मिनी माबो गटग 'झिंग' - वृत्तांत

Submitted by बेफ़िकीर on 20 June, 2011 - 03:17

सर्व छायाचित्रे एकत्रीत स्वरूपात शेवटी दिलेली आहेत. दिसली नाहीत तर पुन्हा प्रयत्न करेन. कैलासरावांनी व्यवस्थित सूचना दिल्या असूनही छायाचित्रे दिसली नाहीत तर तो दोष माझा आहे.
==============

ऊन प्यायला, पावसात वाळला कधी
कवी जगाला हवा तसा वागला कधी

झिंग!

या एकाच शब्दात १८ आणि १९ जून २०११ या दोन दिवसांचे वर्णन होऊ शकेल.

"आज सकाळपासून उद्या रात्रीपर्यंत तुला जे हवे ते कर" असे जर कुणी सांगीतले आणि वेळ, जरूरीपुरते पैसे, वाहन, सुट्टी, ताणविरहीत मनस्थिती आणि हवे ते सवंगडी असले तर?

केवढे तोषणे हे मजल दरमजल
कोण जाणे कुणी आखली ही सहल

"हां भूषणजी... मी येतोय... निशिकांतजींच्या घरी जाऊन तुमच्याइथे येतो मग निघू"

कैलासरावांचा हा फोन आठवडाभर येत होता. मी ती कॉल्सची हिस्टरी यशःश्रीला दाखवली कारण तिला खरे वाटायला पाहिजे की निदान यावेळेस तरी नवरा एकटाच भरकटायला चाललेला नाही. मग हळूहळू तीच विचारायला लागली, किती वाजता निघणार, केव्हा येणार, कोण कोण आहे?

अखिल भारतीय मुस्लिम मराठी संमेलनातील 'मिला जुला मुशायरा' या कार्यक्रमासाठी डॉ कैलास गायकवाड आणि श्री निशिकांत देशपांडे यांना आमंत्रण आहे.

असे मी तिला सांगीतल्यानंतर साहजिकच प्रश्न आला.

"मग तू का चाललायस?"

मग मी भकास चेहरा करून शुन्यात पाहिल्याप्रमाणे सद्गदीत स्वरात एक वाक्य फेकले.

"मराठी कवींनीच मराठी कवींना दाद न देऊन लहान केलेले आहे"

"जाSSSSS"

विषय संपला! मग फोनाफोनी वाढली आणि शुक्रवार उजाडेपर्यंत असे वाटू लागले की च्यायला खरच आपण जातोय की काय!

मग मी एक एसेमेस केला.

'उद्या सकाळी तयार राहा, परवा रात्री परत यायचं आहे, आणि पंधराशे बजेट तयार ठेवा'

यावर फक्त आणि फक्त 'ओके' असे उत्तर आले. नो क्वेश्चन्स आस्क्ड!

सौ. स्वाती सामक! वय वर्षे सदुसष्ट! दर वर्षी मनाने तरुण होणारी कवयित्री! मी कधीच मरणार नाही असे ठामपणे सांगत जीवनाचा संपूर्ण आनंद घेत असतानाच अत्यंत हळुवार तरल अशा ओळींनी श्रोत्यांना गंभीर बनवणारी कवयित्री!

स्वाती सामक येणार हे बायकोला सांगीतल्यावर ती म्हणाली त्यांना तिथे बोलावलंय का?

"छे?"

"मग?"

"मग काय? मला तरी कुठे बोलावलंय?"

"काय चाललंय तुमचं... खरच... नुसते फिरायला चाललेला आहात सगळे... हो ना?"

"सॉरी..."

माझे ते 'सॉरी' इतके प्रामाणिक होते की तिने लगेच समजुतदार पत्नीसारखा चेहरा केला.

जगाला भेडसावे ही समस्या भांडताना
मला माझा असावा तेवढा अभिमान नाही

शनिवार उजाडला तेव्हा मी पहिला फोन कैलासरावांना केला.

"गाडीतच आहे... पोचतोय"

"निशिकांतरावांकडे जा... तिथून यशवंतरावपशी या.."

आता सहलीत सगळेच 'राव' असल्याने यशवंतराव हे एक नाट्यगृह आहे हे नॉनपुणेकरांना सागायला हवे.

दहाव्या मिनिटाला निशिकांत देशपांडेंचा फोन!

"तुम्ही जॉईन व्हाल का? डॉक्टरांना नाश्ता करायचाय"

तोवर यशःश्री ऑफीसला गेलेली असल्याने मी चेहर्‍यावरचा आनंद अजिबात न लपवता बोलू लागलेलो होतो. तरीही शुद्ध पुणेकराप्रमाणे मी त्यांना 'चंद्रलोक किंवा वेदान्तला नाश्ता घ्या, मी तिथे येतोच' असे'च' म्हणालो, 'अहो मग घरीच या की' वगैरे म्हणणे मला सुचलेच नाही हे नंतर प्रवासात सांगून उगाचच श्रेय घेतले.

इडली, वडा व चहा असा नाश्ता करून आणि पेट्रोल भरून आम्ही तिघे स्वातीताईंच्या घरापाशी पोचलो.

चाललो होतो पुढे मी आपल्या धुंदीमधे
वाटले नव्हते मला की थांबली असशील तू

एक प्रभावी घटक गाडीत येऊन बसला आणि त्या गाडीत बसल्याच्या क्षणी मी नेहमीजे वाक्य बोलतो तेच वाक्य बोललो.

"पर्स तिकडे घ्या... गिअर टाकताना अडथळा येतो"

"कळतं मला... बसल्या बसल्या भांडायला लागू नकोस"

स्वाती सामक व कैलासराव, निशिकांतराव यांचा परिचय निशिकांत यांच्या घरी झालेल्या गुप्त मराठी गझल मुशायर्‍यात झालेला होताच. गुप्त अशासाठी की त्याचा वृत्तांतच आम्ही दिलेला नाही. इलाही जमादारांनी हेड केलेल्या त्या मुशायर्‍यात मिल्या आणि आनंदयात्री तसेच आम्ही चौघेही सहभागी झालेलो होतो व देशपांडेच्या अप्रतीम वास्तूत त्यांच्या पत्नीने केलेली सरबराई आणि चिरंजीवांनी केलेली मदत येथे सांगायची राहूनच गेली.

सहल सुरू झाली.

आणि कात्रजच्या बोगद्यात पहिली कविता झडली. स्वाती सामकांनी आपला परिचय अधिक नीट व्हावा यासाठी त्यांची अप्रतिम कविता ऐकवली.

मी इथवर चालत आले त्या एका कवितेसाठी
यापुढील जगणे माझे बस एका कवितेसाठी

पहिला टोलनाका पार केला तेव्हा कवितेची झिंग मनामनांवर पसरलेली होतीच! कोण कुणाचे कुणी नाही. देशपांडे औरंगाबादहून पुण्यात येऊन निवृत्त आयुष्य जगत आहेत. स्वाती सामक या मालेगावचे माहेर सोडून 'य' वर्षापुर्वी पुण्यात येऊन स्थायिक झालेल्या असल्या तरी पुणेकर म्हणवून घ्यायला तयार नाहीत. डॉ. कैलास गायकवाड नवी मुंबईचे! देशपांडेंचे वय असेल चौसष्ट! स्वातीताई सदुसष्ट! कैलास गायकवाड छत्तीस! आणि मी शुद्ध पुणेकर, एक्केचाळीस!

कवितेने कोण कुणाचे मित्र होईल काही सांगता येत नाही.

जणू वर्षानुवर्षे आरामात मैत्री टिकवून आहोत अशाच मूडमध्ये प्रवास सुरू झाला आणि मी निशिकांतरावांना सांगीतले.

"हा घ्या कागद आणि पेन! या क्षणापासून होईल तो सर्व खर्च सर्वांनी समान वाटून घ्यायचा"

हे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळले. हिशोब तो हिशोब! मैत्री ती मैत्री!

"मी बँकिंगमधून निवृत्त झालो तरी हे माझ्या नशिबात आहेच" असे म्हणून निशिकांतरावांनी वैतागल्याचा मिश्कील अभिनय केला.

मित्र प्रत्येकास होता, एकटे नव्हते कुणी
बेहिशोबी मालमत्ता राहिली नव्हती तिथे

आणि मग सुरू झाला दौरे-मैफील! स्वातीताईंनी 'मुलगी लग्न करून सासरी जाताना वडिलांच्या भावना कशा असतात' हे दर्शवणारी कविता ऐकवली तर निशिकांत यांनी त्यांची गझल! मात्र प्रत्येकजण कविता ऐकवत असतानाच कैलासरावांमधील गायक जाणवू लागला. सातार्‍याच्या पहिल्या क्रॉसिंगला किंगफिशर माईल्डच्या तीन (फक्त तीनच, डॉक्टर घेत नाहीत ) बाटल्या घेऊन पुढचा प्रवास सुरू झाला तेव्हा कैलासरावांनी गिनीचुनी जुनी हिंदी गीते गायला सुरुवात केली.

स्तब्ध शांतता, आजूबाजूला पूर्ण हिरवाई, सुखद हवेचे प्रवाही झोत, त्यांनी प्रत्येकाच्याच केसांचा अवतार झालेला, किंगफिशर माईल्डची तरलता मनावर पसरलेली, चौघांपैकी एक जण गुडांग गरम धरलेला हात बाहेर ठेवून रस्त्याकडे एकटक पाहत अ‍ॅक्सीलरेटर ताणतोय, शंभरच्या पुढचा वेग आणि कैलासरावांची गाणी!

लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो
शायद फिर इस जनममे मुलाकात हो न हो

खरेच होते! कित्ती कित्तीही प्रयत्न केले, अगदी तोच ग्रूप, तेच वाहन, तीच ठिकाणे आणि तेच वार ठरवले तरी ओरिजिनल क्षणांची मजा पुनर्निमीत करता येत नाही. ही वेदना असते, सुख नसते हे! पुन्हा ते क्षण नाहीच येत. म्हणून तर 'याद', म्हणजे स्मृती ही बाब इतकी आवश्यक असते. आपण ते क्षण जगलो होतो ही हुरहूर पुढचे क्षण जगण्यासाठी आधार देत असते.

मै पल दो पलका शायर हूं
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है

कैलासराव मागच्या सीटवरून एकटक रस्त्याकडे पाहात एकावर एक उत्तम गीते गात होते.

काय रस्ता होता तो! हिरव्या झाडांच्या बोगद्यातून मृद्गंध घेत घेत आणि पिसासारखे हलके होत होत इतकी सुंदर गाणी? हा माणूस माबोला मुकलेला नाही.... माबो त्याला मुकली!

अरे हो!

त्यातच माबोचा विषय सुरू झाला. माबोशीच काय पण इंटरनेटशी काहीही संबंध नसलेल्या स्वातीताईंना आमच्या तिघांच्या गप्पांमधील ओ का ठो कळत नव्हते. पण आमचा तिघांचा तो इन्टरेस्ट जागृत झाला तो झालाच! मग कैलासरावांनी माझे ज्ञान वाढवायला सुरुवात केली. 'हा आयडी म्हणजे तो हाच आहे, ही म्हणजे ती तिच आहे' वगैरे वगैरे! आज या क्षणी हा वृत्तांत लिहिताना माझ्या माबोवरील शत्रूंच्या संख्येत किमान दहाने वाढ झालेली आहे व याचे संपूर्ण श्रेय कैलास गायकवाड या वैद्याला जाते. कारण काही काही डुप्लिकेट आय डी प्रत्यक्षात कोण आहेत हे मला माहीतच नव्हते, ते आता माहीत झालेले आहेत.

या गप्पा डोक्यावरून चाललेल्या असल्याने स्वातीताईंनी त्यांच्या पर्समधून एक लाल रंगाचा 'लवंग व वेलदोडा' असलेला बटवा काढून डॅशबोर्डवर ठेवला. हा 'राग' प्रदर्शीत करणारा बाहुला आहे हे माझ्या लक्षात आले तरीही मी तसे बोलून दाखवले नाही. कारण त्यातील जिनसामलाही हव्याच होत्या.

मात्र स्वातीताईंनी 'आंतरजालीय गप्पा बास' असे कळवळून, तळमळून आणि हळहळून सांगीतल्यावर वेगळे विषय निघू लागले. तोवर 'माझी अतीप्रसिद्ध आंतरजालीय भांडणे' हे अनेक अध्याय असलेले तोंडी पुस्तक मी वाचून पूर्ण केलेले असल्याने आता माझे शत्रू निशिकांत व कैलास यांना माहीत झालेले होते व दोन दिवस मला त्या शत्रूंबद्दल आता काहीही चांगले ऐकायला लागणार नाही या आनंदात मी एकशे पंधरा वरून एकशे वीसवर गेलो. हे आकडे 'किलोमीटर्स पर अवरचे' असून 'झिंग पल मिलीलीटरचे' नाहीत हे सांगणे न लगे!

आता मी व कैलासराव एकत्र गाऊ लागलो.

चढता सूरज, किसीके मुस्कुराहटोंपे, मंजिले अपनी जगह है अशा वाट्टेल त्या व्हरायटीमधून गात गात शेवटी साई इन्टरनॅशनल या 'रूरल' परंतु खूपच चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो.

निशिकान्त व कैलास यांच्या तेथील एक स्थानिक कोंबडी डोळ्यात भरल्याने ती कापली गेली. मात्र खाताना आम्ही तिघांनी खाल्ली! स्वातीताई 'रसिकांचे डोके' सोडले तर बाकी शाकाहारी आहेत. बीअर, गाणी, वारा, वेग आणि कोंबडीची (म्हणजे कोंबडीमुळे आम्हाला आलेली) सुस्ती असे परिणामकारक घटक अनुभवत चांडाळ चौकडी सांगली फाट्याला वळली आणि बर्‍याच अंतरावर गेल्यानंतर एका चहाच्या स्टॉलवर पहिले मतभेद झाले. म्हणजे आमच्या चौघात नव्हेत, तर चहावाल्याशी माझे! त्याने एक अगम्य मसाला टाकून चहा केलेला होता जो सुरुवातीला रूह अफजासारखा लागून घशातून खाली उतरताना मस्तानी, चहा आणि सुंठेचा काढा एकत्र प्यायल्यावर लागेल तसा लागत होता. तसेच हा परिणाम किंगफिशर माईल्डचा नव्हता हे रोखठोक नमूद करत आहेच!

ते मतभेद का मिटले हे मात्र मला अजूनही आठवत नाही. माझा तोपर्यंत लाकडी ड्रायव्हर झालेला होता.

सांगलीला पोचण्याआधी माझ्याकडे ज्या हॉटेल्सचे नंबर्स होते त्यांना फोन करून मी त्यांना फोन केल्याबद्दल माफी मागून तो विषयही संपवलेला होता. एकेक रूम दोन दोन हजारच्या पुढची! ही काय ऑफिशियल ट्रीप आहे होय? कविता ऐकायला एवढा खर्च कोण करणार? वगैरे विचार माझ्या मनात 'माझ्या कविता इतरांनी ऐकाव्यात असे मला वाटते' हे आठवत असूनही आलेच!

नशीबावर भरोसा ठेवून फिरल्यानंतर सदानंद नावाच्या एका बर्‍यापैकी हॉटेलमध्ये चार रूम्स मिळाल्या व प्रत्येकानेच थोडी थोडी विश्रांती घेतली.

रात्री नऊ वाजता मुशायरा सुरू होणार होता व त्यापुर्वी निमंत्रितांच्या भोजनाचा कार्यक्रम असल्यामुळे निशिकांत व कैलास दोघे पुढे निघून गेले. मात तेथील परिसंवाद फारच लांबल्यामुळे त्यांनाही तेथे भोजनाचा आस्वाद घेता आलाच नाही व त्यांनी कोठेतरी इतरत्र भोजन घेतले. तोवर मी व स्वातीताई तेथे पोचलो.

विष्णूदास भावे नाट्यमंदीरात तीन दिवस हे संमेलन चाललेले होते. मुशायरा दुसर्‍या दिवशी, म्हणजे शनीवारी रात्री होता. खचाखच गर्दी असलेल्या त्या आवारात सर्वत्र मुस्लिम बांधव होते. प्रवेशद्वारापाशी पुस्तकांचे पाच, सहा स्टॉल्स होते.

मला तेथे पर्वणीच वाटली कारण जाँ निसर अख्तर, इन्शा, मुनव्वर राणा, कतील शिफाई, बशीर बद्र, परवीन शाकिर, वसीम बरेलवी अशा अनेकांचे गझलसंग्रह दिसत होते. कैलासराव व निशिकांत एका स्टॉलवर तर मी व स्वातीताई दुसर्‍या स्टॉलवर असताना मी आठ पुस्तके निवडली व त्यांचे बिल करायला सांगीतले. मात्र त्यातच तो प्रकार झाला.

स्वातंत्र्यानंतर ६३ वर्षांनंतरही मुस्लिम माणूस अजून मागेच का! या विषयावरचा अती लांबलेला परिसंवाद आता शेवटाला आलेला होता. एक हिंदू वक्ता भाषण करत होता. आणि त्या भाषणाचे शब्द ऐकू आले तसा मी आत धावलो. आतमध्ये तमाम गर्दीत बहुसंख्य मुस्लिम कुटुंबे होती. तो वक्ता हिंदू असूनही म्हणत होता.

"अरे कशासाठी चातुर्वर्ण्य काढलेत तुम्ही? हजारो जाती आहेत तुमच्यात? एकही मंत्रीमंडळ तुम्ही आंबेडकरांचा उल्लेख झाल्याशिवाय स्थापन करू शकत नाही"

वगैरे वगैरे!

त्याच्या वाक्यांवर मुस्लिम कुटुंबांमधील पंधरा वर्षांची मुलगीसुद्धा खळखळून हासून दाद देत होती. माझे रक्त उसळ्या मारत होते. ज्या मनस्थित्त मी आत धावलो होतो ते पाहून मला शोधायला कैलास आणि निशिकांत आत आले होते हे मला नंतर समजले. मी सरळ पहिल्याच रांगेत जाऊन बसलो. अचानक हा कोण आला हे माझ्या शेजारचे दोन मुसलमान बांधव चक्रावून पाहू लागले. मी वक्त्याकडे रागाने पाहात आहे हे जाअवल्यावर त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली. मला ते भाषण थांबवायचे होते. पण तेवढ्यात ते दोघे तेथून उठले आणि मागच्या रस्त्याने स्टेजवर गेले. त्यांच्यासोबत आणखीन दोन मुस्लिम बांधवही स्टेजवर आले व कुणालातरी काहीतरी सांगू लागले. ते पाहिल्यावर मात्र मला जाणवले की आपण एकाकी आहोत. आपण अत्यंत सामान्य आहोत. आपला इथे पार पार कचरा होऊ शकतो. घाबरून मी ताडकन उठून बाहेर आलो. कुणालाच समजले नाही की मी कुठे गेलो. स्वातीताईंनी मला हाक मारून 'बिल तयार आहे' असे सांगीतले. भयंकर भडकलेलो असल्याने मी त्यांना 'नकोयत ती पुस्तके' असे ओरडून सांगीतले.

मग आम्ही सगळेच आवारात येऊन एका झाडाखाली बसलो. प्रत्येकालाच राग आलेला होता. त्यातच आम्हाला धुळ्यातील प्रज्ञा सोनगडकर या प्राध्यापिका भेटल्या. त्यांनी आदल्या दिवशीच्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेले होते. त्या तर म्हणाल्या की काल झालेले प्रकार तर बघवतही नव्हते. हा खरे तर एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता. संयोजक अतिशय चांगल्या मनाचे मुसलमान बांधव होते. पण काही हिंदू वक्त्यांनी चीप पॉप्युलॅरिटीसाठी त्या व्यासपीठाचा गैरफायदा घेतलेला होता.

कैलास व निशिकांत यांनी प्रचंड संयम राखलेला होता. स्वातीताई मात्र 'आत्ताच्या आत्ता आपण इथून निघू' असेच म्हणू लागलेल्या होत्या. पण शेवटी आपल्याच मित्रांची गझल ऐकायची होती. त्यासाठीच एवढा अट्टाहास केलेला असताना असे जाणे पूर्णपणे अयोग्यच होते.

शेवटी मी व स्वातीताई जेवायचे राहिलो होतो म्हणून चौघेही एका जवळच्या उपहारगृहात जेवायला गेलो. तेथे कैलासरावांनी आजवर त्यांनी पाहिलेल्या, वाचलेल्या अशाच अनेक घटना सांगीतल्या. आम्ही थक्क होऊन ऐकत होतो.

जेवंण आटोपून आलो तरी मुशायरा सुरू होण्याची चिन्हे दिसेनात. हा मुशायरा शेवटी रात्री ११.०० वाजता सुरू झाला. किमान चाळीस उर्दू - मराठी शायर तेथे उपस्थित होते. उर्दू शायरांचे सूत्रसंचालन अबू बकर रहबर हे अत्यंत गुणी शायर करत होते तर मराठी कवींचे सूत्रसंचालन अजीम नवाज राही!

अजीम नवाज राही आणि अबू बकर रहबर यांची वाणी अत्यंत प्रवाही व रसाळ होती. खानदानी उर्दू भाषा ऐकताना रोमांच उठत होते. रसिक खरेखुरे रसिक होते. त्यातही कित्येक मुस्लिम बांधव होते.

हळूहळू परिसंवादाचा मूड नष्ट व्हायला लागला. विष्णूदास भावे नाट्य मंदिराच्या भिंतींवर एकाहून एक सरस शेर आदळू लागले. वाहवाच्या आवाजाने सभागृह भारू लागले.

मराठी कवींमध्ये कैलास व निशिकांत यांच्याखेरीज सुहासिनी, प्रमोद खराडे, जनार्दन म्हात्रे यांच्याशिवा आणखीही काही जण होते. सुरेश भटांची 'मुहम्मद' ही रदीफ असलेली गझलतंत्रातील कविता वाचून आरंभलेला हा मुशायरा रंगू लागला. उर्दू शायरांपैकी तीन जणांनी तर कमाल शेर ऐकवले.

पण खूप म्हणजे खूपच उशीर होत होता. काही प्रमाणात चुळबूळ सुरू झालेली होती. आमच्या दोस्तांचा नंबर काही केल्या येईना! त्यातच सुहासिनी यांची गझल झाल्यानंतर त्यांना आणि प्रज्ञा सोनगडकर यांना सोडायला मी व स्वातीताई गेलो. आम्ही परत आलो तेव्हा कैलास यांची गझल आधीच झालेली होती. कैलास यांनी कॅमेरा आणलेला होता व तो आमच्याकडे होता. त्यांना त्यांचा फोटो हवा होता. आमचे दुर्दैव म्हणा किंवा निष्काळजीपणा, सगळे फोटो घेऊनहि नेमका कैलासरावांचाच फोटो घ्यायला आम्ही हजर नव्हतो. याबद्दल या वृत्तांतातही पुन्हा त्यांची माफी मागतो. निशिकांत यांची गझल मात्र ऐकायला मिळाली. कैलासरावांच्या तीन शेरांना अभूतपुर्व दाद मिळाली असल्याचे समजले. निशिकांत यांनाही जोरकस दाद मिळाल्याचे आम्ही समक्ष पाहिले.

मुशायर्‍याला मायबोलीचे पूर्ण संरक्षण होते. कारण सर्व शायरांच्या सर्वात डावीकडे कैलासराव तर सर्वात उजवीकडे निशिकांतराव बसलेले होते. हे दोघे गाडीत शेजारी बसल्यामुळे बहुधा कंटाळून मुशायर्‍यात शक्य तितके लांब बसले असावेत असेही मनाला चाटून गेले. एका महान शायरांनी 'सकाळी सकाळी' अशी रदीफ असलेली एक अत्यंत भंकस गझल ऐकवली ज्यावरून दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही सगळे हासत होतो. 'अहा दव चमकले सकाळी सकाळी' असा मतल्याचा पहिला मिसरा असलेल्या गझलेत त्यांनी पुढे सकाळीच रातराणीही फुलवली आणि तिला गुलाबीगंधही प्रदान केला होता. मागे एकदा वैभव जोशी सोलापूरच्या गझलोत्सवाला जाऊन आल्यानंतर मला म्हणाले होते की 'अहा दव चमकले सकाळी सकाळी' असली एक सुमार गझल तेथे ऐकली. ते आठवून मला अधिकच हसू येत होते ती गझल ऐकताना!

पहाटे ०१.५८ अशा वेळेस मुशायरा समाप्त झाला आणि आम्ही चौघेही हॉटेल सदानंदवर परतलो. लिफ्टमध्येच मी घोषित केले कीमी दहा वाजायच्या आत उठणार नाही आहे.

मात्र सकाळी नऊच्या सुमारासच कैलासरावांनी फोन करून 'माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, नाश्त्याला येता का' असे मला झोपेतून उठवून सांगीतल्यामुळे मी क्रोधाची परिसीमा गाठत त्यांना 'मी अकरा वाजता उठणार आहे' असे सांगितले व झोपमोड झाल्यामुळे ताबडतोब उठून बसलो. पहाटे अडीचला रूमवर आल्यानंतर मी टीव्ही पाहत पाहत पहाटे चार वाजता झोपलेलो होतो.

शेवटी सगळे सव्वा दहाला खाली नाश्त्याला जमले आणि पुन्हा इडली वडाच खाल्ला कारण ती डिश तातडीने मिळते.

"पुस्तके घ्यायची राहिलीच राव" असे मी म्हंटल्यावर कैलासरावांनी सांगीतले की 'मोमीनचेही पुस्तक होते तेथे'! मोमीनचे माझ्याकडे एकही पुस्तक नसल्यामुळे मी वरपक्षाप्रमाणे अडून बसलो की पुस्तके घेतल्याशिवाय जायचे नाही. रथ माझ्या हातात असल्यामुळे नाराजीने त्यावर सर्वांनी होकार भरला व मंडळ चेक आऊट करून पुन्हा संमेलनाच्याच जागी आले.

दुर्दैवाने मोमीनचे पुस्तक आदल्याच रात्री संपलेले असल्यामुळे मी बाकीची दहा पुस्तके घेतली व तत्क्षणी कॅश नसल्याने स्वातीताईंनी दिलेले तेराशे रुपये अजून द्यायचेच राहिलेले आहेत हे आत्ता आठवले.

पण आम्ही संमेलनात पुन्हा आलो त्यावेळेस निशिकांत व स्वातीताई यांच्या सेलफोनवर हॉटेलवाल्याचे फोन चालू झाले. "आमच्या एका रूमची किल्ली तुमच्याकडेच राहिलेली आहे ती ताबडतोब द्या"!

निशिकांत - भूषणजी... तो म्हणतोय किल्ली राहिली... रूमची..

मी - ह्यॅ! तुमची नाही ना राहिली??

निशिकांत - छे छे.. मी काउंटरवरच ठेवली की??

मी - मग सांग त्याला.. म्हणाव उगाच फोन करू नकोस..

तोवर स्वातीताई आणि माझ्यात तोच संवाद पुन्हा झाला.

असे मोजून सहा फोन आले आणि कुणाचीच किल्ली राहिलेली नाही तरीही फोन येतच आहेत हे पाहून शेवटी मी माझ्या खिशात हात घातला तर साली माझ्याच रूमची किल्ली निघाली!

प्रचंड दिलगीरी व्यक्त करून मी गाडी पुन्हा हॉटेलकडे नेली व किल्ली देऊन टाकली. मग स्वातीताईंना सांगलीतील गणपतीचे मंदिर प्रसिद्ध असल्याचा साक्षात्कार झाला व गाडी पत्ता विचारत विचारत तिकडे निघाली. कुठेही गणपतीचे मंदिर लागले नाही व शेवटी एकदम हायवेच आला! त्यामुळे मग चतुर्थीनिमित्त गणरायाचे नुसते स्मरणच करून आम्ही सहलीच्या सर्वोत्कृष्ट क्षणाकदे निघालो.

'सादळे..... मादळे'

कोल्हापूरहून पुण्याला येताना पंधरा एक किलोमीटर्सवर डावीकडे वळून घाट चढत चढत सात आठ किलोमीटर वर गेले की महाराष्ट्रातील स्वर्ग लागतो.

सादळे मादळे! हीजागा केंट क्लबच्या आधी आहे. एक अत्यंत प्राचीन वस्तूंनी नटलेले सभागृह! आजूबाजूला पावसाळी वातावरण किंवा पाऊस! गारठवणारी हवा! चित्तवृत्ती प्रफुल्लीत करणारी दरी! अशक्य दृष्य!

येथे क्लायमॅक्स चालू झाला. त्याच वातावरणात काही फोटोबिटो झाल्यानंतर दोन तासांचा खुलाखुला मुशायरा!

ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा त्याने स्वतःची कविता सुरू करायची. वॉव्ह!

काय एकेक कविता आल्या. दोन तास केवळ आणि केवळ कविता! संपेचना तो प्रकार! तीन वाजले तसा वेटर सांगायला आला की 'जेवा की राव आता'!

मग आत गेले मंडळ! तेथे अस्मादिकांनी 'पक्षी' व 'केवढे छान दिवस होते ते' या गझला तरन्नुममध्ये सादर केल्या व कैलासरावांनी त्यांच्या माझ्यावरील ऐतिहासिक प्रेमाला जागून त्याचे रेकॉर्डिंग केले व ते यू ट्यूबवर टाकण्याची खात्रीही दिली. आजूबाजूचे पब्लिक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहात आहे हे कळल्यावर आम्ही शांत होणार तितक्यात शेजारच्या टेबलवरील एका नवयुगुलापैकी मुलाने मुलीच्या तोंडात घास भरवला. ते दृष्य आम्ही पाहात नसलो तरी स्वातीताईंनी पाहिले व त्या त्या दोघांना म्हणाल्या..

"नाईस"

त्यावर ती मुलगी गोड लाजली असे स्वातीताईंनी आम्हाला परतीच्या प्रवासात सांगीतले. त्यामुळे आपण ते दृष्य पाहिलेच नाही अशी एक अनामिक हुरहुर तिघांना लागली.

तर मटन!

चतुर्थी असल्यामुळे मी ड्रिंक घेतलेले असले तरीही नॉनव्हेज खायचे नाही असे ठरवून गणपती या देवावर काहीसे उपकार केले. मात्र कैलासराव व निशिकांतराव यांनी सादळे मादळे येथील सुप्रसिद्ध मटन माझ्या शिफारशीवर विसंबून खाल्ले व ते त्यांना आवडल्याचे त्यांनी निदान तोंडावर तरी सांगीतले. मी व स्वातीताईंनी शाकाहार घेतला व त्यात खीर येते हे मल माहीत असल्याचे मी आधीच सांगून आणखीन थोडे श्रेय मिळवलेच!

भरपूर जेवून परतीचा प्रवास तीन त्रेचाळीसला सुरू केला तो सात त्रेचाळीसला पुण्यातील चांदणि चौकात संपला. तेथे कैलास यांना मुंबईकडे जाणार्‍या गाड्या मिळण्याच्या स्पॉटवर सोडले व निशिकांत यांना न्यायला त्यांचे चिरंजीव आलेले होते. स्वातीताईंना पौड रोडवर सोडून मी घरी पोचलो.

परतीच्या प्रवासात मात्र कैलासरावांनी त्यांचे अफाट वाचन दाखवून दिले. कित्येक विषय, जे रजकारण, समाज व संस्कृतीशी निगडीत होते, त्यावर कैलासराव अत्यंत प्रवाहीपणे बोलत होते.

या सहलीत चौघांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली.

स्वातीताई - सुंदर कविता व वातावरण हासरे ठेवणे, तसेच गंभीर चर्चेत महत्वाचे मुद्दे मांडून स्वतःचे महत्व वाढवत राहणे!

निशिकांत देशपांडे - सातत्याने विनोदी बोलून व विनोद ऐकवून मुशायर्‍यासाठी आपण जात नसून केवळ आनंद लुटण्यासाठी जात आहोत हे सिद्ध करणे!

डॉ. कैलास गायकवाड - अनंत प्रकारच्या चर्चा व अनेक गीते गात राहणे व सर्वांची स्तुती करून प्रत्येकाला तो म्हणजे या युगातील महान मानव आहे याची जाणीव देत राहणे!

बेफिकीर - प्रवासात गाडी चालवणे व थांबल्यावर गाडी न चालवणे अशा दोन मुख्य जबाबदार्‍या!

येताना मात्र मी एकटा पडलो. कारण मी एकटाच जन्मापासून पुणेकर! मग पुणेकरांवरचे जोक्स ऐकवण्यास ऊत आला. काय वाट्टेल ते जोक्स ऐकले मी!

या प्रवासातील छायाचित्रे ओळीने एकाखाली एक द्यायचा प्रयत्न करत आहे. छायाचित्रे कशी देतात ते कैलास यांनी समजावून सांगीतलेले आहे. तरीही ती दिसलीच नाहीत तर तो दोष माझा असून मग मी कैलास यांना पुन्हा माबोवर येऊन ती छायाचित्रे देण्याची विनंती करेन!

एकंदरीत, पंचाहत्तर टक्के मायबोलीकर असलेले हे गटग अविस्मरणीय होते.

आज सकाळपासून नेहमीच्या जीवनात चौघेही आलेले असतील. राहतील त्या आठवणी! पुन्हा कधीच असाच ग्रूप, असाच प्रवास, असेच दोन दिवस, असेच स्पॉट्स आणि असेच क्षण येणार नाहीत. काहीतरी वेगळे होईल. कदाचित चौघेही परत एकाचवेळेस भेटणारही नाहीत, कुणी सांगावे.

पण... ही सहल मनातून जाणार नाही.

या सहलीत असतानाही प्रत्येकाच्या मनात सोमवारी सकाळपासून पुन्हा रुटीन सुरू होणार याची जाणीव होतीच! सारखे काही ना काही फोनही येत होतेच! पण तरीही प्रत्येकजण हेच म्हणत होता...

आज आनंदात राहू... पाहुया पुढचे पुढे
वास्तवे बाजूस सारू... पाहुया पुढचे पुढे

========================

छायाचित्रे येथे एकत्रच देत आहे. दिसली नाहीत तर पुन्हा प्रयत्न करेन.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

========================

मुशार्याला उपस्थित शायर

नाथ पेश करताना बुजुर्ग शायर शम्स अली

प्रमोद खराडे गजल पेश करताना

कवयित्री सुहासिनी गजल पेश करताना

डॉ गायकवाड गजल पेश करताना

गजल पेश करताना निशिकांत

बेफिकीर, निशिकांत व् स्वातीताई कार जवळ उभे असताना

बेफिकीर

विविध छायाचित्रे

निशिकांतजी

कैलास

निसर्ग

===================

गुलमोहर: 

छान.
ती भांड्यांची चित्रे कसली आहेत ? म्हणजे कोणते ठिकाण आहे ? म्युझियमसारखे आहे का ?

मस्तच वृतांत !!! Happy

सौ. स्वाती सामक! वय वर्षे सदुसष्ट! दर वर्षी मनाने तरुण होणारी कवयित्री! मी कधीच मरणार नाही असे ठामपणे सांगत जीवनाचा संपूर्ण आनंद घेत असतानाच अत्यंत हळुवार तरल अशा ओळींनी श्रोत्यांना गंभीर बनवणारी कवयित्री!>>> Happy

मस्त Happy

मोहिनी | 20 June, 2011 - 04:36 नवीन
ह्याला माबो गटग कस काय म्हणता येईल?? फक्त एकटे लेखकमहाशय माबोकर, आणि माबो गटग कस?? काहीही.>>>>

निशिकांत हा आयडी सुद्धा मायबोलीकर आहे.

वाकड्यात शिरणे हा काही जणांचा स्थायीभावच असतो. दुनिया अश्यांना फाट्यावर मारुन पुढे जात रहाते.

संमेलनाचा आँखो देखा हाल आवडला.

वाकड्यात शिरणे हा काही जणांचा स्थायीभावच असतो. दुनिया अश्यांना फाट्यावर मारुन पुढे जात रहाते.

>
हे तुझ्या पोस्टवरुन दिसलच मला. फाट्यावर मारायचा सल्ला अनुसरुनच मी जाते पुढे. दोन आठवड्याच्या आयडीना निशिकांत हा आयडी माहीत आणि इतरांच वकिलपत्र घेण्याची खुमखुमी दिसुन येते. जाणकार ह्यावरुन योद्य तो बोध घेतीलच.

मोहिनी | 20 June, 2011 - 04:36 नवीन
ह्याला माबो गटग कस काय म्हणता येईल?? फक्त एकटे लेखकमहाशय माबोकर, आणि माबो गटग कस?? काहीही.>>>>

हा घाणेरडा,हिणकस आणि एकांगी प्रतिसाद वाचून parag. नावाच्या जाणकाराने योग्य तो बोध घेवूनच फाट्यावरचा प्रतिसाद दिलाय.

अखिल भारतीय पातळीवरील साहित्य संमेलनातील मायबोलीकरांचा समावेश असलेल्या मुशायर्‍याचा आँखो देखा हाल एक माबोकर सदस्य इतक्या उत्तम प्रकारे टंकलिखित करुन सर्वांपर्यंत पोहचवतो, त्यावर मोहिनी नावाचा आयडी अशी टुकार प्रतिक्रिया देतो हे इतर मायबोलीकरांना दिसत नसावे कदाचित.असो.

वृत्तांत आवडला.
ह्या मोहिनीच्या प्रतिक्रियेकडे लक्ष द्यायची गरज नाही. नको ते वाद पेटवू नका.

संमेलनामधिल परिसंवादांना तुम्हाला हजर राहता आले असते आणि त्याबद्दल काही लिहिता आले असते तर ते वाचायला (मला तरी) आवडले असते. असो. वृतांत मात्र छान.

बाकी parag. ह्या आयडीने स्वतःलाच जाणकार वगैरे संबोधुन कसा काय प्रतिसाद दिला हे गुढ नाही उलगडलं बुवा Wink

छान वृत्तांत. अजून डीटेलवार असता तर मजा आली असती.

भ्रमा, जाणकार म्हणजे समजूतदार नव्हे. बाकी सगळी वजाबाकी.

बेफी....... एकदम झकास.......

जरा तो कैलासरावांचा एकट्याचा काळ्या टीशर्टमधला फोटो आहे तिथे "जाडसर बाहुला" असं लिहाल का???? Wink

वृतांत मस्तच.

या चांग्याच कुणीतरी भलं करा रे!!

ह्याला माबो गटग कस काय म्हणता येईल?? फक्त एकटे लेखकमहाशय माबोकर, आणि माबो गटग कस?? काहीही.>>>>
हा घाणेरडा,हिणकस आणि एकांगी प्रतिसाद वाचून parag. नावाच्या जाणकाराने योग्य तो बोध घेवूनच फाट्यावरचा प्रतिसाद दिलाय>>>> parag 100% पाठींबा.

बेफि, छान वृत्तांत दिला आहे. मनापासून आवडेश.

पण काही हिंदू वक्त्यांनी चीप पॉप्युलॅरिटीसाठी त्या व्यासपीठाचा गैरफायदा घेतलेला होता. >>> हे अनपेक्षित वास्तवच..!

खरेच होते! कित्ती कित्तीही प्रयत्न केले, अगदी तोच ग्रूप, तेच वाहन, तीच ठिकाणे आणि तेच वार ठरवले तरी ओरिजिनल क्षणांची मजा पुनर्निमीत करता येत नाही. ही वेदना असते, सुख नसते हे! पुन्हा ते क्षण नाहीच येत. म्हणून तर 'याद', म्हणजे स्मृती ही बाब इतकी आवश्यक असते. आपण ते क्षण जगलो होतो ही हुरहूर पुढचे क्षण जगण्यासाठी आधार देत असते.>>>> Happy

वृत्तांत अगदी सुंदर आणि सविस्तर दिला आहे बेफ़िकीरजी...प्रकाशचित्रेही व्यवस्थित आली आहेत..!

धन्यवाद!*