आपले विचारविश्व - के. रं. शिरवाडकर

Submitted by वरदा on 15 August, 2012 - 13:10

इंग्लिशमधे रीडर्स किंवा कम्पॅनियन बुक्स ही एक फार मस्त सोय असते. कितीही किचकट, गहन विषय असला तरी त्या विषयाची सहज पण अचूक तोंडओळख करून देणारी पुस्तके (पाठ्यपुस्तके किंवा गायडं नव्हेत), तीही त्या विषयातील कुणी अधिकारी अभ्यासकाने लिहिलेली/ संपादित केलेली. ही परंपरा मराठीत जवळजवळ नाहीच. आपल्याकडे कलाशाखेची (भयाण दर्जाची) पाठ्यपुस्तके सोडता सर्वसामान्यांना आकलन होईल अशा समाजशास्त्रीय विषयांवरील पुस्तकांची वानवा आहे. मुळात स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचे समाजशास्त्रज्ञ अगदी मोजकेच आहेत/ होते. आणि त्यातल्या बहुतेकांची हयात ही इंग्लिशमधून व्यावसायिक संशोधनपर लिखाण करण्यात गेली. काही जणांनी मराठीतून लिखाण केलं पण ते तितकसं समाजमानसापर्यंत पोचलं नाही (उदा: वि.म. दांडेकर). शिवाय इतिहास, संस्कृती वगैरे विषय जरातरी आकलनाच्या टप्प्यातले आहेत, त्यांचा वर्ण्यविषय हा रस घेण्यासारखा आहे हे सर्वसामान्य वाचकाला स्वाभाविकपणे वाटतं. त्या तुलनेत अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र असे विषय कोण मुद्दामहून वाचायला जाणार? आणि याही पलिकडचा अस्पृश्य विषय म्हणजे तत्त्वज्ञान. सर्वसामान्यच काय पण इतर समाजशास्त्रांचे विद्यार्थी, अभ्यासक सुद्धा ज्याला वचकून असतात असा विषय हा! जिथे अभ्यासकांनीच वाचायची मारामार तिथे विद्यार्थी आणि इतरेजन कशाला वाचताहेत? पण या सगळ्या परिस्थितीला आणि समजाला छेद देणारं एकमेव पुस्तक मराठीत काही काळापूर्वी प्रसिद्ध झालं. त्याचं नाव 'आपले विचारविश्व'. जागतिक तत्त्वज्ञानाचा थोडक्यात आणि अत्यंत सुगम भाषेत आढावा घेऊन त्याची तोंडओळख सर्वसामान्य वाचकाला सहजी होईल हे बघणारं असं पुस्तक माझ्या समजुतीनुसार मराठीतलं पहिलंच रीडर/ कम्पॅनियन बुक ठरावं.

प्रा. के. रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातलं भारतीय अ‍ॅकॅडेमिक्समधलं एक प्रख्यात नाव. मराठी माणसाला कुसुमाग्रजांचे धाकटे भाऊ म्हणूनच जास्त परिचित. आयुष्यभर प्राध्यापकी आणि संशोधन-लेखन केलं. आणि या सगळ्या वाचन-लेखन-चिंतनाचं सार असलेलं हे पुस्तक वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी लिहिलं.

या तत्त्वज्ञानाचा आढावा घेताना त्यांनी जाणीवपूर्वक फक्त चार महत्वाची क्षेत्रं विचारात घ्यायचं ठरवलं - तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान आणि देवधर्मविचार. त्यांच्याच म्हणण्यानुसार या चारी क्षेत्रांचा समग्र अभ्यास नव्हे तर या विचारप्रवाहांचे स्वरूप आणि दिशा कळणे शक्य व्हावे हे या लेखनामागचे सूत्र आहे.

साहजिकपणे या पुस्तकाचा खूपसा भर हा आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञांवर आणि त्यांच्या वैचारिक योगदानाबद्दल आहे. पण प्राचीन जगातील तत्त्वपरंपरांचा आढावाही त्यांनी घेतला आहे. एकूण सहा भागांत पुस्तकाची विभागणी केली आहे
१. पूर्वेची प्रज्ञा (प्राचीन भारत, चीन, जपान, इस्लाम)
२. पश्चिमेचा विचारविकास (प्राचीन ग्रीक, १७-१८-१९व्या शतकातले विचारवंत)
३. वास्तवाचे वेध (समाजशास्त्र, अमेरिकन फलप्रामाण्यवाद, २०वे शतक)
४. आपला भारत (मध्ययुगीन, आधुनिक)
५. विज्ञान आणि धर्म
६. सफर संपवताना (व्यक्ती-विश्व-समाज-मानवी मनाचा शोध)

मी या वर्ण्यविषयाबद्दल फारसं लिहित नाहीये कारण ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे. जवळजवळ साडेतीनशे पानांचं हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत कादंबरीसारखं वाचलं तर आपलं वैचारिक व्यक्तिमत्व अतिशय समृद्ध करणारा एक अनुभव पदरात पडतो. पण वर्ण्यविषय थोडा क्लिष्ट असल्याने प्रत्येक वेळी प्रत्येकाला तेवढा अवसर मिळतोच असं नाही. तेव्हा अधून मधून तुकड्यातुकड्यांत - ज्या विशिष्ट मुद्यात/ विचारवंतात रस आहे तेवढाच भाग - असं वाचलं तरी यातून मिळणारा आनंद कमी होत नाही. कधीही हातात घ्यावं आणि कोणतंही पान उघडून वाचावं अशी जी काही थोडीफार पुस्तकं असतात त्यांमधे याचा समावेश नक्कीच होतो.

मुळातच तत्त्वज्ञान इंग्लिशमधून वाचायचा प्रयत्न केला की लक्षात येतं की भाषा पक्की असेल तरच वर्ण्यविषय समजतो. कारण प्रत्येक शब्दाला मागे एका संकल्पनेची/ विचारप्रक्रियेची पार्श्वभूमी असते आणि नेहमीच्या इंग्लिश शब्दांच्या वापरात ती माहित असणं आवश्यक नसतं. ज्याला परिभाषा (जार्गन) म्हणतात ती आत्मसात केल्याशिवाय ही पुस्तकं वाचणं दमछाक करणारं ठरतं (आणि म्हणूनच कदाचित बहुतांश मराठी अभ्यासक-विद्यार्थी हे वाचायचा कंटाळा करतात). या अशा भाषेला सुगम मराठीत आणणं हे जवळजवळ अशक्यप्राय काम शिरवाडकरांनी यशस्वीरीत्या केलंय. जवळजवळ प्रत्येक संकल्पनेला त्यांनी मराठी प्रतिशब्द वापरलाय आणि कंसात त्याचा मूळ इंग्लिश शब्द दिलाय. त्यामुळे वाचकाला समजायला अजिबातच अडचण येत नाही. शिवाय मधेमधे छोट्यामोठ्या चौकटी टाकून विविध उद्धरणं, कविता, जादाची माहिती (स्निपेट्स) देऊन विषयाची रंजकता वाढवली आहे.

पण या सगळ्यापेक्षा आपण सर्व मराठी माणसांनी आवर्जून वाचावी ती या पुस्तकाची प्रस्तावना. अडीचपानी प्रस्तावनेत मराठी समाजशास्त्र-विचारवंत परंपरेची पीछेहाट का होतीये/ झालीये यावर अत्यंत परखड भाष्य आहे. उभी हयात शिक्षणक्षेत्रात काढल्यानंतर - मराठवाडा आणि पुणे - जो साक्षेपी प्राध्यापक जेव्हा ही मते मांडतो तेव्हा त्यावर आपण प्रत्येकाने एकदातरी विचार करणं आवश्यक आहे.
"१९५० नंतर जागतिक ज्ञान ज्या गतीने पुढे जात होते त्याचा महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रांत पत्ताही नव्हता. बेप्रवृत्ती आणि इतरांविषयी तुच्छता, आत्मतुष्टी आणि संकुचित दृष्टी यांनी उच्च शिक्षण ग्रासले गेले. परिणामी मराठी विद्यार्थी, म्हणजेच मराठी मन सामान्य गुणवत्तेकडे ढकलले जात होते. त्यात इंग्रजीतला कच्चेपणा! त्यामुळे सामान्यता संपादन (achievement of mediocrity) हा महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा आदर्श बनला!"

या परिचयाचा शेवटही मी त्यांच्याच प्रस्तावनेतील शेवटाने करतेय
"सध्याचे दिवस विचारांच्या लोकप्रियतेचे नाहीत. सध्या सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य आणि नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मूठभर का होईना, सुजाण जन विचारांची देवाणघेवाण, विचारांचे संघर्ष मोलाचे मानीत. सध्या संस्कृतीतून अशा गोष्टींचे उच्चाटन होऊ लागले आहे; वैचारिकतेचा झपाट्याने संकोच होत आहे, आणि हे धोक्याचे आहे. हे मुक्त विचारांशी शत्रुत्व करणार्‍या हुकुमशाहीला, झुंडशाहीच्या राज्याला आमंत्रण आहे..."

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
http://kharedi.maayboli.com/shop/Aapale-Vichr-Viswa.html
आपले विचारविश्व
के. रं. शिरवाडकर
राजहंस प्रकाशन (२०१०)
किंमत - रु. ४००/-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,

इथले विचार जवळजवळ पटले. एकदा वाटलं की मी तुमचं वाचतोय की स्वत:शीच बोलतोय...!

१.
या जगात काहीही ओरिजिनल नसते असे मलाही वाटते. जरा वेगळ्या शब्दांत मांडायचं झालं तर म्हणेन की जगातली प्रत्येक गोष्ट भगवंतांची कॉपी आहे.

२.
>> आजच्या परिस्थितीचा एक अप्रत्यक्ष परिणाम इतकेच हजारेंचे स्वरुप आहे.

हेही पटण्यासारखं आहे. शिवाजीमहाराजांच्या बाबतीतही असेच म्हंटले गेले होते. न्या. रानड्यांच्या The Rise of Marath Power या पुस्तकात महाराजांचा उदय हा संतांच्या प्रबोधनकार्याचा दृश्य अविष्कार होता असे म्हंटले आहे. अर्थात, त्यामुळे महाराज वा हजारे यांचे महत्त्व कमी होत नाहीच.

३.
>> (त्याच्या) जडणघडणीच्या काळात रुजलेले विचार दिसेनासे झाले की (माणूस) हळहळतो.

हे वाक्य तर प्रचंड पटलं. १९९१ साली सोव्हियेत महासंघ मोडीत निघाला तेव्हा वैचारिक बैठक कोलमडल्याने हताश झालेली काही माणसे मी बघितली आहेत.

४.
>> 'त्यांच्यात विचार नाही' असे म्हणणे तकलादू अधिष्ठानावरील विचार आहे...

हे नाही पटले. कारण हल्लीच्या तरुण पिढीत विचार नाही असं आरभाट यांनी कुठेही म्हंटलं नाहीये. त्यांचा मुद्दा असा आहे की विचारांचे पोषण व्हायला लागते. आणि अशी पोषणप्रक्रिया जोमदारपणे होत नाही. (बरोबर ना आरभाट?)

तसं बघायला गेलं तर जागतिकीकरणानंतर उद्योगांत (post globalisation industry मध्ये) सक्रिय झालेली पिढी जागतिक दर्जाची आव्हाने सहजपणे पेलत आहे. त्यामुळे भारतीय तरुणांच्या कर्तृत्वास मर्यादा नाहीत हे ढळढळीतपणे दिसतं. मात्र केवळ सॉफ्टवेअरला माणसे वा उच्च प्रतीच्या अभियांत्रिकी सेवासुविधोत्पादने पुरवणे, इतकंच संकुचित ध्येय असू नये. यापेक्षा बरेच काही भारत जगाला देऊ शकतो.

आज जगात भारतीयांचे नाव आहे, पण भारताचे नाही. ही आरभाट यांची खंत असावी. (बरोबर का हो?)

आ.न.,
-गा.पै.

अरभाट, रैना, वरदा, मृदुला, शांतिसुधा, चिमण, अस्चिग, पेशवा, तुम्ही जास्त लिहायला पाहिजे.

हे नाही पटले. कारण हल्लीच्या तरुण पिढीत विचार नाही असं आरभाट यांनी कुठेही म्हंटलं नाहीये.<<<

गा मा पैलवान, तसे शिरवाडकरांनी म्हंटलेले दिसत आहे, मीही 'अरभाट' यांनी म्हंटले आहे असे नाही म्हणालो Happy

बेफिकीर,

शिरवाडकरांनी असं म्हंटलेलं सापडलं नाही. पण 'तरुण पिढीत विचार नाही' असा सूर सर्वत्र ऐकू येत असे. यालाच काही लोक आदर्शाची वानवा असंही म्हणत. नव्या पिढीसमोर आदर्श नाहीत अशी तक्रार असे.

काही एका प्रमाणात हे खरंय. कारण आदर्श विचार अस्तित्वात असले तरी त्यानुसार आचरण करायला तशी कणखर माणसे लागतात. आता हेच पहा ना, आपले साहित्यिक सरकारदरबाराचे उंबरठे झिजवतात तेव्हा एक प्रतिभावंत म्हणून मिळालेलं स्वातंत्र्य गहाण टाकीत असतात. असे साहित्यिक चांगले कलाकार होऊ शकतील, पण अनुकरणीय व्यक्ती म्हणून कमी पडणार.

शासकीय कारभाराचा नकळत परिणाम समाजावर होत असतो.

ही चर्चा आता काँग्रेस आणि गांधीनेहरू यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. (एक आपली धोक्याची सूचना.) तेव्हा जपून युक्तिवाद करणे. Happy

आ.न.,
-गा.पै.

pustak tatwadnyanawar aahe.. changla aahe.. saglyannach aawadel asa nahi.

varada , changla lihilay.

परिचय आवडला. पुस्तक यादीत टाकले आहे.

तत्वज्ञान हे जंगल आहे हे कळल्यानंतर आता जपूनच पाऊल टाकतो. Happy
जागतिक तत्वज्ञानामध्ये असलेल्या 'युरोसेंट्रिझम'बद्दल पुस्तकात काय म्हटले आहे याबद्दल उत्सुकता आहे.

राजकाशाना,

युरोपकेंद्रत्वाबद्दल मलाही शिरवाडकरांचे विचार वाचायला आवडतील. तत्त्वज्ञानातील युरोपकेंद्रत्व पुढे राष्ट्रवादातही प्रतिबिंबित झाले. त्यामुळे भारतीय राष्ट्राचा युरोपीय दृष्टीकोनातून विचार होऊ लागला. हा विचार भारताच्या प्राचीन तात्त्विक परंपरेशी नेहमी जुळेलच असे नाही. यातून पुढे भारतात अनेक समस्या उद्भवल्या.

आ.न.,
-गा.पै.

गा. पै.
तत्वज्ञानामध्ये नवीन तत्वज्ञान आले की आधीचे बाद होते असा लोकप्रिय समज आहे पण तो खरा नाही. गेल्या काही शतकांमध्ये जेते युरोपकडे असल्यामुळे त्यांचे विचार मूलभूत आणि बाकीच्याचे कमअस्सल असे गृहीतक तयार झाले.
यावर एक वाचनीय लेख इथे.
http://opinionator.blogs.nytimes.com/2012/06/03/philosophys-western-bias...

हेच कलेच्या बाबतीतही झाले पण तो स्वतंत्र विषय आहे.

राजकाशाना,

लेखाबद्दल धन्यवाद! अत्यंत समर्पक लेख आहे. लेखाचा सारांश लेबिनित्झने सांगितलेल्या परिच्छेदात येतो. इथे परत उधृत करतो :

G. W. Leibniz, writing in the early 18th century on the future course of Sino-European relations, suggested evocatively that “the commerce of light,” which is to say of illumination, or knowledge, always piggy-backs on the commerce of goods. Indeed, the past 2000 years reveal a fairly close correspondence between the global centers of economic activity and the centers of intellectual production. Most tellingly, Europe becomes the principle locus of philosophical and scientific activity only when it comes to dominate the global economy through the conquest of the New World and the consequent shifting of the economic center of the world from Asia to Europe.

वरील उतार्‍याचा अर्थ असा की जागतिक व्यापार ज्याच्या हाती, त्याच्या हाती ज्ञानार्जनाच्या चाव्या! जेव्हा भारताचा जागतिक व्यापारात वरचष्मा होता तेव्हा पूर्ण जगासाठी भारत ही सुवर्णभूमी होती.

आज काय परिस्थिती आहे ते मी सांगत नाही! योग यांनी इथे एक संदेश टंकलाय. त्यात त्यांनी गिरीश कुबेर यांच्या लोकसत्तेतील एका लेखाचा दुवा दिलाय. या लेखात गिरीश कुबेरांनी अण्णा हजार्‍यांच्या राजकारण प्रवेशाबद्दल टिप्पणी केलीये.

ते म्हणतात की : "सामाजिक, शासकीय पातळीवर संतांची गरज ही अप्रगत समाजांना लागते."

आता हे विधान वाचून हसावं की रडावं तेच मुळी कळंत नाही. भारताच्या पुनरूत्थानात संतांचं (=अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत लोकांचं) स्थान एकमेवाद्वितीय आहे. न्या. रानड्यांनी लिहिलेल्या The Rise of Maratha Power या पुस्तकात त्यांनी दाखवून दिलंय की शिवाजीमहाराजांचा उदय हा संतांच्या प्रबोधनकार्याचा दृश्य अविष्कार होता. चंद्रगुप्त मौर्याच्या पाठी चाणक्याची साधना उभी होती. फार काय जेव्हा औरंग्याने मराठ्यांत फूट पडण्यासाठी युवराज शाहूला कैदेतून सोडले, तेव्हा अराजक असले तरी कान्होजी आंगरे आणि बाळाजी विश्वनाथ मराठेशाहीच्या भल्यासाठी एकत्र आले. या कार्याकरिता त्यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांचा आशीर्वाद होता. तसेच विजयनगरचे साम्राज्य उभारणारे हरिहरराय आणि बुक्कराय यांना विद्यारण्यस्वामींचं पाठबळ होतं. शिवाजीमहाराजांनाही (किमान एकदा तरी) रामदास स्वामींचं मार्गदर्शन मिळालं होतं.

त्यामुळे भारतातली राजकीय प्रक्रिया नेहमी अध्यात्मिक उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली घडवून आणण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांच्या आंदोलनाचं मूल्यमापन व्हायला पाहिजे. गिरीश कुबेरांनी लावलेल्या कसोट्या भारतीय परंपरेत तितक्याश्या बसत नाहीत.

सांगण्याचा मुद्दा काय की शिरवाडकरांनी जे विचारविमर्शन केलंय त्यात भारतीय विचार पाश्चात्य (= western philosophical viewpoint) नजरेतून पाहिलेत का? की पूर्ण वैचारिक पार्श्वभूमीच मुळी भारतीय आहे (म्हणजे भारतीय दृष्टीकोनातून पाश्चात्य विचार तपासलेत)? की अशी कोणतीही भूमिका न घेता त्रयस्थपणे लेखन केलेय?

शोधून काढणं रंजक (इंटरेस्टिंग) ठरेल.

आ.न.,
-गा.पै.

ही चर्चा वाचून विविध दृष्टीकोन कळत आहेत.
गामा पैलवान यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही ('आजचा समाज' असे तृतीयपुरुषात बोलण्यापेक्षा हे जास्त योग्य वाटते) विचार करत नाही किंवा आमच्यात क्षमता नाही असे नाही. तसे तर कधीच होणार नाही. पण ती क्षमता पोसली/ताणली जात नाहीये असे बर्‍याचदा वाटते. त्याला अनेक कारणे आहेतच. सोशल मिडीया हा फार मोठा घटक ठरत आहे.

गिरीश कुबेर यांचे म्हणणे मला मननीय वाटले. समाजात कुठल्याही क्षेत्रात 'चमकदार, धडाडीचे, इ.इ.' नेतृत्वाची गरज भासत असेल तर समाजाच्या सामूहिक शक्तीचे काय? आम्ही 'आमचा' असा विचार कधी करणार आहोत? म्हणजे परत स्वतः विचार करण्याचा आळस दिसतो. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी नेत्याची गरज भासण्यातून कळपवृत्ती तयार होण्यास मदत होते का? अश्या प्रश्नांच्या अनुशंगाने विचार केला तर त्यांचे 'संतांची गरज अप्रगत समाजाला भासते' हे विधान कळायला मदत होते.

त्यामुळे भारतातली राजकीय प्रक्रिया नेहमी अध्यात्मिक उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली घडवून आणण्यात आली आहे. >>>> हे खरे असले म्हणून जे घडत आहे ते आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी योग्यच आहे हे कशावरून? इथेच प्रश्न आहे. तेव्हा कदाचित गरज असेल, आताही तशी गरज आहे का? आणि इतक्या वर्षांनी, इतक्या बदललेल्या परिस्थितीतसुद्धा तीच संतांची गरज असेल तर आपलेसुद्धा (त्यात 'भारतीय परंपरा'सुद्धा आल्याच) परीक्षण होणे आवश्यक आहे. मला वाटते, कुबेरांना हे अपेक्षित असावे. त्यामुळे परत कुबेरांचे म्हणणे विचार करायला लावते. इतिहास हा काळाच्या संदर्भात समजून घेणे आवश्यक नाही काय? आमचा समाज 'कटघरे में' उभा करण्याचा उद्देश नाही. 'आमच्या इतिहासात तर आतापर्यंत असेच झाले' असा पवित्रा मला व्यक्तिशः थोडा बचावात्मक वाटतो. कुबेरांचे म्हणणे पटणे/न पटणे ही दूरची गोष्ट. आधी त्याचे विविध पैलू समजून तर घेऊ.

राजकाशानाच्या दुव्यासंदर्भात -
यातील One good way to begin to correct this problem... हा परिच्छेद फार महत्त्वाचा आहे. तत्वज्ञ चक्रवर्ती राम प्रसाद यांनी लिहिलेल्या 'Eastern Philosophy' या पुस्तकात हाच मुद्दा मांडला आहे. पौर्वात्त्य तत्वज्ञान अशी संकल्पनाच ते नाकारतात. इथल्या सर्व तत्वविचारांची अशी एकत्र मोट बांधायला त्यांचा विरोध आहे, कारण त्यांच्या मते या विचारधारा भिन्न आहेत. 'इथल्या सर्व विचारधारांमध्ये काहीतरी सामायिक ज्ञान/विचार आहे' या गृहितकातून पाश्चात्त्य समाजाने 'पौर्वात्त्य तत्वज्ञान (इस्टर्न ऑर ऑक्सिडेंटल फिलॉसॉफी)' हे नामाभिधान दिले. हे गृहितक राम प्रसादांसारखे तत्वज्ञ आता नाकारत आहेत. (अगदी बुद्धाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर बुद्धाने केवळ वैदिक कर्मकांडेच नाकारली नाहीत, तर मूल वैदिकविचारालाच आव्हान दिले. त्याअर्थी, हे केवळ काहीतरी नाकारण्यातून अथवा विरोधातून आले नाही. बुद्ध शाश्वत आत्म्याचे अस्तित्वच नाकारतो. इथपासून बौद्ध तत्वज्ञान वेगळे ठरते.)

सांगण्याचा मुद्दा काय की शिरवाडकरांनी जे विचारविमर्शन केलंय त्यात भारतीय विचार पाश्चात्य (= western philosophical viewpoint) नजरेतून पाहिलेत का? की पूर्ण वैचारिक पार्श्वभूमीच मुळी भारतीय आहे (म्हणजे भारतीय दृष्टीकोनातून पाश्चात्य विचार तपासलेत)? की अशी कोणतीही भूमिका न घेता त्रयस्थपणे लेखन केलेय? >>>> हे बघणे खरेच रोचक ठरेल. मला वाटते, पाश्चिमात्त्य दृष्टीकोनातून इथल्या तत्वज्ञानाकडे बघणे अनेकांनी केले आहे. याउलट, सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑरोबिंदो, ओशो, कृष्णमूर्ती, विनोबा इ.चे दृष्टीकोन इथल्या मातीचे असावेत.

कॉमन इस्टर्न थ्रेड आहे. मुराकामीच्या एका पुस्तकात हिदू व्हील ऑफ कर्मा आणि तिबेटन व्हील ऑफ पॅशन्स चे उल्लेख आहेत.

आधी म्हणल्याप्रमाणे माझं तत्वज्ञानाचं वाचन नाही, तो माझा प्रांत नाही आणि एका विशिष्ट मर्यादेपलिकडे त्यात डुबकी मारण्याचा माझा उद्देश नाही त्यामुळे या चर्चेत मला फारसं काही भाग घेण्यासारखं नाही आत्तातरी.

माझ्या वाचनाप्रमाणे ओरिएन्टॅलिझम, युरोसेन्ट्रिक बायस वगैरे आता समाजशास्त्रांच्या सैद्धांतिक प्रणालींमधे मान्य विचार आहेत आणि वर्ण्यविषयाच्या विश्लेषणामधे याचं भान ठेवूनच विश्लेषण केलं जातं. पण तरीही समाजशास्त्रांच्या सैद्धांतिक आणि तत्वज्ञानिक (?) प्रणालींमधे पाश्चात्य तत्वज्ञानाचा पगडा आहे कारण मुळात या सगळ्याच्या सगळ्या विद्याशाखा रेनेसाँ नंतर युरोपमधे विकसित झाल्या, बहरल्या. त्यामुळे त्यांची बैठक स्वाभाविकपणे तिथल्या तत्त्वज्ञानावर आहे. शिवाय आपल्याकडची तत्ववेत्यांची परंपरा बर्‍यापैकी खंडित झालीये. गांधी, विनोबांसारखे काही अपवाद सोडले तर बाकीच्या बहुतेक तत्त्वचर्चा या समाजशास्त्र किंवा विज्ञान यांना काही भरीव देऊ शकतात असं दिसत नाहीये. या उलट पाश्चात्त्य देशांमधे तत्त्वचर्चेचं सातत्य आहे. नवनवीन विचार अहमहमिकेने पुढे आले. आणि त्यांचा थेट परिणाम हा समाजशास्त्रातल्या विश्लेषण पद्धतींवर झाला किंवा त्या विश्लेषणांसाठी ते विचार उपयोगी पडले. आपल्याकडे असं कितिसं झालं? आणि बाहेरच्यांनी सोडा, आपल्याकडल्या समाजशास्त्रज्ञांनी असे काय प्रयत्न केले अशा विश्लेषणांचे? आणि केले नसतील तर त्यामागे काही ठोस कारणं आहेत का याचाही शोध घेतला पाहिजे. नुसती पाश्चात्त्यधार्जिणी वृत्ती म्हणून सोडून दिलं की काम सोपं होतं पण उत्तर मिळत नाही! शिवाय आपण जेव्हा विसाव्या शतकातल्या भारतीय तत्त्वज्ञांबद्दल बोलतोय तेव्हा त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानही वाचलं होतं, ते त्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभावाखाली होते हे लक्षात घ्यायला पाहिजे.

या विद्याशाखांच्या मुळाशी धर्माशी फारकत घेऊन मानवी जीवनाच्या एकेका पैलूचा त्रयस्थपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न आहे. किंबहुना हा दृष्टीकोनच पाश्चात्त्य आहे.
आपल्या प्राचीन तत्त्वज्ञानात समाजाचं असं विश्लेषण करायचा दृष्टीकोन नाही कारण आपली परंपरा वेगळी आहे. आणि या प्राचीन विचारप्रवाहांचा आजही आपल्या तत्त्वपरंपरेवर पगडा आहे. इथे बर्‍यावाईटाचा प्रश्न नाहीये, तर दृष्टीकोनांच्या फरकाचा आहे. आणि आजही जे भारतीय पारंपारिक शास्त्रं शिकतात त्यांना या सगळ्याचा अभ्यास करावाच लागतो कारण त्या विद्याशाखांचं अधिष्ठान त्या तत्त्वपरंपरेत आहे म्हणून....

गांधी, विनोबांसारखे काही अपवाद सोडले तर बाकीच्या बहुतेक तत्त्वचर्चा या समाजशास्त्र किंवा विज्ञान यांना काही भरीव देऊ शकतात असं दिसत नाहीये. या उलट पाश्चात्त्य देशांमधे तत्त्वचर्चेचं सातत्य आहे. नवनवीन विचार अहमहमिकेने पुढे आले. आणि त्यांचा थेट परिणाम हा समाजशास्त्रातल्या विश्लेषण पद्धतींवर झाला किंवा त्या विश्लेषणांसाठी ते विचार उपयोगी पडले >>>>>
हे पटले. अगदी ओशो, ऑरोबिंदो आदींच्या विश्लेषणात प्रामुख्याने धार्मिक तत्वज्ञान (थिऑसॉफी) केंद्रस्थानी आहे. समाजशास्त्र, विज्ञान या अनुशंगाने विचारमंथन फारच थोड्यांनी केलेले दिसते.

फरक दृष्टीकोनांमध्ये आहे, हे तर फारच पटले.

कारण मुळात या सगळ्याच्या सगळ्या विद्याशाखा रेनेसाँ नंतर युरोपमधे विकसित झाल्या, बहरल्या. त्यामुळे त्यांची बैठक स्वाभाविकपणे तिथल्या तत्त्वज्ञानावर आहे.>>> हे विज्ञानाचा आणि त्याच्या इतिहासाचा अभ्यास करताना सतत जाणवते.

>>आपल्या प्राचीन तत्त्वज्ञानात समाजाचं असं विश्लेषण करायचा दृष्टीकोन नाही कारण आपली परंपरा वेगळी आहे. आणि या प्राचीन विचारप्रवाहांचा आजही आपल्या तत्त्वपरंपरेवर पगडा आहे. इथे बर्‍यावाईटाचा प्रश्न नाहीये, तर दृष्टीकोनांच्या फरकाचा आहे. >>
अचूक विश्लेषण. प्रत्येक तत्वज्ञानावर ते जिथे उपजलं तिथल्या संस्कृतीचा बराच प्रभाव असतो. त्यामुळेच दृष्टीकोनातही फरक पडतो. रेनेसान्सच्या काळात जी युरोप (आणि नंतर अमेरिका) आणि बाकीचं जग अशी विभागणी व्हायला सुरूवात झाली तिचे पडसाद आजही दिसतात. आजच्या बदलत्या काळाशी याची सांगड कशी घालावी असा प्रश्न बरेचदा पडतो.

अरभाट,

आपला इथला प्रतिसाद वाचला. काही निरीक्षणे नोंदवावीशी वाटतात.

१.
>> ... ती क्षमता पोसली/ताणली जात नाहीये असे बर्‍याचदा वाटते.

अगदी १००% सहमत! कर्तृत्ववान लोकांना सतत वेगवेगळी आव्हाने स्वीकारावीशी वाटतात. आज बुद्धीजीवी वर्गासमोर आव्हाने उभी नाहीत. शिवाय पैशाला नको तेव्हढे महत्त्व आले आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून विचारवंतांची एक प्रकारची घुसमट होते आहे. हा प्रकार भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र थोड्याफार प्रमाणावर चालू आहे.

एक उदाहरण द्यायचं झालं तर इथल्या इंग्लंडमधील शिक्षणव्यवस्थेचं देता येईल. आज GCSC (=१०वी पास) मुलाचे वय वर्षे १६ असते. सर्वसाधारण मुलाचे गणित आणि इंग्रजी (हो हो इंग्लिश) कमालीचे कच्चे असते. त्यामुळे त्याला नोकरीधंदा करण्यासाठी कंपनीला ज्यादा प्रशिक्षण द्यावे लागते. स्नातकांचीही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे अभ्यासक्रम अधिकाधिक सोपा करण्याकडे शैक्षणिक संस्थांचा कल असतो. तसेच निम्नस्तरीय मुलांवर बराच खर्च केला जातो. त्यामुळे हुशार मुलांकडे म्हणावे तेव्हढे लक्ष पुरवता येत नाही.

तुम्ही म्हणता ती क्षमता ताणण्याची सुरुवात शिक्षण क्षेत्रापासून करावी लागेलसे वाटते.

२.
>> समाजात कुठल्याही क्षेत्रात 'चमकदार, धडाडीचे, इ.इ.' नेतृत्वाची गरज भासत असेल तर समाजाच्या
>> सामूहिक शक्तीचे काय? आम्ही 'आमचा' असा विचार कधी करणार आहोत? म्हणजे परत स्वतः
>> विचार करण्याचा आळस दिसतो.

दोन उदाहरणे देतो. शिवाजीमहाराज धडाडीचे, चमकदार, इत्यादि होते. याउलट लालबहादूर शास्त्री साधेसुधे होते. दोघांच्याही नेतृत्वाबद्दल अजिबात शंका उपस्थित होत नाही.

मला वाटतं की चमकदार, धडाडी, इत्यादि गुणांचा सामूहिक शक्तीशी थेट संबंध नाही.

३.
>> प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी नेत्याची गरज भासण्यातून कळपवृत्ती तयार होण्यास मदत होते का?

मला वाटतं की नेत्याचं अंधानुकरण केल्याने कळपवृत्ती बळावते. भले तो कसाही आला असेल (समाजाच्या गरजेतून वा अन्य मार्गाने). म्हणूनच इथेही वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की : नेत्यावर दबाव कसा टाकता येईल?

४.
>> अश्या प्रश्नांच्या अनुशंगाने विचार केला तर त्यांचे 'संतांची गरज अप्रगत समाजाला भासते' हे विधान
>> कळायला मदत होते.

एक वेळ अशी येते की समाजातल्या प्रतिष्ठितांना हाती शस्त्र धारण करावं लागतं. अमेरिकन राज्यघटनेच्या दुसर्‍या दुरुस्तीनुसार प्रत्येक अमेरिकी नागरिकास हत्यार बाळगायचा अधिकार आहे तो याचसाठी.

ही वेळ येऊ द्यायची नसेल तर राज्यकर्त्यांवर लोकांचा नैतिक दबाव असावा लागतो. भारतात संत (=अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत लोक) जनतेस नैतिक दबाव आणण्याजोगे बनवतात.

त्यामुळे समाज प्रगत आहे वा अप्रगत याचा राज्यकर्त्यांवर दबाव टाकण्याशी थेट संबंध नाही.

५.
>> खरे असले म्हणून जे घडत आहे ते आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी योग्यच आहे हे कशावरून?

जे घडतंय (= अण्णांचे आंदोलन) त्यातून राज्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचं साधन विकसित होतंय. त्यामुळे असे विमर्शन समाजाच्या प्रगतीसाठी पूरक आणि पोषक आहे.

६.
>> तेव्हा कदाचित गरज असेल, आताही तशी गरज आहे का? आणि इतक्या वर्षांनी, इतक्या बदललेल्या
>> परिस्थितीतसुद्धा तीच संतांची गरज असेल तर आपलेसुद्धा (त्यात 'भारतीय परंपरा'सुद्धा आल्याच)
>> परीक्षण होणे आवश्यक आहे.

परीक्षण करायला हरकत नाही. मात्र कसोट्या आणि निकष भारतीय परंपरेत बसायला हवेत.

७.
>> 'आमच्या इतिहासात तर आतापर्यंत असेच झाले' असा पवित्रा मला व्यक्तिशः थोडा बचावात्मक वाटतो.

पायंड्याच्या सुरक्षिततेमागे दडल्यासारखा हा पवित्रा वाटतो का? पण प्रत्येक वेळी परिस्थिती वेगळी होती.

"आमच्या इतिहासात (संतांचे मार्गदर्शन) असेच होत आले आहे" हे अत्यंत ढोबळ विधान आहे. चंद्रगुप्ताच्या वेळी चाणक्याचे मार्गदर्शन बरेच सखोल होते. तर शिवाजीमहाराजांच्या वेळी समर्थ रामदासांचे मार्गदर्शन अत्यंत त्रोटक स्वरूपाचे (पण समर्पक) होते. ब्रह्मेंद्रस्वामींचे कान्होजी आंगरे व बाळाजी विश्वनाथास झालेले मार्गदर्शन एक सल्लागार (कन्सल्टंट) या नात्याचे होते. विद्यारण्यस्वामींचे हरिहरराय आणि बुक्करायास झालेले मार्गदर्शन नक्की कसे होते ते मला माहित नाही. परंतु परिस्थितीनुरूप असणारसे वाटते.

त्यामुळे इथे पायंड्याची सुरक्षितता हा मुद्दा लागू पडत नाही.

८.
>> यातील One good way to begin to correct this problem... हा परिच्छेद फार महत्त्वाचा आहे.
>> तत्वज्ञ चक्रवर्ती राम प्रसाद यांनी लिहिलेल्या 'Eastern Philosophy' या पुस्तकात हाच मुद्दा मांडला
>> आहे. पौर्वात्त्य तत्वज्ञान अशी संकल्पनाच ते नाकारतात. इथल्या सर्व तत्वविचारांची अशी एकत्र मोट
>> बांधायला त्यांचा विरोध आहे, कारण त्यांच्या मते या विचारधारा भिन्न आहेत

एका अर्थी सहमत. पण दुसर्‍या अर्थी नाही. पौर्वात्य तत्त्वज्ञानांचा म्हणून असा एक स्वतंत्र गट आहे असं अनेकांना वाटतं. याचं कारण म्हणजे बरीचशी पौर्वात्य (आणि सर्व भारतीय) तत्त्वज्ञाने ही साधकाने जगून पाहायची असतात. भारतीय तत्त्वज्ञानांना म्हणूनच दर्शन असेही म्हणतात.

मात्र पाश्चात्य तत्त्वज्ञानांना दर्शन ही संज्ञा कितपत लागू पडेल याची शंका आहे. एक उदाहरण म्हणून बघू गेल्यास डॉक्टर राधाकृष्णन, महर्षी अरविंद घोष, ओशो, कृष्ण्मूर्थी, विनोबा, गांधी, टिळक इत्यादि तत्त्वज्ञांचे एकतर आश्रम तरी होते किंवा त्यांनी आपल्या लेखनातून सामान्य जनतेला तत्त्व कसे जगावे याचं प्रतिपादन केलंय. अशा प्रकारचं मार्गदर्शन पाश्चात्य तत्त्ववेत्यांनी जनतेस केलं आहे का? नसण्याची शक्यता अधिक.

प्रत्यक्ष आचरण हे भारतीय (वा पौर्वात्य) तत्त्वज्ञानांचे वैशिष्ट्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

अगं वरदा, म्हणजे तू लिही आणि आमचे शिक्षण कर. बाकी काहीच नाही. जास्त वाचायला आवडेल एक वेगळा स्वतंत्र लेख. इथे एक तर धार्मिक/ अध्यात्मिक सश्रद्ध लिहीले जाते नाहीतर मजेचे . आता तू म्हणतीस तसे बौद्ध तत्वज्ञान, हिंदू फिलॉसॉफी वर लेख लिहीलेस तर वाचायला आवडेल ना. नॉट टुबी फीलिन्ग सॅड प्लीज.

पुस्तक वाचलं नसल्याने अभिप्रायावरुन त्याबद्दल खूप काही लिहीता येऊ शकत नाहीच. तत्वज्ञान या शब्दाचे भाषांतर philosophies असे बहुवचनी होऊ शकतं आणि ते जास्त योग्य आहे. Eastern Philosophies. तसे पाहता प्रत्येकाचं तत्वज्ञान वेगळं असतं - काही समान धागे पकडून. तत्वज्ञान हे विज्ञानाप्रमाणे 'तत्व'निष्ठ असलं तरी 'एक'निष्ठ नसतं त्यामुळे आपलंसं करुन आपलीही दिडकी त्यात घालणं महत्वाचं असतं. दुरून डरांव-डरांव वाटले तरी सगळ्या बेडकांचे आवाज वेगळे असतात.

आपल्याला जरी शे-दोनशे वर्षं खूप वाटली तरी मानवाच्या इतिहासात ती नगण्य. त्या पार्श्वभुमीवर पौर्वात्य तत्वज्ञान जास्त प्रगत वाटतं, जास्त सर्वांगीण वाटतं. पण अजुन शे-दोनशे वर्षानी आपली उत्क्रांती शरीराबाहेर जास्तच झाली की ते सर्व कदाचीत पूर्णपणे कालबाह्य पण व्हायचं.

देवाधर्माच्या विचाराबद्दल हिंदु आस्तिक परंपरा गमतीदार आहेत - ६ पैकी ४ देवाला पूर्णपणे डावलतात. पण नंतर झालेल्या बदलांनी सर्वच बदललं. त्यात बराचसा हातभार लोकसंख्येचाही आहे. कोणताही (चांगला) आवाज दाबायला १-२ कोटी लोक सहज समोर येतात. त्यामुळेच गांधी-विनोबांसारखे विरळेच. खरंतर गिजुभाईंसारखे त्याच पंक्तीत हवे - शिक्षणाचे पण तर तत्वज्ञानच आहे. पण पुन्हा रुढ्यांचं (आणि पर्यायानी पुर्वात्य तत्वज्ञानचं) ओझं! नेहरू, आंबेडकर, जयप्रकाश हे सर्व तत्वज्ञानीच होते .... टाटा, बिर्ला हे पण

महाराष्ट्राचा(ही) उल्लेख झाला आहे म्हणून मागे एक बोर्ग आणि महाराष्ट्रियन असे स्फुट (पण इंग्रजीत) लिहिले होते त्याचा हा दुवा: http://www.maayboli.com/node/4610

aschig,

अवांतर

>> देवाधर्माच्या विचाराबद्दल हिंदु आस्तिक परंपरा गमतीदार आहेत - ६ पैकी ४ देवाला पूर्णपणे डावलतात.

कुठल्या त्या मी विसरलो. Uhoh जरा सांगणार का? इथे देव म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर अभ्प्रेत आहे, बरोबर?

आ.न.,
-गा.पै.

वरदा, हे पुस्तक मला ज्या दिवशी वाचायला मिळेल तो सुदिन.. पण प्रस्तावनेतील वाक्याला मात्र मनापासून दाद द्यावीशी वाटली !

जबरदस्त पुस्तक! फायनली विकत घेण्याच योग आला आणि पहिल्या ४-५ पानातच प्रचंड आवडून गेले. मी एपिस्टेमॉलॉजी शिकवतो पण युरोसेंट्रीझमचा पगडा माझ्या करिक्युलमवर आहेच त्यामुळे भारतीय तत्वज्ञानाची माहिती तशी जुजबीच होती. या पुस्तकाने त्यात भर तर पडतेच आहे पण त्याहूनही लेखकाचा प्रत्येक तत्वज्ञान तयार होण्यामागचे 'कॉटेक्स्ट' देणे हे अत्यंत महत्वाचे आहे. नवा विचार तयार होताना तो तेंव्हाच, त्याच परिस्थितीत, त्याच लोकांना का सुचला हे कळले की त्या विचाराचे 'ऑब्जे़टिव्ह' मूल्यमापन शक्य होते.

Pages