'श्रेयनामावली' - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 5 October, 2012 - 10:27

नमस्कार मंडळी,

गेले काही दिवस वाजत गाजत असलेल्या २०१२ मायबोली गणेशोत्सवाची आता सांगता झाली. आपण सगळ्यांनी बाप्पांना " गणपती बाप्पा मोरया | पुढच्या वर्षी लवकर या ||" असं सांगून ती सुफळ संपूर्ण करविली.

अगदी श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेपासूनच मायबोलीकरांच्या मदतीचा ओघ सुरु झाला. उच्चासनारूढ अशा गणेशमूर्तीचे प्रकाशचित्र जिप्सी यांनी अगदी विनाविलंब दिले. (मंडप, आजूबाजूची आरास वगैरे कलाकुसर संयोजकांची बर्का!) चैतन्य दिक्षीत यांनी बासरीवादनाचे पार्श्वसंगीत देऊन प्रतिष्ठापनेच्या मंडपाचे पावित्र्य द्विगुणित केले. हार्दिक आभार जिप्सी आणि चैतन्य!

महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे आद्य प्रवर्तक कै. बाळ गंगाधर उर्फ लोकमान्य टिळक यांचे एकमेव
ध्वनीमुद्रण सर्वप्रथम फक्त मायबोलीवर व ते देखील २०१२ च्या मायबोली गणेशोत्सवांतर्गत उपलब्ध करुन दिले चिनूक्स यांनी. त्याचबरोबर त्यामागची घटना आणि त्याचा शोध या विषयी एक अभ्यासपूर्ण लेखही चिनूक्स यांनी लिहून दिला. चिनूक्स, तुमचे योगदान शब्दातीत आहे. शतशः आभार!

'सूरमाय' (सुरील्या मायबोलीकरांचा समूह) चे संस्थापक योग यांचे व त्यांच्या समूहातील अनिताताई, अगो, जयंती, जयश्री, श्यामली, रैना, सई, क्रांति, पद्मजा, सारीका (सौ. योग), दिया, भुंगा, प्रमोद देव, पेशवा, ऊल्हास भिडे, सायबरमिहीर, चैतन्य दिक्षीत, कौशल या सदस्यांचे, २०१२ मायबोली गणेशोत्सवासाठी ५ गाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनापासून आभार.

'बालचित्रवाणी' व 'सुंदर माझा बाप्पा' या उपक्रमात आपल्या मायबोलीकरांच्या छोट्यांनी त्यांच्यातील कलागुणांची चुणूक दाखवून कमाल केली. सानिका, आरोही, सावलीची बाहुली, अर्जुन, श्रिया, शिरीन, ओजल, शार्वी, सान्वी, श्रीया, अर्चिस, सिध्देश, प्रांजल, नीरजा, तनु, कावेरी, अर्णव, श्रेयान, आर्या, वेद व रूद्राक्ष या सर्व छोट्या दोस्तांना मोठ्ठी शाब्बासकी! तसेच या सर्व छोटुकल्यांची तयारी करुन घेणार्‍या मायबोलीकर पालकांचे अभिनंदन व आभार.
'बालचित्रवाणी' तील छोट्यांपेक्षा थोडासाच मोठा, सृजन पळसकर, याने स्वतः अगदी तयारीने गायलेली गणेश-सरस्वती वंदना आम्हाला पाठवली. मायबोली शीर्षक गीतातही सृजन चा सहभाग होता. लगे रहो सृजन!

यंदा आम्ही चार स्पर्धा आयोजित केल्या होत्या-- तों.पा.सु. (हस्तकला स्पर्धा), मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् (पाककृती स्पर्धा), चित्र बोलते गुज मनीचे (काव्य-चित्र स्पर्धा), गर्जा महाराष्ट्र माझा (गटलेखन स्पर्धा). सर्व स्पर्धांमध्ये भरघोस संख्येनी सहभागी होणार्‍या मायबोलीकरांचे विशेष कौतुक व हार्दिक आभार! तसेच प्रत्यक्ष भाग न घेऊन देखील, सहभागी झालेल्या मायबोलीकरांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन, त्यांचा उत्साह वाढवत ठेवणार्‍या मायबोलीकरांचेही खूप खूप कौतुक. आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धा ह्या कलात्मकतेला आवाहन व बुद्धीला चालना देणार्‍या होत्या असे बहुसंख्य मायबोलीकरांनी आम्हाला सांगितले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! चित्र बोलते गुज मनीचे ह्या काव्य-प्रकाशचित्र स्पर्धेकरता परीक्षक म्हणून काम पाहिले, सर्वांचे परीचित मायबोलीकर उल्हास भिडे व श्यामली यांनी. मायबोली व मायबोलीकरांच्या प्रेमापोटी, आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपला बहुमूल्य वेळ परीक्षणासारख्या किचकट कामासाठी खर्च केला. आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रकाशचित्रं हवी होती, आणि ती हमखास मिळण्याचं ठिकाण कोणतं हे एव्हाना पाठ झाले होते. तिथेच आम्ही धाव घेतली- जिप्सी व बित्तुबंगा. दोघांचेही खूप खूप आभार. या स्पर्धेच्या धाग्यावरच्या चित्रातल्या चारोळी करुन दिल्या आहेत, शुगोल (संयोजक) हिची न-मायबोलीकर मैत्रीण डॉ. ॠता वाखारकर यांनी. आभार ॠता व लवकरच मायबोली सदस्य व्हा ही विनंती.

अन्य तीन स्पर्धांच्या निकालासाठी आम्ही समस्त मायबोलीकरांना मतदानाचे आवाहन केले. त्यालाही भरभरुन प्रतिसाद देणार्‍या सर्व मायबोलीकरांचे खूप खूप आभार.

सांस्कृतीक कार्यक्रमांतर्गत विविध लेख, रेखाचित्रे, व्यंगचित्रे वगैरे पाठवण्याविष्यी आम्ही जाहीर आवाहन केले होते. ललिता-प्रीति, दिनेशदा, अरुंधती कुलकर्णी, मामी, भारती बिर्जे डिग्गीकर, बी, जागू, आशुडी, शशांक पुरंदरे, aschig यांनी विविध विषयांवर लेख पाठविले. तसेच स्मिता१, वर्षा व्हिनस, कंसराज, sanky, तोषवी, अभिप्रा, डॅफोडिल्स यांनी त्यांच्या बोटांच्या करामतीने श्रीगणेशाचे त्रिविध दर्शन घडविले. सरोज कोले यांनी सादर केलेल्या भजनानी आमचा गणेशोत्सव आणखी सूरेल केला. या सर्वांच्या उत्साही सहभागाबद्दल संयोजक मंडळ त्यांचे शतशः आभारी आहे. व्यंगचित्रं आणि भाऊ नमसकर याचं मायबोलीवर जणू काही समीकरणच झालंय. त्यामुळे भाऊंना तशी विनंती करणं अपरिहार्यच होतं. आम्ही एखाद-दुसर्‍या ची मागणी केली आणि भाऊंनी एका मागोमाग एक अशी आठ व्यंगचित्रांची खैरात केली. तुमचे आभार मानायला शब्द अपुरे आहेत. तरीही भाऊ, शतशः आभार!
प्रकाशचित्रांचा झब्बू आणि मायबोली हे असंच आणखी एक समीकरण! यासाठी व सार्वजनिक गणपती या धाग्यासाठी प्रकाशचित्रांचा साठा उपलब्ध करून दिला, पुन्हा एकदा जिप्सीनी. धन्यवाद जिप्सी! त्याच बरोबर रोहिणी गोरे, तोषवी (संयोजक) हिची न-मायबोलीकर मैत्रीण, यांनीही काही प्रकाशचित्रे दिली. तसेच,' नैवेद्यम् समर्पयामि' साठी चे पोस्टर तयार करुन दिले, हृषीकेश नायगांवकर, स्नेहश्री (संयोजक) हिचे न-मायबोलीकर बंधू यांनी. दोघांचेही खूप आभार आणि अर्थातच मायबोलीकर होण्याची विनंती!

'लष्कराच्या भाकर्‍या भाजायच्या' झाल्या की पहिला रोष ओढवतो तो घरच्यांचा. आम्हा सर्व संयोजकांचा मायबोलीवर वावर कमी असला तरी घरी मायबोलीविषयी गप्पा होत असल्यामुळे घरचे लहान-थोर या ना त्या प्रकारे मायबोलीशी परीचित आहेत. त्यामुळेच की काय कुठल्याच घरी 'असहकाराची चळवळ' झाली नाही. कॉम्प्युटर एक्स्पर्ट नवर्‍यांची मदतही खूप झाली. (एव्हढं साधं कसं येत नाही? हे म्हणण्याची संधी पण सोडली गेली नाही बर्का!) तर असा हा मदतीचा हात सदैव पुढे करणार्‍या आमच्या घरच्यांना हा हार्दिक आभाराचा आहेर.

आम्हा सर्व संयोजकांत अनुभवी कोणीच नव्हतं. त्यामुळे संयोजनाचं काम काय व कसं असतं इतक्या प्राथमिक अवस्थेतून आम्हाला लवकर बाहेर काढण्यापासून, केलेल्या कामावर लक्ष ठेवणे, प्रोत्साहन देणे, कौतुक करणे, गरजेनुसार कानपिचक्याही देणे इथ पर्यंतची कामे रुनी पॉटरमामी यांनी अगदी न कंटाळता व सातत्याने केली. मामी बर्‍याच स्काइप मिटींगांना देखील हजर असंत. दोन धृवावर असलेल्या संयोजकांशी सतत संवाद साधुन, या दोघींनी गाडी रूळावरुन घसरु दिली नाही. मामी व रुनी यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

आम्हा सर्वांची संयोजक म्हणून निवड करुन गणेशोत्सव संयोजनाची संधी दिल्याबद्दल, अ‍ॅडमीन, मनापासून धन्यवाद! पावला पावलागणिक आम्ही अडखळत होतो आणि तांत्रिक मदत, कायदेशीर बाबींबद्दल सल्ले, मार्गदर्शनपर सुचना, आगी विझवून धीर देणे इत्यादी विविध प्रकारांनी अ‍ॅडमीन आम्हाला सावरत होते. आमच्या खूळचट पासून किचकट पर्यंत सर्व प्रश्नांना तितक्याच आत्मीयतेने व तत्परतेने उत्तरं देत होते. खरंच, अ‍ॅडमीन खूप खूप आभार!

अनावधानाने कुणाचा उल्लेख राहिला असेल त्यांचे आणि मायबोलीच्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!

या सगळ्याचं मूळ म्हणजे मायबोलीचं अस्तित्व आणि ते शक्य केलं अजय (अजय गल्लेवाले-वेमा) यांनी, १६ वर्षापूर्वी. मायबोलीसारखं व्यासपीठ निर्माण करुन, मराठी माणसांची मराठी भाषेशी जोडलेली नाळ, तुटू न देण्याचं कार्य, अजय आपण करत आहात. आमचे सांकृतिक जीवन समृद्ध करण्यात मायबोलीचा वाटा फार मोठा आहे. मनःपूर्वक आभार, अजय!

मंगलमूर्ती मोरया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंगलमूर्ती मोरया !! वर उल्लेख केलेल्या सर्वांमुळेच खूप छान पार पडला गणेशोत्सव Happy

बाप्पा मोरया! नेहमीप्रमाणेच हाही गणेशोत्सव मस्त झाला.. सर्व उपक्रम,लेख सुंदर होते.. Happy
संयोजकांचे आभार आणि कौतुक !

गणेशोत्सव खुपच छान पार पडला. सर्व स्पर्धा चांगल्या होत्या आणि प्रतिसादही चांगला होता.
संयोजकांचे आणि इतर सर्वांचे आभार, अभिनंदन आणि कौतुक.

सर्वांचे अभिनंदन आणि खुप कौतुक!
गणेशोत्सव मस्तच झाला Happy
आभार्स संयोजक आणि मायबोली अ‍ॅडमिन टीम Happy

अरेच्या, किती जणांचा हातभार लागला या कामाला हे इथे वाचल्यावर कळले. श्रीबाप्पांच्या मंगलचरणी - सगळ्या मंडळींना समाधान लाभो - ही मनःपूर्वक प्रार्थना....

याहीवर्षीचा गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला Happy
संयोजक मंडळाचे मनापासुन धन्यवाद!!!

तर असा हा मदतीचा हात सदैव पुढे करणार्‍या आमच्या घरच्यांना हा हार्दिक आभाराचा आहेर.>>>>>>हे जास्त महत्वाचे. Happy

इतक्या लोकांचा सहभाग होता....... त्यामुळेच जबरदस्त झाला गणेशोत्सव..........सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन Happy

अजय....... सगळ्यात जास्त आभार तुझे....... मायबोलीसारखं प्रत्येकाला आपलंच वाटणारं संकेतस्थळ इतक्या समर्थपणे सांभाळतो आहेस........ !!

संयोजकांचे मनापासून आभार आणि हा सोहळा प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत करणार्‍या सर्व माबोकरान्चे कौतुक.
'किती जणांचा हातभार लागला या कामाला हे इथे वाचल्यावर कळले' या वाक्याशी पूर्णता: सहमत.

संयोजक टीम एकदम कल्पक आणि अतिशय उत्साही होती.

तोषवी, मधुरा, शुगोल, स्नेहश्री, युगंधर, चिन्मय या सगळ्यांनीच अनेक छान छान आणि अभिनव कल्पना मांडल्या आणि सुरेखरीत्या राबवल्या. यंदाचा गणेशोत्सव इतक्या उत्कृष्टपणे पार पाडण्यामागे त्यांची अनेक दिवसांची कठोर साधना आहे.

सर्व संयोजक टीमचे अभिनंदन आणि कौतुक. Happy

अगदी अपेक्षेप्रमाणे खेळीमेळीत उत्सव साजरा झाला. हे सगळे आभासी जगात चाललेय, यावर विश्वासच बसत नव्हता. झब्बू देताना तर आपण सगळे कोंडाळं करुन बसलो आहोत असेच वाटत होते.

श्राव्य कार्यक्रम मात्र मला यावर्षी ऐकता आले नाहीत, म्हणून प्रतिसादही देता आला नाही.

मतदान मात्र मी जाणीवपूर्वक केले नाही, सगळेच आपले, कुणा एकाची निवड करणे, माझ्यासाठी अशक्य आहे.

अरेच्या, किती जणांचा हातभार लागला या कामाला हे इथे वाचल्यावर कळले. श्रीबाप्पांच्या मंगलचरणी - सगळ्या मंडळींना समाधान लाभो - ही मनःपूर्वक प्रार्थना.... >>>
सहमत आहे.
पुढच्या वर्षी गणेशोत्सवाच्या संयोजनात भाग घेण्याची इच्छा आहे. बघूया कसे काय जमते ते.
मोरया

सांस्कृतीक कार्यक्रमांतर्गत विविध लेख, रेखाचित्रे, व्यंगचित्रे वगैरे पाठवण्याविष्यी आम्ही जाहीर आवाहन केले होते. ललिता-प्रीति, दिनेशदा, अरुंधती कुलकर्णी, मामी, भारती बिर्जे डिग्गीकर, बी, जागू, आशुडी, शशांक पुरंदरे, aschig यांनी विविध विषयांवर लेख पाठविले.>>>

माझं नाव वाचून मला खूपच भरुन आलं. धन्यवाद.