करण्यास पुरे पडेल अशी आशा आहे).
त्यांच्या प्राधान्यात उमेदवाराशी जवळीक, जात वगैरे, मिळू शकणार्या पार्ट्या येथपासून काहीही असू शकते. असते.
त्यामुळे निवडून आलेला माणूस हा सामान्य वाचकाचे प्रतिनिधित्व 'अत्यल्प' प्रमाणात करतो.
मला वाटते 'पूर्वी होते तेच
मला वाटते 'पूर्वी होते तेच खरे व उत्तम व तसे काही होऊच शकत नाही' ही (विशेषतः) मराठी रसिकांची खुळी संकल्पना नवीन साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला लीलया गाडते. <<<
पटले.
पुढचे मुक्तछंदाबद्दलचे तितकेसे पटले नाही पण त्याबद्दल इथे चर्चा नको आणि ती चर्चा करण्याइतकी माझी वाङ्मयीन तयारी नाही. तर ते असोच.
त्यामुळे निवडून आलेला माणूस हा सामान्य वाचकाचे प्रतिनिधित्व 'अत्यल्प' प्रमाणात करतो.<<<
हे ही पटले
, अध्यक्षानी ३ पुस्तके लिहिली
, अध्यक्षानी ३ पुस्तके लिहिली आणि त्यांना मते देणार्या ५६६ लोकानी २-३ पुस्तके लिहिली आहेत, या डेटाच्या आधारे ते सामान्यांचे प्रतिनिधित्व करत नाही, हा निष्कर्ष कसा काय काढला?
मसापच्या लोकानी लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडला, इथे विषयच समाप्त होतो... तो त्यांचा प्रतिनिधी असल्याशी कारण. तो लोकांचाही प्रतिनिधी असायलाच हवा, ही अपेक्षाही मुळात चुकीची नाही का?
आणि समजा, जरी सर्व जनतेचे बहुमत घेतलेच असते, तर कोण निवडून येणार होते? हमो का? कुणाच्या जिवावर ?? ३.५ % आणि चारदोन शोकराव यांच्या जिवावर?
ज्या संस्थेची आपण निवडणूक लढवत आहोत, तिथल्याच सदस्यांच्या विश्वासाला तुम्ही पात्र नसाल, तर इतर आम जनतेचे आम्हीच प्रतिनिदित्व करतो, याला काय अर्थ उरतो ?
? ? या प्रतिक्रियांना हसावे
? ?
या प्रतिक्रियांना हसावे की रडावे कळत नाही?
प्रथम हे की मी कुठे पूर्ण वृत्तांत दिला आहे. मात्र ज्यामुळे वक्त्यांनी गंमत निर्माण केली तेवढेच मी सांगितले. मी उल्लेखलेल्या ओळी सोडून झालेली चर्चा अतिशय गंभीर आणि विचार करणारीच होती. अनेक वेळा वेगवेगळ्या साहित्यिकांच्या तोंडून ऐकल्यामुळे इथल्या काही स्वयंघोषित अभ्यासकांना माझे लिहिणे पटले नसेल. मी जी वाक्ये दिली होती ती गंमत म्हणूनच वक्त्यांनी उल्लेखलेली होती. एखाद्याची निवड इतक्या मोठ्या मतांनी होणे हेही कदाचित त्यामागे कारण असू शकेल.
खरेतर अतिशय मनमोकळेपणाने वक्ते बोलत होते. मात्र इथल्या प्रतिसादांवरून मुळातच काही कोणाला आकस आहे की काय अशी शंका येते. त्यांचा विरोध वक्त्यांनाच आहे की काय अशीही शंका येते.
मसाप मध्ये खरेतर, जातीपातीपेक्षा वेगळ्या अंगाने सर्व साहित्यिकांनी विचार करणे जरूरीचे आहे, या मतावर सर्वांनीच सकारात्मक वक्तव्य केले हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे. मात्र ते वर्तमानपत्रातून जाहीर झाल्यामुळे मी लिहिले नाही इतकेच. मी फक्त भाषणांमधील गमती (म्हणजे ज्याला सर्व उपस्थितांनी आणि वक्त्यांनीसुद्धा हसून दाद दिली) तेवढेच लिहिले होते. याचा अर्थ वक्त्यांना कोणाचीतरी टिंगल किंवा अपमान करायचा होता असा अर्थ निघत नाही.
मात्र इथे प्रतिसाद देणार्यांनी निषेधाची वगैरे भाषा करून आपण साहित्यिक सोडाच, रसिकही नाही हे दाखवायचा प्रयत्न का केलाय हे समजत नाही.
यावेळी मसाप मध्ये तरूण साहित्यिकांचीही गर्दी होती हे विशेष.
चर्चे बद्दल धन्यवाद!
ता.क. मला कोणाबद्दलही आकस नाही. मी जे ऐकले ते लिहिले.
जोशी आंम्ही तुमचीच बाजू
जोशी
आंम्ही तुमचीच बाजू मांडलेली आहे.
श्री.जोशी..... तुमचा वरील
श्री.जोशी.....
तुमचा वरील प्रतिसाद इथल्या सदस्यांना एकूणच साहित्य आणि साहित्यिक म्हणजे काहीही कळत नाही अशा आविर्भावाचा वाटतो....निदान मी तरी असाच समज करून घेतला आहे, कदाचित इतरांना तसे वाटतही नसेल. एक लक्षात घेणे आवश्यक आहे की एकदा का तुम्ही इथे मायबोलीवर 'धागा' म्हणून वृत्तांत टाकला की त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया ह्या येणारच. समजा तुम्ही दिलेल्या सत्कार समारंभाच्या वृत्तांतावर 'छान, मस्तच, अभिनंदन' अशा छापाच्या डझनभर प्रतिक्रिया इथे आल्या असत्या तर मात्र तुम्हाला रडावे की हसावे असा प्रश्न पडला नसता. पण या निमित्ताने साहित्य साहित्यिक घडामोडी यावर विविध अंगांनी चर्चा घडत असेल तर ते साहित्याच्या दृष्टीने सुचिन्हच मानावे लागले. वरील एकाही प्रतिसादात तुमच्यावर वैयक्तिक कसलीही टीका दिसून येत नाही. मते-मतान्तरे प्रकटली आहेत ती वक्त्यांच्या भाषा योजनेवरून....जिचा वृत्तांत तर तुम्हीच दिला आहे.
"स्वयंघोषित अभ्यासक' म्हणजे नेमके तुम्हाला काय म्हणायचे आहे हे स्पष्ट होत नाही. मी गेली चाळीस वर्षे मराठी साहित्य संमेलनाचा पाठपुरावा करणारी व्यक्ती आहे. आज इंटरनेटमुळे हे विश्व जवळ आले आहे हे जितके खरे तितकेच हेही खरे की साहित्याच्या (तसेच मराठीच्या) प्रेमापोटी आम्ही आमच्या कॉलेजच्या जमान्यापासून अगदी तांबड्यापिवळ्यानिळ्या एस.टी.ने सार्या महाराष्ट्रभर प्रवास करून अशा संमेलनांना हजेर्या लावल्या आहेत. त्यामुळे अभ्यासाची एक बैठकही तयार झाली आहे [खूप काही लिहिता येईल एकूणच साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक दंगलीविषयी...फार जवळून पाहिले आहेत मी हे प्रकार]. त्या अनुषंगानेच डॉ.कोतापल्ले निवड संदर्भात लिहिण्याचा मला अधिकार प्राप्त झाला आहे असे मी मानतो. खुद्द डॉ.नागनाथ कोतापल्ले आणि रावसाहेब कसबे यांच्याशीही माझी ओळख असल्याने डॉक्टरांच्या अध्यक्षपदाची निवड ही घटना जितकी तुम्हाला आनंदाची तितकीच मलाही आहे हेही स्पष्ट मांडतो. फक्त सत्कार प्रसंगी 'मरणार नाही.....अध्यक्षपदाशिवाय' असली भाषा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अभ्यासकाने वापरावी हे मला निश्चित्तच खटकले....त्या उद्गाराची काही गरज नव्हती.
असो. शेष इतकेच म्हणतो की खुल्या मंचावर धागा सादर केला म्हणजे सार्यांनी आपल्याला रुचेल अशीच मते व्यक्त केली पाहिजेत ही अपेक्षा योग्य नाही.... त्यातही जे विरोधात लिहितात त्याना कशाविषयी तरी आकस असतो अशीही प्रतिसाद देताना मनी धारणा ठेवू नये, इतकेच.
(माझ्या प्रथम प्रतिसादातील मताला अनुमोदन देणार्या सर्वश्री चिनूक्स, नीधप, बेफिकीर, वरदा, च.चा. आदी सुहृदांचे तसेच या निमित्ताने श्री.आंबा, बेफिकीर, चिनूक्स, नीधप, एम.डी. यानी साहित्याविषयी केलेल्या चर्चेबद्दल मनःपूर्वक आभार. श्री.च.चा. यानी सयाजीराव गायकवाड यांच्या संदर्भात जे मत मांडले आहे ते योग्यच आहे. रावसाहेब कसबे याना ते नाव अभिप्रेत नसेलही.....तो माझा एक तर्क होता/आहे एवढेच म्हणू शकतो. रावसाहेब या ना त्या निमित्ताने कोल्हापूर मुक्कामी येत असतात, मी त्याना प्रत्यक्ष भेटून या संदर्भात नक्की खुलासा करून घेईन.)
अशोक पाटील
इतकी चर्चा झालीच आहे तर एक
इतकी चर्चा झालीच आहे तर एक शंका मला वृद्धास भेडसावते आहे.
परदेशात पण साहीत्य संमेलने, साहीत्य मंडळे अस्तित्वात आहेत का ? (मराठी भाषिकांची नव्हेत !) कारण तिथे साहीत्यनिर्मिर्ती आणि साहीत्य विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण, लेखकांना मिळणारे मानधन हे सारे अचंबित करणारे वाटते.
चक्रमचाचा, अशोकजी मी
चक्रमचाचा, अशोकजी
मी वैयक्तिकपणे काही मनावर घेतलेले नाही.
मात्र, मला असे वाटते, की गंमत म्हणून झालेल्या विधानांनाही इतके फारसे महत्व देऊ नये. अहो, हा त्यांच्या शैलीचा भाग असू शकेल कदाचित. मी प्रतिसादांबाबत हसावे की रडावे असे म्हटले खरे!! सर्वजण माझे लेखन मजेत घेतील असे वाटले होते. मात्र फारच गंभीर चर्चा झाली. जातीचा वगैरे उल्लेख येण्याची आवश्यकता नव्हती असे वाटते.
एका कवीचे व माझे बोलणे त्याच दिवशी झाले होते. मी त्यांना कोत्तापल्ले अध्यक्ष झाल्याचे सांगितल्यावर 'एखादे वेळी असे झाले तर काय झाले?' असे त्यांचे उत्तर आले. म्हणजे कदाचित मला आश्चर्य वाटले किंवा कोत्तापल्ले मान्य नाहीत असा त्यांचा समज झाला की काय असे मला वाटले असावे. म्हणजेच आपण एकमेकांना ओळखणारेसुद्धा एखाद्या साध्या विधानावर काही वेळा वेगळेच काहीतरी अर्थ काढतो आणि एकमेकांबद्दल काहीतरी ठाम समजूत करून बोलतो असे मानायला हरकत नसावी.
मसाप च्या बाजूने उभे राहणे किंवा न राहणे, तसेच त्यातील व्यक्तींविषयी मला मत मांडायचे नव्हते. मात्र काहींनी मांडले. असो.
खरेतर, या निवडणुका, त्यातील रस्सीखेच किंवा मते ओढणे वा मॅनेज करणे याही गोष्टी होत असणारच. याविषयीही चर्चा सखोल झाली असती तर बरे!!
>>
अतिशय मनमोकळेपणे साजरा झालेला हा सोहळा साहित्य विश्वाला नक्कीच पुढे घेउन जाणारा होता असे वाटते. <<
हे जे माझे मत होते ते खरेच आहे. याची कारणे दोन, एकतर अनेक नवीन कवी/लेखक यावेळी या समारंभात रस घेताना दिसले आणि दुसरे म्हणजे, कोणाला मान्यवर म्हणतात हे त्यांना समजले.
माझ्या लिखाणाला लोकांनी वावा म्हणावे यासाठी मी लिहित नाही. मी काही घरबैठा साहित्यिक नाही. गेली १८ वर्षे खेडोपाड्यात फिरलो आहे. माणसाला जाणून घेण्याचा प्र॑यत्न केला आहे. काव्य आणि काव्यरसिकांसाठी काम करण्याची माझी धडपड सुरूच आहे. त्यामुळे कोण मला काय म्हणते हे मी फारसे महत्वाचे मानीत नाही. मात्र, वैयक्तिक कोणाबद्दल अनुद्गार न निघावेत इतकीच माफक अपेक्षा.
चक्रमचाचा, अशोकराव आणि इतर सर्वांचे आभार..!
ता.क.(मानवत असल्यास) साहित्य सम्मेलन होईपर्यंत वेगवेगळ्या चर्चा रंगत राहतीलच. त्यावेळी सम्मेलनावर चर्चा करूच. मी बहुतेक सम्मेलनाला असणार आहे.
अशोकजी तुम्हाला खटकलेला
अशोकजी
तुम्हाला खटकलेला उल्लेख हा तुमच्यासाठी नसावा असा आपला माझा अंदाज.
प्रतिसादांमधील जातीवाचक
प्रतिसादांमधील जातीवाचक उल्लेख नष्ट केले जातील अशी अपेक्षा आहे
१. श्री.अ.अ.जोशी ~ धन्यवाद.
१. श्री.अ.अ.जोशी ~ धन्यवाद. साहित्याच्या प्रेमाने आणि प्रेमापोटीच आपण ही चर्चा केली आहे, करतही राहू इथून पुढे....असेच मी मानत असल्याने तिथे व्यक्तिगत पातळीवरील मताच्या आदानप्रदानामुळे काही कटुता निर्माण होऊ देऊ नये इतपत भान मी नित्यनेमाने ठेवीत असतो.
२. श्री.चक्रमचाचा ~ होय. माझेही तेच मत आहे. फक्त चर्चेच्या ओघात काही बाबींवर मते व्यक्त होताना तशी....तात्पुरती का होईना....भावना उमटते. पण त्याचाही अर्थ साहित्याविषयी वाटणार्या आपुलकीशीच असू शकतो.
३. श्री.बेफिकीर ~ नक्कीच सहमत आहे मी तुमच्या वरील मताशी. साहित्य संमेलन हा एक आनंद सोहळा असतो साहित्यप्रेमींसाठी. त्या सोहळ्यासाठी निवडली गेलेली व्यक्ती ही प्रथम साहित्यिक असते.....आणि आपणही तिच्याकडे केवळ त्याच भूमिकेतून पाहणे उत्तम. वाद प्रत्यही घडत असतातच, पण एकदा का निवडणूक प्रक्रिया संपली की निवड झालेली व्यक्ती ही आपलीच असते.... होते....व्हावी.
अशोक पाटील
Sahitya sammelan election is
Sahitya sammelan election is just like Ganpati Mandal election. That is internal matter of that Mandal.
मसापच्या लोकानी लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडला, इथे विषयच समाप्त होतो... तो त्यांचा प्रतिनिधी असल्याशी कारण. तो लोकांचाही प्रतिनिधी असायलाच हवा, ही अपेक्षाही मुळात चुकीची नाही का?
This is very true.It is a Galli event. and does not reflect marathi mind. As Mango 1 says, this Galli Adhyaksh need not be adhyaksha of marathi literature world.
Leave it .Úmbaraatale KiDe MakoDe...
तेच तर. इथले निकष ठरलेत
तेच तर. इथले निकष ठरलेत बहुमताचे, त्याप्र्माणे मराठे आले असते तर त्यांचेही आम्ही अभिनंदनच केले असते. कुणीही त्यानुसार यावे निवडून.
विद्यापीठाच्या मराठीच्या सिलॅबसमधील कथा-कादंबरी-कविताही बदलता येत नाही त्या वर्षभरात अध्यक्षांना.
. त्याना हे अधिकार नसतातच. कशाला त्यानी धडे आणि कविता बदलत बसायचे? सम्मेलन साजरे करावे, लोक , लेखक , प्रकाशक यांच्यात एक आनंदाची भावना निर्माण व्हावी, इतकाच तर सम्मेलनाचा उद्देश.. ते सोडून कुठल्या उच्चभ्रू जातीवर म्हणे अन्याय झाला, त्यांचे मी पुनरुत्त्थान करणार, असला आक्रोश माजला, तेंव्हा कुणी काही नाही बोलले, आणि एक बहुजन मनुष्य अध्यक्ष झाला तर चालू झाले दळण , की हे सामान्यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत म्हणून.
साक्षात गोबेल्सने यांच्याकडे शिकवण्या लावायला हव्यात.
>>मसापच्या लोकानी लोकशाही
>>मसापच्या लोकानी लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडला, इथे विषयच समाप्त होतो... तो त्यांचा प्रतिनिधी असल्याशी कारण.>>
मसापच्या किती मतदात्यांनी कोत्तापल्ले यांना मतदान केले होते हे मला माहित नाही. मात्र, "मसाप ही मातृसंस्था असल्याचा उल्लेख डॉ. माधवी वैद्य यांनी केला" आणि म्हणून सत्कार केला जात आहे असे त्या म्हणाल्या.
अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णींशी दोन महिन्यांपूर्वी संवाद झाला. त्यावेळी द.भि. म्हणाले, की मी कुठल्याच साहित्य संस्थेचा सदस्य नव्हतो. तसेच मतदारही नव्हतो. तरी मी निवडला गेलो आणि निवडला गेल्यामुळे आता मी कायमचा सदस्य आपोआपच झालो.
दभिंच्या या बोलण्यामुळे मला बरे वाटले ते हे की, कोणी सदस्य असण्याची आवश्यकता नाही. आपले काम करूनही अध्यक्ष होता येते.
सध्या निवड झालेले कोत्तपल्ले हे मला वाटते अ.भा. साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष की काय असे होते.
आणखी एक गोष्ट म्हणजे, केवळ १००० च्या आसपास मतदार आहेत निवडीसाठी.
What r criteria to become
What r criteria to become member of MSP? I heard they r not allowing new people to become member to protect their lobbies and groups. Can anybody tell provisions of constitution of MSP. They and their behaviour is not less than any Devasthan committee. Thanks god they do not have abundant money like Devasthans....
श्री.जोशी.... तुम्ही द.भि.
श्री.जोशी....
तुम्ही द.भि. यांच्याबाबतीत सांगितलेली गोष्ट सत्यच आहे. ते मसापचे जसे सदस्य नव्हते त्याचप्रमाणे मतदानाचा हक्कही नव्हता त्याना. इतकेच काय यंदाच्या निवडणुकीसाठी जे चार उमेदवार रिंगणात होते त्यांच्यापैकी एकालाही मतदानाचा अधिकार नव्हता. अध्यक्षपदासाठी ज्या व्यक्तीचे नाव सुचवायचे असते ती व्यक्ती "साहित्यिक" या नामाला पात्र आहे आणि तिच्या नावाचा पाठपुरावा मसापशी संलग्न असलेल्या घटक तसेच संलग्न/सहयोगी संस्थेस करता येतो, इतकाच निवडणूकीच्या पात्रतेचा क्रायटेरिया आहे.
महामंडळाच्या अशा एकूण चार घटक संस्था आहेत....त्या अशा : १. औरंगाबाद मराठवाडा साहित्य परिषद, २. नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ, ३. मुंबई साहित्य संघ आणि ४. पुणे स्थित महाराष्ट्र साहित्य परिषद..... यांच्या व्यतिरिक्त हैद्राबाद, रायपूर, बडोदा, गोवा व गुलबर्गा या पाच ठिकाणी महामंडळाच्या सहयोगी संस्था आहेत. ४+५ अशा संस्थेतील आजीव सदस्यांची संख्या [अंदाजे] १७ हजाराच्या आसपास आहे. मात्र ह्या सर्व सदस्यांना "साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक प्रक्रिये" तील मतदानाचा अधिकार नाही. प्रातिनिधिक स्वरुपात मतदार निवडले जातात. म्हणजे मागील वर्षी 'अ' सदस्य कोल्हापूर शाखेतील पात्र मतदार असेल तर तो याही वर्षी मतदार असेलच असे होत नाही. त्याच्या जागी ती संस्था 'ब' चे नाव सुचवू शकते. असे वेचक मतदार या घडीला आहेत १०५८. याशिवाय ज्या ठिकाणी 'संमेलन' भरणार असते तेथील यजमानपद स्वीकारलेल्या स्थानिक साहित्यसंस्थेला ८० मतांचा अधिकार असतो.
निवडणूक लढविणार्या पात्र उमेदवारांना या मतदारांना प्रत्यक्ष भेटण्याचा अधिकार दिलेला असतो.....त्यानुसार प्रचाराच्या निमित्ताने इच्छुक तसेच त्यांचे प्रतिनिधी या मतदारांना नक्कीच प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करीत असतात. हे महामंडळास मान्य असल्याने त्याविरूद्ध कुणी तक्रार करण्याचे कारण नसते.
निवडीची ही पद्धत योग्य की अयोग्य यावर नित्यनेमाने वितंडवाद झडत असतात. तरीही गेली कित्येक वर्षे महामंडळाने या नियमावलीत फरक केलेला नाही.
अशोक पाटील
Mr patil, It is very
Mr patil, It is very undemocratic way of election. In co-opertive institutions new members are not created by means of refusing memberships to new aspirant members. It is to maintain the majority original Co-operative Goondas in institute. It is just like that. These seem to be Literature Goondas....
लिटरेचर गुन्डा साहित्यिक
लिटरेचर गुन्डा
साहित्यिक व्हावा ऐसा गुन्डा, ज्याचा सर्व संस्थी झेन्डा !
अरे फार्टुकानंदा, तुझ्या
अरे फार्टुकानंदा, तुझ्या कळफलकातून मराठी भाषा झडून गेली काय रे?
त्याना हे अधिकार नसतातच.
त्याना हे अधिकार नसतातच. कशाला त्यानी धडे आणि कविता बदलत बसायचे? सम्मेलन साजरे करावे, लोक , लेखक , प्रकाशक यांच्यात एक आनंदाची भावना निर्माण व्हावी, इतकाच तर सम्मेलनाचा उद्देश.. ते सोडून कुठल्या उच्चभ्रू जातीवर म्हणे अन्याय झाला, त्यांचे मी पुनरुत्त्थान करणार, असला आक्रोश माजला, तेंव्हा कुणी काही नाही बोलले, आणि एक बहुजन मनुष्य अध्यक्ष झाला तर चालू झाले दळण , की हे सामान्यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत म्हणून.<<<
ठळक केलेल्या वाक्याबाबतः
साहित्य संमेलन हे शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रमाणे नसते हे लक्षात घ्यायला हवे. साहित्य संमेलन का भरवले जाते, त्याची आवश्यकता काय, उद्दिष्ट काय, त्याला अध्यक्ष हवाच कशाला, तो नियुक्त होण्याची प्रक्रिया काय असावी, मतदानाचे अधिकार कोणाला असावेत, निवडून आल्यानंतर त्याने काय किमान बाबी करणे आवश्यक आहेत या सर्वांबाबत काही सर्वमान्य अपेक्षा आहेत. जसे द भिं ना एक लाख रुपये शासकानडून मिळाले होते. हे एक लाख रुपये त्यांना अध्यक्ष या भूमिकेतून महाराष्ट्रात प्रवास करून निरनिराळे साहित्य प्रवाह, प्रकाशात येण्याच्या पात्रतेचे पण काही कारणाने प्रकाशात येऊ शकत नसलेले साहित्य कसे समाजाभिमुख करता येईल हे पाहणे, आजची संस्कृती व तिच्याशी आजच्या, कालच्या व उद्या येऊ घातलेल्या साहित्यकृतींमधील 'अर्काचा' ताळमेळ बघणे व समाजमनाला एक सकारात्मक वैचारीक कल मिळेल हे बघणे यासाठी होते.
कवींच्या ओळी (जसे इक्बालच्या 'सारे जहाँसे अच्छा') देश फिरवू शकतात, क्रांती घडवू शकतात, समाजमन बनवू शकतात. या सामर्थ्याचे वरील सीमीत भूमिकांचे प्रतिसाद देताना विसर पडलेला दिसतो किंवा ते माहीतच नसल्याचे आढळते. साहित्यकृतींनी समाज ढवळून निघू शकतो, आमुलाग्र बदलू शकतो किंवा सुधारणावादी होऊ शकतो हे सर्वमान्य तत्व असल्याने साहित्य संमेलनातून साहित्यीक - सामाजिक अपेक्षा ठेवल्या जातात. (येथे ह मो चुकले हे ह मों च्या कदाचित घरचेही म्हणतील इतकेही म्हणायला वाव आहे).
१. मुळात मराठी माणूस मत्सरी आणि घाबरट असतो. दुसर्याला चांगले म्हणण्यातून आपण घसरू असे काहीसे गृहीतक त्याच्या मनात असते. दिलदार स्वभावाची वानवा मध्यप्रदेशच्या खाली सुरू होते आणि महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर ती वानवा संपते. गुजरात, मध्यप्रदेशमध्ये कलाकाराला त्याच्या भोवतालची रसिक मंडळी इतका रसिकाश्रय देतात की त्याला त्यातून अधिक श्रेष्ठ साहित्यनिर्मीतीचे प्रोत्साहन मिळते. यूपी, बिहार, दिल्ली, पंजाब आणि इतर उत्तर भारतात तर हे अधिकच होते. मराठी माणूस प्रथम दुसर्यावर टीका करतो, त्यातून स्वतः कोणीतरी आहोत हे आधी सिद्ध करून ठेवतो आणि मग 'मी तरीही क्षमाशीलपणे या कलाविष्काराबाबत / नियुक्तीबाबत काही बोलणार नाही कारण माझे हेतू उदात्त आहेत' असे म्हणून स्वतः महान ठरतो. हे दुर्दैवी असून हे आपल्या मातीत आहे. ते बदलणे सोपे नाही.
२. संमेलनाला निधी पुरवणारे शासन संमेलनातून निघू शकणार्या सामाजिक जडणघडणीसाठी केलेल्या सहभागाबाबत अपेक्षा ठेवत नाही. वास्तविक पाहता 'काय केलंत काय या निधीतून' असा प्रश्न विचारणे गैर नाही. पण 'कलेला कुठे मर्यादा असते?' असे छापील उत्तर फेकून त्यांची बोळवण केली जाईल. विचार केला तर पटेल की साहित्य संमेलनाला अजून वीस वर्षांनी कुणी प्रत्यक्ष जात बसेल का? की ऑनलाईन सोहळ्यात सहभागी होतील? गंमतीशीर आहे. आज सगळे प्रत्यक्ष भेटतात. उत्तम कांबळेंसारखे जबाबदार लोक अध्यक्ष होतात आणि चीजही करतात त्या पदाचे. ह मों सारखे लोक विनाकारण जातपातही आणू शकतात. पण वरदांनी उल्लेखिल्याप्रमाणे रस्त्यावरून (टिळक रोडवरून मसापबाहेरून) गर्दीला भिडत स्कूटरवरून जाणार्या सामान्य माणसाला त्यातून काही मिळत नाही. समाजातील उपेक्षित घटकांना कोणत्याही आशेची चाहुल लागत नाही. शेतकर्यांना गर्दी करावीशी वाटत नाही कारण त्यांचा आवाज तेथे येत नाही. राजकारण्यांना संमेलन कधी एकदा संपतंय असे वाटत नाही कारण त्यांच्या भ्रष्ट कारकीर्दीचा धाडसी आणि रोखठोक आढावा संमेलनात घेतला जात नाही. संमेलनात साहित्याची आजची परिस्थिती, उद्या असलेल्या अपेक्षा असल्या गुळमुळीत विषयांवर भाषणे घडतात. चोवीस तास कार्यरत असलेला एक 'कवी मंच' स्थापन करण्यात येऊन त्यावर सूत्रसंचालक म्हणून 'नकवींची' वर्णी लागते आणि वय वर्षे दहा ते वय वर्षे नव्वद यातील कोणताही इच्छुक स्टेजवर येऊन पाऊस, माहेर असल्या चोथा कविता ऐकवत बसतो. पुस्तकांची विक्री होते पण कोणाला आपली पुस्तके छापताच येत नाहीत हे अध्यक्ष आपल्या भाषणात सांगत नाहीत. नवीन पिढी आंतरजालावर अधिक लिहिते याकडे कानाडोळा केला जातो कारण स्वतःला त्यातले काही कळत नाही. साहित्यिकांनी फक्त साहित्यावरच बोलावे असा अत्यंत मर्यादीत समज करून घेऊन व पसरवून देऊन वार्तालाप होतात. अमिताभ बच्चनच्या गेल्या दहा पिढ्यांचा मराठीशी संबंध नसला तरी त्याला पाचारण करण्यात येते. मुस्लिमांनी केलेल्या संमेलनात त्यांचे सामाजिक प्रश्न इतक्या भयानक तीव्रतेने मांडले गेले की ते न पटणार्यांचे आणि पटणार्यांचे दोघांचेही रक्त उसळावे. कोणीतरी वर म्हंटले आहे की त्यात काय झाले ते लिहिलेले नाही. मी एका वृत्तांतात एक पॅरा त्यावर लिहिला आहे तो पुढील प्रतिसादात कॉपी पेस्ट करेन. आपली तसे करण्याची हिम्मतच होत नाही.
३. लोकशाही पद्धतीने निवडणूक असली तरी वर्षानुवर्षे गोठ्यातल्या साखळ्या धरून चरत बसलेलीच नांवे पुन्हा पुन्हा मतदार म्हणून समाविष्ट होतात हे कोणी लक्षात घेत नाही. ही निवडणुक लोकशाही पद्धतीने होते हे अगदी खरे. पण मतदार दशकानुदशके तेच राहतात आणि सामान्य माणूस त्या चाळीस पन्नास वर्षात इतका पुढे जातो की त्याच्या त्या पुढे जाण्याचे प्रतिबिंब या दशकानुदशकेवाल्या मतदारांच्या साहित्यात जाम म्हणून आढळत नाही. याचा अर्थ 'द सेम सेट ऑफ पीपल कीप ऑन व्होटिंग विदाऊट इव्हन नोटिसिंग द वर्ल्ड अराऊंड देम अॅन्ड द चेंजेस इन दॅट'! आणि मुख्य म्हणजे यांच्या नावाला (पुन्हा मराठी घाबरटपणामुळेच) प्राप्त झालेली वलये इतकी स्ट्राँग असतात की ह्यांनाच बाजूला करा म्हणण्याची कोणाची छातीच होत नाही.
या सर्वांमुळे ते लोकशाही पद्धतीने निवडून आलेले अध्यक्ष हे निव्वळ त्या 'काहीशे' मतदारांचेही पुरेसे प्रतिनिधित्व करणारे नसतात. वर श्री अशोक साहेब यांनी म्हंटल्याप्रमाणे एखाद्या आदरणीय उमेदवाराला बिनविरोध पद मिळावे या विचारापासून तर बाकीचे योजने दूर असतात.
तेव्हा, आंबा म्हणतात ते निव्वळ टेक्निकॅलिटीजबाबत आहे, पण आपण वक्तव्ये, निर्णय, घटना या सर्व गोष्टी सुयोग्यपणे 'क्वॉलिफाय' करायला हव्यात.
-'बेफिकीर'!
त टी १ - पुढील एका प्रतिसादात मुस्लिम संमेलनात एक दोन मते मांडण्यात आल्याचा उल्लेख मी जेथे केला होता तो पेस्ट करणार आहे.
त टी २ - या गेल्या काही दशकांत प्रामुख्याने मराठी कवींनी मुक्तछंदावर जोर दिल्यामुळे दैनंदिन जीवनातून काव्य व काव्याची गोडी हारवली व त्यामुळे साहित्यीक आणि आम समाज एकमेकांपासून दूर गेले याबाबत जमल्यास तिसर्या प्रतिसादात लिहीन.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/26701
===============================
>>>स्वातंत्र्यानंतर ६३ वर्षांनंतरही मुस्लिम माणूस अजून मागेच का! या विषयावरचा अती लांबलेला परिसंवाद आता शेवटाला आलेला होता. एक हिंदू वक्ता भाषण करत होता. आणि त्या भाषणाचे शब्द ऐकू आले तसा मी आत धावलो. आतमध्ये तमाम गर्दीत बहुसंख्य मुस्लिम कुटुंबे होती. तो वक्ता हिंदू असूनही म्हणत होता.
"अरे कशासाठी चातुर्वर्ण्य काढलेत तुम्ही? हजारो जाती आहेत तुमच्यात? एकही मंत्रीमंडळ तुम्ही आंबेडकरांचा उल्लेख झाल्याशिवाय स्थापन करू शकत नाही"
वगैरे वगैरे!
त्याच्या वाक्यांवर मुस्लिम कुटुंबांमधील पंधरा वर्षांची मुलगीसुद्धा खळखळून हासून दाद देत होती. माझे रक्त उसळ्या मारत होते. ज्या मनस्थित्त मी आत धावलो होतो ते पाहून मला शोधायला कैलास आणि निशिकांत आत आले होते हे मला नंतर समजले. मी सरळ पहिल्याच रांगेत जाऊन बसलो. अचानक हा कोण आला हे माझ्या शेजारचे दोन मुसलमान बांधव चक्रावून पाहू लागले. मी वक्त्याकडे रागाने पाहात आहे हे जाअवल्यावर त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली. मला ते भाषण थांबवायचे होते. पण तेवढ्यात ते दोघे तेथून उठले आणि मागच्या रस्त्याने स्टेजवर गेले. त्यांच्यासोबत आणखीन दोन मुस्लिम बांधवही स्टेजवर आले व कुणालातरी काहीतरी सांगू लागले. ते पाहिल्यावर मात्र मला जाणवले की आपण एकाकी आहोत. आपण अत्यंत सामान्य आहोत. आपला इथे पार पार कचरा होऊ शकतो. घाबरून मी ताडकन उठून बाहेर आलो. कुणालाच समजले नाही की मी कुठे गेलो. स्वातीताईंनी मला हाक मारून 'बिल तयार आहे' असे सांगीतले. भयंकर भडकलेलो असल्याने मी त्यांना 'नकोयत ती पुस्तके' असे ओरडून सांगीतले.
मग आम्ही सगळेच आवारात येऊन एका झाडाखाली बसलो. प्रत्येकालाच राग आलेला होता. त्यातच आम्हाला धुळ्यातील प्रज्ञा सोनगडकर या प्राध्यापिका भेटल्या. त्यांनी आदल्या दिवशीच्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेले होते. त्या तर म्हणाल्या की काल झालेले प्रकार तर बघवतही नव्हते. हा खरे तर एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता. संयोजक अतिशय चांगल्या मनाचे मुसलमान बांधव होते. पण काही हिंदू वक्त्यांनी चीप पॉप्युलॅरिटीसाठी त्या व्यासपीठाचा गैरफायदा घेतलेला होता.
कैलास व निशिकांत यांनी प्रचंड संयम राखलेला होता. स्वातीताई मात्र 'आत्ताच्या आत्ता आपण इथून निघू' असेच म्हणू लागलेल्या होत्या. पण शेवटी आपल्याच मित्रांची गझल ऐकायची होती. त्यासाठीच एवढा अट्टाहास केलेला असताना असे जाणे पूर्णपणे अयोग्यच होते.<<<
Pages