युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला प्लीज सांगा जर पडवळ, दोडका, दुधी इ. भाज्या फार जून असतील आणि ते नीट कळले नाही तर भाजी चक्क कडसर / कडवट होते. यावर उपाय किंवा काही युक्ती आहे का? जून भाजीचा कडसरपणा घालवण्यासाठी काय करता येऊ शकते?

घरचे काजु आले आहेत. पण ते कसे सोलायचे ह्याची माहिती नाही. त्याच्यातल तेल उभारत, अस कळल. काजू फोडायचा अडकित्त्ता पुण्यात मिळेल का? प्लीज मदत करा.

अरुंधती, या भाज्यांची एक कडू जात असते. या चिरण्यापुर्वी एक तुकडा कच्चाच खाऊन बघायचा. कडू लागला नाही तरच भाजी करायची, नाहीतर टाकून द्यायची. दुसरा उपाय नाही. यांना विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीतल्या भाज्या म्हणतात. निव्वळ दिसायला सारख्या. कुठल्याही उपायांनी त्यांचा कडूपणा जात नाही. उलट त्या भाज्या खाल्यास पोटात दुखते व उलट्या होतात.

किस बाई किस.. या गाण्यातल्या दोडक्याची फोड, लागली गोड, आणिक तोड.. या ओळी पण याच संदर्भातल्या.

अनया,
काजूच्या बिया सोलण्यासाठी त्या भाजाव्या लागतात किंवा उकडाव्या लागतात. ती एका कारखान्यातली प्रक्रिया आहे. पण हा प्रयोग अजिबात घरी करु नका. धोकादायक आहे ते. त्यासाठी खुप अनुभव लागतो.

अजून पाऊस पडत असेल तर एक उपाय आहे. त्या बिया रुजत घालायच्या. वर अंकुर आला कि तो खुडून त्याची भाजी करायची.

चोप्ड सुई कसं करतात? ( chopped sui)
ते जे मन्चाऊ सुप सोबत देतात ते...कश्या तयार करतात?

अनया, तुम्ही नक्की कुठल्या भागात आहात? भारतात आत्ता काजू कसे काय मिळाले ?
काजू कच्चे म्हणजे नुकतेच झाडावरुन तोडलेले असले तर घरी फोडता येत नाहीत. दिनेश म्हणाले तसे ते भाजावे / उकडावे लागतात. त्यानंतरही ते आपल्याला सहज सोलता येत नाहीत. त्याच्या चिकाने हात खराब होतात ( भाजल्यासारखे) कारखान्यात (काजू फॅक्टरीमधे) एक किलो वगैरे पण भाजुन / उकडुन आणि मग सोलुनही मिळतात. मात्र आता पावसाची फॅक्टरी चालू नसते असे वाटते.
कोकणात असाल तर जिथुन काजू आले त्याच्या आसपासच्या लोकांना फॅक्टरीबद्दल विचारा.

बंडू, Chop suey असे गूगल करुन पहा, बर्‍याच रेसिपी मिळतील.

माझ्या कडे मोरावळा आहे दोन महिन्यापुर्विचा. फ्रिज्बाहेर ठेवल्यामुळे थोडा काळा पडला आहे.चांगला असेल का?

@मेधा ताई: धन्यवाद...
मी एकदा कच्चे च तळले पण काहीतरी चुकलं अस वाटुन
एक्द शिजवून, तळून बघितले... तरी गडबड झाली... !

अनया, आजूबाजूच्या कोंकणी पदार्थ - ओले काजू वगैरे विक्री करणार्‍या दुकानांत चौकशी करून बघा... काही पर्याय कळू शकेल. भरत नाट्य मंदिर जवळ, नारायण / शनिवार पेठेत, हत्ती गणपतीजवळ अशी काही दुकाने आहेत.

सावली,दिनेशदा,अरुंधती सर्वान्चे आभार. मी पुण्यात आहे. काजु येउन बरेच महिने झाले. पण काही घरगुती अडचणी आल्यामुळे ते काम मागे पडले. भरत नाट्य जवळचे दुकान माहिती आहे. उद्याच विचारते.

अविगा मोरावळा मूळात फ्रिजात ठेवायचा नसतो, तो बाहेरही वर्षानुवर्ष टिकतो.
काळा का आणि कसा पडला ते सांगता येणार नाही, पण खाऊन पहा थोडासा..
मोरावळा जितका जुना तितका गुणकारी असं म्हणतात.

अनया, काजू बिया पाण्यात ७ -८ दिवस भिजत घाला आणि रोज पाणी बदला. कधी कधी ५ दिवसांत सुद्धा होतात. बिया किती दिवस उन्हात सुकवल्या आहेत त्यावर अवलंबून असत. हॅन्ड ग्लोव्ह्ज घालून विळीवर चिरा. मस्त काजूगर मिळतील. जेवढे हवे तेवढे वापरा आणि उरलेले फ्रिजरमध्ये ठेवा. आम्ही पावसाळ्यात नेहमी असे करून ठेवतो.
आणि दिनेशदांनी सांगितलेले मातीत पुरून ठेवायचे किंवा नुसते पावसात गॅलरीत ठेवायचे पण आता पाऊस रोज नाही पडत आणि मग त्याला हिरवे मोड आले की मस्त भाजी करायची.
ह्या वेळेस मी एक दिवस काजू बिया पाण्यात घालून ठेवल्या आणि पुन्हा अर्धा दिवस बाहेर पेपरवर ठेवल्या परत अर्धा दिवस पाण्यात ठेवल्या. ५ - ६ दिवसात बियांना मोड आले.

चुलीवर काळ्या मडक्यात भाजलेल्या काजूची चव सर्वात बेस्ट. पण ..... Sad

धन्यवाद दक्शे. आवळ्याला पाणी सुटत म्हणुन फ्रिज्मध्ये ठेवला नाही.तरी ब्राऊन कसा झाला काय माहीत? म्हणून मला थोडा संशय आला.
खाल्ला तर थोडी आंबट-गोड चव लागते.

अविगा, मोरावळा जसा जूना होत जातो तसा त्याचा रंग बदलतो आणि तो कोरडा होत जातो. माझ्याकडे ३ वर्षं जूना मोरावळा आहे. चॉकलेट सारखा रंग झालाय.

मला एक किलो छोलेची भाजी बनवायची आहे, आपला कांदा खोबरे मसाला घेउन. त्यासाठी मी १ किलो कांद्याची पेस्ट आणि अर्धा किलो खोबरे वाटुन ठेवले आहे. एवढे पुरेल ना ?

तो चांगला आहे की नाही याबद्दलच शंका आहे.>>> माझ्याकडचा मोरावळा मी खाऊन पाहिला आहे. कोरडा झाला
आहे.पण अजूनही चांगला आहे.

सकाळी घाई मध्ये कांदा कापणे काम खूप कठीण होवून जाते. रोज सकाळी सकाळी उठल्यावर कांदा कापायचा कंटाळा पण येतो. मैन्त्रिणी कडे पहिले होते तिची आई खूप सारे कांदे कापून मस्त बंद डब्यात भरून ठेवायची मग हवे तसे वापरायचे. पण डबा नक्की कुठे स्टोरे करायचा ?? frozen section मध्ये स्टोरे केला तर सगळा कांदा दगड होतो आणि काढताना मुश्किल ..कृपया सांगावे आठवडाभर साठी लागणारा कांदा fridge मध्ये कसा store करावा..धन्यवाद

गुलमोहोर,
आमच्याकडे खुप मोठे कांदे मिळतात. मला एकावेळी अर्धा सुद्धा लागत नाही. मी ते व्ही स्लाईसरवर बारीक
कापून तेलात अर्धवट परतून ( अर्धवट म्हणजे पारदर्शक होईपर्यंतच ) घेतो आणि मग हवाबंद डब्यात भरून,
फ्रीजमधे खालीच ठेवतो.
याचा घट्ट गोळा होत नाही. आणि थेट पदार्थाच्या फोडणीत घालून आपल्याला हवा तितका परतता येतो.
भरतात वगैरे घालताना तर परतावाही लागत नाही.

असा कांदा परतताना मी थोडेसे व्हीनीगर ( एका किलोला २ टिस्पून ) घालतो व १ टिस्पून मीठ घालतो.
माझ्याकडे तो सहज २ आठवडे टिकतो.

मे रोज दोन वेळेला सॅलड खाते त्यात टोमॅटो, काकडी आणि गाजर यांचा समावेश असतो.
गाजराचा मधला भाग मी काढून टाकत असते, पण टोमॅटोच्या मधला भाग काढून खावा की तसाच ठेवावा? Uhoh
मी ऐकलंय की टोमॅटोच्या बिया तब्येतीला चांगल्या नसतात म्हणून.

गुलमोहोर, माझी पंजाबी मैत्रिण एका वेळच्या भाजीला लागणारं कांदा-टोमॅटो-मसाला असं वाटण करून हलकं तेलावर परतून छोट्या छोट्या डब्यांमध्ये भरून फ्रिजला ठेवते. असे सहा, सात डबे असतात तिच्या फ्रिजमध्ये.

Pages