नेताजींचे काय झाले?

Submitted by षड्जपंचम on 21 August, 2012 - 02:21

नेताजी सुभाषचंद्र बोस हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला एक ज्वलंत आणि तेजस्वी अध्याय म्हणता येईल. ते फक्त एक सच्चे देशभक्त नव्हते तर एक क्रांतिकारी, जनसामान्यांपर्यंत पोच असलेले आणि भविष्याचा विचार करणारे सुधारणावादी नेते होते. ते एक असे नेते होते की ज्यांना जाती, धर्म, भाषा इ. बंधने तोडून लोकांनी स्वीकारले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक स्वतंत्र सेना स्थापून मोठ्या स्तरावर ब्रिटीशांशी युद्ध पुकारणारा हा पहिलाच नेता!

नेताजींच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले गेले आहेत. अर्थातच, नेताजींच्या तथाकथित मृत्यूनंतरही देशाचे अनेक वर्षे नेताजींवर तेवढेच प्रेम होते. परंतु नेताजींचं काय झालं याची पक्की माहिती कधीच जनतेला मिळाली नाही. ती मिळाली नाही का मिळू दिली गेली नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम मिशन नेताजी नावाची एक संस्था करत आहे . काही पत्रकार व ह्या विषयावर खरी माहिती मिळवण्याची इच्छा असणारे लोक ह्या संस्थेत आहेत. ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नेताजींच्या बाबतीत १८ ऑगस्ट १९४५ नंतर काय झालं ह्याची खरी माहिती भारत व इतर देशांच्या सरकारांकडून मिळवणे व ती जनतेसमोर आणणे.

कुतूहल म्हणून ह्या संस्थेच्या संकेतस्थळावर गेल्यावर बरीच काही माहिती मिळते. ह्या विषयावर थोडे वाचन केल्यावर जाणवते, की भारत सरकारला ह्या विषयावर जास्त चर्चा झालेली नकोच आहे. किंबहुना भारत सरकारने वेळोवेळी हा प्रश्न तापू न देण्याचाच प्रयत्न केलेला आहे.

नेताजींनी देशासाठी काय काय केलं ह्यावर बरेच ग्रंथ आणि लेख लिहिले गेले आहेत. नेताजींनी ब्रिटीश साम्राज्याविरोधी शक्तींची मदत घेऊन भारताला कायमच आणि संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचे स्वप्न पाहिलं. ते प्रथम जर्मनीला गेले. तिथे जर्मनीची मदत मिळवली. जर्मनीची युद्धात माघार सुरु होताच त्यांनी जपान ला प्रयाण केलं व जपान ची मदत मिळवली. ह्या दोन्ही देशांनी नेताजींना दिलेली मदत पाहता त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाची कल्पना येते. एकट्याच्या जिवावर दोन महाशक्तिशाली देशांची मदत मिळवणे आणि एक मोठी फौज तयार करणे, हे असामान्य प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याशिवाय जमूच शकत नाही. नेताजींच्या चाणाक्ष मनाने बऱ्याच गोष्टींचा अंदाज घेतला होता. दुसऱ्या महायुद्धात जपानची अवस्था बिघडल्यावर जगाच्या पाठीवर असा एकाच देश उरला होता की जिथे इंग्लिश आणि अमेरिकन वर्चस्व सहजासहजी पोहोचू शकत नव्हते. सोविएत रशिया. भारतीय स्वातंत्र्ययुद्ध जपानमधून जास्त काळ सुरू ठेवणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत नेताजींनी रशियास जायचे ठरवले असे म्हणतात. जपाननेही त्यांना ह्यासाठी मदत केली होती. प्रचलित समजानुसार विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

नेताजींच्या मृत्यूच्या चौकशी साठी सरकारने अनेक कमिट्या नेमल्या. पण मिशन नेताजी ह्या साईट प्रमाणे बऱ्याच नेताजी-प्रेमींनी हेच म्हणलंय की ह्या कमिट्यांनी कधीही पूर्ण समाधान करणारे पुरावे सादर केले नाहीत. किंवा त्यांना करू दिले गेले नसावेत.

परंतु बऱ्याच नेताजी प्रेमींनी हे कधीच मान्य केले नाही. पुराव्यांचा विचार करता हा अपघात आजच्या तैवान मध्ये झाला, पण तैवान ने म्हणले आहे की असा अपघात कधीच झाला नव्हता. नेताजींनी सुरक्षित पणे निसटावे म्हणून त्यांनी व जपानी अधिकार्यांनी हा बनाव रचला. तैवानच्या माहितीनुसार १८ ऑगस्ट ला तैवान मध्ये कुठलाही विमान अपघात झाला नव्हता. जपानी अधिकाऱ्यांनी इतकेच सांगितले की जो देह नेताजींचा म्हणून आणला होता त्याचा चेहरा इतका बिघडला होता की छातीठोकपणे हे कुणीच सांगू शकत नव्हते की हे नेताजी आहेत, वस्तुत: अपघात १८ ऑगस्ट ला झाला आणि जगाला ह्याची माहिती २३ ऑगस्ट ला मिळाली. ५ दिवस का लागले हा प्रश्न बऱ्याच लोकांना सतावतो. नेताजींच्या पत्नी एमिली बोस ह्यांनी सुद्धा हेच म्हणले आहे की नेताजी रशियाला पोचले होते. तिथे ते स्टॆलिन ची मदत मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आजपर्यंत रशियात त्यांचे काय झाले ह्याची पुराव्यानिशी माहिती कधीच मिळू शकली नाही.

मिशन नेताजी मधील पत्रकारांच्या म्हणण्याप्रमाणे रशिया कडे नेताजींच्या बाबतीत काही classified फायली आहेत व त्या रशियाने कधी जगासमोर आणल्या नाहीत. भारताकडेही नेताजींच्या बाबतीत बऱ्याच फायली असून त्या ' सुरक्षेच्या दृष्टीने अति-महत्वाच्या' ह्या कारणास्तव भारत सरकार ने त्या कधीही समोर आणल्या नाहीत. ह्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारत सरकारने ताबडतोब थांबवले. सी आय ए च्या अहवालांनुसार १९५० मध्ये बोस जिवंत होते व ते भारतात येण्याचा प्रयत्न करत होते. याबद्दलची सी आय ए ची कागदपत्रे मिशन नेताजी वाल्यांनी मिळवली व ती साईट वर आत्ता उपलब्ध आहेत. सी आय ए ने नंतरही एकदा बोस जिवंत असल्याचे म्हणले होते असे वाचनात आले आहे. ही साईट असेही म्हणते की भारताच्या इंटेलिजन्स ब्युरो चाही हे प्रकरण दडपण्यात मोठा सहभाग होता. मिशन नेताजी संकेतस्थळावरील माहितीचा विचर केला तर, सध्याच्या राष्ट्रपतीं सकट भारताच्या बऱ्याच राजकारण्यांना ह्या प्रकरणाची माहिती होती.

दुसरे महायुद्ध संपल्यावर सुभाषबाबू युद्ध-गुन्हेगारांच्या यादीत गेले. भारतानेही ह्याला मान्यता दिली आणि कधीही त्यांचे नाव त्या यादीतून काढण्याचे प्रयत्न केले नाहीत ! गांधींशी वाद झाल्याने सुभाषबाबूंना निवडून येऊन सुद्धा राष्ट्रीय सभेचा चा राजीनामा द्यावा लागला होता हे सर्वज्ञात आहे. सुभाषबाबू जहाल मतवादी होते, आणि शांततेची कबुतरे उडवून राष्ट्र सुरक्षित राहत नाही हे मानणार्यातले होते. त्यामुळे भारत सरकारचा उदासीन दृष्टीकोन फारसे अप्रूप वाटण्यासारखा नाही. हेही वाचले आहे, की भारतात येण्याबाबातीत प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नेहरूंना नेताजींनी एक पत्र लिहिले होते. ते पत्र खरेच गेले होते का, ते काय होते व त्या पत्राचे काय झाले कुणास ठावे? नेताजींच्या बाबतीत ब्रिटन कडेही काही कागदपत्रे असून 'परराष्ट्र संबंधाच्या दृष्टीने महत्वाची' ह्या कारणास्तव त्यांनी ती कधीही समोर आणलेली नाहीत.

रशिया नंतर नेताजींचे काय झाले ह्याबाबत पक्की माहिती नाही. भारतात सरळ मार्गाने येणे अशक्य होते. कारण ते ठरले युद्ध-गुन्हेगार, तेही भारताने राजमान्य केलेले! साहजिकच गुप्तहेर संस्था त्यांच्या पाळतीवर ! त्यामुळे असे मानले जाते की त्यांचा रशियातच मृत्यू झाला असावा. ह्याबाबतीत केजीबी ला माहिती असल्याचे सांगितले जाते. एक मात्र खरं की त्यांच्या येण्याने बर्‍याच लोकांची अढळपदे ढळायची शक्यता होती.

दुसरा तर्क म्हणजे ते भारतात लपून छपून नेपाळमार्गे आले असावेत आणि गुप्त स्वरुपात राहिले असावेत. गुप्तपणे नजरेतून निसटणे हे त्यांना नवीन नव्हते. इंग्रजांच्या तावडीतून निसटून ते अनेक देश फिरले होतेच. भारतात सरळ मार्गाने येणे अशक्य होते. यामुळे त्यांना एक तर भारतात लपून ओळख बदलून येणे हा एकाच पर्याय असावा. हा समज विश्वसनीय मानणाऱ्या लोकांचा पुरावा म्हणजे म्हणजे गुमनामी बाबा. उत्तर प्रदेशात फैझाबाद येथे गुमनामी बाबा नावाचे साधू अचानक प्रकटले. ते कुठून आले ह्याची कुणालाही कल्पना नाही. ते एकटे एकटे राहणारे होते व लोकांमध्ये मिसळत नसत. ते बंगाली होते. त्यांना मोजक्याच व्यक्ती भेटण्यास येत असत व ते त्यांच्याशी पडद्याआडून बोलत असत. ह्या बाबांबद्दल लोकांना संशय होता की हे नेताजी आहेत. त्या बाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडील सामानात नेताजींचे अनेक खासगी फोटो, पत्रे आणि पुस्तके सापडली. एका मान्यताप्राप्त त्रयस्थ हस्ताक्षर तज्ञाने त्यांचे हस्ताक्षर नेताजींशी जुळत असल्याचे सांगितले. भारत सरकार ने लगेच दुसरा हस्ताक्षर तज्ञ नेमला आणि त्याचे हे विधान खोटे ठरवले. एका साधू कडे नेताजींचे खासगी दुर्मिळ फोटो आणि विविध जागतिक विषयांवरची इंग्रजी पुस्तके असण्याचा काय संबंध असावा हेही गुलदस्त्यात आहे. १९९९-२००५ मध्ये नेमलेल्या मुखर्जी कमिशन ने हे मान्य केले की विमान अपघात झालाच नव्हता. कारण, त्या काळाच्या लोकांना तसेच तत्कालीन तैवानी वृत्तपत्रांना अपघाताची काहीही खबर असल्याचे दिसले नाही. [मुखर्जी कमिशन चा अहवालच शेवटी सरकारने अमान्य केला! ] परंतु गुमनामी बाबा हे नेताजी असल्याचे मुखर्जींनी त्यांच्या रिपोर्ट मध्ये अमान्य केले. त्या साधूंची DNA टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. ह्याच मुखर्जींनी नंतर एका व्हिडिओ मध्ये मान्य केले आहे की त्यांना गुमनामी बाबा हे नेताजीच असल्याचे वाटत होते.

नेताजी जिवंत असतील तर समोर का आले नाहीत हा प्रश्न काही लोक विचारतात. पण हाही विचार केला पाहिजे की ते जरी जिवंत असतील आणि बऱ्याच काळानंतर भारतात परतण्यात यशस्वी झाले असतील, तरीही समोर येणे इतके सहज शक्य नव्हते. एक म्हणजे भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते, त्यामुळे ज्या उद्दिष्टासाठी ते लढले ते महायुद्ध् आणि आझाद हिंद फौजेच्या प्रभावामुळे का होईना साध्य झाले होते. तसेच त्यांना भारत सरकारने स्वत:च युद्धगुन्हेगार ठरवले असल्याने गुप्तचर यंत्रणा त्यांच्या पाळतीवर असणार. त्यांचे ताबडतोब हस्तांतरण होण्याची शक्यता असणार. स्वातंत्र्यानंतर २० - २५ वर्षांनी प्रकट होऊन देश हातात घेणे सुद्धा इतके सरळ नव्हतेच. त्यामुळे फक्त खळबळ माजली असती. स्वत:च्याच देशवासियांमध्ये गोंधळ निर्माण करायची त्यांना कदाचित आवश्यकता वाटली नसेल. मंत्रालयात असणारे पण स्वत:चेच कधी काळाचे साथी त्यांच्या सोबतीला उभे ना राहिल्याने वेळ खूप बदललेली होती. आझाद हिंद फौजेचा विरोध करणाऱ्या लोकांनी, नंतर देशभर गाजलेल्या त्या खटल्याच्या जिवावर प्रतिष्ठा मिळवून घेतली. नेताजी एक सच्चे देशभक्त होते. मी हे मिळवून दिलं, हे ओरडून ओरडून सांगण्यापेक्षा देशाला हे मिळालं ह्याचे समाधान मानणारयातले ते होते.

ही गोष्ट स्पष्ट आहे की नेताजी फक्त भारताच्याच नाही तर जागतिक राजकारणातील एक असामान्य व्यक्ती होते. जर्मनी, जपान इ. देशांनी त्यांची खास बडदास्त ठेवण्याचे कारण काय? भारताव्यतिरिक्त ब्रिटन, जपान, रशिया, अमेरिका ह्या सर्व सरकारांकडे त्यांच्याबाबतीत इतक्या साऱ्या गुप्त फाईल्स असण्याचे कारण काय?

नेताजींच्या अचानक पडद्यामागे जाण्यावर अनेक पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत. ह्या विषयावर माहितीची इच्छा असलेल्यांनी missionnetaji.org ला भेट द्यायला हरकत नाही. तेथे बरीच माहिती, दस्तऐवज आणि पत्रे सविस्तर स्वरूपात आहेत. शेवटी हा जुने-पाने उकरून काढायचा नाही, तर आपल्या आवडत्या नेत्याचे काय झाले ह्या बाबतीत माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे. खरे खोटे शोधून खाढणे अतिशय अवघड असले, तरी कुणीतरी ह्यावर काम करतंय ह्याची जाणीव असणे आवश्यक !

टीप: वरील सर्व माहिती इंटरनेट वरून घेतली आहे. अधिक माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे. ह्या विषयावर पुस्तके सुद्धा विक्रीसाठी इंटरनेट वर उपलब्ध आहेत. अनुज धार ह्या लेखकाची पुस्तके शोधावीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इवान,

लेख सध्याच्या परिस्थितीवर अगदी अचूक भाष्य करतोय. सरदार, नेताजी आणि आता इव्हन आंबेडकरांना जो आपले म्हणण्याचा प्रयत्न चाललाय तो केविलवाणा वाटतो, अर्थात, ideological point of view ने. बाकी लोकप्रिय राजकारणकरण्यासाठी ते चाललाय हे खरेच.

असो, विषयांतर भरपूर होईल, लेख नेताजींवर आहे, तो तिथेच राहू द्या ... आजचे संदर्भ वापरून तेव्हाचे राजकारण समजण्याचा प्रयत्न केल्यास हाती काहीहि लागणार नाही.

अर्थात, ते कधीच लागत नाही.

Pages