काही गोड तर काही कडू...

Submitted by मोहना on 10 September, 2012 - 08:07

"आय एम एक्स्ट्रिमली ऑफेंडेंड...." तलावाकाठचं घर बघायला आम्ही आत शिरलो आणि विनसीने माझा दंड पकडला. माझी मान आश्चर्याने तिच्याकडे वळली. तिचा रागाने लालेलाल झालेला चेहरा, शरीराला सुटलेली सूक्ष्म थरथर... आपला गुन्हा काय हेच मला कळेना.
"तुझा मुलगा तुमच्या भाषेत बोलतोय."
’ऑ?’ तो केव्हा मराठी बोलत होता याच विचारात गुंतले क्षणभर. एकदम कोडं सुटलं. मी घाईघाईने म्हटलं,
"तसा काही हेतू नव्हता त्याचा किंवा आमचा कुणाचाच..." हळूहळू ती शांत झाली. विनसी आमची एजंट. घर विकत घ्यायचं ठरल्यावर तिच्याबरोबर फिरत होतो. परदेशात राहत असलो तरी आईशी बोलायचं ते मराठीतच हे ब्रीद वाक्य मुलांच्या मनावर पक्कं ठसलेलं आहे त्यामुळे पोरं मराठीत आणि तिला एकटं पडल्यासारखं वाटू नये म्हणून माझी उत्तरं इंग्लिशमध्ये अशी कसरत गाडीत झाली होतीच. पण अगदी थोडावेळ. म्हणजे सुरुवात व्हायची मराठीतून पण माझं इंग्लिश ऐकल्यावर उरलेलं सारं मुलं इंग्लिशमध्ये बोलायची. पण जे काही बोलणं मराठीत झालं त्याचं पर्यवसान असं होईल याची शंकाही आली नाही. विनसी माझ्यावर उखडलेली मुलाने पाहिलं. आता तो संतापला मनातून. पण आजीच्या वयाच्या माणसाला काही बोलायचं नाही एवढं तारतम्य त्याच्याकडे होतं. मुलीला काय झालं ते कळण्याएवढी ती मोठी नाही. ती तितक्यात काहीतरी मला सांगत आली, मराठीत. काय करावं ते सुचेना, मराठीतूनच तू इंग्लिश बोल हे त्या वेळेला कसं सांगणार? मी घाईघाईत तिला म्हटलं.
"शी डज नॉट लाइक इफ यू स्पीक इन इंग्लिश." मुलीने समजल्यासारखी भाषा बदलली. पुढे तिने दाखवलेली घरं यात्रिकपणेच पाहिली. घर शोधण्याचा उत्साह एकदम बारगळला. नंतर तिचं क्षमा मागणारं इ मेल आलं. पण त्याला काय अर्थ?

एकीकडे मुलांनी आपली भाषा विसरू नये म्हणून प्रयत्न करायचा, आणि त्याचवेळेस ’फक्त घरी बोला हं मराठी. बाहेर असलो की आमच्याशी इंग्लिशच बोलायचं’ असं सांगायचं म्हणजे इफ एल्स करून कार्यालयातली प्रोग्रॅमिंगची भाषा वापरल्यासारखंच की. मुलांचा संगणक केल्यासारखं. पुन्हा त्यातून त्यांना इंग्लिशमध्येच बोला म्हटलं की लगेच ती पण अस्त्र घेऊन तयार असतात,
"तूच तर सांगतेस आमच्याशी मराठीतच बोलायचं."
"अरे पण..." स्पष्टीकरण देतानाच वाटत राहतं कळ दाबली की मराठी किंवा इंग्लिश अशी खेळण्यासारखी अवस्था तर करून टाकत नाही ना आपण त्यांची?.
मुलगा तर अशा वयात,
"हॅ, आता तर मुद्दामच मराठी बोलू आपण तिच्यासमोर. आणि तुम्ही पण ऐकून काय घेता? ’फायर’ करा ना तिला." इथे अमेरिकन बाणा असतो त्याचा.
"स्पॅनिश बोलणार्‍या लोकांबरोबर काय केलं असतं तिने? सांगितलं असतं का असं त्यांना?."
"घरं विकायची तर फ्रेंडलीपणा असायला नको का?"
"तिच्या जागी तुम्ही असतात तर तिने नसतं का तुम्हाला ’फायर’ केलं?’

एक ना अनेक मतं. आम्हाला वाटत राहतं, तिला जे सांगायचं ते सौम्य शब्दात सांगितलं असतं तर? तुम्ही घराबद्दल बोलत असाल तर इंग्लिशमध्येच बोला, म्हणजे मलाही समजेल काय मतं आहेत तुमची... असं काहीतरी. तिच्या वयाकडे, मेहनतीकडे पाहून आमचा काही जीव धजावत नाही तिला काही बोलण्याचा किंवा ’फायर’ करण्याचा. मनातल्या मनात निषेध करत माझं तिच्याबरोबर घर बघणं चालूच राहतं.... आणि अचानक एक दिवस तिचं ईमेल येतं.
"मी सेवानिवृत्त होणार आहे लवकरच. त्याआधी तुम्हाला माझ्या बदली दुसरी एजंट देते. आणि एक लक्षात ठेवा. तुम्ही कस्टमर आहात. आवडली नाही एजंट तर यू कॅन फायर हर.... विनसी"

गेले तीन आठवडे माझा सतरा वर्षाचा मुलगा भारतात आहे. खूप फिरतोय, अंजिठा, वेरूळ, रायगड, बंगळूर, कितीतरी ठिकाणं आणि प्रत्येक ठीकाणच्या नातेवाईकांना भेटतोय. त्याचं कौतुक होतंय तसंच त्याच्या मराठी बोलण्याचंही. विनसीची समस्या सोडवता आली नाही खरी, पण जेव्हा मराठीच्या कौतुकाची पावती मिळते तेव्हा बरं वाटतं, असं मनात म्हणत मी आपलं नुकतंच माझ्या मावसभावाचं इंग्लिशमधून आलेलं पत्र पुन्हा पुन्हा वाचत राहते.
You should be proud of your boy. Even I am unable to speak Marathi without using english words, however he spoke purely in marathi.

याचसाठी केला होता अट्टाहास, त्याची काही गोड फळे तर काही कडू, एकाच नाण्याच्या दोन बाजू....

(हे ललित लेखन नाही पण कुठल्या वर्गात लिहायचे तेच समजले नाही. कुणी सांगेल का?)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>"स्पॅनिश बोलणार्‍या लोकांबरोबर काय केलं असतं तिने? सांगितलं असतं का असं त्यांना?.">> अगदी बरोबर. चायनीज कोरियन लोकांचा दंड पकडून त्यांना सांगायची हिंमत तिने केली असती??? तुम्ही आपापसांत मराठी बोलणं सोडू नये असं मला वाटतं. हवंतर अधेमधे तिला मुलं काय म्हणतायत हे ट्रान्सलेट करुन सांगा.

तुमच्या लेकाबरोबर सहमत आहे. Happy

आधीच्या एका कंपनीत काम करताना हे भाषेचे इश्श्यूज खूप खटकायचे. युरोपियन लोक इथे यायचे तेह्वा आमच्या ग्रूप मीटींग्जमध्ये हे लोक एकमेकांशी आपापल्या भाषेत बोलणार, आणि आम्हाला मॅनेजमेंटची सक्त सूचना असायची की आम्ही इंग्लिशमधूनच बोलायचं! Uhoh

लेखन ललितच्याच जवळपासचं आहे,एक अनुभव, एक समस्या, एक भाष्य म्हणून. आणि खूप प्रभावित करणारंही. तुम्हाला प्रणाम.

आपण आपल्याच भाषेत बोलावे हे उत्तम. समोरच्याला अवघडत असेल तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे.
भारतातही दाक्षिणात्य, त्यांच्याच भाषेत बोलतात.

माझ्यासमोर कुणी त्यांच्या भाषेत बोलले तर ते बोलणे माझ्यासाठी नव्हते, असा समज मी करुन घेतो.

मला तुमचं/मुलाचं म्हणणं पटलं नाही. सौजन्य म्हणून उपस्थित सर्वांना समजेल अशाच भाषेत बोलावं. आम्ही हे पाळतो आणि मुलालाही असंच शिकवलं आहे. हे केवळ घराबाहेरच नाही. घरात आजीआजोबा असले तर आम्ही आपसांत शक्यतोवर इंग्रजी बोलत नाही. मुलगा आवश्यक तेवढं मराठी बोलू शकतो, आणि मोडकंतोडकं बोलला तरी त्यामागची (संवादात सर्वांना सामावून घेण्याची) कळकळ ऐकणार्‍यापर्यंत पोचतेच.

तुम्ही घर विकत घेणार, त्यातून तिला कमिशन मिळणार - म्हणजे ती सर्व्हिस प्रोव्हायडर अन तुम्ही कस्टमर.
अन तरी ती तुम्हाला असं अ‍ॅटिट्युड दाखवते ! काय गरज आहे ऐकून घेण्याची.
ऑफिसात, सोशल सराउंडिंग्ज मधे गोष्ट वेगळी आहे .

या देशात परकीय नागरिकांनी स्थावर मालमत्ता घ्यायला कायदेशीर परवानगी आहे. एखादा अजिबात इंग्रजी न जाणणार चिनी मिलियनियर आला त्याच्या दुभाषाला घेऊन तर ही बाई काय करेल ?

हाउस हंटर्स इंटरनॅशनल मधे किती गिर्‍हाइकं स्थानिक भाषा बोलतात ?

प्रामाणिकपणे सांगायचे तर वाचताक्षणीच तुमची चीड, सहानुभुती वगैरे सारे एकत्र दाटून आले की हे काहीही काय चालवून घेतात..

पण मग विचार केला ते कल्चर, तो देश, तेथील कायदे आपल्या ओळखीचे नाहीत तर लगेच अशी टोकाची प्रतिक्रिया नको.. खरेच तेथील परिस्थिती अशी असेल.. इथे शेअर केलीत त्याबद्दल धन्यवाद..

बाकी शॉकिंग माहीती आहे ही... माझ्यासाठी तरी....
खरेच असे चालते तिथे???

आम्हाला वाटत राहतं, तिला जे सांगायचं ते सौम्य शब्दात सांगितलं असतं तर? तुम्ही घराबद्दल बोलत असाल तर इंग्लिशमध्येच बोला, म्हणजे मलाही समजेल काय मतं आहेत तुमची... असं काहीतरी.>> ह्यातच सगळे आले. मुलाची प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे. तुमचे ह्याबाबतीमधले confusion किंवा अडखळणे मात्र खटकले.

सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
फायर करणं, न करणं यात खूप गोष्टी गुंतलेल्या असतात. माझं म्हणणं इतकंच होतं की तिला जे सांगायचं ते सौम्य शब्दात सांगावं. आणि तिला एकटं पडतोय असं वाटू नये याची काळजी मी घेत होतेच, लेखात म्हटल्याप्रमाणे सुरुवात फक्त मराठीतून होत होती मुलांकडून, उर्वरीत इंग्लिश.
असामी - अगदी तेच माझं म्हणणं. गोंधळ किंवा अडखळणं असं काहि नाही हो, पण कधीतरी मी म्हणतेय ते प्रश्न पडतात खरे...
तुमचा अभिषेक - तुम्हाला राग आला तर ठिक, सहानुभूती नको :-). एकतर हा शाब्दिक हल्ला इतका अनपेक्षित होता की काही सुचलंच नाही. सुचलं तेव्हा आता मुलांसमोर नको तमाशा असं वाटलं. फोन करुन दुसर्‍या दिवशी बोलेन म्हटलं तर त्या एक दोन दिवसात तिने निवृत्त होते आहे असं कळवलं.... पुन्हा प्रत्येकजण अशा प्रसंगाना तोंड देताना स्वभावाप्रमाणे तोंड देतो ना..

मला तरी इथे मराठी बोलताना काही चूक वाटली नाही.
माझा पॉटलक चा मिक्स्ड ग्रूप आहे.जपानी, कोरियन, थाइ, आफ्रिकन, मराठी, मद्रासी वगैरे..आणि खूपदा आया मुलांशी त्यांच्या भाषेत बोलतात. कोणाला काही वाटत नाही त्याचे..

कधी तर पोरांनी मराठी बोललेलं बरं असं वाटतं. एकदा हॉटेलमधे भरपूर लठ्ठ बाई बघितली..लेक लगेच, मॉमी, इज शी फॅट? नशीब, ती बाई ऐकू येण्याच्या अंतरावर नव्हती. नाही तर काही दिवस इथे पोस्टी टाकता आल्या नसत्या Happy

मोहनाजी,
राग, सहानुभुती दोन्हीही नाही... आपल्या शेवटच्या मताशी सहमत.. प्रत्येक जण स्वभावाप्रमाणे रीअ‍ॅक्ट होतो.. खास करून चटकन येनारी प्रतिक्रिया.. बस माझी तीच प्रतिक्रिया मला माझ्या पोस्ट मधून दर्शवायची होती.. आणि ती ही वाचनातून आलेली.. प्रत्यक्ष घटनास्थळी वेगळाही वागलो असतो.. आपण आपल्या जागी योग्यच आहात.. Happy

<<<< नाही तर काही दिवस इथे पोस्टी टाकता आल्या नसत्या >>> हा हा sneha1
तुमचा अभिषेक - तुमच्या भावना पोचल्या :-).

लोकांच्या समोर त्यांना न कळणार्‍या भाषेत आपापसात बोलत राहू नये हे बेसिक आहे. ते योग्यच.
पण एजंटचे वागणे ही ओव्हररिअ‍ॅक्शन वाटली.

हे असं बरेचदा होतं. आताशा बरचसं कोरियन कळतं पण तरिही मी मुलांशी मराठीतच बोलतो. ती दोघही आता आमच्याशी मराठीत बोलतात याचा आनंद वाटतो. इथे (आणि बर्‍याचश्या देशांत) बहुभाषिक असणे त्यांना कळतच नाही. कदाचित तेही कारण असु शकेल.

बाकी एजंट जरा घुर्र्ट वाटतेय. तसे लोकं सगळीकडे असतातच म्हणा, पण तुमच्या मुलाचं १००% पटलं.