कालचा प्रसंग. म्हणाल तर विनोदी, म्हणाल तर "भगवान का लाख लाख शुक्र है के अनहोनी टल गई" प्रकारातला....
काल लेक शाळेतून आला. शाळेत निघताना टापटिपीत निघायचं आणि येताना मात्र शिमग्याच्या सोंगासारखं यायचं, हे रोजचंच झालंय.
जाताना आत खोचलेला शर्ट परत येईपर्यंत अर्धा बाहेर, शर्टवर कमीत कमी दोन (आणि जास्तीत जास्त कितीही !) डाग, दिवसाआड एका नवीन जागी खरचटल्याच्या खुणा, मस्ती करून करून थकलेला पण तरीही प्रफुल्लित चेहरा, हातात एखादं छोटंसं फूल किंवा चित्र आणि कधी एकदा घडलेलं रामायण आईला सांगतो असा आविर्भाव....
कालही तसंच.
आल्या-आल्याच जाहीर केलं,
"आई, थांब. इथेच उभी रहा. मी तुला नाकातून एक गंमत काढून दाखवणार आहे "
"ई...हे काय आता नवीनच..."
माझा चेहर्यावरच्या एक्स्प्रेशन्सकडे संपूर्ण दुर्लक्ष करून लेकाने आपलंच घोडं पुढे दामटवलं.
"थांsssब. दाखवतो तुला. जरा धीर धर."
एका नाकपुडीत बोटांची चिमट घालायचा प्रयत्न चालू होता.
आता मात्र मी वैतागले.
"काय आहे सांगशील का ? काही गेलंय का नाकात ?" असं म्हणत मी त्याचं नाक तपासलं.
कुठे काही दिसेना.
त्याचा प्रयत्न चालूच.
"गेssलं नाहीsये. थांब तू."
अजून आम्ही दारही लावलं नव्हतं. त्याच वेळी तीर्थरूप आले (चिरंजीवांचे !)
"ए, काय चाल्लंय रे? नाकात बोटं का घालतोयस ? आणि तू पण काय बघत बसलीयेस ? "
"अरे, तो सांगतच नाहीये. नुसतंच थांब थांब म्हणतोय. नाकात पण काही दिसत नाहीये."
लेकाकडे लक्ष गेलं तर त्याचा चेहरा आता रडवेला झाला होता.
"अरे, हे बाहेर का येत नाहीये ?"
आता मात्र आमची चांगलीच तंतरली.
"पिलू, काय घातलंयस नाकात ?" असं म्हणत मी तपासण्यासाठी पुन्हा नाकाला हात लावला तर दुखण्यामुळे तो हातही लावू देईना.
"आ...आss..."
तेवढ्यात नवरोबांनी प्रसंगावधान दाखवून त्याला एक नाकपुडी बंद करून दुसर्याने श्वास बाहेर सोडायला लावला आणि दुसर्या उच्छवासासोबत एका प्लॅस्टिकच्या कागदाच्या सुरळीने टुणकन बाहेर उडी मारली !
त्याचं दुखायचं थांबलं होतं. पण तरीही चेहरा अजून वैतागलेला होता.
"काय आहे हे ?"
" मायलोच्या स्ट्रॉला लावतात तो प्लॅस्टिकचा कागद..."
"तो कसा गेला नाकात ?"
"मी घातला..."
"का ?"
" मला रा-वन मधल्या शारुख खानसारखं नाकातून लांब प्लॅस्टिकची दोरी काढून तुम्हाला सरप्राईज करायचं होतं." :डोक्याला हात लावलेली बाहुली :
त्याचं स्पष्टीकरण ऐकून आम्हाला एकीकडे हसायला येत होतं आणि एकीकडे राग येत होता.
मग "असं करणं किती डेंजर असतं " ह्या विषयावर जरावेळ त्याचं बौद्धिक घेतल्यावर सगळा प्रसंग निवळला.
नंतर विचार करताना लक्षात आलं की बहुतांश मुले नाकात काहीतरी वस्तू (शेंगदाणा, वाटाणा, चुरमुरा, गोटी हे त्यातले प्रमुख पाहुणे) घालण्याचा प्रकार करतात, पण तो साधारण दोन ते चार वर्षे या वयात.
आमच्या महाभागाने त्या वयात काही केलं नाही आणि आत्ता सहा वर्षे पूर्ण व्हायच्या, तुलनेने कळत्या वयात हा प्रयोग केला.
मग आठवलं, तो २-३ वर्षाचा असताना एकदा असंच खिदळताना पाणी पीत होता.
ते पाहून त्याला खाद्यपदार्थांचा आणि हवेचा मार्ग वेगवेगळा असतो हे चित्र काढून समजावून सांगितलं होतं.
आणि खाताना किंवा पिताना चाळे करू नयेत, नाहीतर हे मार्ग चुकून गंभीर अपघात होऊ शकतात हे ही सांगितलं होतं.
तिथे आमची विसूकाका आणि टकुमावशीची पहिली भेट झाली.
तेव्हाचा संवाद.
" हे बघ, पाणी किंवा खाऊ इसोफेगसमधून आत जातं आणि हवा ट्रकियामधून आत जाते "
मी शास्त्रशाखेच्या विद्यार्थ्याला सांगावं इतक्या सहजपणे सांगितलं होतं.
पण आमचा विद्यार्थी अजून बोबड्या बोलांमधून सुद्धा बाहेर आला नव्हता
"हवा कचातून ज्याते ?"
"ट्रकिया"
"-----"
"आनि खाऊ कचातून ज्यातो ?"
"इसोफेगस"
"-----"
"पलत शांग"
मग त्याला चित्रे काढून दाखवली.
आणि नावं लक्षात यावी म्हणून इसोफेगसचं (अन्ननलिका) "विसूकाका" आणि ट्रकियाचं (श्वासनलिका) "टकुमावशी" असं बारसं करून टाकलं !
मग नंतरही अधनंमधनं हे दोन नातलग आमच्या गप्पांमध्ये डोकावू लागले.
त्यांच्या सोबतच मग हळुहळू "स्टमकपंत" "ब्लॅडरपंत" "रेक्टमपंत" ह्या मेंब्रांची देखील भरती झाली.
पण गेल्या महिन्यात रा-वन चित्रपट बघताना, ते रोबॉटिक जी-वनकाका नाकातून चमकदार केबल काढून करिनाकाकूला दाखवतात, हा प्रसंग पाहत असताना "ई...यक्क..." असल्या प्रतिक्रियांच्या गोंधळात " हे सगळं खोटं असतं हं, आपण असं करायचं नाही " हे परवलीचं वाक्य उच्चारायचं राहून गेलं....आणि त्याचा परिणाम काल दिसला.
नंतर दिवसभर अधनंमधनं लेकाच्या नाकात डोकावून पाहणं चालू होतं !
********************************************************************************************************************
असल्या प्रसंगातून सगळं आलबेल झालं तर नंतर हसायला विषय मिळतो.
पण काहीवेळा अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
सध्या माझ्या सोबत काम करत असलेल्या एका मैत्रिणीचा मुलगा पाचव्या वर्षी, खेळताना चोकिंग होऊन जागीच दगावला.
बर्याचदा अशावेळी पालक स्वतःच घाबरतात, गोंधळून जातात.
श्वासाचा मार्ग बंद झाला तर अवघ्या ४-५ मिनिटात मेंदूला इजा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने काही प्राथमिक गोष्टींची माहिती ठेवली तर एखाद्याचे प्राण वाचवले जाऊ शकतात.
अशावेळी काय करू नये ?
१. मूल स्वतःहून खोकत असेल तर खोकला थांबवायचा प्रयत्न करू नये.
२. वस्तू दिसत नसेल तर किंवा खूप आत दिसत असेल आणि मूल शुद्धीवर असेल तर ती वस्तू काढायच्या फंदात न पडता सरळ दवाखाना गाठावा. तिथे असलेल्या वेगळ्या साहित्याच्या मदतीने डॉक्टर अशी वस्तू जास्त सुरक्षित रितीने काढू शकतात.
३. नाकातील वस्तू काढण्यासाठी चुकूनही तपकीर हुंगवू नका.
स्पष्टिकरणः शिंक येण्या आधी एक जोरदार श्वास आत घेतला जातो. छोटा शेंगदाणा, मणी इ. नाकातील वस्तू त्या श्वासाबरोबर श्वासनलिकेत जाऊ शकते. असे झाल्याने एक मायनर इन्सिडेंट मेजर लाईफ थ्रेट मधे परिवर्तीत होतो. (नशीबाने आजकाल तपकीर ओढणारे सहसा मिळत नाहीत.)
४. नाकातील गोलाकार व टणक वस्तू : जसे मणी, चिकूची/सिताफळाची बी. घरी काढण्याचा प्रयत्नही करू नका. - चिमट्यात धरता येत नाही. अधिक खोल जाऊ शकते.
५. मूल अतीशय शांत व को-ऑपरेटिव्ह असल्याशिवाय इतरही वस्तू काढण्याचा प्रयत्न घरी करू नका. वस्तू आत खोलवर जाण्याचा वा नाकात रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. घोळणा अगदी सहज फुटतो.
१. मुलाला खोकला काढायला सांगावे. ह्यामुळे हवेचा दाब तयार होऊन संबंधित वस्तू बाहेर फेकली जायला मदत होते.
२. नाकाने श्वास आत ओढण्याचे टाळून तोंडाने श्वास घ्यायला सांगावे. नाकाने श्वास आत ओढला तर वस्तू सुद्धा आत ओढली जाण्याचा धोका असतो.
३. कुठल्या नाकपुडीत वस्तू अडकली आहे हे नक्की माहीत असेल तर त्याच्या शेजारील नाकपुडीवर बोट ठेवून श्वास बाहेर सोडायला सांगावा, असे केल्याने वस्तू बाहेर फेकली जायची शक्यता वाढते.
४. हेम्लिक / हॅम्लिक मॅन्युव्हर (Heimlich maneuver) करता आले तर उत्तम.
५. कुठल्याच उपायांचा फायदा होत नसेल तर त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा प्रयत्न करावा.
६. वरील प्रकारांनी वस्तू बाहेर निघाली असेल तरी नंतरचे काही दिवस खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वासाचा आवाज येणे, ताप ह्यासारख्या लक्षणांवर लक्ष ठेवावे. कारण क्वचित एखादा तुकडा आत जाऊन न्युमोनिया व्हायची शक्यता असते.
७. अधूनमधून मुलांना 'विसूकाका' आणि 'टकुमावशी' च्या अस्तित्वाची आठवण करून द्यावी
त.टी.-
१. प्रचि जालावरून साभार.
२. 'अशावेळी काय करू नये' मधील महत्वाचे मुद्दे क्र. ३ ते ५ सुचवल्याबद्दल डॉ. इब्लिसना धन्यवाद.
.
आपल्याला जर घरात कुठे कुठे
आपल्याला जर घरात कुठे कुठे डेंजरस वस्तू आहेत ते शोधायचं असल्यास रांगत्या बाळाला जमिनीवर ठेवा..ते रांगत बरोब्बर त्या वस्तू, कोपरे लगेच हुडकून काढते >>>>>>>>>> १०००००० % बरोब्बर... माझी लेक राजवी यात मास्टर आहे....... :)
खुप छान.
खुप छान.
लेकीचा आजचा पराक्रम....
लेकीचा आजचा पराक्रम.... खाताखाता खेळणं चाल्लेलं. फुटाणे हादडत होती. मी पण समोरच होते. इतक्यात बेल वाजली म्हणुन दार उघडायला गेले. १ मिनिटात परत आले तर ही शांतपणे मला सांगते, 'ते नाकातुन बाहेर पण येत नाहीये आणि खाता पण येत नाहीये.' काय उद्योग केलाय, हे क्षणात लक्षात आलं. फुटाण फार आत गेलेला नव्हता. नाकात दिसतही होता. सरळ गाडीत घातल लेकीला आणि प्रायमरी हेल्थ्केयर्ला नेलं. तिथल्या इंटर्ननी अगदी सहज गप्पा मारत तो बाहेर काढला. लेकीने इतक्या शांततेत तो काढु दिला.. की त्यासाठी चॉकलेट दिलं डॉक्टरने तिला!!
आमच्या चिरंजीवांनी पण अगदी
आमच्या चिरंजीवांनी पण अगदी असेच काही महिन्यांपूर्वी केले होते. मी अगदी त्याच्या पुढ्यात असूनही काही करू शकले नाही, म्हणजे बघा. एका क्षणात दोन्ही नाकपुड्यांमध्ये एक एक पंढरपुरी डाळं घातली. मी प्रसंगावधान (वगैरे?) राखून त्याला शिंक येतेय का, विचारले, आणि खरंच सटासट शिंका आल्या. त्यात एका बाजूची डाळ नाकाच्या थोडीशी खाली होती, ती अगदी हाताने काढता आली. पण दुसर्या बाजूची डाळ शिंकांमध्ये आधीच पडली होती. पण त्याचं म्हणणं ती अजूनही आतच आहे. मला खात्री होती की ती निघाली आहे, पण नवरोबाने 'सेफर साईड' म्हणून पेडीकडे नेले. पेडीने तपासले त्याला पण आत काहीच नसल्याची खात्री होती, पण परत कशाला रिस्क म्हणत त्याने पुन्हा 'सेफर साईड' म्हणून इएनटीकडे पाठवले. आता इएनटीने नीट आतून तपासणी केली तरी पुन्हा एकदा 'सेफर साईड' म्हणून एक्सरे काढायला सांगितला. आता त्यात डाळ कुठे दिसणार नाही पण किमान काही कंजेशन दिसत असेल तर शंका फिटेल, हे ही सांगितले. अर्थात सगळा रिपोर्ट क्लीअर आला, पण या सगळ्या रामायणात पाऊण दिवस खर्च पडला.
त्यानंतर मुलाला डाळं न खाण्याची शिक्षा चालू आहे. आता तो ३ वर्षांचा झाल्यानंतर बंद करू. पण मग चिरंजीवांनी घ्यायचा तो धडा घेतलाय. आणि असे का करू नये, यावरचे आपले मौलिक ज्ञान आपल्या वयाच्या सर्व मित्र-मंडळींना देऊन त्याने १-२ आई-वडिलांचे खरोखर असे अपघात होण्याचे वाचवले आहे.
[ म्हणजे मला हा मोती/शेंगदाणा नाकात घालावासा वाटतोय, पण माधवने सांगितलेय की त्याने खूप त्रास होतो, म्हणून मी तुला परत देतोय, असली वाक्यं त्यांच्या पालकांनी आम्हाला ऐकवलीये. ]
आज आम्च्या लेकाने
आज आम्च्या लेकाने प्लॅस्टीकच्या बॉलपेन च्या शेवटी असते तो भाग खाल्ला. तोंडात घोळवत बसला होता म्हणे अचानक पोटात गेले.
आता फक्त वेट आणि वॉच. तो असे काही करेल असे कधीच वाटले नव्हते.
मॉरल ऑफ द स्टोरी: आपल्याला समजदार वाटणारे आपले लेकरु वर उल्लेख केलेले सगळे प्रकार कळत नकळत करु शकते /किंवा त्याच्या कडुन हे प्रकार होउ शकतात.
माझ्या 8 months च्या मुलीनें
माझ्या 8 months च्या मुलीनें औषध च्या bottle च्या खोक्याचा थोडा तुकडा गिळला. दूध पित आहे पण ते बाहेर कसे निघेल doc कडे जावे का
खोके फार प्लास्टिक वाले नसेल
खोके फार प्लास्टिक वाले नसेल तर आता एव्हाना चोथा झाला असेल.
श्वास व्यवस्थित येत असेल, खात पित खेळत असेल तर फार काळजीचे कारण नाही(मी डॉक्टर नाही, हे मेडिकल ओपिनियन नाही)
Pages