लहान मुलांनी नाका-तोंडात वस्तू घालण्याचे अपघात

Submitted by रुणुझुणू on 8 July, 2012 - 06:45

कालचा प्रसंग. म्हणाल तर विनोदी, म्हणाल तर "भगवान का लाख लाख शुक्र है के अनहोनी टल गई" प्रकारातला....

काल लेक शाळेतून आला. शाळेत निघताना टापटिपीत निघायचं आणि येताना मात्र शिमग्याच्या सोंगासारखं यायचं, हे रोजचंच झालंय.
जाताना आत खोचलेला शर्ट परत येईपर्यंत अर्धा बाहेर, शर्टवर कमीत कमी दोन (आणि जास्तीत जास्त कितीही !) डाग, दिवसाआड एका नवीन जागी खरचटल्याच्या खुणा, मस्ती करून करून थकलेला पण तरीही प्रफुल्लित चेहरा, हातात एखादं छोटंसं फूल किंवा चित्र आणि कधी एकदा घडलेलं रामायण आईला सांगतो असा आविर्भाव....

कालही तसंच.
आल्या-आल्याच जाहीर केलं,

"आई, थांब. इथेच उभी रहा. मी तुला नाकातून एक गंमत काढून दाखवणार आहे " Uhoh
"ई...हे काय आता नवीनच..."

माझा चेहर्‍यावरच्या एक्स्प्रेशन्सकडे संपूर्ण दुर्लक्ष करून लेकाने आपलंच घोडं पुढे दामटवलं.
"थांsssब. दाखवतो तुला. जरा धीर धर."

एका नाकपुडीत बोटांची चिमट घालायचा प्रयत्न चालू होता.

आता मात्र मी वैतागले.
"काय आहे सांगशील का ? काही गेलंय का नाकात ?" असं म्हणत मी त्याचं नाक तपासलं.
कुठे काही दिसेना.

त्याचा प्रयत्न चालूच.
"गेssलं नाहीsये. थांब तू."

अजून आम्ही दारही लावलं नव्हतं. त्याच वेळी तीर्थरूप आले (चिरंजीवांचे !)

"ए, काय चाल्लंय रे? नाकात बोटं का घालतोयस ? आणि तू पण काय बघत बसलीयेस ? "

"अरे, तो सांगतच नाहीये. नुसतंच थांब थांब म्हणतोय. नाकात पण काही दिसत नाहीये."

लेकाकडे लक्ष गेलं तर त्याचा चेहरा आता रडवेला झाला होता.
"अरे, हे बाहेर का येत नाहीये ?"

आता मात्र आमची चांगलीच तंतरली.

"पिलू, काय घातलंयस नाकात ?" असं म्हणत मी तपासण्यासाठी पुन्हा नाकाला हात लावला तर दुखण्यामुळे तो हातही लावू देईना.
"आ...आss..."

तेवढ्यात नवरोबांनी प्रसंगावधान दाखवून त्याला एक नाकपुडी बंद करून दुसर्‍याने श्वास बाहेर सोडायला लावला आणि दुसर्‍या उच्छवासासोबत एका प्लॅस्टिकच्या कागदाच्या सुरळीने टुणकन बाहेर उडी मारली !

त्याचं दुखायचं थांबलं होतं. पण तरीही चेहरा अजून वैतागलेला होता.
"काय आहे हे ?"
" मायलोच्या स्ट्रॉला लावतात तो प्लॅस्टिकचा कागद..."
"तो कसा गेला नाकात ?"
"मी घातला..."
"का ?"
" मला रा-वन मधल्या शारुख खानसारखं नाकातून लांब प्लॅस्टिकची दोरी काढून तुम्हाला सरप्राईज करायचं होतं." Angry :डोक्याला हात लावलेली बाहुली :

त्याचं स्पष्टीकरण ऐकून आम्हाला एकीकडे हसायला येत होतं आणि एकीकडे राग येत होता.
मग "असं करणं किती डेंजर असतं " ह्या विषयावर जरावेळ त्याचं बौद्धिक घेतल्यावर सगळा प्रसंग निवळला.

नंतर विचार करताना लक्षात आलं की बहुतांश मुले नाकात काहीतरी वस्तू (शेंगदाणा, वाटाणा, चुरमुरा, गोटी हे त्यातले प्रमुख पाहुणे) घालण्याचा प्रकार करतात, पण तो साधारण दोन ते चार वर्षे या वयात.
आमच्या महाभागाने त्या वयात काही केलं नाही आणि आत्ता सहा वर्षे पूर्ण व्हायच्या, तुलनेने कळत्या वयात हा प्रयोग केला.

मग आठवलं, तो २-३ वर्षाचा असताना एकदा असंच खिदळताना पाणी पीत होता.
ते पाहून त्याला खाद्यपदार्थांचा आणि हवेचा मार्ग वेगवेगळा असतो हे चित्र काढून समजावून सांगितलं होतं.
आणि खाताना किंवा पिताना चाळे करू नयेत, नाहीतर हे मार्ग चुकून गंभीर अपघात होऊ शकतात हे ही सांगितलं होतं.

तिथे आमची विसूकाका आणि टकुमावशीची पहिली भेट झाली. Happy

तेव्हाचा संवाद.

" हे बघ, पाणी किंवा खाऊ इसोफेगसमधून आत जातं आणि हवा ट्रकियामधून आत जाते "
मी शास्त्रशाखेच्या विद्यार्थ्याला सांगावं इतक्या सहजपणे सांगितलं होतं.

पण आमचा विद्यार्थी अजून बोबड्या बोलांमधून सुद्धा बाहेर आला नव्हता Lol
"हवा कचातून ज्याते ?"
"ट्रकिया"
"-----"
"आनि खाऊ कचातून ज्यातो ?"
"इसोफेगस"
"-----"
"पलत शांग" Uhoh

मग त्याला चित्रे काढून दाखवली.
आणि नावं लक्षात यावी म्हणून इसोफेगसचं (अन्ननलिका) "विसूकाका" आणि ट्रकियाचं (श्वासनलिका) "टकुमावशी" असं बारसं करून टाकलं ! Lol

मग नंतरही अधनंमधनं हे दोन नातलग आमच्या गप्पांमध्ये डोकावू लागले.
त्यांच्या सोबतच मग हळुहळू "स्टमकपंत" "ब्लॅडरपंत" "रेक्टमपंत" ह्या मेंब्रांची देखील भरती झाली.

पण गेल्या महिन्यात रा-वन चित्रपट बघताना, ते रोबॉटिक जी-वनकाका नाकातून चमकदार केबल काढून करिनाकाकूला दाखवतात, हा प्रसंग पाहत असताना "ई...यक्क..." असल्या प्रतिक्रियांच्या गोंधळात " हे सगळं खोटं असतं हं, आपण असं करायचं नाही " हे परवलीचं वाक्य उच्चारायचं राहून गेलं....आणि त्याचा परिणाम काल दिसला.

नंतर दिवसभर अधनंमधनं लेकाच्या नाकात डोकावून पाहणं चालू होतं ! Lol

********************************************************************************************************************

असल्या प्रसंगातून सगळं आलबेल झालं तर नंतर हसायला विषय मिळतो.
पण काहीवेळा अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
सध्या माझ्या सोबत काम करत असलेल्या एका मैत्रिणीचा मुलगा पाचव्या वर्षी, खेळताना चोकिंग होऊन जागीच दगावला. Sad

बर्‍याचदा अशावेळी पालक स्वतःच घाबरतात, गोंधळून जातात.
श्वासाचा मार्ग बंद झाला तर अवघ्या ४-५ मिनिटात मेंदूला इजा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने काही प्राथमिक गोष्टींची माहिती ठेवली तर एखाद्याचे प्राण वाचवले जाऊ शकतात.

अशावेळी काय करू नये ?

१. मूल स्वतःहून खोकत असेल तर खोकला थांबवायचा प्रयत्न करू नये.

२. वस्तू दिसत नसेल तर किंवा खूप आत दिसत असेल आणि मूल शुद्धीवर असेल तर ती वस्तू काढायच्या फंदात न पडता सरळ दवाखाना गाठावा. तिथे असलेल्या वेगळ्या साहित्याच्या मदतीने डॉक्टर अशी वस्तू जास्त सुरक्षित रितीने काढू शकतात.

३. नाकातील वस्तू काढण्यासाठी चुकूनही तपकीर हुंगवू नका.

स्पष्टिकरणः शिंक येण्या आधी एक जोरदार श्वास आत घेतला जातो. छोटा शेंगदाणा, मणी इ. नाकातील वस्तू त्या श्वासाबरोबर श्वासनलिकेत जाऊ शकते. असे झाल्याने एक मायनर इन्सिडेंट मेजर लाईफ थ्रेट मधे परिवर्तीत होतो. (नशीबाने आजकाल तपकीर ओढणारे सहसा मिळत नाहीत.)

४. नाकातील गोलाकार व टणक वस्तू : जसे मणी, चिकूची/सिताफळाची बी. घरी काढण्याचा प्रयत्नही करू नका. - चिमट्यात धरता येत नाही. अधिक खोल जाऊ शकते.

५. मूल अतीशय शांत व को-ऑपरेटिव्ह असल्याशिवाय इतरही वस्तू काढण्याचा प्रयत्न घरी करू नका. वस्तू आत खोलवर जाण्याचा वा नाकात रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. घोळणा अगदी सहज फुटतो.


अशावेळी काय करावे ?

१. मुलाला खोकला काढायला सांगावे. ह्यामुळे हवेचा दाब तयार होऊन संबंधित वस्तू बाहेर फेकली जायला मदत होते.

२. नाकाने श्वास आत ओढण्याचे टाळून तोंडाने श्वास घ्यायला सांगावे. नाकाने श्वास आत ओढला तर वस्तू सुद्धा आत ओढली जाण्याचा धोका असतो.

३. कुठल्या नाकपुडीत वस्तू अडकली आहे हे नक्की माहीत असेल तर त्याच्या शेजारील नाकपुडीवर बोट ठेवून श्वास बाहेर सोडायला सांगावा, असे केल्याने वस्तू बाहेर फेकली जायची शक्यता वाढते.

४. हेम्लिक / हॅम्लिक मॅन्युव्हर (Heimlich maneuver) करता आले तर उत्तम.

heimlich maneuver.jpg

५. कुठल्याच उपायांचा फायदा होत नसेल तर त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा प्रयत्न करावा.

६. वरील प्रकारांनी वस्तू बाहेर निघाली असेल तरी नंतरचे काही दिवस खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वासाचा आवाज येणे, ताप ह्यासारख्या लक्षणांवर लक्ष ठेवावे. कारण क्वचित एखादा तुकडा आत जाऊन न्युमोनिया व्हायची शक्यता असते.

७. अधूनमधून मुलांना 'विसूकाका' आणि 'टकुमावशी' च्या अस्तित्वाची आठवण करून द्यावी Happy

त.टी.-
१. प्रचि जालावरून साभार.
२. 'अशावेळी काय करू नये' मधील महत्वाचे मुद्दे क्र. ३ ते ५ सुचवल्याबद्दल डॉ. इब्लिसना धन्यवाद. Happy

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे! हा खेळ का आवडतो मुलांना!?
आमच्याकडे चाइल्ड सेफ्टी आऊट्लेट प्लग्स असतात ना, ते घशात घालून झालेय. किती तो ऑक्झिमोरॉन!! Proud
तेव्हा अर्थातच वाईट हालत झाली होती, पण मी काढू शकले तो.. हुश्श!

लेख नेहेमीप्रमाणेच मस्त लिहीला आहेस!

हा माझ्या आर्यनने मला चांगलाच धडा दिलाय.
तो दीड वर्षाचा असताना small screw गिळला त्याने आणि नेमका पोटात न जाता छातीत(!) गेला खोकल्यामुळे.मेटल infection झाल्यामुळे एक महीना hospital/tension....

नकोच ती आठवण.....

अजुनही तो स्क्रु जपून ठेवलाय....
सुदैवाने तो बरा झाला पण तब्येत खालावली...

हे प्रसंग खरंच धडकी भरवणारे, कसोटी बघणारे असतात. रुणु यानिमित्तानं योग्य प्रथमोपचार सांगितल्याबद्दल धन्यवाद. नव्या नातेवाईकांची नावं मस्त आहेत.

अस्मादिकांनी लहानपणी खडूचा वास घेण्याच्या मिषाने तो नाकात यशस्वीरीत्या अडकवून दाखवला होता.

>>> आमच्याकडे चाइल्ड सेफ्टी आऊट्लेट प्लग्स असतात ना, ते घशात घालून झालेय. किती तो ऑक्झिमोरॉन!! >>> अरे देवा! Biggrin

खरेच धडकी भरवणारे प्रसंग! संकट टळल्यावर काही वाटत नाही, पण त्या-त्या वेळी ब्रम्हांड आठवतं.

तो केळं भरवण्याचा प्रसंग अगदी जसाच्या तसा आमच्या कुटुंबात घडलेला... फक्त बाळीने नाण्याऐवजी आईच्या मंगळसुत्राची वाटी गिळलेली. मंगळसूत्र वाढवलेलं कळलं, सबंध खोलीभर शोधूनही त्याचे अवशेष मिळाले नाहीत तेव्हा मनात आलेली दुष्ट शंका खरी की खोटी तपासण्यासाठी बाळीला डॉक्टरांकडे नेले, तिथे सोनोग्राफीत बाळीच्या पोटात पहुडलेली मंगळसुत्राची वाटी दिसली. आईबापसाला सोन्याची वाटी मिळाली म्हणून अत्त्यानंद आणि ती बाळीच्या पोटात म्हणून घोर अश्या दोन्ही भावना अनुभवायला मिळाल्या.
आणि इथे बाळी खूपच लहान असल्याने टॉयलेटमधून 'टक्क्' आवाज येणे शक्य नव्हते, त्यामुळे रोजच्या रोज बाळीची शी चिवडायचा कार्यक्रम त्या महान मातेने कसाबसा पार पाडला होता. तिसर्‍या दिवशी ती वाटी बाहेर आली.
पण तेव्हापासून आमच्या कुटुंबातील सर्व मातांना मंसू न घालण्याची अलिखित परवानगी आपसूक मिळून गेली Wink

आमच्याकडे चाइल्ड सेफ्टी आऊट्लेट प्लग्स असतात ना, ते घशात घालून झालेय. किती तो ऑक्झिमोरॉन>>> Rofl

सॉरी भाग्यश्री, पण हसु आवरलच नाही.
त्या त्या वेळी आपल्याला सॉलिड टेन्शन येतं. आता आठवताना मजा वाटते खरी..

मंजूडी + १
माझ्या मैत्रिणीच्या भावानेही अशीच काहीतरी वस्तू ( बहुतेक नाणेच ) गिळले होते. आवाजावर विसंबून राहता येत नाही. ते नाणे बाहेर येईपर्यंत रोज शी चिवडावी लागली आणि तो अगदी लहानही नव्हता त्यावेळी.

विसूकाका आणि टकुमावशी आवडले.. रुणु. खूपच छान लिहिलेस.. हेवी विषय, हलक्या रीतीने मांडलास तरी त्याचे गांभीर्य लक्षात आलेच..

आम्च्य ओल्खितिल एक मुलिने नाकात चिन्चोका घतल. तो अदकला. शस्त्रक्रिया केलि..पन ति मुल्गि जन्माचि गेन्गन्या आवजात बोल्ते.

बापरे!
>>हे प्रसंग खरंच धडकी भरवणारे, कसोटी बघणारे असतात. रुणु यानिमित्तानं योग्य प्रथमोपचार सांगितल्याबद्दल धन्यवाद. नव्या नातेवाईकांची नावं मस्त आहेत. >> +१

मंजूडी,
बाळीने सरळ सोन्यावरच डल्ला मारला तर....खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी Lol

मला एक कळत नाही, बर्‍याच मोठ्या (प्रौढ) लोकांना औषधाच्या गोळ्या घेताना जड जातं.
माझ्या कित्येक पेशंटस कानीकपाळी सांगूनही कॅल्शिअम घ्यायचं टाळतात (मला सुद्धा ब्रह्मांड आठवायचं कॅ घेताना !)..........मग ही एवढुशी पिल्लं अस्ले भलभलते प्रकार (सेलफोनची बॅटरी, आउटलेट प्लग्ज, मं सू ची वाटी, नाणी- राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय ) कसं गिळत असतील ???? Uhoh

बाप रे! किती उद्योगी बाळं आहेत!

मुलं वस्तूच नाकातोंडात घालतात असं नाही. एका ओळखीतल्या मुलीनं, चार ते सहा वर्षांपर्यंतच्या वयात (वेगवेगळ्या वेळी) आईचं अख्खं लिपस्टिक, व्हिक्स व्हेपोरब (अतिशयोक्ती नाही), बोरोसिल आणि कैलाशजीवन खाल्लंय. यातलं फक्त कैलाशजीवन खाल्ल्यावर तिला ओकारी इंड्यूस करायची वेळ आली नाही.

>>गेssलं नाहीsये. थांब तू.
इतक्या कष्टाने घातलेली सुरनळी, आणि तू गेलंय काहीतरी म्हणतेस!! Proud
एकदम उद्योगी लेक.
आणि उपयुक्त लेख.

मी बाळपणी झुरळ खाल्ल्याची गोष्ट घरी रंगवून सांगितली जाते. ऑर्गॅनिक पदार्थ खाल्लेले चालत असणार बहुतेक.

बापरे. सगळ्यांचेच किस्से भयानक आहेत. म्हणजे आता वाचताना हसु येतंय पण त्यावेळी वाट लागली असणार.
मला वाटलेलं ५वर्ष पुर्ण झाली तर हा धोका टळला.. पण इथे वाचुन कळतय कि अजुनही मधे मधे समजवावे लागणार आहे.
सध्या नविन गोष्टी सुद्धा आल्यात त्यात. टोक केलेली पेन्सिल नाका तोंडात कानात घालणे Sad
त्याशिवाय आजच एक नविन गोष्ट सांगितलीये लेकीने. एक मुलगा म्हणे म्हणाला की त्याची जीभ कापली आणि पुन्हा आली. मला अगदी धस्स झालं ऐकुन. मुलं कुठले प्रयोग करतील याचा नेम नाही Sad
रुणुझुणू इतके लिहिलेस तर सिपीआर बद्दलही माहीती दे ना प्लिज. लेक लहान होती तेव्हा सिपिआरची चित्र असलेली फाईल करुन ठेवलेली. पण आता इथे शिफ्टींग मधे सापडणार नाही.

मृदुला, Lol तुझ्या आई बाबांनी किती टेन्शन येत असेल गं ? Light 1

आम्च्याकडे कन्येने डोक्याला लावाय्ची चिमटा क्लिप डोक्यावरुन काढुन गिळली होती ,तिचा श्वास अडकला होता (आणी आमचाही )माझे ९११ करुन पलिकडच्या माणसाला सगळ सांगुन झाल तोवर नवर्‍याने तिला पालथे उचलुन किंचित टिल्ट केले आणी डिनर मेनु बरोबर पिन निघाली होती.
एकदा गळ्यात् घालायची माळ चाईल्ड सिझरने कापुन त्यातला मणी नाकात घातला होता सुदैवाने फार आत नसल्याने हेअर क्लिपरने काढता आला.
तेव्हापासुन सगळी काम एकीकडे ठेवुन बारिक लक्ष ठेवावे लागायचे.

आमच्याकडे हे नाका-काना-तोंडात वस्तू घालायचे प्रकार दोघींचेही अनेकदा करुन झाले आहेत. पहील्या पहील्या वेळेस घाबरुन डॉक कडे जाणे व नंतर सरावल्यामुळे घरीच काढणे केलेय.
समजावून सांगणे चालूच असते, समजतेही, पण ऐनवेळी जिज्ञासा मोठी ठरते.

>>ते नाणे बाहेर येईपर्यंत रोज शी चिवडावी लागली आणि तो अगदी लहानही नव्हता त्यावेळी<<

अरे बापरे! मुलं कुठलीही दुनिया फिरवून आणू शकतात. Proud

एक कुतुहलाने प्रश्ण, मुलांच्या लहान अन्न नलिकेतून नाणं जातं?

धन्स रुणू Happy लेख जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचावा म्हणुन शिर्षक बदलायची रिक्वेस्ट केली होती Happy

एकएकांच्या मुलांचे पराक्रम भारीच आहेत....

मीदेखिल महापराक्रमी होते...

मला लहानपणापासुनच खाण्याची आवड असल्यामुळे मी खोट्या अंगठीतला लाल खडा, काचेचे मणी चावुन चावुन खल्लेत आणि मग केळ्यांचे घडही जिरवलेत Proud इतकेच काय मी फुड कलर असतात त्यातला लाल रंग बाटलीभरून प्यायले आहे.... मग काय पुढचे ३-४ दिवस सगळेच लालेलाल..... माझी ताई अजुन माझी थट्टा करते Lol

रुणु, पुन्हा एकदा चांगल्या विषयावर लेख!
वरचे सगळे किस्से वाचुन धस्स झालं आणि निरागसतेवर हसुही!

लाजोतै, लेकीला चुकुनही हा किस्सा सांगु नका! Biggrin

आमच्याकडे धाकटीने परवाच 'मला तुझ्यासारखे कानात घालायचे म्हणुन मणी कानात घालण्याचा प्रयत्न केला!'

लगेच माझे सगळे कानातले अंगठ्या एकदम उंचावर ठेवुन दिल्या. तिचे कान टोचुन आणायचे आहेत आता म्हणजे तिला कानातले घालता येतील.
मोठी लेक एकदम जीवाला जपुन असते लहानपणापासुन. धाकटी मात्र भयंकर आहे. फार लक्ष ठेवावे लागते तिच्याकडे.

हे राम! खरंच या मुलांच्या कुतूहलाला काय म्हणावे! अस्मादिकांनीही लहानपणी बकुळीचे सुकलेले फूल जोरात हुंगायच्या प्रयत्नांत नाकपुडीत घालून ठेवले होते! मोगर्‍याच्या फुलाचीही तीच तर्‍हा! नाकात खडू, पेन्सिली घालणे कॉमन होते! आईने एकदा रात्री कानात तेल घालून चांगला मध्यम आकाराचा कापसाचा बोळा ते तेल बाहेर येऊ नये म्हणून माझ्या कानात घातला तर सकाळी तो बराच आतवर खोल सरकला होता. कसा ते देवच जाणे!! चांगला मोठ्या आकाराचा कापूसबोळा होता तो! डॉक्टरांकडे जाऊन चिमट्याने अलगद बाहेर काढायला लागला.
आई तेव्हापासून मला चिडवते की हिच्या कानात कापसाऐवजी कापसाच्या वातीच घालायला पाहिजेत!! Lol

मी इयत्ता अकरावीत असताना मित्राशी पैज लावून उसाचे करवे (अगोदर कधी उसाचे करवे विशेष खाल्ले नव्हते... आमची कोणाचे दात जास्त स्ट्राँग आहेत स्पर्धा चालू होती आपसात!) खात असताना त्यातील एका करव्याचे तूस घशात उभे अडकले. जाम टोचत होते. आधी केळी, भात, बटाटा, पोह्याच्या पापडांची लाटी असे अनंत प्रकार ते तूस खाली जावे म्हणून खा खा खाल्ले. पोटाची व घशाची, दोन्हीची हालत खराब इतक्या परिश्रमांनी. संध्याकाळ पर्यंत ते तूस बाहेर यायचे किंवा आत जायचे नाव घेईना! घराजवळच्या डॉक्टरांना दाखवल्यावर ते म्हणाले सौम्य भूल देऊन तूस बाहेर काढावे लागेल. झाले! भूल घ्यावी लागणार म्हटल्यावर माझे डोकेच सटकले! घरी येऊन आरशासमोर जबडा ताणून उभी राहिले, घशात हात घातला आणि तूस खस्सकन् बाहेर काढले. नशीब, घशाला त्यामुळे काही इजा झाली नाही! नंतर माझा पराक्रम ऐकून घरच्यांनी कपाळाला हात लावला!

चांगला धागा.

माझ्या लेकीने आठ नऊ महिन्याची अस्ताना झुरळ पकडले होते. चव घेण्याचा प्रयत्न चालू होता, तेवढ्यात मी बघितले. इतक्या जोरात किंचाळले तरी लेकीचे ढिम्म लक्ष नव्हते.

झुरळाला झाडूने मारायला गेलं तर घरभर पळत सुटतं, तरी रांगणार्‍या लेकराच्या हातात कसं काय सापडलं असेल हा प्रश्न मला अजून पडतो.

कसले जबरी किस्से आहेत एक एक!
राजसला सुदैवाने खाली पडलेल्या वस्तु उचलून टेस्ट करायची सवय नाहीये. फक्त eatables असतील उदा. भाताचे सांडलेले शीत, चकलीचा तुकडा इ. तरच तोंडात घालतो. खूपदा समजावते की खाली पडलेली वस्तु तोंडात टाकायची नाही. जर्म्स लागलेले असतात. पण लहान मुलांना त्याचे काही पडलेले नसते. पण नाणे, बॅटरी, इ. न खाणेबल वस्तु त्याने खायचा प्रयत्न अजूनतरी केलेला नाहीये. :हुश्श:
(फक्त एकदा झुरळाचे छोटे पिल्लू गिळून झालेय. Happy )

निंबे.. Uhoh ..
माझी मैत्रीण( वय ६-७) लहानपणी आंघोळ करताना रोज कानात पाणी घालायची .. थोड्या दिवसांनी कान भयंकर ठणकू लागला. शेवटी ई एन टी कडे जावं लागलं.. तिला असं का करत होतीस म्हणून विचारलं तर म्हणाली ,' मुझे कान भी तो अंदर बाहर से साफ चाहिये था'..

लहान पणी माझ्या आईने नाकात पाटीवरची पेन्सील घातली होती. बाहेर काढताना ती अर्धवट तुटली. काही भाग आतच राहिला. मग आजोबांनी तिला तपकिर हुंगायला दिली. जोरदार शिंक आली आणि पेन्सीलीचा तुकडा बाहेर.

लहान असताना मी एकदा भिजवलेली मेंदी खाल्ली होती. नंतरचा काही रीपोर्ट ऐकीवात नाही......

एकदा कानात खुप खाज येत होती. माझे वय साधारण १०-११ असेल. तेंव्हा पेनाच्या टोपणाच्या दांडीने खाजवायचा प्रयत्न केला होता. टोपण ( बहुदा रेनॉल्ड्स चे पांढरे पेन असावे) कानातच अडकले. शेवटी प्लकर ने काढले आईने!!! नंतर माझी उत्तारपुजा बांधली.

माझा मुलगा २ वर्षाचा असताना एकदा मी त्याला पोहे भरवत होते. अचानक तो फार अस्वस्थ झाला तेव्हा माझ्या लक्षात आले की त्याच्या हातात एक प्लास्टीकच क्राफ्ट मध्ये असतो तो रुपया एवढा गुगली डोळा होता तो नाही आहे.(आता तो डोळा त्याच्या हातात कसा गेला ते कळलेच नाही. माझ्या मुलीचे शाळेतले काही क्रफ्ट बाजूला होते. आणि तो त्याच्या हातात दिसला असताना मी लगेच का काढून घेतला नाही ह्याबद्दल मी अजून मला दोष देते.आयांनो लहान मुलांना भरवताना त्यांच्या हातात काही नाही ह्याच्यावर लक्ष ठेवा.)
झाले, हॉस्पिटल मध्ये धावलो, परत मला नक्की माहीती नव्हते की खरच त्याने काही गिळले आहे का. तो फक्त अस्वस्थ हालचाली करत होता. पूर्ण दिवस हॉस्पिटल मध्ये घालवला, काही खायला तयार नाही, क्ष रे मध्ये काही प्लस्टीकचे दिसत नाही. फक्त एक ज्यूस प्यायला पण उलटी काढ्ली नाही.
शेवटी घरी आणले. दूध दिले. त्याने अधाशासारखे प्यायले आणि पूर्ण उलटी केली. खबर्दारी म्हणून डॉ सर्वीसला फोन केला, तर नर्स म्हणाली, आतच्या आता हॉस्पिटल मध्ये जा. मध्येच जाताना शंका आली तर ९११ ल फोन करा. परत गेलो. त्याला काही रेडीओ-अ‍ॅक्टीव सोलूशन प्यायला लाऊन एक्स रेज काढले की कुठे अडकले आहे ते कळेल. नशीबाने गळ्याजव़ळ होते. रात्री भूल देऊन काढावे लागले. ह्या सर्व प्रकरणात मुलगा इतका रडला की बघायला नको.
अतिशय तणावाचा दिवस होता, नशीबाने त्यातून कॉप्लिकेशन्स न होता सर्व पार पडले. डॉ ने काय काय होऊ शकते हे सांगून घाबरवलेच होते.

Pages