'उद्द्यापन' - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 9 October, 2012 - 20:52

संयोजनासाठी नाव द्यावं की नाही अशा चलबिचल अवस्थेतून झालेली सुरुवात आज "अरे! संपलं सुद्धा, आता परत इ-भेट कधी?" अशा हुरहुर लावणार्‍या अवस्थेत संपली. संयोजनासाठी नाव देताना, हां ठिके! नाव देऊ - झाली निवड तर नेमून दिलेले काम करून कार्य पार पाडू, हा का ना का! एवढं सोपं वाटलं होतं. सुरुवात झाली तीच मुळी फेल गेलेली व्हिडिओ कॉन्फरन्स - मुख्य संयोजकांनी दुसर्‍या मिटींग नंतर घेतलेली सपशेल माघार - दोन तीन संयोजकांचा नो शो - नव्या संयोजकांची शोधाशोध - त्यांच्याबरोबर पुन्हा करावी लागलेली अथश्री - अशी, बेरीज थोडी आणि वजाबाकी जास्त...

सुरवातीच्याच या दणक्यांमुळे थोडा नर्व्हसनेस होता. तसे आम्ही सगळेच रोमातले. मायबोलीवरील अक्षरी वावर त्यामानाने कमीच. तशातच 'अ‍ॅडमीन' ह्या पोस्टबद्दल एक बारीकसा पूर्वग्रह की - अ‍ॅडमीन म्हणजे मजकूर आणि त्यांच्या आयड्यांची कत्तल करणारे - अर्थातच थोडे कडक व्यक्तीमत्व! आता त्यांच्याशीच दोन हात करावे लागणार! मात्र पुढे जसं जसं त्यांच्याबरोबर डीलिंग वाढत गेलं तसं 'The Devil Is Not as Black as He Is Painted' ह्याची खात्रीच पटली. पुढे तर "अ‍ॅडमीन, ही तुमची आजची कामं..." अस म्हणण्यापर्यन्त खेळीमेळीचं वातावरण तयार झालं. याच सर्व श्रेय अर्थातच अ‍ॅडमीनना! Happy

'गाथा चित्रशती' चालू होती, तशातच दिवाळी अंकाची घोषणा झालेली! या पार्श्वभूमीवर आमच्या कार्यक्रमात कितीजण भाग घेतील याची धाकधूक होती. त्यामुळे लोकांच्या झटकन पसंतीस उतरतील असे उपक्रम देण्याचं आव्हान आमच्या समोर होतं. आलेल्या सूचनांमधे, कोणते उपक्रम असावेत याबाबत अगदी दोन टोकांच्या भूमिका होत्या. 'गाथावर' पडणारा लेखांचा पाऊस बघून लेखांच्या स्पर्धा न घेण्याचा व स्वतंत्रपणे मागवलेल्या लेखांना विषयाची चौकट न घालण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा ठरवताना त्या नाविन्यपूर्ण व मेंदूला खाद्य देणार्‍या, तरीही सर्वांना सहभागी होता येईल अश्या असाव्यात यावर कटाक्ष ठेवला. नियम, अटी, सूचना यांचा अगदी खलबत्त्यात खलून भुगा पाडला. तरीही 'गर्जा महाराष्ट्र माझा' आणि विशेषतः 'मिसळम् पाकम् गट्ट्म् गट्ट्म्' वर आलेला प्रश्नांचा भडीमार पाहता तेल निघेपर्यंत कूटायला हवे होते हे लक्षात आले. याबाबतीत मायबोलीकरहो, तुमच्या तत्परतेला आणि बारकाइने वाचण्याच्या सवयीला सलाम!

पाककृती व हस्तकौशल्य यात मायबोलीकर माहिर आहेतच. तेव्हा, 'तोंपासु' व मिपागग साठी भरपूर प्रवेशिकांची अपेक्षा ठेवली होती आणि ती बहुतांशी पूरी झाली. 'गर्जाच्या...' निमीत्ताने, सर्व मायबोलीकरांना उघड उघड कंपूबाजी करण्याचा जणू काही परवानाच दिला होता. पण 'मायबोलीकर गप्पा आणि कुचाळक्या(?) यासाठी कंपूबाजी करणे जास्त पसंत करतात' अशी शंका यायला फार्फार वाव दिलात बर्का तुम्ही! "गर्जा महाराष्ट्र माझा" ला तीनच प्रवेशिका आल्या असल्या तरी सहभागी झालेले मायबोलीकर आहेत १३ ही खूपच समाधानाची बाब!

"चित्र बोलते गुज मनीचे" या स्पर्धेसाठी दोनोळ्या ठेवायच्या का चारोळ्या का दशपदी का खंडकाव्य का यातलं काहीही यावर धमाल चर्चा झाली. परीक्षणाच्या सुलभतेसाठी चारोळ्या ठरवल्या आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी हा निर्णय सार्थ ठरवला.

मायबोली गणेशोत्सव म्हणजे प्रकाशचित्रांचा झब्बू अपरिहार्यच आहे. यंदा आम्ही प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी व प्रकाशचित्रांची बाराखडी असे दोन संपूर्ण नवे असे झब्बू/खेळ खेळायला दिले. "प्रकाशचित्रांची बाराखडी" ही एक संपूर्ण नवी संकल्पना.बाराखडी कशी बनते, तर एक व्यंजन(मूळाक्षर) + स्वर. उदा. क् + अ = क. म्हणून सर्व व्यंजनाच्या बाराखड्या वापरायला सांगितले. कुणीतरी प्रश्न विचारला की अ, आ, इ... का गाळले? त्या प्रश्नावर थोडी चौकशी केल्यावर समजले की ते जरी स्वर असले तरी तिला अ ची बाराखडी असेच म्हणतात. पण एव्हाना झब्बूची वेळ संपत आली होती, म्हणून बदल केले नाहीत. तर लोकहो, तुम्हाला अ च्या बाराखडीचे प्रचि टाकण्यापासून वंचित रहावे लागले या बद्दल क्षमस्व! काही म्हणा, आमच्या ज्ञानात मात्र भर पडली आणि तुमच्या सुद्धा नं! मूळाक्षरांचा क्रम, मायबोलीवर ती कुठे शोधावीत याची नव्यानी उजळणी झाली की नै? या प्रचि बाराखडीच्या खेळा संदर्भात 'पुढच्या मुळाक्षरावर रुमाल टाकून ठेवण्याची' कल्पना अगदी फिट्ट बसणारी होती. तसेच अनेकांनी उत्स्फुर्तपणे खेळांत सुसूत्रता ठेवण्यास केलेली मदत उल्लेखनीय आहे.

प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी हा देखील झब्बू क्षेत्रातला आणखी एक नवा खेळ. हा झब्बू खेळताना येणार्‍या संभाव्य अडचणींवर आम्ही बराच ऊहापोह केला. नियम वा अट स्वरुपात टाकता येईल किंवा टाकला तरी अवलंबन करणं सोपं होईल असा ठोस उपाय काही सापडला नाही. एक प्रयोग म्हणून पुढे जायचं ठरवलं. त्याचं फलित आश्चर्यकारकरित्या सुखद असं होतं. गोंधळ होत होता. पण एकमेकांना सूचना करत, केलेल्या सूचना जमेल तशा पाळत खेळ पुढे जात होता. इथे देखील, काही जणांनी उत्स्फुर्तपणे योग्य त्या सूचना करत व स्वतः काढलेले प्रचि टाकण्याचे आवाहन करत खेळांत सुसूत्रता आणण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्यासारखा होता.

रंगपंचमी च्या झब्बूवर अपेक्षेप्रमाणेच प्रचंड क्लिकक्लिकाट झाला. त्यावर आलेले प्रचि अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. तिथे काही ठिकाणी फोटोग्राफर चे नांव सांगताना दाखवली गेलेली कल्पकता मनोरंजक होती. 'असावे घरकुल आपुले छान' मधली एकसे एक घरं आणि 'लेकुरे उदंड जाहली' मधील विविध लेकरे अगदी काबिल-ए-तारीफ होती.

प्रकाशचित्रांच्या झब्बूवर येणारी चित्रांची संख्या व त्याचा वेग बघता संयोजकांना नियंत्रण करणे कठीण होते. अशा वेळी स्वयंशिस्तीचीच गरज असते आणि बहुतांशी माबोकरांमध्ये ती आहे. त्यातच झब्बू या उपक्रमाचं यश सामावलेलं आहे.

"रिक्षेच्या फेरीची" अपरिहार्यता तुम्हाला काय नव्याने सांगणार? पण "गर्जा महाराष्ट्र माझा" साठी आख्ख्या महाराष्ट्रभर फिरायचं होतं ना! म्हणून आम्ही आपली एस.टी.च फिरवली. तसंच गप्पांच्या धाग्यावर हेरगिरी करत कंपूच्या गप्पा चालू आहेत असा जरासा संशय जरी आला तरी लगेच, बशीतून गोविंदांची टोळी घेऊन धावत होतो. उद्गीर, औरंगाबाद, नगर, पुणे, ठाणे, कोल्हापूर --- पण काय राव तुम्ही लोकं! जाम चिवट

तर मंड्ळी, या संयोजन प्रवासाबद्द्ल सांगण्यासारखं खूप काही आहे. पहाटे डोळे चोळत केलेल्या मिटींग्ज - लागलेल्या आगी - विझवायसाठी केलेला आटापिटा - धागा धागा अखंड विणूया करत काढलेले असंख्य धागे(त्या सगळ्याची एक चटई विणून होईल--ही आहे रूनीची खास टिप्पणी!) - अमर्याद लेखन - वाचन - खाडाखोडी - पुन्हा लेखन - पुन्हा खाडाखोड... - मुशो - पुन्हा लेखन - फोनाफोनी - बडबड - हे राम! हे सगळं आता थंडावत आहे.जे करायला जमलं ते सांगितलं. 'गेले द्यायचे राहून...' असंही काही आहे. अ‍ॅनिमेशन, लेखांच्या स्पर्धा, प्रकाशचित्र झब्बू साठी नवे नवे विषय, लेखनातील विविधता व कल्पकता या व अशाच काही ठिकाणी कमी पडल्याची खंत जरुर आहे, त्याच बरोबर खूप काही मिळवल्याचा आनंदही. नव्या ओळखी - गप्पांचे नवे विषय - "मिलकर बोझ उठाना"चे धडे - तांत्रिक गोष्टींची ओळख - बघायला मिळालेले मायबोलीचे अंतरंग - असंच खूप काही आणि सरतेशेवटी बाप्पांच्या सेवेत ॠजु व्हायला मिळाल्याचं अपार समाधान!

ही होती २०१२ मायबोली गणेशोत्सवाची कहाणी. मंडळी, आमच्या बरोबर आपण सर्वांनीही ज्या गणेशव्रताचा वसा घेतला त्याचे आज उद्द्यापन झाले. आपण उतलो नाही, मातलो नाही, घेतला वसा टाकला नाही. म्हणूनच आज ही श्रीगणेशोत्सवाची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.
यांतु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् | इष्ट काम प्रसिध्द्यर्थम् पुनरागमनाय च ||

'श्रेयनामावली' - मायबोली गणेशोत्सव २०१२
कल्पकता संयोजकांची-१
कल्पकता संयोजकांची-२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
.

लैभारी उद्यापन ,आता तरी प्रसाद द्या !
गप्पा आणि कुचाळक्या >>> ओ संयोजक गप्पा आणि कुचाळ्क्या असले कसले जुनाट शब्द वापरता , गॉसिप म्हणा की Proud

उत्तम झाला गणेशोत्सव Happy

मात्र पुढे जसं जसं त्यांच्याबरोबर डीलिंग वाढत गेलं तसं 'The Devil Is Not as Black as He Is Painted' ह्याची खात्रीच पटली. पुढे तर "अ‍ॅडमीन, ही तुमची आजची कामं..." अस म्हणण्यापर्यन्त खेळीमेळीचं वातावरण तयार झालं. याच सर्व श्रेय अर्थातच अ‍ॅडमीनना<<< अगदी अगदी... मागच्या वर्षीचा अनुभव Happy

रुनी ची वेळोवेळी केलेली मदत, सुचना आणि कधीकधी कान उघडणी .... खुप उपयोगाची Happy

संयोजक मंडळी, अभिनंदन आणि आभार Happy

'The Devil Is Not as Black as He Is Painted' ह्याची खात्रीच पटली. पुढे तर "अ‍ॅडमीन, ही तुमची आजची कामं..." अस म्हणण्यापर्यन्त खेळीमेळीचं वातावरण तयार झालं. याच सर्व श्रेय अर्थातच अ‍ॅडमीनना! >>> हा हा हा

लै भारी लिवलंया.... खुसखुशीत, खमंग, फिरक्या घेत......

सर्वांचे मनापासून आभार......

'The Devil Is Not as Black as He Is Painted' ह्याची खात्रीच पटली.>>> Lol

खरोखर, घरातलं एखादं कार्य असल्या सारखं कामाला लागतात मंडळी, आणि मग हे काम संपल्यावर काही दिवस अंगावर येणारी पोकळी, आता उद्यापासून करायच काय असेही प्रश्न....:)

उत्तम झाला गणेशोत्सव, मनोगतही छान लिहिलं आहे, वेलडन संयोजक Happy

छान लिहिलय. झब्बूचे सर्व खेळ यावेळेला आवडले. विषय पण साधे आणि शोधाशोध केल्यास भरपूर फोटो डकवता येण्यासार्कहे होते/

'व्रताची' लागण संयोजकांनाही झालेली दिसतेय, 'उद्यापन' करताहेत Wink

नेहमीप्रमाणेच यंदाचा मायबोली गणेशोत्सव मस्त मजेत, उत्साहात आणि धमालीत पार पडला. घरच्या गणपतीमुळे पहिले पाच दिवस सहभाग घेता आला नाही. पण नंतर मात्र गणपतीच्या मांडवातच तळ ठोकला होता. सर्व खेळ-स्पर्धा मस्त होत्या. प्रचिझब्बूंवर भांडाभांडी करताना मजा आली Proud मि.पा.ग.ग.ची कल्पना छान होती, पण सुरुवातीला घातलेल्या खूप सार्‍या अटी आणि नियमांमुळे स्पर्धेत भाग घेताना जरा आत्मविश्वास डळमळला Happy
यंदाचे सांस्कृतिक कार्यक्रम मात्र बहारदार वाटले नाहीत.
इथे देखिल संयोजकांची पुन्हा पाठ थोपटते Happy

मनोगत फार सुरेख उतरलंय. घरचं कार्य केल्यासारखं समाधान मिळालं असेल ना......... !! तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि मनापासून अभिनंदन Happy

उत्तम समारोप... यंदाच्या स्पर्धात प्रचंडच वैविध्य होतं... त्यासाठी हार्दिक अभिनंदन..

गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणेच उत्तम! स्पर्धांमधे बरंच नाविन्य होतं. मजा आली. संयोजक मंडळानं घेतलेले कष्ट जाणवले.

बालकलाकारांनी फारच धमाल आणली. पुन्हा पुन्हा ऐकण्या-बघण्यालायक सुंदर गाणी आणि सादरीकरणं आहेत.

गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या!

अरे वा!! संयोजकांचे कौतुक. छान पार पडला गणेशोत्सव. एकंदर रागरंग पाहुन् झब्बु वाढवले असे वाटले मला, आणि त्याचे फार कौतुक वाटले. प्रसंगावधान राखलेत. तसेच नियम बदलुन द्यायचा निर्णयही अतिशय योग्य. छान धडाक्यात झाला गणेशोत्सव. Happy

खुप छान समारोप... मस्त होते सगळे उपक्रम ... धमाल आली,धन्यवाद संयोजक!!! तुमच्यामुळे इतक्या छान कार्यक्रमात सहभागी होता आलं आणि गणेशोत्सवाचा आनंद लुटता आला, मनापासुन धन्यवाद.........!!!!!!

यावेळेसही खूप जोरदार कार्यक्रम चालू होते. संयोजकांचे एका चांगल्या आयोजनाबद्दल अभिनंदन!

फार सुरेख मनोगत!

मस्तच झाला याहीवेळचा उत्सव. मला रीड-अ‍ॅक्सेस होता, लिहायला फार स्कोप नव्हता काही कारणामुळे. त्यामुळे सहभाग जवळजवळ नव्हताच! पण तरी मजा आली!

संयोजकांचं मनापासून अभिनंदन! Happy