लहान मुलांनी नाका-तोंडात वस्तू घालण्याचे अपघात

Submitted by रुणुझुणू on 8 July, 2012 - 06:45

कालचा प्रसंग. म्हणाल तर विनोदी, म्हणाल तर "भगवान का लाख लाख शुक्र है के अनहोनी टल गई" प्रकारातला....

काल लेक शाळेतून आला. शाळेत निघताना टापटिपीत निघायचं आणि येताना मात्र शिमग्याच्या सोंगासारखं यायचं, हे रोजचंच झालंय.
जाताना आत खोचलेला शर्ट परत येईपर्यंत अर्धा बाहेर, शर्टवर कमीत कमी दोन (आणि जास्तीत जास्त कितीही !) डाग, दिवसाआड एका नवीन जागी खरचटल्याच्या खुणा, मस्ती करून करून थकलेला पण तरीही प्रफुल्लित चेहरा, हातात एखादं छोटंसं फूल किंवा चित्र आणि कधी एकदा घडलेलं रामायण आईला सांगतो असा आविर्भाव....

कालही तसंच.
आल्या-आल्याच जाहीर केलं,

"आई, थांब. इथेच उभी रहा. मी तुला नाकातून एक गंमत काढून दाखवणार आहे " Uhoh
"ई...हे काय आता नवीनच..."

माझा चेहर्‍यावरच्या एक्स्प्रेशन्सकडे संपूर्ण दुर्लक्ष करून लेकाने आपलंच घोडं पुढे दामटवलं.
"थांsssब. दाखवतो तुला. जरा धीर धर."

एका नाकपुडीत बोटांची चिमट घालायचा प्रयत्न चालू होता.

आता मात्र मी वैतागले.
"काय आहे सांगशील का ? काही गेलंय का नाकात ?" असं म्हणत मी त्याचं नाक तपासलं.
कुठे काही दिसेना.

त्याचा प्रयत्न चालूच.
"गेssलं नाहीsये. थांब तू."

अजून आम्ही दारही लावलं नव्हतं. त्याच वेळी तीर्थरूप आले (चिरंजीवांचे !)

"ए, काय चाल्लंय रे? नाकात बोटं का घालतोयस ? आणि तू पण काय बघत बसलीयेस ? "

"अरे, तो सांगतच नाहीये. नुसतंच थांब थांब म्हणतोय. नाकात पण काही दिसत नाहीये."

लेकाकडे लक्ष गेलं तर त्याचा चेहरा आता रडवेला झाला होता.
"अरे, हे बाहेर का येत नाहीये ?"

आता मात्र आमची चांगलीच तंतरली.

"पिलू, काय घातलंयस नाकात ?" असं म्हणत मी तपासण्यासाठी पुन्हा नाकाला हात लावला तर दुखण्यामुळे तो हातही लावू देईना.
"आ...आss..."

तेवढ्यात नवरोबांनी प्रसंगावधान दाखवून त्याला एक नाकपुडी बंद करून दुसर्‍याने श्वास बाहेर सोडायला लावला आणि दुसर्‍या उच्छवासासोबत एका प्लॅस्टिकच्या कागदाच्या सुरळीने टुणकन बाहेर उडी मारली !

त्याचं दुखायचं थांबलं होतं. पण तरीही चेहरा अजून वैतागलेला होता.
"काय आहे हे ?"
" मायलोच्या स्ट्रॉला लावतात तो प्लॅस्टिकचा कागद..."
"तो कसा गेला नाकात ?"
"मी घातला..."
"का ?"
" मला रा-वन मधल्या शारुख खानसारखं नाकातून लांब प्लॅस्टिकची दोरी काढून तुम्हाला सरप्राईज करायचं होतं." Angry :डोक्याला हात लावलेली बाहुली :

त्याचं स्पष्टीकरण ऐकून आम्हाला एकीकडे हसायला येत होतं आणि एकीकडे राग येत होता.
मग "असं करणं किती डेंजर असतं " ह्या विषयावर जरावेळ त्याचं बौद्धिक घेतल्यावर सगळा प्रसंग निवळला.

नंतर विचार करताना लक्षात आलं की बहुतांश मुले नाकात काहीतरी वस्तू (शेंगदाणा, वाटाणा, चुरमुरा, गोटी हे त्यातले प्रमुख पाहुणे) घालण्याचा प्रकार करतात, पण तो साधारण दोन ते चार वर्षे या वयात.
आमच्या महाभागाने त्या वयात काही केलं नाही आणि आत्ता सहा वर्षे पूर्ण व्हायच्या, तुलनेने कळत्या वयात हा प्रयोग केला.

मग आठवलं, तो २-३ वर्षाचा असताना एकदा असंच खिदळताना पाणी पीत होता.
ते पाहून त्याला खाद्यपदार्थांचा आणि हवेचा मार्ग वेगवेगळा असतो हे चित्र काढून समजावून सांगितलं होतं.
आणि खाताना किंवा पिताना चाळे करू नयेत, नाहीतर हे मार्ग चुकून गंभीर अपघात होऊ शकतात हे ही सांगितलं होतं.

तिथे आमची विसूकाका आणि टकुमावशीची पहिली भेट झाली. Happy

तेव्हाचा संवाद.

" हे बघ, पाणी किंवा खाऊ इसोफेगसमधून आत जातं आणि हवा ट्रकियामधून आत जाते "
मी शास्त्रशाखेच्या विद्यार्थ्याला सांगावं इतक्या सहजपणे सांगितलं होतं.

पण आमचा विद्यार्थी अजून बोबड्या बोलांमधून सुद्धा बाहेर आला नव्हता Lol
"हवा कचातून ज्याते ?"
"ट्रकिया"
"-----"
"आनि खाऊ कचातून ज्यातो ?"
"इसोफेगस"
"-----"
"पलत शांग" Uhoh

मग त्याला चित्रे काढून दाखवली.
आणि नावं लक्षात यावी म्हणून इसोफेगसचं (अन्ननलिका) "विसूकाका" आणि ट्रकियाचं (श्वासनलिका) "टकुमावशी" असं बारसं करून टाकलं ! Lol

मग नंतरही अधनंमधनं हे दोन नातलग आमच्या गप्पांमध्ये डोकावू लागले.
त्यांच्या सोबतच मग हळुहळू "स्टमकपंत" "ब्लॅडरपंत" "रेक्टमपंत" ह्या मेंब्रांची देखील भरती झाली.

पण गेल्या महिन्यात रा-वन चित्रपट बघताना, ते रोबॉटिक जी-वनकाका नाकातून चमकदार केबल काढून करिनाकाकूला दाखवतात, हा प्रसंग पाहत असताना "ई...यक्क..." असल्या प्रतिक्रियांच्या गोंधळात " हे सगळं खोटं असतं हं, आपण असं करायचं नाही " हे परवलीचं वाक्य उच्चारायचं राहून गेलं....आणि त्याचा परिणाम काल दिसला.

नंतर दिवसभर अधनंमधनं लेकाच्या नाकात डोकावून पाहणं चालू होतं ! Lol

********************************************************************************************************************

असल्या प्रसंगातून सगळं आलबेल झालं तर नंतर हसायला विषय मिळतो.
पण काहीवेळा अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
सध्या माझ्या सोबत काम करत असलेल्या एका मैत्रिणीचा मुलगा पाचव्या वर्षी, खेळताना चोकिंग होऊन जागीच दगावला. Sad

बर्‍याचदा अशावेळी पालक स्वतःच घाबरतात, गोंधळून जातात.
श्वासाचा मार्ग बंद झाला तर अवघ्या ४-५ मिनिटात मेंदूला इजा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने काही प्राथमिक गोष्टींची माहिती ठेवली तर एखाद्याचे प्राण वाचवले जाऊ शकतात.

अशावेळी काय करू नये ?

१. मूल स्वतःहून खोकत असेल तर खोकला थांबवायचा प्रयत्न करू नये.

२. वस्तू दिसत नसेल तर किंवा खूप आत दिसत असेल आणि मूल शुद्धीवर असेल तर ती वस्तू काढायच्या फंदात न पडता सरळ दवाखाना गाठावा. तिथे असलेल्या वेगळ्या साहित्याच्या मदतीने डॉक्टर अशी वस्तू जास्त सुरक्षित रितीने काढू शकतात.

३. नाकातील वस्तू काढण्यासाठी चुकूनही तपकीर हुंगवू नका.

स्पष्टिकरणः शिंक येण्या आधी एक जोरदार श्वास आत घेतला जातो. छोटा शेंगदाणा, मणी इ. नाकातील वस्तू त्या श्वासाबरोबर श्वासनलिकेत जाऊ शकते. असे झाल्याने एक मायनर इन्सिडेंट मेजर लाईफ थ्रेट मधे परिवर्तीत होतो. (नशीबाने आजकाल तपकीर ओढणारे सहसा मिळत नाहीत.)

४. नाकातील गोलाकार व टणक वस्तू : जसे मणी, चिकूची/सिताफळाची बी. घरी काढण्याचा प्रयत्नही करू नका. - चिमट्यात धरता येत नाही. अधिक खोल जाऊ शकते.

५. मूल अतीशय शांत व को-ऑपरेटिव्ह असल्याशिवाय इतरही वस्तू काढण्याचा प्रयत्न घरी करू नका. वस्तू आत खोलवर जाण्याचा वा नाकात रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. घोळणा अगदी सहज फुटतो.


अशावेळी काय करावे ?

१. मुलाला खोकला काढायला सांगावे. ह्यामुळे हवेचा दाब तयार होऊन संबंधित वस्तू बाहेर फेकली जायला मदत होते.

२. नाकाने श्वास आत ओढण्याचे टाळून तोंडाने श्वास घ्यायला सांगावे. नाकाने श्वास आत ओढला तर वस्तू सुद्धा आत ओढली जाण्याचा धोका असतो.

३. कुठल्या नाकपुडीत वस्तू अडकली आहे हे नक्की माहीत असेल तर त्याच्या शेजारील नाकपुडीवर बोट ठेवून श्वास बाहेर सोडायला सांगावा, असे केल्याने वस्तू बाहेर फेकली जायची शक्यता वाढते.

४. हेम्लिक / हॅम्लिक मॅन्युव्हर (Heimlich maneuver) करता आले तर उत्तम.

heimlich maneuver.jpg

५. कुठल्याच उपायांचा फायदा होत नसेल तर त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा प्रयत्न करावा.

६. वरील प्रकारांनी वस्तू बाहेर निघाली असेल तरी नंतरचे काही दिवस खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वासाचा आवाज येणे, ताप ह्यासारख्या लक्षणांवर लक्ष ठेवावे. कारण क्वचित एखादा तुकडा आत जाऊन न्युमोनिया व्हायची शक्यता असते.

७. अधूनमधून मुलांना 'विसूकाका' आणि 'टकुमावशी' च्या अस्तित्वाची आठवण करून द्यावी Happy

त.टी.-
१. प्रचि जालावरून साभार.
२. 'अशावेळी काय करू नये' मधील महत्वाचे मुद्दे क्र. ३ ते ५ सुचवल्याबद्दल डॉ. इब्लिसना धन्यवाद. Happy

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजेशीर पण खतरनाक प्रसंग... Happy तु दिलेली नावे भारी आहेत पण... Proud

शेवटी दिलेली महिती सेव्ह करुन ठेवतोय. Happy

अशावेळी काय करावे ? >>> फारच उपयोगी माहिती रुणू , तुझ्या ह्या नामकरणाने मुलांना पण समजायला अगदी सोप्प.

रुणझुणु नावे मस्तच दिली आहेस्.:फिदी:

आणी माहिती पण सहज , सोपी पण महत्वपूर्ण अशी आहे. माझ्या मुलीने अजून तरी असे उपद्व्याप केले नाहीत, पण काळजी घेईनच.

हो ना, मजेशीर पण खतरनाकच प्रसंग. काही क्षण आमची हवा टाइट झाली होती.
थँक्स ऑल. Happy
टुनटुन,
सावध राहिलेलं उत्तम, मुलांच्या डोक्यात कधी काय येईल सांगता येत नाही. दोनेक महिन्यांपूर्वीच आम्ही आपसांत चर्चा करत होतो की आपल्या लेकाने असं काही केलं नाही वगैरे, तर पठ्ठ्याने चुणुक दाखवलीच.

धन्यवाद नका रे देऊ Happy मी फक्त शेअर केलंय तुमच्याशी.
त्या लिन्कांवर पण सोप्या भाषेत लिहिलंय. नजरेखालून घालायला हरकत नाही.

किस्सा सांगण्याची पद्धत आवडली. शेवटी काहीही गंभीर न झाल्याने लेखाची मजा घेता आली. मुलं ही कधी काय उपद्व्याप करुन बसतील याचा काही नेम नसतो हेच खरं,
तुम्ही शेवटी दिलेली माहितीदेखील पालकांसाठी उपयुक्त आहे.

रुणझुणु
छानच समजावून सांगितलंयस.

अवांतरः

"आई, थांब. इथेच उभी रहा. मी तुला नाकातून एक गंमत काढून दाखवणार आहे "
"ई...हे काय आता नवीनच..."

माझा चेहर्‍यावरच्या एक्स्प्रेशन्सकडे संपूर्ण दुर्लक्ष करून लेकाने आपलंच घोडं पुढे दामटवलं.
"थांsssब. दाखवतो तुला. जरा धीर धर."

एका नाकपुडीत बोटांची चिमट घालायचा प्रयत्न चालू होता.

आता मात्र मी वैतागले.
"काय आहे सांगशील का ? काही गेलंय का नाकात ?" असं म्हणत मी त्याचं नाक तपासलं.
कुठे काही दिसेना.

त्याचा प्रयत्न चालूच.
"गेssलं नाहीsये. थांब तू."

अजून आम्ही दारही लावलं नव्हतं. त्याच वेळी तीर्थरूप आले (चिरंजीवांचे !)

"ए, काय चाल्लंय रे? नाकात बोटं का घालतोयस ? आणि तू पण काय बघत बसलीयेस ? "

"अरे, तो सांगतच नाहीये. नुसतंच थांब थांब म्हणतोय. नाकात पण काही दिसत नाहीये."

लेकाकडे लक्ष गेलं तर त्याचा चेहरा आता रडवेला झाला होता.
"अरे, हे बाहेर का येत नाहीये ?"

आता मात्र आमची चांगलीच तंतरली.

"पिलू, काय घातलंयस नाकात ?" असं म्हणत मी तपासण्यासाठी पुन्हा नाकाला हात लावला तर दुखण्यामुळे तो हातही लावू देईना.
"आ...आss..."

हे सगळे संवाद एलदुगो टीमच्या इला भाटे, विवेक लागू आणि घना यांच्यात घडत आहेत असं डोळ्यासमोर आणलं Happy Happy असंच मजा. चिडू नकोस हां.

रुणुझुणू, शेवटची घटना वाचून गांभीर्य लक्षात आले पण तुझी सांगण्याची ( मुलाला आणि आम्हालाही ) पद्धत फारच आवडली Happy
मी एकदा लहान असताना रात्री झोपताना मोगर्‍याचे फूल नाकापाशी ठेवले होते. शांत झोप लागावी म्हणून अरोमाथेरपी Wink एका श्वासाबरोबर ते एकदम आत ओढले गेले. काढायचा जितका प्रयत्न केला तितके ते आतच गेले. बाहेर निघाल्याचे आठवत नाही. पुढे ( त्या फुलाचे ) काय झाले कुणास ठाऊक Proud

* माझा मुलगा हे वाचणार नाही म्हणून इथे लिहू शकले. बाकी कुणा पालकांना मुलं वाचतील अशी भिती वाटत असल्यास सांगा. प्रसंग उडवेन. असे काहीही प्रयोग अत्यंत घातक आहेत हे आता समजते Happy

लेख चांगलाय.
>>विसूकाका, टकूमावशी>> नावं भारी आहेत. लेखाच्या सुरवातीला नाकातल्या ऐवजांची नावं असावीत असं वाटलं Proud

माझा मुलगा वर्षाचा असताना त्याने सेलफोनची वगैरे चपटी गोल बॅटरी खाल्ली होती. लगेच लक्षात आल्यावर त्याला उलटं करुन पाठीवर थापट्या मारल्यावर ती बाहेरही आली. ९११ वाले आले तोवर सगळं आलबेल होतं.

<< चिडू नकोस हां.>> अंजली, चिडू कशाला ? Happy एलदुगो बघते मी अधनंमधनं. जेव्हा चुकतं तेव्हा नवरोबा (त्याने बघितलं असेल तर) त्याच्या कानडी-मराठीत इष्टोरी सांगतात.

अगो,
धन्य ____/\____ Proud
ते मोगर्‍याचं फूल शरीरातच स्थायिक झालं असेल तर तिथे महफिल-ए-गझल चालू असेल....
" जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा "
Lol

इब्लिस,
धन्यवाद. मी चित्र टाकणार होते पण आळस केला. तुम्ही टाकलंत ते बरं झालं. Happy

ग्रेटथिंकर Happy

सायो,
म्हणजे तुमच्या घरीसुद्धा झालंय हे नाट्य Lol
नाकातल्या ऐवजाला आम्ही गुहेतून डोकावणार्‍या प्राण्यांची नावं दिली आहेत....छोटंसं असेल तर ससेभाऊ, जरा मोठ्ठं असेल तर वाघोबा वगैरे Proud

अरे देवा!!

आमच्याकडे प्लेडोह चा साप करुन तो नाकात घालायचा प्रयोग झालाय. Sad
तेव्हा नाक ही वस्तु पार्क करायची जागा नव्हे ही शाळा घेतली होती. (त्यावर तिने 'मग कानात घालू का?' असे निष्पापपणे विचारले होते. Sad ) आता तीच शाळा परत घेणार या निमीत्ताने.

अगो +१. रुणु मस्त लिहीले आहेस.

थँक्स इब्लिस.

सायो-बापरे.

रूणू, फारच उपयोगी माहिती दिली आहेस. सगळ्या पालकांना फायदा होइल याचा. धन्यवाद Happy

वरचा तुमच्या घरचा प्रसंग खरच बाकां होता.... नशिब सगळं आलबेल झालं Happy

विसुकाका आणि टकूमावशी नांवही मस्तच आहेत Happy पण मलाही सायोसारखच वाटलं प्रसंगा वाचायला सुरु केले तेव्हा Proud

एकच रिक्वेस्ट करू का? लेखाच्या शिर्षकामधे कुठेतरी हा धागा कशाबद्दल आहे ते लिहीता येइल का?

मी धाग्याचे नाव वाचले तेव्हा मला वाटलं की इदर हे मुलांना सांभाळणार्‍या व्यक्तींबद्दल आहे किंवा मुलांना वाईट लोकांपासुन कसे दूर ठेवायचे हे सांगायसाठी ची ही दोन कॅरॅक्टर्स - स्ट्रेजर डेंजर शिकवण्यासाठी - आहेत की काय? (अश्या डेंजरस लोकांना आमच्याकडे 'स्केअरखान' आणि 'यकीमावशी' अशी नांव आहेत Proud )

Lol
लेख आवडला. पोराने केलेला उपद्व्याप आठवला...
त्याला शेंगदाणे खायला आवडतात म्हणुन दिले होते.
माझ्या बायकोची नजर चुकवुन (हे ल्हान पोराना कसं जमतं. आम्हा नवरे मंडळीना जमतच नाय Sad Proud )
त्याने तो उजव्या नाकपुडीत घातलेला. नंतर नाक फुगलेल दिसतय म्हणुन पाहिल.
त्याला दुखतही होत. आम्ही पाहिल तर शेंगदाणा कच्चा असल्याने तो नाकातील मांसल भागासारखाच दिसत होता.
आम्ही अवाक झालो काल नॉर्मल होता आणि आज अचानक नाकात हा भाग कुठुन आल म्हणुन.
तडक त्याच्या डॉक कडे गेलो. त्यानी नंतर तो शेंगदाणा बाहेर काढुन दाखवला.
बोल्ले अस बरीच पोरं करतात ह्या वयात..

आता वाटतेय मजा लिहिताना पण त्यावेळी घाबरलो होतो. Happy

'स्केअरखान' आणि 'यकीमावशी'>>> ही नावही मस्त आहेत की. Happy

रूणुझुणू, विसूकाका आणि टकुमावशी आवडले. खूप उपयुक्त माहिती. तुझी लिहीण्याची स्टाईल आवडली.

हे वाचून माझ्या मुलीनी केलेला पराक्रम आठवला. ती ६ वर्षाची होती. ती आणि छोटा भाऊ रात्रीच जेवण करुन खेळत होते. खेळता खेळता मुलीने एक कॉईन गिळले. ते अडकून बसले. ती व्यवस्थित बोलत होती. नक्की कुठले कॉईन तिला सांगता येईना. पाणी प्यायली, पण घश्यात अडकलेले तसेच होते. तिला अर्जंट केअरला नेलं. तिथे एक्स रेत अडकलेलं कॉईन दिसलं. पण तिथे ते काढण्याची सोय नव्हती. म्हणून त्यांनी हॉस्पीटलला पाठवलं. लाल दिव्याच्या गाडीतून. तिथे असं ठरलं की ते थोडीशी का होईना पण भूल देऊन काढायला लागेल. जेवण दोन तासांपूर्वी झालेलं असल्याकारणाने भूल देता येत नव्हती. मग त्यांनी तिला अ‍ॅड्मीट करुन घेतले. दुसर्‍या दिवशी ११ वाजता ई.एन.टी डॉ. आले त्यांनी किंचीतशी भूल देऊन मिनीटाभरात ते काढले. तो जपानी येन होता. कॉईन गिळणारी मुलगी बघायला आख्ख्या हॉस्पीटलचा स्टाफ जमला होता. एक दोन जणांनी सॉफ्ट टॉइज दिले. मुलीने ती व्हीआयपी ट्रीटमेंट जाम एन्जॉय केली. देव कृपेनी ते कॉईन विसूकाकांनी एका बाजूला ठेवून दिले होते. डॉ. कडे नेईपर्यंत आमची जाम तंतरली होती.

रुणुझुणू,
बापरे ! बरं थोडक्यात निभावलं. पाळणाघरातल्या एका मुलाने वय २ वर्ष कॅडबरी आवडते म्हणुन कॅडबरीसोबत तिचा कागद नाकात घातला होता. का तर म्हणे तिचा वासही आवडतो. २ दिवसांनी त्याच्या आईला कळलं, जवळ घेतल्यावर वास वेगळा येतोय. मग सगळी धावपळ.
मुलं या वयात काहीतरी उद्योग करतातच. आता आमच्याकडेही शाळा घ्यायला हवी.
नावं छान दिली आहेस. समजवतांना सोप्प जाईल.

मुलं ही कधी काय उपद्व्याप करुन बसतील याचा काही नेम नसतो हेच खरं>>> +१
बापरे असे प्रसंग म्हणजे टेन्शनचा काळ घेउन येतात.

ह्म्म.. मुले नेहमी तंतरवतात. मुलें व माकडं सारखीच.

असाच प्रसंग आम्हाला आलेला, शेजारच्यांकडे मुलगी गेलेली... १.५ वर्षाची. बेसन लाडू खूप आवडायचा तेव्हा. आम्ही तिला त्यावेळी त्या वयात लाडू देताना बेदाणा काढून द्यायचो. बाजूच्या काकूने तसाच दिला लाडू खायला.
चिकट ओला झालेला बेदाणा, तूप व बेसन, गोळा झालेली लाळ ह्याचा संगमने बेदाणा गिळून तो जरासा आतमध्येच चिकटूनच बसला. ना खाली जाईना व खोकून बाहेर येइना. पाणी द्ययाला भिती वाटली. उलटी पकडली व पाठीवर थापा मारल्या तेव्हा तोंडात आला तो चिकट तुकडा. आजवर ती हा लाडू खात नाही. तिच्या लक्षात आहे हा प्रसंग असे नाही पण आम्हीच भितीने दिला नाही.. पण तिला तो आवडणे सुद्धा बंद झाले. Sad

एक धडा आम्ही शिकलो/मुलीला शिकवले, कोणाच्याही कडे (अगदी कोणाकडेही) काहीही खायचे नाही/घ्यायचे नाही. चुकी त्यांची नसली तरी दुसर्‍याला माहीत नसते काय चालते मुलांना, काय जमते.

<< त्यावर तिने 'मग कानात घालू का?' असे निष्पापपणे विचारले होते. >> आईग्गं रैना, कित्ती क्युट !

ओक्के लाजो. शीर्षकात बदल करते Happy

बर्‍याच जणांना असला अनुभव आलेला दिसतोय. समदु:खी...
शुगोल, लेकीने एकदम आंतरराष्ट्रीय पराक्रम केलाय तर Lol

मुलें व माकडं सारखीच.>> झंपी, +++१०००
आम्ही लेकाला बर्‍याचदा (घरात फक्त आम्हीच असताना) 'बिशेमा' म्हणतो...बिना शेपटीचं माकड !

माझ्या एका मावसभावाने एक रुपयाचं नाणं गिळलं होतं. तसा मोठा होता तो तेव्हा.
डॉक्टरांनी सांगितलं की २-३ दिवस बघू. बाहेर नाही आलं तर ऑपरेशन करूनच काढावं लागणार.
त्याला खूप केळी खायला द्या.
मग मावशी बिचारी त्याच्या मागे लागून लागून केळी भरवत बसली.
सगळे तणावात.
दुसर्‍या दिवशी सकाळी तो टॉयलेटमध्ये असताना टणकन आवाज आला...नाणं बाहेर आलं होतं Lol
मग काय..ऑपरेशन टळलं म्हणून आनंदी आनंद गडे.
आम्ही अजून चिडवतो त्याला. सोडतो की काय ? Proud

बाप रे! तोंडचं पाणि पळवतात पोरं कधीकधी
माझ्या ऐकिवात माझ्या कित्येक मित्र मैत्रिणींनी नाकात गहू, डाळ, पेन्सिल..

दुसर्‍या दिवशी सकाळी तो टॉयलेटमध्ये असताना टणकन आवाज आला >> सगळे अगदी आतुरतेने वाट पहात होते बहुतेक आवाजाची.. Lol

रुणु छान लिहले...पण प्रसंग बाका होता...

बरेच लहान मुले असे प्रकार करतात खेळता खेळता आणि आई वडिलांच्या तोंडचे पाणी पळवतात.. Happy

दक्षिणा,
आठवलं की अजून पोट धरून धरून हसतो आम्ही.
जस्ट इमॅजिन, कुणीतरी टॉयलेटमध्ये गेलंय, आणि घरातले झाडून सगळे मेंबर्स दाराबाहेर घोटाळत उभे आहेत...आवाजाकडे कान लावून Biggrin

हो स्मितू Happy

Pages