शाही कोबी पुलाव

Submitted by श्रद्धादिनेश on 12 September, 2012 - 07:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

तेल : ३-४ टेबल स्पुन्स
तुप : ३-४ टेबल स्पुन्स
लवंग, काळी मिरी : ४-५ प्रत्येकी
दालचिनी : ३-४ छोटे तुकडे
तेजपत्ता : ३-४ पाने
लसुण : 2-3 मोठ्या पाकळ्या बारीक ठेचून
गरम मसाला पावडर : १ १/२ टेबल सपून्स
मिठ चवीनुसार
कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने सजावटीसाठी

कोबी : पाव किलो
बासमती तांदुळ : १ १/२ कप
फरसबी (तिरके काप केलेली) : १/२ कप
गाजर (जुलियन्स) : १/४ कप

भिजवलेल्या काळ्या मनुका : १/२ कप
भिजवलेले काजू : १/२ कप
पनीर : १५0 ग्रॅम
गरम पाणी : ३ कप

क्रमवार पाककृती: 

१) तांदुळ २-३ दा पाण्यातून धुवून, पाणी काढून टाकून २०-३० मि ठेवून द्यावा.
२) काळ्या मनुका व काजू विसेक मि पाण्यात भिजवून ठेवावेत.
३) कोबीच्या पातळ लांब स्ट्रिप्स कापून घ्याव्यात. जसे चायनीज पदार्थांसाठी कापतो तसे.
४) पॅन मधे २-३ टे स्पू तेल गरम करुन घ्यावे.
५) त्यात हा कापलेला कोबी टाकून ५-८ मि परतून घ्यावा. कोबी जास्त नरम होता काम नये.
६) ज्या भांड्यात पुलाव करायचा आहे त्यात ३-४ चमचे तुप तापवून घ्यावे.
७) तुप गरम झाल्यावर त्यात लवंग, काळी मिरी, दालचिनी टाकून जरा तडकू द्यावे. तेजपत्ता टाकून थोडेसे परतून घ्यावे.
८) आता लसूण टाकून ते थोडेसे परतून घ्यावे.
९) भाज्या घालून दोनेक मि परतून घ्याव्यात.
१०) आता धुतलेला तांदुळ घालून तो पाचेक मि मस्त परतून घ्यावा.
११) भिजवलेल्या मनुका आणि काजू घालावेत.
१२) गरम पाणी घालून सर्व साहित्य एकत्र करून भांड्यावर झाकण ठेवावे.
१३) ५-७ मि नि भात जरासा शिजल्यावर त्यात चवीप्रमाणे मिठ घालून भात व्यवस्थीत शिजवून घ्यावा.
१४) पनिरचे पातळ लांब-लांब तुकडे करुन घ्यावेत.
१५) भात व भाज्या निट शिजल्यावर त्यात कापलेले पनीर आणि गरम मसाला पावडर घालून हलकेच मिक्स करुन घ्यावे.
१६) २-३ मि वाफेवर ठेवून गॅस बंद करावा.
१७) आता परतलेला कोबी वरुन बिर्यानी प्रमाणे पसरून घ्यावा किंवा पुलावच्या लेयर्स करुन त्यामध्ये पसरावा. सगळे एकत्र करुनही घेता येते.
१८) एकदा कोबी घातल्यावर पुन्हा शिजवण्यची प्रक्रीया होऊ नये नाही तर कोबी पिचपिचीत होईल.
१९) वरुन कोथिंबीर आणि पुदीना चिरुन टाकून गरमा गरम पुलावचा आस्वाद घ्यावा.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जण
अधिक टिपा: 

१) कोबी व्यतिरीक्त इतर भाज्यांचे प्रमाण कमी असावे. मुख्य चव कोबीची लागली पाहीजे.
२) जास्त तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या कुटून त्या लसणाबरोबर परताव्यात.
३) मायक्रोवेव्ह मधेही झट पट तयार होतो.
४) आजच केला होता पण सगळे शाही प्रकार वगळून केला होता त्यामुळे फोटो काढले नाहीत.

माहितीचा स्रोत: 
वेगळा पुलाव बनवण्यासाठी केलेले प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users