आपले विचारविश्व - के. रं. शिरवाडकर

Submitted by वरदा on 15 August, 2012 - 13:10

इंग्लिशमधे रीडर्स किंवा कम्पॅनियन बुक्स ही एक फार मस्त सोय असते. कितीही किचकट, गहन विषय असला तरी त्या विषयाची सहज पण अचूक तोंडओळख करून देणारी पुस्तके (पाठ्यपुस्तके किंवा गायडं नव्हेत), तीही त्या विषयातील कुणी अधिकारी अभ्यासकाने लिहिलेली/ संपादित केलेली. ही परंपरा मराठीत जवळजवळ नाहीच. आपल्याकडे कलाशाखेची (भयाण दर्जाची) पाठ्यपुस्तके सोडता सर्वसामान्यांना आकलन होईल अशा समाजशास्त्रीय विषयांवरील पुस्तकांची वानवा आहे. मुळात स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचे समाजशास्त्रज्ञ अगदी मोजकेच आहेत/ होते. आणि त्यातल्या बहुतेकांची हयात ही इंग्लिशमधून व्यावसायिक संशोधनपर लिखाण करण्यात गेली. काही जणांनी मराठीतून लिखाण केलं पण ते तितकसं समाजमानसापर्यंत पोचलं नाही (उदा: वि.म. दांडेकर). शिवाय इतिहास, संस्कृती वगैरे विषय जरातरी आकलनाच्या टप्प्यातले आहेत, त्यांचा वर्ण्यविषय हा रस घेण्यासारखा आहे हे सर्वसामान्य वाचकाला स्वाभाविकपणे वाटतं. त्या तुलनेत अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र असे विषय कोण मुद्दामहून वाचायला जाणार? आणि याही पलिकडचा अस्पृश्य विषय म्हणजे तत्त्वज्ञान. सर्वसामान्यच काय पण इतर समाजशास्त्रांचे विद्यार्थी, अभ्यासक सुद्धा ज्याला वचकून असतात असा विषय हा! जिथे अभ्यासकांनीच वाचायची मारामार तिथे विद्यार्थी आणि इतरेजन कशाला वाचताहेत? पण या सगळ्या परिस्थितीला आणि समजाला छेद देणारं एकमेव पुस्तक मराठीत काही काळापूर्वी प्रसिद्ध झालं. त्याचं नाव 'आपले विचारविश्व'. जागतिक तत्त्वज्ञानाचा थोडक्यात आणि अत्यंत सुगम भाषेत आढावा घेऊन त्याची तोंडओळख सर्वसामान्य वाचकाला सहजी होईल हे बघणारं असं पुस्तक माझ्या समजुतीनुसार मराठीतलं पहिलंच रीडर/ कम्पॅनियन बुक ठरावं.

प्रा. के. रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातलं भारतीय अ‍ॅकॅडेमिक्समधलं एक प्रख्यात नाव. मराठी माणसाला कुसुमाग्रजांचे धाकटे भाऊ म्हणूनच जास्त परिचित. आयुष्यभर प्राध्यापकी आणि संशोधन-लेखन केलं. आणि या सगळ्या वाचन-लेखन-चिंतनाचं सार असलेलं हे पुस्तक वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी लिहिलं.

या तत्त्वज्ञानाचा आढावा घेताना त्यांनी जाणीवपूर्वक फक्त चार महत्वाची क्षेत्रं विचारात घ्यायचं ठरवलं - तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान आणि देवधर्मविचार. त्यांच्याच म्हणण्यानुसार या चारी क्षेत्रांचा समग्र अभ्यास नव्हे तर या विचारप्रवाहांचे स्वरूप आणि दिशा कळणे शक्य व्हावे हे या लेखनामागचे सूत्र आहे.

साहजिकपणे या पुस्तकाचा खूपसा भर हा आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञांवर आणि त्यांच्या वैचारिक योगदानाबद्दल आहे. पण प्राचीन जगातील तत्त्वपरंपरांचा आढावाही त्यांनी घेतला आहे. एकूण सहा भागांत पुस्तकाची विभागणी केली आहे
१. पूर्वेची प्रज्ञा (प्राचीन भारत, चीन, जपान, इस्लाम)
२. पश्चिमेचा विचारविकास (प्राचीन ग्रीक, १७-१८-१९व्या शतकातले विचारवंत)
३. वास्तवाचे वेध (समाजशास्त्र, अमेरिकन फलप्रामाण्यवाद, २०वे शतक)
४. आपला भारत (मध्ययुगीन, आधुनिक)
५. विज्ञान आणि धर्म
६. सफर संपवताना (व्यक्ती-विश्व-समाज-मानवी मनाचा शोध)

मी या वर्ण्यविषयाबद्दल फारसं लिहित नाहीये कारण ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे. जवळजवळ साडेतीनशे पानांचं हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत कादंबरीसारखं वाचलं तर आपलं वैचारिक व्यक्तिमत्व अतिशय समृद्ध करणारा एक अनुभव पदरात पडतो. पण वर्ण्यविषय थोडा क्लिष्ट असल्याने प्रत्येक वेळी प्रत्येकाला तेवढा अवसर मिळतोच असं नाही. तेव्हा अधून मधून तुकड्यातुकड्यांत - ज्या विशिष्ट मुद्यात/ विचारवंतात रस आहे तेवढाच भाग - असं वाचलं तरी यातून मिळणारा आनंद कमी होत नाही. कधीही हातात घ्यावं आणि कोणतंही पान उघडून वाचावं अशी जी काही थोडीफार पुस्तकं असतात त्यांमधे याचा समावेश नक्कीच होतो.

मुळातच तत्त्वज्ञान इंग्लिशमधून वाचायचा प्रयत्न केला की लक्षात येतं की भाषा पक्की असेल तरच वर्ण्यविषय समजतो. कारण प्रत्येक शब्दाला मागे एका संकल्पनेची/ विचारप्रक्रियेची पार्श्वभूमी असते आणि नेहमीच्या इंग्लिश शब्दांच्या वापरात ती माहित असणं आवश्यक नसतं. ज्याला परिभाषा (जार्गन) म्हणतात ती आत्मसात केल्याशिवाय ही पुस्तकं वाचणं दमछाक करणारं ठरतं (आणि म्हणूनच कदाचित बहुतांश मराठी अभ्यासक-विद्यार्थी हे वाचायचा कंटाळा करतात). या अशा भाषेला सुगम मराठीत आणणं हे जवळजवळ अशक्यप्राय काम शिरवाडकरांनी यशस्वीरीत्या केलंय. जवळजवळ प्रत्येक संकल्पनेला त्यांनी मराठी प्रतिशब्द वापरलाय आणि कंसात त्याचा मूळ इंग्लिश शब्द दिलाय. त्यामुळे वाचकाला समजायला अजिबातच अडचण येत नाही. शिवाय मधेमधे छोट्यामोठ्या चौकटी टाकून विविध उद्धरणं, कविता, जादाची माहिती (स्निपेट्स) देऊन विषयाची रंजकता वाढवली आहे.

पण या सगळ्यापेक्षा आपण सर्व मराठी माणसांनी आवर्जून वाचावी ती या पुस्तकाची प्रस्तावना. अडीचपानी प्रस्तावनेत मराठी समाजशास्त्र-विचारवंत परंपरेची पीछेहाट का होतीये/ झालीये यावर अत्यंत परखड भाष्य आहे. उभी हयात शिक्षणक्षेत्रात काढल्यानंतर - मराठवाडा आणि पुणे - जो साक्षेपी प्राध्यापक जेव्हा ही मते मांडतो तेव्हा त्यावर आपण प्रत्येकाने एकदातरी विचार करणं आवश्यक आहे.
"१९५० नंतर जागतिक ज्ञान ज्या गतीने पुढे जात होते त्याचा महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रांत पत्ताही नव्हता. बेप्रवृत्ती आणि इतरांविषयी तुच्छता, आत्मतुष्टी आणि संकुचित दृष्टी यांनी उच्च शिक्षण ग्रासले गेले. परिणामी मराठी विद्यार्थी, म्हणजेच मराठी मन सामान्य गुणवत्तेकडे ढकलले जात होते. त्यात इंग्रजीतला कच्चेपणा! त्यामुळे सामान्यता संपादन (achievement of mediocrity) हा महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा आदर्श बनला!"

या परिचयाचा शेवटही मी त्यांच्याच प्रस्तावनेतील शेवटाने करतेय
"सध्याचे दिवस विचारांच्या लोकप्रियतेचे नाहीत. सध्या सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य आणि नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मूठभर का होईना, सुजाण जन विचारांची देवाणघेवाण, विचारांचे संघर्ष मोलाचे मानीत. सध्या संस्कृतीतून अशा गोष्टींचे उच्चाटन होऊ लागले आहे; वैचारिकतेचा झपाट्याने संकोच होत आहे, आणि हे धोक्याचे आहे. हे मुक्त विचारांशी शत्रुत्व करणार्‍या हुकुमशाहीला, झुंडशाहीच्या राज्याला आमंत्रण आहे..."

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
http://kharedi.maayboli.com/shop/Aapale-Vichr-Viswa.html
आपले विचारविश्व
के. रं. शिरवाडकर
राजहंस प्रकाशन (२०१०)
किंमत - रु. ४००/-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तक वाचले. खूपच मस्त आहे. अनेक वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाचा धावता आढावा ह्यात आहे. त्यामुळे आपले (मानवजातीचे) विचारविश्व कसे घडत गेले याचा एक overview मिळतो. काही गोष्टी नीटशा न कळल्याने अनेक प्रश्नही उभे राहतात. पण कुतूहल निर्माण होणे आणि आणखी सखोल वाचनास उद्युक्त होणे यातच या पुस्तकाचे यश आहे! प्रा. के रं शिरवाडकरांना श्रद्धांजली.

Pages