लहान मुलांनी नाका-तोंडात वस्तू घालण्याचे अपघात

Submitted by रुणुझुणू on 8 July, 2012 - 06:45

कालचा प्रसंग. म्हणाल तर विनोदी, म्हणाल तर "भगवान का लाख लाख शुक्र है के अनहोनी टल गई" प्रकारातला....

काल लेक शाळेतून आला. शाळेत निघताना टापटिपीत निघायचं आणि येताना मात्र शिमग्याच्या सोंगासारखं यायचं, हे रोजचंच झालंय.
जाताना आत खोचलेला शर्ट परत येईपर्यंत अर्धा बाहेर, शर्टवर कमीत कमी दोन (आणि जास्तीत जास्त कितीही !) डाग, दिवसाआड एका नवीन जागी खरचटल्याच्या खुणा, मस्ती करून करून थकलेला पण तरीही प्रफुल्लित चेहरा, हातात एखादं छोटंसं फूल किंवा चित्र आणि कधी एकदा घडलेलं रामायण आईला सांगतो असा आविर्भाव....

कालही तसंच.
आल्या-आल्याच जाहीर केलं,

"आई, थांब. इथेच उभी रहा. मी तुला नाकातून एक गंमत काढून दाखवणार आहे " Uhoh
"ई...हे काय आता नवीनच..."

माझा चेहर्‍यावरच्या एक्स्प्रेशन्सकडे संपूर्ण दुर्लक्ष करून लेकाने आपलंच घोडं पुढे दामटवलं.
"थांsssब. दाखवतो तुला. जरा धीर धर."

एका नाकपुडीत बोटांची चिमट घालायचा प्रयत्न चालू होता.

आता मात्र मी वैतागले.
"काय आहे सांगशील का ? काही गेलंय का नाकात ?" असं म्हणत मी त्याचं नाक तपासलं.
कुठे काही दिसेना.

त्याचा प्रयत्न चालूच.
"गेssलं नाहीsये. थांब तू."

अजून आम्ही दारही लावलं नव्हतं. त्याच वेळी तीर्थरूप आले (चिरंजीवांचे !)

"ए, काय चाल्लंय रे? नाकात बोटं का घालतोयस ? आणि तू पण काय बघत बसलीयेस ? "

"अरे, तो सांगतच नाहीये. नुसतंच थांब थांब म्हणतोय. नाकात पण काही दिसत नाहीये."

लेकाकडे लक्ष गेलं तर त्याचा चेहरा आता रडवेला झाला होता.
"अरे, हे बाहेर का येत नाहीये ?"

आता मात्र आमची चांगलीच तंतरली.

"पिलू, काय घातलंयस नाकात ?" असं म्हणत मी तपासण्यासाठी पुन्हा नाकाला हात लावला तर दुखण्यामुळे तो हातही लावू देईना.
"आ...आss..."

तेवढ्यात नवरोबांनी प्रसंगावधान दाखवून त्याला एक नाकपुडी बंद करून दुसर्‍याने श्वास बाहेर सोडायला लावला आणि दुसर्‍या उच्छवासासोबत एका प्लॅस्टिकच्या कागदाच्या सुरळीने टुणकन बाहेर उडी मारली !

त्याचं दुखायचं थांबलं होतं. पण तरीही चेहरा अजून वैतागलेला होता.
"काय आहे हे ?"
" मायलोच्या स्ट्रॉला लावतात तो प्लॅस्टिकचा कागद..."
"तो कसा गेला नाकात ?"
"मी घातला..."
"का ?"
" मला रा-वन मधल्या शारुख खानसारखं नाकातून लांब प्लॅस्टिकची दोरी काढून तुम्हाला सरप्राईज करायचं होतं." Angry :डोक्याला हात लावलेली बाहुली :

त्याचं स्पष्टीकरण ऐकून आम्हाला एकीकडे हसायला येत होतं आणि एकीकडे राग येत होता.
मग "असं करणं किती डेंजर असतं " ह्या विषयावर जरावेळ त्याचं बौद्धिक घेतल्यावर सगळा प्रसंग निवळला.

नंतर विचार करताना लक्षात आलं की बहुतांश मुले नाकात काहीतरी वस्तू (शेंगदाणा, वाटाणा, चुरमुरा, गोटी हे त्यातले प्रमुख पाहुणे) घालण्याचा प्रकार करतात, पण तो साधारण दोन ते चार वर्षे या वयात.
आमच्या महाभागाने त्या वयात काही केलं नाही आणि आत्ता सहा वर्षे पूर्ण व्हायच्या, तुलनेने कळत्या वयात हा प्रयोग केला.

मग आठवलं, तो २-३ वर्षाचा असताना एकदा असंच खिदळताना पाणी पीत होता.
ते पाहून त्याला खाद्यपदार्थांचा आणि हवेचा मार्ग वेगवेगळा असतो हे चित्र काढून समजावून सांगितलं होतं.
आणि खाताना किंवा पिताना चाळे करू नयेत, नाहीतर हे मार्ग चुकून गंभीर अपघात होऊ शकतात हे ही सांगितलं होतं.

तिथे आमची विसूकाका आणि टकुमावशीची पहिली भेट झाली. Happy

तेव्हाचा संवाद.

" हे बघ, पाणी किंवा खाऊ इसोफेगसमधून आत जातं आणि हवा ट्रकियामधून आत जाते "
मी शास्त्रशाखेच्या विद्यार्थ्याला सांगावं इतक्या सहजपणे सांगितलं होतं.

पण आमचा विद्यार्थी अजून बोबड्या बोलांमधून सुद्धा बाहेर आला नव्हता Lol
"हवा कचातून ज्याते ?"
"ट्रकिया"
"-----"
"आनि खाऊ कचातून ज्यातो ?"
"इसोफेगस"
"-----"
"पलत शांग" Uhoh

मग त्याला चित्रे काढून दाखवली.
आणि नावं लक्षात यावी म्हणून इसोफेगसचं (अन्ननलिका) "विसूकाका" आणि ट्रकियाचं (श्वासनलिका) "टकुमावशी" असं बारसं करून टाकलं ! Lol

मग नंतरही अधनंमधनं हे दोन नातलग आमच्या गप्पांमध्ये डोकावू लागले.
त्यांच्या सोबतच मग हळुहळू "स्टमकपंत" "ब्लॅडरपंत" "रेक्टमपंत" ह्या मेंब्रांची देखील भरती झाली.

पण गेल्या महिन्यात रा-वन चित्रपट बघताना, ते रोबॉटिक जी-वनकाका नाकातून चमकदार केबल काढून करिनाकाकूला दाखवतात, हा प्रसंग पाहत असताना "ई...यक्क..." असल्या प्रतिक्रियांच्या गोंधळात " हे सगळं खोटं असतं हं, आपण असं करायचं नाही " हे परवलीचं वाक्य उच्चारायचं राहून गेलं....आणि त्याचा परिणाम काल दिसला.

नंतर दिवसभर अधनंमधनं लेकाच्या नाकात डोकावून पाहणं चालू होतं ! Lol

********************************************************************************************************************

असल्या प्रसंगातून सगळं आलबेल झालं तर नंतर हसायला विषय मिळतो.
पण काहीवेळा अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
सध्या माझ्या सोबत काम करत असलेल्या एका मैत्रिणीचा मुलगा पाचव्या वर्षी, खेळताना चोकिंग होऊन जागीच दगावला. Sad

बर्‍याचदा अशावेळी पालक स्वतःच घाबरतात, गोंधळून जातात.
श्वासाचा मार्ग बंद झाला तर अवघ्या ४-५ मिनिटात मेंदूला इजा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने काही प्राथमिक गोष्टींची माहिती ठेवली तर एखाद्याचे प्राण वाचवले जाऊ शकतात.

अशावेळी काय करू नये ?

१. मूल स्वतःहून खोकत असेल तर खोकला थांबवायचा प्रयत्न करू नये.

२. वस्तू दिसत नसेल तर किंवा खूप आत दिसत असेल आणि मूल शुद्धीवर असेल तर ती वस्तू काढायच्या फंदात न पडता सरळ दवाखाना गाठावा. तिथे असलेल्या वेगळ्या साहित्याच्या मदतीने डॉक्टर अशी वस्तू जास्त सुरक्षित रितीने काढू शकतात.

३. नाकातील वस्तू काढण्यासाठी चुकूनही तपकीर हुंगवू नका.

स्पष्टिकरणः शिंक येण्या आधी एक जोरदार श्वास आत घेतला जातो. छोटा शेंगदाणा, मणी इ. नाकातील वस्तू त्या श्वासाबरोबर श्वासनलिकेत जाऊ शकते. असे झाल्याने एक मायनर इन्सिडेंट मेजर लाईफ थ्रेट मधे परिवर्तीत होतो. (नशीबाने आजकाल तपकीर ओढणारे सहसा मिळत नाहीत.)

४. नाकातील गोलाकार व टणक वस्तू : जसे मणी, चिकूची/सिताफळाची बी. घरी काढण्याचा प्रयत्नही करू नका. - चिमट्यात धरता येत नाही. अधिक खोल जाऊ शकते.

५. मूल अतीशय शांत व को-ऑपरेटिव्ह असल्याशिवाय इतरही वस्तू काढण्याचा प्रयत्न घरी करू नका. वस्तू आत खोलवर जाण्याचा वा नाकात रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. घोळणा अगदी सहज फुटतो.


अशावेळी काय करावे ?

१. मुलाला खोकला काढायला सांगावे. ह्यामुळे हवेचा दाब तयार होऊन संबंधित वस्तू बाहेर फेकली जायला मदत होते.

२. नाकाने श्वास आत ओढण्याचे टाळून तोंडाने श्वास घ्यायला सांगावे. नाकाने श्वास आत ओढला तर वस्तू सुद्धा आत ओढली जाण्याचा धोका असतो.

३. कुठल्या नाकपुडीत वस्तू अडकली आहे हे नक्की माहीत असेल तर त्याच्या शेजारील नाकपुडीवर बोट ठेवून श्वास बाहेर सोडायला सांगावा, असे केल्याने वस्तू बाहेर फेकली जायची शक्यता वाढते.

४. हेम्लिक / हॅम्लिक मॅन्युव्हर (Heimlich maneuver) करता आले तर उत्तम.

heimlich maneuver.jpg

५. कुठल्याच उपायांचा फायदा होत नसेल तर त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा प्रयत्न करावा.

६. वरील प्रकारांनी वस्तू बाहेर निघाली असेल तरी नंतरचे काही दिवस खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वासाचा आवाज येणे, ताप ह्यासारख्या लक्षणांवर लक्ष ठेवावे. कारण क्वचित एखादा तुकडा आत जाऊन न्युमोनिया व्हायची शक्यता असते.

७. अधूनमधून मुलांना 'विसूकाका' आणि 'टकुमावशी' च्या अस्तित्वाची आठवण करून द्यावी Happy

त.टी.-
१. प्रचि जालावरून साभार.
२. 'अशावेळी काय करू नये' मधील महत्वाचे मुद्दे क्र. ३ ते ५ सुचवल्याबद्दल डॉ. इब्लिसना धन्यवाद. Happy

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा प्रसंग जरा वेगळा - डोळ्यात लोखंडाचा कण जाणे या स्वरुपाचा आहे.
मित्राची लहान मुलगी (५-७ वर्षे वयाची) लोखंडाचे काही कटिंग, वेल्डिंग वगैरे पहात उभी होती. एक लोखंडाचा कण डोळ्यात उडाला. ती मुलगी डोळा झाकून पळाली व घरचे ओरडतील म्हणून मैत्रिणीकडे थांबली. संध्याकाळी घरच्यांनी शोधले तर डोळा झाकून बसलेली. ती मुलगी डोळ्याला हात लाउ देत नव्हती. नेत्र तज्ञाकडे नेल्यावर त्याने तपासून पाहिले व सांगितले की तो कण अगदी वरच्या थरातच आहे - काळजी करु नका - काढण्याचे दोन मार्ग आहे - १] स्पेशल, अनुभवाचा, अगदी किरकोळ खर्चाचा व लगेच करता येणारा २] भूल देऊन काढणे रु. १००० व वेळ लागेल असा.
सगळ्यांचा विश्वास संपादन करुन डॉ.ने पहिला उपाय केला.
सर्व नातेवाईकांना (आईवडिलांसकट) रुमच्या बाहेर काढले. डॉ. व सहाय्यक आतमधे. सर्व बाहेर गेल्यावर त्या मुलीला एक जोरात मुस्कटात मारली - ती मुलगी एवढी गोंधळली व जोरात भोकाड पसरणार - नेमक्या त्याच क्षणी, त्या मुलीच्या लक्षात यायच्या आत - क्षणार्धात डॉ. ने एका शार्प सुईने अतिशय सफाईने तो कण बाहेर काढला. डोळ्यात अँटिबायोटिक टाकून डोळा बँडेजने बंद केला. चार-पाच दिवसात ती मुलगी व्यवस्थित पाहू लागली. डॉ. चा अनुभव (चलाखी का प्रसंगावधान) हा असा काम करुन गेला.

हॉरीबल ..... काय डॉक्टर आहे......

रच्याकने....

मागे कॉलेजला असताना माझ्या मित्राच्या हाताचे नख सायकलच्या कुलुपात अडकुन विचित्र तुटले. रक्त यायला लागलं. आम्ही घाबरुन कॉलेजच्या जवळच्या डॉक्टर कडे गेलो. त्याने आधी आम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींना बाहेर काढले. त्याला म्हणाला रडु नको तिकडे बघ, आणि काही कळायच्या आत चिमट्याने त्याचे उरलेले नख अक्षरशः ओढुन काढले. आमच्या मित्राने जी खच्चुन बोंब मारिलिये......

त्या मुलीच्या लक्षात यायच्या आत - क्षणार्धात डॉ. ने एका शार्प सुईने अतिशय सफाईने तो कण बाहेर काढला. >>> खरोखरच हॉरीबल. अंगावर काटा आला वाचुन. डॉ. लोक अशी पण रिस्क घेतात? बापरे....

बाप रे Sad मोकीमी
मी लहान असताना... माझा एकदम पुढचा दुधाचा दात भयंकर हालत होता, ऑलमोस्ट पडायलाच आला होता.... माझ्या काकुच्या मैत्रिणीला मी कौतुकाने दाखवायला गेले तिने असंच इकडे-तिकडे बघ म्हणून टचकन टिचकी मारली त्या हालत्या दातावर.. क्षणार्धात तुटुन हातात. बरं वाटलं होतं मला तेव्हा.. पण.
कारण खूपच हालत होता तो, आणि पडत नव्हता. पण हे असले उपाय अघोरीच. Sad

काही कळायच्या आत चिमट्याने त्याचे उरलेले नख अक्षरशः ओढुन काढले. आमच्या मित्राने जी खच्चुन बोंब मारिलिये......

फक्त कल्पनाही केली तर मलाही आता जोराने बोंब माराविशी वाटतेय. नख ओढुन काढणे कसला टॉर्चर करणारा प्रसंग आहे, शत्रुच्या तावडीत सापडल्यावर खरे बोलायला लावणार्‍या टॉर्चर पैकी एक Happy

लहान मुलांचेच किस्से लिहीने अपेक्षीत आहे का Uhoh मी स्वतः लहान असतानाचा लिहीते Wink

द्त्ताचे शिंगवे या छोट्या गावात गेलो होतो. मी ४-५ वर्षांची असेल. बस स्टॅन्ड म्हणजे रोडवर येउन थांबने.. बराच वेळ बस आली नाही मग आम्ही खेळत होतो. माझ्या फ्रॉकचा मनी खेळता खेळता हातात आला.. मग अस्मादिकांनी सहज चाळा म्हणून नाका जवळ नेउन मोठा श्वास घेतला. गेला मनी सरळ नाकात. अस्वस्थ वाटायला लागल्यावर आई-बाबांना सांगितले.. मग रस्त्यावर येणार्‍या ट्रकला बाबांनी थांबवुन.. आमची वरात ट्रकमधे डॉक कडे.. आणी मनी निघाल्यावर जे काही हुश्श झाले.. ते अजुनही आठवते Proud

लहान मुलांवर बारीक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवे. त्यांची डोकी कुठे धावतील सांगता येत नाही.
मागच्या आठवड्यात माझी वाहिनी काही विशेष आजारावर डॉक कडून औषधे घेऊन आली होती. जेवणाच्या आधी घ्यायच्या गोळ्या असल्यामुळे मी आणि आईने तिला २/३ वेळा विचारले कि गोळी घेतलीस का? माझे कन्यारत्न ( ३ वर्ष) हे ऐकतय हे माझ्या गावीही नव्हते. माझ्या वाहिनीने गोळ्यांचे पाकीट काढले आणि ती पाणी घ्यायला उठली. त्या दोन क्षणात कन्यारत्न पाकीट घेऊन नुसतेच पळाले नाही तर त्यातली औषधाची गोळीही तोंडात गेली. नशिबाने लगेच लक्षात आले आणि ती गोळी गिळायच्या आत तोंडातून बाहेर काढली. नंतर तिच्या रडारडी वरून कळले कि तिला गोळी म्हणजे चोकलेटची गोळी वाटत होती आणि ती हवी हा हट्ट चालूच होता.
माझ्या अत्तेबाहीनीने लहानपणी बीअर च्या बाटलीत ठेवलेले रॉकेल प्यायले होते, त्याची आठवणही झाली.
एकंदरीत काय लहान मुलांसमोर जपून बोलायला हवे आणि त्यांना काय खायचे डोहाळे लागतील ते सांगता येत नाही Happy

अरे, बर्‍याच जणांच्या पोतडीतले अनुभव बाहेर आलेत की.....

धमाल (आणि भितीदायकही) किस्से आहेत एकेक. Lol

सावली,
सीपीआरबद्दल लिहिते. आज दिवसभर जामच बिझले होते. सकाळपासून लॉग इन करायलाही जमलं नाही.
सवड झाली तर आज रात्री, नाहीतर उद्या लिहिते. Happy

चांगल लिहीतेस ग रुणू.. सोप्या भाषेत अन रंजकही. Happy

हे भगवान.. मुलांना सांगू सुध्दा नका असे प्रसंग. सावधानगिरी सोडून...

मी लहानपणी (२ वर्शे) दाढीची ब्लेड चघळायला सुरवात केली होती. आईचे लक्ष गेल्यान दाढेतून वगैरे पदराचा बोळा घालून घालून कण काढले म्हणे... मग काय केळ्यांचा मारा..
लेक - १. लहान बटाटा घश्यात - उं. उं करायला लागली म्हणून लक्ष गेल अन काढला..
२. दाढीब्लेड हातावर मारली (१.५ वर्षे)
सायकल मधे पाय .. इ.इ...

डोळ्यात तेल घालून लक्ष दयाव लागत हेच खर. ...

@ रुणुझुणू :
खाली दिलेले प्लीज अ‍ॅड करणार का?
जे अनुभव लिहिले आहेत, त्यात हिरॉइकली फॉरेन बॉडीज काढण्याच्या कथा फार आहेत.

>>अशावेळी काय करू नये ?

१. मूल स्वतःहून खोकत असेल तर खोकला थांबवायचा प्रयत्न करू नये.

२. वस्तू दिसत नसेल तर किंवा खूप आत दिसत असेल आणि मूल शुद्धीवर असेल तर ती वस्तू काढायच्या फंदात न पडता सरळ दवाखाना गाठावा. तिथे असलेल्या वेगळ्या साहित्याच्या मदतीने डॉक्टर अशी वस्तू जास्त सुरक्षित रितीने काढू शकतात.
<<

३. नाकातील वस्तू काढण्यासाठी चुकूनही तपकीर हुंगवू नका.

स्पष्टिकरणः शिंक येण्या आधी एक जोरदार श्वास आत घेतला जातो. छोटा शेंगदाणा, मणी इ. नाकातील वस्तू त्या श्वासाबरोबर श्वासनलिकेत जाऊ शकते. असे झाल्याने एक मायनर इन्सिडेंट मेजर लाईफ थ्रेट मधे परिवर्तीत होतो. (नशीबाने आजकाल तपकीर ओढणारे सहसा मिळत नाहीत.)

४. नाकातील गोलाकार व टणक वस्तू : जसे मणी, चिकूची/सिताफळाची बी. घरी काढण्याचा प्रयत्नही करू नका. - चिमट्यात धरता येत नाही. अधिक खोल जाऊ शकते.

५. मूल अतीशय शांत व को-ऑपरेटिव्ह असल्याशिवाय इतरही वस्तू काढण्याचा प्रयत्न घरी करू नका. वस्तू आत खोलवर जाण्याचा वा नाकात रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. घोळणा अगदी सहज फुटतो.

यावर माझ्याकडे खूप आहे लिहायला.

मी लहान असताना नाकात पाटीवरच्या पेन्सिलीचा तुकडा घातला. बाहेर खेळत होते. तुकडा घातला नि नाक वर ओढले. जाम आत जाऊन रुतून बसला. मग ठणाणा सुरु केला. आई तेव्हा माहेरी होती नि आजोबा डॉक्टर. त्यान्चा दवाखाना घराजवळच होता. लगेच अस्मादिकान्ची रवानगी तिथे झाली.

अजून, इतकी वर्षे झाल्यावरही मला दोन नर्सेसनी टेबलावर दाबून धरलेले नि चिमट्याने अथक प्रयत्न करून तो काढणारे आजोबा आठवतात. अगदी घामाघूम झाले होते सगळेच. भरपूर दुखल नि वर नाकातून नन्तर रक्तही आलेल Sad

हा काहीतरी खानदानी रोग असावा. कारण नन्तर खूप वर्षानी न्यूयॉर्कला आल्यावर लेकीनेही हाच पराक्रम केला. मी नि दोन्ही मुल टी व्ही बघत होतो. मुलाने कुकीज मागितल्या म्हणून दोन सेकन्दासाठी उठले असेन.

बाईसाहेबानी(वय वर्ष तीन) तेवढ्या वेळात सुईचे प्लॅस्टिकचे गोलाकार कव्हर नाकात घातले. 'मॉमी, आय कान्ट ब्रीद' ऐकले नि हात आपोआपच ९११ कडे गेला. मग धावपळ, अँम्ब्युलन्स, सारे सोपस्कार होऊन दवाखान्यात पोचलो तर इमर्जन्सी डिपार्टमेन्टमधली खेळणी बघून मॅडम टुणकन उडी मारून खाली उतरल्या नि खेळायला सुरुवात. श्वास घेणे व्यवस्थित. तो तुकडा मात्र निघेना.

एका पोरगेल्याशा तरूण डॉक्टरने दोन सेकन्दात तो बाहेर काढला. वर लेकीच्या गालाला हात लावून म्हणाला, 'तुला मला भेटायच होत तर इतक सगळ करायची गरज नव्हती. तू इतकी गोड आहेस की मी तसाही तुला भेटलो असतो.'

अनघा, दाढीचं ब्लेड....बापरे Sad

इब्लिस, तुम्ही सांगितलेले मुद्दे लेखात घातले आहेत. धन्यवाद Happy

मधुरिमा आणि बाकी सगळेच....इतके व्हरायटी अनुभव ऐकण्यात आले नव्हते. आता जास्त सवध राहता येईल.
आता वाटतंय, तुम्हा सगळ्यांच्या तुलनेत मी लहानपणी बरीच सज्जन होते Wink
('होते' शब्द अधोरेखित :फिदी:)

रुणू.. Proud
मधुरिमा.. खरंच मुलांकडे लक्ष सतत द्यावंच लागतं ..
एक मैत्रीण म्हणायची,' आपल्याला जर घरात कुठे कुठे डेंजरस वस्तू आहेत ते शोधायचं असल्यास रांगत्या बाळाला जमिनीवर ठेवा..ते रांगत बरोब्बर त्या वस्तू, कोपरे लगेच हुडकून काढते"..

CPR - Cardiopulmonary resuscitation / बेसिक लाइफ सपोर्ट :

ही पोस्ट वाचताना बर्‍याच जणांच्या मनात "आम्ही डॉक्टरही नाही आणि नर्सही नाही. मग हे आम्ही कशाला वाचायचं ? " असा प्रश्न येण्याची शक्यता आहे.

पण प्रत्येक व्यक्तीला बेसिक लाइफ सपोर्ट्बद्दल जुजबी माहिती असणं गरजेचं आहे. वेळ-प्रसंग काही सांगून येत नाही. आणि हे शिकणं, वाटतं तितकं अवघडही नाही.

प्रगत देशांमध्ये प्रत्येक पालकाला, नर्सरी चालवणार्‍या शिक्षकांना, पोहणं शिकवणार्‍या शिक्षकांना बेसिक लाइफ सपोर्टचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला जातो. काहीवेळा असं शिक्षण अनिवार्यही असू शकतं.

ह्याचा कुठेकुठे उपयोग होऊ शकतो ?

१. वीजेच्या उपकरणांमुळे लागणारा शॉक
२. श्वास गुदमरणे - वस्तू गिळल्यामुळे, जेवताना अन्नाचा कण अडकल्याने, औषधाच्या गोळ्या अडकल्याने
३. विषबाधा
४. पाण्यात बुडणे (ड्राउनिंग)
५. एक वर्षाच्या आतील मूल अचानक निश्चल होणे (SIDS-Sudden Infant Death Syndrome)
६. अतिरक्तस्त्राव होऊन मूल बेशुद्ध होणे
७. डोक्याला मार लागून मूल बेशुद्ध होणे
८. तीव्र अ‍ॅलर्जी

(List is not exhaustive)

सीपीआर कधी करू नये?

मूल जर शुद्धीवर असेल, खोकत असेल, श्वास घेत असेल तर सीपीआर करू नये.

नेमकं काय करायचं ?

सीपीआर करतानाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत - CAB
C - Circulation / Compressions - छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देऊन हृद्याचे कार्य चालू ठेवण्यास मदत करणे
A - Airway - श्वासाचा मार्ग मोकळा आहे ना, ह्याची तपासणी करणे
B - Breathing - कृत्रिम श्वास देणे

बर्‍याचदा अपरिचित व्यक्तींना तोंडाने श्वास देण्यासाठी (Mouth-to-mouth breathing) लोक कचरतात.
जंतुसंसर्गाची भिती, बेशुद्ध व्यक्तीला झालेली उलटी किंवा तोंडातून होणारा रक्तस्त्राव, संकोच अशी अनेक कारणे असू शकतात.

त्यामुळे अमेरिकन हार्ट असोसिएशनने आता तोंडाने श्वास न देता 'हॅण्डस ओन्ली सीपीआर' (Hands only CPR) तरी केला जावा म्हणून प्रचार चालू केला आहे.

सीपीआर सुरू करण्यापूर्वी -

१. आजूबाजूच्या धोक्याचा अंदाज घ्या. उदा. - वीजेचा शॉक लागला असेल तर त्या मुलाला हात लावण्यापूर्वी विजेचं उपकरण बंद करा.

२. मूल शुद्धीवर आहे का हे पहा. त्यासाठी मुलाच्या खांद्यावर किंवा पाठीवर हलकेच थोपटून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा.
मुलाला जोरजोरात हलवू नका.
असे केल्यास घशात अडकलेली वस्तू खोलवर जाऊन स्थिती आणखी गंभीर होऊ शकते किंवा जर मणक्याला इजा झालेली असेल तर श्वासोच्छवास पूर्ण थांबू शकतो.

३. मुलाने रिस्पॉन्स न दिल्यास सीपीआर चालू करा.
सोबतच्या व्यक्तीला त्वरित वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी योग्य त्या नंबरवर फोन करण्यास सांगा.

C-Circulation / Compressions - छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देऊन हृद्याचे कार्य चालू ठेवण्यास मदत करणे.

१. मुलाला जमिनीवर किंवा योग्य अशा सपाट भागावर पाठीवर झोपवावे.

२. मुलाच्या शेजारी गुडघ्यावर बसावे.

३. मुलाच्या छातीच्या मधोमध एक तळवा पालथा ठेवावा. त्यावर दुसरा तळवा ठेवावा. (लहान मुलांमध्ये एकाच हाताचा वापर करणं योग्य)

४. हात (सीपीआर करणार्‍या व्यक्तीचे) कोपरात न वाकवता सरळ ठेवावेत.

५. एका लयीत १,२,३,४,५......३० पर्यंत मोजत, पंप दाबल्याप्रमाणे छातीवर दाब द्यावा.
एका मिनिटात साधारण १०० कम्प्रेशन्स होतील अशा वेगात करावे.

Chest compressions-CPR.jpgA-Airway - अर्थात श्वासाचा मार्ग मोकळा आहे ना, ह्याची तपासणी.

१. मुलाची हनुवटी उचलून आणि कपाळ थोडंसं मागे दाबून श्वास घेण्याचा मार्ग मोकळा करण्यास मदत करावी.

२. मुलाच्या छातीच्या हालचालीकडे लक्ष देऊन श्वास चालू आहे का ते पहावे.

B-Breathing - कृत्रिम श्वास देणे

१. मुलाचा श्वास चालू नाही अशी शंका आल्यास मुलाच्या तोंडावर आपले तोंड ठेवावे.

२. मुलाचे नाक चिमटीने बंद करावे.

३. एका सेकंदाला एक अशा पद्धतीने दोन श्वास आत सोडावेत.

Mouth breathing-CPR.jpg

वैद्यकीय मदत मिळेपर्यंत ३० चेस्ट कम्प्रेशन्स - २ श्वास - पुन्हा ३० कम्प्रेशन्स - २ श्वास हे चक्र चालू ठेवावे.

मूल शुद्धीवर आल्यावरही तपासणीसाठी डॉक्टरकडे घेऊन जावे.

********************************************************************************************************************

ही पोस्ट वाचून कृपया कुणी घाबरून जाऊ नका.
ह्याचा उद्देश आवश्यक माहिती देणं इतकाच आहे Happy

भारतात असलेल्यांना हे फारच नवीन किंवा त्यांनी शिकण्यासाठी अनावश्यक प्रकरण वाटण्याची शक्यता आहे. पण युके, अमेरिका किंवा इतरही प्रगत देशांमध्ये राहणार्‍यांना ही माहिती सतत कानावर पडत असेल.
तिथे शाळेतील मुलांनासुद्धा काहीवेळा सीपीआरचं प्रशिक्षण देतात.

ब्रिटिश रेड क्रॉस संस्थेचा हा एक सोप्पा व्हिडिओ.

सोप्या भाषेतील आणखी काही लिंक्स :
१. http://www.nlm.nih.gov/medlineplus/ency/article/000012.htm
२. http://kidshealth.org/kid/watch/er/cpr.html?tracking=K_RelatedArticle#
३. http://www.mayoclinic.com/health/first-aid-cpr/FA00061

रुणु, धन्यवाद, सीपीआर बद्दलची माहिती पण उत्तम आणि उपयुक्त आहे.

ही माहिती वेगळा धागा काढुन लिहावी असे मला वाटते. इथे ही माहिती आहे पण शोधायला कठिण जाईल.

माफ कर माझ्या सततच्या रिक्वेस्ट्स बद्दल पण इतक्या महत्वाच्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांना/पालकांना माहित असणे आवश्यक आहे असे वाटते.

तु सोप्या शब्दात माहिती देतेस ती नेटवरच्या जड जड मेडिकल टर्म्स वापरून लिहीलेल्या माहितीपेक्षा समजायला जास्त सोपी असते Happy

सॉरी, अजुन एक रिक्वेस्ट - अगदी नवजात्/वर्षापेक्षा लहान बाळांना सीपीआर देण्याची पद्धत थोडी वेगळी असते. ती देखिल लिहीशिल का प्लिज?

लाजो, निवांत पाटील.....वेगळा धागा काढायला माझी हरकत नाही.
पण आता माबोकर मंडळी मला धरून मारतील, काय ' आरोग्य आरोग्य ' चालवलंय ह्या अंबिकेने म्हणून Lol

.....की ह्याच लेखात वाढवू ? पण फार मोठा लेख झाला तर वाचायला कंटाळा येईल ना.

माफ कर माझ्या सततच्या रिक्वेस्ट्स बद्दल >>
माफी कसली मागतेस गं ?
मीच बिचकतेय की लोकांवर इमोशनल अत्याचार नको इतक्या लेखांचा Happy

नवजात बाळांचं लिहिते गं उद्या.

अगं अंबिके Happy रुणु, तु इथे लिहुन जी मोठी मदत करतेस ना त्याबद्द्ल आम्ही तुझे आभार मानायला हवेत तुला मारायला नाही Happy

वेगळा धागा काढलास तर उलट फायदाच होइल सगळ्यांना तुला धन्यवादच मिळतिल Happy

कालच एक किस्सा ऐकला, शाळेत तिसरीतल्या मुलाने सिपरच्या वॉटरबॅग मधुन इतके जोरात पाणी प्यायले की सिपरचे वरचे बुच डायरेक्ट घशात Uhoh
टिचरची तारांबळ, गोंधळ, डॉक्टरकडे धावाधाव इ. झाल्यावर यथावकाश ते बुच पोटात विसावल्याचे कळाले. आता रोज सकाळची ड्युटि आईबाबांना. Sad

ओक्के. काढते आज नवीन धागा.
आणि धन्यवाद नका रे देऊ......इदं न मम ! Happy
मी फक्त शास्त्रीय माहिती आणि लोक ह्यांच्यामधले अडथळे काढायचा प्रयत्न करत आहे.

मोनाली, बापरे......ते बूच बाहेर आल्याचं कळव प्लीज किंवा दुसरं काही करावं लागलं तर तेही लिही नंतर.

आपण खाताना काही बोललो अथवा हसलो तर आपल्याला खोकला येतो. थोडेसे पाणी पिल्यावर सगळे नीट होते.
मला असे विचारायचे होते की अशी भाताची शिते चुकुन श्वासनलिकेत गेली तर पुढे काय होते?
काल मुलीला वरणभात भरवत असताना अचानक तिला खोकला लागला. काहीतरी अडकले घश्यात. पण यावेळी तिला खुप जास्त अऩकंफर्टेबल वाटत होते. मी पाठीवरुन हात फिरवुन पाणी प्यायला दिले. नंतर ती एकदम नॉर्मल झाली. पण असे शित समजा श्वासनलिकेत गेले असेल तर काही धोका असतो का?
खरे तर आपण इतके वाचत असतो नेट्वर की घाबरायला होते. आता हे चांगले की वाईट माहिती नाही. पण इथे योग्य सल्ला मिळेल असे वाटले म्हणुन इथे विचारले.

आस, घाबरू नका.
तिला खोकला आला ह्याचाच अर्थ तिच्या शरीराच्या संरक्षणयंत्रणेने ते भाताचं शित बाहेर ढकलून टाकायचा प्रयत्न केला. ते शित कदाचित कुठेतरी उडून पडूनही गेलं असेल.
ती नॉर्मल झाली म्हणजे काही धोका नसावा. Happy

फक्त पुढचे काही दिवस ताप, श्वास घ्यायला त्रास वगैरे गोष्टींवर लक्ष ठेवा. अशी लक्षणे जाणवली तर डॉक्टरकडे घेऊन जा आणि तेव्हा ह्या भाताचं शित अडकण्याच्या प्रसंगाचा उल्लेख करा.

रुणु पण असे भाताचे शीत इ. जर श्वासनलिकेतुन आत गेलेच तर त्याचे पुढील सिम्टम्स काय व त्यावर काय अ‍ॅक्शन घ्यावी याबद्दल थोडे सांगशील का?

फक्त पुढचे काही दिवस ताप, श्वास घ्यायला त्रास वगैरे गोष्टींवर लक्ष ठेवा. अशी लक्षणे जाणवली तर डॉक्टरकडे घेऊन जा आणि तेव्हा ह्या भाताचं शित अडकण्याच्या प्रसंगाचा उल्लेख करा.

हे त्यांनी आधीच सांगितले आहे @ मोनलीप
ठसका लागतो तेव्हा बहुतेकदा श्वासनलिकेत गेलेले नसते, लॅरिंक्स (स्वरयंत्र) पासूनच परत फिरते.

हे त्यांनी आधीच सांगितले आहे>> हो ते वाचले.

पण जर असे काही फुफ्फुसात गेलेच (असे जाउ शकते का?) तर काय होऊ शकते हे हवे आहे मला.

मोनाली, चुकून असा कण श्वासनलिकेत गेलाच तर शरीर तो विरघळवण्यासाठी काही पेशींचं जाळं तयार करतं. छोटासा, त्यामानाने कमी दूषित कण असेल तर फार दुष्परिणाम न होता सगळं ठीक होतं. न्यूमोनिया वगैरे झाला तर अँटिबायोटिक्स देऊन उपाय करता येतात.

पण कण मोठ्ठा असेल (उदा. - वाटाणा) तर मात्र गंभीर परिणाम घडू शकतात.
अशावेळी त्याबाजूचं फुप्फुस निकामी होतं, पेशंट दगावू शकतो.
पेशंट वाचला आणि जर त्याला अस्वस्थपणा असेल, शरीर काळं-निळं पडत असेल तर ब्रॉन्कोस्कोपी करून ती वस्तू काढण्याचा प्रयत्न केला जातो.

शक्यतो लहान मुलं आणी मोठ्यांनाही ठसका लागताच लगेच पाणी देऊ नये. ठसका पुर्ण थांबला की जरासं पाणी द्यावं.

Pages