मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - सफरचंद मोदक - गोड - साक्षी

Submitted by साक्षी on 29 September, 2012 - 07:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पारीकरता -
१) १/४ किलो बासमती तांदुळाची पिठी ( साधारण १ मोठे भांडे (शिगेस) भरुन )
२)पीठाएवढेच पाणी
३) १ मोठा चमचा लोणी / तेल
४) चवीपुरते मीठ
सारणाकरता -
१) सफरचंद - १
२) बटाटे - २ (मध्यम)
३) नारळांचा चव (खोबरे) - पाऊण वाटी
४) गुळ - अर्धी ते पाऊण वाटी (गोडाच्या आवडीप्रमाणे कमीजास्त चालेल)
५) आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड

क्रमवार पाककृती: 

सारण - सफरचंद व बटाट्याची साले काढून किसून घ्यावेत. सफरचंदाचा कीस, बटाटयाचा कीस, खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर ठेवावे व ढवळत राहावे. सारण कोरडे झाले (अंदाजे ५ ते ७ मिनिटे) की आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड घालून खाली उतरावे.
सारणउकड -
तांदूळ स्वच्छ धुऊन चांगले वाळवून पिठी केलेली असावी.

पातेल्यात पाणी तापत ठेवावे. त्यात १ मोठा चमचा लोणी / तेल व चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात पिठी घालून उलथण्याच्या टोकाने चांगले ढवळावे आणि झाकण ठेवावे. १ ते २ मिनिटांनी गॅस बंद करावा.
उकड
ही उकड गरम असतानाच गार पाण्याचा हात लावून चांगली मळून घ्यावी.

प्रत्यक्ष कृती - उकडीचा छोटा गोळा चांगला मळून घ्यावा. हाताला तेल लावून घेऊन गोळ्याला टोपीचा आकार द्यावा. शक्य तेवढी पातळ वाटी करावी.
पारी
त्यात १ चमचा सारण भरावे. आता वाटीला चिमटीने जवळ जवळ निऱ्या घालाव्या.
निर्‍यानिर्‍या
निऱ्या करताना हाताला पाणी लावून घ्यावे. निऱ्या झाल्यानंतर वाटी डाव्या हाताच्या तळव्यावर घ्यावी व उजव्या हाताने एकत्र आणून बंद करवी. हे सगळे अत्यंत हलक्या हाताने करावे.
हा उकडण्या आधी
उकडण्या आधी

आणि हा उकडल्यानंतर
उकडल्यानंतर

या प्रकारे सगळे मोदक करून घ्यावे व मोदकपात्रात उकडावे. मोदकपात्र नसल्यास एका मोठ्या पातेल्यात पाव भाग पाणी उकळत ठेवावे. ह्या पातेल्यावर बसेल अशी चाळण घ्यावी. चाळणीला तेल लावून घ्यावे. मोदक गार पाण्यात बुडवून काढून चाळणीत ठेवावे. चाळण आधण पाण्याच्या पातेल्यावर ठेवावी आणि वर घट्ट झाकण ठेवावे. १५ मिनिटांनी गॅस बंद करावा.

गरम मोदक वाढून त्यावर तुपाची धार सोडावी.

गरम मोदक तयार आहे.
तयार मोदकवाटीतला मोदक

वाढणी/प्रमाण: 
१० ते १५ मोदक
अधिक टिपा: 

१) हळदीची पाने उपलब्ध असल्यास चाळ्णीत हळदीची पाने घालून त्यावर मोदक ठेवावे. हळदीचा छान वास येतो.
२) मोदक हे बनवायला किचकट असल्यामुळे सुबक आकार, पातळ पारी या गोष्टी खूप सरावानंतरच जमतील.

माहितीचा स्रोत: 
मूळ कृती - कै. सौ. आई, त्यात फेरफार मी केले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदकाला मुरड कधी बघितलीही नव्हती. आम्हाला साधे मोदक करण्याचीही मारामार. फार सुरेख दिसतायंत मोदक. सारणही नाविन्यपूर्ण Happy

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
नीधप : हातानेच घालतात ही मुरड! परत मोदक केले की मुरड घालतानाचा फोटो काढून डकवेन. फक्त ते कधी जमेल माहित नाही.
मोदक करते कधीतरी पण फोटो काढून डकवणे होत नाही. केंव्हा पासून पाककृती डोक्यात होती. पण रात्री घरी आल्यावर काही करायला जमत नव्हते. काल सुट्टी असल्याने स्वयंपाक झाल्यावर सारण केलं. घरच्यांकडून त्याची पावती मिळाल्यावर उकड काढली व मोदक केले.

दिनेशदा, जागू, लाजो ई. दिग्गजांची पावती मिळाल्यावर खूप छान वाटले.

आई असती तर तिला खूप आनंद झाला असता. मोदक खूप सुंदर करायची ती! तिनेच मला शिकवले. मुरड घालायला मात्र मी दुसर्‍यांचं बघून बघून शिकले.

साक्षी.

मस्त.. मस्त.. मस्त.... Happy ते वरून तुप आल्यावर डोळे बंद करून घ्यावेसे वाटले... Proud नकोच हा त्रास उघड्या डोळ्यांनी बघायला...