व्हेजिटेबल ओSह ग्रातन (vegetable au gratin) अर्थात बेक्ड व्हेजिटेबल्स

Submitted by मामी on 13 September, 2012 - 14:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

भाज्या : फ्लॉवर, गाजर, मटार, फरसबी, उकडलेले बटाटे
पास्ता : आवडीप्रमाणे कोणताही पास्ता नेहमीप्रमाणे शिजवून

व्हाईट सॉस : बटर, कणिक (किंवा मैदा), दूध, मीठ, मीरपूड

इतर : क्रीम चीज, फ्रेश क्रीम, ग्रेटेड चीज, हिंग, मीठ, मीरपूड, बटर
खाताना वरून घालण्याकरता : (आवडीनुसार) टोमॅटो केचप, चिली सॉस, हर्ब्ज (ओरेगानो, बेसिल, चाईव्ह किंवा जे आवडतात ते), चिली फ्लेक्स, मस्टार्ड सॉस इ.

खास उपकरणी : आवन (इलेक्ट्रिक किंवा मायक्रोवेव), आवनप्रुफ काचेचे पसरट भांडे (मी बोरोसीलचं वापरलं आहे. फोटो बघा.)

क्रमवार पाककृती: 

सर्व भाज्या स्वच्छ धुऊन कापून घ्या. गाजराचे क्युब्ज करा. फरसबीचे धागे काढून टाकून त्याचे पेराएवढे तुकडे करा. फ्लॉवरचे साधारण मध्यम आकाराचे तुरे ठेवा. बटाटे सोलून त्याचे मध्यम चौकोनी तुकडे करा.

गॅसवर एका कढईत चमचाभर अमुल बटर टाकून त्यात थोडा हिंग टाकून मग चिरलेल्या भाज्या (बटाटे वगळून) घालाव्यात. थोड्या परतून वरून मीठ घालून झाकण ठेवावे आणि एक वाफ आणावी. भाज्या अर्धकच्च्या रहायला हव्या कारण त्या पुढे बेक करायच्या आहेत.

भाज्या शिजेपर्यंत एकीकडे गॅसवर दुसर्‍या एका भांड्यात चमचाभर बटर घालून त्यात आपल्याला हवी तितकी कणिक(साधारण चार-पाच टेबलस्पून. पण भाज्यांच्या प्रमाणात कमी-जास्त करून) २-३ मिनिटे बारीक आचेवर चांगली परतून घ्यावी. भांडे खाली उतरवून त्यात थंड दूध घालावे. घोटाळत रहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. दाटसर पेस्ट झाली पाहीजे. यात चवीपुरते मीठ आणि मीरपुड घालून ठेवावे.

भाज्या अर्धकच्च्या शिजल्यावर कढई गॅसवरून खाली काढावी आणि त्यात हा व्हाईट सॉस घालून चांगले एकत्र करावे. यातच आता उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि शिजवलेला पास्ता घालावा. फ्रेश क्रीम, चीज क्रीम घालावे.

आवन आधीच गरम करून घ्यावा. मध्यम टेंपरेचर ठेवावे. (प्लीज कोणी मला टेंपरेचरबद्दल अधिक शंका विचारू नका.) आता आवनमध्ये बेक करण्याकरता जे भांडे वापरणार असाल त्यात हे मिश्रण घालावे. वरून किसलेले चीज भुरभुरावे. आणि गरम आवनमध्ये बेक करायला ठेवावे.

वरचं चीज विरघळून जरा जरा लाल होत आलं की झालं समजा आणि काढून गरमगरम सर्व्ह करा. शिजेपर्यंत धीर धरवतो पण निवेपर्यंत धरवत नाही हे खरं असलं तरी थोडा धीर धरा. कारण गरम चीज ही काय चीज असते ते तुम्ही गरम चीज खाईपर्यंत कळणार नाही. Happy

बघता बघता फस्त झालं की...

वाढणी/प्रमाण: 
अं दा ज आणि क्षमता.
अधिक टिपा: 

१. याच पदार्थात सॉसेजेस, चिकनचे उकडलेले तुकडे, मीटबॉल्स इ पदार्थ घालून सामिष जेवणाचा आनंद घेता येईल.
२. पास्ता घातला नाही तरी चालेल.
३. व्हाईट सॉस कमी किंवा जास्त झाला तर चालतो.
४. आवडत असल्यास अननसाचे तुकडेही घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
विविध रेस्टॉरंटस मध्ये खाऊन झाल्यावर, अनेक ठिकाणी वाचल्यावर मग मनाच्या गाभार्‍यातून व्हेजिटेबल ओSह ग्रातनचा झरा आज अचानक झुळूझुळू वाहिला.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त, मस्त. फोटोतलं यम्मी दिसतंय अगदी. मी फक्त पटेटो ग्राटन खाल्लंय. ते खूप आवडलं होतं.
माहितीचा स्त्रोत आणि वाढणी/ प्रमाण भारीच आवडलं Happy

मामी, फोटो भारी दिसतोय. ह्यांच्या त्यांच्याकडे दोन तीनदा हा पदार्थ खाल्ला आहे पण मला कधीच आवडला नाही. का ? काहीच कल्पना नाही.
बस्के, तुझ्या फोटोत ऑ ग्रतानच्या शेजारी काय आहे?

लै भारी रेस्पी मामी! नॉन-देसीफूड पॉटलकांत घेऊन जाता येण्याजोगी.

बस्के, तुझ्या ताटलीत 'अवियल' आहे का असं विचारण्यात आलंय. Happy

अवियल' Lol

मस्त लागते ही रेस्पी. माझा शेजारी यासाठी खास गार्लिक फ्लेवरचं चीज आणायचा..त्याने चव आणखी वाढते असा त्याचा नुस्का.. Wink

सगळेच फोटो यमी....

अवियल समजून मुलं खात असतील तर तसं सांगायला काहीच हरकत नाही.
ज्या खोटं बोलण्याने कुणाचं नुकसान होत नसेल तर काहीच हरकत नाही.

मामी, मस्त दिसतय ओ ग्रातेन Happy

मी यात व्हाईट सॉस मधेच थोडे हर्ब्ज घालते आणि बेक करताना भाज्या+सॉस मिक्स मधे किसलेले चीज मिसळते आणि शिवाय वरुन पण घालते. गार्लिक चीज किंवा गार्लिक बटर ही घालते कधीकधी Happy

नेहमी होणारा प्रकार आहे त्यामुळे कहिबाही व्हेरिएशन्स चालु असतात Happy

या सोबत गार्लिक ब्रेड आणि पोटॅटो फ्राईज किंवा फिश्/चिकन फिंगर्स आणि सॅलड Happy

थंडीच्या दिवसात अगदी हिट्ट मेन्यु Happy

अवियल Lol

मस्त फोटो नी पाकृ!!
तेवढा क्रिमचीजचाही फोटो टाकला असतास तर.....

आमी (ऑफ) व्हाईट सॉसात टोमॅटो पण घालतो, आंबट चव आवडते म्हणून. मग आमचे ऑग्राटीन व्हाईट/ ऑफव्हाईट दिसत नाही Wink

व्वा! मामी ...मस्तच! मी हे नेहेमीच करते. आणि लेक आलेली असली तर सगळ्यांच्या वाटचं आम्ही दोघी संपवतो.
फोटोही मस्तच आलेत. विशेषतः पहिला!आणि हो मी अननस अगदी हमखास वापरतेच. आधी बॉइल करून ठेवलेला. पण पास्ता नाही घालत त्यात. तसाही मी पास्ता/न नूड्ल्स फारसं नाही बनवत.
पण आता पास्ता घालूनही करून बघीन.

धन्यवाद सगळ्यांना. Happy

मंजूडी, मदर्स डेअरीचं चीज स्प्रेड (क्रीम प्लेन) हे चीज घातलं. घट्ट श्रीखंडाची कन्सिस्टन्सी. Happy

वा, छानच !

माझा बर्‍याचवेळेचा बेत असतो हा. माझ्याकडे स्वतः केलेले व्हाईट सॉस इन्स्टंट मिक्स असतेच. आमच्याकडे बटाटा पावडर मिळते, त्यामूळे माझ्यासाठी झटपट होणारा पदार्थ आहे हा !

मस्त रेसिपी आणि फोटोही मस्त, मला अतिशय आवडते. चीजची खरपूस चव यम्मी!

पण एकूणात ब्लॅन्ड लागते जरा, त्यामुळे घरी जास्त लोकप्रिय नाही, किंवा बरोबर अजून काहीतरी झणझणीत पैदा करावे लागते! Uhoh

माझे अत्यंत आवडते कंफर्ट फूड!! Happy त्यातली वितळलेल्या चीजची चव सर्वात भारी लागते. खूप आवडतो हा पदार्थ.

खूप छान आहे पण माझ्याकडून आणि घरी हा पदार्थ करुन होणे शक्य नाही. एकतर घरात ह्यापैकी बर्‍याच गोष्टी नसतात. विकत घेतल्या तर त्या एकदा वापरुण परत कधी वापरण्याचा योग लगेच येणार नाही. माझ्याकडे दरवेळी अमुल नवीन आणण होत आणि ते वर्षभर कुणीच खात नाही. मला हे दुधातुपाचे पदार्थ खाताना भिती वाटते.

Pages